आज,
आपल्या पहिल्यावहिल्या रात्री,
हे गोरेपान पुस्तक, तुझ्या शरीराचे
हळुवार उघडतांना....
सुरूवातीलाच लक्ष वेधून घेतले बघ,
तुझ्या मनाच्या; ईवल्याशा, निरभ्र, निष्पाप, पवित्र
अर्पणपत्रिकेने!
खरे तर; अर्पणपत्रिका टाळूनही...जाता आले असते पुढे
भराभरा, अधीरपणे; पुस्तक संपविण्यासाठी
सगळेजण तसेच तर करतात!
पण... ईतक्या निरागसपणे समर्पित करीत होते,
ते कोवळे कोवळे पान,
स्वतःला; पुस्तकासह की रहावलेच नाही बघ,
आणि वाचू लागलो मी, हळुवारपणे;
मेंदीच्या कोवळ्या पानाने लिहिलेली,
त्यावरची सुकुमार अक्षरे; अलगद पुसत अश्रू; त्यावर अपार कृतज्ञतेने सांडलेले!
आणि हे काय?
रेखाटले होते अर्पणपत्रिकेवर...सगळीकडे, फक्त...
माझे नाव; माझे!
पण होते प्रत्येक नावाभोवती ; नवनवीन नाते, गुंफलेले
प्रेमाचे, मैत्रीचे,त्यागाचे, विश्वासाचे, घट्ट,जन्मोजन्मीचे,
जणू प्रत्येक नाते, हसत.. गोड बाळासारखे; निर्व्याज,
खुप जुनी ओळख असल्यासारखे
माझा हात घट्ट धरीत; ईवल्याशा बोटांनी!
पुन्हापुन्हा वाचीत राहिलो मी अर्पणपत्रिका; रात्रभर,
तुला हळुवार थोपटीत, अर्पणपत्रिका समजून घेत,
पुस्तक नंतरही वाचता येईल; वाचायचेच आहे
पण अर्पणपत्रिका तर नीट उमजली पाहिजे!
त्यानंतरही...किती दिवस उलटले तरी,
बरेचदा, पुस्तकाची उजळणी झाल्यावर देखील....
थबकतो मी अजूनही,
त्याच निष्पाप, निरागस अर्पणपत्रिकेवर,
आणि जातो मोहरून.. अजूनही, होतांना स्पर्श, माझ्या थरथरत्या बोटांना,
कोरलेल्या माझ्याच नावाच्या...अक्षरांचा,
अजूनही ताजा, अजूनही नवा!!
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 4:01 am | धनंजय
एकदम भारी.
(मात्र कोणाचे खरेखरचे प्रेमपत्र चोरून वाचल्यासारखे वाटल्यामुळे काळजात चर्र झाले.)
10 Aug 2010 - 4:07 am | पंगा
याला काय माहीत?
10 Aug 2010 - 4:16 am | मीनल
'त्या' कोमल क्षणांकडे पहायचा वेगळा दृष्टीकोन इथे मांडला आहे.
चित्रपटातील कॅमेरा, दिव्यांनी, मासिकांनी , इतर माध्यमांनी `त्या `तले गुपितच बटबटीत करून टाकले आहे. ते गुलाबाच्या नाजूक दाट पाकळ्यामधे लपवून ठेवायच्या ऐवजी सूर्यफूलासारखे सताड उघडे पाडले आहे.
इथे तोच विषय हळूवारपणे गोंजारला आहे. श्रुंगाराचे सोज्वळ असे दर्शन आहे.
लेखन आवडले.
10 Aug 2010 - 4:47 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
10 Aug 2010 - 11:47 pm | सागरलहरी
पुस्तक नंतरही वाचता येईल; वाचायचेच आहे
पण अर्पणपत्रिका तर नीट उमजली पाहिजे!
व्वा !
11 Aug 2010 - 6:54 am | कालिन्दि मुधोळ्कर
ईSSSSSSव!
11 Aug 2010 - 7:03 am | मदनबाण
शॉलिट्ट्ट्ट्... :)
11 Aug 2010 - 11:23 am | उमेश कोठीकर
धन्यवाद मित्रांनो!