पुनःश्च - किरण भिडे

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
14 May 2018 - 11:24 am

नमस्कार,
किरण भिडे यांच्या वतीने हा लेख इथे देत आहे.
धन्यवाद.

------------------------------

a

दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होतो. आमच्या डोंबिवली तल्या चन्दुमामाने मला एका लोकल लायब्ररीत नोकरी करतो का असं विचारलं. वाचायची आवड होतीच. म्हटलं भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील. व्यवहारज्ञान आलेलं नव्हतं पण पैसे न मोजता हे करता येईल याचा कोण आनंद होता. महिना दीड महिना केली असेल नोकरी मी ती. पण ते असं पुस्तकांच्या संगतीत दिवसभर राहणं मला खूप आवडून गेलं होतं. ती लायब्ररी जणू माझं पहिलं प्रेमच होतं. जगरहाटी प्रमाणे प्रेमी जनांची ताटातूट झाली आणि मी करियर च्या मागे धावू लागलो. पण खरं प्रेम तुम्हाला फार लांब जाऊ देत नाही म्हणतात. मी देखील इंजिनिअरिंग, आरोग्यनिगा, लोकांना खाऊ घालणे असे उद्योग केले.

व्यवसाय जरी कुठलाही असला तरी वाचन सुटलं नव्हतं. उलट "माधवबाग" करत असताना "आरोग्यसंस्कार" नावाचे मासिक सुरु करून माझी हौस मी पुरती भागवत होतो. या मासिकाच्या निमित्ताने "ग्रंथाली" चे दिनकर गांगल, "अंतर्नाद" चे भानू काळे, लोकसत्ताच्या शुभदा चौकर, मटा चे श्रीकांत बोजेवार, इब्राहिम अफगाण या सगळ्यांशी छान ओळख झाली. यांना भेटलं की मला "आपल्या लोकांच्यात" आल्यासारखं वाटायचं. "मेतकुट", "काठ अन घाट" यातून थोडा मोकळा झालो; म्हटलं वेळ मिळालाय, जे जे सुटलं ते सगळं वाचून काढूया. जुने हौसेने घेतलेले पण उघडूनही न बघितलेले दिवाळी अंक, काळे/गांगल यांनी दिलेले अंतर्नाद,रुचीशब्द चे अंक वाचून काढले. असे कितीतरी लेख मला मिळाले जे मी एवढ्या वर्षांनी वाचले तरीही मला कालसुसंगत वाटले. वाटलं किती छान साहित्य आहे हे. खरंतर सगळ्यांना वाचायला आवडेल. पण कसं पोचणार त्यांच्यापर्यंत? आणि पुन्हा कोण छापणार हे? या "आणि पुन्हा" ने मनात घर केलं. म्हटलं आपणच "पुनश्च"( आणि पुन्हा ) या नावाने हा उपक्रम सुरु केला तर? अशी ही पुनश्च ची जन्मकथा. आणि अशा रीतीने मी पुन्हा एकदा या पुस्तकांच्या दुनियेत आलोय "पुनश्च" या माझ्या नवीन उपक्रमासह.

थोडसं या उपक्रमाबद्दल विस्ताराने. माझी अशी योजना आहे की याद्वारे मी जुन्या नियतकालिकांतील आजही कालसुसंगत असे लेख काढून ते डीटीपी करून एका App आणि website च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवणार. सुरुवातीला दर आठवड्याला दोन लेख असं त्याचं स्वरूप असेल. म्हणजे वर्षात साधारण १०४ लेख वाचकांपर्यंत पोचतील. ज्यांना ते screen वर वाचायचे असतील त्यांनी तसे वाचावे. ज्यांना print outs काढून वाचायचे असतील तर तीदेखील सोय असेल. तुम्हाला आवडलेला लेख तुम्ही whatsApp, facebook इ. समाजमाध्यमांवर शेअर देखील करू शकाल. लेखांमध्ये सर्व प्रकारच्या साहित्याचा समावेश असेल उदा. चिंतन, अनुभवकथन, पुस्तक/सिनेमा/नाटक इ. चा रसास्वाद, व्यक्ती आणि संस्था परिचय, निवडक कथा. ही यादी खूप वाढवता येईल. मला जे वाचकापर्यंत पोचलंच पाहिजे असं प्रकर्षाने वाटेल ते सर्व. नियतकालिकामध्ये सुधारक, आजचा सुधारक, परिवर्तनाचा वाटसरू, अभिरुची, मराठवाडा, सत्यकथा, माणूस, अनुभव, अंतर्नाद इ. चा समावेश असेल. लेखांची निवड सुरुवातीला हा एकखांबी तंबू असल्यामुळे मीच करेन. एक लेख निवडण्यासाठी कितीही लेख वाचायला लागण्याची शक्यता असल्यामुळे एकट्याला हे काम खूप शक्य नाही हे उघडच आहे. पण भविष्यात संपादक मंडळ असावे अशी इच्छा आहे. असे संपादक मंडळ असेल तर लेखही संख्येने जास्त देता येतील. शिवाय वाचकही त्यांना आवडलेले जुने लेख सुचवू शकतील. पण त्यांची निवड करणे अथवा न करणे हे मी किंवा संपादक मंडळावर अवलंबून असेल.

जाहिरातींचा भडीमार सगळीकडे होत असताना इथेही तो करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे साहजिकच हा उपक्रम सशुल्क करावा लागणार हे उघड आहे. पण ती किंमत अशी असेल की त्याचं मूल्य त्यापेक्षा खूप जास्तं आहे हे तुम्हाला जाणवेल. प्रती लेख फक्त १रुपया, वार्षिक १००रुपये अशी त्याची किंमत असेल. अधिकाधिक वाचकांपर्यंत ते पोचावं हा हेतू असल्यामुळे सर्वांना सहज परवडणारी किंमत असायला हवी असं मला वाटलं. आणि ही सुरुवात आहे. भविष्यात एकाच साहित्य प्रकारातील (उदा. अनुभवकथन) अनेक लेख, लेख पाठवण्याची वारंवारता बदलणे, मागाल तो लेख असे विविध पर्याय वाचकांना उपलब्ध करून देता येतील. मराठी साहित्यातील लेखांचे हे जणू म्युझियमच असेल. मला खात्री आहे की मराठीतील चोखंदळ वाचक या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद देतील. या कामात खूप जणांचे सहकार्य लागणार आहे. आपल्या सूचना आणि कल्पनांचे स्वागत आहे.

पुनश्च मधील लेखांच्या निवडीबद्दल थोडसं. नावावरून पुनश्च जरी एक नोस्टाल्जिया वाटलं तरी आपला प्रयत्न असा असतो की त्यातील लेखांना वर्तमानातील घटनांचे संदर्भ असावेत. उदा. सध्या विवाहनोंदणी संस्थांचा एवढा सुळसुळाट झालाय की झी आणि abp सारख्या वाहिन्यांना पण यात उतरावेसे वाटू लागले. त्याला अनुसरून आपण मंगला गोडबोले यांचा 'पुस्तकपंढरी' या मासिकात 1986 साली आलेला 'लग्नाचा बाजार' हा लेख आपण घेतला. मागील गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला टिळकांनी की रंगारी चाळीने? यावरून वाद सुरु होता. त्यातील सत्याची छाननी करणारा 'असा झाला पहिला गणेशोत्सव' हा 'प्रसाद' मासिकाच्या १९६८ सालच्या अंकात आलेला लेख आपण घेतलाय. बालगंधर्व सिनेमा बघणाऱ्यांना बालगंधर्वांच्या शोकांतीकेची झलक त्या चित्रपटात दिसली होती. पण त्या शोकांतीकेची सविस्तर माहिती देणारा वसंत वैद्य यांनी 'विचित्रविश्व' च्या एप्रिल 1984 सालच्या अंकात लिहिलेला 'बालगंधर्वांची अखेर' हा लेख आपण पुनश्चवर घेतला आहे. पुनश्चला आपण थोडे म्युझियमचे पण स्वरूप देऊ इच्छितो. म्हणजे असे लेख त्यावर असावेत जे दुर्मिळ आहेत, मस्त आहेत, एकेकाळी ते खूप वाचले गेले होते. उदा. दत्तू बांदेकर यांनी मृत्युपूर्वी लिहिलेला शेवटचा लेख 'जरा सरकून घ्या', शिरीष कणेकरांचा १९६३च्या माहेर मासिकात लिहिलेला 'महिला क्रिकेट' . पुनश्च मध्ये आपण ललित लेखनातील २१ प्रकार आणण्याचा प्रयत्न केलाय. उदा. अनुभवकथन, चिंतन, मृत्युलेख, विनोद, उपरोध, निबंध, सर्व प्रकारचे रसास्वाद इ. यामुळे वाचकांना विविध प्रकारचे लेखन वाचायला मिळेल आणि त्यांची वाङमयीन अभिरुची वाढेल. लेखात आलेले कठीण शब्दांचे अर्थ त्या शब्दावर क्लिक केल्यावर वाचता येतात ही अजून एक सोय आपण 'नवशिक्या' मराठी वाचकांसाठी करून दिली आहे. अर्थात आम्ही केलंय ते पुरेसं आहे असा िंआमचा अजिबात समज नाही. याहून अधिक काही करता येण्याच्या भरपूर शक्यता यात आहेत. आम्ही आत्ता कुठे खेळायला सुरुवात केलीये, यात खरे रंग वाचकच भरणार आहेत यात आम्हाला अजिबात शंका नाही.

किरण भिडे
kiranvbhide@gmail.com

संबंधित दुवा
गूगल अ‍ॅप - https://play.google.com/store/apps/details?id=com.punashcha.cordova&hl=zu

वाङ्मयसमाजप्रकटनलेख

प्रतिक्रिया

वा! ही तर मेजवानी म्हणायची वाचकांसाठी!

वेल्लाभट's picture

14 May 2018 - 2:24 pm | वेल्लाभट

वाचनाची उशिरा प्रज्वलित झालेली आवड, धकाधकीच्या जीवनशैलीत त्यासाठी दुर्लभ झालेला वेळ, मोबाईलची सोय या तीनही गोष्टींची सांगड घालणारं पुन:श्च पहिल्यापासूनच फार रोचक वाटलं होतं. त्याच्या निर्मात्याशी जेंव्हा बोलणं झालं तेंव्हा उत्तमोत्तम साहित्य लोकांसमोर आणण्यामागची त्यांची तळमळ फार प्रेरित करून गेली. शिवाय उत्तमोत्तम म्हणजे केवळ नवसाहित्य नव्हे तर जुनं, काळाच्या ओघात मागे पडलेलं तरीही आजच्या परिस्थितीशी सुसंगत असणारं असं साहित्य वाचायला मिळावं ही त्यामागची भूमिका स्तुत्य वाटली.

पुनःश्च चा गेले सहा एक महिने मी वाचक आहे. तंबी दुराई सारख्या लेखमाला, इतिहास विज्ञान या विषयातले माहितीपर लेख म्हणजे अनमोल खजिना आहेत. ट्रेनच्या गर्दीतही स्वतःला अनभिज्ञ ठेवण्यासाठी माझ्यासारख्याच्या ते फार कामी येतात. कारण बातम्यांची अ‍ॅप वाचण्यात काहीच अर्थ नसतो, ज्यात फक्त विषण्ण आणि उद्विग्न करणारा मजकूर असतो.

वाचकवर्ग वाढतोय, आणि पुनःश्च सारखी अ‍ॅप मराठी साहित्यात क्रांती आणणार आहेत. इंटरनेट, मोबाईल वर मराठी भाषा, आणि साहित्याचा वापर, वावर वाढवण्यात हे मोलाचं योगदान ठरेल. तेंव्हा प्रत्येक मराठी वाचनप्रेमी व्यक्तीला 'पुनःश्च' परिवारात सामील व्हा, असं मी नेहमी सुचवत असतो.

अभ्या..'s picture

14 May 2018 - 2:54 pm | अभ्या..

अरे मस्तच.
किंमतही माफक ठेवलीय.

पिलीयन रायडर's picture

17 May 2018 - 10:30 am | पिलीयन रायडर

फारच चांगला उपक्रम आहे हा. नक्कीच वाचक होणार.

स्त्युत्य आणि वाचनीय उपक्रम.
शुभेच्छा !

विवेकपटाईत's picture

8 Aug 2018 - 9:08 am | विवेकपटाईत

लेख आवडला.