मराठी सुगम संगीतातील नररत्ने! २ श्रीनिवास खळे

श्रीनिवास खळे! एक प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व! त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं!
जन्म १०जून १९२५. मुळचे बडोद्याचे. तिथल्याच सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसुदन जोशी ह्यांच्याकडे गाण्याचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर तिथेच आतांहुसेनखाँ,निस्सारहुसेनखाँ आणि फैयाजहुसेनखाँ सारख्या दिग्गजांकडूनही तालीम मिळाली. पुढे काही वर्षे त्यांनी बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून नोकरी केली.
त्यानंतर काही घरगुती अडचणीमुळे खळेसाहेब मुंबईत आले पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले.

'गोरी गोरी पान'च्या ध्वनीमुद्रणप्रसंगी खळे साहेब,आशा भोसले आणि वाद्यवृंद

१९५२ साली त्यांची पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्या एका बाजुला होते गोरी गोरी पान,फुलासारखी छान आणि दुसर्‍या बाजुला होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख . ह्या दोन्ही रचना ग.दि माडगुळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही.पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.

१मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतं लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंय शाहीर साबळे ह्यांनी आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीय. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिल आहे हे निश्चित. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय,महाराष्ट्र जय,जय जय राष्ट्र महान, हे देखिल खूपच गाजले.

खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय..त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत.
यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?

खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत.
खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.ह्या गायक-गायिकांनी गायलेल्या गीतांचा नुसता उल्लेख करायचा म्हटला तरी पानेच्या पाने भरतील.
लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे सारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननीळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय असोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर........ १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा.... १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर.......... १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर......... १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.

१९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली... त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.


राम-श्याम गुणगानच्या वेळी पंडित भीमसेन आणि लतादीदींना चाल गाऊन दाखवताना खळेसाहेब.


खळे साहेबांनी दिलेल्या चाली वरवर जरी सोप्या वाटल्या तरी त्या गाताना विशेष श्रम घ्यावे लगतात.स्वर आणि लय सांभाळताना भल्याभल्यांना कठीण जातं. त्याबद्दल बाबुजी म्हणतात की खळे साहेबांच्या काही गाण्यातल्या जागा आपल्याला कधीच जमणार नाहीत.बाबुजींसारख्या सिद्धहस्त गायक-संगीतकाराने असे म्हटल्यावर अजून कोणते वेगळे शिफारसपत्र हवे?

आयुष्यभर केलेल्या खडतर वाटचालीमुळे आणि वेळोवेळी आलेल्या आजारपणांमुळे आज वयाच्या ८३व्या वर्षी खळे साहेब शरीराने खूपच थकलेत. हात थरथर कापतात म्हणून लिहिता येत नाही अशी परिस्थिती आहे;पण पेटी समोर येताच सगळी थरथर थांबते आणि आपले आजारपण विसरून खळे साहेब संगीताच्या विश्वात रंगून जातात.आजही त्यांची संगीतसाधना अव्याहतपणे सुरु आहे.अशा ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!

सर्व माहिती आणि छायाचित्रे महाजालावरून साभार!

सुरेख

अशा ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!
हो नक्कीच ! माझ्याही शुभेच्छा!
त्यांची सगळीच गाणी सुरेख आहेत्...'एका तळ्यात होती' माझं आवडतं गाणं...त्याच्या मागची गोष्ट माहीत नव्हती मला..धन्यु प्रमोद काका
'जय जय महाराष्ट्र माझा' किती छान गाणं आहे ना...मस्त चाल्..सध्या त्या गुप्ते नी त्याची वाट लावलेय नुसती...सॉलीड राग येतो मला त्या प्रकाराचा...
खूप छान माहिती काका..धन्यु.

पुलं म्हणाले होते..

खळेंच्या चालीचा मुखडा ऐकताना वाटतं की आता अंतरा कसा बांधणार आणि अंतरा ऐकताना प्रश्न पडतो की आता परत मुखड्यावर कसा जाणार? Smile

पुलं म्हणतात..

"श्रीनिवासचं गाणं सुरु झालं आणि गाण्याचा मुखडा पूरा झाला की हा आता आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा काही अंदाजच करता येत नाही. अंतर्‍याच्या दोन ओळी झाल्या की आपल्याला प्रश्न पडतो की हा मुखड्याला परत कसा येणार??
तसे सगळेच परत येतात, उड्या मारत. त्यातल्या काही माकडाच्याही असतात. पण हा जो येतो तो असा की... एका डहाळीवरून फुलपाखरूं जसं दुसर्‍या डहाळीवर जातं तसा हा अलगद मुखड्याला परत येतो आणि आपल्याला कळतंच नाही की हा इथे आला कसा!"

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सचित्र, छोटे खानी माहीती दिल्या बद्दल

काका प्रथम तुमचे खुप खुप धन्यवाद,
खळे साहेबाच्या चेहर्‍यावर असलेले म॑द स्मित मला खुप आवडते सदैव प्रसन्न वाटते त्याच्याकडे पाहुन.
आणि त्याच्या बद्दल काय बोलावे, तुम्हाला तर आता माहितच आहे.
Smile

सुरेख!!

ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!

प्रमोदकाका, तात्या असे करता येईल का की तुम्ही बुजुर्ग नररत्नांना भेटुन मिपातर्फे पुष्पगुच्छ, शुभेच्छा [अजुन काही] देऊन याल. इतके सुंदर संगीत देउन आपल्याला आनंद दिल्याबद्दल एक कृतज्ञता म्हणुन. या निमित्ताने अश्या कलाकारांची आजची स्थिती पण कळेल.

चांगली कल्पना..

सहजराव, खूप चांगली कल्पना आहे...

असो.

प्रमोदकाका, खळेसाहेबांवरील लेख छानच आहे. या प्रतिभावान कलाकाराला माझाही सलाम..!

'जाहल्या काही चुका..' हे खळेसाहेबांनी बांधलेलं माझं सर्वात आवडतं गाणं! असो..

तात्या.

सु॑दर लेख

सु॑दर लेख प्रमोदकाका!
मला 'या चिमण्या॑नो' फार आवडते (बसवायला फार अवघड आहे..ओव्हरऑल पाह्यला गेल॑ तर खळेसाहेबा॑ची गाणी बसवता॑ना ** फाटते..Smile अनवट बा॑धणी असते. येर्‍यागबाळ्याने अजिबात नादी लागू नये.
तसेच सुरेश वाडकरने गायलेले 'काळ वेगासी .. हे गाणेही आवडते.

संग्रही

संग्रही ठेवण्यासारखा लेख.
उगवला चंद्र पुनवेचा हे माझे त्यांनी संगीत दिलेले बकुळ पंडित यांनी गायलेले माझे आवडते गाणे

छान

छान लेख प्रमोद काका.
"लळा जिव्हाळा" हे माझं त्या॑नी संगीत दिलेलं आवडतं गाणं.

शुक्रताराने .........

किती गाणे न कळणारांना संगीताचा कान दिला याची गणतीच करता येणार नाही.

सर्वांगसुंदर चाली देणा-या संगीतकारावर सर्वांगसुंदर लेख. देवसाहेब, जबाब नहीं.

सुधीर कांदळकर.

खळेसाहेब..

खळेसाहेबांचा परिचय आवडला आणि ह्या दोन्ही गाण्यांच्या तबकडीची गोष्टही!
मला स्वतःला एका तळ्यात होती..,बगळ्यांची माळ .. आणि लाजून हासणे.. ही गाणी फार आवडतात.
अवांतर-मागे एकदा शंकर महादेवन त्यांना गुरुस्थानी मानतो असे त्याच्या एका मुलाखतीत ऐकलेले आठवले.
स्वाती

श्रीनिवास खळे ह्यांचा सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

बरीच अनवट माहिती समजली. धन्यवाद प्रमोदकाका!

'बगळ्यांची माळ फुले' हे माझे आवडते गाणे. अजूनही बरीच आहेत.
बालगीतांना त्यांनी दिलेल्या चाली इतक्या सहज आहेत की अजूनही कितीतरी बालगीते मनात रुंजी घालतात - 'गोरी गोरी पान', 'किलबिल किलबिल पक्षि बोलती, 'कोणास ठाउक कसा', 'चंदाराणी का गं दिसतेस' अशी कितीतरी!

चालीतून कवितेच्या शब्दांमधला भाव व्यक्त झाला पाहिजे ही भावगीताची अपेक्षा खळे साहेबांच्या गाण्यातून १०१% पूर्ण होते. 'शुक्रतारा मंद वारा' हे गाणं डोळे मिटून, घरातच शांतपणे ऐकलत तरी मंद वारा वहात असलेल्या ठिकाणी, तळ्याकाठी तुम्ही आहात इतका जबरदस्त परिणाम त्या स्वरांचा होतो!
हा देवत्त्वाचाच स्पर्श असतो.
खळेसाहेबांच्या आयुरारोग्यासाठी शुभचिंतन!

(अवांतर - खळेसाहेब आणि नौशादसाहेबांच्या चेहरेपट्टीत, केसांच्या ठेवणीत मला नेहेमीच विलक्षण साम्य वाटतं. दोघेही महान संगीतकारच असावेत हा एक गमतीदार योगायोग!)

चतुरंग

वा देव साहेब !!!

संगीतकार खळेसाहेबांचा परिचय आणि त्यांनी चाली दिलेल्या सुरेख गाण्यांची, आपण सुरेख ओळख करुन दिली आहे.

लाजून हासणे अन्‌ हसुन पाहणे ...... ........
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, -दयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख व्हावे, लै भारी !!!

भेटी लागी जीवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे......स्वरांजली या कार्यक्रमात पहाटेच्या वेळी रेडियोवर अनेकदा ऐकले आहे.
या चिमण्यांनो परत फिरा......हेही तितकेच आवडते.

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा,..........यालाही किती सुरेख संगीत दिले आहे.

महान संगीतसाधकाला दीर्घ आयुष्य आणि आरोग्यासाठी माझ्याही शुभेच्छा !!!!

-दिलीप बिरुटे

जाहल्या काही चुका...

खळेसाहेबांची इतरांनी उल्लेख केलेली अन्य गाणीही मला आवडतात, परंतु जाहल्या काही चुका हे गाणं माझ्या काळजात घुसतं! काय सालं गाणं लिहिलं आहे आणि बांधलं आहे! केवळ भन्नाट....!

आत्ता हेच गाणं ऐकतो आहे...

संपता पूजा स्वरांची, हात तू देशील का?
दाटूनी काळेख येता, तू घरी नेशील का?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले...
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले..

जाहल्या काही चुका अन् सूर काही रहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले..!

छ्या! दिदी दिलावरून अक्षरश: छुरी चालवते आणि घायाळ करून टाकते..!

आपला,
(दिदीचा भक्त!) तात्या.

+१

तात्यांशी १०१% सहमत !
बाय द वे , मधले कडव्याची नजाकत ज्याला कळली (गाऊ शकणे सोडून द्या , केवळ कळणे ! ) तो भाग्यवान ! अशक्य आहे या गाण्याचे मधले कडवे !

अण्णा आणि खळेसाहेब..

राम-श्याम गुणगानच्या वेळी पंडित भीमसेन आणि लतादीदींना चाल गाऊन दाखवताना खळेसाहेब.

अण्णा खळेसाहेबांना खूप मानतात. इतकंच नव्हे, 'खळेसाहेब मला माझ्या गुरुसमान आहेत' असंही अण्णा म्हणाले आहेत..!

आपला,
(अण्णाप्रेमी) तात्या.

भीमसेन आणि खळेसाहेब!

अण्णा खळेसाहेबांना खूप मानतात. इतकंच नव्हे, 'खळेसाहेब मला माझ्या गुरुसमान आहेत' असंही अण्णा म्हणाले आहेत..!

खळ्यांनी स्वरबद्ध केलेली 'अभंगवाणी' सादर करताना पंडित भीमसेन जोशी खळ्यांच्या पायाशी बसले.
हे पाहून खळे गडबडून गेले आणि म्हणाले, " अरेरे, हे काय करता?"
त्यावर पंडितजी उत्तरले, "आत्ता, तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य!"

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

छान

माहितीपूर्ण लेख.
खळेसाहेबांना एकदा प्रत्यक्ष बघण्याची / भेटण्याची इच्छा आहे.

-अमित

निळा सावळा नाथ..

प्रमोदसाहेब,

श्रीनिवासजींच्या निळा सावळ नाथ... ची गायिका कोण?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

गीत गंगाधर महांबरे

स्वर - कुंदा बोकील
(साभार - http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/902.htm)

चतुरंग

स्वर - कुंदा बोकील

चतुरंगजी,

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

कुंदा बोकील!

श्रीनिवासजींच्या निळा सावळ नाथ... ची गायिका कोण?

कुंदा बोकील ह्या गायिका आहेत.

ह गाणं खूपच सुंदर आहे. कवि आहेत गंगाधर महांबरे.

निळासावळा नाथ, तशीही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात

तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन
शोधुनि झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात

नील जळी यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धन्यवाद, प्रमोद साहेब!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

श्रीनिवास खळे.... निवडक गाणी..

प्रमोदसाहेबांनी सुरु केलेल्या ह्या धाग्यात माझी काही भर..

श्रीनिवास खळेंची काही निवडक गाणी...
http://fb.esnips.com/web/SrinivasKhale

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

धन्यवाद मित्रहो!

आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रमोदजी, आ

प्रमोदजी,
आपला लेख वाचून खूप माहिती मिळाली.धन्यवाद
श्रीनिवास खळे यांची "नक्षत्राचे देणे " हा कार्यक्रम खूप आनंददायी आहे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com