स्वानंदासाठी

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
10 May 2018 - 3:49 pm

नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होते ‘ईकडची बातमी तिकडे’ करुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळे ‘लोक’ पायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तर ‘लावालावी’ करायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा. आता या तत्वात बसेल अशी लावालावी करायची म्हणजे थोडा विचार करणे आलेच. नारद चालून थकले, विचार करुन शिणले आणि शेवटी एका केळीच्या बनात थंड हवेच्या आधारे विश्रांतीसाठी थांबले. सकाळपासून हातातल्या विणेवरुन बोटे फिरली नव्हती ना मुखाने ‘हरि नाम’ ऊच्चारले होते.

थकलेल्या नारदांनी सहज आजूबाजूला पाहीले. समोरच्याच केळीच्या प्रशस्त पानावर काही लिहिले होते. नारदांनी जवळ जाऊन पाहीले. पहिली ओळ वाचली. मग दुसरी वाचली. आणि मुनीजी वाचण्यात अगदी गढून गेले. पुर्ण पान वाचूनही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी अजुबाजूला पाहिले. दुसऱ्या पानावर ऊर्वरीत मजकुर होता. नारद वाचत होते. पान संपल्यावर दुसरे पान शोधत होते. एकामागोमाग नारदांनी सात पाने वाचली. त्यांचे भान हरपले. कोण नारायण, कोण ब्रम्हा त्यांना काही आठवेना. डोळ्यातुन अश्रू वहात होते. अंतःकरण आनंदाने भरले होते. कधी अनुभवली नव्हती अशी चित्तात शांती अनुभवीत होते.
मागून आवाज आला “काय झालं मुनीवर?”
नारदांनी मागे वळून पाहिले. समोर मारुतीराया ऊभे होते.
नारद म्हणाले “हनुमंता, अरे मी आजवर खुप जनांनी लिहिलेली ‘रामायणे’ वाचली पण मनाला अद्भुत शांती देणारे तुमचे रामायण अगदी अलौकीक आहे.” हे ऐकुन हनुमंत फक्त हसले आणि आकाशात झेपावत नाहीसे झाले.
अतःकरणातील तो अलौकीक आनंद अनुभवत नारदांनी केळीचे बन सोडले. जसजसे केळीचे बन मागे पडले तसतसा नारदांच्या अंतःकरणातला आनंद कमी होत जाऊन ‘मुळ वृत्ती’ने डोके वर काढायला सुरवात केली. विचारचक्रांना चांगलीच गती मिळाली. चेहऱ्यावर छद्मी समाधान ऊमटले आणि मनात काही ठरऊन नारदांची पावले वाल्मीकींच्या आश्रमाकडे वळली.

सकाळच्या प्रसन्नवेळी आश्रमाच्या दारात प्रत्यक्ष नारदमुनींना पाहून वाल्मीकींना आनंद झाला. पुष्पहार घालून त्यांनी नारदांचे स्वागत केले. हाताला धरुन आश्रमकुटीत घेऊन नेले. दर्भासनावर आदराने बसवले. फलाहार-दुग्धाहाराची तबके समोर ठेवली. सर्व सोपस्कार झाल्यानंतर वाल्मीकींनी विचारले “मुनीवर, सर्व लोक क्षेम आहेत ना? विष्णूलोकाची काय वार्ता?”
नारद चेहरा गंभीर करत म्हणाले “तुमचे ‘पद’ सोडून सर्वकाही कुशल आहे आचार्य.”
वाल्मीकींनी गोंधळून विचारलं “जरा विस्ताराने सांगीतलं तर काही कळेल मुनीवर.”
नारद मनातला आनंद चेहऱ्यावर न दाखवता म्हणाले “कालच पृथ्वीलोकात फिरत असताना एक रामायण वाचनात आले. आपण लिहिलेल्या रामायणापेक्षा मला ते जास्त भावले. अर्थात हे माझे मत आहे.”
वाल्मीकींनी विचारले “कुणी लिहिले आहे?”
नारदांनी सांगीतले “श्री मारुतीरायांनी लिहिले आहे.”
नारद फलाहार वगैरे घेऊन, वाल्मीकींचे आदरातिथ्य स्विकारून मार्गस्थ झाले. जाताना वाल्मीकींची मनःशांती घेऊन गेले. त्यांना अतिव दुःख झाले. वाल्मीकींनी खुप विचार केला. नारदांचे कामच आहे लावालावी करणे, त्या मुळे दुर्लक्ष करावे असे त्यांनी ठरवले. पण मन काही ऐकत नव्हते. “माझ्यापेक्षा सुंदर रामायण लिहावे, आणि तेही एका माकडाने!” वाल्मीकी प्रचंड अस्वस्थ झाले. शेवटी तेही एक लेखकच ना! नारद खोटे बोलणार नाही हे नक्की. शेवटी वाल्मीकी नारदांनी सांगीतलेल्या ‘रामायणा’च्या शोधात निघाले.

काही दिवसांच्या अथक भटकंतीनंतर वाल्मीकींना नारदांनी वर्णन केलेले केळीचे बन सापडले. त्यांनी काही वेळातच केळीची ‘ती’ सात पानेही शोधून काढली. ते रामायण वाचता वाचता वाल्मीकींची अवस्थाही नारदांसारखीच झाली. केवळ अप्रतिम. साहित्यिक मुल्यांच्या दृष्टीने परिपुर्ण. भक्तीरसपुर्ण. असामान्य शब्दयोजना. अलौकीक लेखनशैली. सगळ्याच दृष्टीने परिपुर्ण असे ते रामायण वाचताना वाल्मीकींना अश्रू अनावर झाले. आनंदाचे आणि दुःखाचेही.
मागून आवाज आला “काय झाले आचार्य? आपल्याला रामायण आवडले नाही का?”
वाल्मीकींनी मागे वळून पाहीले. समोर मारुतींना पाहुन म्हणाले “वर्णनातित आहे हे रामायण.”
हनुमंताने आश्चर्याने विचारले “मग हे डोळ्यात अश्रू कशासाठी आले आचार्य?”
वाल्मीकी ऊत्तरले “तुझे रामायण निश्चितच माझ्या रामायणापेक्षा श्रेष्ठ आहे. आजवर रामायण म्हटले की माझी आठवण यायची सगळ्यांना. पण तुझे हे रामायण वाचून आता कोणी माझे रामायण वाचनार नाही आणि माझी रामायणकार म्हणुनही कोणी आठवण काढणार नाही.”
“बस् एवढेच ना?” असे म्हणून हनुमंताने समोरील केळीची पाने तोडली व तुकडे तुकडे करुन खाऊन टाकली.
वाल्मीकी हनुमानाचा तो वेडेपणा पाहून चकीत झाले. त्यांना वाटले ‘माकड ते माकडच शेवटी’ तरीही त्यांनी न राहऊन विचारले “हनुमाना, काय केले हे तुम्ही. तुमचेच रामायण नष्ट केले? कशासाठी?”
मारुतीराया हसत म्हणाले “तुम्ही रामायण लिहिले ते जगात तुमचे नाव ‘रामायणकार वाल्मीकी’ व्हावे म्हणून. लोकांनी तुम्हाला ओळखावे, कौतूक करावे म्हणून. पण मी जे रामायण लिहिले होते ते फक्त स्वानंदासाठी. माझ्या रामायणातील एक एक शब्द, एक एक ओळ लिहिताना मला अवर्णनिय आनंद झाला. प्रत्यक्ष प्रभुरामाच्या सान्निध्य असल्याचा अनुभव आला. आता जगात फक्त तुमचेच रामायण राहिल आणि ते तुमच्याच नावाने ओळखले जाईल. ‘वाल्मीकी रामायण’ म्हणुन दोघेही अमर व्हाल.”
खजील होऊन वाल्मीकींनी आपल्या आश्रमाचा रस्ता धरला.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स’ साठी नाही. काय म्हणता? :)

(फार गांभीर्याने घेऊ नये :)

वावर

प्रतिक्रिया

तुमची लिखाणाची पद्धत खूप छान, सोपी ओघवती आहे. आधीचे पण सगळे लेख वाचले, प्रतिक्रिया द्यायला जमलं नाही, पण छान होते ते पण. या लेखाचा आशय अतिशय आवडला.

शाली's picture

10 May 2018 - 8:50 pm | शाली

धन्यवाद!

उगा काहितरीच's picture

10 May 2018 - 8:51 pm | उगा काहितरीच

तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स’ साठी नाही. काय म्हणता? :)

शतप्रतिशत सत्यवचन, मुनिवर ! शतप्रतिशत सत्यवचन !!

पद्मावति's picture

10 May 2018 - 9:19 pm | पद्मावति

छान लिहीलंय. आवडलं.

सुखीमाणूस's picture

10 May 2018 - 11:00 pm | सुखीमाणूस

निरुपण आवडले आणि पटले.

पण काहींचा स्वानंद हा परदुःखात असतो. ते कसे काय सुधारणार? असो आपल्या लेखामुळे कोणात बदल झाला तर चांगलेच होईल.

अबोलघेवडा's picture

11 May 2018 - 11:32 am | अबोलघेवडा

अतिशय सुंदर, ओघवत्या भाषेत लिहिलं आहेत. असेच लिहीत जा.... फक्त स्वतःच्याच नाही तर आमच्या देखील आनंदासाठी...

शेखरमोघे's picture

12 May 2018 - 12:47 am | शेखरमोघे

लिखाण आवडले. अतिशय छान तात्पर्य "माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदासाठी". पण हा उपदेश पाळण्यात एक धोका सम्भवतो. हा उपदेश पाळला तर मि पा वरच्या कळलाव्यान्चे कसे होणार? :०))

शाली's picture

12 May 2018 - 5:43 am | शाली

:)

उचित बोधकथा. पण नुसता दंगा घालणे हाच हेतू असणार्यांचे काय ?

पाषाणभेद's picture

6 Apr 2019 - 12:36 pm | पाषाणभेद

तेच म्हणतो. अगदी योग्य आहे.

कथा आवडलीच, आणि त्यातले मर्म अधिकच भावले. खरोखर आपल्यातल्या सृजनशीलतेला चित्र, संगीत, लेखन इत्यादि मार्गांनी वाव देत रहाणे यातच खरेतर जीवनाचे सार्थक असते-असावे.
बरेचदा लिहीताना- चित्र रंगवताना, एकादे वाद्य वाजवताना निखळ आनंद लाभत नाही. असमाधान, नैराश्य, हुरहुर वगैरे आपला ताबा घेत असते. परंतु चिकाटीने प्रयत्न करत राहून नवनव्या वाटा धांडोळणे चालूच ठेवण्यातून समाधान लाभत असते, असा अनुभव येतो.
या सुंदर लेखनासाठी अनेक आभार शालीभाऊ.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2019 - 5:08 pm | चौथा कोनाडा

छान, सुरेख बोधकथा !
शेवटी लिखाणा काय किंवा इतर कोणतीही कला स्वतःसाठी केली की मिळणार आत्मानंदा अवर्णनीय असतो !