भिन्न षड्जच्या निमित्ताने..

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जनातलं, मनातलं
17 Aug 2013 - 6:38 pm

ताई देवल क्लबात शिकायला जायची तेव्हा हे नाव पहिल्यांदा ऐकले: किशोरी आमोणकर.

ताईचा आवाज तेव्हा थोडा नाजुक होता, पेटीच्या आवाजातुन बाहेर येत नसे. तेव्हा गुलाबबाई म्हणायच्या अगं जरा उंच स्वर लाव की! किशोरीताईंचे ऐक जरा. त्यावेळी कॅसेट-प्लेअर वगैरे नव्हता घरी (आणि जेव्हा आला तेव्हा पहिले काही महिने सुगम संगीत, किशोर, लताबाई, गीतरामायण यांच्या कॅसेट्स ऐकण्यात गेली. त्याविषयी पुन्हा कधीतरी). शास्त्रीय ऐकणे हा प्रकार सोपा झाला नव्हता. पण कधीमधी कोल्हापुरात देवल क्लबमध्ये जेव्हा जायचो तेव्हा त्या कोंदट खोल्या, ते इरसाल, डोळा घालणारे तबलजी आणि खुंट्या मारल्यासारखी ती स्वर लावण्याची पद्धत वगैरे पाहुन (स्वर हालाय् नाही पाहिजे, काय समजायलीस!) गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेकरता विद्यार्थ्यांची फौज तयार करण्याचा हा एक घाऊक कारखाना आहे असे माझे मत झाले होते. आमच्या घरी सागाचे लाल रंगविलेले पाट होते, पितळी फुलांचे. त्यावर सहज माझी बोटे चालत. म्हणुन आई-बाबा म्हणाले की तुला तबला शिकवायचा का? मला तीन-चार वेळा धर्माधिकारी गुरुजींकडे गेल्याचे आठवते. नंतर तो उत्साह कधी ढेपाळला ते आठवत नाही पण नंतर तसाच देवल क्लबात जायचो आणि ऐकायचो.

उद्देश एकच. ताईची चेष्टा करणे. 'भज मन नीसदिन शाऽऽमसुंऽऽदर' किंवा 'आऽजी गाती जयाऽ बुधजन विमलसुरी, घेऊनी उभय निषाऽदाऽऽ' अशी लक्षणगीते ऐकली की मला भयंकर हसू येत असे. एक तर भाषा अगम्य, तिचा लेहेजा अलग. दुसरे म्हणजे ही गाणी अश्या भाषेतच का म्हणतात या माझ्या प्रश्नाला कोणी उत्तर देत नसे आणि शिक म्हणजे समजेल असा सल्ला मिळे. मराठी गाणी आवडायची, ती बहुधा सगळी देवाधर्माची रेडिओवर जी लागतील ती. शाळेत एकदा 'तोच-चंद्र-मान-भात' हे गाणे एका मोठ्या मुलाने म्हटले तेव्हा मला अज्जिबात म्हणजे अज्जिबात समजले नव्हते. वयच नव्हते तशी गाणी समजायचे!

तर शास्त्रीय गाण्याविषयी सांगत होतो. ती पढंत, शिडी चढून उतरल्यासारखे ते अलंकार, क्लिष्ट बोल-ताना आणि प्रत्येक स्वर हेलकावत दाखवुन देणारे आलापीचे ते संथ दळण. हे काही गाणे नव्हे, असे माझ्या मनाने घेतले. ताई शिकत गेली, माझे लक्ष इतर गाण्यांकडे वळले. मग ते सुटलेच, चेष्टाही आणि ऐकणेही.

रोहितदादा तेव्हा पुण्यात शिकत होता. कवीमनाचा, स्वतःच्या प्रेमात असलेला आणि छान बोलणारा. त्याने आलेला असताना एकदा आपली कवितांची वही दाखवली. त्यात काही 'प्रेम कोणावर करावे' छाप, काही सांध्यपर्वातील वैष्णवी नावाचे गोलमाल, तर काही 'माझ्या मना बन दगड' अश्या वास्तवात रुजणार्‍या कविता होत्या. काही कॅसेट्सही होत्या त्याच्याकडे. त्यातले एक गाणे ऐकुन मला कोण भुरळ पडली म्हणता! असे गाणे मी ऐकलेच नव्हते तोवर! 'हे शामसुंदर, राजसा, मनमोहना' हे ते गाणे. धारदार, चपळ स्वर, त्यात मध्येमध्ये बासरीची प्राण कंठाशी आणणारी कलाकुसर. चाल कोणाची? तर हृदयनाथ मंगेशकरांची. आणि आवाज? ताईंचा. पुणेरी लोक जेव्हा अण्णा म्हणतात, तेव्हा भीमसेन जोशी ओळखायचे असते हे सामान्यज्ञान तोपर्यंत झाले होते. आता ह्या ताई कोण? पण त्या गाण्याने, त्या आवाजाने मोहुन जाऊन पुढे विचारले तेव्हा कळले की 'किशोरीताई आमोणकर' म्हणुन. अरेच्चा! हे नाव येऊन गेलेय की आपल्या समोर. पण तेव्हा असे का वाटले नव्हते बुवा? प्रत्येक गोष्ट शिकण्याचे एक वय असते हेच खरे. पण अशा 'सेल्फ पेस्ड डिस्कवरी' मध्ये वेळ फार वाया जातो असे आता वाटते. त्यापेक्षा कोणी मारुन-मुटकुन ऐकवले असते तर सुरवातीला नसते आवडले कदाचित, पण गाणे लवकर अंगात भिनले असते, नाही का? कोण जाणे, काय झाले असते! इफ विशेस वेअर हॉर्सेस, बेगर्स वुड फ्लाय..

मग त्याच्याच सांगण्यावरून एक कॅसेट विकत घेतली, 'दृष्टी'. संगीत किशोरी आमोणकर व रघुनंदन पणशीकर. नंतर समजलेली पिक्चरची गोष्ट माझ्या 'त्या' वयाला आवडण्यासारखीच होती म्हणा ना.. पण गाणी माझ्या मनात रुंजी घालू लागली. 'एक ही संग होते', 'मेघा झरझर बरसत रे' आणि 'सावनीया संझा में अंबर झर आई'. मेघा.. मध्ये 'मन कछु नहीं समझत रे, मेघाऽऽ झरझर बरसत रे' मध्ये काय सुरेख कलाकुसर केली आहे! 'राऽधाऽ ने काया की बांसुरी बजाईऽऽ' किती सुंदर कल्पना आहे! आणि 'बाजत घन मृदंग, गुंजत सब अंग अंग' म्हटल्यावर होणारा मृदंगाचा धिमित् धिमित् नाद, क्या कहने! तेव्हाच्या दिवसात माझ्या मनात तीच एक धुन आलटुन-पालटुन घोळत असे आणि मनातल्या मनात त्यातल्या जागा शोधणे सुरु असे.

मग सहेला रे ऐकले. वेडा झालो. ठार वेडावलो. किती वेळा ऐकले असेल माहित नाही. शुद्ध, तेजाने निथळणारे, धारदार स्वर. राग वगैरे समज नव्हतेच, पण ते स्वर मनावर सम्राटाप्रमाणे राज्य करण्यासाठीच अवतरले होते हे खरे. तर हा भूप! आणि ह्या स्वयंभु गंधारगायकीच्या प्रेमातच पडलो. कॉलेजात बेंचवर बसल्या बसल्या ते गाणे आठवू लागले. तत् च संस्मृत्य संस्मृत्य झाले होते म्हणा ना अगदी! मग हळुहळु प्रवास सुरुच झाला. एकीकडे वसंतरावांचे सळसळणारे, ठेक्याला बोटांवर नाचविणारे, दमविणारे गाणे आवडु लागले होते. मित्राकडे 'मोहम्मदशा रंगीले' ऐकले आणि भिमाण्णांपुढे हात टेकले, साष्टांग दंडवतच घातला का म्हणेनात! असे गाणे कोणी कसे गाऊ शकेल असे मनोमन विचारू लागलो. कोणी विचारले तर कोल्लापुरी ष्टायलीत 'आमी भीमसेन जोशी (ऐकण्याच्या) तालमीतले' सांगु लागलो. मग त्या गर्दीत किशोरीताईंचे गाणे आपल्या शालीनपणाने जरा अंग चोरुन बसले.

तेव्हा आमचे मित्रमंडळ जेथ्रो टल्, पिंक फ्लॉईड, बीटल्स्, ईगल्स्, पर्ल जॅम् ह्या गुंत्यात गुंतले होते. मीही ओढला गेलोच त्यात. तेही आवडु लागले. गाणीच्या गाणी पाठ करणे (विचारले तर सांगायचो की ईंग्लिश सुधारते म्हणुन ऐकतो, बर्‍याच स्लँग्ज समजल्या आणि सामान्यज्ञानात बराच पुढे गेलो) सुरु झाले. त्यातही एखादा 'नॉर्वेजिअन वुडस्' मधला पीस ओळखीची खूण सांगायचा, तर कधी 'मॅजिक फ्लूट' मधल्या हार्मनीच्या लाटांवर लाटा मनावर कोसळत असताना, मन आ वासुन ती लीला 'पहायचे' आणि नंतर बासरीची पहाडी धून पुन्हा मायदेशीच्या विलक्षण सौंदर्याची आठवण करून देत असे. अजुन देतेच.

म्हारो प्रणाम ऐकली तेव्हा मी बर्‍यापैकी गाणी ऐकत होतो. मीरेच्या हृदयीचे आर्त लताबाई/हृदयनाथांच्या प्रतिभेतुन उतरलेले ऐकले होते. गढ से तो मीराबाई उतरी, कर्म की गती न्यारी संतो.. मनावर गारुड करुन गेले होते. पण म्हारो प्रणाम मध्ये ती राजस्थानी, गोषातली, कृष्णविरहिणी राजस्त्री आपल्या सगळ्या भक्तीरसाने ओथंबलेल्या रचना घेऊन पुढे आली, त्या चालींना तिथल्या मातीचा वास होता, आवाजातले तेज तसेच पण सौम्यसे वाटणारे. मुख्य म्हणजे शास्त्रीय संगीत मूळ लोकधुनांमधून झिरपते याची खूण पटविणारे सगळे होते. 'ओ बदरा' काय, 'म्हारो प्रणाम' काय, 'सावन दे रह्यां जोरा रे', 'प्रभुजी मैं अरज करूं', 'जाओ निरमोहिया' काय, फारफार आवडली ती गाणी. कॅसेट्स् घासूघासू खराब केल्या. आता ती गाणी ऐकताना तो भावगर्भ, रसमय आवाज ते दिवस आठवुन पुन्हा रोमांच उभे करतो.

रंगी रंगला श्रीरंग ऐकले तेव्हा मिसरूड फुटले होते. फुरफुरत होतो. मंदिर-मस्जिद पेटले होते, मंडलची पाचर छातींत खोंच मारत होती. अशात 'रंगी रंगला..' मध्ये महाराष्ट्र देशीचे अवघे संतमंडळ आणि त्यांचा प्राणसखा पांडुरंग भेटीला आला, मन ऐकुन तृप्त झाले. चोखयाची महारी म्हणते 'पाहते पाहणे गेले दूरी, अवघा रंग एक झाला'. हा अद्वैतभाव, ही जाणीव ह्यांच्यात कशी जागृत झाली? मला प्रश्न पडु लागले, कोषातुन बाहेर येऊ लागलो. माणुस, माणसाची अंधारातुन 'अत्त दीप भव' होण्याकडे चाललेली वाटचाल समजुन घेऊ लागलो. कोणी म्हणेल, ह्यात गाण्याचा काय संबंध? तर एवढेच म्हणेन की कुणाला दु:खातुन वाट सापडते, कुणाला वाचनातुन, कुणाला देशाटनातुन. मला त्या गाण्यातुन वाट सापडली जिथे किशोरीताईंचे स्वर तळपत होते. प्रश्न माझ्यापुरते सुटले. गोंगाटाला बाहेर बंद करून मी ऐकू लागलो हे मोठेच उपकार!

आज नेट आणि एमपी-३ च्या जमान्यात गाणी मिळवायला पुर्वीएवढे कष्ट करावे कागत नाहीत. कलाकाराचा संपुर्ण आलेख मांडणार्‍या सिडीज् सहज उपलब्ध होतात. एखादा राग, पुर्वी न ऐकलेला, आवडुन गेला तर एक गोष्ट नक्की करतो. ते म्हणजे काही श्रेष्ठ गायकांनी/गायिकांनी तो राग गायला आहे का हे पहाणे. पहिल्यांदा मारवा ऐकला तो उल्हास कशाळकरांचा, त्यानंतर दिवसरात्र त्याच्या नशेत बरेच मारवे ऐकुन काढले. ह्या सगळ्या मंथनातुन वर आला तो अमीर खाँसाहेबांचा मारवा. ऑलमोस्ट योगिक ट्रान्स्. त्यात बाळाच्या गालावर तीट असावी इतपत कापलेला खर्जातला सूर. तीच गत रागेश्रीची. कौशिकीचा रागेश्री तिच्यासारखाच मोहक! पण मग एकदा रागेश्रीचे भांडार खोलल्यावर, किशोरीताईंच्या रागेश्रीसारखे रत्न कसे दृष्टीआड झाले हे जाणवुन लाज वाटली. बरखुरदार, देर आये दुरूस्त आये. राग-काल-शास्त्र, श्रुतीविस्तार आणि त्याच्या घटपटादि चर्चांपेक्षा हा कसोटीवर घासुन लावलेला किशोरीताईंचा स्वर मन मोहरून टाकतो. कधीही ऐकली तरी बरजो न मानेऽऽ ची लखलखणारी पुकार बहार उडवुन देतेच मनात.

मधल्या काळात अनेक कलाकार ऐकले. भरभरून ऐकले. काही गौरीशंकर, काही गंगौघ, तर काही खट्याळ प्रवाह. काहींच्या, आपला गळा तीन सप्तकांत कसा फिरतो हे दाखवण्याच्या आणि टाळ्या घेण्याच्या, करामतीही अनुभवल्या. कधी गाण्यात डुंबत, तर कधी काठावर बसुन होतो. मनाचा ठाव घेऊन प्रवाहात ओढून नेणारे गंधर्व इनेगिनेच. त्यात अमीर खाँसाहेब, भीमसेन जोशीबुवा आणि किशोरी आमोणकर हे दिपस्तंभ म्हणावे असे.

मागे TEDx च्या मुंबईतल्या कार्यक्रमात धनश्री पंडित-राय यांनी हिन्दुस्थानी आणि पाश्चात्य संगीताचा तौलनीक विचार मांडणारे एक खुसखुशीत सेशन घेतले होते. त्यात बरोक् आणि हिन्दुस्थानी शैलीची तुलना वरवर करताना त्यांनी उदाहरण घेतले ते 'म्हारो प्रणाम' चे. वाटले ईस्ट इज ईस्ट अ‍ॅन्ड वेस्ट इज वेस्ट, नेव्हर द ट्वेन शॅल मीट तितके खरे नाहीच. मसाले तेच आणि तसेच आहेत जगभरात. कुठे चिमुटभर तर कुठे तोळाभर. पण कसबी कलाकार हिणकस ते सारे टाकुन देतो आणि शुद्ध ते आपलेसे करतो.

हा सगळा विचार मांडावासा वाटला भिन्न षड्जच्या निमित्ताने. अमोल पालेकरांच्या अनेक कलाकृती पहाण्यात आल्या आहेत पण ही मास्टरपीस फिल्म बनवून त्यांनी संगीतप्रेमींवर अगणित उपकार केले आहेत. आज अमीर खाँसाहेबांची कलाकार म्हणुन असलेली ओळख, एक मोठा माणुस म्हणुन ठळक होते ती फिल्म्स् डिविजनने बनविलेली छोटेखानी डॉक्युमेंटरीमधुन. संगीताच्या पुढच्या पिढीतल्या श्रोत्यांसाठी हे मोलाचे ठेवे फार दुर्मिळ म्हणावे असे. अल्लादियाखाँची गाणी ऐकलेले आज कोण असणार, अब्दुल करीमखाँचेही तेच. त्यांच्या तयारीच्या कहाण्या केसरबाईंच्या, भीमसेन जोशींच्या बोलण्यातुन ओझरत्या समजतात. पण तेवढेच. आज संगीतातला अक्षय, निरंजन आनंद सर्वांसाठी खुला आहे. गरज आहे ते सारे मांडणार्‍याची, त्यासाठी दोन पावले चालणार्‍याची. पालेकरांनी लहरी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या किशोरीताईंचे पोर्ट्रेट इतके बारकाव्याने, तब्येतीने चितारले आहे की बस्स!

किशोरीताईंची संगीतातली वाटचाल, मोगुबाईंबद्दल भरभरुन बोलणे, शिक्षणातले बारकावे सांगणे सगळेच फार सखोल आहे. एका क्षणी त्या सांगुन जातात की ज्यात स्वर नाही ते सर्व गाण्यातुन सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही माईंची शिकवण होती. अत्रौली-जयपुरच्या भरजरी गायकीबद्दल त्या वेदांतातला दाखला देतात, 'नेति नेति'. अतिविलंबित ख्याल जयपुर शैलीत का नाही याचे उत्तरही जिज्ञासुंना इथे मिळेल. पण एकीकडे मेरुखंड पद्धतीचे गायन भावणार्‍या मला ही जयपुर गायकी का आवडावी? पुढे बोलताना त्या याचे उत्तर देऊन जातात की आमची पद्धत दोन श्रुतींमधला अवकाश शोधण्याची आहे. हे 'अ‍ॅड इन्फिनिटम्' नेता येणारे श्रुती-अवकाश आहे. तसेच मेरूखंड म्हणजे केवळ स्वरांचे, श्रुतींचे 'पर्म्युटेशन्/कॉम्बिनेशन' नव्हे तर स्वरांच्या बाह्य स्वरूपाकडून, एक एक पदर सोडवित, गाभ्याकडे जाणे, जे कधी संपणार नाही. असा मी माझ्यापुरता लावलेला अर्थ.

आपली स्वतंत्र शैली निर्माण करून, गायकीच्या क्षेत्रात तळपत असलेल्या ह्या विदुषीचे चिंतन, तिचा संगीतविचार, तिची आंदोलने, सुरांच्या बनात हरवलेलं एक माणुस असणं, सारं सारं टिपलंय इथे. देवळातल्या पिंडीवर बेलफुले वाहताना ह्या प्रवासाची सुरवात होते. रवळनाथाच्या साक्षीने गोंयच्या घरात सुबक अबोलीचा गजरा गुंफत असलेल्या, घरगुती किशोरीताई आहेत. सोबतीला आहेत त्यांचे शिष्य, सांगाती, सहप्रवासी आणि चिरंतन असणारे सप्तसूर.

तरूण वयातल्या किशोरीताईंची एक फ्रेम आहे यात. आत्ताइतकीच ठाम, स्पष्ट, मूलगामी मते तेव्हाही दिसतात. रागांचा आत्मा जाणुन गाणे, बंदिशी रचणे महत्त्वाचे. दरबारी-कानड्यासारख्या गंभीर प्रकृतीच्या रागात घुंगरांचे झनक झनकवा कसे चालावे? आणि पुढे जाऊन स्वतःच्या प्रतिभेच्या वारूवर लगाम लावुन कलेच्या आदिरूपाशी प्रतारणा करत नाही तोच सच्चा कलावंत असा विचार मांडतात. सहज ऐकता ऐकता एखादे वाक्य विजेसारखे लखलखुन जाते 'प्रत्यक्ष राग अवतरला हे फक्त शास्त्रीय संगीतच करू शकते'. या एका वाक्यामागे काय काय उभे आहे? केलेली साधना, व्रतस्थता, तद्रुपता आणि साक्षात्कारी जाणीव. घराण्या-घराण्यातला भेदाभेद, स्पर्धा ह्या सर्वांपलीकडे गेलेले हे गाणे आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे घराणी गंगेच्या पाण्याच्या गडव्यासारखी आहेत. प्रत्येकाला वाटते की आपण गंगा आणली. पण गंगा विशाल आहे, प्रवाही आहे, ती या चंबूत बंदिस्त होऊ शकेल का? बायबलात बॅबेलच्या मनोर्‍याचे रूपक आहे. देशोदेशीच्या एकभाषिक मानवांनी निर्माण करू घातलेला हा उत्तुंग मनोरा, ज्यात सर्वांच्या हातची वीट लागणार. पण कलहाचे बीज पडले ते वेगवेगळ्या भाषाभेदांमधुन आणि हा मनोरा विस्कटला, अपूर्ण राहिला. तसेच काहिसे होत असावे का संगीतात? ताई म्हणतात, सर्वांनी मिळुन जर एक यमन गायला गेला असता तर प्रत्यक्ष चैतन्य अवतरले असते!

सप्तसूर म्हणावे की षड्जाची निरनिराळी रूपं? तीन सप्तकांत विस्तारलेले स्वराकाश खरे तर षड्जाचेच म्हणावे लागेल. त्या आकाशातला उठून दिसणारा हा दैदिप्यमान असा भिन्न षड्ज!

शेवटी येते हा सगळा जीवनानुभव मांडणारी एक अप्रतीम कविता.. जी मांडली नाही तर काहीतरी अपुरे राहिले असे मला वाटेल. आणि मांडली तर जे काही ओंजळीतुन निसटले ते सारे मोती एका धाग्यात बांधले जातील अशी..

*************************************************
आयुष्यानं मला भरभरून दिलं
अमाप प्रकाशलेणी, सोनेरी पंखांचे आकाशीपक्षी
लांब तुर्‍यांची असंख्य पिवळी फुलं
आणि तितक्याच सर्वदूर, प्रदीर्घ पानगळ भरलेल्या निर्गंध वाटा..

आंदण घेतलेल्या क्षणी ठरवलं
वेदनेसोबतही चिंब रहायचं
सुरांच्या गर्भात खुलत रहायचं,
जीवघेण्या आंदोलनांना सामोरं जायचं..

दुसरा क्षण हातचा मिळाला तेव्हा जाणवलं
ही तर आवर्तनं आहेत!
वळशागणिक नवा 'साऽ' घेऊन येणारी
तेव्हापासुन शोधत राहिले नव्यानं उमलणार्‍या षड्जाला..

उद्या मी गेले की एक नक्की म्हणा
तिनं स्वरांची कूस सोडली नाही
त्या अस्पर्शी 'साऽ'ची आसही सोडली नाही
आयत्या मिळालेल्या क्षणाशी प्रतारणाही केली नाही..
*************************************************

मग आसमंतात भरून उरते ती भिन्न षड्जातली 'उड जा रे कागाऽ' ची आळवणी....

(ही फिल्म इथे पहायला मिळेल http://www.youtube.com/movie?v=ppQlc3NjuMw&feature=mv_sr)

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

17 Aug 2013 - 7:09 pm | मराठी_माणूस

लेख छान.

(अवांतर: देवल क्ल्ब ह्या चांगल्या संस्थेबद्दल हीणकस शेरेबाजी अनावश्यक )

शिवोऽहम्'s picture

17 Aug 2013 - 9:49 pm | शिवोऽहम्

त्याला इलाज नाही. कारण गाळीव लेखन करणे हा माझा हेतू नाही. त्या वेळी मनात आलेले विचार मांडले आहेत. भेटलेल्या काही तबलजींबद्दल माझा वैयक्तिक अनुभव अक्षरशः तसाच आहे. योगायोग म्हणा की दुर्दैव, ते मला देवल क्लबात भेटले होते. देवल क्लब ह्या संस्थेबद्दल, तिच्या कार्याबद्दल आदर आहेच. पण मला ती चाकोरी जमली नाही इतकेच. एकुणच, हिन्दुस्थानी संगीत हा विषय अतिसुलभीकरणाचा नाही. गांधर्व महाविद्यालयातील अभ्यासक्रम, परीक्षापद्धती आणि विशारद पदवीचे झालेले अवमुल्यन मला पटत नाही.

अपना अपना नजरिया..

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2013 - 7:14 pm | धर्मराजमुटके

लेख आवडला आहे.

मूकवाचक's picture

19 Aug 2013 - 12:23 pm | मूकवाचक

+१

आदूबाळ's picture

17 Aug 2013 - 8:45 pm | आदूबाळ

मस्तच! लेख आवडला.

परीक्षांसाठी म्हणून लष्करी शिस्तीत चालणारं गाणं कुणाला आवडेल? समुद्रात मोकळ्या भटकणार्‍या तराफ्याला अचानक बेट दिसावं तद्वत एक एक राग, एक एक कलाकार भेटला तर मज्जा. "सहेला रे" च्या भेटीचा क्षण माझ्याही नीटच ध्यानात आहे. जौनपुरीही असाच आवडता.

मिठाचा खडा पडावा अशी मतंही आहेत, पण इतक्या छान लेखाखाली नको.

पुलेशु!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

17 Aug 2013 - 8:49 pm | मनोज श्रीनिवास जोशी

शा.संगीताची आवड ही एक अती उत्कट अशी व्याधी आहे. ही बाधा तुम्हाला कशी झाली त्याचा उलगडा चांगला केला आहेत.भिन्न षड्ज ही बायोग्राफी केवळ अप्रतिम आहेच आणि त्याचा छान वेध घेतला आहे.
एकुणात अप्रतिम लेख वजा आस्वाद !
ह्या ग्रुप वर यावे ही विनन्ती !

https://www.facebook.com/#!/groups/207685002639712/

मिपा वर नियमित लिहित राहाल ही अपेक्षा !

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Aug 2013 - 10:25 pm | लॉरी टांगटूंगकर

उत्तम!
संम, ती लिन्क जरा गंडली आहे, तेव्हढी दुरुस्त करा

शिवोऽहम्'s picture

17 Aug 2013 - 10:33 pm | शिवोऽहम्
डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2013 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख.

अनुप ढेरे's picture

18 Aug 2013 - 9:30 am | अनुप ढेरे

लेख आवडला...

रमेश आठवले's picture

18 Aug 2013 - 10:55 am | रमेश आठवले

फार दर्जेदार लेख. शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड बर्याच लोकांना असते -मी ही त्यातलाच एक. पण त्याविषयी इतके भावपूर्ण लेखन करणे फार थोड्या रसिकांना जमते.
अभिनंदन !!!

अर्धवटराव's picture

18 Aug 2013 - 11:18 pm | अर्धवटराव

श्रीमंती, वैभव, ऐश्वर्य म्हणतात ते हेच.
__/\__

अर्धवटराव

कवितानागेश's picture

19 Aug 2013 - 12:32 am | कवितानागेश

सुंदर लिहिलय. मनाला भिडलं... :)

विजुभाऊ's picture

19 Aug 2013 - 1:25 am | विजुभाऊ

मी पहिल्यांदा किशोरी आमोणकरांचा आवाज ऐकला तो " जनी जाय पाणीयाला मागे धावे र्‍हषिकेष."
अजूनही ते गाणे मनातूण कधी बाजूला गेलेले नाहिये

शिवोऽहम्'s picture

19 Aug 2013 - 10:40 am | शिवोऽहम्

फार सुंदर गाणे. तो सगळा अल्बमच फार सुंदर आहे. 'मी माझे मोहित, राहीले निवांत, एकरूप तत्त्व देखिले गे माये' जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा अगदी शांत, आश्वस्त वाटते.

अति-अवांतरः कोल्हापुरात आमच्या भागात पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि टँकर बोलावला की त्यातुन पाणी पाईपने घागरी-घागरी भरून आम्ही नेत असू. तेव्हा गंमती-गंमतीत 'पाणी रांजणात भरी.. सडा सारवण करी, जनी जाय पाणीयासी..' असे म्हणत असू.

किसन शिंदे's picture

19 Aug 2013 - 2:34 am | किसन शिंदे

अ प्र ति म!!

फार म्हणजे फारच सुंदर लिहलंय. वर रमेश आठवले म्हणतात त्याप्रमाणे शास्त्रिय संगीताची आवड प्रत्येकाला असते पण असं सुंदर लेखन तुमच्यासारख्या एखाद्याच जातीच्या रसिकाला जमू शकते.

हॅट्स ऑफ टू यू!

स्पंदना's picture

19 Aug 2013 - 5:27 am | स्पंदना

किशोरी ताई...एक गोष्ट तुम्ही सारेचजण विसरताय की माझ्यासारखीच तुम्हालाही अजुन ठाउक नाही आहे?
गीत गाया पत्थरोंने मध्ये किशोरीताईंच्या आवाजाच्या हलक्या उडत्या (अगदी शब्द अपूरे पडतात त्या तानांचे वर्णन करायला)अश्या पक्ष्याने माराव्यात अश्या स्वर्गीय सुंदर ताना ऐका राव. मी वेडी झाले त्यांवर. चित्रपट संगितात जर धुर्त राजकारणी माणस, फक्त माझाच आवाज ऐकला पाहिजे असा हट्ट धरुन बसली नसती तर असे अनेक सुरेख आवाज ऐकायला मिळाले असते.
ऐका कान देवुन...
काय ताना आहेत! अश्या वरच्यावर तोललेल्या पाखरान उडता उडता मारलेल्या लकेरीच जणु.

रमेश आठवले's picture

19 Aug 2013 - 9:34 am | रमेश आठवले

माझ्या आठवणी मध्ये सुद्धा हे गीत किशोरीताई यांनी गायलेले आहे असे होते. तसे मी प्रतिसादात लिहिले पण होते. पण प्रकाशित करण्या पूर्वी एकदा पडताळून पावावे म्हणून मी तू नळीवर शोध घेतला असता हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे एवढेच दिसले म्हणून मग प्रतिसादातील हा भाग वगळला. किशोरीताई यांचे गाणे हे दोन्ही मध्ये अधिक कसदार आहे असे सर्वानांच वाटेल . तसेच हे गाणे दुर्गा रागावर आधारित आहे ही गोष्ट त्यांच्या मांडणी वरून पटकन समजते.
https://www.youtube.com/watch?v=phprEOVP5tc

शरद's picture

19 Aug 2013 - 9:43 am | शरद

आपला टोला योग्य आहे पण या ठिकाणी नाही. मी ऐकले आहे त्या प्रमाणे किशोरीताईंनी सिने संगीत गायले म्हटल्यावर माईंनी त्यांना सांगितले की तुला काय गायचे ते तू ठरव पण मग या तंबोर्‍याला हात लावावयाचा नाही. एव्हढे पुरेसे झाले.
शरद

शिवोऽहम्'s picture

19 Aug 2013 - 10:15 am | शिवोऽहम्

शरदराव म्हणतात ते खरे आहे. माईंनी ताकीद दिली की हे गाणार असशील तर मग तंबोरा खाली ठेव. पण किशोरीताईंची सुगम संगितातली बोटावर मोजण्याइतकी गाणी म्हणजे रत्ने आहेत रत्ने.

(तुम्हाला शरदराव म्हटलेले आवडेल का? सध्या टॅक्सीवाल्यांच्या अरेरावीने त्रस्त मुंबईकरांना आवडणार नाही :). आणि उर्वरित महाराष्ट्रात तर एकच शरदराव)

यशोधरा's picture

19 Aug 2013 - 7:14 am | यशोधरा

सुरेख लेख. धन्यवाद!

किशोरीताईंविषयी काही लिहिले आहे का मिपा वर असं बघायला गेले तर हा लेख सापडला.. आज सगळ्यांनाच ताईंची आठवण येत असेल म्हणून हा लेख वर काढावा म्हणून ही प्रतिक्रिया..

चतुरंग's picture

4 Apr 2017 - 8:08 pm | चतुरंग

फारच छान लिहिलंय. गाणं ऐकणं, समजत जाणं या सार्‍याचा प्रवास छान मांडलाय.
(गांधर्व महाविद्यालयातल्या विशारद परीक्षा आणि तिथून झालेले विशारद हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे! :)

गांधर्व महाविद्यालयातल्या विशारद परीक्षा आणि तिथून झालेले विशारद हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे!

लौल! लिहाच ही विनंती!

बादवे हे शिवोहम फार छान लिहितात. हल्ली कुठे गेलेत काय माहीत!

यशोधरा's picture

4 Apr 2017 - 10:00 pm | यशोधरा

उद्या मी गेले की एक नक्की म्हणा
तिनं स्वरांची कूस सोडली नाही
त्या अस्पर्शी 'साऽ'ची आसही सोडली नाही
आयत्या मिळालेल्या क्षणाशी प्रतारणाही केली नाही..

खरंच! अगदी खरं..

चौकटराजा's picture

5 Apr 2017 - 8:41 pm | चौकटराजा

हा लेख एकदम सुरेख .
विशारद, डोक्टरेट वगरे वर एक किस्सा. चिंचवडचे पंडित पदमाकार कुलकर्णी ना कुणीतरी विचारले तुम्ही डोक्टरेट का नाही केली. ते त्यावर म्हणाले "मी सप्तसुरानी घायाळ झालेला एक पेशंट आहे मी कसा डोक्टर होणार ! " तात्पर्य संगीताचे शास्त्र शिकायला विशारद वगैरे ठीक . पण त्यातील कला साध्य करण्यासाठी प्रचंड श्रवण भक्ती आवश्यक. विशारदच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले इतरांचे गाणे किती ऐकत असतील याची शंकाच आहे मला !

खुप सुंदर लेख. किशोरीताईंवर इतका सुंदर लेख दुसरीकडे कुठेच वाचला नाही.

यशोधरा's picture

6 Apr 2017 - 7:27 pm | यशोधरा

अमीर खाँसाहेब, भीमसेन जोशीबुवा आणि किशोरी आमोणकर ही त्रयी माझी अतिशय लाडकी, सोबत वसंतराव आणि कुमार ह्यांच्यासकट मल्लिकार्जुन मन्सूरण्णा ह्यांची नावेही घ्यायला हवीत. अमोल पालेकरांनी ही एक उत्तम डॉक्युमेंटरी बनवली हे तर खरेच. त्यातील ताईंची मते, विचार ऐकताना वाटते किती चिंतन, अभ्यास आणि साधना इथवर येण्याआधी केली असेल ह्यांनी.

धन्यवाद ह्या लेखाबद्दल.