मोहब्बतें - गुरू नॉट कूल

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
20 Jun 2013 - 8:48 am

ज्याचे खरे नाव 'गुरू नॉट कूल' असायला हवे, अशा गुरूकूल नावाच्या कडक स्कूल बद्दल हा चित्रपट आहे. कडक म्हणजे अभ्यास किती कडक करावा लागतो ते माहीत नाही. आख्ख्या चित्रपटभर एकही वर्ग दाखवलेला नाही, कोणी अभ्यास करतानाही दाखवलेले नाही. पण येथील संचालक अधूनमधून सगळ्यांना हॉल मधे राउंड अप करून रागीट चेहर्‍याने ‘परंपरा और अनुशासन’ शिकवतो. भाषा अशी की तुलनेत उत्तर प्रदेश भाजप चे अध्यक्ष हाय फाय इंग्रजी बोलत असतील असे वाटावे. कडकपणा एवढाच.

येथे अॅडमिशन घेतल्यावर तुम्हाला बाहेरची दुनिया बंद होते. पण पोरे कधीही गावातील रेस्टॉरंट्स मधे जाणे, गावातील चौकात नाचणे ई. गोष्टी सहज करतात. तसेच या शाळेच्या इतर दारांवर चौकीदार असतात, पण ज्या एका बाजूला एक मुलींचे कॉलेज असते त्या साईडने कोणीही सहज ये-जा करू शकते. हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती.

गुरूकुल मधून जर कोणाला काढून टाकले तर इतर कोठेही अॅडमिशन मिळत नाही. आपण एखाद्या संस्थेत काही दिवस होतो हे लपवण्याचे कोणतेही मार्ग भारतात उपलब्ध नसावेत. ड्रॉप घेतला होता वगैरे चालत नसावे. किंवा देशातील प्रत्येक शाळा कोणालाही प्रवेश देताना गुरूकुल कडे "सदर विद्यार्थ्यास आपल्या संस्थेतून कधी निलंबित केले आहे काय, याची माहिती द्यावी" चे अर्ज वेळोवेळी करत असतील. पण एवढे करून आधी काढून टाकलेला शाहरूख पुन्हा तेथेच येतो व तेही विद्यार्थी नव्हे, तर शिक्षक म्हणून (पुन्हा त्याला "तीन विद्यापीठांमधून आमंत्रण" असतेच). एवढ्या कडक संस्थेचा प्रमुख त्याला मात्र केवळ संस्थेच्या आवारात व्हायोलिन वाजवले या क्वालिफिकेशन वर नोकरी देतो. केवळ आपले आडनाव उडवून शाहरूख आपली आधीची ओळख लपवतो. राज मल्होत्रा नावाचा हाकललेला विद्यार्थी राज आर्यन नावाने परत आला तर त्याला कोणीही ओळखत नाही. अमिताभने पाहिलेले नसते (आणि पूर्ण नावही वाचलेले नसते. उत्तरेकडच्या शाळेत राज मल्होत्रा एकच असणार.) पण तेथे इतर शिक्षकही त्याला ओळखत नाहीत. एकवेळ मिशी वाढवून किंवा डावीकडच्या ऐवजी उजवीकडून भांग पाडून आला असता तर समजू शकलो असतो.

तर एकूण हिंदी चित्रपटात सहनायकांवर नेहमी होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे. ही मुख्यतः सहनायकांची प्रेमकहाणी आहे. ती ही सफल होणारी. नाहीतर यांच्या नशिबी नेहमीच अर्धाअधिक चित्रपट हीरॉइनने झाशा दिल्यावर मग तिच्याकडून "मैने तुम्हे कभी उस नजर से देखा नहीं", "तुम मेरे एक अच्छे दोस्त हो" किंवा "भैय्या, आज राखी का त्योहार है" असे ऐकायचे. आणि तिचा रूमाल किंवा तत्सम वस्तू हातात धरून ती फ्रेम मधून बाहेर पडताना तिच्याकडे केविलवाणे बघून एक सामुदायिक सहानुभूती मिळवायची एवढेच काम असते.

अमिताभ, शाहरूख व ऐश्वर्या करत करत यांच्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे त्यांना उप-उप-नायकच म्हंटले पाहिजे. मात्र त्यांचा हा लाँच मूव्ही. त्यामुळे ते लेदर जॅकेट, जीन, गिटार सगळा गणवेश एण्ट्रीला हवाच. किंबहुना जिमी शेरगिल रेल्वेतून उतरतो व जुगल हंसराजला भेटतो तेव्हा तो त्याला पहिले "तुझे गिटार कोठे आहे?" असे विचारेल असेच वाटते. हे दोघे शहाण्यासारखे नॉर्मल डब्यातून उतरतात. मात्र उदय चोप्रा दिग्दर्शकाचा खास आदमी असल्याने उत्तर रेल्वे इंजिनापासून तिसर्‍या डब्याच्या जागे एक उघडी वॅगन लावते, व हा त्यातून बॅग फेकून मग उतरतो.

प्रत्येकाच्या आणि प्रत्येकीच्या एन्ट्रीला मात्र त्यांच्या पुढून मागे जोरदार वारा नेहमी वाहत असतो. तसेच सारखी ती मेपलची वाटणारी पाने इकडून तिकडे उडत असतात. दिग्दर्शकाला बहुधा "light, camera, fan, leaf blower, action" म्हणावे लागत असेल प्रत्येक वेळी. एकवेळ वासिम अक्रमला वार्‍याची दिशा ओळखता येणार नाही, पण या हीरॉइन्स बरोबर ओळखतात. त्यात समोरासमोर दोघे असले व दोघांनाही "छा गये" रूपात दाखवायचे असेल तर दोघांच्याही समोरून मागे वारे वाहतात, एकाच दृश्यात. (शाळेत जर आम्ही 'खारे वारे व मतलई वारे एकाच वेळी वाहतात' लिहीले असते तर चालले असते का?)

तसेच काही चित्रपटांत प्रत्येक जण एक 'उसूल' घेऊन येतो हे आपण पाहतो. येथे प्रत्येक जण एण्ट्रीला एक सिग्नेचर बॅकग्राउंड म्युझिक घेऊन येतो. शमिता शेट्टी ("रू रू रू रू..."), शाहरूख ("ला ला ला ला"), प्रीती ("आSSSSSS" चा कोरस) ई.

किमचा एक जुना फोटो असतो जुगल हंसराज बरोबर. त्यावर त्याचे मित्र त्याला पिळतात तेव्हा तो म्हणतो तिच्या वडलांची बदली झाल्यावर ती कोठे गेली माहीत नाही व नंतर कधी भेटलो नाही. बदली झालेल्यांना त्यांच्या ऑफिसमधून नवीन ठिकाणचे पत्ते मिळत नसल्याने व १५-१६ वर्षाच्या मुलांना आपल्या क्रश बद्दल काहीच कुतूहल वाटत नसल्याने ते बरोबर आहे. त्यात तो म्हणतो मी आता भेटलो तरी ती ओळखेल का नाही कोणास ठाऊक (त्या फोटोतला व प्रत्यक्षातला त्याचा चेहरा सारखाच दिसतो हा एक बारीक तपशील महत्त्वाचा नाही.). आता या संवादानंतर ते दोघे भेटायला किती वेळ लागेल असे आपल्याला वाटते? ती त्याच गावात असते, एवढेच नाही तर ते ज्या बाजारात ज्या दुकानात जातात तेथेच तीही आलेली असते.

त्या किम ची एन्ट्री काय वर्णावी! तिच्या स्क्रीची बोलण्यातून एवढे कळते की दुकानदार ती वस्तू दीड रूपयाला आहे म्हणत असतो व ती अडीच रूपयाला मागत असते (सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी 'श्री ४२०' मधे हा विनोद निरागस समजला जात असे. नंतर कोणी वापरल्याचे माहीत नाही). कारण म्हणे तिला 'देढ' व 'ढाई' कळत नसते. एरव्ही ती अस्खलित हिन्दी बोलते, दुसर्‍याच्या शेर टाईप संवादास त्याच लहेजात प्रत्युत्तर देण्याएवढ्या सफाईने.

हे मूळचे जन्मानंतर बिछडलेले तिळे असावेत अशी शंका येण्याइतपत त्यांच्या आयुष्यातील गोष्टी एकसारख्या व एकाचे-झाले-की-दुसर्‍याचे-तसेच पद्धतीने घडतात. मुली सापडणे, त्या आवडणे, त्यांचे प्रेम जमणे, मोडणे, परत जमणे हे सगळे एकाच वेळेला क्रमा क्रमाने होते. एकाला एक मुलगी दिसली की लगेच दुसर्‍याला आणि लगेच तिसर्‍याला त्यांच्या प्रेमिका नाट्यमय पद्धतीने सापडणार. एका ला प्रेमात अडचण आली की लगेच गावभर प्रेमभंगाचा सीझन. अशाच एका सामुदायिक प्रेमभंग सोहळ्यानंतर शाहरूख त्यांना भेटतो. त्याचे काउन्सेलिंग सेशन साधारण असे झाले असावे:

उदयः "तिला माझ्यात इंटरेस्ट नाही",
शाहरूखः "मग काय झाले. डर बघितला का?"
अलंकारः "तिला एक बॉयफ्रेण्ड आहे",
शाहरूखः "कभी हाँ कभी ना पाहा"
जिमी: "तिचे लग्न झालेले आहे",
शाहरूखः (गूढ हसतो)...
तिघे: "ओह! डर, अंजाम, यू नेम इट..",
येथे शाहरूख च्या चेहर्‍यावर मुले परीक्षा पास झाल्याचे भाव.

मग तो त्यांना त्याची प्रेमिका काय म्हणायची ते सांगतो:
"मोहब्बत भी जिंदगी की तरह होती है. कुछ मोड मुश्किल होते है, कुछ आसान...
मगर जिस तरह हम कभी जिंदगी का साथ नही छोडते, उसी तरह मोहब्बत का साथ भी नही छोडना चाहिये"!

मग ते तिघे विचारतात ती कोठे आहे, तर तो म्हणतो "ओह, तिने आत्महत्या केली".

ऐश्वर्या राय असले लंबेचौडे डॉयलॉग मारेल असे मुळात वाटत नाही. ती अमिताभची मुलगी. ते दोघे एकमेकांशी मुळात क्वचित बोलतात. त्यात त्या हवाई बेटांवरच्या लिपीत जसे १२ की १५ च अक्षरे आहेत, तसे यांच्या संवादांत दोन तीनच वाक्ये आलटून पालटून येतात. अमिताभने काही चांगले केले की ऐश्वर्या म्हणते
"आप दुनिया के सबसे अच्छे पिता है".
मग अमिताभ म्हणतो, "मै दुनिया का सबसे अच्छा पिता नही हूँ".
उलट त्याला आपले काही चुकले हे लक्षात आले की तो म्हणतो
"मै दुनिया का सबसे बुरा पिता हूँ".
मग त्यावर ती म्हणते, "नही, आप दुनिया के सबसे अच्छे पिता है".

मग लग्नाच्या वयाच्या आपल्या मुलीचे कोणावर तरी प्रेम जमले आहे. त्यात आपल्याच संस्थेत अॅडमिशन मिळण्याइतपत तो चांगला आहे, एवढेच नव्हे तर तेथील लोकांच्या मतानुसार 'बहुत काबिल है और ये जरूर कुछ बनेगा' हे कळाल्यावर कोणत्याही बापाची रिएक्शन होईल तशीच त्याची होते. तो त्याला संस्थेतून हाकलून देतो. त्याचा चेहराही न पाहता. सलीम-जावेद चे स्क्रिप्ट असते तर शाहरूख येथे अमिताभला म्हंटला असता "तुम मुझे एक बाप की हैसियत से निकाल रहे हो या एक प्रिन्सिपल की?"

हिंदी चित्रपटात कोणताही मिलिटरीतील माणूस सर्व काही यथासांग करून मग लष्करात गेलाय आणि व्यवस्थित परत आलाय असे बघितले आहे का? येथे त्या प्रीतीचा नवरा लग्नाच्या दिवशीच सीमेवर जातो. दुसर्‍या दिवशी जाणे एक वेळ मिलिटरीला चालेल पण हिंदी चित्रपटात चालणार नाही. तो तेथे गायब झाल्याने तो मेला असेच सगळे समजत असतात पण अमरिश पूरी (त्याचे वडील) अजूनही मानायला तयार नसतो. त्याने एवढे हिंदी पिक्चर पाहिलेले व स्वत: अनुभवलेले असल्याने साहजिकच त्याला माहीत असते की 'गायब' झालेला हीरो नंतर कधीतरी उपटतोच. मग नंतर अचानक एक नाच चालू होतो. तेथे प्रीतीला जायचे असते. पण अमरिश पुरी तेथे असल्याने ती जात नाही. मग त्या कुटुंबाचा मानसिक प्रवास वगैरे दाखवला असेल असे तुम्हाला वाटेल - तिचा नवरा परत येत नाही याची खात्री झाल्यावर तिला जो आवडतो आहे त्याबरोबर जाऊ देण्यासाठी. प्रत्यक्षात अमरीश पुरी येऊन तिचे कुंकू पुसतो आणि लगेच ही एकदम खुषीत नाचायला आणि गायला निघून जाते!

एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्षात काहीही चूक दिसत नसताना केवळ तो हीरो नाही म्हणून त्याची फजिती करणे ही प्रथा दिग्दर्शक येथेही पाळतो. ती किम इतकी निरागस ई.ई असते की पूलसाईड पार्टीमधे कदाचित आपल्याला पाण्यात उतरावे लागेल याची तिला कल्पनाच नसते. त्यामुळे तिचा बॉयफ्रेण्ड ("लव्ह ऑफ हर लाईफ") तो दीपक तिला पाण्यात टाकतो आणि इतका वेळ हाय फाय असलेल्या किम ला फक्त पाण्यात पडल्यावर एकदम आपली मर्यादा वगैरेचा साक्षात्कार होतो. आणि ती 'माकारेना' पोज मधे उभी राहते. मग हीरो ने (भुतासारखा चेहरा करून पाण्यात) येऊन आपले जॅकेट काढून तिला घालणे वगैरे सोपस्कार होतात. मग ते दोघे गावातील मुख्य चौकात जाऊन पूलसाईड पार्टीला बोलावून पाण्यात टाकणार्‍याच्या प्रेमात पडण्याची चूक मी कशी केली याबाबत चर्चा करतात. वास्तविक तिला पाण्यात टाकलेले आवडले नाही हे समजल्यावर त्या बिचार्‍या दीपकने तिची माफीसुद्धा मागितलेली असते. पण त्याची चूक ही असते की तो हीरो नसतो.

आमच्या कॉलेज मधे दोन नग होते त्यांचे एका परिक्षेत एक सोडून सर्व विषय 'राहिले' होते. त्या एका विषयात त्यांच्यापैकी एकाला १०० पैकी ५७ व दुसर्‍याला ५६ मार्क होते. तर ५७ वाल्याने दुसर्‍याकडे बघून तुच्छतेने 'हूं' असे केले त्याची आठवण मला हा पुढचा, आता उदय चोप्रा चा नफ़रत टू मोहब्बत शॉट बघून झाली. ती शमिता शेट्टी उदय चोप्रावर रागावते कारण म्हणे तो एक तोकडे कपडे घालून नाचणार्‍या मुलीकडे बघत बसतो. वास्तविक ती नाचणारी मुलगी आणि शमिता यांच्या कपड्यात काय तो २-४ धाग्यांएवढाच फरक असतो. मग तो तिला म्हणणार की तुम उसके जैसी नही हो सकती, ती चॅलेंज स्वीकारणार (१ सेमी कपडा कापायला किती वेळ लागतो), मग उदय नुसता बसलेला असताना एकदम तो दोन्ही दिशांना वाहणारा वारा, उडणारी पाने वगैरे आणि मग ती एक शाल गुंडाळून येते. मग ती शाल काढल्यावर कळते की ती 'उसके जैसी' झालेली असते. मला तर आधीची शमिता आणि ही यात काहीच फरक दिसला नाही.

इतर काही महान सीन्स-
- देवाला नमस्कार करणारे भूत या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. कोणत्याही धार्मिक वा हॉरर चित्रपटाला जे जमले नाही ते येथे यांना जमलेले आहे.
- इतर चित्रपटांत कलाकार फुटेज खातात तसे यातील काही जोड्या वारा खातात. कारण एकाच वेळी चालू असलेल्या गाण्यांत तिकडे प्रीतीच्या गच्चीवर तुफान वारा, इकडे लेडिज हॉस्टेल मधे तर इनडोअर हॉल मधे वारा व बाहेर जोरदार पाऊस तर गावातील मुख्य चौकात जुगल-किम उभे असताना वार्‍याचा मागमूस नाही. "या पिक्चर मधे सर्वात जास्त वारा माझ्याच सीनमधे आहे" अशा मुलाखती नक्कीच दिल्या असतील काहींनी.
- एका गाण्यात मधेच उदय चोप्रा इलेक्ट्रिशियनच्या वेषात लेडिज हॉस्टेल मधे असतो. २-३ पुरूष इलेक्ट्रिशियन्स ना मुलींच्या हॉस्टेल मधे कोणाच्याही देखरेखीशिवाय सहज जाऊ दिले जात असल्याने उदय चोप्रा त्या वेशात तेथे असतो. बाकी मुली ते तेथे नसल्याप्रमाणे वावरत असतात. बहुधा हा नॉर्मल सीन असावा. या गाण्यात नीट कळत नाही, कदाचित ड्रीम सिक्वेन्स असेल. पण जर ड्रीम सिक्वेन्स असेल तर उदय चोप्राला स्वप्नात इलेक्ट्रिशियन का बनावे लागते कळत नाही.
- अमिताभच्या भाषणात एकदा "मैने यहाँ के हर एक स्टुडण्ट को एक समर्थ, संपूर्ण और काबिल इन्सान बनाया है" अशा वाक्याला खाली सबटायटल्स मधे "stronger, fuller and better man" अशी वाक्ये आल्याने मला आजकाल सबटायटल्स मधेही स्पॅम मेल्स येतात की काय अशी शंका आली.
- शेवटी अमिताभने हार मानल्यावर सगळे भांगडा वगैरे करत असताना. आदित्य चोप्रा 'मोहब्बते-२' ची नांदी दाखवतोय का असे मला वाटले- म्हणजे सगळे गुरूकूल नाचगाण्यात मग्न असताना अमिताभ पुन्हा तेथे येतो व तीन विद्यार्थ्यांना अभ्यास करायला शिकवतो व आता तो पुन्हा शाहरूखला हरवतो असा दुसरा भाग.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2013 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हहपुवा करणारी झकास चिरफाड.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

20 Jun 2013 - 10:23 am | स्पंदना

हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती.
शाळेत जर आम्ही 'खारे वारे व मतलई वारे एकाच वेळी वाहतात' लिहीले असते तर चालले असते का?
एकवेळ मिशी वाढवून किंवा डावीकडच्या ऐवजी उजवीकडून भांग पाडून आला असता तर समजू शकलो असतो.
त्याने एवढे हिंदी पिक्चर पाहिलेले व स्वत: अनुभवलेले असल्याने साहजिकच त्याला माहीत असते की 'गायब' झालेला हीरो नंतर कधीतरी उपटतोच
इतका वेळ हाय फाय असलेल्या किम ला फक्त पाण्यात पडल्यावर एकदम आपली मर्यादा वगैरेचा साक्षात्कार होतो
येऊन तिचे कुंकू पुसतो आणि लगेच ही एकदम खुषीत नाचायला आणि गायला निघून जाते
पण त्याची चूक ही असते की तो हीरो नसतो.
इतर चित्रपटांत कलाकार फुटेज खातात तसे यातील काही जोड्या वारा खातात

किती किती पंचेस शोधायचे?
फार फार दिवसांनी फारएण्ड....

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 1:46 pm | प्यारे१

मोहब्बते-
जन्म: १९९९/२००० (जे काय असेल ते)
कारणः (के हेच्च ए ए जे ज्यांची असेल त्यांची)
मृत्यू: २०/०६/२०१३
कारणः फारएन्ड नावाच्या मूव्हीज-सीरियल किलर ने थंड डोक्याने केलेला निर्घृण खून.
खुन्याला राजाश्रय असल्याने दबक्या आवाजात खुसपूस सुरु आहे. (अहो हापिसात खदाखदा कसं काय हसता येईल? ;) )

वेल्लाभट's picture

16 Jul 2015 - 2:42 pm | वेल्लाभट

केवळ कहर

पंचेस हायलाईट करायचे म्हणजे लेखच चोप्य पस्ते करुन हायलाईट करायचा असं होईल.

तरीही खास कौतुक.. कारण मला आठवतं त्यानुसार हा सिनेमा चार तासांपेक्षा जास्त लांब आहे. इतका अवाढव्य पिच्चर पाहून त्यातल्या तपशिलांसकट हे लिहीणं हेच एक वंदनीय कार्य आहे. त्याउपर खदखदून हसायला लावणं हे तर एकदम लाजवाब..

सिनेमातला वार्‍याचा प्रभाव, सर्व नवनायकांचं "तुझं झालं की माझी पाळी" अशा रितीने एकामागून एक होणारं प्रेम इत्यादि, राज आर्यन मल्होत्राऐवजी राज मल्होत्रा बनून येताच ओळख न लागणं.. आणि अशा असंख्य गोष्टी फारेण्डरावांच्या तीक्ष्ण नजरेने पकडल्या आहेत.

हा हा हा... हसुन हसुन वाट लागली माझी... अजिबात आवडला नव्हता हा मुव्ही... मी अजुनही एकदा पण हा पुर्ण मुव्ही बघितला नाहिये. तो शाहरुख आणि ती ऐश्वर्या डोक्यात जातात अगदी माझ्या.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jun 2013 - 7:03 pm | श्रीरंग_जोशी

Mohabbatein असे स्पेलिंग असल्याने आम्ही तेव्हा या चित्रपटाच्या नावाचा उच्चार 'मोहब्बतेंइन' असा करायचो ;-). हे परिक्षण त्या चित्रपटाशी संबंधीत कलाकारांना पाठवायला हवे :-).

या भन्नाट परिक्षणाकरिता दंडवत स्विकारावा...!

टवाळ कार्टा's picture

20 Jun 2013 - 7:23 pm | टवाळ कार्टा

_/|\_

भारी लिहिले आहे. हसून मेले.

किसन शिंदे's picture

20 Jun 2013 - 8:17 pm | किसन शिंदे

फारेण्डस्टाईल चिरफाड!! =)) =))

आतिवास's picture

21 Jun 2013 - 7:59 pm | आतिवास

+ १. सुदैवाने हा चित्रपट पाहिलेला नाही. चुकूनही पाहणार नाही समोर आला तरी आता :-)

इंद्रवदन१'s picture

25 Jun 2013 - 10:49 pm | इंद्रवदन१

+१

अग्निकोल्हा's picture

20 Jun 2013 - 10:34 pm | अग्निकोल्हा

.

स्पंदना's picture

21 Jun 2013 - 5:44 am | स्पंदना

यु मिन एंडेड फाऽऽर बेटर?

कोमल's picture

21 Jun 2013 - 10:18 am | कोमल

मस्त मस्त... हहपुवा.. :)) :)) :))

तुमचा अभिषेक's picture

21 Jun 2013 - 1:21 pm | तुमचा अभिषेक

मात्र उदय चोप्रा दिग्दर्शकाचा खास आदमी असल्याने उत्तर रेल्वे इंजिनापासून तिसर्‍या डब्याच्या जागे एक उघडी वॅगन लावते, व हा त्यातून बॅग फेकून मग उतरतो.

हे भारीच हा..
सॉरी उदय चोप्रा, पण काही लोक आपल्याला बघायला नाही आवडत, भले त्यांच्यात तसे काही वाईट का नसेना... माझ्यासाठी तू त्यापैकीच एक..

लेख फारएण्ड स्पेशलच.. :)

अवांतर - लॉजिक कुछ भी रेहनो दो, तो चित्रपट मी बघतो कधी अधूनमधून लागला की.. पण फक्त अमिताभ आणि शाहरुख असेल तरच सीन बघायला मजा येते, बाकीच्यांना जरा आणखी कमी मध्ये निपटवले असते त्यात तर आणखी बरे झाले असते... पण मग तुमच्या लेखाचीही लांबी कमी झाली असती.

सुहास..'s picture

21 Jun 2013 - 2:31 pm | सुहास..

आवडेश !!

मला एकाने विचारले होते एश्वर्या कोण आहे पिक्चर मध्ये
मी : हडळ ;)

मुक्त विहारि's picture

21 Jun 2013 - 5:49 pm | मुक्त विहारि

जबरदस्त..

पैसा's picture

21 Jun 2013 - 10:30 pm | पैसा

सिनेमापेक्षा मनोरंजक रसग्रहण! फाडा आणखी काही सिनेमे!

धमाल मुलगा's picture

22 Jun 2013 - 3:55 am | धमाल मुलगा

च्यायला! शिण्माबद्दल लिहायचं म्हणलं की ह्या फारएन्डबुवांच्या अंगात काय मुरारबाजी संचारतो की बाजी प्रभू देशपांडे? निस्ता दांडपट्टा! सपासप सप्पासप... :D

बाकी, त्या अनुपम खेर आणि आणि 'तो' अर्चना पूरण'सिंग' ह्यांच्या फ्लर्टिंगची काहीच दखल न घेतल्याबद्दल निषेध! ;)

आम्ही आपलं हा शिणुमा पहायला गेलो ते एका बिनडोक मित्राच्या सांगण्यावरुन. काय तर म्हणे, 'नव्या हिरव्हिनी लै फटाका हैत' झालं..गेले सगळे आंबटशौकीन पदराला खार लाऊन. मग काय, आख्खा टैम त्या किम शर्माचे चिमखडे बोल, अन हिंदकेसरी शमिता शेट्टी ह्यांची पंजाबकेसरी उदय चोप्रा (ह्याला आम्ही बेडूक म्हणायचो.) सोबतची निकाली कुस्ती नशिबी आली. शेवटी आंबटशौकीनपणा लिमलेटच्या गोळ्यांवर भागवला. :D

त्यात आणि ते खुळ्या डोस्क्याचं शारुक. व्हायलीन असं पकडून फरफटत नेत असतंय जणू मेलेली कुत्री ओढून न्यायच्या मुन्शिपाल्टीच्या कामावरुन नुकताच इकडं जॉईन झालाय.
तर ते असोच. नशीबाचे भोग असतात एकेक, ते भोगूनच संपवावे लागतात.

अवांतरः आता पुढचं टार्गेट - 'कभी खुशी कभी गम' घ्या फाडायला. लै दणकेबाज पोट्यान्शियल आहे ;)

सुहास झेले's picture

22 Jun 2013 - 11:04 am | सुहास झेले

खास फारएण्ड स्टाईल चिरफाड ..... =)) =))

मी-सौरभ's picture

22 Jun 2013 - 4:04 pm | मी-सौरभ

आता हा विनोदी पिक्चर बघायला पाहिजे

हा हा हा. भारी हो फ़ारेण्डराव ! धम्या म्हणतोय तो कभी खुशी …. शिणेमाही फ़ाडायला घ्यावा ही विनंती . . तो सिनेमा बघून घरी येईपर्यंत मला ताप भरला होता.

Dhananjay Borgaonkar's picture

23 Jun 2013 - 11:56 am | Dhananjay Borgaonkar

खल्लास!!!मेलो हसुन हसुन. =))

अप्पा जोगळेकर's picture

23 Jun 2013 - 2:17 pm | अप्पा जोगळेकर

जबर॑दस्त. कुछ कुछ होता है, दिल तो पागल है यांच्या खुनाची वाट पाहात आहे.

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2013 - 6:05 pm | स्वाती दिनेश

फार दिवसांनी पोस्टमार्टेम वाचले,
स्वाती

तोड नाही …… असेच लेख येउद्यात …. आम्ही वाट पाहतो आहे

योगी९००'s picture

24 Jun 2013 - 10:08 am | योगी९००

हा हा हा... खुप मस्त चिरफाड..!!!

च्यायला आता हा पिक्चर बघावा लागणार....!!! आधी न पहायचा ठरवला होता. हा लेख वाचून चित्रपट पहायला खुपच मजा येईल..!! हा चित्रपट (ह्या परिक्षणाबरोबर) परत release केला तर पहिल्यापेक्षा जास्त गल्ला जमा करेल.

बाकी चकदे, स्वदेस, वेन्स्डे अशा बहूतांशी चांगल्या चित्रपटांची चिरफाड करता येईल का? (म्हणजे अशी किंवा थोडीफार चिरफाड करायचा scope आहे का?)

सुधीर's picture

24 Jun 2013 - 12:10 pm | सुधीर

चित्रपट पाहण्याची हिंमत कधी झाली नाही. चिरफाड वाचून मात्र भरपूर करमणूक झाली.

अद्द्या's picture

24 Jun 2013 - 2:39 pm | अद्द्या

= )) =))
मेलो

पान्डू हवालदार's picture

24 Jun 2013 - 10:49 pm | पान्डू हवालदार

मस्त... हहपुवा..

मृत्युन्जय's picture

25 Jun 2013 - 12:15 pm | मृत्युन्जय

अशक्य चिरफाड केली आहे. जबरी परीक्षण :)

चिगो's picture

16 Jul 2015 - 6:15 pm | चिगो

लैच उच्च दर्जाची चिरफाड.. भारी पंचेस. ह्ह्पुवा..

पद्मावति's picture

18 Jul 2015 - 2:57 pm | पद्मावति

गुरु नॉट कूल ची मस्तं चिरफाड केली आहे.
तूफान निरीक्षण, अफाट पन्चेस.....

पुंबा's picture

29 Jun 2017 - 5:15 pm | पुंबा

हे स्फुट बाहेर काढणे मी नवमिपाकरांप्रती माझी नैतिक जबाबदारी समजतो. :) :)
हसा लेको.

सरल मान's picture

29 Jun 2017 - 5:47 pm | सरल मान

GST च्या धाग्याने डोक जड झाल होत...!

अभिजीत अवलिया's picture

29 Jun 2017 - 6:47 pm | अभिजीत अवलिया

मी बर्याचदा फारएण्ड साहेबांची चित्रपट परीक्षणे उघडून वाचत बसतो. आता का लिहीत नाहीत माहीत नाही :(

हे ही.. भारीच.. आधी वाचलं होतं, पुन्हा वाचूनही तेवढीच हसले.
" हा नारायण शंकर जर अमेरिकेचा अध्यक्ष असता तर त्याने कॅनडाच्या बाजूला भिंत बांधून मेक्सिकोची बॉर्डर मोकळी सोडली असती." बेस्ट!

हर्मायनी's picture

30 Jun 2017 - 8:56 am | हर्मायनी

खासच ..!

फारच मस्त लिहिलंय...एक से एक पंचेस...
ज्या काळात काहीही आवडायचं..त्या काळात हा सुद्धा सिनेमा आवडला होता!

शित्रेउमेश's picture

3 Jul 2017 - 8:46 am | शित्रेउमेश

चित्रपट परिक्षण......
नाही नाही चिरफाडच ती..... आवडली...
मस्तच...
हहपुवा..

प्रचंड हसवणारे काही धागे उत्खनन करुन वर आणण्याचा प्रयत्न..