द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ५

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
23 Apr 2018 - 12:18 pm

पूर्वसूत्र : खालची सही थोडी स्टायलिश असली तरी नाव सहज वाचता येत होते.‘बापरे, १८५८ च्या जून महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाली होती !’ मी थक्क झालो.‘हो. ...आणि १ नोव्हेंबर १८५८ ला हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटची, राणी व्हिक्टोरियाची सत्ता स्थापित झाली !’ प्रद्युम्न शांतपणे म्हणाला.
भाग – ५
‘त्या कागदाची मी कार्बन डेटिंग टेस्ट करवली. अन्या, तो कागद दीडशे वर्षांपेक्षा जास्त जुना होता ! आणि शाईसुद्धा त्याच काळी बनवत तशी होती. पण ती अगदी कालच लिहिल्याइतकी फ्रेश होती ! ज्याच्या कडून मी तो तपासून घेतला, त्याचे म्हणणे होते की कुणीतरी त्या काळातल्यासारखी शाई बनवून त्या अँटिक पीसवर लिहून माझी मस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे !! तो कागद मात्र मी कुठून मिळवला हे त्याने अगदी खोदून खोदून विचारले. अर्थात मी काहीच सांगितले नाही. जेम्स अँडरसन नावाचा सैनिक खरोखरच ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात होता का आणि तो १८५८ मध्ये इंग्लंडला परतला का याची शहानिशा करण्याचा मी प्रयत्न केला. मुंबई डॉकच्या जुन्या रजिस्टर्सच्या नोंदी, ज्या आता स्कॅन करून आर्काईव्हज मध्ये टाकलेल्या आहेत त्यात अशी एक नोंद आढळली की १८५८ च्या डिसेंबरमध्ये ‘जॉर्जियाना’ या नावाचे ईस्ट इंडिया कंपनीचे एक प्रवासी कम मालवाहू जहाज मुंबई डॉकमधून लंडनला गेले होते आणि त्यात ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मोठा भरणा होता. तिथल्या एका रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याकडून माहिती मिळाली की यासंबंधीचे काही जुने कागदपत्र आता मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये आहेत. थोडी खटपट करताच मला मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या आर्काईव्हजमध्ये ‘जॉर्जियाना’ वरच्या प्रवाशांची नावे मिळू शकली. वेल, आय कुड गेट इट जस्ट बिकॉज ऑफ एकस्लंट डिसिप्लीन ऑफ इंग्लिशमेन, ऑफ कीपिंग ऑल रेकॉर्ड्स फाईन ! .. त्या यादीत एक नाव होते, जेम्स अँडरसन, वय ३५, रा. वेल्शपूल, इंग्लंड ! ’‘फँटॅस्टिक !’ मी नकळत एक शीळ घातली.‘अर्थात, हा जेम्स खरोखरच ग्वाल्हेरच्या लढाईत लढला होता काय, याबद्दल काही माहिती मिळू शकली नाही !’
‘हम्म.. . आणि त्या कॅमेर्‍याचे काय झाले ?’‘वेल, आठ तासांनी माझ्या कन्व्हर्टरने आपले काम चोख केले. मी ड्रॉवर उघडला तेव्हा त्यात कॅमेरा आहे का , आणि तो चालू आहे का हे तपासले. सुदैवाने तो सुस्थितीत होता. मी त्यातले चित्रण पाहिले. ...त्याचा पहिल्या सहा तासांचा भाग ब्लँक होता, पूर्ण कोरा. त्यानंतरच्या भागात ड्रॉवर उघडला गेला आणि एक गोरा हात आत आला. शर्टाच्या पांढऱ्या अस्तन्यांचा काही भाग फक्त दिसत होता. त्याने हा कागद आत टाकला आणि ड्रॉवर पुन्हा बंद केला. बस्स ! एवढेच दिसले त्यात. त्यानंतरचा दोनेक तासांचा भाग पुन्हा कोरा. ’‘ओह, अमेझिंग !’ मला काय बोलावे सुचेना.‘वेल, तो कॅमेरा मी ड्रॉवरच्या दर्शनी भागात ठेवला असता तर कदाचित तो कुणीतरी उचलून घेतला असता आणि त्या काळातील चित्रण शुअरली मिळाले असते. ती शक्यता माझ्या आधीच लक्षात आली होती. पण घेणाऱ्या व्यक्तीने तो कुठे दूर नेला असता तर आठ तासानंतर तो टाईम पॉकेट पासून खूप दूर गेला असता. असे झाले तर तो मला परत मिळण्याचे चान्सेस कमी होते. माझा कन्व्हर्टर त्या ठराविक लोकेशनशी ट्यून केलेला होता. त्यापासून रिसिव्हर फार दूर गेला तर कन्व्हर्टरने पाठवलेली रेझोनेटिंग पल्स तो पिकअप करू शकला नसता.त्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही. आफ्टरऑल, ही माझ्या कन्व्हर्टरची पहिलीच ट्रायल होती आणि त्यात एकुलता एक ऑब्झर्व्हर मला गमवायचा नव्हता !’ ‘हम्म.. मग पुढे ?’‘माझा प्रयोग यशस्वी झाला हे मला समजलं, तरी मी ते इतक्यातच सिद्ध करू शकत नाही. कारण ती क्लिप इतकी त्रोटक आहे की त्यातून पुरावा अ‍ॅज सच काहीच शाबित करता येत नाही. शिवाय ते टाईम पॉकेटही मी म्हटले होते त्याप्रमाणे आता निकामी झाले आहे.’‘ओह ! ...मग आता ?’‘मग काय ? मी तशाच एखाद्या नवीन , म्हणजे खूप जुन्या पण मोठ्या पॉकेटचा शोध सुरु केला. त्यात तुझे मोलाचे सहाय्य मिळाले आणि आता असा टाईम पॉकेट आपल्याला मिळाला आहे !अनिकेत, तुझा फोन झाल्यानंतर मी काय केलं माहिती आहे ? एक आठवड्यात मी स्वत:ला आवश्यक ते सर्व वॅक्सिनेशन करून घेतलं. टाईम पल्स डिटेक्टर आणखी जरा अपडेट करून फाईन सेटिंग करून घेतले. कन्व्हर्टरची रेंज आणि कपॅसिटी वाढवून त्याची नेक्स्ट जनरेशन तयार केली. आणि मुख्य म्हणजे ‘तिकडे’ जाण्यासाठी त्या काळातील प्रथांचा अभ्यास आणि माझी तयारी केली. अर्थात जवळजवळ सर्व खबरदाऱ्या मी शक्य तितक्या प्रमाणात घेतल्या आहेत !’‘ते आलंच माझ्या लक्षात.’ मी एक सुस्कारा टाकला. खरं म्हणजे माझ्या इतकंच लक्षात आलं होतं की प्रद्युम्न जिथे जायला निघाला आहे, तिथून तो परत येणं हा एक चमत्कारच ठरेल.विज्ञानाने आतापर्यंत अनेक चमत्कार केले आहेत, त्यामुळे आणि केवळ त्यामुळेच त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे भाग होते. दुसरे काय करू शकत होतो मी ?‘हं. तर तू सगळं काही तयार ठेवलं आहेस ! अं, ...हे मशीन तू कसे चालवणार आहेस ?’ मी आता हे अ‍ॅक्सेप्ट केले की प्रद्युम्न जाणारच आहे.‘खरं तर हे मशीन किंवा हा कन्व्हर्टर तूच चालवणार आहेस !’ प्रद्युम्न हसून म्हणाला.‘काय ...???’ मी जवळजवळ ओरडलोच.दोन मिनिटे आम्ही एकमेकांकडे बघत होतो. मी साशंकपणे तर तो निश्चिंतपणे, काहीसा खोडकरपणे, मिस्कील हसत. ...मी खांदे उडवले. ‘ओके, मला काय करावं लागेल ?’प्रद्युम्नने त्याच्या शर्टाची बाही जरा वर केली. त्याबरोबर मला त्याच्या अस्तनीच्या आतल्या बाजूस दंडाला खालून सेलोटेपने चिकटवलेली ती छोटीशी चिप दिसली.‘हा रिसिव्हर त्या कन्व्हर्टर मधून नियंत्रित केला जातो. रिमोट कंट्रोल. त्या पल्सेसद्वारे माझा कन्व्हर्टरशी सतत संपर्क राहील. पण मी परत येईपर्यंत त्याची बॅटरी चार्ज करत राहणे हे काम तुला करावे लागेल. तशी तर ही बॅटरी तीन दिवस चार्ज्ड राहते. पण न जाणो काही कारणाने डिस्चार्ज झाली तर ? तिच्यावर कुणीतरी सतत नजर ठेवली पाहिजे. ..मी कन्व्हर्टरवर दोन तासांचा कालावधी सेट करणार आहे. संध्याकाळी आपण त्या भुलीच्या कोठीत प्रवेश करणार आहोत. तिथे गेल्यानंतर मी जेव्हा टाईम पॉकेटमध्ये प्रवेश करेन त्याचवेळी तू हा लाल नॉब ऑन करायचा आहेस. त्यानंतर दोन तास होईपर्यंत तिथेच थांबायचे आहेस. या वेळेत मी तिथेच परत येईन !..पण समजा काही अनएक्स्पेक्टेड अडचणी आल्या आणि मी परत आलोच नाही, तर तू हा कन्व्हर्टर घेऊन सरळ घरी यायचे. याच रूममध्ये तो ठेवायचा, हा करडा नॉब नव्वद अंशात फिरवायचा आणि झोपून टाकायचे. समजले ? ’मी हैराण झालो. ‘अरे पण तू आलाच नाहीस तर, कसं होईल ? हे मशीन बरोबर काम करतंय ना ?’‘हो रे, पण इथल्या काळाची घनता आणि तिथली घनता यात एक सेकंद जरी फरक असला तरी तो वाढत जाऊन तिकडे किती पट होईल हे सांगता येत नाही. तो पूर्ववत होताना इथल्या काळाची सापेक्ष गती अ‍ॅफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी परत येणार हे नक्की ! फक्त काही तास मागेपुढे होण्याची शक्यता आहे...पण तू टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त हा करडा नॉब जर व्यवस्थित सेट केलास की तो दर अर्ध्या तासाने रेझोनेटिंग पल्सेस पाठवत राहील आणि मला इथे खेचून आणेल. ...सगळे काही ठीक होणार आहे अँड आय प्रॉमिस यू अन्या, उद्या सकाळी आपण इथेच नाष्टा घेत असू !’ ‘पण काय रे ? मी हे मशीन इकडे आणल्यावर तू त्याच्या रेंजमध्ये कसा राहशील ?’प्रद्युम्न मोठ्याने हसला. ‘त्याची काळजी नको करू. कन्व्हर्टरच्या पल्सची रेंज ‘इकडे’ काही किलोमीटर्स पर्यंत जाऊ शकते. ‘तिकडे’ मात्र तसे काही करता येत नाही कारण ते सेटिंग आणि रिलीव्हंट पल्स ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी तिकडच्या अवकाशाचे आवश्यक ते पॅरामीटर्स मला सध्या इथे उपलब्ध नाहीत.’‘ओके, मग ठीक.’ माझी काळजी जरी कमी झाली नसली तरी काहीसा धीर आला.बरोबर साडेपाच वाजता आम्ही पद्याच्या जिप्सीतून बाहेर पडलो तेव्हा पद्याच्या अंगावर नेहमीचा जीन्स टीशर्ट नसून एक ढगळ बिनकॉलरचा सदरा आणि मळकट पायजमा असा पोशाख होता. डोक्याला गुंडाळण्यासाठी एक स्कार्फ त्याने खांद्यावर टाकला होता.‘त्या काळात मी तिथलाच म्हणून खपून जायला नको का ?’ त्याचे डोळे मिचकावून दिलेले स्पष्टीकरण !जाताना गावातल्या रस्त्याने न जाता थोडा वळसा घेऊन जरा लांबच्या रस्त्याने जाण्याची आम्ही खबरदारी घेतली...भुलीच्या माळापाशी आम्ही पोचलो तेव्हा साडेसहा वाजून काही मिनिटे झाली होती. अंधुक दिसणाऱ्या पायवाटेवरून पद्याने जिप्सी आत घातली. समोर पाचसातशे मीटर्सवर भुलीच्या कोठीची धूसर आकृती वाटेतल्या झाडांच्या मधल्या जाळीतून दिसत होती. दोन मिनिटांचा रस्ता. पण सात आठ मिनिटे झाली तरी आम्ही वाड्यापाशी पोचलो नाही !पद्याने गाडी थांबवली आणि घड्याळ पाहिले. सहा पन्नास . आम्ही एकमेकांकडे पाहिले. मग बाहेर नजर टाकली तर आम्ही माळाच्या पूर्वेकडून निघालो होतो, ते पश्चिमेच्या जंगलाच्या बाजूला आलो होतो. वाटेतच वाडा लागायला हवा होता.
a
‘चकवा !’ मी उद्गारलो.‘ओके,..’प्रद्युम्नने कंपास बाहेर काढला आणि वाड्याची दिशा पाहिली. मग तो व्हीलवर ठेवून पुन्हा गाडी सुरु केली. काही वळणे घेत आता मात्र आम्ही पाच सात मिनिटातच वाड्यापाशी पोचलो. ‘इथला अवकाश किंचित कलला असावा. मे बी, त्या टाईम पॉकेटमुळे !’ प्रद्युम्न विचारमग्न होऊन म्हणाला.त्या खिंडाराच्या तोंडाशी आम्ही उभे राहिलो तेव्हा घड्याळाचा काटा सात वाजून पाच मिनिटे झाल्याचे दाखवत होता. पश्चिमेकडे पसरलेली लाली काळसर होऊ लागली होती. झाडे आपल्या काळ्या काटेरी फांद्या झुलवत आमच्याकडे टवकारून बघत होती. वरती ढगांच्या कडा तेवढ्या चमकत होत्या. त्या संधिप्रकाशात ती उजाड वास्तू मनावर गूढ भयाची पुटे चढवीत होती.पाचेक मिनिटे तिथेच उभा राहून मी आजूबाजूला नजर फिरवली. माळ अर्थातच निर्मनुष्य होता. काल पाहिलेले खिंडार आम्ही शोधून काढले आणि त्याच्यासमोर उभे राहिलो. आत कुट्ट काळोख होता. माझ्या हातातला फ्लॅश लाईट आत गेल्याशिवाय सुरु करायचा नाही, असे पद्याने सांगितले होते. प्रद्युम्नने खिंडाराच्या तोंडाशी उभे राहून एकदा वर सतीच्या वृंदावनाकडे पाहिले. त्याच्या हातात एक लहानसा हातोडा होता. एका खिशात लहानसा टॉर्च होता आणि दुसऱ्या खिशात ते होकायंत्र. त्याच्या पाठीवरच्या, मुद्दाम जुनाट बनवलेल्या सॅकमध्ये तो डिटेक्टर, कन्व्हर्टर, पाण्याची एक बॉटल आणि इतर जुजबी सामान होते. पायाशी पडलेली एक झुडुपाची काठी त्याने हातात घेतली.‘आपल्याला बरोबर त्या वृन्दावनाच्या खाली जायचे आहे, अन्या. ओके ?’ मी पद्याकडे बघून मान हालवली, तसे त्याने वरती असलेल्या दगडी चिऱ्याला हातातल्या हातोड्याने चार पाच ठोके मारले आणि तो किंचित मागे सरकला. . त्यासरशी तो दगड धाडकन खाली पडला. आता तिथे वाकून आत जाता येण्याइतकी वाट तयार झाली. त्यात काहीतरी खसपस झाली आणि दोन तीन उंदीर आणि एक मोठाली घूस बाहेर पडली. पद्याने हातातल्या काठीने दगडांवर आवाज केला आणि आणखी दोन मिनिटे इतर काही बाहेर पडायची वाट पाहिली. मग मुद्दाम पायाचा ठॉक ठॉक आवाज करत तो आत शिरला.‘सावध ! आत गेल्यानंतर लाईट लावून एक मिनिट थांब आणि मग पायाखाली बघून पुढे पाय टाक.’ पद्या म्हणाला.प्रद्युम्न पुढे आणि मी मागे, असे आम्ही त्या खिंडारात घुसलो. दोन पावले गेल्यावर पद्या थांबला. त्याच्यामागे उभा राहून मी फ्लॅश लाईट ऑन केला. आमच्या चारीबाजूला कोळीष्टके होती. समोर एका ओळीत असलेले काही खांब त्या कोळिष्टकांनी गुरफटले होते. काठीने कोळीष्टके दूर केल्यावर आमच्या लक्षात आले की आम्ही एका प्रशस्त ओसरीच्या एका बाजूच्या ओवरीत उभे आहोत. फ्लॅश लाईटच्या उजेडाने आणखी काही सरपटणारे प्राणी इकडे तिकडे पळत अंधारात नाहीसे झाले. हवा गरम आणि कुंद होती. पण हवेत धूळ मात्र नव्हती. सर्व दारे खिडक्या बंद असल्यामुळेच, बहुधा. वरती कुठेतरी आणखी एक दोन खिंडारे असावीत, कारण मधूनच बाहेरच्या ताज्या हवेची झुळूक अनपेक्षितपणे चेहेऱ्यावर सुखद फुंकर घालत होती.एका हातात कंपास धरून दुसऱ्या हातातल्या काठीने जमिनीवर ठक ठक करत पद्या पुढे त्या ओवरीच्या मधून पुढे निघाला. त्याच्या वाटेवर उजेड पडेल अशा बेताने फ्लॅश लाईट हातात धरून मी मागून चालू लागलो. एका बाजूला चिरेबंदी भिंत तर दुसऱ्या बाजूस दोन फुट उंच लाकडी नक्षीदार कठडा होता. आता तो कोळिष्टकांनी वेढला होता. भिंती एकेकाळी गेरूच्या रंगाच्या असाव्यात. आता त्या (आगीच्या धगीने ?) काळ्याठिक्कर पडल्या होत्या. नक्षीदार दगडी खांबांनी वरच्या प्रचंड तुळया तोलून धरल्या होत्या. त्याही काळवंडल्या होत्या. काही अर्धवट जळालेल्या. ....म्हणजे त्या जुन्या चोपडीतल्या कागदांवर लिहिलेल्या गोष्टी खऱ्या होत्या तर !पद्या अचानक मधेच थांबला. आमच्या समोर दगडी भिंत होती. काठी इकडे तिकडे फिरवल्यावर लक्षात आले की रस्ता डावीकडे वळला होता. डावीकडे वळून पन्नासेक पावले चालल्यावर एक चौकोनी फरसबंदी लागली. तिच्या एका बाजूला दगडी पायऱ्या खाली उतरत गेल्या होत्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूला दगडी चौकट होती. एकेकाळी त्यात दरवाजा असावा. आता नुसतेच काळे भगदाड दिसत होते.पद्याने हातातल्या कंपासकडे बघितले आणि मला इशारा केला....आम्हाला त्या काळ्या भगदाडातच जायचे होते !केवळ पद्या बरोबर होता म्हणूनच मी तिथून आत शिरण्याचे धाडस करू शकलो. अन्यथा असले काही आडदांड आणि अतिरेकी साहसी कृत्य माझ्यासारखा एल प्रोफेसर करू शकला असता का शंका आहे ! प्रद्युम्नच्या हालचाली मात्र अगदी सहज आणि सफाईदार होत्या. तो कुठेही थांबत, अडखळत नव्हता. जरी तो आजूबाजूला नजर फिरवत होता, तरी हातातल्या कंपासकडे त्याचे पूर्ण लक्ष होते...आत गेल्यावर मी इकडे तिकडे लाईट फिरवला. ती एक प्रशस्त लांबरुंद खोली होती. बहुधा ते माजघर असावे. त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार खांब होते आणि त्यांच्या मध्ये एक एक दरवाजा. दरवाजे अर्धवट जळलेले दिसत होते. मागे लाईट टाकल्यावर दिसले की आम्ही जिथून आत आलो त्या चौकटीच्या आत एक जाड लाकडी दार मोडून पडलेले होते. तेही अर्धवट जळके होते.आम्ही आत आलो त्या दाराच्या बरोबर समोर एक दार दिसत होते. हे तुलनेने खूपच लहान होते आणि अगदी सुस्थितीत दिसत होते ! त्याच्या वर जळलेल्याच्या खुणा अजिबात नव्हत्या ! बहुधा हे ‘त्या’ आगीच्या नंतर बसवले गेले असावे ! पद्याच्या तोंडातून एक शीळ निघाली. ‘येस्स, हीच ती जागा ! थांब, अन्या. आपण कन्फर्म करू.’कंपास सॅकमध्ये ठेवून त्याने डिटेक्टर बाहेर काढला. त्याचा स्विच ऑन करून समोर धरला. त्यावरचा काटा ताबडतोब नव्वद अंशात वळला. पद्याने स्विच ऑफ केला आणि डिटेक्टर पुन्हा सॅकमध्ये ठेवला. आम्ही त्या दाराची फ्लॅश लाईटच्या उजेडात बारकाईने तपासणी केली. दरवाजा भक्कम दिसत होता. आता तो कोळिष्टकांनी माखला होता. काठी आणि पद्याचा स्कार्फ यांच्या सहाय्याने आम्ही ती कोळीष्टके साफ केल्यावर दिसून आले की, त्या दाराला एक भलाथोरला कडीकोयंडा होता आणि तो खिळ्यांनी चौकटीतच जाम केला होता.‘आता ?’ मी प्रश्नार्थक चेहेऱ्याने त्याच्याकडे पाहिले. त्याने माझ्या हातातून फ्लॅश लाईट घेतला आणि तिथेच आजूबाजूला शोधाशोध केली. तिथे एका कोपऱ्यात एक अणकुचीदार कोयता दिसला. बहुधा बांधकामासाठी वासे तोडण्यासाठी वापरलेला असावा. त्याच्यावरची धूळ पुसून त्याच्या सहाय्याने आम्ही कडी कोयंड्याशी बरीच झटापट केली. पण तो तसूभरसुद्धा हलला नाही !. ..काही सेकंद आम्ही गप्प होतो. मग एकदम माझ्या डोक्यात काही आले. मी तो कोयता हातात घेतला आणि कोयंड्याच्या विरुद्ध बाजूच्या बिजागरीच्या सापटीत त्याचे धारदार चपटे टोक घालून किंचित जोर दिला. त्यासरशी ‘कर्र कर्र ..’ असा आवाज झाला आणि दरवाजा आणि चौकट यामध्ये बारीकशी फट पडली. पद्या आणि मी दोघांनी पाचेक मिनिटे प्रयत्न केल्यावर त्या जुनाट बिजागऱ्या निखळून खळखळत आतल्या जमिनीवर पडल्या आणि दार किंचित तिरके होऊन आतल्या बाजूला कलले.
( चित्र आंजावरून साभार )  

( क्रमश: )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

23 Apr 2018 - 12:50 pm | श्वेता२४

उत्सुकता आहे

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 1:39 pm | manguu@mail.com

सुंदर

आनन्दा's picture

23 Apr 2018 - 2:11 pm | आनन्दा

हायला.. मस्त चाललेय.

पंतश्री's picture

23 Apr 2018 - 2:26 pm | पंतश्री

मस्त जमली आहे भट्टी.
उत्सुकता लागली आहे पुढच्या भागाची

अभ्या..'s picture

23 Apr 2018 - 4:25 pm | अभ्या..

मस्त स्टोरीय, सुरुवातीला वेगळे वाट्ले पण आता ग्रिप येईल. भारी कालखंड घेतलायसा.

उगा काहितरीच's picture

23 Apr 2018 - 9:11 pm | उगा काहितरीच

पुभाप्र ...

अर्धवटराव's picture

23 Apr 2018 - 11:43 pm | अर्धवटराव

पुभाप्र

प्रचेतस's picture

24 Apr 2018 - 6:51 am | प्रचेतस

भारी लिहिताय.

मोहन's picture

24 Apr 2018 - 12:55 pm | मोहन

पु भा.ल.टा.

खिलजि's picture

24 Apr 2018 - 1:31 pm | खिलजि

जबरदस्त कथा मालिका पुभालटा

सिद्धेश्वर विलास पाटणकर

मंदार कात्रे's picture

25 Apr 2018 - 6:16 pm | मंदार कात्रे

जबरदस्त

छान लिहिले आहेस स्नेहांकिता
एक सुन्दर कादंबरी होइल या कथानकाची. लिहित रहा वाचतोय.
मिपा प्रशासन : मागील भागान्च्या लिन्क्स जोडता आल्या तर पहा. पहिल्यापासून वाचणे सोपे पडेल.

अनिंद्य's picture

27 Apr 2018 - 12:44 pm | अनिंद्य

वाचतोय.
संपादकांनी अनुक्रमणिका केली हे बेस्ट झालं.

सागर's picture

2 May 2018 - 12:26 pm | सागर

धन्यवाद मिपा प्रशासन :)

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 1:03 pm | अक्षय कापडी

वाचला नाहीये अजुन एकही भाग अत्ता वाचायला लागतो