पहिलं प्रेमपत्र

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
24 Mar 2010 - 9:36 pm

आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं.....

मनात खूप धाकधूक वाटत होती....

छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची!

काय करणार? आधी कधी असलं लिखाण केलं नव्हतं ना....
शाळेत कधी कोणी 'प्रेमपत्र असे असे लिहावे' म्हणून मार्गदर्शन पण केले नव्हते!
मायना काय लिहावा??
सप्रेम नमस्कार म्हणावे, 'हाय' 'हॅल्लो' करावे की अजून काही लिहावे?
कसलं झंजट आहे यार हे प्रेमपत्र लिहिणं.....

तसं एकदा दहावीत मराठीच्या स्कॉलर बॅचच्या शिकवणीच्या सरांनी 'आपल्या प्रिय व्यक्तीस पत्र' लिहा असं सांगितल्यावर वर्गातल्या दोन-चार आचरट पोरांनी प्रेमपत्रे लिहून आणून, त्यांचे जाहीर वाचन करून सरांची गोची केल्याचे स्मरत होते. पण त्या प्रेमपत्रांमधील शब्द मात्र काही केल्या आठवत नव्हते!

बाजारात 'नमुन्यादाखल १०० प्रेमपत्र' वगैरे पुस्तकं पण मिळत नाहीत... कॉपी टू कॉपी, माशी टू माशी करायला....

मैत्रिणींना विचारावं का? छ्या!! त्या एकतर येड्यात काढतील की असल्या विषयात कसले सल्ले मागतिए किंवा फिसीफिसी हसत एकमेकींच्या कानाला लागतील.... झालंच मग! दुसर्‍या दिवसापासून आपण अख्ख्या कॉलेजमध्ये थट्टेचा विषय!!

घरात कपाटात जपून ठेवलेलं सुगंधी अत्तराचा शिडकावा केलेलें एक देखणं नोटपॅड होतं.... ते आधी हुडकून काढलं! म्हटलं, त्याच्या पानांवरच्या मौक्तिक माळा, गुलाब पाकळ्या आणि मोरपिसांच्या धूसर चित्रांनी जरा स्फूर्ती येईल. पण छे! आमची स्फूर्तीमाय कोठेतरी अडून बसली होती.

बाजारात टॉम क्रूझचं पोस्टर मिळतं, ते घेऊन आले. तसा तो मला फार काही आवडत नाही, पण डोळ्याला बरी आहे हिरवळ! त्याच्या डोळ्यात डोळे घालून झाले.... म्हटलं, आता तरी शब्दांचा पाऊस पडेल, माझ्या भावछटा बहुरंगांमध्ये उमलतील, विचारांचे मोर थुई थुई नाचतील....

पण नाही हो! तस्सं काहीही म्हणजे काहीही झालं नाही!

उलट त्या मेल्या पोस्टरकडे एकटक पाहिल्यामुळे माझी दृष्टी तिरळी होते की काय अशी शंका घरच्यांच्या मनात दाटून आली.

मग मी अशीच कण्हत, कुंथत, सुस्कारे सोडत कादंबरीमधल्या नायिकेसारखी 'सौधावर मावळत्या सूर्याच्या किरणांकडे अनिमिष नेत्रांनी' वगैरे पाहायला लागले.
शेजार्‍यांनी आस्थेनं विचारलं, ''बरं वाटत नाहीए का? डॉक्टरांना दाखवलंस का?'' घ्या!!!!

वैतागून मी बाजारातून काही कवितांची पुस्तके आणली. कविता ह्या बर्‍याचदा प्रेमानुभूती वगैरे वगैरे विषयी असतात ह्या विषयी खूप ऐकून होते. पण अहो, मी आणलेल्या कवितासंग्रहांमध्ये ''दाहक समाजमन'', ''खुळ्या बेटाचं आत्मवृत्त'', ''मी पणती झाले तर'' असे एकाहून एक अनाकलनीय विषय होते. त्यातील काही ओळी उचलून जर मी माझ्या प्रेमपत्रात घातल्या तर झालंच कोटकल्याण!

चित्रपटगृहांत काही 'प्रॉमिसिंग' गोडमिट्ट, ओशट रोमँटिक चित्रपट झळकले होते. माझा मोर्चा मी त्यांच्याकडे वळवला. त्यातल्या झाडांभोवतीच्या फेर्‍या मोजता मोजता मलाच भोवळ यायला लागली. हिरवळींवरची लोळणफुगडी गीते, बर्फाळ वातावरणातील कवायती पाहिल्यावर 'हे काय खरं नाय बोवा!' असे विचार मनात घोंगावू लागले. घरी व्हिडियोवर जुन्या जुन्या प्रणयचित्रपटांना पाहण्याचा व्यर्थ प्रयत्नही करून झाला. पण प्रत्येक चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत मी एकतर जांभयांनी हैराण झालेले असायचे किंवा अस्वस्थपणे चित्रपट 'फॉरवर्ड' करण्याचा मोह टाळत असायचे! शेवटी तोही नाद सोडून दिला.

आता माझ्यासमोर एकच पर्याय शिल्लक दिसत होता. रोज सायंकाळी डोळ्यांना जाडसर गॉगल लावून, डोक्याला स्कार्फ गुंडाळून मी बागा, उद्याने, नदीकिनार्‍याला भेट देऊन तिथे झाडाझुडुपांआड लपत-छपत प्रेमी युगुलांची टेहळणी करू लागले. फार काही पदरात पडले नाही, पण मुंग्यांनी कडाडून डसणे म्हणजे काय असते, भलत्या ठिकाणी भलत्या कोनात अंग वळवल्याने त्याचा सर्व शरीरावर कसा 'बधिर' इफेक्ट होतो, काटेरी झुडुपांच्या आड लपण्यातले १०१ धोके इत्यादी गोष्टींचे ज्ञान मला फार जवळून झाले. आणि एक दिवस मग पोलिस मामानेही हटकले... ''हितं काय करताय वो ताई तुमी... भल्ल्या घरच्या दिसता म्हनून इच्चारलं.... ह्या वक्ताला हितं फकस्त ती गुटर्गू करनारी कबुतरं दिसत्याती.... तुमी आपलं घरला जावा....'' आता मात्र हा शुद्ध अन्याय होता! पोलिसाला देखील माझ्यावर भरवसा नसावा!!!

रागाने तणतणतच मी घरी परत आले. त्याच संतापाच्या भरात खस्सकन ते गोजिरे नोटपॅड पुढे ओढले आणि मुंडी खाली घालून पल्लेदार वाक्यांची बरसात सुरू केली.

दुसर्‍या दिवशी ते प्रेमपत्राचे पाकीट पोस्टपेटीत घालताना पुन्हा छातीत धडधड, घशाला कोरड, तळहाताला घाम अशा सर्व लक्षणांना अनुभवले. पण आता मी मागे हटणार नव्हते! मोठ्या धीराने पाकिटाला पोस्टपेटीच्या 'आ' वासलेल्या तोंडात ढकलून मी श्रद्धाळूपणे त्या पेटीला नमस्कार केला आणि मेघदूतातील नायकाच्या आर्ततेने माझे पत्र झणी पोचव म्हणून तिला साकडे घातले.

पुढचे पाच दिवस जाम टेन्शनमध्ये घालवले. फोन वाजला की तो घ्यायला जीव धजवत नसे. न जाणो, नकाराचा असला तर? पोस्टमन आला की मी लपून बसत असे.... माझे पत्र 'साभार परत' आले असले तर????

अखेर आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तो फोन आला. पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''

माझ्या कष्टांना, अथक श्रमांना, संशोधनाला फळ आले होते! :-)
त्या प्रत्यक्ष पिळवटून टाकणार्‍या, गहिर, बेदर्दी अनुभवास सामोरे न जाता कडेकडेने, सावधपणे प्रेमाच्या अनुभवाचे फक्त निरीक्षण करून त्याविषयी शब्दमनोरे रचणार्‍या माझ्या सर्जनशीलतेची ती जीत होती की प्रेमकणांच्या घायाळ अनुभूतीला पारख्या झालेल्या माझ्या हृदयाची हार?

--- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

वावरमुक्तकराहणीप्रकटनलेखआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

24 Mar 2010 - 9:41 pm | शुचि

हेहे लैच भारी
ह ह पु वा. =)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

चक्रमकैलास's picture

25 Mar 2010 - 11:39 am | चक्रमकैलास

आपल्याला आवडलं...जाम आवडलं..!!!

नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

काही गरजूंना त्याचा उपयोग होईल. ;)

शुचि's picture

24 Mar 2010 - 10:14 pm | शुचि

जे गरजू इतरांनी डकवलेल्या प्रेमपत्रांवर बाजी मारतात ते पुढे काय्य दिवे लावणार देव जाणे? ;;)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

प्रमोद देव's picture

24 Mar 2010 - 10:27 pm | प्रमोद देव

असा म्हणान सोडून देऊचो आपन...काय?
कोन बोल्लो...देवच बोल्लो. :D

पक्या's picture

24 Mar 2010 - 10:29 pm | पक्या

अहो पण एखाद्याला लिखाण जमले नाही तर त्याने काय प्रेमच करू नये असे आहे काय?
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

24 Mar 2010 - 10:46 pm | शुचि

: )
अहो पण मदनबाण यांची पूर्वीची एक स्वाक्षरी बघा ना प्लेटो का कुणा विचारवंताची - " At the touch of love everyone becomes a poet"
मग कसं नाही जमत प्रेमात पडलेल्यांना प्रेमपत्र ते?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

टुकुल's picture

24 Mar 2010 - 10:46 pm | टुकुल

:-D :-D :-D
शेवट अनपेक्षीत होता, मस्त कलाटणी दिली आहे कथेला आणी आम्हाला पण (कदाचीत)

--टुकुल

चतुरंग's picture

24 Mar 2010 - 10:48 pm | चतुरंग

उलट त्या मेल्या पोस्टरकडे एकटक पाहिल्यामुळे माझी दृष्टी तिरळी होते की काय अशी शंका घरच्यांच्या मनात दाटून आली.
हे हे हे!! खासच!!! :D

(अनेकवेळा तिरळा होताहोता राहिलेला)चतुरंग

राजेश घासकडवी's picture

25 Mar 2010 - 2:19 am | राजेश घासकडवी

चतुरंगजी,

टॉम क्रूज तुम्हाला इतका आवडतो हे माहीत नव्हतं! वैनींना सांगितलंय का?

(चतुराक्ष) राजेश

शुचि's picture

25 Mar 2010 - 5:32 am | शुचि

=))
शप्पत!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

चतुरंग's picture

25 Mar 2010 - 5:15 pm | चतुरंग

टॉम क्रूजच्या पोस्टरबद्दल म्हणत नाहीये मी!!
असो.
गैरसमज ठेवू आणि पसरवू नका!! ;)

चतुरंग

वाहीदा's picture

25 Mar 2010 - 7:13 pm | वाहीदा

टॉम क्रूज कडे पाहताना तुम्ही तिरळे होत होता राहीलात ??
by the way , आता कशी आहे तुमची द्रुष्टी ?
ऐसाभी होता है ;-)
~ वाहीदा

अनिल हटेला's picture

24 Mar 2010 - 10:59 pm | अनिल हटेला

शॉल्लीट एकदम...

शेवट एकदम खासच....:)

बैलोबा चायनीजकर !!!
रूपमहाल्,प्रेमगल्ली,
खोली नं -४२०....
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

रेवती's picture

24 Mar 2010 - 11:10 pm | रेवती

शेवट अनपेक्षित!
खी खी करून हसले.
देव काका म्हणतात त्यात तथ्य आहे. गरजूंना अश्या प्रेमपत्राचा फायदा मिळाला तर कुठं बिघडतय?:)

रेवती

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2010 - 11:20 pm | बिपिन कार्यकर्ते

ए१

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

24 Mar 2010 - 11:22 pm | विसोबा खेचर

पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''

धत तेरीकी! स्पर्धा होती होय? मला वाटलं खरंखुरं प्रेमपत्र लिहिलंत की काय! :)

तात्या.

प्राजु's picture

25 Mar 2010 - 1:15 am | प्राजु

शेवट एकदम अनपेक्षित.
खूप आवडला लेख. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

पिंगू's picture

25 Mar 2010 - 1:22 am | पिंगू

पुढचे पाच दिवस जाम टेन्शनमध्ये घालवले. फोन वाजला की तो घ्यायला जीव धजवत नसे. न जाणो, नकाराचा असला तर? पोस्टमन आला की मी लपून बसत असे.... माझे पत्र 'साभार परत' आले असले तर????

अखेर आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तो फोन आला. पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''

:)) :)) :)) :)) :))

अप्पा जोगळेकर's picture

25 Mar 2010 - 9:13 am | अप्पा जोगळेकर

सहीच.

पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''

:H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H

अभिषेक९'s picture

25 Mar 2010 - 9:24 am | अभिषेक९

मस्त आहे.. पण जरा ते प्रेमपत्र करा की इकडे प्रसिद्ध... तुम्हाला बेस्ट ३ मध्ये निवडल्या गेले.. आम्ही आमचे नशीब अजमावून बघतो...

हर्षद आनंदी's picture

25 Mar 2010 - 9:43 am | हर्षद आनंदी

शेवट अनपेक्षित, पन मजा आली

वेड्या सारखे हसताना पाहुन.. हा चिकटला मिपावर हे सगळ्या टीमला समजले ;)
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

दिपक's picture

25 Mar 2010 - 10:01 am | दिपक

शॉल्लेट आहे पहिल्या प्रेमपत्राची कथा..

अरुंधती's picture

25 Mar 2010 - 10:23 am | अरुंधती

धन्यवाद मंडळी!
ते प्रेमपत्र आठवेल तसं लिहून नक्की आकांक्षी लोकांसाठी पोस्ट करेन! झालं काय, तेव्हा एवढी अक्कल नव्हती, की स्पर्धेला जेव्हा आपण काही लिखाण पाठवतो तेव्हा त्याची एक प्रत कायम आपल्याकडे ठेवायची असते! त्यामुळे माझे ते अद्वितीय प्रेमपत्र नंतर मला दिसलेच नाही! पण तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून मजा आली! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

समंजस's picture

25 Mar 2010 - 10:51 am | समंजस

मस्त!!!
पहिल्या प्रेमपत्राची कहाणी आवडली :)

स्वाती दिनेश's picture

25 Mar 2010 - 4:23 pm | स्वाती दिनेश

मस्तच..
शेवटी एकदम यू टर्न!!
धमाल आली..
स्वाती

डावखुरा's picture

25 Mar 2010 - 5:00 pm | डावखुरा

तुमच्या स्मरण शक्तिला शुभेच्छा देउन तुमच्या प्रेमपत्राची वाट पहात आहे...
[गैर समज करुन घेउ नये... मी मिपावर प्रसिद्ध होण्याची वाट पहातोय...]"राजे!"

श्रावण मोडक's picture

25 Mar 2010 - 7:48 pm | श्रावण मोडक

धत्त तेरीकी...
लेखन बाकी छान.

कवितानागेश's picture

25 Mar 2010 - 11:30 pm | कवितानागेश

छान आहे किस्सा!
.........पण त्या स्पर्धेला एकूण एन्ट्री किती आल्या होत्या??
(शन्केखोर) माउ

अरुंधती's picture

26 Mar 2010 - 9:12 am | अरुंधती

हा हा हा!

मलापण नक्की आठवत नाही! पण डझनभर गृहित धरून चालायला हरकत नाही!!
;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अस्मी's picture

27 Mar 2010 - 11:50 am | अस्मी

=)) =)) =))

सही किस्सा... :)

खरं प्रेमपत्र लिहायच्या वेळी help झाली असेल नयी... ;)

~ अस्मिता

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2010 - 12:06 pm | प्रकाश घाटपांडे

तरीच कर्व्यांच्या टायमाला स्रि शिक्शनाला ईरोध पुनेरी ल्वॉक करायची. का त म्हने बाया शिकल्याव आपल्या नवर्‍याला म्हने चावट चावट पत्र लिहितिन.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.