बाय बाय क्लिक क्लॅक डिंग!!!!

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
30 Apr 2011 - 3:08 pm

क्लिक क्लॅक डिंग!!!! एकेकाळचा अनेक ऑफीसातून येणारा सगळ्यात नेहमीचा आवाज. टाईपरायटरचा आवाज. टाईपरायटर तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. मीही लहानपणापासून पाहत आलो आहे. हा टाईपरायटर घरात कधी आला हे नक्की आठवत नाही मात्र तो घरी होता. तेव्हा आमचं दहिसर हे मुंबईचं एक उपनगर असलं तरी त्याला एक गावपण होतं. गावातून एक 'वाहती' नदी होती. (माझ्या कळत्या वयापर्यंत तिचं पाणी दुषित व्हायला लागत असलं तरी निदान वाहतं होतं.) गावठणाबाहेर असलेलं विठ्ठलाचं कौलारू मंदीर ही गावातली महत्त्वाची जागा होती. शाळा होती, टेकडी होती, टेकडीवर देऊळ होतं, तिथे चढून-दमून गेल्यावर हमखास मिळणारं खोबरं होतं, त्या उंचीवरून दिसणारी रेल्वेलाईन, आणि त्यावरून मधूनच जाणारी रेल्वे होती.

असो.. तर सांगायची गोष्ट अशी हा टाईपरायटर त्या काळापासून आमच्याकडे असावा. माझ्या लहानपणापासून त्याला मी माझ्या बाबांच्या समोर बघत होतो. रोज संध्याकाळी ५:४० ला चर्चगेटहून सुटणारी लोकल ६:४५ वाजता दहिसर गाठायची आणि बाबा ६:५० ला घरात हजर असायचे. घरी आले, चहा, दिवेलागण झाली की जेवणं होईपर्यंत आमच्याशी गप्पा मारणे- टाईमपास सुरू असायचा. त्यावेळचं आमचं घर बैठं, कौलारू होतं. दारं सतत उघडी. आमचं एकत्र कुटुंब आणि त्यात आजी आमची जगमैत्रिण, त्यामूळे सतत घरात कोणीतरी पाहुणा असेच. जेवणं झाली की आम्ही टिव्ही समोर आणि बाबा मात्र जो हा टाईपरायटर समोर घ्यायचे की त्याची 'टक् ट्क' आमचे डोळे मिटल्यानंतरही चालु असायची.

रोजची टाईपरायटरची टक् ट्क हा तेव्हा सवयीचा भाग होता. इतकंच नव्हे तर ती आमची ओळखही होती. त्यावेळी 'टायपिस्ट' असणे हे एक कसब असल्याने टायपिंग येणार्‍यांना नोकर्‍या तर मिळतच पण घरी टाईपरायटर असल्याने कामेही मिळत. त्यात त्या काळी अख्ख्या गावात जे मोजके टाईपरायटर होते त्यापैकी एक माझ्या बाबांचा होता. त्यात त्यांचे टायपिंग हे अतिशय वेगात आणि अचूक होते. टंकन होणार्‍या कागदाकडे न बघता आणि अनेक पानांमागे एकही शब्द चुकीचा टाईप न करता देण्यासाठी त्यांचा लौकिक होता. त्यामुळे सतत अनेक जणांचा राबता घरात असायचा.

ऑफिसमधून काम करून आल्यावर पुन्हा हे टायपिंग करणे हे किती कष्टाचं आहे हे तेव्हा कळत नसे. रात्री २-३ पर्यंत टायपिंग करून पुन्हा सकाळी ऑफिस गाठणे याला त्यांचा फिटनेस कारभूत आहे असे ते सांगतात. मात्र त्याला त्यांची कुटुंबासाठीची तळमळ कारभूत होती हे आता जाणवते. QWERTY कीबोर्ड, त्यावर न दिसता चालणारी बोटे, समोर कागदावर उमटणारी अक्षरे याचंच आम्हाला त्यावेळी अप्रुप होतं.

त्यात बाबांनी रिबिन बदलायला वगैरे टाईपरायटर उघडला की आम्हा पोरांची चंगळच. बटण दाबल्यावर वर येणार्‍या काड्या, त्यावरची उलट अक्षरे, ग्रीसचा डबा, त्याने अकारण माखवून घेतलेले हात वगैरेचा कोण आनंद होता. अख्खा मित्रांना गोळा करून आम्ही ते रिबीन बदलणे, काड्यांना ग्रीस लावणे बघायचो. त्यात बाबाही अजिबात न ओरडता विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्यायचेच वर मला सगळं झालं की एक पान टाईप करायला द्यायचे. ज्यात मला 'Q' ते '?' पर्यंत सगळी अक्षरांची टेस्टिंग करायची असे.

ह्या टंकनोद्योगात आम्हा मुलांसाठी सगळ्यात आवडता प्रसंग जर काहि असेल तर बाबांची टायपिंग मधे चुक होणे. जर मोठी चुक असेल तर कागद पूर्ण भरायच्या आत आम्हाला एक खटका दाबून अख्खा कागद खेचायला मिळे. असा कागद खेचण्याचा पराक्रम करण्यासाठी आम्ही वाट बघायचो. जर लहान चूक असेल तर बाबा एक बाटली काढायचे ज्यात स्पिरीटसारखा वास येणारं एक गुलाबी द्रावण असायचं ज्याने स्टेंन्सिलवर टंकन केलेले बदलता यायचं. त्याचा वास घेत घेत योग्य अक्षरावर ते लिक्विड लावणे हा ही क्षण आनंदाचा असे. त्यासाठी तर बाबांची चुक व्हावी म्हणून आम्ही तासन तास बसलेलं आठवतंय!

टायपिंग करताना केवळ डोळ्यांवरच नाही तर छातीवरही ताण येतो. तो ताण बाबांवर येऊ लागला. आणि तोपर्यंत घरची आर्थिक परिस्थितीही बरीच बरी झाली होती, तेव्हा हळूहळू बाबांचा टायपिंगचा जोडधंदा बंद झाला. मात्र ते घर सोडेपर्यंत घरावरचा 'टायपिस्ट' हा ओळख असलेला बोर्ड बाबांनी तसाच ठेवला होता. अडल्या-नडल्यासाठी रात्री अपरात्री कागद टाईप होण्याचे ते हक्काचे ठिकाण टिकून होते.

परवा डि.एन.ए. वाचत होतो त्यात ही बातमी बाचली आणि मन २०-२२ वर्षे मागे पळालं. त्या काळाशी जुळलेली एक नाळ तुटल्यासारखं वाटलं.. मी स्वतः आयुष्यात या ज्या काही ठिकाणावर आहे त्यामागे अनेक व्यक्तींप्रमाणेच अनेक वस्तुंचाही हातभार आहे. एके काळी आपल्या सार्‍या काड्यंनिशी आमच्या कुटुंबाच्या मागे उभ्या राहिलेल्या टाईपरायटरचे काळाच्या पडद्याआड जाणे अपेक्षित असले तरी मनात कुठेतरी दुखवून गेलेच!

जीवनमानबातमी

प्रतिक्रिया

गणपा's picture

30 Apr 2011 - 3:41 pm | गणपा

छान लिहिलयस रे ऋ. :)

"एके काळी आपल्या सार्‍या काड्यंनिशी आमच्या कुटुंबाच्या मागे उभ्या राहिलेल्या टाईपरायटरचे काळाच्या पडद्याआड जाणे अपेक्षित असले तरी मनात कुठेतरी दुखवून गेलेच!"

भावस्पर्शी...!!!! कौतुक हो....!!

दीप्स's picture

30 Apr 2011 - 4:59 pm | दीप्स

छान लिहिलेस.
तुझ्या भावना समजु शकते.

नितिन थत्ते's picture

30 Apr 2011 - 5:02 pm | नितिन थत्ते

मस्त आठवण.

एका टप्प्यावर (इलेक्ट्रॉनिक) टाईपरायटर कारखान्यामध्ये काम केले. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक टाइपरायटर आला असला तरी तो इतका महाग असे की मॅन्युअल टाईपरायटरला पर्याय नव्हता.

त्याच सुमारास कंप्यूटर आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर देखील आले होते. परंतु त्या ठिपक्यांनी बनलेल्या (वर्डस्टारमध्ये कंपोझ करून -आणि चुका तपासून पुन्हापुन्हा दुरुस्त करून छापलेल्या) अक्षरांपेक्षा टाईपरायटरमध्ये सुबक अक्षर येई. म्हणून 'टाईपरायटरला मरण नाही' असा आम्हा लोकांचा समज होता.

शिवाय अजून एक सॉफ्ट इश्यू टाईपरायटरच्या पथ्यावर होता. तो म्हणजे कंप्यूटरवर टायपिंग करणारा माणूस कंप्यूटर ऑपरेटर (आज आयटी वाला समजला जातो तसाच ;) ) वरच्या दर्जाचा समजला जाई आणि त्याला जास्त पगार द्यावा लागे. शिवाय कंप्यूटरवर फारशी काही अ‍ॅप्लिकेशन्सही नसत. म्हणून कम्प्यूटर घ्यायच्या ऐवजी टाईपरायटरच वापरण्याकडे ऑफिसच्या मालकांचा कल असे.

टाईपरायटरला अखेरचा कडक(ट्ट) सलाम.

पंगा's picture

1 May 2011 - 12:36 am | पंगा

त्याच सुमारास कंप्यूटर आणि डॉट मॅट्रिक्स प्रिंटर देखील आले होते. परंतु त्या ठिपक्यांनी बनलेल्या (वर्डस्टारमध्ये कंपोझ करून -आणि चुका तपासून पुन्हापुन्हा दुरुस्त करून छापलेल्या) अक्षरांपेक्षा टाईपरायटरमध्ये सुबक अक्षर येई.

त्याच सुमारास 'लेटर क्वालिटी प्रिंटर' नावाचा एक वेगळा प्रकारही मिळत असे, असे आठवते. या लेटर क्वालिटी प्रिंटर्सची अक्षरे डॉट मॅट्रिक्स प्रिंटरपेक्षा खूपच सुबक - आणि किमानपक्षी टाइपरायटरच्या अक्षरांइतक्या दर्जाची असत. (नक्की आठवत नाही, पण बहुधा यांतसुद्धा टाइपरायटरप्रमाणेच टंक येऊन कागदावर आदळत असे, असे वाटते.) मात्र, यांची किंमत त्या मानाने खूपच अधिक असे, त्यामुळे फार थोड्या हापिसांत हे बघायला मिळत, आणि असलेच, तर त्यांचा वापर अतिशय तोलूनमापून, केवळ अतिमहत्त्वाच्या पत्रांपुरताच वगैरे केला जात असे, असेही आठवते.

आठवणी छान आहेत.
लेखन आवडले.

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2011 - 7:23 pm | भडकमकर मास्तर

या बातमील वैयक्तिक संदर्भ असल्याने आठवण वाचताना अधिक मजा आली...

माझीही शॅम्पेन's picture

30 Apr 2011 - 7:33 pm | माझीही शॅम्पेन

छान लिहिलायस लेख , मागे रामदास यानी लिहिलेला शिलाई-मशीनचा उल्लेख असलेला लेख आठवला.
ज्या यंत्रांमुळे आपला चरितार्थ चालतो , ती यंत्र न राहता आपले अवयव होतात मग जिवापाड प्रेम करणे ओघाने आलेच

मृत्युन्जय's picture

30 Apr 2011 - 8:04 pm | मृत्युन्जय

मस्त रे ऋ. परवा ती बातमी वाचली तेव्हाच वाटले होते कोणीतरी लिहील म्हणुन.

इंटरनेटस्नेही's picture

30 Apr 2011 - 9:52 pm | इंटरनेटस्नेही

चान चान.

पिंगू's picture

30 Apr 2011 - 9:54 pm | पिंगू

छान लिहलय रे.. वाचून लहान असताना मामाच्या ऑफिसमध्ये केलेलं टायपिंग आठवले.

- (कॉम्पुटर टायपिस्ट) पिंगू

स्वाती२'s picture

1 May 2011 - 1:37 am | स्वाती२

आवडले.

५० फक्त's picture

1 May 2011 - 7:07 am | ५० फक्त

मस्त लिहिलं आहेस रे, मला बाबांनी दहावि झाल्यावर टायपिंग शिकायला पाठवलं होतं त्याची आठवण झाली. मला पहिली मैत्रिण तिथंच मिळाली, आज फोन करेन तिला.

सुनील's picture

2 May 2011 - 12:56 am | सुनील

छानच लिहिलय!

काँप्युटरने केवळ टाइपरायटरची जागा घेतली असे नाही तर स्टेनो-टायपिस्ट हे पदच खालसा केले आहे. आताशा साहेब लोकच मजकूर लिहितात आणि इ-मेलनी पाठवतात किंवा प्रिंट-आउट काढतात (सर्कारी हपिसात चित्र वेगळे असू शकेल!)

वर माझीही शँपेन यांनी म्हटल्याप्रमाणे रामदासांच्या शिलाई-मशीनची आठवण आली.

रामदास's picture

2 May 2011 - 12:04 am | रामदास

माझ्या ऑफीसातले एक सहकारी निवृत्त झाले तेव्हा त्यांना काय भेट द्यावी असं विचारल्यावर ते म्हणाले 'माझं मशीन मी घरी घेऊन जातो.' अर्थात सरकारी कारभारात हे शक्य नसते. मग मी माझे खाजगी ऑफीस बंद केले तेव्हाचा एक टाईपरायटर माझ्याकडे होता तो भेट दिला. रेमींग्टनचे ते मशीन घेऊन जाताना त्यांच्या चेहेर्‍यावर जो आनंद झळकत होता ...त्या मशीनची उरलीसुरली किंमत वसूल झाली.
एकेका पिढीची ही एक खूण असते. आधी शिलाई मशीन नंतर टाइपरायटर .आता ह्या पिढीत एमबीएची डिग्री.
गेले ते दिवस. हाल्डावर बसणारे रेमींग्टनवर बसायचे नाहीत. रेमींग्टन वाले गोदरेजवर नाही ...(कोरसच्या रीबनीची एक डबी अजूनही जपून ठेवली आहे. )

अभिज्ञ's picture

2 May 2011 - 3:32 am | अभिज्ञ

परवा डि.एन.ए. वाचत होतो त्यात ही बातमी बाचली आणि मन २०-२२ वर्षे मागे पळालं. त्या काळाशी जुळलेली एक नाळ तुटल्यासारखं वाटलं.. मी स्वतः आयुष्यात या ज्या काही ठिकाणावर आहे त्यामागे अनेक व्यक्तींप्रमाणेच अनेक वस्तुंचाही हातभार आहे. एके काळी आपल्या सार्‍या काड्यंनिशी आमच्या कुटुंबाच्या मागे उभ्या राहिलेल्या टाईपरायटरचे काळाच्या पडद्याआड जाणे अपेक्षित असले तरी मनात कुठेतरी दुखवून गेलेच!

लेखकाने माझेच मनोगत लिहिल्यासारखे वाटले.
शेवटचा पॅरा विशेषतः जास्तच हळवा करुन गेला.

अभिज्ञ.

निनाद's picture

2 May 2011 - 4:47 am | निनाद

फार सुंदर लिहिले आहे, आवडले. वेगवान आणि अचूक टंकन हे पाहणेही छान असू शकते. या मोठ्या टंकनयंत्रांशिवाय काही घडीची यंत्रेही असत. छोटेसे उंचीने कमी असणारे कोठेही नेता येणारे यंत्र मला फार मोहक वाटत असे.

राजेश घासकडवी's picture

2 May 2011 - 6:48 am | राजेश घासकडवी

तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या ओघात वस्तू मागे पडल्या तरी त्याबाबतीतल्या आठवणी कुठच्यातरी गुलाबी द्रव्याने पुसून टाकता येत नाहीत. पुलंच्या प्रवासवर्णनात त्यांनी 'प्रवासातला मी' चं वर्णन केलेलं आहे. तंत्रज्ञानाने बदलणाऱ्या जगातल्या, काळातील प्रवासात देखील 'प्रवासातला मी' चं वर्णन आलं की ते हृद्य होतं. या लेखात ते साधलेलं आहे.

हा लेख आपण पुन्हा लिहून सविस्तर व मोठा करून लिहावा ही विनंती. हिमनगाच्या टोकाचंच वर्णन आल्यासारखं वाटलं. हा दोष म्हणून सांगत नाही, आख्खा हिमनग बघण्याची इच्छा झाली म्हणून लिहिलं आहे.

रामदास's picture

2 May 2011 - 7:50 pm | रामदास

सहमत

खरंतर मी इतक्या मागच्या(?) पिढीचा वगैरे नाही पण टाईपराईटरच्या आठवणी मात्र आहेत. मोठ्या शहरांच्या मानाने अविकसीत शहरातल्या लोकांची मानसीकता १०-२० वर्षे मागे असते असे म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जेव्हा कंप्युटर्स बर्‍यापैकी मध्यमवर्गाजवळ आले तेव्हाही टाईपिंग शिका असे सल्ले मिळाल्याने आम्ही ते शिकलो, मराठी आणि इंग्रजी दोन्ही एकत्रच. टाईपिंग शिकताना बहुदा देशी कंपनीचे फार आवाज करणारे राईटर्स आम्हाला दिले होते. पण तिथे निवडक आणि नविन असणार्‍या रेमिंग्टनकडे आमचे नेहमीच लक्ष असायचे, नजरा चुकवुन अधुन मधुन ते बडवण्याची संधी सोडायचो नाही. आम्हाला दिलेल्या टाईपराईटर्स मुळे रात्री हात फार दुखायचे म्हणून असेल, भविष्यात रेमिंग्टन नक्की घ्यायचे असे तेव्हा एक स्वप्न होते. (यु हॅव गॉट मेल मध्ये मेगचा बॉयफ्रेंड जेव्हा अजुन एक टाईपराईटर घेतो तो प्रसंग बहुदा त्यामुळेच आवडून गेला होता, मित्र मैत्रिणी आमच्यावर हसत असतील हे ऐकुन. असो). पुढे इंजिनीअरींग ला गेल्यावर आमच्या रुमच्या समोर एक टाईपराईटींग इन्स्टिट्युट होती, तिथे ३०-४० लोकांना सतत खड खड करताना पाहुन मन विषण्ण व्हायचं, वाटायचं हे लोक जगाच्या कीती मागे आहेत. एकीकडे कंप्युटरने जग व्यापलं होतं आणि हे टाईपिंग शिकत होते. कंप्युटरवरती तेव्हा टाईपिंग शिकायचं सॉफ्टवेअर फुकट मिळायचं... (हे बहुदा सर्वात पहिले वापरलेलं जावा अ‍ॅपलेट).

आठवणींनी आठवणी आठवल्या..

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार.
नॉस्टॅल्जिया स्मोकिंगसारखा आहे. स्वतःला सतत आठवण होतेच जातोच इतरांनाही पॅसिव्ह स्मोकिंग करायला भाग पाडतो :)

असो.. मागे उपक्रमावर आजी आजोबांच्या वस्तू लिहिल्या होत्या त्यातील टाईपरायटर आताच्या मुलांना बघायसाठी तरी आजी-आजोबांनी (आता नवा विकत मिळणे बंद होणार असल्याने अधिकच) जपून ठेवायला हवा असे वाटते.

स्वाती दिनेश's picture

2 May 2011 - 11:29 am | स्वाती दिनेश

ऋ,लेख आवडला..
स्वाती

किसन शिंदे's picture

2 May 2011 - 11:50 am | किसन शिंदे

मस्त लेख ऋषी..आवडला आणि २० वर्ष मागे घेऊन गेला.

सहज's picture

2 May 2011 - 12:16 pm | सहज

लेख व प्रतिसाद वाचनीय

अमोल केळकर's picture

2 May 2011 - 3:24 pm | अमोल केळकर

छान लेखन

अमोल केळकर

प्राजक्ता पवार's picture

2 May 2011 - 3:51 pm | प्राजक्ता पवार

छान लिहले आहेस , आवडले .

लिखान आवडले ....

असेच लिहित रहा.. वाचत आहे

आज वाचल अगदी निवांत बसुन.
फार छान वाटल वाचताना. खरच आपल्या जिवनाशी निगडीत गोष्टी हळु हळु आपला एक भाग होउन जातात नाही?
अन काय हो? दहिसर अस होत? जस तुम्ही लिहिलय तस? अजबच!
आम्च्या कड पण साहेबांच्या काळचा टाइप रायटर आहे, अन अजुनही तस्साच चालतो. माझे सासरे अजिबात तयार नसतात घरातली आम्च्या मते असलेली 'अडगळ' काढायला. अर्थात इमोशनल इव्हॉल्वमेंट आम्ही समजु शकतो नाही अस नाही.

ऋषिकेश's picture

4 May 2011 - 10:54 pm | ऋषिकेश

दहिसर अस होत? ...अजबच!

एकेकाळी दहिसर नदीचं पाणीही स्वच्छ होतं म्हणे (मी नाहि पाहिलंय). माझी आजी तिथे कपडे धुवायला गेली असता कानातली कुडी पडली तेव्हा ती पाण्यात स्वच्छ दिसत होती. काकांनी ती कुडी पाण्यात उडी मारून काढल्याची आठवण नेहमी सांगितली जाते. आता त्या प्रवाहाला नाला म्हणणेही जिवावर यावे :(

आम्ही स्वतः टेकडीवरच्या भावदेवीला जात असु. तेथून मागे हिरवीगार शेते नि त्यामागे सगळी मिठागरे होती. हे तर मी ही पाहिलंय.. त्या शेताडीतून मिठागरांवर जायच्या वाटेवर गुंजांची भरगोस झाडे होती.

असो. जुन्या दहिसरवर काय माझ्या आठवणीतल्या जुन्या (म्हंजे अवघ्या २०-२५ वर्षांपूर्वीच्या) मुंबईवर लिहायचे तर वेगळा लेख लिहावा लागेल.. आठवणींतून आठवले म्हणून लिहितोय :)

प्रतिक्रीयेबद्दल आभार

चिगो's picture

3 May 2011 - 4:52 pm | चिगो

छान लेख.. आवडला. एकदा भावना जुळल्या, जडल्या की मग यंत्र नुसती निर्जीव वस्तु न राहता त्या आपल्या भाव-जीवनाचा भाग बनतात.. मग चावीचं घड्याळ, चाबीचा / इलेक्ट्रॉनिक ग्रामोफोन ह्या गोष्टी डिजीटल क्लॉक आणि आयपॉडच्या जमान्यातही हळव्या करुन जातात..
आता हातात डिजीटल कॅमेरा असला तरी दहा-बारा वर्षांआधीपर्यंत नागपुरच्या महाराजबाग रोडवर फुटपाथी दुकान लावून बसलेले पासपोर्ट फोटोवाले आठवतात. ह्यांच्याकडे जे कॅमेरे होते, त्यांना काळी कापडं लावलेली असायची, आणि फोटो घेतांना फोटोग्राफर कॅमेर्‍यात मुंडी टाकून फोटो काढायचा !

खुपच छान लिहिलं तुम्हि.