पंडित जितेंद्र अभिषेकी!

पंडित जितेंद्र अभिषेकी! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक प्रमुख व्यक्तीमत्व. आवाजाची उपजत देणगी नसली तरी परिश्रमाने त्यावर मात करून ग्वाल्हेर,आग्रा आणि जयपूर अशा तीन विविध घराण्याची गायकी पचवलेल्या पंडितजींनी त्यातून स्वत:ची अशी एक वेगळी गायकी परंपरा निर्माण केली. अभिषेकी बुवा म्हणूनच ते जास्त प्रसिद्ध आहेत! गोव्यातल्या मंगेशी इथला जन्म. वडिल कीर्तनकार.इथेच,वडिलांकडेच त्यांचे संगीताचे आद्य शिक्षण झाले. त्यांनतर उस्ताद अझमत हुसेन खाँ,गिरिजाबाई केळकर,जगन्नाथबुवा पुरोहित आणि गुलुभाई जसदनवाला अशा विविध घराण्याच्या दिग्गजांकडे पुढचे धडे गिरवले. तसेच काही अनवट रागांची दिक्षा खुद्द बडे गुलाम अली खाँ ह्यांच्याकडूनही मिळाली.
आपण सामान्य रसिक अभिषेकींना एक शास्त्रीय गायक म्हणून ओळखण्याऐवजी ऐवजी एक समर्थ संगीतकार म्हणून जास्त ओळखतो.मत्स्यगंधा,ययाति आणि देवयानी,कट्यार काळजात घुसली वगैरे नाटकातल्या पदांना त्यांनी दिलेल्या चाली विलक्षण गाजल्या. काटा रुते कुणाला,सर्वात्मका-सर्वेश्वरा वगैरे सारखी त्यांनी गायलेली कैक गीतेही ज्याच्या त्याच्या ओठी आजही आहेत.

तंबोरा जुळवण्यात तल्लीन.


गानमग्न अवस्थेतील काही भावमुद्रा!




मैफिलीतले अभिषेकी बुवा!
सर्वात्मका सर्वेश्वरा ऐका आणि पाहा.

सर्व छायाचित्रं जितेंद्र अभिषेकी.कॉम वरून साभार.

सुरेख चित्रे..

परत एकदा सुरेख चित्रे...
तुमच्या सर्व छायाचित्रयुक्त लेखनाचे संकलन करुन एकत्र वाचायला/बघायला फारच मजा येइल Smile

--
ध्रुव

उत्तम छायाचित्रे

सर्वच फोटोज छान आले आहेत. अभिनंदन.
मला स्वतःला त्यान्ची गायलेली "माझे जीवन गाणे" अणि "शब्दा वाचुन कळले सारे शब्दान्च्या पलिकडले"
ही गाणी फार आवडतात

अजुन एक झलक

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाची अजुन एक झलक

धन्यवाद मंडळी.

भावमुद्रा ह्या मालिकेला आपण दिलेल्या उदंऽऽऽड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मात्र गेल्या दोनतीन प्रकरणांना मिळालेला थंऽऽऽड Dont Tell Anyone प्रतिसाद पाहता 'बस्स झाले आता' असेही वाटत असावे असे वाटतंय.
तेव्हा हा उपद्व्याप इथेच थांबवतो.
पुन: एकदा मन:पूर्वक धन्यवाद!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

उत्तम समारोप

भावमुद्रा ही मालिका आम्हालाही आवडली. त्याबद्दल आपले मनापासून आभार !!! सर्व चित्रे शोधायची, एकत्र करायची, अप्लोड करायची,माहिती टाकायची हे सर्व वाचकांसाठी केले, आपली आवड म्हणुन केले त्यात मजा आली, बरीच माहितीही मिळाली !!!

मात्र गेल्या दोनतीन प्रकरणांना मिळालेला थंऽऽऽड प्रतिसाद पाहता 'बस्स झाले आता' असेही वाटत असावे असे वाटतंय.
तेव्हा हा उपद्व्याप इथेच थांबवतो.

आपणास वाचकांच्याही भावमुद्रा वाचता येतात असेच म्हणावे लागेल. Smile वक्त्याच्या बाबतीत असे म्हटले जाते की, ज्याला थांबायचे कळते तो मोठा वक्ता. आपणही वाचकांचा मूड बघुन थांबण्याचा निर्णय घेतला, म्हणुन आपणही आम्हाला मोठे वाटतात. संगीतकारांच्या भावमुद्रा आणि आपल्या लेखनाचे दिर्घकाळ स्मरण राहिल. अर्थात आपणास अजून काही संगीतकारांच्या भावमुद्रा टाकायच्या असतील तर जरुर टाका. त्याचबरोबर आता झकासपैकी बालपणाच्या आठवणी येऊ द्या किंवा ललित लेख येऊ द्या !!!

सुरेख..

सर्व मुद्रा सुरेख..!

अभिषेकीबुवांचं संगीत हा माझ्यामते डॉक्टरेटचा विषय आहे. त्यांच्या संगीतामुळे मराठी संगीतरंगभूमीला नवसंजिवनी मिळाली. अभिजात संगीताचा अतिशय सुरेख उपयोग करून त्यांनी उत्तमोत्तम चालीत नाट्यपदं बांधली. अभिषेकीबुवांच्या चाली, जुन्या जमानातल्या बखलेबुवा, टेंबे यांच्याच परंपरेतल्या वाटाव्यात इतक्या अस्सल होत्या. काहीशी मरगळलेली संगीत रंगभूमी अभिषेकीबुवांच्या समर्थ संगीतामुळे पुन्हा एकदा उभी राहिली आणि बुवांची नाट्यपदं अगदी सर्वतोमुखी झाली, घराघरात पोहोचली.

माझ्या मते बखलेबुवा, देवल, टेंबे ह्या मंडळींनी मराठी संगीत रंगभूमीचा जो भक्कम पाय रचला होता त्यावर 'अभिषेकी झालासे कळस!' असंच म्हणावं लागेल!

आपला,
(अभिषेकीप्रेमी) तात्या.

+१ असेच म्हणतो.

सर्वसामान्य रसिकाला पुन्हा एकदा संगीत रंगभूमीची ओढ वाटू लागली इतकी त्यांच्या नाट्यपदांची मोहिनी आजही आहे.

प्रमोदकाका, अशा कलाकारांबद्दल सचित्र माहिती देण्याचा आपला खटाटोप संस्मरणीय आहे.
(आपला 'बालपणीचा सुखाचा ललितकाळ' पुढे चालू रहावा असे वाटते.)

चतुरंग