बासरी भरून पावली

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in जनातलं, मनातलं
8 May 2018 - 7:54 pm

गाढ झोपेत असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर मानवी भावनांची जणू जत्राच भरली होती. मध्येच त्यावर एखादी स्मित लकेर उमटून जाई, मधेच त्याचा चेहरा पूर्ण जगाचे दुःख पचवल्यासारखा करुण होऊन पिचून निघे. स्वप्न बघत होता हो तो. हास्याचा भाग म्हणजे त्याचे पितृतुल्य गुरुजी, घरून पळून आलेल्या बासरीवेड्या पोराला त्यांनी दिलेला थारा. त्याच्या चेहऱ्यावर अगोदर आलेलं स्मित त्याला आठवण देत होतं, पहिल्या दिवशी गुरुजींनी जेव्हा त्याला पोकळ वेळूच्या भोके पाडलेल्या काठीत भावना रित्या करणे शिकवणे सुरू केले होते तेव्हा तो जागेपणी असाच स्मित करत होता. रोज पहाटे उठणे आन्हिके करून गुरुजींची चिलम बनवून त्यांना उठवणे मग त्यांच्यासोबत रियाज. गुरुजींची परिस्थिती यथातथाच त्यात त्यांच्या पत्नीस असे आगंतुक पोरगे पोसणे अजिबात रुचत नसे. त्या त्याला दिवसभर कामे लावीत वरतून फुकट बांबू फुकायला येऊन कोरभर भाकरी खाऊन टाकल्याबद्दल बोल, त्यांच्याच आठवणींनी आज झोपेत त्याचे तोंड उदास होत असे, अन दुःखी होत असे तो दिवस आठवून जेव्हा त्याचे गुरुजी सकाळी रियाजाला उठले अन एकच खोकल्याची उबळ येऊन उन्मळून पडले होते. शेवटचा आधार संपावा तसे तो क्षणभर उन्मळून पडला होता.

गुरुजींची शेवटची आठवण म्हणून चिलम घेऊन गुरुगृह सोडलेला तो, उदास विमनस्क मनाने घरी परतला तो फक्त आपल्या सावत्र भावाने सगळे बळकावलेलं पाहायलाच. गुरुपत्नीहून वाईट स्वभावाची वहिनी अन फोटोतून पाहणारे वारलेले आईबाप. सगळी गणिते चुकली तसे तो भावासमोर पदर पसरून कसेबसे मिळवलेले पाचशे रुपये घेऊन सुटला, कुठं जायचं काही कल्पना नाही डोक्यात फक्त बासरी, पोटात फक्त भूक, शिक्षण पाचव्या इयत्तेतच सोडलेलं. त्याचं विश्वच बासरी होतं, त्याचा नाईलाज होता. त्याने सरळ दहा उगा म्हणायला असलेल्या बासऱ्या घेतल्या अन गावातल्याच बागेबाहेर विकायला उभारला. हजार लेकरे अन त्यांचे दोन हजार आईबाप रोज पाहणारा तो बगीचा पण बहुतेक ह्याच्याकडे रागीट नजरेनेच पाहत होता. ज्या दिवशी हजारात एखादे लेकरू सूर पाहून हरकलेले दिसे त्या दिवशी हा स्वतः हरखून जात असे, कारण त्या दिवशी वडापाव नशिबी येई, एरवी बासरीवर वाजवलेल्या सवंग चित्रपट संगीताच्या जोरावर जी काही दहा पाच रुपये कमाई होई त्यात फक्त चार रुपयांचा पार्ले पुडा अन कटिंग चहा येई. उरलेली खळगी भरायला मायबाप सरकारने सार्वजनिक नळाची सोय केली होती.

एकदिवस तो भुकेला कोमेजला उठला, तिरिमिरीत स्वतःचीच बासरी तोडून टाकली, पोट भरायचं म्हणून एका चहावाल्याकडे पोऱ्या म्हणून लागला, बासरी रीती झाली, ती डोक्यातून, बंडखोर मन पोटाच्या भुकेला सुद्धा भीक घालना, चहावाल्याच्या कोळशाच्या भट्टी समोर मर मर राबून खोकला मात्र त्याला जडला, तोच एक त्याचा मित्र होता आता. रात्री टपरीतच झोपल्या झोपल्या तो एखाद फिल्मी गाणे वाजवी तितकी दीड दोन मिनिटे स्वतःच मंत्रमुग्ध होऊन त्याच नशेत झोपी जाई, पण हळू हळू हे व्यसन परत डोके वर काढू लागले, अन एकदा मात्र कडेलोट झाला दिवसभराचा दुधाचा रतीब करपेपर्यंत ह्याचे मन बासरीवरच बसून होते, चहा वाल्याने अंगातील प्रत्येक हाड ठेचुन हाकलले तोवर हा येडा मुग्धच होता. शुद्धीवर आला तेव्हा फाटके कपडे अन केलेल्या कामाचे पाचशे रुपये उरावर घेऊन परत हा जगात मोकळा होता.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या, फिल्मी असले म्हणून काय झाले गाण्याला अस्तित्व मिळते ते सप्तसुरांमुळेच. परत एकदा पार्लेजी अन चहा सांगाती आले. अर्धपोटी बासरी कवटाळून तो फक्त स्वतःसाठीच 'तुम तो ठहरे परदेसी' 'परदेसी परदेसी जाना नही' 'दुनिया बनाने वाले' वाजवत बसू लागला. त्याला जोवर पार्ले कंपनी रोज चार रुपयात पोसत होती तोवर त्याला कसलीच तमा नव्हती. अगदी चहावाल्याच्या भट्टीने दिलेल्या सख्या सोबती खोकल्याचीही.

त्या दिवशी तो असाच दिवसभर खोकुन अन वेळू फुकुन दमला होता, बागेतच एका बाकड्यावर पडल्या पडल्या तो परत एकदा फुकट दिसणाऱ्या एकमेव स्वप्न चित्रपटात गुंग झाला होता, गुरुजी, भाऊ, भावकी वगैरे ठराविक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून झरत होते तेव्हाच एक अनामिक कळ त्याच्या पाठीतून उठली, अन शुद्ध परत येता येता एक आवाज कानात घुसला

'उठय ये भडव्या, तुज्या बा चा गार्डन हाय व्हय रं चुतमारीच्या?' ज्या सरकारने पोट भरायला सार्वजनिक नळ दिला त्याच सरकारचा नोकर असलेला एक हवालदार पुढे दत्त, का यमदूत म्हणून हजर होता!. काय बोलावे हे ठरवत असतानाच अजून एक सणसणीत कानाखाली पडली अन उत्तरादाखल शब्द शोधण्याऐवजी त्याने खोकल्याची उबळच मोकळी केली , तसं हवालदार आपल्या सोबत्याला म्हणाला

'आयला गर्दुलं दिसतंय रे गाबडं!'

'हां मग काय, त्वांड बग कसं मिचकूळ हाय भाड्याचं'

'काय रे नशापाणी करून सरकारी बागेत झोपतो काय झवन्या?, यायला ही खुळी गांडीवर सोटे खाऊन बी सूदरायची न्हाईत'

'ऐक ह्याची तपासणी घे, अन साहेबांसमोर उभं कर, आपल्या बीट मंदी गांजा, अफू, भांग इकायचं लै वाढल्या लगा, कंट्रोल कराय लागल नायतर इतकं मलाईदार बीट हातून घ्यायला येरमाळे अन सवडकर टपून बसलेत भोसडीचे'

गर्भगळीत झालेल्या त्याला एका हवालदाराने बकोट धरून उभे केले, दुसरा त्याचे खिसे चाचपू लागला तेव्हा त्याला हाती लागली चिलम, गुरुजींची शेवटली आठवण असलेली चिलम!.

'गंजेकस दिसतंय भाडखाऊ, मेरेकर घे ह्याला पटकन कस्टडीत, ह्याचा सप्लायर सापडला मंजी आपलं ह्ये बीट किमान 3 वर्षे फिक्स'

अन अचानक त्याला तोंड फुटलं

'चिलम द्या के माजी परत माझे गुर्जी हाईत त्ये'

'मेरेकर हे बघ आयघालं अजून तारेतच दिसतंय गांज्याच्या हा हा हा हा हा'

'चिलमीलाच गुरू केलंस व्हय रे गंजेड्या, मेरेकर हाण भडव्याला दोनचार गुच्च्या येईल लायनीवर कुत्रं'

'द्ये ये ते माझे गुर्जी.....' फाड फाड फाड एका मागे एक थोबाडीत बसू लागल्या तशी तो अजूनच आक्रमक होऊ लागला,

'गुर्जी पाहिजे होय भडव्या तुला घे तुझा गुर्जी' म्हणत हवालदाराने मारलेली ती थप्पड उंटाच्या पाठीवर शेवटली काडी ठरली'

भेंचोद, दुनियेची आय घातली ह्या, डोक्यात येतील तितक्या शिव्या आठवत तो थडथड उडू लागला,

'मेरेकर हे आऊट ऑफ कंट्रोल होतंय रं' असं हवालदार घाबरून आपल्या साथीदाराला म्हणे म्हणे पर्यंत ह्याने हिसडा मारून स्वतःला सोडवलं , हाती चिलम असलेल्या हवालदाराला अक्षरशः दहा सेकंदात तीन चार कानाखाली लागवून त्याने त्याच्या कानाखाली चुलखंड पेटवलं अन शेवटी तोंडचा पट्टा मोकळा सोडला,

'मादरच्योद, गुरुजींना धक्का देतो का रांडेच्या, तुझा मुडदा बसला भीतीला टेकून, भोसडीच्या दे माझे गुर्जी'

क्षणभर सर्द झालेले दोन हवालदार बाजूला होताच त्याने फिट आल्यासारखे घुमायला सुरुवात केली,

'मेरेकर मरतंय तिच्यायला हे'

'हा हा हा हा हा' खदखद हसून त्याने मोठ्या बांबूत बारक्या छमाठ्या खोवून तयार केलेले ते स्वस्त बासऱ्यांचे फुल उधळून टाकले, एक बासरी उचलली, उरलेल्या विखुरलेल्या बासऱ्यांवर थयथया नाचून त्याने सगळ्या बासऱ्या मोडून टाकल्या, अन त्याचं हे रूप पाहत हातातले फायबरचे दांडे सावरत उभे असलेल्या हवालदार द्वयी समोरच त्याने मातीत फतकल मारली, सूर लावला, 'तुम तो ठहरे परदेसीssssssss' पण 'साथ क्या निभावोगे' पर्यंत पोचलाच नाही तो. आतून काहीतरी भयानक उकळत होते ते आता वायला वरच्या दुधाच्या तपेली प्रमाणे फसफसू लागलं, आलं आलं म्हणता म्हणता त्याची छाती भरून आली अन 'साथ क्या निभावोगे' ऐवजी बासरीच्या प्रत्येक भोकातून त्याची वेदना, अपेक्षाभंग, राग, संताप, नैराश्य लाल तांबडा रंग घेऊन भासभास जमिनीवर सांडू लागले.

साथ सोडून परदेसी दूर लोकी निघून गेला!

बासरी तांबडी का होईना एकदाची भरून पावली.

लेखकथा

प्रतिक्रिया

मनस्वी कलाकाराचा तसाच नाट्यमय शेवट! अप्रतिम लिहिलंय!

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 9:19 pm | जेम्स वांड

थँक्स दादा

वाईट तिज्यायला, सगळं वाईट. डोस्कं फिरायची कामं नुसती. लै वाइट दळिंद्री. कलेसोबत असली की रडीवतीच.
.
मागशीला ते देऊ वांडोबा, लिहित जावा.

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 9:18 pm | जेम्स वांड

लगा, तू प्रोत्साहन दिलं, आता लिवणार, मोक्कार लिवणार, आजवर लिवलं नाय कारण आपला नियम हाय

लिखो तो हद कर दो
वरना कार्यक्रम रद्द कर दो

अनन्त्_यात्री's picture

8 May 2018 - 10:16 pm | अनन्त्_यात्री

हम पढते रहेंगे।

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:29 pm | जेम्स वांड

लिहितच राहणार सरजी :)

आलाप सिनेमा आठवला अमिताभचा
खरंच कला वैट्टच. माणसाला काय काय भोग भोगायला लावते

पद्मावति's picture

8 May 2018 - 9:24 pm | पद्मावति

सुन्न :(

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:29 pm | जेम्स वांड

गरिबी वाईट, आज बसस्टॉप वर बासऱ्या विकणारे पोरगे पाहून हे झरझर सुचत गेले, मी लिहीत गेलो, प्रकाशित केल्यावर चूक कळली, फार काहीतरी विचित्रच लिहून बसलोय, पण त्या पोराच्या 'तुम तो ठहरे परदेसी' वाजवताना ताणलेल्या गळ्याच्या शीरा कुठेतरी खोलवर जखम करून गेल्या मनावर, आपण पांढरपेशे अश्या धाय मोकलून संवेदना व्यक्त करणेही आपल्या प्राज्ञ इको सिस्टिम मध्ये बसत नाही, मग लिहायचे असले काहीतरी तडफड व्यक्त करणारे. तुमची स्मायली पाहून कदाचित तुम्हालाही तेच जाणवले असावे म्हणून हा स्पष्टीकरण प्रपंच , असो! :(

पद्मावति's picture

9 May 2018 - 1:12 am | पद्मावति

मी लिहीत गेलो, प्रकाशित केल्यावर चूक कळली, फार काहीतरी विचित्रच लिहून बसलोय, विचित्र नाही हो. अगदी कळकळीने तुम्ही लिहिलंय ते जाणवलं मला. तडफड पोहचतेय तुमची. सुन्न होतं अस काही वाचलं की. लेखन आवडलं अस तरी कसं म्हणू? पण मनाला मात्र खुप भिडलं खोलवर. प्रतिक्रिया काय द्यावी हे ही कळेना त्यामुळे फक्त अशी इमोजी दिली.

वांड्याची चिलीम ज्यानं पेटवली, त्याचा या ठिकाणी शाल श्रीफळ व तर्री मारून मिसळ देऊन जाहीर सत्कार करण्यात येत आहे.

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:56 pm | जेम्स वांड

त्या अभाग्याला आज किमान जेवण मिळावे हीच प्रार्थना, शाल श्रीफळ कसले घेऊन बसलाय :(

कपिलमुनी's picture

8 May 2018 - 10:41 pm | कपिलमुनी

घरातून पळालेल्या प्रत्येकाला नशीबाची साथ मिळत नाही.
आणि कलाकारांची जिंदगी फार वाईट !
पैसा आणि कला एकत्र नांदणे फार अवघड आहे.

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:55 pm | जेम्स वांड

_/\_

अभ्या..'s picture

8 May 2018 - 10:58 pm | अभ्या..

कप्या कडू, तुला ह्या प्रतिसादासाठी बी मागशील ते देईन. कवाबी.

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 11:01 pm | श्वेता२४

खूप सुरेख वर्णन आणि काळजाला भिडणारा शेवट. काय बोलावं? कलाकाराची कलेबाबतची घालमेल आणि हे असे वर्णांदेखील एखादा मनस्वी कलाकाराचं लिहू शकतो.

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 11:30 pm | जेम्स वांड

_/\_

आम्ही कसले कलाकार ताई आपली अशीच सहज अहवालभर्ती !

शाली's picture

8 May 2018 - 11:35 pm | शाली

भारी लिहीलय. आवरतं घेतल्यासारखं वाटलं.

जेम्स वांड's picture

9 May 2018 - 7:42 am | जेम्स वांड

हा पहिलाच प्रयत्न त्यामुळे थोडं आटोपतं घेतलंय लेखन.

टवाळ कार्टा's picture

9 May 2018 - 1:44 am | टवाळ कार्टा

वाईत्त

शेखरमोघे's picture

9 May 2018 - 5:56 am | शेखरमोघे

भरून पावलो!!

प्रचेतस's picture

9 May 2018 - 6:49 am | प्रचेतस

अप्रतिम लिहिलंत, अधिक काय बोलू.

जयंत कुलकर्णी's picture

9 May 2018 - 6:50 am | जयंत कुलकर्णी

उस्फुर्त ! चांगल लिहिलंय..

स्नेहांकिता's picture

9 May 2018 - 7:20 am | स्नेहांकिता

असलं काय लिहीत जाऊ नका बॉ.
कसंतरीच होतं.

पैसा's picture

9 May 2018 - 7:46 am | पैसा

कथा आवडली

जेम्स वांड's picture

9 May 2018 - 7:48 am | जेम्स वांड

_/\_

जेम्स वांड's picture

9 May 2018 - 7:48 am | जेम्स वांड

टका, शेखर मोघे, प्रचेतस दादा, जयंत सर,

स्नेहांकिता ताई, कधी कधी लिहायचं नसतं पण लिहिल्या शिवाय चैनही पडत नाही.....

सुखीमाणूस's picture

9 May 2018 - 8:42 am | सुखीमाणूस

वाचतांना डोळे पाणावले.

माझ्या कार्यालयात एक परदेशी कर्मचारी भारत भेटीसाठी यायचा. तो मूळ भारतीय वंशाचा होता. दोन पिढ्या आधी ते ब्रिटन ला स्थायिक झाले होते. तो म्हणायचा गरिबी आणि भूक माणसाच्या डोळ्यात दिसते. थिजलेले डोळे दुःख दाखवत असतात.

सिरुसेरि's picture

9 May 2018 - 10:39 am | सिरुसेरि

सुन्न करणारे लेखन . दादा कोंडके यांचा "वाजवु का ? " चित्रपट आठवला .

गोष्ट आवडली पण...

हे कलाकार लोक असे व्यवहारशुन्य का असतात? कलेच्या मागे असे वेडेपिसे होउन धावणे कितपत योग्य आहे? अशा माणसाला कलाकार म्हणावे का वेडा?

कला आणि व्यवहाराची उत्तम सांगड घालु शकणाराच मोठा कलाकार होउ शकतो हे यांना का समजत नाही?

(असल्या दोन जणांना जवळून पाहिलेला)
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

9 May 2018 - 12:23 pm | जेम्स वांड

ही माणसे तुमच्या आमच्या मितीत जगतच नसतात, तारे जमीन पर मधलं ते पोरगं आठवा, गटारीत त्याला ब्रह्मांड दिसत असते! ही माणसे उस्फुर्त जगतात अन ह्यांचे तास ते तीन तास उस्फुर्त जगणे पाहायला आपण तिकीट काढून जात असतो. हेच आपलं सत्य, ह्या लोकांना कसली मीमांसा अन तर्क लावणार?

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2018 - 12:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुमचे म्हणणे मान्यच आहे हो...
पण असले काही वाचले पाहिले की फार वाईट वाटतं.
आणि वाईट वाटून घेण्यापलीकडे आपल्याला फारसे काही करता येत नाही याचे अजून वाईट वाटते.
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

9 May 2018 - 12:39 pm | जेम्स वांड

Very Sad

तुम्ही मात्र निराश केलं राव माऊली.
असु दे. काही हरकत नाही.

विशुमित's picture

9 May 2018 - 1:08 pm | विशुमित

वांड लिहलंय.
लिहते राहावा.

लई भारी's picture

9 May 2018 - 1:09 pm | लई भारी

आवडलं तरी कस म्हणणार! :(

अरेरे दुर्दैवी शेवट . कलेचा उदय होता होता अस्त झाला .

तुम्ही कमांडोच राहा , वान्डो नका होऊ

कडकच बरे वाटता , शोभत नाही मऊ

हलकेच घ्या बरे , कमांडो राव

बाकी कथा आवडली आणि तीच शीर्षकही

सिद्धेश्वर

वांडसाहेब , खरंच छान लिहिलंय . लिहीत राहा .

यशोधरा's picture

9 May 2018 - 6:27 pm | यशोधरा

:(..

अत्रन्गि पाउस's picture

10 May 2018 - 9:14 am | अत्रन्गि पाउस

जमून लिहिलत बुवा ....अप्रतिम, और आनेडो

रातराणी's picture

12 May 2018 - 2:45 am | रातराणी

_/\_
असलं काही लिहू नका ओ :(

अर्धवटराव's picture

12 May 2018 - 3:02 am | अर्धवटराव

कळवळुन आलं मन :(

पिशी अबोली's picture

13 May 2018 - 6:31 pm | पिशी अबोली

त्रास झाला खरं तर वाचून, म्हणून उशिराने प्रतिसाद. पण सुंदर लिहिलं आहे याची पोचपावती दिल्याशिवाय राहवेना.

जेम्स वांड's picture

13 May 2018 - 7:15 pm | जेम्स वांड

पण हे कुठंतरी भडाभडा लिहिल्याशिवाय सुद्धा चैन पडेना.

पण

तुमच्या आवर्जून दिलेल्या पावती बद्दल पुन्हा आभार :)

नाखु's picture

13 May 2018 - 8:37 pm | नाखु

खपल्या भळभळतात

अस्सल लिखाण

नाखु नि: शब्द

टर्मीनेटर's picture

14 May 2018 - 11:28 pm | टर्मीनेटर

स्पीच लेस...मस्तच लिहिलंय.