चावट रश्श्यांची दुनिया !

सस्नेह's picture
सस्नेह in पाककृती
11 May 2018 - 3:06 pm

काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली.  लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू  लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली.
रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठी माणसाला रस्सा भुरकण्याचा प्राचीन काळापासून नाद !
रस्सा म्हटलं की पयलेछूट आठवतो  तांबडा-पांढरा ! तांबडा रस्सा म्हणजे रश्श्यांचा राजा आणि पांढरा त्याचे धाकटे भावंड ! तांबडा तुम्हाला कुटंबी भेटंल खरं पण तांबडा पांढऱ्याची जोडी पाहिजे असंल तर कोल्लापूरला यावं लागंल. तांबड्याची तर्री आणि पांढऱ्याचा साजूक तोरा मिरवावा तर कोल्हापुरी थाळीनंच.

ताटाच्या वरल्या अंगाला दोन मोठाल्या वाट्या एकीत लालभडक कटवाला तांबडा आणि त्याला खेटून दुसरीत नाजूक मिजाजवाला मिरे-वेलची-तमालपत्रीचा स्वाद मिरवणारा पांढरा. मधे सुक्क्या मटनाची प्लेट, डावीकडं वाफा निघतेली जोंधळ्याची भाकरी, तिला लागून दहीकांदा आणि लिंबाची फोड  आणि  त्याच्याजवळ खेम्याची बारकी प्लेट ! यवडं झालं की लागली कोल्लापुरी थाळी ! बसा आनी हाणा !!
...आनी रस्सा मागून घ्याला लाजू नका बरं का पावनं ! तांबडा म्हणु नका, पांढरा म्हणू नका, लागंल तेवढा वरपा !
खरा रस्साप्रेमी कधी रश्श्यात तुकडे शोधत बसणार नाही आणि चमच्याने नाजूकपणे रश्श्याचे चहासारखे घुटकेही घेणार  नाही. रस्सा खायचा तो भुरकून आणि ओरपून, वाटी तोंडाला लावूनच.
महाराष्ट्राच्या प्रांतागणिक तांबड्याचा नूर बदलत जातो. खानदेशी, मालवणी, वऱ्हाडी, नागपुरी. त्यांची आणि वेगवेगळी तऱ्हा.  पण रंग तांबडाच.
तांबडा आणि पांढरा झाला की नंबर लागतो खेकड्याचा रस्सा !
ह्याला लैच निगुतीनं करायला लागतंय आणि खाणारापण दर्दी लागतोय. उगं माशाचा वास येतोय म्हणून नाकं मुरडणारा चालत न्हाय. खेकडे आणून त्यांच्या नांग्या काढून, आबदार ठेचून शिजवून दबदबीत रस्सा करायचा. बारक्या नांग्या असल्या तर मिक्सरात फिरवून रस गाळून घ्याचा आणि रश्श्यात घालायचा. सगळं घर दरवळायला लागतंय बघा !
तेचाच एक भाऊ कोळंबीचा रस्सा. हे जरा करायला सोपं आणि कमी त्रासात ! कोळंबी मार्केटातूनच साफ करून आणली की फार कटकट नाही. धुतली की टाकली फोडणी. कोळंबीला मसाला बिसाल्याची नाटकं नाहीत. आलंलसूण ठेचून घातलं आणि धणे-जिरे पूड टाकली की झालं काम. पण चव काय नामी ! स्लर्प !!

जातीचे मटनखाऊ आणखी एका रश्श्याचे पंखे असतात. मुंडी रस्सा ! याचा वास आणि उग्रपणा सहन करायला मर्दाचं काळीज आणि पोट बाळगावं लागतं.
आमची आजी अंड्याचा रस्सा करायची. म्हणजे अंडा करी नव्हे. मसालारहित, नुसतं तिखट मीठ घालून. अंडं फोडून फेसायचं आणि कांदा भाजून त्यात तिखट-मीठ, लसूण  आणि पाणी घालून पातळ पिठलं करतो तसं त्यात फेसलेलं अंडं घालून रस्सा करायचा. त्या लालभडक तर्रीदार रश्श्याच्या तोडीची अंडा करी आजवर भेटली नाही.
माझी एक दूरची बहिण अंडे फोडून डायरेक्ट उकळत्या रश्श्यात घालून शिजवून रस्सा करते. त्याचं नाव डुबुकरस्सा ! त्याची एक वेगळीच टेस्ट.
नॉनव्हेजमध्ये आहेत त्यापेक्षा जास्त व्हरायटी व्हेज रश्श्याची. बटाट्याचाच एक रस्सा घेतला तरी त्यात शंभर नमुने. बटाटा रस्सा हा एक ऑल टाईम फेवरीट रिझर्व्ह आयटम आहे. पाहुणे आले, फ्रिजमधली भाजी संपलीय, बाजारात जायला वेळ नाही, आले बटाटाभाऊ मदतीला. शिवाय याच्या जोडीला कुणीही खपून जाते.
कांदे-बटाटे रस्सा , टोमॅटो-बटाटा रस्सा, गोड बटाटा रस्सा, बटाट्याचा काळा रस्सा, फ्लॉवरवाटाणे-बटाटा रस्सा (याला काही जण कुर्मा म्हणतात.), वांगी-बटाटा रस्सा, ढब्बू मिरची आणि बटाटा रस्सा मासळीप्रेमी त्यात सोडे-बांगडे इ. मिसळून घालतात. बटाटा हा सर्वसमावेशक असल्याने या सर्वांच्या रंगात आपला रस-रंग मिसळून रश्श्याला वेगळीच गोडी आणतो.

मटकीचा रस्सा मिसळीसाठी जास्त फेमस आहे. तरीपण नुसता ओरपायला पण भारीच. थोडा मटणाचा मसाला लावला तर तांबड्याच्या तोंडात मारेल. मात्र याच्या पाकृला ओले खोबरे मस्ट. आणि वरती तरंगायला कोथिंबीर.

नॉनव्हेज रश्श्याच्या तोडीस तोड म्हणजे पावटा किंवा वालाच्या मोडाचा  रस्सा. आमच्या कोल्हापूरकडे त्याला वरणे म्हणतात. वाल किंवा वरणे रात्रभर भिजत घालावे , दुसरे दिवशी कपड्यात बांधून झाकून ठेवावे. बारा तासांनी मोड आले की कांदा, आले-लसूण तिखट-मीठ इतके मोजकेच घटक घालून असली चाबरट चव येते की ज्याचं नाव ते !


पावट्याचा रस्सा म्हटलं की आमच्या घरी इतर काही कालवण करावं लागत नाही. रस्सा एके रस्सा. चपाती-भाकरीबरोबर आणि भाताबरोबरपण !
आणखीही बरेच रश्श्याचे नमुने असतील महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात बनणारे. त्यांची वर्णने इथे देऊन  मिपाकरांनी  रस्सा-महोत्सव करावा ही आग्रहाची इणंती ! __/\__
(फोटो आंजावरून साभार )

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 May 2018 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटू पाहुनच तोंडातुन बदाबदा लाळ गळायला लागली. आता या रैवारी "जगदंबा" ला भेट देणे आले.
पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

11 May 2018 - 3:38 pm | श्वेता२४

व्वाह्हह! काय वर्णन केलंय! आणि फोटो पण जबरी.

कपिलमुनी's picture

11 May 2018 - 3:44 pm | कपिलमुनी

गणपा भाऊंचा पाया रस्सा एकदा करून बघा.
अप्रतिम चव लागते.

गणपाचा बघायला हवा, पण पाया रस्सा कोल्हापूर आणि इचलकरंजीत खुपदा टेस्ट केलाय. कॅल्शियम-रीच असतो.

आमची आजी अंड्याचा रस्सा करायची. म्हणजे अंडा करी नव्हे. मसालारहित, नुसतं तिखट मीठ घालून. अंडं फोडून फेसायचं आणि कांदा भाजून त्यात तिखट-मीठ, लसूण आणि पाणी घालून पातळ पिठलं करतो तसं त्यात फेसलेलं अंडं घालून रस्सा करायचा. त्या लालभडक तर्रीदार रश्श्याच्या तोडीची अंडा करी आजवर भेटली नाही.

हे करून बघणार. बाकी लेख नादखुळा झालाय. (आणि पोटात डायनोसॉर थयथया नाचाया लागल्येत हेवेसांनल!) आता हा तांबडा-पांढरा रस्सा शोधणं आलं!

कपिलमुनी's picture

11 May 2018 - 4:01 pm | कपिलमुनी

येत्या विकांताला करून बघणार आहे .

** काअंदा लसून चटणीचे तिखट वापरायचे की पूड ?

ऑफकोर्स, कानडा-लसूण तिखट ! :)
पार्सल करू काय ?

सस्नेह's picture

11 May 2018 - 4:05 pm | सस्नेह

सॉरी, कांदा-लसूण तिखट !

यशोधरा's picture

11 May 2018 - 4:13 pm | यशोधरा

मी म्हटले रश्शामध्ये काय चावटपणा दिसला!!
ते अंडा रश्शाच्या पाककृतीचे अगदी बैजवार वर्णन येऊंदेत बरं.
आणि शाकाहारी आणि मांसाहारी रशशांची एकाच लेखात वर्णने केल्याबद्दल उलीकसा निषेध!
मला कर पार्सल ते कांदा लसूण तिखटाचे मिक्स.

चवीने खाण्याचा प्रकार = चावट :D

उगा काहितरीच's picture

11 May 2018 - 4:44 pm | उगा काहितरीच

ते अंडा रश्शाच्या पाककृतीचे अगदी बैजवार वर्णन येऊंदेत बरं.

+११११११११

वीकांताला करून पाकृ टाकणेत येईल.
त्याआधी इतर कुणी केल्यास अवश्य टाका.

ते अंडा रश्शाच्या पाककृतीचे अगदी बैजवार वर्णन येऊंदेत बरं.

धागा टाकला आहे.

जेम्स वांड's picture

11 May 2018 - 4:22 pm | जेम्स वांड

जबरी जमेश ताई, रश्याला खरेच तोड नाही. खाशा थंडीत तर रश्याला थेट सरकारने 'जीवनावश्यक बाबीत' वर्ग करावे असे मनापासून वाटते :)

रच्याकने, मटन मसाला घालून नुसतं उकळलेल्या मसालेदार पाण्यात हुलग्यांचे, ज्वारीचे, बाजरीचे शेंगोळे घालून खायची मजा एकदा घेतल्याने आम्ही थोडाफार जीव शाकाहारी जेवणात अजून गुंतवलेला आहे!. मस्ट ट्राय प्रकरण.

तिमा's picture

11 May 2018 - 4:30 pm | तिमा

सर्व प्रकार आणि त्याचे फोटो बघून, अतिशय अ‍ॅसिडीटी होऊन निवर्तलो आहे.

गामा पैलवान's picture

11 May 2018 - 6:13 pm | गामा पैलवान

स्नेहांकिता,

कसला चवदार लेख आहे. चिंबोरीच्या रश्श्याची आठवण येऊन जीभ हळवी झाली. खेकड्याचे पाय वाटून घालतातच. पण कोवळ्या नांग्याही वाटून घालतात ही नवी माहिती मिळाली.

चिंबोरीच्या रश्श्याने सर्दी पळते. कशीकाय ते ठाऊक नाही. पण पळते खरी.

आ.न.,
-गा.पै.

अमेरिकन त्रिशंकू's picture

12 May 2018 - 5:02 pm | अमेरिकन त्रिशंकू

चिंबोरीच्या रश्श्याने सर्दी पळते. कशीकाय ते ठाऊक नाही. पण पळते खरी.

झिंक असतं शेल फिश आणि खेकड्यामध्ये.

गामा पैलवान's picture

12 May 2018 - 10:03 pm | गामा पैलवान

धन्यवाद अत्रि! :-)
आ.न.,
-गा.पै.

नाखु's picture

11 May 2018 - 6:55 pm | नाखु

या धाग्यावर आलो पण

आणि रस्ता (रस्सा) चुकलो नाही

पांथस्थ नाखु

शिव कन्या's picture

11 May 2018 - 7:26 pm | शिव कन्या

आवडले. करून बघणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2018 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

रस्सादार... आपलं... रसदार लेख ! कोणाचीही भूक खवळून जावी असा आहेच, पण आजारपणामुळे भूक हरवलेल्या रुग्णासाठीही रामबाण उपाय होईल ! :)

manguu@mail.com's picture

11 May 2018 - 9:33 pm | manguu@mail.com

छान

पद्मावति's picture

12 May 2018 - 9:35 pm | पद्मावति

क्या बात है. एकदम चविष्ट लेख.

शाली's picture

12 May 2018 - 5:47 am | शाली

रसदार लेख.

संजय पाटिल's picture

12 May 2018 - 10:35 am | संजय पाटिल

रसभरीत लेख! चणोला पण रस्सा बनवायला लय भारी...

सस्नेह's picture

12 May 2018 - 8:57 pm | सस्नेह

चणोला म्हणजे काय ?

संजय पाटिल's picture

14 May 2018 - 1:09 pm | संजय पाटिल

कपिलतिर्थमधे चवकशी करा! सध्या सिझन आहे. मिळुन जायील....

संजय पाटिल's picture

14 May 2018 - 1:32 pm | संजय पाटिल

बायदवे.. पावट्यासारखाच असतो, सोलुन घेउन, साधारन नुसताच भाजतात, हलकासा म्हणजे एखादी चीर पडेल एवढाच चेचायचा, आणि रस्सा बनवायचा...
आणि गरमागरम भाकरी बरोबर चोपायचा...

सस्नेह's picture

14 May 2018 - 1:49 pm | सस्नेह

उद्या जाईन कपिलतीर्थात.
मोडंवाल्यांकडे मिळतात का ?

संजय पाटिल's picture

14 May 2018 - 3:40 pm | संजय पाटिल

मोडंवाल्यांकडे मिळतात का ?
ओल्या शेंगा असतात.

इरसाल's picture

12 May 2018 - 11:45 am | इरसाल

काळे चणे, त्याचा पण झणझणीत रस्सा पण टाका की ह्यात.
खानदेशी रसोई (रस्श्याच नाव) त्यात गव्हाच्या पिठा चे गोळे सोडतात शिजवताना त्याला डुबुकवड्या म्हणतात. आंब्याचा रस, पुरणपोळी, भात, रसोई, भज्या-पापड-कुर्डाया कांदा-लोणचं असा खासा बेत असतो ह्या सीझनला जावई आला किंवा पाहुणे आले की.

सस्नेह's picture

12 May 2018 - 8:59 pm | सस्नेह

काळे वाटाणे / चणे हे एक रश्शाचं भारी मटेरियल आहे!

त्रिवेणी's picture

13 May 2018 - 7:17 am | त्रिवेणी

गव्हाच नाही डाळीच पीठ असत ते आणि पातोड्या पण करतो आपण त्यांच पिठाच्या

इरसाल's picture

14 May 2018 - 1:19 pm | इरसाल

रसोईमधे गव्हाच्याच डुबुकवड्या सोडतात :)

manguu@mail.com's picture

14 May 2018 - 6:54 pm | manguu@mail.com

रसोई जर डाळ , कडधान्याचा पदार्थ असएल तर त्यात गव्हाच्याच वड्या सोडणार . उदा डाळ ढोकळी, वरणफळ , चकोल्या

मुक्त विहारि's picture

12 May 2018 - 11:50 am | मुक्त विहारि

आता ह्या पापाचे परिमार्जन उद्याच करायला लागणार.

नीलकांत's picture

13 May 2018 - 1:30 pm | नीलकांत

ह्या रश्याच्या पायी तर महाराष्ट्रात जिथं तिथं जाऊन आलोय. आता सुध्दा खरडफळ्यावर पुण्यातील काही जागांची माहिती मिळाली. तुमचा लेख तर सर्वात भारी.

मस्तच. लेख आवडला.हे वेगवेगळे चवदार रश्ये भुरकुन बघावे लागतील आता.

- नीलकांत

सस्नेह's picture

13 May 2018 - 7:25 pm | सस्नेह

या कोल्हापूर ला

नीलकांत's picture

14 May 2018 - 12:13 am | नीलकांत

कोल्हापूरला नक्की येणार.

भीमराव's picture

13 May 2018 - 5:18 pm | भीमराव

काय राव सगळ्या मानाच्या रश्शांमधे पोळ्याच्या आमटीच नाव नाही? पुरणपोळी च जेवण किती साजुक असेल, पण त्याला खरी शोभा आमटी मुळेच.
पावट्याची आमच्या मातोसरींनी साधी आमटी एक स्वर्गीय पदार्थ आहे, तसाच भरडलेला काळा घेवडा सुद्धा.
हल्ली लोक ग्रिन पीस बोलतात त्या वाटाण्याच्या आमटीत​ गरम चपाती कुस्करून जेव्हा आपण पहिला घास जिभेवर ठेवतो तेव्हा जे काही होतं, ते शब्दात सांगायचं शक्य तरी आहे का?ताटातली वाटी अथवा डिश काढून बाजूला ठेवावी
गरमागरम भाकरी-चपाती कुस्करून त्यात मस्त रस्सा ओतुन मिश्रण छान एकजीव करावे. यात रस्सा आपल्या आवडीच्या प्रमाणात ठेवावा. कांदा बुक्कीने सोडुन घ्यावा आणि मग तयार काला वड म्हणून नाडी तुटेपर्यंत वडाला, हे खरं जेवण.

कटाची आमटी हा रस्सा म्हटला तर तो सात्विक रस्सा. चावट नाही च :)

बॅटमॅन's picture

14 May 2018 - 3:28 am | बॅटमॅन

आयच्या गावात. ते समुद्रमंथनातनं निघालेलं अमृत म्हणजे दुसरंतिसरं काही नसून रस्साच असणार याची आज खात्री पटली.

सस्नेह's picture

14 May 2018 - 7:03 am | सस्नेह

अगदी अगदी !
देव-दानवांनी भांडावे अशीच चीज आहे ही =))

स्वाती२'s picture

14 May 2018 - 4:05 am | स्वाती२

रुचकर लेख आवडला!

सरनौबत's picture

14 May 2018 - 1:19 pm | सरनौबत

मस्त जमलाय रस्सा, अगदी हवा तस्सा !

कालच कडव्या वालांची वर्षभराची बेगमी करुन झाली आहे. आता पहिला पाऊस पडला की चटक मटक रस्सा होईलच.

दिलिप भोसले's picture

14 May 2018 - 5:28 pm | दिलिप भोसले

छान लेख लिहला आहे. क्रमवार पाककृती लिहा.

असले भारी वाचल्यावर घरात कोण बी शाकाहारी असू नै वाटते, वास येतो बै त्यासनी... स्वतः बी खायचं नाही आणि दुसर्याला बी खावू दयाच नाय... पण ह्या रविवारी स्पेशल मटणाचा रस्सा होणार, बसा नाकाला हाथ लावून असा हुकूमच काढणार...

प्राची अश्विनी's picture

15 May 2018 - 7:57 am | प्राची अश्विनी

असे लेख म्हणजे उगा जीवाचा छळ.:(:(

यमगर्निकर's picture

16 May 2018 - 3:06 pm | यमगर्निकर

एकच नं ताई, वाचून तोंडातून पाणी गळायला लागले.... स्पेशली कोल्हापुरी पांढरा रस्सा.....

आषाढ_दर्द_गाणे's picture

20 May 2018 - 5:41 pm | आषाढ_दर्द_गाणे

सुंदर लेख!

इतके अप्रतिम वर्णन आहे की प्रतिसाद द्यायला लॉगिन केले वर्षभरानंतर!!!
विशेषतः मटनरस्याची चर्चा रोचक•••
उत्कृष्ट प्रकारचा रस्सा पॅक करून विकला तर सहज खपेल!

शान्तिप्रिय's picture

22 May 2018 - 2:48 pm | शान्तिप्रिय

मस्त लेख.
व्हेज रस्से फोटोत पाहुन भुक चाळवली.

नूतन सावंत's picture

15 Jun 2018 - 11:25 pm | नूतन सावंत

चमचमीत लेख,मोडाच्या मसुरांचाही मस्त रस्सा होतो.

हे कोल्हापुरी 'तांबडा-पांढरा' 'तांबडा-पांढरा' रस्सा लैच कौतुक ऐकून एकदा काय प्रकारै पाहू म्हणून एका हाटेलात गेलो होतो.
नावातच ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण मिळण्याची ग्वाही देणारं रेस्टोरंट होतं. वर फोटो दाखवलाय एग्झॅक्टली तस्सं ताट समोर आलं. आपण खूष! तोंडात आलेली लाळ गपकन गिळली आणि भाकरीचा तुकडा मोडला.
कसचं काय.
तांबडा रस्सा म्हणजे पाण्यात बचकाभर तिखट मिसळून गरम करून दिल्यासारखं. बाकी काही मसाले जगात असतात याचा गंध नसावा. मग पांढर्‍या रश्शाकडे वळलो. तर ती सपट मलम वगैरे खाजेबिजेवर लावायची मलमं असतात ना, ते पाण्यात घालून कालवल्यासारखं लागत होतं सेम टू सेम!
ते कोंबडीचं सुकं, ओलं, सगळं तितकच बेक्कार.
'पुरेपुर' भ्रमनिरास होऊन बाहेर आलो. (आलं का ध्येनात;)
च्यायला कुठे तो नुसत्या वासासरशी कासावीस करून सोडणारा मालवणी रस्सा आणि कुठे हे तिखटाचं पाणी.
ओरिजनल कोल्हापुरी रस्सा नक्कीच चांगला असेल, नाही असणारच, आणि हॉटेल बकवास असेल. आणखी एकदा दुसरीकडे घाबरत घाबरत ट्राय करायला लागेल. पण पोपट झाला खरा.

संजय पाटिल's picture

20 Jul 2018 - 3:55 pm | संजय पाटिल

कोल्हापुरात गेलात तर परख किंवा देहाती ट्राय कर एकदा..

कोल्हापुरातच आहे. पारख आणि देहाती, दोन्ही कडे ट्राय केले आहे. खास नाही.
घरगुती थाळी हॉटेल्समध्ये मात्र मस्त मिळतात रस्से.

कपिलमुनी's picture

20 Jul 2018 - 5:27 pm | कपिलमुनी

देहातीचा वातावरण चांगले आहे . चव पुर्वीपेक्षा थोडी फिकि झाली आहे. पण स्वच्छता आणि नीट शिजलेले मटण यावर उजवे थरते
रामदूत , महादेव प्रसाद ची चव चांगली वाटली.

पाटलाचा वाडा , रॉयल कोल्हापूर वगैरे खास नाहीत. ( ओपल , पद्मा ला जात नाही)
घरगुती थाळी हॉटेल्समध्ये ?? नावे सांगा , कारण नवीन हॉटेल ट्राय करायला आवडेल.

आता आता अलीकडे टिकटॅक कॉर्नर, धैर्याप्रसाद हॉलशेजारी मटन चिकन थाळी मिळते घरगुती. मस्त असते.
काही वर्षापूर्वी शनिवार पेठेत एका शेडमध्ये उत्तम घरगुती मटन थाळी आणि उत्कृष्ट बिर्याणी मिळत असे. आता मिळते का बघयला हवे.
तसेच शिवाजी पेठेत एक दोन ठिकाणे होती. नावे आठवत नाहीत. आठवल्यावर सांगेन.

संजय पाटिल's picture

1 Aug 2018 - 10:58 am | संजय पाटिल

पद्मा टॉकिज जवळ श्रीकॄष्ण डिलक्ष ट्राय करा....

संजय पाटिल's picture

1 Aug 2018 - 10:59 am | संजय पाटिल

वरचा प्रतिसाद तिरफाळ यांना होता!