मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागतिक महिला दिन..अन् बिच्चारे पुरुष ! :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · काथ्याकूट

               जागतिक महिला दिन आला की, स्त्रियांच्या प्रश्नांची,समस्यांची, त्यांच्या प्रगतीची मांडामांड सुरु होते.मग काही तक्ते,संशोधन, निष्कर्षे आणि त्या स्थितीतून स्त्री बाहेर यावी यासाठीच्या नियोजनांची चर्चा होते. ती चांगलीच गोष्ट. स्त्रीची अधिक प्रगती व्हावी याबद्दल शंकाच नाही पण तिचा पहिला प्रश्न असतो की पुरुषांच्या जोखडातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. तिला पुरुषांइतकेच स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. लग्न हा मूर्खपणाचा कळस आहे, पुरुषांनी स्त्रियांवर कायमची मालकी हक्क गाजवण्याचा तो एक कट आहे. स्त्रीला मुले होतात आणि पुरुषांना होत नाही इतकाच काय तो फरक ! (भविष्यात पुरुषांनाही होतील असे ऐकले ,वाचले आहे. ) खरं तर स्त्रियांना समाजात एक मानाचं, गौरवाचं स्थान मिळावं यासाठी अनेक पुरुष विचारवंतानी  प्रयत्न केले आहेत. स्त्री चळवळी किंवा त्यांच्यासाठी काम करणा-यांच्या बाबतीत काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, पुरुषांवर  एकांगी टीका करण्याच्या प्रयत्नात पुरुषांकडून मिळालेल्या फायद्याकडे स्त्रिया दुर्लक्ष करतात. स्त्री म्हणजे, गोगोड बोलणारी, सुंदर, मृदू, चतुर, उच्च विचार, अशा स्वभावाची ( अंदाजे हं ) पण स्त्रियांच्या चळवळी ही सर्व वैशिष्ट्ये नष्ट करायच्या मागे लागल्या आहेत. स्त्रीयांच्या मासिकांमधून पुरुषांवर जरब बसावी अशी उदाहरणे वाचून अनेकदा स्त्रिया आक्रमक होण्याची शक्यता असते, त्यामुळे पती-पत्नीचे संबध दुरावतात, जे संबंध परस्पराविषयी जिव्हाळा, प्रेम, यावर उभारायचे त्यात या स्त्रीवादी विचारांनी नातेसंबधात रुक्षपणा  आणि निव्वळ त्यात व्यवहार आणीत आहेत. 
                  आपल्या हक्कासाठी सतत भांडणारे पती-पत्नी आपल्या मुलांच्या समोर कोणता आदर्श ठेवतील. पुरुष हे वाईटच अशी समजूत असणा-या स्त्रियांना माहीतच असेल की आपल्या कुटुंबावर प्रेम करणारे व बायकामुलांच्यासाठी अहोरात्र श्रम करणारे पुरुष असतात हेही सत्यच असते. नव-याला सोडून, मुलांना नातेवाईकांवर सोपवून, दुस-या पुरुषांबरोबर लग्न करुन किंवा न करता स्वबळावर नोकरी करुन किंवा तशाच राहणा-या स्त्रियांचे अशा प्रसंगी कौतुक केले जाते. स्त्री कुठे स्थिर होऊ शकते असा मार्ग तिने निवडावा. पण स्त्रीचे वैभव म्हणजे संसाररथाचे चाक होणा-या समर्पणात असावे असे वाटते. पुरुष बदमाश आहेत, गुन्हेगार आहेत, स्त्रीच्या प्रगतीतील अडथळा आहे अशी भावना अशा दिनाच्या निमित्ताने वाढीस लागते असे वाटते. खरं म्हणजे स्त्रीने पुरुषांना अशी लेबले लावल्याने स्त्री सुखी होईल का ? काही पुरुष, स्त्रियांचे मानसिक, शारीरिक शोषण सामाजिक जीवन जगतांना करतात ...वगैरे..पण अशा प्रश्नांचीही काही उत्तरे असतात. म्हणून समस्त पुरुष तस्साच आहे, हे जरासे न पटणारे आहे. कुटुंबव्यवस्था टिकवण्याची मोठी जवाबदारी स्त्रीची असते तिथे तिने पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवला पाहिजे. तिथूनच दोघांच्या  अधिक सुखाचे मार्ग खुले होतात असे वाटते. घटस्फोट घेणा-या बायका म्हणजे धाडसी, आक्रमक स्त्रिया म्हणजे धाडसी, पुरुषांना वठणीवर आणतात त्या ख-या टेरर स्रिया, वगैरे अशी चुकीची मूल्य स्थापीत होत आहेत. स्त्री-पुरुष यांचे प्रेम, ओढ, हे नैसर्गिक आहे.यातून स्त्रीयांना वेगळे करण्याचे कारस्थान...वेगवेगळ्या  संस्था / संघटना करतात असेही वाटते.  शोषित, पिडीत,   आणि खूप काही सोसणा-या  स्त्रियांचे   जिव्हाळ्याचे प्रश्न खूप आहेत, त्याचबरोबर एकीकडे पत्नीपिडितांचीही संख्या वाढत आहे. तेव्हा  चुकीच्या मूल्यांमुळे आपण पुरुषांवर अन्याय तर करत नाही ना ? असाही विचार आजच्या दिवसानिमित्त झाला पाहिजे ?


वाचन 9255 प्रतिक्रिया 0