मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?

भन्नाट भास्कर's picture
भन्नाट भास्कर in काथ्याकूट
25 Apr 2018 - 11:34 am
गाभा: 

पोरगी एके दिवशी म्हणाली, "मम्मा मला सुमीतशी लग्न करायचे आहे"..

मी उडालोच !!

कारण पोरीची अजून वय वर्षे चार पुर्ण व्हायची होती. सध्या नर्सरीमध्ये शिकते.
तसे या फ्रेंडबद्दल थोडी कल्पना होतीच. कारण गेले काही दिवस घरातल्या भिंती आणि वह्यापुस्तके या सुमीतच्या नावाने रंगत होती. आधी आम्हाला वाटले, असेल एखादा फ्रेंड. लिहायला सोपे म्हणून लिहितेय. तसेही पोरगी न शिकवता स्वत:च्या मनाने काहीतरी लिहीतेय याचेच आम्हाला फार कौतुक. पण प्रकरण ईथवर गेले असावे याची कल्पना नव्हती :)

मम्माने समजूतदारपणे आधुनिक पालकांच्या भुमिकेत शिरून विचारले,
"का बेटा? का लग्न करायचेय त्याच्याशी?"

"अग्ग मम्मा, मला तो फार आवडतो. माझे त्याच्यावर प्रेम आहे" ..
आता आम्ही दोघेही एकत्रच उडालो.

तरी पुढच्याच क्षणी सावरून मम्माचा पुढचा प्रश्न,
"तुला तो का आवडतो?"
(प्रेम हा शब्द आम्ही मुद्दामहून टाळला)

"तो माझा फ्रेंड आहे. तो माझ्याशी टिफिन शेअर करतो" ... हे ऐकून थोडासा जीवात जीव आला. मी चक्क मोठ्याने हुश्श केले.

"तुझे बाकीचे फ्रेंड नाहीत का?"

"हो, आहेत ना.. आर्या, अपूर्वा, मनाली"

"मग ते तुझ्याशी टिफिन शेअर नाही करत का?"

"हो, करतात ना"

"मग ते तुला आवडत नाहीत का?"

"हो आवडतात ना.."

"मग तुला त्यांच्याशी लग्न नाही करायचे का?"

"अग्ग मम्मा, त्या सर्व गर्ल आहेत ना. मग गर्ल आणि गर्ल कसे लग्न करणार :)

आम्ही पुन्हा कपाळाला हात लावला.

---------------------------------------------------------------------

आमच्या संभाषणातील शब्दन शब्द जसाच्या तसा आठवून लिहीला आहे.
फक्त मुलाचे नाव तेवढे बदलले आहे.
क्या करे, खानदान के ईज्जत का सवाल है :)

पण स्मार्ट जनरेशन म्हणत हा किस्सा हसण्यावारी न्यावा असे वाटत नाही. दुर्लक्ष करून सोडून द्यावे अशी तर जराही ईच्छा नाही. हल्ली सभोवताली काय चालू आहे याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. चार वर्षांच्या कोवळ्या जीवांसोबतही ज्या संतापजनक घटना घडत आहेत, खरे तर लिहावेसेही वाटत नाही, पण या परिस्थितीपासून पळूनही जाता येत नाही. तर ईतर सुरक्षिततेसोबत आपल्या मुलामुलींच्या अज्ञानाचा कोणी फायदा उचलू नये याची काळजीही आहे.

तर प्रश्न असे पडलेत, या वयाच्या मुलांना काय समजवावे? कितपत ज्ञान द्यावे? कुठल्या वयात द्यावे? कसे द्यावे?
सध्या शाळेत याबाबत काहीच सांगितले जात नाहीये. बॅड टच, गुड टच हे मागे सत्यमेव जयतेमध्ये पाहिले होते. ते कोणत्या वयात समजावले जाते? शाळेत शिकवतात का आपण घरीच समजवायचे असते? त्याव्यतिरीक्त तिच्या डोक्यात बसलेले हे गर्ल-बॉय लग्न कन्सेप्ट कसे काढावेत? वा तशी गरज आहे का?

खरे तर ईथे प्रश्नही काय विचारावेत हा देखील माझ्यासाठी प्रश्नच आहे. त्यामुळे स्वत:तर्फे काही काळजीचे मुद्दे मांडलेत तरी आवडेल.
ईथे जर जुनी काही चर्चा झाली असेल, काही उपयुक्त माहितीचे धागे असतील, तर त्या धाग्यांच्या लिंक मिळाल्या तरी आवडेल.

- आभारी आहे,

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

25 Apr 2018 - 11:54 am | अनिंद्य

@ भन्नाट भास्कर,

महत्वाच्या विषयावर बोलते झालात, अभिनंदन.
लहान मुलांसाठीही दिवस सोपे नाहीत याचे वाईट वाटते.

गुड टच - बॅड टच बद्दल माहिती देण्यासाठी ४ वर्षे सुयोग्य वय आहे. शाळेत आणि पालकांनी दोघांनीही सहजपणे माहिती द्यावी.

जाणकारांच्या अभिप्रायाच्या / अधिक चर्चेच्या प्रतीक्षेत.

अनिंद्य

भन्नाट भास्कर's picture

25 Apr 2018 - 12:13 pm | भन्नाट भास्कर

धन्यवाद, एखाद्या संकेतस्थळावर एखादा धागा प्रकाशित करायची पहिलीच वेळ. तसेच गरजेचे वाटल्याने. मी देखील जाणकारांच्या अभिप्रायाच्या / अधिक चर्चेच्या प्रतीक्षेत.

मानसी१'s picture

25 Apr 2018 - 12:15 pm | मानसी१

माझ्या २ वर्ष्या च्या मुलीला तीच्या लाडक्या आजीशी लग्न करायच आहे. घरी लवकरच दीराच लग्न आहे. तेव्हा तीने विचारले होते की काका लग्न का करतोय. मी सान्गितल की त्याला काकु आवडते म्हणुन लग्न करतोय. त्यावर तीने लगेच डिक्लेयर केला " मी आजी सोबत लग्न करणार. :) :)

‘कसं सांगू’ या नावाचंच एक पुस्तक अाठवलं, तसेच थोड्या मोठ्या वयासाठी मुलांनी वाचण्याचीच रेड बुक, ग्रीन बुक अशी पुस्तकंही अाहेत. माझ्या मुलाच्या मराठी माध्यमाच्या शाळेत बहुधा सहावीपासून लैंगिक शिक्षणाचे काही तास होतात. मुले व मुली वेगवेगळे तास.
एक मात्र जाणवले, ते असे की अापल्याला अापल्या मुलाला किती समजते असे वाटते, त्यापेक्षा त्यांना नक्कीच जास्त समजत असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2018 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?

याबाबतीत हा व्हिडिओ उपयोगी सुरुवात होऊ शकेल...

युट्यूबवर अजून खूप आहेत. ते पाहून योग्य वाटेल ते व्हिडिओ मुलांना दाखवणे ही उपयोगी सुरुवात होऊ शकेल.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2018 - 2:57 pm | पिलीयन रायडर

जे जसं समोर येईल तसं त्याला उत्तर द्यावं. माझ्या मुलाने मला जे जे प्रश्न विचारले ते भले त्याच्या वयाच्या मानाने मला फार लवकर आले असं वाटलं तरी मी त्याची खरी उत्तरं दिली. अर्थात जरा टोन डाऊन करून. मुलांना स्त्री आणि पुरुषाच्या शरीरातला फरक कळतो, लग्न - प्रेम ह्या संकल्पना सुद्धा नीट कळतात, बाळ कुठून येतं वगैरे प्रश्न पडतात. आपण फारसा बाऊ न करता खरं बोलायचं. केज्युअली सांगायचं म्हणजे मुलं प्रश्न विचारायला घाबरत नाहीत.

बाकी आपण कुणासमोर कपडे बदलू नयेत, मुलींना हात लावू नये, मारामारी करू नये (भले मुलींनी मारलं तरी!), आई बाबा आणि डॉकटर शिवाय कुणालाही काही ठिकाणी हात लावू द्यायचा नाही. वगैरे शक्य तितक्या लवकर सांगावं. वय वाढेल तसं त्यात भर घालत अजून महत्वाच्या अवघड गोष्टी सांगता येतात.

आणि नातेवाईक, मित्र वगैरे लोकांना अगदी ठामपणे मुलीला हात लावू नका म्हणून सांगायच. कवटाळणे, पप्प्या घेणे, मांडीवर बसवणे हे फक्त अत्यन्त लिमिटेड लोक करू शकतात. त्यामुळे भीड न बाळगता आपणही हे बोलावे, मुलं आपोआप ठाम होतात मग.

माहितगार's picture

25 Apr 2018 - 5:19 pm | माहितगार

मला वाटते गुड टच आणि बॅड टच बद्दल डॉ. सुहास म्हात्रे म्हणतात तशी किमान माहिती द्यावी सोबत पिरा तै म्हणतात तसे मुले पालकांशी मोकळी आणि योग्य भूमिकांवर ठाम होऊ शकतील हेही पहावे.

प्रश्न विचारण्यापासून थांबवू नये आणि जेवढे प्रश्न येतील त्यांची खरी (अर्थात वैज्ञानिक दृष्टीने ) प्रश्नापुरतीच माह्ती द्यावी. आपल्याला जास्त माहित आहे म्हणून जास्तही सांगत बसू नये असे वाचले आहे . अर्थात ह्या मुद्द्यास मानसशास्त्रातील जाणकाराम्च्या दुजोर्‍याची गरज असावी.

खाली श्रीगुरुजी प्रमाणे मुलांना कुठूनही माहिती घेऊ द्यात असे एक परंपरागत मत जोखीमीचे असते कारण माहिती पालकांकडुन नाही मिळाली तर मुले कुठून तरी घेतील पण ती सर्वच योग्य आणि योग्य मुल्यांसोबत मिळेल याची खात्री नसते . त्यामुळे पालक आणि डॉक्टर हे माहितीचे अधिक चांगले स्रोत असावेत असे वाटते.

मराठी कथालेखक's picture

25 Apr 2018 - 8:18 pm | मराठी कथालेखक

मुलींना हात लावू नये, मारामारी करू नये (भले मुलींनी मारलं तरी!)

मुलीने मुलाला मारलं तर मुलाने का म्हणून मार खावून रहावं ? आरे ला का रे होणारच..आणि व्हायलाही हवं.

आणि नातेवाईक, मित्र वगैरे लोकांना अगदी ठामपणे मुलीला हात लावू नका म्हणून सांगायच. कवटाळणे, पप्प्या घेणे, मांडीवर बसवणे हे फक्त अत्यन्त लिमिटेड लोक करू शकतात.

काही अंशी असहमत.. चांगल्या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्यात स्पर्श असणे नैसर्गिक आणि जिव्हाळा वाढवणारे आहे. आसपास काही वाईट घटना घडत असलेल्या कानी येत असले तरी आपल्या जवळच्या लोकांवर सरसकट अविश्वास दाखवणे आणि मुलांना निस्सीम प्रेमाला पारखे करणे पटत नाही. मी माझ्या एका मित्राच्या आणि बायकोच्या एका मैत्रीणीच्या मैत्रीणीच्या मुलीला जवळ घेतो, मांडीवर बसवतो आणि त्यात कुणाला वावगे वाटत नाही.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2018 - 11:09 pm | पिलीयन रायडर

मुलींनी मारलं तर माझा मुलगा तिच्या आई वडिलांना सांगेल. मुलाने मारलं तरीही तो हेच करतो पण मुलींसाठी माझ्या सूचना ह्या आणि अशाच कायम राहतील. ह्याला फार लॉजिकल कारण नाहीये माझ्याकडे. माझ्या मुलाने मुलीला मारू नये असं मला वाटतं. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं.

दुसरा मुद्दा जिव्हाळ्याचा स्पर्श. अनेक घरांमध्ये अत्यन्त जवळच्या नातेवाईक अथवा मित्र परिवारातून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. माझ्या माहितीत किमान 10 उदाहरणं आहेत. म्हणूनच म्हणलं की "लिमिटेड" लोकांव्यतिरिक्त कुणी असा हात लावू नये. तुम्ही त्या पालकांसाठी लिमिटेड सर्कल मध्ये असाल. सगळेच नसतात.

बेटर सेफ than सॉरी.

भन्नाट भास्कर's picture

27 Apr 2018 - 9:23 am | भन्नाट भास्कर

आणि नातेवाईक, मित्र वगैरे लोकांना अगदी ठामपणे मुलीला हात लावू नका म्हणून सांगायच. कवटाळणे, पप्प्या घेणे, मांडीवर बसवणे हे फक्त अत्यन्त लिमिटेड लोक करू शकतात.
>>>>>
सहमत. मुलांच्या हितासाठी थोडा वाईटपणा आला तरी चालवून घ्यावा. पण नम्रपणे नकार द्यावा.

मराठी कथालेखक's picture

2 May 2018 - 6:58 pm | मराठी कथालेखक

मुलांच्या हितासाठी थोडा वाईटपणा आला तरी चालवून घ्यावा

याची दुसरी बाजू पण विचारात घ्यावी . जर मुलांना असे अगदी कटाक्षाने इतर मित्र / नातेवाईकांपासून दूर ठेवले तर ते मित्र/नातेवाईक दुखावतील ..तुम्ही म्हणाल "दुखावू देत"..ठिक आहे..पण मग मुलांना त्यांचा स्नेह /जिव्हाळा लाभणार नाही , झालेच तर अडीअडचणीच्या वेळी - खासकरुन मुलांच्या बाबतीत काही मदत हवी असताना असे दुखावले गेलेले मित्र/ नातेवाईक मदतीला येतील का याचाही विचार करा... कधी अगदी गरज असतानाही मग कुणी तुमच्या मुलांना तासभर देखील सांभाळणार नाही..

भन्नाट भास्कर's picture

3 May 2018 - 1:12 pm | भन्नाट भास्कर

हमम, ईथे नातेवाईकांचे आणि समाजाचे प्रबोधन करायचेही गरज आहे तर ..

बाकी सारेच नातेवाईक एकाच सर्कलमध्ये येत नाही. काही जवळचे काही लांबचे तर काही त्या अध्येमध्ये असतात. कुठल्या सर्कल मधील नातेवाईकांना मुलांच्या किती जवळ येऊ द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 3:11 pm | श्रीगुरुजी

तुम्हाला स्वतःला लैंगिक बाबी कश्या, किती, कधी आणि कोणी समजावल्या? तीच पद्धत तुमच्या मुलांसाठीही वापरा. समजा नाही समजावल्या तरी हरकत नाही. मुले ते स्वतःच शिकून घेतील.

माहितगार's picture

25 Apr 2018 - 5:01 pm | माहितगार

मुलांना कसे सांगायचे ते पिराताईंनी सांगितले . पण गुरुजींप्रमाणे विचार असलेल्यांना नेमके काय आणि कसे सांगायचे हा ही प्रश्न आहेच . ह. घ्या गुरुजी :)

ते अधिक धोकादायक/त्रासाचं ठरू शकेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Apr 2018 - 3:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

महत्वाचा विषय आहे खरा.

मुले दिस्कव्हरी नॅट जिओ वर वगैरे बर्‍याच गोष्टी बघत असतात आणि त्यांना प्रश्नही पडत असतात बाळ कसे होते, कुठुन येते, वगैरे तर कॉमनच पण प्लॅसंटा, हर्मोन वगैरेही माहीती असते. काही उदाहरणे

आमच्या शेजारच्या ५ वर्षाच्या मुलीने आईला विचरले "रिलेशनशिपमध्ये आहेत म्हणजे काय?" त्यांच्याकडे क्लासला येणार्‍या आठवीतल्या मुली बोलत होत्या.

त्याच क्लासमध्ये एका ८ वर्ष वयाच्या मुलाने हार्मोनल चेंजेस होतात म्हणुन एक मुलगी जाडी झाल्याचे सांगितले.
तर वरती पिरातै म्हणाल्या तसे टोन डाउन करुन एक एक सांगत जावे असे वाटते.

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 3:50 pm | कपिलमुनी

>>>नाही समजावल्या तरी हरकत नाही. मुले ते स्वतःच शिकून घेतील.
ही पद्धत सध्या उपयोगाची नाही . काळ बदल्ला आहे. आणि पुर्वीच्या पद्धती मध्ये अशास्त्रीय माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते .

त्यामुळे मुलांशी लहानपणापासून मोकळेपणाने बोलणे महत्वाचे आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Apr 2018 - 8:24 pm | श्रीगुरुजी

मागील शेकडो पिढ्यांनी अधिकृत लैंगिक अभ्यासक्रम शिकल्याचा दाखला नाही व त्यांना अशास्त्रीय माहिती मिळाल्याचाही दाखला नाही. त्यामुळे लैंगिक शिक्शणाचा फार बाऊ करू नये. लैंगिक शिक्शण मुलांना द्यावेसे वाटत असेल तर जरूर द्या. पण द्यायला जमले नाही तरी फार बाऊ करू नका. आपल्याला कोणी माहिती दिली व त्याचा काही तोटा झाला का हा सुद्धा विचार करा.

प्रत्येक गोष्ट स्वत:च्या मर्यादित अनुभवात तोलू नये. आपल्या वेळी एकूणच माध्यमांमध्ये दिसणारं सेक्स चं प्रमाण आणि आजच्या मुलांच्या नजरेला पडणारं सेक्स चं प्रमाण यात बरच अंतर आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2018 - 6:32 pm | टवाळ कार्टा

मागील शेकडो पिढ्यांनी कधी शिक्षण घेतले नव्हते तरी तुम्ही शाळा कॉलेजात शिकलातच ना....शिकून किती फरक पडला याबाबत मी काही बोलू इच्छित नाही =))

कपिलमुनी's picture

26 Apr 2018 - 6:56 pm | कपिलमुनी

>>>शिकून किती फरक पडला याबाबत मी काही बोलू इच्छित नाही>>LLRC

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2018 - 8:05 pm | श्रीगुरुजी

पुस्तकी शिक्षण आणि लैंगिक शिक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मागील पिढ्यात किंवा अगदी आताच्या पिढीत सुद्धा सर्वजण शिकलेले नाहीत. परंतु त्याचा लैंगिक संबंधात कोठेही अडसर आल्याचा इतिहास नाही. मागील पिढ्यांनी अधिकृत लैंगिक शिक्षण न घेतल्याने त्यांची काही अडचण झाली किंवा त्यातून काही चुकीच्या लैंगिक गोष्टी होत होत्या असाही इतिहास नाही. तरीसुद्धा ज्यांना आपल्या मुलांना लैंगिक शिक्षणाच्या एखाद्या सर्टिफिकेट/क्रॅश कोर्स/डिप्लोमा/डिग्री/पोस्टडिग्री अशा कोर्सला घालण्याची तीव्र इच्छा असल्यास जरूर घालावे. तसा कोर्स उपलब्ध नसला तरी फार काळजी करू नये.

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2018 - 2:27 am | टवाळ कार्टा

त्याच हिशोबाने आधीच्या लाखो पिढ्या न शिकता कंदमुळे खाऊन सुखाने जगत होतीच की....कशाला शिकायचे

श्रीगुरुजी's picture

27 Apr 2018 - 8:45 am | श्रीगुरुजी

कामप्रेरणेप्रमाणेच अन्नसेवन ही नैसर्गिक प्रेरणा आहे. काही मिनिटांपूर्वी जन्म झालेले अपत्यसुद्धा कोणत्याही प्रशिक्शणाशिवाय याच प्रेरणेने दूध पिऊ लागते. अर्थात एखाद्या पालकांना त्यासाठी आपल्या अपत्याला एखाद्या ट्रेनिंग क्लासला पाठवायचे असल्यास जरूर पाठवावे. परंतु असा क्लास उपलब्ध नसल्यास किंवा क्लासच्या सर्व जागा भरल्याने प्रवेश मिळत नसल्यास फार चिंता करू नये.

भन्नाट भास्कर's picture

27 Apr 2018 - 9:19 am | भन्नाट भास्कर

कामप्रेरणा निर्माण होण्याआधी कोणी अज्ञानाचा गैरफायदा घेऊ नये याची चिंता आहे.

मराठी कथालेखक's picture

2 May 2018 - 6:50 pm | मराठी कथालेखक

अगदी औपचारिक लैंगिक शिक्षण मुद्दाम घ्यायलाच हवे माझेही मत नाही.
मुख्यतः लैंगिक विनोदांमधून योग्य त्या वयात हे ज्ञान हळू हळू मुलांपर्यंत पोहोचते. नको असलेले गर्भारपण टाळण्यापुरते ज्ञान असले तरी पुरे..
पण कुणा मुलाला / युवक/युवतीला काही लैंगिक समस्या असतील तर त्याने/तिने तज्ञ डॉक्टरकडे जावून योग्य ते ज्ञान घ्यावे.

लई भारी's picture

25 Apr 2018 - 3:59 pm | लई भारी

चांगली आणि गरजेची चर्चा आहे!

>>>>खरे तर ईथे प्रश्नही काय विचारावेत हा देखील माझ्यासाठी प्रश्नच आहे.
अगदी अशीच अवस्था आहे :)

@स्वधर्म: तुम्ही म्हणताय ते पुस्तक "काय सांगू ? कसं सांगू ? " हे आहे का? सध्या बुकगंगा वर उपलब्ध नाही आहे.

स्वधर्म's picture

25 Apr 2018 - 4:59 pm | स्वधर्म

.

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 4:23 pm | श्वेता२४

माझ्या बहीणीच्या मुलाच्या इंटरनॅशनल शाळेत एका मुलीने (ज्यु.केजी) तीच्या वर्गातल्या मुलाशी लग्न करणार म्हणून हातात हात घालून बसली. क्लासटीचरला तीने स्पष्ट सांगितलं की मी याच्याशी लग्न करणार आहे आणि याच्यासोबतच बसणार. वर्गशिक्षिकेने हतबल होऊन ही बाब मुख्याध्यापिकेच्या कानावर घातली. मुख्याध्यापिकेने वर्गात येऊन सगळ्यांना सांगितले की कुणीही कुणाचा पापा घ्यायचा नाही, कुणीही कुणाचा हात हातात घ्यायचा नाही, कुणीही कुणाशी लग्न करण्याचे ठरवायचे नाही नाहीतर मा तुमची तुमच्या पालकांकडे तक्रार करेन आणि तुम्हाला शिक्षा करेन. यावर ती मुलगी उठून आपल्या जागेवर बसली म्हणे. पण खरंच पोलिस, शिक्षा देईन असे धाक दाखवून मुलांच्या मनात अशाप्रकारे जरब बसविणे योग्य होईल का याबाबत मिपाकरांचे काय अनुभव आहेत

माहितगार's picture

25 Apr 2018 - 5:23 pm | माहितगार

मला वाटते प्रायमरी पर्यंतची मुले ( _वय दहा पेक्षा लहान ) आपापसात लग्न लग्न खेळतात ते भातुकलीचे काल्पनिक खेळ असतात . त्यात मोठ्यांप्रमाणे अधिक अर्थ काढण्यात पॉईंट नसतो. त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे . उपरोक्त शाळेतील उदाहरणात शाळेतील शिक्षिका ओव्हर रिअ‍ॅक्ट करत आहेत असे वाटते . चुभूदेघे.

भन्नाट भास्कर's picture

27 Apr 2018 - 9:30 am | भन्नाट भास्कर

हल्ली मुलांच्या लैंगिक शोषण आणि सुरक्षिततेबाबत शाळा बरेच जागरूक असतात, या बाबत त्यांना आपली ईमेज जपायची असते. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार घडू नये याची एक्स्ट्रा काळजी घेतली जाते. त्यामुळे त्यांचा उपाय योग्य असो वा अयोग्य वा आणखी चांगल्या पद्धतीने समजावता आले असतेही, पण ईंटेंशन हे होते.

खटपट्या's picture

30 Apr 2018 - 7:02 pm | खटपट्या

उसगावात तर शाळेच्या बाहेर ''नो कीसींग अँड हगींग'' अशी पाटी लावलेली असते :)

कपिलमुनी's picture

25 Apr 2018 - 4:56 pm | कपिलमुनी

लग्न या शब्दाची आपली व्याख्या आणि मुलांचि व्याख्या वेगळी असते.
आपल्या आजूबाजूला जे दिसेल , घरी जी चर्चा होते , टीव्ही वर जे दिसते त्यावर मुलांचे विश्व तयार होते.कार्टून मध्ये सुद्धा जर कपल्स दाखवत असतील तर त्या चाही परीणाम होइल
ते घरी फक्त लग्नामुळे एकत्र रहात असलेले आइ बाबा बघत असतील तर त्यांना तेच एक नाते महिती होनार.

भाउ , बहीन , कझिन , आजी अजोबा , आत्या काका मामा मवशी अशी नाती माहिती असतील तर ते आपल्या सवंगड्याला त्या नजरेतून बघतील .

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2018 - 5:56 pm | पिलीयन रायडर

आणि हो, माझाही मुलगा त्याच्या लग्नाबद्दल भरपूर बोलतो. फक्त कुणाशी हे फिक्स नाही केलं अजून. पण आपल्या आई वडिलांना बघून मुलांना लग्न ह्या गोष्टीचं आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे. जसं मोठं होऊन त्यांना आई बाबांसारखं ऑफिसला जायचं असतं, तसंच लग्नही करायचं असतं. माझा मुलगा तर त्याच्या मुलांबद्दल सुद्धा बोलतो!

आपण जे जे करतोय ते ते त्यांना करायचं आहे, बाकी काही नाही!

आनन्दा's picture

25 Apr 2018 - 6:05 pm | आनन्दा

अगदी सौ टके की बात.
फक्त मध्यंतरी 4 वर्षाच्या मुलाने बलात्कार / विनयभंग केला म्हणून बातमी वाचली होती त्याच गूढ उकलले नाही अजून.

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2018 - 6:33 pm | पिलीयन रायडर

हो, ज्या अर्थी त्या मुलाने असं केलंय म्हणजे त्याने ते पाहिलंय. इतक्या लहान मुलाला कुतूहल असेल पण असं विचित्र वागावं इतकं डोकं नक्कीच नसेल. मोबाईलवर खूप खेळतात मुलं आजकाल. कदाचित चुकून काही पाहण्यात आलं असेल.

खरं तर संपूर्ण सत्य काय हे कळणं अवघड आहे आजकाल. त्या मुलीच्या आईचं पत्र वाचलं होतं मी. ते सगळं खरं असेल तर फार चिंताजनक आहे हे सगळं.

अशी चर्चा अर्धवट माहितीवर अर्धवट मार्गदर्शनाखाली दुरल्क्षीत होणे प्रशस्त वाटत नाही. मानस-वैद्यक क्षेत्रातील जाणकारांच्या मार्गदर्शनची गरज प्रथमदर्शनी दिसते. लोकमत वृत्तात कथित बातमी मराठीतून या दुव्यावर दिसते . चिल्ड्रेन कमिशन ने दखल घेतल्याची बातमी येथे आहे . लहान मुलांच्या रिलेटेड केस असल्यामुळे पुढील बातमी आली नसेल तर समजण्यासारखे आहे.

टाईम्सस्पिकीन्ग ट्री वृत्तात म्हटल्याप्रमाणे केस बहुधा अजाण वयातील अनुकरणशीलतेतून घडली असावी. किंवा लहान मुलीच्या सांगण्यात गोंधळ झाला . शाळेतील मुलांचे पालक किंवा शाळा किंवा दोन्हीच्या पातळीवर कुठेतरी नीग्लिजन्स राहीला असण्याची दाट शक्यता वाटते

अजाण टॉडलर वयात त्यांचे आपापसातील समवयीन औत्सुक्य आणि अनुकरण शीलतेतून अ‍ॅप्रोचेस प्रसंग काही अपवादात्मक प्रमाणात झाले तरी वयाच्या सहाव्या वर्षानंतर सहसा विस्मरणात जात असावेत . आणि त्या वयकडे पाहून त्यांच्या पालक आणि शाळेस विश्वासात घेऊन समुपदेशनाची गरज असावी. एखादा मुलग्या फारच व्रात्य असल्यास मुलांच्या शालेत शीफ्ट करता यावे . अर्थात टॉडलर आपापसातल्या पुरेशी दक्षता घेतल्यस केसेस इजेच्या पातळीपर्यंत जाण्याची शक्यता सहसा अपवादात्मक असावी असे वाटते . मानस / वैद्यक त्यांचे मत प्रदर्शीत करतीलच असे वाटते.

भन्नाट भास्कर's picture

27 Apr 2018 - 9:34 am | भन्नाट भास्कर

४ वर्षाच्या मुलाला त्या फिलिंग्सच येणार नाहीत. हे काहीतरी बघितलेले कॉपी करायचा प्रयत्न असावा. अश्यात तो मुलगा स्वतःलाही कधी ईजा पोहोचवू शकतो. खरेच याचीही काळजी घ्यायला हवी.

स्मिता.'s picture

25 Apr 2018 - 6:28 pm | स्मिता.

बहुतांश लहान मुलांना आपल्या आई-वडिलांसारखं सगळं करायची इच्छा असते. त्यामुळे ते लग्नासारख्या विषयावर बोलतात. माझ्या मोठ्या बालवाडीतल्या मुलाला स्वयंपाक करणे, भांडी घासणे, घर साफ करणे ही कामं कराविशी वाटतात, कारण तो मला ही कामं करतांना बघतो.

मागे एकदा मला म्हणे की मी मोठा झालो की तूच माझी बायको हो. मी म्हणाले की मी तुझी आई आहे, कोणीतरी दुसरी तुझी बायको बनेल. त्यावर चिरंजीव म्हणाले की ती 'दुसरी कोणीतरी' मला ओळखत नसेल, तू मला नीट ओळखतेस म्हणून तूच माझी बायको बनायचं! :)

प्रसाद गोडबोले's picture

25 Apr 2018 - 8:56 pm | प्रसाद गोडबोले

मुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात?

कधी सांगाव्यात हा अवघड प्रश्न आहे असे वाटते पण कश्या आणि किती हे बर्‍यापैकी सेप्पे आहे. ह्या विषयावरील म्हाग्रुंची वेबसीरीज अतिषय उत्तम होती >

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Apr 2018 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

भन्नाट भास्कर's picture

27 Apr 2018 - 9:36 am | भन्नाट भास्कर

मस्त आहे ही वेबसिरीज. मागे पाहिलेली. आवडलेली. ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा बघायलाही उत्तम आहे.

सुखीमाणूस's picture

25 Apr 2018 - 10:57 pm | सुखीमाणूस

आपले आई व बाबा लग्न ठरण्यापुर्वी एकमेकाना अनोळखी होते हे मान्यच नव्हते. तो साधारण 6 वर्षाचा असताना त्याला वाटायचे की त्याची धाकटी 2 वर्षाची बहिण मोठेपणी त्याची बायको असणार. मात्र त्याच्याशी बोलल्यावर त्याची समजूत पटली.

मुलगा असो की मुलगी साधारण वयाच्या नवव्या वर्षी त्याना स्त्रियांच्या मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती द्यावी.

तसेच साधारण सातवीत शास्त्र विषयात मुलांना लैंगिक पुनरुत्पादन हा विषय सुरू होतो व दहावीत अगदी कुटुंब नियोजन देखील शिकवले जाते. हे धडे मुलांबरोबर घरी जरूर अभ्यासावे. मोकळ्या चर्चेने मुलांना फायदा होतो.

माझ्याकडे शिकवणी साठी येणार्‍या सातवीतल्या मुलीचे अभ्यासतले लक्श उडाले होते. तिच्याशी बोलल्यावर तिने सांगितले की तिच्या डोक्यात सतत पुनरुत्पादन हे धडे आणि त्यावरुन अजून काही विचार येतात व अभ्यासात लक्ष लागत नाहीये. हे सगळे तिच्या आईला सांगायला ती खूप घाबरत होती.
तिच्या आईशी बोलून प्रश्न सोडवता आला कारण आई समजूतदार होती.

प्रत्येक मूल निराळे असते. तेव्हा मुलाची गरज ओळखून माहिती पुरवावी.

आमच्या दोन्ही मुलांना आम्ही मनासारखे मजेत जगा असे सांगताना, आपली मजा ही दुसर्‍याची सजा होता कामा नये हे देखील शिकवले आहे.

स्वधर्म's picture

26 Apr 2018 - 7:16 pm | स्वधर्म

अामच्या घरी मोठी मुलगी अाहे अन् दोन वर्षांनी लहान मुलगा. त्यांच्या शाळेत वयाप्रमाणे या विषयाची अोळख तर करून दिलीच अाहे, पण ‘वागायचं कसं?’ हे त्यांना एकमेकांच्या केवळ घरात असण्यानं बरंच शिकायला मिळालंय असं वाटतं. भावंड जर विरूध्द लिंगी असेल तर अापोअापच मुलींना मारू नये, अाणि का, याचं उत्तर मुलांना मिळतं. त्यांच्या वाढीच्या अवस्था समजून येतात. घरात मोकळं वातावरण असलं, तर हे शिक्षण सहजपणे होतं.
मोकळं वातावरण: एका पालकांसाठीच्या तासाला एक सांगितलेली टीप: बरेच अाईवडील मुलांसमोर अगदी कटाक्षाने एकमेकांना स्पर्श करणे, जवळ बसणे वगैरे टाळतात. तर असे मुद्दाम करू नये, असे सांगितले होते. अर्थात अतिसलगी देणेही टाळले पाहिजे.

अर्धवटराव's picture

27 Apr 2018 - 9:24 am | अर्धवटराव

आमच्या चिरंजीवांचा मौलीक प्रश्न... मुलींना जर मुलांसारखं ** नसतो तर त्या पी पी कसं करतात ??? पू पू च्या उदाहरणावरुन मग त्यांचं शंका समाधान केलं. आमचा एक स्पेशल बेड टाईम असतो. झोपायच्या अगोदर दिवे वगैरे मालवुन चिरंजीवांच्या बेडमधे आमचा एक संवाद प्रोग्राम चालतो. शाळेतल्या गमती, अभ्यासातले प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप... अनेक विषयावर मुक्तचिंतन होतं. आपले मायबाप आपलं ऐकतात, प्रश्न सिरीयसली समजावुन घेतात, आणि खात्रीने आपल्या मदतीला येतात हे चिरंजीवांना मनापासुन पटलय. काहि गोष्टींचा उलगडा थोडं आणखी मोठं झाल्यावरच होईल हे सुद्धा त्याला कळलय. त्यामुळे त्याला कळेल तेव्हढं लैंगीक ज्ञान विनासायस देता आलं.