आजकाल स्पर्धा कोण वाढली आहे. वर जाण्यासाठी जो तो धडपडतोय. आता जे हुषार आहेत त्यांच ठिक आहे पण आमच्या सारख्यांच काय? आणि आजकाल वर चढायला हुषारी पुरतेच असही नाही. मग मोठ्ठ व्हायचं असेल तर काय करावं बर? आहेत, त्यालाही उपाय आहेत. एक उपाय मागे मी इथे सांगितला होता. आता दुसरा सांगतो.
चारचौघात आपल वजन वाढवायच असलं, महत्व प्रस्थापित करायच असल तर मग काहीतरी वेगळं कराव लागतं. थोडक्यात आपणच आपल्याला मोठ कराव लागतं. ते कस? अहो हे कलियुग आहे, बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे. कस खपणार? तुम्ही काय आहात यापेक्षा तुम्ही काय दिसता वा स्वत:चा काय आभास निर्माण करू शकता यावर तुमच भवितव्य अवलंबुन असतं. आणि असे करायचे अनेक सोपे मार्ग आता उपलब्ध आहेत. जे तुम्हाला झटपट मोठे करू शकतात.
आता उत्सुकता न ताणता सुरू करतो. एक जुने सुभाषित आहे जे सर्वांना माहित आहे. केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार....... बास. अगदी हेच. ’सभेत संचार’ कुठल्या सभा? कसला संचार? कोण घेतो सभा? कसल्या या सभा? अरेच्चा! हे काय प्रश्न झाले? अहो सभा म्हणजे मराठीत ज्याला सेमिनार, वर्कशॉप, कॉन्क्लेव वगैरे वगैरे म्हणतात तेच ते. मूंबईसारख्या शहरात अशा सभांना तोटा नसतो. अनेक संस्था, अनेक शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन संस्था, व्यापारी संस्था, सल्लागार संस्था रोज कुठे ना कुठे दुकान लावुन असतात. उगाच का मुंबईची तारांकित हाटेल दुथडी भरून वाहतात? आपण फक्त पाळतीवर राहायच. भोचकपणा करायचा. बुद्धिमान आणि कामसु मित्रांशी संपर्क ठेवावा. जालावर जिथे जिथे म्हणुन (फुकट) सदस्यत्व घेता येईल तिथे घ्यावे, आपला विपत्ता बिनदिक्कत द्यावा. ईच्छा तेथे मार्ग!
अशी एकदा का पेरणी केली, की पीक उगवु लागत. मग आपल्या व्यवस्थापनाचे धोरण नीट निरखावे, त्यांचा कल कुठे आहे ते नीट समजुन घ्यावे. मोठ्या साहेब लोकांच्या आजुबाजुला घुटमळुन कसले वारे वाहत आहेत त्याचा आढावा घ्यावा. हे आपल्या पीकाचे खत. न चुकता रोज विरोप वाचुन पाहावेत. बघता बघता सुगीचा हंगाम येतो. आपल्याला अनेक सभांचे टपाल येऊ लागते. मित्रमंडळी त्यांचा मालकवर्ग त्यांना कुठे धाडतो याच्या खबरी लागतात. भ्रमणध्वनीवर संस्थांच्या करवल्यांचे देकार येऊ लागतात. आता एक धूर्त पाऊल म्हणजे साहेब लोकांच्या मेजावर पडलेली प्रकाशने ’साहेब, जरा वाचायला नेऊ का?’ असे म्हणत (आणि त्यांचे पकविणे सहन करत) लांबवावीत. यामुळे सध्या कसला प्रवाह जोरात आहे ते ठाम समजतेच, वर आपण अत्यंत प्रगतीशील व हुषार आहोत असा गैरसमजही निर्माण व्हायला मदत होते. मग मंदी निमित्त मोठ्या साहेबांचे झालेले भाषण नीट स्मरावे. झालंच तर गृहप्रकाशनातील भिकार संपादकिय वाचावे. आणि या सर्वातले परवलीचे शब्द हेरावेत. परवलीचे शब्द कोणते? ’मंदीवर मात’, ’उत्पादकतेत वाढ’, ’नव्याचा शोध’, ’गुणवत्ता विकास’, ’सामाजिक जाणीव’, ’भविष्याचा वेध’, ’कर्मचारी सहभाग’, ’बुद्धिसंधारण’, ’नेतृत्व विकास’, ’मानवी संबंध’, ’नव्या वाटा’, ...............
मग विषय निवडावा. सुहास्य मुद्रेने साहेबाकडे जावे. "सर, माझी खात्री आहे, आपण मला नक्कीच संमती द्याल" साहेबाच्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह फुलायच्या आतच हातातला सभा-सहभागाचा अर्ज पुढे करावा. कधी बाप जन्मात न ऐकलेल्या वक्त्या-व्याख्यात्या-प्रशिक्षकांबद्दल आपण त्यांना बालपणापासुन ओळखत असल्यागत विलक्षण आदरयुक्त बोल काढावेत. आपण कार्यभाराखाली दबलेले असतानाही केवळ सदर सभेचा विषय आपल्या ध्येय धोरणांशी निगडीत असून ती आजच्या घडीची गरज आहे हे लक्षात घऊन आपण त्यात सहभागी व्हायचे ठरविले आहे असे न विसरता सांगावे. मग साहेब आणि आपल्या व्यवस्थापनाचे ’कर्मचाऱ्यांना विकासासाठी सातत्याने प्रोत्साहन देण्याच्या’ धोरणाचे तोंडभरुन कौतुक करावे. आता आपल्या अर्जावर सही करण्याखेरीज साहेबाला गत्यंतर नसते. आणि आतली बात अशी की एकेकाळी साहेब आपल्या जागी असताना त्यानेही हेच केलेले असते. साहेबाची सही होताच सर्वप्रथम अर्ज लेखा विभागाकडे सुपुर्द करून "धनादेश त्वरित तयार करुन आजच रवाना झाला पाहिजे" असे साहेबांनी सांगितले आहे असे ठणकावावे. नपेक्षा हे झारीतले शुक्रचार्य असे कागद बुडाखाली दाबुन बसतात. सायंकाळी घरी जाण्यापूर्वी खुंटा हलवुन बळकट करावा, वर आंतरध्वनी वरून ’होय साहेब, धनादेश तयार होत आहे" असे मोठ्याने म्हणावे. मग लगबगीने आयोजकांना आपली उपस्थिती कळवावी.
कार्यक्रम निवडताना कुण्या शाळा वा महाविद्यालयाच्या सभागृहात होऊ घातलेला भिकार कार्यक्रम निवडु नये. शक्यतो पंचतारांकित वा किमान तारांकित हॉटेल निवडावे. आणि दिवस हा कामाचा दिवस असावा. शनिवार वा रविवार वा अन्य सुटीचा दिवस असु नये याची दक्षता घ्यावी. विषय म्हटल तर संबंधित पण गळ्यात येईल असा नसावा. आणि हो. गिळता येइल इतकाच घास घ्यावा. दुष्ट साहेब लोक आय आय एम वगैरे मध्ये होणाऱ्या एखाद्या प्रशिक्षणात लटकावु पाहतील तर ते हाणुन पाडावे. अर्थात वरकरणी "अरे वा! आय आय एम - ते पण अहमदाबाद! वा वा वा भाग्यच उजाडले म्हणायचे, पण काय करणार सध्या काही कालबद्ध कार्यात गुंतलोय ना? ही जबाबदारी नसती नक्की गेलो असतो" असे म्हणत सुटून पडावे. मागे मी एकदा असाच फसलो होतो. एके दिवशी अचानक मला मनुष्यबळ विकास विभागाच्या संचालकांनी बोलावुन सांगितले की व्यवस्थापकिय संचालकांच्या शिफारसीनुसार मला आय आय एम अहमदाबाद येथे एक आठवड्याच्या विचारमंथन कार्यशाळेसाठी नामांकित केले आहे. मी हरखुनच गेलो. काम सोडुन आठवडाभर उंडारायचे म्हणजे काय? वा! मात्र पुढे काय वाढुन ठेवले होते त्याची कल्पना मला बापड्याला नव्हती. मी आपला गेलो. संध्याकारी कचेरीतुनच निघालो, आणि उडाण विलंब वगैरे सहन करून साडे अकराला आय आय एम परिसरत दाखल झालो. स्वागताला हजर असलेल्या इसमाने हातात खोलीच्या चावी बरोबर एक जाडजुड बाड ठेवले. वर स्वागत या नावाखाली धमकीपत्र होते. "आपले स्वागत असो. उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता अमुक एक कक्षात हजर राहणे. उद्याचा विषय अमुक हा असून त्याला पूरक असे वाचन करुन येणे. सदर वाचन विषय दिलेल्य़ा बाडात पृष्ठ क्रमांक अमुक ते तमुक मध्ये आहे. बोंबला. अखेर दिड वाजता हातातले बाड गळुन पडले व मी आडवा झालो. ही तर भयंकर छळ छावणी होती. भरीस भर म्हणजे नाश्ता व जेवण देणारे आपल्या गुजराथी बाण्याला जागुन आग्रहाने भरपेट जेवायला घालायचेच वर आग्रहाने गोडधोडही खायला लावायचे. मात्र भरल्या पोटी डोळे उघडे ठेवुन गहन चर्चा ऐकायच्या ही भयानक शिक्षा होती. रात्री तर भयानक छळ होत असे. दिवसाचा कार्यक्रम संपताना सहा अपरिचित पात्रांची मोट बांधली जायची आणि एखाद्या विषयावर दुसऱ्या दिवशी सकाळी सादरीकरण करायचे फर्मान बजावले जायचे. रात्री पुढ्यात सुग्रास अन्न असुनही जेवायची हिंमत होत नव्हती. बरे सादरीकरण म्हणजे नेहेमीप्रमाणे चुना लावायची सोय नाही कारण इथले प्राध्यापक महा खट आणि तेही किचकट व कुजकट, आणि प्रत्येक शब्दाचा कीस पाडणारे. ते आठ दिवस मी कसे घालवले मला माहित. असो. नकोत त्या कटु आठवणी.
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता कार्यक्रमाच्या एक दोन दिवस आधी निरोप्या, मुखपुस्तक, मिसळपाव अशी नित्याची महत्वाची कामे बाजुला ठेवुन जरा बदल म्हणुन आंतरजालाचा उपयोग ज्ञान व संशोधनासाठी करावा. माहिती पत्रकातुन वक्ते, परीसंवादातले सहभागी वा सल्लागार असे जे कुणी उत्सवमूर्ती असतील त्यांची नावे व अल्पपरिचय या आधारे जालावरुन त्यांचे कार्य, त्यांना मिळालेले मानसन्मान, त्यांनी लिहिलेली पुस्तके वगैरे जुजबी माहिती काढावी. मुख्य म्हणजे त्यांचे श्रीमुख नीट अवलोकन करावे ज्यायोगे प्रसंगी त्यांना ओळखणे सोपे जावे. अशी महत्वाची माहिती एक कागदावर छापुन घ्यावी व न चुकता तो कागद खिशात ठेवावा. आपल्याला महत्वाच्या कार्यक्रमासाठी जायचे असल्याचा जाहिर उच्चार करुन नित्याची कामे करणे आदल्या दिवशीच बंद करावे, कामे सहकारी व कनिष्ठांमध्ये वाटुन द्यावीत. एक सांगायचेच राहीले. कार्यक्रमाला एकट्याने न जाता मर्जीतल्या कनिष्ठ सहकाऱ्याला/ सहकारिणीला सहभागी करुन घ्यावे. आणि हे वर्तमान साहेबाची सही झाली की मग त्या व्यक्तिला बोलावुन सांगावे. तो हरखुन जातो. अशामुळे आपले भावी समर्थक निर्माण होतात व दुसरीकडे वरिष्ठांना आपली ’संघभावना’ दिसुन येते. खरा फायदा म्हणजे तिथे महत्वाचे मुद्दे टिपुन घ्यायचा त्रास वाचतो व आपसूक सर्व साहित्य मिळते. काय करणार? जाऊन आल्यावर एकदा ’आपण काय ऐकले, काय शिकलो, काय बोध घेतला, जे ऐकले त्याचा नित्याच्या कार्यात सहभाग कसा करता येईल व त्यायोगे आपल्या आस्थापनेचे भले कसे होईल यावर एक सादरीकरण द्यायची वेळ आली तर तयारी असावी.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी आपल्या कनिष्ठाला ’जाताना मला घे’ असे सांगावे. झकपक पोशाख करावा. मोठ्या तारांकित हाटेलात जायचे असेल तर कोट अवश्य घ्यावा (नपेक्षा तासाभरात थंडी वाजु लागते). अत्तराचा फवारा मारावा. बुटाला चकाकी द्यावी. आत काही नसलेली संगणक थैली खांद्याला लावावी वा एखादी रुबाबदार चामडी थैली हाती घ्यावी. वेळ अजिबात चुकवु नये. (खाउन माजावे, टाकुन माजु नये). जाताक्षणी सराइतपणे नोंदणी कक्षा शोधावा. इथे सराईत आणि नवखे यातला फरक समजुन येतो. सरळ आपले भेट पत्र गल्ल्यावर देऊन आपला बिल्ला, थैली वगैरे तब्यात घ्यावे. मग आत जावुन जिथे कुणी त्रास देणार नाही आणि जी जागा जा ये करायला सोपी असेल ती पटकावावी. आपली निशाणी जागी ठेवुन तडक बाहेर यावे आणि चहापानात सहभागी व्हावे. आपण काही भुकेले नसतो, पण जरा दुसऱ्याचे मन राखावे, यजमानांना बरे वाटावे म्हणुन सर्व खाद्यपदार्थ हसतमुखाने खावेत. अजिबात लाजु नये. यजमान आपली बडदास्त वधुपिता वरपक्षाच्या पाहुण्यांची घेतो तद्वत घेतात. मात्र गाफिल राहुन चालत नाही हो. मध्यंतरी एका परिसंवादाला गेलो असता मध्यंतरात यजमानांपैकी एका सुहासिनीने गाठले. माझ्या डाव्या हातात बशी आणि उजव्या हातात सामोसा होता. "कसा वाटला?" असा सस्मित प्रश्न येताच मी ’उत्तम, सुसंगत" असे मान डोलावुन सांगितले. पटकन तोंडातुन ’खुसखुशीत’ असे निघणार होते पण एव्हाना सराईत झाल्याने हा प्रश्न हातातल्या समोश्याविषयी नसून मध्यंतरापूर्वीच्या भागाला उद्देशुन आहे हे मी ओळखून होतो. आपल्या सफाईदार वावरण्याने व पाहुणचाराने (दुसऱ्याच्या खर्चाने का असेना) कनिष्ठ दिपुन जातो व आपला वरिष्ठ ’मोठा’ आहे या विषयी त्याची खात्री पटु लागते.
सभेचे कामकाज सुरु होताच सहकाऱ्याला सर्व नावे व मुद्दे नीट टिपुन घण्याची सूचना करावी. जवळ एक चपटा खिशात मावेल असा डिजिटल कॅमेरा बाळगावा. जेव्हा काही महत्वाची सरकी पडद्यावर दिसेल तेव्हा टिपावी. पुढे कधीतरी तोंडावर मारायला उपयोगी ठरते. एकेक जण अपले सादरीकरण संपवुन खाली उतरण्या आधी ’काही प्रश्न असल्यास विचारा असे सांगतो. निदान एखाद्या तरी वक्त्याला एखादा प्रश्न विचारावा. भले तो त्या विषयाशी सुसंगत नसेल. हुषार व्याख्याते कसातरी कसलातरी संबंध जुळवुन उत्तर देतात इतकेच नव्हे तर ’उत्तम प्रश्न
’ अशी तारिफही करतात. इथे तुमचा सहकारी/ सहकारिणी विलक्षण आदराने तुमच्याकडे पाहतात. जेवणाच्या वेळी नेहेमी उलटीकडुन सुरुवात करावी म्हणजे गर्दीचा त्रास होत नाही. म्हणजे लोक हातात बशी घेऊन सलाड्च्या क्रमाने जात असता आपण थेट विरुद्ध टोकाने म्हणजे पापडाकडुन सुरुवात करावी. जेवत असताना भोजनोत्तर मिष्टान्न काय आहे हे हळुच पाहुन यावे, त्याप्रमाणे भोजन बेतावे. भोजनानंतरचा काळ कठिण. बेसावध क्षणी डुलकी लागायचे भय हमखास. तसे होऊ नये यासाठी समोर मांडलेल्या कागद पेन्सिलीचा सदुपयोग करुन फुली गोळा वा ठिपक्याची रांगोळी काढुन घर घर खेळावे. तशा अधुन मधुन पडणाऱ्या टाळ्यांनी झोप मोड होतेच, पण हा चाळा बरा. अंधुक प्रकाशामुळे आपण महत्वाच्या नोंदी करीत आहोत असे इतरांना भासते आणि आपलेही काम होते. अशा कर्यक्रमांना चार वाजता ’उच्च चहा’ असतो. छान गरमा गरमा कडक कॉफी घ्यावी. तोंडी लावायला समोसे, रोल्स, टिक्की, कुकी असे काही असतेच. डोक्याचे काम करायचे म्हणजे सकस आहार हा हवाच.
अखेरचे सत्र संपताच लगबगीने व्यासपीठाकडे जाऊन एखाद्या व्याख्यात्याला भेटावे. त्याची तारिफ करावी. हे दृश्य दुरुन पाहणारा सहकारी आणि आयोजक यांच्या नजरेत आपण वधारतो. लग्नाच्या वऱ्हाडात आपल्या बबडीला होतकरू वर शोधणाऱ्या आत्या - मावश्या असतात वा वास्तुप्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्ज देणाऱ्या वित्तसंस्थांचे गाळे असतात तद्वत बऱ्याच सभांमध्ये होतकरु उमेदवार शोधणारे ’भरती सल्लागार’ही असतात. यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवलेले बरे. (वेळ काय सांगुन येते का?) निघण्यापूर्वी ’आयोजन फार उत्तम होते आणि कार्यक्रम झकास झाला’ असे आयोजकांपैकी एखाद्याला/एखादीला आवर्जुन सांगावे. मग आयोजक पुन्हा एकदा आपले भेटपत्र मागुन घेतात. हीच ती वेळ हाच तो क्षण. आपल्या पुढील कार्यक्रमाची बीजे इथेच रोवली जातात.
प्रतिक्रिया
7 Dec 2011 - 12:34 am | अन्या दातार
भन्नाट हो! काय आयडीया आहेत एकेक. अनुभव दांडगा दिसतोय आपला ;)
7 Dec 2011 - 1:55 am | रेवती
मिटिंगदेवीनंतरचा भाग भारी जमलाय.
सगळे शब्द मस्त, पण 'उच्च चहा' वाचल्यावर फिस्सकन हसू आले.
7 Dec 2011 - 2:07 am | बहुगुणी
फार पोचलेले अनुभव आहेत हे सिद्धच आहे! 'यशस्वी असे व्हा' वगैरे वर आधारित एक समुपदेशन कार्यालय / संस्थळ सुरू करायला हरकत नाही :-)
7 Dec 2011 - 3:05 am | गणपा
_/\_
दंडवत स्विकारा गुरुदेव.
भडकमकर क्लासेसची आठवण झाल्यावाचुन राहिली नाही. ;)
7 Dec 2011 - 3:14 am | पिंगू
प्रात्यक्षिक आवडले.. _/\_
- पिंगु
7 Dec 2011 - 3:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उगाच का आम्ही तुमच्याशी 'पंडीत मैत्री' केली! ;-)
7 Dec 2011 - 3:21 am | चतुरंग
हे झालेलं दिसतंच आहे! ;)
प्रत्येक गोष्ट झटपट, चांगली आणि स्वस्त व्हायला हवी असा हट्ट असलेला जमाना आहे.
माझ्या एका कलीगच्या डेस्कवरती पुढील संतवचन लावलेले आहे -
“We do three types of jobs – Cheap, Quick and Good. You can have any two.”
1.“A good quick job – won’t be cheap”
2.“A good job cheap – won’t be quick”
3.“A cheap job quick – won’t be good.”
(एक्सपेन्सिव्)रंगा
(खुद के साथ बातां : रंग्या, साक्षीमहाराजांनी हा लेख अशाच एखाद्या सेमीनार मध्ये पाठच्या बेंचवर बसून हळूच टंकलाय की काय? ;) )
7 Dec 2011 - 9:22 pm | सर्वसाक्षी
(खुद के साथ बातां : रंग्या, साक्षीमहाराजांनी हा लेख अशाच एखाद्या सेमीनार मध्ये पाठच्या बेंचवर बसून हळूच टंकलाय की काय? Wink )
रंगाशेठ,
बरोब्बर ओळखलत. १ तारखेला एका सेमिनारला गेलो असता (अर्थातच मागलटीच्या मेजावर बसुन) ही कल्पना सुचली.
7 Dec 2011 - 6:44 am | सन्जोप राव
वर्णन आवडले. मराठी शब्दांच्या अतिरेकी आग्रहामुळे झणझणीत, देशी लसूण, कोथिंबीर वगैरे घातलेली मुगाची उसळ खाताना घासागणिक दाताखाली चोर मूग येऊन दाताच्या कण्या व्हाव्यात तसे झाले असले तरीही वर्णन आवडले.
जवळ एक चपटा खिशात मावेल असा डिजिटल कॅमेरा बाळगावा.
किंवा एखादी चपटी.. ;-)
बाकी असे परिसंवाद पोत्याने पालथे घातल्याने सह-अनुभूती आहेच!
7 Dec 2011 - 9:25 pm | सर्वसाक्षी
समोर तलाव तुडुंब भरलेला असताना लोटा कशाला न्यावा?
कार्यक्रम संपल्यावर श्रमपरिहार असतोच की.
8 Dec 2011 - 7:43 pm | प्रकाश घाटपांडे
श्रमपरिहाराचे महत्व आपापल्या परीने अनन्य साधारण आहे. शास्त्रापुरता का होईना श्रमपरिहार झालाच पाहिजे! :) :-)
7 Dec 2011 - 9:25 am | फारएन्ड
प्रचंड आवडले! धमाल लिहीले आहे :D आधीचा भागही वाचतो आता.
7 Dec 2011 - 9:39 am | मराठी_माणूस
लेख मस्त. वाचताना मजा आली.
असे बरेच सहकारी आजुबाजुला पाहीलेत, पण माघारी लोक त्यांच्या अशा वागण्यावर टीका करतात आणि ति कधीच आदरणीय व्यक्तीमत्व नसतात.
7 Dec 2011 - 9:54 am | तर्री
मजेदार मांडणी.
ऊच्च चहा नंतर कॉफी खटकली . कॉफीला मराठी काय पर्याय काय हा विचार सुरु आहे.
जेवणाच्या वेळी नेहेमी उलटीकडुन सुरुवात करावी म्हणजे गर्दीचा त्रास होत नाही.
हा पुरोगामी विचार ध्यानात घेतला गेला आहे.
7 Dec 2011 - 9:57 am | गवि
मला कोणीतरी म्हटलं होतं की कॉफी हा एकच शब्द असा आहे की जगातल्या सर्व भाषांमधे तो आहे, आणि कॉफी याच अर्थाने. किंवा त्याला प्रतिशब्द नाहीत. किंवा असले तरी ते नंतर तयार झाले असावेत.
7 Dec 2011 - 10:02 am | प्रचेतस
मूळ शब्द बहुधा अरेबिक आहे.
'काहवा' असे पेय होते हे कुठेतरी वाचल्याचे आठवतय.
7 Dec 2011 - 10:52 am | अन्या दातार
कॉफी आणि काहवा वेगळे आहेत. काहवा म्हणजे विविध मसाले, काहवा चहापत्ती, बदाम, केशर इ. पदार्थ घालून केलेला चहा.
काहवा म्हणजे कॉफी नव्हे. दोन्ही गोष्टींचे मूळसुद्धा वेगळे आहे. कॉफी इथिओपियामधून अरब जगतात गेली. काहवा कश्मिरी प्रदेशातला (म्हणजे देशी ;) )
कॉफ्या चहाळ
7 Dec 2011 - 11:38 am | प्रचेतस
मस्त माहिती.
हा काहवा आता प्यायलाच पाहिजे.
7 Dec 2011 - 9:55 am | गवि
जबरी, खास, भन्नाट, अफलातून, धमाल, उत्तम, झकास, लव्हली, सुप्पर, खंग्री...
पुलंच्या "असामी"शी कंटेंपररी नसलं, हल्लीच्या काळातलं असलं तरी वरचं लिखाण वाचून काहीशी बेनसन जान्सन कंपनीची आठवण झाली. धोंडो भिकाजी जोशी यांना पडणारा तो प्रश्न की, कोणीच मान मोडून काम न करता आमची बेनसन जान्सन कंपनी चालते तरी कशी..? त्यामुळेच एकूण जग चालवण्यासाठी काही करायची गरज आहे असं मुळीच वाटत नाही. ;)
7 Dec 2011 - 9:56 am | ५० फक्त
जबरा लेखन जाम आवडले,
असे अनुभव फार कमी आहेत तरी सुद्धा.
@ चतुरंग,
तुमच्या मित्राला धन्यवाद कळवा, त्यांचे संतवचन मी आता माझ्या डेस्कवर सुद्धा लावतो.
7 Dec 2011 - 10:55 am | नगरीनिरंजन
लेख मस्त वाटला आणि दिलेले सल्ले अत्यंत व्यवहारी आणि उपयुक्त आहेत!
आंग्ल शब्दांना दिलेले काही मराठी प्रतिशब्द टोपी उडवून गेले.
"उच्च चहा" आणि "सरकी" =)) =))
(डिजिटल कॅमेर्याला का सोडले ते कळले नाही).
मिटींगदेवींची कहाणीसुद्धा वाचून काढली.
तीही झबर्दस्त आहे!
7 Dec 2011 - 11:06 am | विवेकखोत
"बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे "
पण माझ्या तर अशी म्हण ऐकिवात आहे
"बोल नारयाचे मुग हि विकले जातात अन न बोल नारयाचे गहू पण विकल्या जात नाही "
अर्थ बरोबर आहे पण म्हण वेगळी आहे, कृपया (माझे काही चुकत असेल तर )योग्य बदल सुचवावा.
7 Dec 2011 - 11:09 am | प्रीत-मोहर
दोन्ही भाग सहीच!!!
7 Dec 2011 - 11:12 am | आचारी
गुरुदेव तुमच्या चरण कमलाचे दर्शन द्या ! काय एक एक खतरनाक कल्पना !!
7 Dec 2011 - 12:14 pm | आनंद घारे
आणखी एक पाऊल पुढे टाकून त्या सभेत वक्ता किंवा प्रवक्ता होण्यासाठी आणि झाल्यानंतर काय काय करावे याचे मार्गदर्शन केल्यास सभेतला संचार अधिक फलप्रद होईल.
7 Dec 2011 - 9:30 pm | सर्वसाक्षी
कल्पना चांगली आहे, सूचना विचाराधीन राहील. पुढे मागे लेख लिहिला गेल्यास आपले नाव श्रेयनामावलीत झळकविले जाईलः)
7 Dec 2011 - 9:31 pm | सर्वसाक्षी
कल्पना चांगली आहे, सूचना विचाराधीन राहील. पुढे मागे लेख लिहिला गेल्यास आपले नाव श्रेयनामावलीत झळकविले जाईलः)
7 Dec 2011 - 12:14 pm | मन१
अजून एक बुकमार्क मिळाला...
"सरकी" ठिक पण "उच्च चहा"म्हणजे?
--वाचक मनोबा.
High tea असा काही शब्द ऐकण्यात नाही. कृपया प्रकाश टाकावा.
माठ
7 Dec 2011 - 9:16 pm | सर्वसाक्षी
म्हणजे सायंकाळी चहाबरोबर हादडायला नाना पदार्थ असणारा चहापान कार्यक्रम.
असे पाहा, कार्यक्रम संपतो साडेसहा- सातच्या सुमारास. पेयपान सुरू होते साडेसात आठला. म्हणजे जेवणाला नऊ तरी वाजणार. कार्यक्रमा नंतर जेवण वगैरे नसले तर घरी जाऊन जेवायला नऊ- साडेनऊ होणारच. तेव्हा पोटाला धर म्हणुन हा प्रघात पडला असावा.
7 Dec 2011 - 12:27 pm | छोटा डॉन
_/\_
साष्टांग नमस्कार स्विकारा साक्षीदेवा !
जे काही लिहले आहे त्याला तोड नाही, एकदम 'उत्तम, सुसंगत' वगैरे आहे
पण बरीच बिझीनेस सिक्रेट्स अशी उघडपणे चव्हाट्यावर मांडल्याबद्दल निषेध ;)
- (कॉन्फरंसप्रिय) छोटा डॉन
7 Dec 2011 - 12:32 pm | प्यारे१
अरे वा....
दांडगा अनुभव दिसतोय. की सर्वसाक्षीत्वाचा परिणाम?
7 Dec 2011 - 9:17 pm | सर्वसाक्षी
दोहोंचा सामायिक परिणाम असावा:)
7 Dec 2011 - 2:18 pm | पैसा
एकदम लैच्च भारी!
7 Dec 2011 - 6:59 pm | दादा कोंडके
_/\_
7 Dec 2011 - 7:02 pm | जाई.
मस्त वर्णन केलं आहे
7 Dec 2011 - 7:24 pm | विजुभाऊ
लय धमाल. झकास.
टेक्नीकल सेमिनार आमच्या डोच्क्यावरुन जातात.
बिझनेस सेमिनार बरे असतात. काही नवी म्हैती मिळ्ते.
ऑल हॅन्ड्स मीट नाअमक काही इम्टर्नल सेमिनार असतात. त्याचे नक्की काय प्रयोजन असते ते प्रायोजकानाच ठौक नसते
7 Dec 2011 - 10:15 pm | मेघवेडा
हुच्च!
8 Dec 2011 - 11:20 am | इरसाल
20 Aug 2012 - 2:44 pm | बॅटमॅन
हा खंग्री धागा मुद्दाम वर्ती काहाडत हाये!!