तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 Apr 2018 - 8:00 am

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या

गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच. किंबहुना त्या सगळ्या कुटुंबासाठीच ती शोकांतिका ठरते.

त्यामुळे सुदृढ बालक जन्मास येण्यासाठी गरोदरपणात स्त्रीची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. याबाबतीत संबंधित डॉक्टरवर दुहेरी जबाबदारी असते ती म्हणजे स्त्री आणि तिचा गर्भ या दोघांचीही तब्बेत सांभाळणे. त्यासाठी डॉक्टरला शारीरिक तपासणीबरोबरच काही चाचण्यांची मदत घ्यावी लागते. या चाचण्यांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

आपण ढोबळ मानाने या चाचण्यांचे वर्गीकरण दोन गटात करतो:
१. प्राथमिक चाचण्या: यांचा हेतू मुख्यतः गर्भवतीची तब्बेत तपासण्याचा असतो. अर्थात तिच्या तब्बेतीचा परिणाम शेवटी गर्भावर होतोच.
२. विशिष्ट चाचण्या: यांचा हेतू गर्भाची वाढ पाहणे आणि त्यात काही गंभीर विकृती आहेत का हे पाहण्यासाठी असतो.
आता दोन्हीचे विवेचन करतो.

गर्भवतीच्या प्राथमिक चाचण्या:
या खालीलप्रमाणे आहेत:
१. हिमोग्राम : यात हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि लालपेशीचा विशेष अभ्यास केला जातो. रक्तक्षय होऊ न देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच रक्तगट (ए बी ओ आणि आर एच) ही पाहिला जातो.

२. लघवीची तपासणी : यात ग्लुकोज, प्रथिन हे लघवीतून जात नाहीयेना हे पाहणे तसेच जंतूसंसर्ग तपासणे, हे महत्वाचे.

३. ग्लुकोजची रक्तपातळी : बऱ्याच गर्भवतीना ‘गर्भावस्थेतील मधुमेह’ होऊ शकतो. त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी ही आवश्यक.

४. रक्तदाब तपासणी ; ही पण तितकीच महत्वाची. जर या अवस्थेत उच्च-रक्तदाब मागे लागला तर त्याचा गर्भाचे वाढीवर गंभीर परिणाम होतो.
५. शरीराचे वजन पाहणे.

विशिष्ट चाचण्या : यांचे आजारानुसार ४ गटात वर्गीकरण होईल:

१. गर्भावस्थेत Down syndrome(DS) चे निदान
२. सोनोग्राफीने गर्भातील विकृती शोधणे
३. जंतूसंसर्ग आजारांच्या चाचण्या : यांत HIV, हिपटायटीस-बी, सिफिलीस आणि रुबेला हे येतात
४. थायरॉइडची TSH चाचणी

अतिविशिष्ट चाचण्या : यात काही तंत्र वापरून गर्भजल काढले जाते आणि खुद्द गर्भाच्या पेशींची जनुकीय तपासणी करतात.
आता DS बद्दल विस्ताराने पाहू.

Down syndrome(DS) :
हा एक जन्मजात गंभीर आजार आहे. मुळात तो गुणसूत्रांचा आजार आहे. जर असे मूल जन्मास आले तर ते मतिमंद असते तसेच त्याला हृदयाचे गंभीर आजार असतात. म्हणून या आजाराचे गर्भावस्थेतच निदान करणे व त्यानुसार निर्णय घेणे हे हितावह असते. हे निदान करण्यासाठी प्रयोगशाळा चाचण्या आणि सोनोग्राफीचा वापर होतो.
या चाचण्या प्रत्येक गर्भवतीने कराव्यात अशी शिफारस आहे पण, त्याची सक्ती नाही. त्याचे निष्कर्ष १००% विश्वासार्ह नसतात. या आजाराचा धोका गर्भवतीच्या वयानुसार वाढत जातो. ३५ वयानंतर हा धोका बराच वाढतो.

इथे आपण DSच्या फक्त प्रयोगशाळा चाचण्यांचाच विचार करणार आहोत. गरोदरपणाची एकूण ३ तिमाहीत विभागणी केली जाते. त्यापैकी पहिल्या दोनमध्ये(शक्यतो पहिल्याच) या चाचण्या करतात.

पहिल्या तिमाहीतील चाचण्या
:
यात गर्भवतीच्या रक्तावर २ चाचण्या केल्या जातात:

१. free β CG ची मोजणी: CG हे हॉर्मोन गर्भाच्या भोवती जो placenta असतो त्यात तयार होते.
२. PAPP-A ची मोजणी: हे एक एन्झाईम आहे.

निष्कर्ष: जर गर्भ DS झालेला असेल तर CG चे प्रमाण नॉर्मलच्या दुप्पट होते आणि PAPP-A चे प्रमाण नॉर्मलच्या निम्म्यावर येते.
नंतर या चाचण्यांचे आणि सोनोग्राफीचे निष्कर्ष यांचा एकत्रित अभ्यास करून DS ची जोखीम (कमी/जास्त) ठरवली जाते. जिथे ही जोखीम खूप असते त्या रुग्णांना थेट गर्भावरील निदान चाचण्या कराव्या लागतात. त्या बऱ्यापैकी तापदायक असतात.

३. थायरॉइडची TSH चाचणी : गर्भवतीस थायरॉइड-कमतरता नाही ना हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, पहिल्या तिमाहीत गर्भाच्या मेंदूचे वाढीसाठी जे थायरॉइड हॉर्मोन लागते ते आईकडूनच पुरवले जाते. आता ही चाचणी बहुतेक ठिकाणी केली जाते पण, सरसकट करायची का यावर तज्ञांचे एकमत नाही. काहींच्या मते ती अधिक जोखीम असणाऱ्यांमध्येच करावी. जोखीम वाढवणारे घटक असे:

• वय ३० चे वर
• पूर्वी गर्भपात झालेले
• थायरॉइड आजाराचा कौटुंबिक इतिहास
• लठ्ठपणा

दुसऱ्या तिमाहीतील चाचण्या :
जर DS च्या चाचण्या पहिल्या तिमाहीत झाल्या असतील तर आता त्याची गरज नाही. परंतु, जर काही कारणाने तसे झाले नसेल तरच आता खालील रक्तचाचण्या कराव्यात:
१. AFP : हे प्रथिन गर्भाच्या यकृतात तयार होते व नंतर मातेच्या रक्तात उतरते.
२. CG : या हॉर्मोनचा उल्लेख वर आला आहे.
३. UE३ : हे हॉर्मोन इस्ट्रोजेन गटातील असून ते placenta मध्ये तयार होते.
४. Inhibin A : हे एक प्रथिन आहे.

निष्कर्ष: जर गर्भ DS झालेला असेल तर CG आणि Inhibin A चे प्रमाण नॉर्मलच्या दुप्पट होते आणि AFP व UE३ चे प्रमाण नॉर्मलच्या ३/४ इतके कमी होते.

वरील ४ पैकी जर पहिल्या तीन एकत्र केल्या तर त्याला ‘तिहेरी चाचणी’ तर चारही केल्या तर त्याला ‘चौपदरी चाचणी’ म्हणतात.
जर वरील चाचण्यांतून DS ची जोखीम खूप असल्याचे कळले तर त्या रुग्णांना थेट गर्भावरील निदान चाचण्या कराव्या लागतात.
AFP चाचणीचा उपयोग DS व्यतिरिक्त अन्य आजारासाठीही होतो. जर गर्भाला पाठीच्या कण्याचा एक गंभीर विकार असेल तर याचे प्रमाण बरेच वाढते.
वरील सर्व चाचण्यांचे निष्कर्ष हे गर्भवतीचे वय, वजन आणि वंश या पार्श्वभूमीवर तपासूनच मग DS व इतर आजारांची जोखीम नक्की केली जाते.

गर्भपेशींच्या अतिविशिष्ट चाचण्या :
जेव्हा चाळणी चाचण्यांचे निष्कर्ष खूप जोखीम दर्शवतात अथवा काही आजारांचा कौटुंबिक इतिहास असतो तेव्हाच या करतात. संबंधित आजारांमध्ये DS व तत्सम आजार, सिकल सेलचा आजार आणि थॅलसिमीया यांचा समावेश आहे. किंबहुना या चाचण्या या चाळणी / रोगनिदान यांच्या सीमेवरील आहेत.

गरोदर होण्यापूर्वीच्या चाचण्या :
हे ऐकायला काहीसे विचित्र वाटेल पण विशिष्ट परिस्थितीत नक्की उपयुक्त आहे. इथे आपण हिमोग्लोबिनच्या सिकलसेल आणि थॅलसिमिया या दोन आजारांचे उदाहरण घेऊ. हे आजार आशिया व आफ्रिकेत बरेच आढळतात. ज्या जोडप्याचे बाबतीत कोणाही एकाचा या आजारांचा मोठा कौटुंबिक इतिहास असेल तर अशा वेळेस या चाचण्यांचा उपयोग होतो. जरी संबंधिताला प्रत्यक्ष आजार नसला तरी त्याची ‘carrier’ अवस्था आहे की नाही ते त्यातून समजते. तेव्हा अशा जोडप्यांनी जनुकीय समुपदेशकाचा सल्ला जरूर घ्यावा.

अजून एक मुद्दा. आता गर्भवतीची TSH चाचणी करण्याचे प्रमाण वाढते आहे. ती गरोदरपणात पहिल्या महिन्यात लवकरात लवकर करायची असते. काही तज्ञ असे सुचवतात की मग ती गरोदरपूर्व अवस्थेतच करावी म्हणजे त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.

तसेच जर त्या स्त्रीस आधीच मधुमेह वा उच्च-रक्तदाब असेल तर तेही आजार गरोदरपूर्व अवस्थेत नियंत्रणात असले पाहिजेत. त्यासाठी संबंधित चाचण्या जरूर कराव्यात.
...
या लेखाबरोबरच ही लेखमाला समाप्त होत आहे. येथील नियमित वाचकांना ती उपयुक्त वाटली याचे समाधान आहे. सर्व वाचक, प्रतिसादक आणि प्रशासक यांचे मनापासून आभार !
**************************************************** ***********

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

सुमीत भातखंडे's picture

3 Apr 2018 - 11:01 am | सुमीत भातखंडे

माहितीनी परिपूर्ण लेख.
संपूर्ण लेखमालाच छान झाली.

अनिंद्य's picture

3 Apr 2018 - 11:17 am | अनिंद्य

@ कुमार१,

उत्कृष्ट लेखमालेबद्दल अभिनंदन. ह्या मालिकेमुळे अनेक वाचकांच्या मनातील शंकांना उत्तरे मिळाली असतील.

गरोदर होण्यापूर्वीच्या चाचण्या.... हे महत्वाचे वाटते.

आणिक एक म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन, शारीरिक-मानसिक आरोग्य चाचण्या, अनुवांशिक व्यंग, वंध्यत्व, एच आय व्ही सारखे गंभीर संसर्ग या विषयांवर बोलणे फारसे प्रशस्त समजले जात नाही अजूनही. पण ते आवश्यक आहे खरे. तुम्हां डॉक्टर मंडळीनी अश्या 'विवाहपूर्व चाचण्या' सुचविण्याची फॅशन लवकर येवो :-)

मी सहज केलेल्या सूचनेवरून एवढी अभ्यासपूर्ण आणि तरीही सोप्या-सरळ भाषेत ही मालिका लिहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.

पु ले शु,

अनिंद्य

कुमार१'s picture

3 Apr 2018 - 11:32 am | कुमार१

मनापासून आभार. तुमच्यसारख्या जाणकार वाचकांच्या पाठबळावरच हे साध्य झाले.
विवाहपूर्व आरोग्य समुपदेशन ही काळाची गरज आहे, हे नक्की.

अभिजीत अवलिया's picture

3 Apr 2018 - 11:33 am | अभिजीत अवलिया

सिकलसेल आणि थॅलसिमिया दोन्ही नसतील पण तरीही हिमोग्लोबिन कमी असेल तर गर्भावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
डबल मार्कर/ट्रिपल मार्कर टेस्ट कितपत विश्वसनीय आहेत?

कुमार१'s picture

3 Apr 2018 - 11:58 am | कुमार१

हिमोग्लोबिन कमी असेल तर गर्भावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? >>>

अर्थातच. मुळात हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वाहतूकदार आहे. म्हणून,
कमी हिमोग्लोबिन >>> पेशींना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा >> त्यांच्या कार्यावर विपरीत परिणाम.

डबल मार्कर/ट्रिपल मार्कर टेस्ट कितपत विश्वसनीय आहेत? >>>>

बऱ्यापैकी विश्वासार्ह आहेत पण १००% foolproof नाहीत !

चौकटराजा's picture

3 Apr 2018 - 3:02 pm | चौकटराजा

बॉडी अ‍ॅट वॉर ह्हे पुस्तक वाचून कैक वर्षे झाली. त्यात एक प्रकरण " प्रेग्नन्सी - नेचर्स व्हर्शन ऑफ ट्रान्सप्लांट असे होते . त्यांच्या मते खरेतर गर्भ हा फोरीन बॉडी च असतो . पण म्हणे निसर्ग विशिष्ट योजना करून त्याला शरीरातून बाहेर न फेकण्याची रचना स्त्री शरीरात करतो. हे थोडेसे अवांतर .

कुमार१'s picture

3 Apr 2018 - 3:38 pm | कुमार१

चौरा, चांगला मुद्दा.

बरोबर. त्यामुळे गर्भाशय हे गर्भाला ९ महिने मुदतीपुरते ‘स्वकीय’ समजते आणि ती मुदत संपताच ‘परकीय’ समजू लागते !
थोडक्यात हा ९ महिन्यांचा त्याचा visa संपला की गर्भाची बाहेरच्या जगात हकालपट्टी होते. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2018 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावरची ही मालिका एक अभ्यासपूर्ण आणि सर्व मिपाकरांना खूप उपयोगी अशी गणली जाईल. धन्यवाद !

किचकट वैद्यकिय विषय सर्वसामान्य लोकांना सहज समजेल असा करून सांगण्याची कुमार१ यांची हातोटी विलक्षण आहे !

लवकरच अजून एक नवीन विषय घेऊन लिहिलेल्या लेखमालेची प्रतिक्षा आहे !

कुमार१'s picture

3 Apr 2018 - 10:39 pm | कुमार१

वंदन आणि आभार ! तुमच्या शुभेच्छा व पाठबळामुळेच हे शक्य झाले. ते सतत मिळत राहील याची खात्री आहे.
त्यामुळे नव्या जोमाने लेखन करीत राहीन.

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 10:47 am | सुबोध खरे

खरं तर आदर्श स्थितीत यापैकी बऱ्याच चाचण्या या जेंव्हा जोडपे आपल्याला "मूल हवंय" या निर्णयाला पोहोचते तेंव्हाच करायला हव्यात म्हणजे गरोदर राहण्यापूर्वीच.
यात संपूर्ण हिमोग्राम, थायरॉइड, मधुमेह, यकृत आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता( liver & kidney function tests) या चाचण्या येतील.

यामुळे गरोदर राहण्याच्या अगोदरच स्त्री जितकी निरोगी आणि उत्तम प्रकृतीची असेल तितके गरोदरपण आणि प्रसूती उत्तम होऊन बाळाचे आरोग्य उत्तम राहील.

त्यातून याला येणारा खर्च हा अनुत्पादकच (nonproductive) समजला जातो. शिवाय आमच्या काळात "असली थेरं" नव्हती आणि आमचं काय वाईट झालं म्हणणारे दुद्धाचार्य/साळकाया म्हाळकाया तर घराघरात सापडतात.

त्यात डॉक्टर "पैशासाठी" या "सर्व टेस्ट्स" करायला लावतात म्हणणारी माणसे थोडी नाहीत. गर्भसंस्कारावर १८००० रुपये खरंच करणाऱ्या मी पाहिलेल्या एका जोडप्याने ३ महिने होईस्तोवर कोणतीही चाचणी केली नव्हती

दुर्दैवाने "पुढचा विचार" करणारी जोडपी फारच कमी आहेत. (लोक जर आयुर्विमा काढण्याचं चालढकल करतात तर हि फारच दूरची गोष्ट आहे).

कुमार१'s picture

4 Apr 2018 - 11:35 am | कुमार१

रोगप्रतिबंधा वर केला गेलेला खर्च हा खरे तर "उत्पादक"च समजला पाहिजे !

लई भारी's picture

4 Apr 2018 - 2:12 pm | लई भारी

सर्व लेखांवर प्रतिक्रिया दिली नाही, पण अतिशय उपयोगी लेखमाला आहे.
आधीच्या लेखमालेच्या प्रिंट्स घेऊन घरी दाखवल्या होत्या हे पण करेन :)

पुढील लेखनास शुभेच्छा आणि नवीन विषयाच्या प्रतीक्षेत!

कुमार१'s picture

4 Apr 2018 - 4:58 pm | कुमार१

तुम्हाला लेखमाला उपयुक्त वाटल्याने समाधान आहे.

अत्रन्गि पाउस's picture

5 Apr 2018 - 11:15 am | अत्रन्गि पाउस

atishay abhyasu vivechn. samany lokanna atishay sopya bhashet kichkat vishay samjavun dilat.
asha veli fakt krutdnyatene haat jodavet hi bhavana

कुमार१'s picture

5 Apr 2018 - 11:55 am | कुमार१

@ अपा,
आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो.

कुमार१'s picture

7 Apr 2018 - 11:17 am | कुमार१

आज जागतिक आरोग्य दिन !
त्यानिमित्ताने आपणा सर्वांना उत्तउम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी शुभेच्छा .

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 12:31 pm | arunjoshi123

कुमार१ यांच्या प्रस्तुतीकरणाच्या शैलीवरून अनेक प्रेमळ डॉक्टरांची आठवण झाली. अत्यंत उपयुक्त लेखनमाला.

कुमार१'s picture

23 Apr 2018 - 12:44 pm | कुमार१

अरुण जोशी , आभारी आहे.
आजच्या ग्रंथदिनाच्या शुभेच्छा !

सुधीर कांदळकर's picture

24 Apr 2018 - 7:21 pm | सुधीर कांदळकर

चाचण्या कराव्यात की नको वा कोणत्या चचण्या कराव्यात हा यक्षप्रश्न सोडवायला कोणालाही लेखांची फारच मदत होईल.

बर्‍याच प्रकारच्या लसी हल्ली जाहिरातीत दिसतात. काहींचा सरकार प्रचार करते. परंतु लस टोचल्यावर येणारी प्रतिकारशक्ती किती दिवस टिकते याचा उल्लेख सहसा दिसत नाही. मुले खेळतांना धडपडून पडतात. जखम खोल असल्यास धनुर्वातविरोधी लस टोचतात. बर्‍याच वेळा एकदोन महिन्याच्या अंतराने पण धनुर्वाताची लस टोचली जाते. कारण पालकांना प्रतिकारशक्ती किती काळ राहते हे ठाऊक नसते आणि त्या व्यक्तीला/मुलाला ती लस केव्हा टोचली याचा अभिलेख डॉक्टरकडे नसतो. विविध लसी, परिणामकारकता टक्केवारी, त्यांच्यामुळे येणारी प्रतिकारशक्ती सरासरी किती काळ राहते, या विषयावर लेखमाला आली तर फार बरे होईल. माझी नम्र फर्माईशच समजावी.

धन्यवाद,

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 8:33 pm | सुबोध खरे

साहेब

धनुर्वाताच्या लसीचे तीन डोस जन्मल्यानंतर ४, ५ आणि ६ व्या महिन्याला दिले असतील तर दर ५ वर्षांनी एकदा बूस्टर डोस द्यावा लागतो. जर आपल्याला नक्की माहिती असेल कि बूस्टर डोस दिला आहे तर ५ वर्षे पर्यंत परत इंजेक्शन ची गरज नाही.

माणसे आपल्या मुदत ठेवीपासून किसान विकास पत्र, आणि प्रेमपत्रे जपून ठेवतात.

परंतु आपल्याच मुलाची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाची फाईल मात्र जपून ठेवत नाहीत. आणि जपून ठेवलेली असली तरी वेळेवर मिळत नाही आणी डॉक्टरकडे आणत नाहीत. परत लसीकरण बालरोगतज्ञा कडे होते जेथे त्याचा अभिलेख असू शकतो आणि मूल मोठे झाले कि ते फॅमिली डॉक्टर कडे नेतात.

म्हणून मग एखाद्या टोकदार लोखंडी वस्तूने (उदा. गंजलेला खिळा) जखम झाली तर डॉक्टर उगाच धोका पत्करण्यापेक्षा इंजेक्शन घ्या म्हणून सांगतात.

कुमार१'s picture

24 Apr 2018 - 7:53 pm | कुमार१

सुधीर, नमस्कार
तुम्हाला लेखमाला उपयुक्त वाटल्याने समाधान आहे. तुमच्या फर्माईश ची नोंद घेत आहे.
सध्या डोक्यात अन्य विषय आहेत पण सवडीने बघू