टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
मिसळपाव - एक व्यक्तिगत इतिहास - भाग २
(पहिल्या भागात: आपण ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुळकर्णी ह्यांनी स्थापन केलेल्या मराठी संकेतस्थळापासून पुढे सुरुवात करूया. ज्ञानेश्वरंाचे स्थळ "क्रमश:" लिखाणांसाठी प्रसिद्ध होते. दर एपिसोडला भगवद्गीतेच्या एका अध्यायाचे मराठीकरण करण्याचा संकल्प सोडलेल्या ज्ञानेश्वरांचे दर लेखाशेवटी "क्रमश:" असे वाचून वाचकवर्ग कंटाळलेला होताच, पण तरीही, सदर स्थळचालकांचा हिरमोड होऊ नये, आणि फुकट वाचायला मिळते आहे, ते मिळावे, वर्गणी द्यायला लागू नये, म्हणून प्रतिसाद देतच होता. शेवटी ही "ग्यानबाची मेख" ज्ञानेश्वरांच्या लक्षात आली, आणि सदर संकेतस्थळावरील लेखन स्वत:च बंद करून त्यांनी समाधी घेतली. अशा समाधीला सध्या "वाचनमात्र होणे" असे म्हणतात. अशा समाधीतून परत येणे शक्य आहे, परंतु त्यासाठी स्थळाच्या सदस्यांनी आग्रह करणे आवश्यक आहे. असा आग्रह ज्ञानेश्वरांना कुणी केला नाही, ही तत्कालीन संकेतस्थळसदस्यांची घोडचूक आपल्याला नजरेआड करून चालणार नाही.)
इसवी सन १२०० ते १६०० : फारसे काही घडलेच नाही. नाही म्हणायला, ज्ञानेश्वराचे संकेतस्थळ विस्मृतीत गेले. मंडळी, फक्त एकाच्या लिखाणासाठी चौघांनी चालवलेले स्थळ कितीसे चालणार ? संकेतस्थळ चालायला फक्त एकाचे लिखाण चालत नाही, तर एकापेक्षा अधिक लेखक आणि अनेक वाचक आणि प्रतिसादक असावे लागतात. ज्ञानेश्वराच्या संकेतस्थळावरचे अनेक वाचक प्रतिसाद द्यावा की नाही, ह्या दुविधेत. दुसरे, सदर लेखक हा, तत्वज्ञान आणि कविता एकाच क्याटेगरीखाली लिहायचा. त्यामुळे वाचकांना समजून घेणे कठीण व्हायचे. ही परिस्थिती आपल्याला अजूनही हैराण करते, नाही का? कुणी एखादी कविता "जे ना देखे रसिक" च्या ऐवजी "गुरांतलं, ढोरातलं" ह्या क्याटेगरीत टाकलं, की साहित्यप्रेमींना काय करावं ते अजीबात सुचत नाही. आणखी एक म्हणजे, हा लेखक कुण्या "बापरखुमादेवीवरू" चे नाव प्रत्येक लेखनाच्या शेवटी सिग्नेचर म्हणून टाकायचा. सर्वसामान्य वाचकांना हे कळायचेच नाही. अजूनही, "स्वरभास्कराय नम:" म्हटले, की काही सदस्यांचा "हे स्वरभास्कर कोण? ते मिले सुर मेरा तुम्हारा वाले? ते गायक आहेत होय?" असा घोळ होतोच.
पण ह्या काळात मराठी संकेतस्थळांची दुर्दशा झाली, हे नाकारून चालणार नाही. सर्व स्थळांच्या चालकांनी संपादनाच्या बाबतीत प्यासिव्ह भूमिका घेतली. स्वत: नेमणूक केलेल्या संपादकांवर स्थळ सोपवून स्वत: बुधवार - शनिवार संध्यादि कर्मकांडात मग्न झाले. आणि हळूहळू सर्व मराठी संकेतस्थळे फारशी नियंत्रणाखाली गेली. (फारशी काय, चालकांनी नेमलेल्या ह्या संपादकांच्या नियंत्रणात पूर्णपणे गेली म्हणाना!) "मराठीतले फारशी शब्द - भाग २५६७" अशा प्रकारचे लेख येऊ लागलेत, तेव्हा वेळ गेलेली होती. सर्व मराठी स्थळे अमराठी झाली होती.
ह्या कालावधीच्या अंतास एकनाथ, तुकाराम नावाचे विडंबनकार होऊन गेले. ज्ञानेश्वराच्या साहित्याची विडंबने त्यांनी स्वत:च्या स्थळावर प्रकाशित केलीही. पण ती तेव्हा फारशी लोकप्रिय झाली नाहीत. मूळ कविताच समजून घ्यायला वाचकवर्ग तयार नव्हता (दरवेळी दुवे देऊन देखील.) मग ही विडंबने वाचायला वेळ कुणाला ? सगळे वाचक तत्कालीन चालकवर्गाच्या मर्जीत राहण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत होते. त्यावरही कडी म्हणजे एकनाथ हे विडंबनकार गाढवांना पाणी पाजणे वगैरे तथाकथित लोकोपयुक्त कामे करायचे. मंडळी, विडंबनकाराला हे शोभत नाही. मराठवाड्यातील लोकांनी त्यांना वाळीत टाकले नसते, तरच नवल! ज्ञानेश्वरांचे साहित्य लोकाभिमुख व्हावे वगैरे म्हणून त्यांतील संकल्पनांची भारुडे नामक विडंबने करणे वगैरे एकीकडे, पण सदर स्थळांवर गाढवांना देखील इतर सदस्यांसारखे वागवून त्यांना पाणी देण्याइतपत ह्या काळातील विडंबनकारांची बेतखल्लुफी वाढली होती. ला हौल बिलाकुवत !
तुकारामाचीही हीच गत ! स्वत:चे संकेतस्थळ स्थापावे, त्यावर तत्कालीन गूगलचे ऍडसेन्स टाकून अर्थप्राप्ती करवून घ्यावी असा आवली (ह्या सदस्येचे "तुकापाव" ह्या स्थळावरचे टोपणनाव सुभाषिणी असे होते, असे मंबाजींच्या लेखनातून कळते) नावाच्या सल्लागाराचा सल्ला सदर स्थळचालकाने उधळून लावला. उलट मंबाजी ह्या क्रिटिकाला स्वत:च्याच स्थळावर सदस्यत्व उपलब्ध करवून देऊन त्याने स्वत:चे घर असे निंदकाच्या शेजारी बंाधले. दुसरे म्हणजे सदर चालक, तत्कालीन लोकप्रिय संकेतस्थळाच्या विठ्ठल ह्या चालकाकडून विमान येईल, आणि आपल्याला त्या स्थळावर सदस्यत्व मिळेल, ह्या आशेतच जगत आलेला. स्वत:चे संकेतस्थळ सांभाळणे त्याला कठीण गेले, ह्यात काय नवल ? मंबाजी ह्या क्रिटिकाने शेवटी स्वत:चे रंग दाखवले. "तुकापाव"चे अख्खे विदागार पाण्यात टाकून "विदागाराचा अपघात" अशी वर मल्लीनाथी केली. पण विठ्ठलानेच त्याच्या विदागारातील कालातीत विडंबनांचे गूगलवर संचित करून त्याची लाज राखली. आणि वर विदागार तरंगल्याचा आभासही निर्माण केला. तेव्हा मंबाजीचा कात्रज होऊन, तोही "तुकापावा"वरचा आजन्म सदस्य झाला. असे असूनही, तुकारामाचे संकेतस्थळ चालले, ते नंतर स्वराज्य ह्या संकेतस्थळावरील दुवे तेथील सदस्यांनी टिचकावले, तेव्हा. (ते पुढे येईलच.)
एकच समाधानाची बाब अशी, की ह्या फारशी संकेतस्थळचालकांतच पाच कंपू निर्माण झाले. नंतर प्रत्येकांनी आपापली वेगवेगळी संकेतस्थळे उभारली. त्यांना "शाही" असे नामकरणही ह्याच काळात झाले. प्रत्येक मराठी लेखकाने आपापली "शाही" स्वीकारली. एका लेखकाने, दोन शाह्यंामध्ये मनसबदारी स्वीकारणे चुकीचे समजले जाऊ लागले. "निजामशाहीत पूर्वप्रकाशित साहित्य आदिलशाहीत प्रकाशित केलेले चालणार नाही" अशी ह्या स्थळांच्या चालकांनी भूमिका घेतली. असे पूर्वप्रकाशित साहित्य सदस्यांनी दोन अगर त्यापेक्षा अधिक स्थळांवर प्रकाशित केल्यास सरळ "डिलीट" ही कळ वापरण्यात येईल, अशा नवसाहित्यिकांना धमक्या मिळू लागल्या. त्यामुळे प्रत्येक मराठी नवसाहित्यिकाने आपापले "शाही" स्थळ निवडले. वरवर कारण देताना "निजामशाहीतील प्रशासकीय अनुमतीच्या जाचामुळे आम्ही हल्ली कुतुबशाही स्वीकारली आहे" असे जाहीर प्रतिसाद येऊ लागले. ह्या दोन्ही शाह्या एकमेकाच्या मावसभगिनी आहेत असे विचार जाहीरपणे मांडणे शक्यच नव्हते. कारण "खरडवही" हे जाहीरपणे खाजगी लिखाण करण्याचे माध्यम तेव्हा उपलब्ध झालेले नव्हते. खाजगी मतभेदांचा जाहीर कोथळा काढणे, हे "स्वराज्य" ह्या स्थळावर पहिल्यांदा शक्य झाले. (ते पुढे येईलच.)
इसवी सन १६०० (च्या आसपास): छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. मराठीचे खास असे एखादे संकेतस्थळ असावे, ह्या विचाराने उचल खाल्ली. ह्यापूर्वीच्या स्थळांमध्ये मराठी वाचकवर्ग भरपूर होता, परंतु चालकवर्ग मात्र सगळा फारशी. मराठी संकेतस्थळ एखाद्या मराठी चालकाने चालवावे, असा विचार इसवी सन बाराशेनंतर पहिल्यांदा झाला. हे संकेतस्थळ व्हावे हे तो श्रींची इच्छा, असे जाहीर करूनही बरेच दिवस "स्वराज्य" हे संकेतस्थळ अनेक वर्षे एका फारसी चालकाच्या स्थळावरील (निजामशाही ह्या स्थळावरील) कंपू म्हणून चालले. ह्या कंपूचे नायक शिवाजी भोसले ह्यांना दादोजी कोंडदेवंासारख्या जुन्या-जाणत्या सदस्यांचे सहकार्य लाभले (हे संकेतस्थळ सुरू होण्याआधी दादोजींनी "एक्स-निजामशाही" नावाचा याहू-ग्रुप सुरू केला होता, असे इतिहास सांगतो.) सदर फारशी स्थळचालकाचे लक्ष नाही, असे पाहून तोरण्याला सदर कंपूचा कट्टा झाला. आणि तेथे "स्वराज्य" ह्या नवीन मराठी संकेतस्थळाची स्थापना झाली. ह्या कट्ट्याचा वृत्तांत गोपनीय राहावा, लगेच प्रकाशित होऊ नये, ह्याची काळजी घेण्यात आली. त्यामुळे निजाम ह्या फारशी स्थळचालकाला आपल्याच स्थळावरचे सदस्य व्यनिंच्या माध्यमाने आपल्यापासून फोडण्यात आले आहेत, ह्याची काही म्हणजे काहीच जाणीव झाली नाही. (भविष्यात ह्यातून संकेतस्थळचालकांनी शिकण्यासारखे म्हणजे, स्वत:च्या स्थळावरील सदस्यंाचे व्यनि चोरून वाचत राहावे. असली बंडे लगेच लक्षात येतात.)
सदर स्थळ बरेच दिवस चालले. मध्यंतरी ह्या स्थळाच्या कारभारात खंड घालण्याचा इतर प्रस्थापित स्थळांनी बराच प्रयत्न केला. आदिलशाही ह्या स्थळाच्या चालिका बडी बेगम, ह्यांनी तर अफजलखान नावाचा एक महाभयंकर "डॉन" शिवाजीचे स्थळ मोडून काढण्यास धाडला. त्याने ह्या स्थळाच्या सदस्यांचे श्रद्धास्थान असलेल्या एका तुळजाभवानी नावाच्या सदस्येवर आपल्या घाणेरड्या प्रतिसादांतून हल्ला करून इतर सदस्यांस चिथावणी दिली. परंतु, स्वराज्य स्थळाचे चालक शिवाजी भोसले, ह्यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पुढे सदर स्थळचालकही ह्या डॉन ला घाबरून आहेत अशी बातमी त्यंानी पसरवली. शिवाजी भोसल्यांच्या खरडवहीत अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. पण ते गप्पच राहिले. शेवटी, अफजलखानाने "काव्य शास्त्र विनोद" अशा सर्व साहित्यावर आपले विखारी आणि जळजळीत प्रतिसाद टाकून स्वराज्यस्थळ मोडकळीला आणले असताना, चालकांनी त्यांना व्यनि टाकून खरडवहीत भेटूया, असे लिहिले. अफजलखानाने काही खरडी लिहिल्या, शिवाजीने काही. शेवटी, एका खरडीतच खानाचा कोथळा बाहेर पडला. सर्व सदस्यंानी तो वाचला, आणि "हरहर महादेव" असे सगळीकडून प्रतिसाद आले. काही मावळ्यंानी "हरहर महादेव" असे न म्हणता, फक्त "असेच म्हणतो" किंवा "+१" असे प्रतिसाद दिलेत. त्यांची योग्य ती खरड महाराजांनी काढलीच. सदर मावळे सध्या कुठल्याच स्थळावर नाहीत. फक्त वाचनमात्र आहेत.
ह्या स्थळांच्या स्पर्धेत सदस्यसंख्या जास्त म्हणून अधिक अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या पदपातशाही, ह्या स्थळावरून आलेल्या एका बलाढ्य सदस्याने स्वराज्यस्थळावरच्या सर्वाधिक लोकप्रिय अशा पुण्यनगरीतील एका कट्ट्यावरच आपले बस्तान जमवले. कुणीही "आहिस्ता आहिस्ता" अशा गजला केल्या, की "शाहिस्ता, शाहिस्ता" अशी त्याची विडंबने केलीत. महाराज हे सर्व बराच काळ फक्त बघत होते. शाहिस्ताच्या लेखनाचे संपादन होत नाही, ह्या सदस्यंाच्या तक्रारीकडेही त्यांनी बरेच दिवस दुर्लक्ष केले. एकदा शाहिस्त्याने आपल्या कंपूसह स्वराज्यस्थळावरच कट्टा केला. त्याची छायाचित्रे तो स्वराज्याच्या संकेतस्थळावर चढविता झाला. पण रात्रीतून बघतो काय, तर कुणीतरी प्रत्येक छायाचित्र तीन बोटे कापलेले. इतिहासप्रेमींनो, ही कारागिरी आपल्या स्थळचालकांची, बरे का ? आपली चढवलेली छायाचित्रे अशी कापलेली पाहून शाहिस्ता स्वराज्य स्थळावरून नाहीसा झाला, तो कायमचाच!
(सदर स्थळचालकांची मर्जी असेल, तर: क्रमश:)
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


दैवदुर्विलास
वस्तुनिष्ठ लेखन म्हणून विचार करता हे स्वतंत्र लेखन,लेखनशैली,त्यातून हाताळलेली ऍनॉलॉजी व तिच्यातली कल्पकता यांना दाद देतो.
(वाचक) बेसनलाडू
मात्र श्रद्धास्थाने,जात-धर्म,त्यांना धक्के लागणे,त्यांच्यावरील लेखनबंदीदी चर्चेवर चर्विचरण होत असतानाच आजच्या आषाढी एकदशीच्या मुहुर्तावर संतकवी,त्यांची आधुनिक आंतरजालीय भटक्यांशी झालेली तुलना,त्यांच्या साहित्याची ही सर्किटछाप खिल्ली उडवली जाणे,हा माझ्यासाठी तरी आजपर्यंतच्या मिसळपाववरील वावरातला सगळ्यात मोठा दैवदुर्विलास आहे.हे लेखन म्हणजे अख्ख्या भागवत धर्मावर व भागवत साहित्यावरचा आणि संतांसारख्या श्रद्धास्थानांवरचा गलिच्छ हल्ला आहे,असे मला वाटते.
संकेतस्थळाच्या मालकाचे विनंती/हुकूमबिकूम बाजूला राहू द्या;पण कुणा सोम्यागोम्याची विनंती कानी पडणार(च) असेल,तर एक करतो.पुढचे भाग प्रसिद्ध करू नकात आणि जनाची नाही तर निदान मनाची बाळगून या भागाचे प्रायश्चित करायचे बघा.अर्थात हे निवेदन/विनंती आहे;आग्रह नाही.पटल्यास पहा,नाहीतर तुमची मर्जी.पण आजवरचा हा तुम्ही केलेला सगळ्यात मोठा अपेक्षाभंग हेच खरे.किंबहुना त्याखातरच प्रियाताईच्या भयकथेचे निमित्त पुढे करून येथे पुन्हा लिहिते झालात,असे वाटते.
(सूचक)बेसनलाडू
चालू द्या ;-)
बेसनलाडू,
आपल्या प्रतिसादातून मिसळ्पावाचे नियम-कायदेप्रतिबंधित असे भविष्यातील रूप कसे असणार ह्याची नांदीच मिळते. त्यामुळे सदर पापाचे प्रायश्चित्त म्हणून आम्ही पुढचा काही वेळ एकनाथी भारुडांचे दर एकादशीला एक नवीन पॉप साँग अथवा रॅप मध्ये रूपांतर करून प्रायश्चित्त घेऊ.
सध्या "विंचू चावला" चे:
स्कॉर्पियन बिट मी
स्कॉर्पियन बिट मी
ओह माय माय माय
स्कॉर्पियन बिट मी
वगैरे लिहिण्यात सध्या मग्न आहोत..
- (एकनाथांनी दिलेले पाणी पिण्यात मग्न) सर्किट
चालू द्या ;-)
आद्य संत सर्किटमहाराज व त्यांच्या निवडक अनुयायांच्या गेंड्याच्या कातडीची नीट पूर्वकल्पना असल्याने प्रामाणिक मत नोंदव्ण्यापलीकडे काही अपेक्षा नाहीतच मुळी.कोसळ(व)णे-ढासळ(व)णे,विनोदबुद्धी वापरणे न वापरणे याच्याशी मतनोंदणीनंतरच संबंध संपतो.स्वत:चा विवेक,तत्त्वे आणि मुद्दा यांच्याशी प्रामाणिक राहिले की झाले - लेखकानेही व प्रतिसादकर्त्यांनीही
(प्रामाणिक)बेसनलाडू
अरेरे !
आमची तुलना गेंड्यांशी केलेली असण्याची जर का काही दूरान्वयाने शक्यता असेल तर त्यामुळे गेंड्यांचा अपमान होतो. तसे काही झाल्यास समस्त गेंडेजातीची मी आधीच क्षमा मागतो !
अरेरे!++
आमची तुलना गेंड्यांशी केलेली असण्याची जर का काही दूरान्वयाने शक्यता असेल तर
(ह घ्या)
असे आपणांस वाटत असण्याचे कारण कळले नाही.माझ्या लेखनातून तुमचा तसा समज झाला असल्यास तो माझ्या लेखनचा दोष किंवा/आणि तुमच्या समजुतीचा दोष याचा परिणाम समजावा.माझा तसा काही उद्देश नाही.प्रत्येकाला स्वतःच्या कातडीचा थिक्नेस् माहीत आहेच
त्यामुळे गेंड्यांचा अपमान होतो. तसे काही झाल्यास समस्त गेंडेजातीची मी आधीच क्षमा मागतो !
तुमच्या वतीने की आद्य संत श्री सर्किटमहाराजांच्या?तुमच्या वतीने असल्यास नवल आहे,त्यांच्या वतीने असल्यास त्याहून नवल आहे
(हलकाफुलका)बेसनलाडू
उपास सुटला का ?
आदरणीय बेसनलाडू,
आपला एकादशीचा उपास सुटला असल्यास आता हलके घेण्यास काहीही प्रत्यवाय नसावा, असे वाटते.
- (आद्य संत) सर्किट
प्रत्यवाय कधीच नव्हता
पण काय हलके घ्यायचे आणि किती यावर माझे मत ठाम आहेच,हे आतापर्यंत लक्षात आले नसल्यास क्षमस्व.
(क्षमाप्रार्थी)बेसनलाडू
हलकेफुलके
आदरणीय बेसनलाडू,
पुढील भागांत कधीतरी "मराठी संकेतस्थळांवरचे आद्य काका" राघोबादादा ह्यांना त्यांच्या पुतण्याने, नारायणरावाने लिहिलेल्या "काका मला वाचवा" ह्या खरडीचा उल्लेख आमच्या बेमुर्वत लेखणीतून झरण्याची शक्यता असल्याने आम्ही आपली आधीच क्षमा मागतो.
- (तुम्ही एक क्षमाप्रार्थी तर आम्ही दहा क्षमाप्रार्थी) सर्किट
त्याचे नवल नाही
आता इतकी नाटके केलीच आहात,तर करून टाकतो क्षमा!
(क्षमाशील)बेसनलाडू
निवडक अनुयायी?????
हे एक आपल्या सर्वांना पुरून उरलेले आहेत ते पुरेसे नाही काय की यांचे निवडक अनुयायीही असावेत असं वाटतंय तुला बेला.
खरं तर आद्य संत सर्किटमहाराज "एकला चालो रे" या मंत्रावर विश्वास ठेवून आहेत असे समजते. तसेच, साक्षात परमेश्वराने सर्किटमहाराजांचा जन्म झाल्यावर त्यांच्यासाठी केलेला साचा तोडून टाकला आहे त्यामुळे त्यांचे अनुयायी होऊन गादी चालवणारे कोणीही नसणार. - इति काचेच्या गोलातील भविष्य.
गादीचालक
आमचे अनुयायी (असलेच तर) एकवेळ भिंत चालवतील. (भिंतं भितो भिंताः .. प्रथमा...) पण गादी अजीबात चालवणार नाहीत.
- सर्किट
असहमत ...
>>हे लेखन म्हणजे अख्ख्या भागवत धर्मावर व भागवत साहित्यावरचा आणि संतांसारख्या श्रद्धास्थानांवरचा गलिच्छ हल्ला आहे , असे मला वाटते ...
याच्याशी असहमत आहे.
ह्यात फक्त त्या गोष्टी "एक रुपक" म्हणुन वापरण्यात आल्या आहेत. त्यात कौठे मुद्दामुन कुणाचा "अपमान" वगैरे केला ही भावना दिसली नाही. त्यामुळे "गलिच्छ हल्ला" वगैरे ला मी असहमत आहे ...
बाकी या प्रकारचे लेखन करताना कुठली नी कुठली "गोष्ट वा काळ " हा रुपक म्हणुन वापरावा लागतो ...
मग तो "मुगल , निजाम, शिवाराज्य, त्याआधीचे चंद्रगुप्त मौर्य, आजचे राजकारण " या गोष्टी वापरायला हरकत का असावी ?
त्यात ज्यांची "खिल्ली" उडवली आहे असे वाटते ती त्या "इतिहासातील व्यक्तींची " नसुन ज्यांच्यासाठी त्यांचे रुपक वापरले आहे त्यांची आहे ...
मला तर जास्त काही "आक्षेपार्ह्य" वातत नाही बाबा ...
हे झाले माझे मत, बाकीचा निर्णय आपण व इतर मॉड्स नी घ्यावा.
मी माझे मत सांगितले ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
श्री डॉन ह्यांस
सदर लेखन हे एक वैडंबन्यक्तकीय असून श्री. बेसनलाडू ह्या आमच्या मैत्राने आमच्याच शैलीत लिहिण्याचा (के) प्रयत्न केला आहे, हे सुस्पष्ट आहे.
आमच्या लेखनाला जसे कुणी गांभीर्याने घेत नाहीत त्याप्रमाणेच त्यांच्या प्रतिसादाला देखील कुणी गांभीर्याने घेऊ नये, ही त्यांची अपेक्षा आपण पार कोसळवली-ढासळवली आहे.
आपण कृपया सदर प्रतिसादाला उपप्रतिसाद देताना विनोदबुद्धी वापरावी, ही विनंती.
- (विनोदी) सर्किट
आमचा
आमचा खालचा प्रतिसाद एकदम आमच्या बॉटममधून ...म्हणजे तहे-दिलसे आलाय बरं ! शुद्ध मराठीत सांगायचे तर एकदम जेन्न्युइन ! नथिंग व्यंगात्म अबाऊट इट !
श्री सर्कीट ह्यांस ...
आपल्या प्रतिसाद पडलेला "अंमळ गंभीर" प्रतिसाद हा मुळात "गंभीर" नसुन "विनोदबुद्धी" चा आहे हे मी "विनोदबुद्धी" न वापरल्याने माझ्या लक्षात आले नाही.
येथुन पुढेचे आपल्या लेखाला प्रतिसाद देताना कुठलीही "विनोदी अपेक्षा" आमच्या "गंभीर" लेखनाने "कोसळ[व]ली वा ढासळ[व]ली" जाणार नाही अशी मी "गंभीरपणे" आपल्याला ग्वाही देतो ...
अवांतर : मुळच्या लेखातला "डॉन अफजलखान " व "डॉन म्हणजे मी" ह्यांचा "गंभीरपणे" काही "बादनारायण समंध" लाऊन लेखाविषयी असलेली आमच्या "विनोदी अपेक्षा" कुणाकडुन "कोसळ[व]ली वा ढासळ[व]ली" जाणार नाही अशीही आम्ही "गंभीर" अपेक्षा ठेवतो.
[डोंबलचा] गंभीर - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
खि खि खि
खि खि खि!!!!!!
डॉनभाऊ लै भारी बरंका! झक्कास!!
बैल
मझा आला !
मला या लेखात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही ! धो धो हसलो ! मजा आली ! लगे रहो !
सुरवातीला आधीच्या लेखाची लिन्क दिली असती तर बरे झाले असते !
आधीच्या भागाचा दुवा
http://www.misalpav.com/node/2462
हा आहे. जनरल डायरांना वेळ मिळाल्यास, सदर दुवा ह्या लेखनाच्या आधी टाकावा ही विनंती.
- (भगत) सर्किट (सिंग)
बेसनलाडू
बेसनलाडू यांच्याशी असहमत.
सर्किट, अ-फा-ट मस्त आहे. प्लीज चालू द्या.
पुर्नप्रत्यय
आधीच्या लेखाप्रमाणेच हा देखील लेख (लेखाची भाषा/विनोद) वाटल्याने पुर्नप्रत्ययाचा अनुभव आला
नवीन कल्पना आणि विनोद अजून सर्कीटशैलीत न दिसल्याने अथवा हळू हळू येत असल्याने "संथ" सर्कीट म्हणावेसे वाटतेय...
असो. तुर्तास आता आपल्याला १० पैकी किती गूण द्यावेत (गूण द्यावेत का) ह्या विवंचनेत आहे
बाकी खिल्ली उडवणे हा आपला धर्म असल्याने, हा लेख धार्मिक धरला जाऊन उडवायला का नको अशी कारणे दाखवा नोटीस मिळू शकेल, तेंव्ह अमंळ सावध असावे...
अहो
अहो विकासराव,
घर्माला बंदी आहे धर्माला नाही!
म्हणूनच म्हणतो जरा "तारतम्यानं" घ्या!
आपला,
बैल
अरे हो की!
घर्माला बंदी आहे धर्माला नाही!
म्हणूनच म्हणतो जरा "तारतम्यानं" घ्या!
अरे हो की! विसरूनच गेलो. धन्यवाद बैलोबा!
हसुन हसुन गडाबडा लोळलो!
नक्की कुणाच्या खांद्यावर दुनळी ठेउन कुणाची शिकार केलीय ते समजलं नाही तरी पण हसुन हसुन गडाबडा लोळलो!
(गडबडा लोळणारा) बैल
अवांतरः
सर्किटराव तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पायलेलाच असणार ही खात्री आहे! त्यातला तो शेवटचा शीन आठवतो का हो?
बंदुक काढल्यावर तो ज्योतिषी महाराज घाबरुन विचारतो ये क्या हे? त्यावर सर्किट म्हणतो.... "संकट"!
तुम्ही इथ अलात की आम्हला त्या ज्योतिष महाराजात तात्या दिसतो आणि तुम्ही म्हणजे "संकट" ... हेहेहे
आपला,
बैलोबा
धनाबै
तुम्ही इथ अलात की आम्हला त्या ज्योतिष महाराजात तात्या दिसतो आणि तुम्ही म्हणजे "संकट" ...
श्री. धमाल,
आपली कल्पनाशक्ती अफाट आहे, असे दिसते. परंतु आपण ह्या जालविश्वात नवीनच असल्याने, ह्याबाबतीत आपले अंमळ चुकीचे आहे. आदरणीय तात्या हे मुन्नाभाई, आणि आम्ही सर्किट ही वस्तुस्थिती संपूर्ण मराठी जालजगताला माहितीच आहे. (कोण रे तो ? तात्यांना मनमोहन आणि आम्हाला प्रकाश करात म्हणतोय ? घर्मान्ध आणि मूलतत्त्ववादी माणूस ! ह्याचे लेखन काढून टाकावे अशी स्थळचालकांना विनंती.)
- सर्किट
पुढील भागात...
पुढील भागात शिवाजींच्या संकेतस्थळाचे सातारचे आणि कोल्हापुरचे संकेत स्थळ होईल का ह्याच्या प्रतीक्षेत.....
शेखर
खो खो खो!!
सर्किटशेठ,
धन्य आहे तुमची.. काय ऍनॉलॉजी लावलीय.. जबर्या.. हा हा हा हा..
(द्राक्षासव न घेणारा)केशवसुमार
स्वगतः हा गाळिव इतिहास संपेपर्यंत ह्या माणसाने कुणाचा मार खाल्ला नाही म्हणजे मिळवलं..
मार खाऊनच
अरे, या माणसाने संकेतस्थळांबाबत इतके ज्ञानार्जन केले आहे ते सर्वांचा मार खाऊनच हे विसरलास का?
(सनावळ्या, ऐतिहासिक नोंदी तज्ज्ञ) प्रियाली
मार आणि कातडीची जाडी
अरे, या माणसाने संकेतस्थळांबाबत इतके ज्ञानार्जन केले आहे ते सर्वांचा मार खाऊनच हे विसरलास का?
"कातडी निबर करण्याचे शंभर मार्ग" हा आमचा ग्रंथ आपल्या हाती पडलेला दिसतो.
- सर्किट
जबराट
"कातडी निबर करण्याचे शंभर मार्ग" हा आमचा ग्रंथ आपल्या हाती पडलेला दिसतो.

मी ईतिहासात काठावर पास झालो होतो.. सर्किट क्लासेस मध्ये ऍडमिशन मिळेल काहो
आणि त्या ग्रंथाची सॉफ्टकॉपी मिळाली तर बघा ना राव प्लिज...
कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
छान चाललंय!
छान चाललय.
साती
इतिहासकार दादोजी कोंडदेव
ज्या नव्या सदस्यांनी "आम्हाला इतिहास माहित नाही आमची गोची होते" असं काही म्हटलं असेल त्यांनी आपापली पावलं आपापल्या तोंडात कोंबली असावीत एव्हाना.
.
हाहाहाहा!!!!
चालू द्या!
दादोजींनी लिहायला घेतलेल्या ह्या इतिहासावर खुद्द महाराजांनी अजुनतरी मौन पाळायचे ठरवलेले दिसतय! हरकत नाही..
(दुरान्यवये का होईना) पण गेंडा जमातीचा अपमान होण्याची शक्यता जमेत धरुनही आम्ही मात्र ह्याची दखल घेऊन लेख आवडल्याची नोंद ठेवत आहोत..
-कोलबेर
विचार करा
मला विनोदाचे मुळीच वावडे नाही. पण विनोदासाठी विनोद करण्याच्या इर्षेने, किंवा काहीतरी अफलातून लिहीण्याची आपल्याकडून लोकांना अपेक्षा आहे अशा वृथा अभीमानाने तारतम्य सोडून आम मराठी जनतेच्या श्रद्धा स्थळांवर सवंग लिहीणे कृपया टाळावे. आपली शोकांतीका काय आहे माहीत आहे? आपण सारे आपल्या सहिष्णूतेचा इतका जास्त बडीवार माजवतो, की आपण कसे पुढारलेले, जास्त सहीष्णू आहे हे सिद्ध करण्याची आपल्यात शर्यत लागते. ह्या विरूद्ध बाकी जग त्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थानां विषयी कोणी दुरान्वये देखील लिहीण्याचे ढाडस केले तर आग्यामोहोळ उठवतात. आणि ते बरोबरही आहे. का आपल्या श्रद्धांचे विडंबन होऊ द्यावे? बाकीच्यांना कशाला नावे ठेवावी? आपणच आपले हित लक्षात घेत नाही.
संचालकांना विनंती आहे की कुठल्याही धर्म, संस्कृती विषयी अनुदार उद्गार छापू नये. मग ते विनोद, विडंबन, कसलेही कातडे पांघरून आले असो. जर समाज सुधरणा नावा़खाली काही कळकळीचे लिहायचे असेल, तर तसा स्पष्ट उद्देश लेखनात दिसला पाहीजे. व आपले विचार न पटणार्या वाचकांचा विचार देखील त्यात केलेला दिसावा.
वरील परखड मते वाचून कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व. तसेच हे लिहीण्यात कोणावर व्यक्तीगत टिप्पणी करण्याचा उद्देश नाही. आपली श्रद्धा स्थळे थोडी देखील डागाळली जाऊ नये ही तीव्र मनीषा आहे.
आदरणीय मनोहरजी
आपल्या विचारांशी अत्यंत सहमत आहे.
आमच्या लेखनातून कुणाचीही श्रद्धास्थाने डळमळीत होऊ नयेत, अशीच आमची इच्छा आहे.
परंतु एका सामान्य संकेतस्थळाच्या एका क्षुद्र सदस्याने काहीबाही खरडले, तर डळमळीत होणारी इतर सदस्यांची श्रद्धास्थाने इतकी कमकुवत पायावर असावीत का ?
लिहिणारे काहीही लिहू देत, आमची श्रद्धा स्थाने ही आमची आहेत, आमच्या भर भक्कम पायावर ती निर्भर आहेत, आणि म्हणूनच कुणी काहीही लिहू देत, ती स्थाने आमच्या बळावर भक्कमच राहणार, अशी खात्री अद्याप ह्या श्रधास्थानांच्या पायारूपी सदस्यांत का येत नाही ? ह्याच्यावर कृपया अपली लेखणी झिजवावी ही विनंती.
उगाच आमच्यासारखा कुणी उपटसुंभ काही बाही लिहितो, आणि आपली श्रद्धास्थाने डळमळीत होतात, असे आपल्यासारख्या लोकांच्या प्रतिसादातून जाणवले, तर असे अनेक उपटसुंभ उगवतील.
असे उपटसुंभ टाळायचे असल्यास स्वतः स्वतःच्या श्रद्धास्थानांना भक्कम पाया उपलब्ध करून द्यावा ही विनंती.
अहे, शेवटी आपल्या श्रद्धास्थानांना आपणच पाया देणार नाही , तर मग कोण देणार ?
- (श्रद्धाळू) सर्किट
चुकीचा प्रतीवाद
उगाच आमच्यासारखा कुणी उपटसुंभ काही बाही लिहितो, आणि आपली श्रद्धास्थाने डळमळीत होतात, असे आपल्यासारख्या लोकांच्या प्रतिसादातून जाणवले, तर असे अनेक उपटसुंभ उगवतील.
वरील प्रतीवाद जर चालवून घेतला, तर कोणीही लुंगासुंगा उठेल आणि देवळात थुकेल. मग तुम्ही म्हणत बसा की आमचे श्रद्धास्थान अशा थील्लर कृतींनी खराब होत नाही. आम्ही बाकीची भावीक मंडळी असे कृत्य करणार्याला काय करतील ते सांगायला नकोच. तुकोबांच्याच शब्दात, "नाठाळचे काठी घालू माथा"
असे उगवलेले उपटसुंभ कमी कसे करायचे ते तुकोबांनी शिकवून ठेवले आहे.
नाठाळाचे काठी
सुंदर. तुकोबांच्या अभंगातील काही ओळी संदर्भविहीन टाकण्यची आपली शैली आम्हास आवडली.
भाविक मंडळींनी आपापली श्रध्हास्थाने अशा कमकुवत पायावर डोलारा म्हणून सांभाळायची असल्यास आमचे का ही ही म्हणणे नाही.
खुशाल चालवावीत.
- सर्किट
भाविक
भाविक मंडळींनी आपापली श्रध्हास्थाने अशा कमकुवत पायावर डोलारा म्हणून सांभाळायची असल्यास आमचे का ही ही म्हणणे नाही.
This is adding insult to injury. आता समस्त भक्तांचा पायाच कमकुवत म्हटल्या जात आहे. श्रद्धा म्हणजे काय हे समजल्याशीवाय ह्यावर बोलणे अशक्य. मला वाटते मीच थांबवावे हे बरे.
नवल
सहज आठवण झाली व कुतूहल चाळवले गेले,म्हणून येथे पाहिले;आणि दोन-एक लोकांची श्रद्धास्थाने डळमळणे महत्त्वाचे नाही तर बहुजनांची (जातीवाचक नव्हे,तर सर्वसामान्य/सगळ्या/तमाम या अर्थी) श्रद्धास्थाने डळमळली,तरच त्याला उठाव (आणि त्याविरुद्धही
)म्हणतात (आणि किंमत मिळते),हा साक्षात्कार झाला.आणि तो सुद्धा सनदशीर मार्गाने,समतोल चर्चेने वगैरे.चालू द्यात.
(क्रांतिकारी)बेसनलाडू
सहमत...
किंवा काहीतरी अफलातून लिहीण्याची आपल्याकडून लोकांना अपेक्षा आहे अशा वृथा अभीमानाने तारतम्य सोडून आम मराठी जनतेच्या श्रद्धा स्थळांवर सवंग लिहीणे कृपया टाळावे.
सहमत आहे!
आपली श्रद्धा स्थळे थोडी देखील डागाळली जाऊ नये ही तीव्र मनीषा आहे.
सहमत आहे.
अरूणराव, आपल्याशी सहमत आहे. म्हणूनच मी या भागाला कुठलाही प्रतिसाद दिला नव्हता. मी शिवछत्रपती, दादोजींचं नांव दुसर्या इतर कोणत्याही संदर्भात वाचू शकत नाही. परंतु मराठी माणसांनीच या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली आहे!
या पुढे ही लेखमाला इथे ठेवायची किंवा नाही या बद्दल सिरियसली विचार करावा लागेल...
तात्या.