कुस्तीत सुरक्षेचा विचार का होत नाही

पी महेश००७'s picture
पी महेश००७ in काथ्याकूट
7 Apr 2018 - 2:27 am
गाभा: 

गेल्या वर्षी पैलवान विकी साष्टे कुस्ती खेळताना जायबंदी झाला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. मनाला प्रचंड वेदना झाल्या. या घटनेतून मन सावरत नाही तोच शाहूवाडीचा पैलवान नीलेश कुरुंदकरचं जाणं. जत्रेतल्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याने टाकलेल्या एकचाकी डावात नीलेश मानेवर पडला आणि मणक्यावर गंभीर मार बसला. मानेपासून संपूर्ण शरीराची हालचाल मंदावली. सहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर नीलेशची झुंज अपयशी ठरली आणि त्याने या जगाचा निरोप घेतला. विकी साष्टेही अशाच एका दुर्दैवी कुस्ती लढतीत जायबंदी झाला आणि नंतर त्याला आपले प्राण गमवावे लागले. काही जण जायबंदीही झाले. अर्थात, या अपवादात्मक घटना आहेत. त्यामुळे कुस्तीचे वैभव तसुभरही कमी झाले नाही. असं असलं तरी पैलवानांच्या सुरक्षेबद्दल कधीच ऊहापोह होत नाही किंवा त्यावर गांभीर्याने विचार होत नाही. मला कुस्तीची अन्य खेळांशी अजिबात तुलना करायची नाही, पण मर्दानी खेळांमध्ये सुरक्षेच्या पातळीवर अजिबात विचार होत नाही.

"जयाना वाटे भय मृत्यूचे..क्षात्रधर्म तयाने करू नये..काहीतरी करून उपाये पोट भरावे"
हे खरे असले तरी पूर्वी युद्ध लढतानाही चिलखत, ढालींचा सुरक्षेसाठी उपयोग व्हायचाच. सुरक्षा साधने जेथे उपयोगात येत नाही तेथे खबरदारी म्हणून नियम आले, तसेच उपचार आले. कुस्तीबाबत मात्र कोणीही गांभीर्याने विचार करीत नाही.

मल्लविद्याचे संस्थापक मिलिंद मानुगडे यांनी अतिशय चांगला मुद्दा व्यक्त केला होता. तो म्हणजे काटा कुस्त्या ठरवत असताना 108 क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका असणे हा नियोजनाचा भाग असायला हवा. उलटी पुठ्ठी, बॅक थ्रोसारखे डाव मैदानी कुस्तीतून काढून टाकले पाहिजेत. तसेच माती व मॅट कुस्तीतला फरक समजून हे बदल काळाच्या ओघात बदलेले पाहिजे.

मानुगडेंचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावर कुस्ती संघटनेने खरोखर विचार करायला हवा. मुळात जत्रेतल्या कुस्त्यांवर संघटनेचा अंकुशच नाही.

म्हणूनच सुरक्षित कुस्तीबाबत मला काही मुद्दे सुचले म्हणून इथे नमूद करतो.

1. गावोगाव जत्रेतल्या कुस्त्या होतात. त्यावर कोणाचेही बंधन नसते. अशा कुस्त्यांमधील मल्लाच्या आरोग्यसेवेची कोणतीही खबरदारी घेतली जात नसते. ती अशा आयोजकांवर बंधनकारक करायला हवी. उदाहरणार्थ, वैद्यकीय पथक, तसेच मानुगडे यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णवाहिका आदी.

2. हौशी, तसेच जत्रेतल्या कुस्त्याच नव्हे, तर अन्य मान्यताप्राप्त कुस्त्याही नेहमी अद्ययावत रुग्णालयांजवळच घेण्याचे बंधनकारक करायला हवे. किमान एक किलोमीटरच्या आत रुग्णालय असलेच पाहिजे. (ही रुग्णालये अद्ययावत असणे आवश्यक आहे. थंडीतापाच्या दवाखान्याजवळ नव्हे हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे) म्हणजे काहीही दुखापत घडल्यास अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या आत पैलवानावर उपचाराची सोय होऊ शकेल.

3. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला हाताळायचे कसे याचे वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर पैलवान, तसेच पंचांना (पंचांना तर अनिवार्यच करायला हवे) मिळायला हवे. बऱ्याचदा हाताळताना इतक्या घोडचुका होतात, की ती चूक आहे हेसुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे असे शिबिर हवेच. तसेच त्यादृष्टीने लागणारे वैद्यकीय साहित्यही मिळायला हवे. गळ्याचा वैद्यकीय पट्टा, तसेच नाकातून रक्त वाहत असेल तर नाकपुडीत मिळणारी जाळीदार पट्टी (प्रथमोपचारात याची सविस्तर माहिती मिळू शकेल) इ. साहित्याचा वापर केला तरी रुग्णाला हाताळताना त्याला इजा होत नाही.

4. कुस्तीचा आखाडा नेहमी प्रेक्षकांच्या कोंडाळ्यात असतो. त्यामुळे एखादी घटना घडली की गर्दी होते. त्यामुळे तातडीने मार्ग काढता येत नाही अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते. ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची माहिती आयोजकांना द्यावी.

याव्यतिरिक्त एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे संरक्षण विम्याचा. खेळाडूंसाठी स्वतंत्र विमा नाही, अशी तक्रार आहे. असे असले तरी सर्वांसाठी वैद्यकीय विमा, तसेच अपघाती विम्याची सोय आहे. त्याचा लाभ पैलवानांनाही मिळू शकेल. आयुर्विमा महामंडळाशी संपर्क साधल्यास तेथील अधिकारी अधिक चांगली माहिती देऊ शकतील. सरकार, क्रीडा संघटनांच्या मदतीने खेळाडूंचा विमा उतरवला जाणे महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा नियमांचा नमूद केला आहे. या दोन्ही मुद्द्यांवर संघटनात्मक पातळीवर व्यापक चर्चा घडवून आणायला हवी.

प्रतिक्रिया

सध्याच्या कुस्तींचे नियम बदलायला हवेत. अपघात कमीतकमी होतील. म्याटवरच्या कुस्तीत तीन फेय्रा, गुणांवर पराभूत इत्यादी एकूणच कंटाळा आणणारा प्रकार आहे. सुमोसारखे सोपे नियम अपेक्षित.

जेम्स वांड's picture

7 Apr 2018 - 6:41 am | जेम्स वांड

तीन राऊंड मध्ये मॅक्स पॉईंट घ्यायला तितके खुबीने डाव फेकून जास्तीत जास्त पॉईंट मिळवून देणारा डाव लावणे हे डोक्याचे काम होय. 'कुस्ती कळणाऱ्याला' ह्यात आनंदच येतो, बोर होण्यासारखे काही नाही त्यात. बोर होणाऱ्यांनी कृपया असले सल्ले तरी देऊ नयेत असे पूर्ण आदर बाळगून सांगू इच्छितो.

जेम्स वांड's picture

7 Apr 2018 - 6:43 am | जेम्स वांड

ह्यात काही काही डावपेचांचा फरक पडतो हे नक्कीच, कुस्तीगीर पैलवान लोकांची सुरक्षा हा खरंच एक नाजूक मुद्दा होय.

ही असली कुश्ती कंटाळवाणी नक्कीच आहे. सल्ला फेकून द्या.

सतिश पाटील's picture

7 Apr 2018 - 11:06 am | सतिश पाटील

आपल्याकडे सर्वच बाबतीत सुरक्षा, शिस्त, आणि खाजगी आयुष्य हे सगळ भ्रम आहे , या गोष्टी कोणीही गंभीरपणे घेत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2018 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्याकडे सर्वच बाबतीत सुरक्षा, शिस्त, आणि खाजगी आयुष्य हे सगळ भ्रम आहे , या गोष्टी कोणीही गंभीरपणे घेत नाही.

+१००

आणि तसे कोणी (विशेषतः सरकार) करू लागले तर, "आमच्या अधिकारात हिटलरशाही ढवळाजवळ होत आहे" अशी बोंब मारली जाते. :(

जेम्स वांड's picture

8 Apr 2018 - 2:01 am | जेम्स वांड

अजून किती धाग्यांवर पॉलिटिकल एजंडे रेटणार काका? तुम्ही खूपच पूजानीय आहात, हे आदरपूर्वक नमूद करून गप्प बसतोच बापडा

आनन्दा's picture

8 Apr 2018 - 1:25 pm | आनन्दा

+1. खरंच तो प्रतिसाद वाचून दुःख झालं

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2018 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

सत्य कडू असते.

परिस्थितीकडे डोळेझाक करून ती बदलत नसते. खेळांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे (हे नक्कीच बरोबर आहे) असे म्हणणार्‍या किती संघटना सरकारने बनवलेले निर्णय सहजपणे स्विकारतात ? आणि कोणताही विरोधी पक्ष (मग तो कोणताही पक्ष असो), ते नियम किती जाचक/अव्यवहार्य आहेत असे म्हणून विरोध करण्याची राजकारणी संधी सोडतो ?

ज्यांना खेळाबद्दल कळकळ आहे आणि/किंवा असे कार्यक्रम साजरे करतात, अश्या संघटनांना...

१. खेळातील धोका फार फार पूर्वीपासून सुचून त्यांच्या पुढाकाराने सुरक्षेचे नियम बनवून त्यांचे पालन करायला नको होते का ?

२. ज्या खेळात धोका असतो अश्या खेळांचे आयोजन करणार्‍यांनी त्यांच्या उत्पन्नापैकी ठराविक टक्के निधी खेळाडूंच्या विम्यासाठी राखून ठेवणे, हा विचार फार जगावेगळा वाटतो का?

जो खेळ अनेक दशके (किंवा शतके) पारंपारिक खेळ मानला जातो त्याच्या संबंधी दुसर्‍या कोणी येऊन काहीतरी करा अशी अपेक्षा करत बसण्याऐवजी, ज्यांना एखाद्या खेळाबद्दल कळकळ आहे त्या लोकांनी/संघटनांनी एकत्र येऊन आपल्या खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकास आणि सुरक्षितता (उदा: इजा होऊ नयेत यासाठीच्या आणि इजा झालीच तर त्यांच्यासाठीच्या उपाययोजना, इत्यादी) यासाठी संघटीत होऊन काही ठोस पावले फार पूर्वी उचलली पाहिजे होती ही अपेक्षा जगावेगळी होईल का ?

हे कुस्तीलाच नाही, बहुतेक सगळ्या पारंपारिक खेळांना लागू होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2018 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

जगभरात जे खेळ विकसित आणि लोकप्रिय झाले आहेत त्यांचा इतिहास पाहिला तर, त्यांच्यामागे त्यांच्यात रस असलेल्या लोकांचे 'भविष्यवेधी विचार' समोर ठेऊन केलेले अथक प्रयत्न आहेत, हेच दिसेल. सरकारी हस्तक्षेप जेवढा कमी तेवढे राजकारणही कमी होते. अर्थात, असे खेळ खूप लोकप्रिय आणि श्रीमंत झाले की त्यांत अर्थकारण (आणि बहुदा राजकारणही) सहजपणे शिरते, हे पण तितकेच खरे !

लेखातील मुद्द्यांशी सहमत आहे.

manguu@mail.com's picture

7 Apr 2018 - 8:18 pm | manguu@mail.com

खेळातील रिस्क स्वेच्छेने घेतलेली असते. हाय रिस्क अ‍ॅक्टिविटीत स्वताहुन भाग घेऊन दुखापत झाली तर ते आरोग्यविम्यात कव्हर होत नाही. विमा पॉलिसीत तसे क्लॉजच असते.

उगा काहितरीच's picture

8 Apr 2018 - 7:10 am | उगा काहितरीच

ओके , म्हणजे F1 वगैरे स्पर्धेत भाग घेणाऱ्यांचा पण विमा नसतो का ?

manguu@mail.com's picture

8 Apr 2018 - 7:43 am | manguu@mail.com

जास्तीचा प्रिमियम भरुन कदाचित देत असतील पॉलिसी.

उगा काहितरीच's picture

8 Apr 2018 - 8:13 am | उगा काहितरीच

मग तसाच जास्तीचा प्रिमियम भरून कुस्ती सारख्या खेळात पण मिळायला हवा. ही जबाबदारी आयोजक , स्पॉन्सर यांची .

manguu@mail.com's picture

8 Apr 2018 - 8:18 am | manguu@mail.com

नॉर्मल पॉलिसीचाच हप्ता परवडत नाही. Extra कोण भरेल ?

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2018 - 12:24 am | प्रसाद गोडबोले

कुस्ती , एमएमए , किक बॉक्सिंग , ग्लॅडिएटर फाईट्स सारखे हिंसक क्रिडाप्रकार कायमचे बन्द करुन टाकले पाहिजेत !

- मार्कस ऑरेलियस

अभ्या..'s picture

8 Apr 2018 - 1:58 pm | अभ्या..

रोबोटांची कुस्ती, सिम्युलेटरवर रेसिंग, रेस्लिंग असे चालू केले पाहिजे.
कसेय की सोफ्यातून उठायला नाही पाहिजे. बघणार्‍याने पण, खेळणार्‍याने पण.
.
घ्या पॉपकॉर्न.....

प्रसाद गोडबोले's picture

8 Apr 2018 - 8:08 pm | प्रसाद गोडबोले

येस !

अगदीच खाज असेल त्याने व्ही . आर . सेट लाऊन असले खेळ खेळावेत !

vr

(अवांतर : वी. आर वर इतर गेम खेळण्यात जास्त मजा आहे असे ऐकुन आहे , पण तसेही रीअ‍ॅलिटिमध्येही इतर गेम खेळण्यात जास्त मजा आहे ;) )

अभ्या ते रोबोट वॉर्स वगैरे प्रकार ऑलरेडी आहे की बे.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 4:13 pm | विशुमित

आणखी एक पुरोगामी प्रकार.

लेखांतील मुद्द्यांशी सहमत आहे. कुस्तीगिरांच्या सुरक्षेसाठी योग्य नियमावली तयार करून रेग्युलेटरी मेकॅनिझम उभे करावे.
म्हात्रे सरांची प्रतिक्रिया अस्थानी वाटली. धागालेखक केवळ सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल बोलत नाहीत त्यांचा मुद्दा संघटनात्मक पातळीवर आणण्याच्या बदलांसंदर्भातच आहे.

असे म्हात्रे काका तुम्हांसही सांगतील, कदाचित!. मिपावर काही मोजके ऋषितुल्य लोक आहेत त्यातले एक मला म्हात्रे काका अजूनही वाटतात, अक्षरशः सगळे खंड देश संस्कृती फिरून तावून सुलाखून निघालेला माणूस म्हणजे म्हात्रे काका, अर्थात हे आमचे 'फॅन बॉय लाऊड थिंकिंग' झाले. त्यांना काय वाटते अन त्यांचा आमच्याबद्दल काय ग्रह होतो हे त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे, हेच खरं!. फक्त इतकं विपुल अन इतकं सुंदर लेखन करणारे आमचे काका असे आऊट ऑफ लाईन वाटतात तेव्हा किमान एक टोचणी प्रतिक्रिया देण्याचा भोचक का असेना हक्क मात्र मी माझ्याजवळ ठेवतोय. :(

पुतळाचैतन्याचा's picture

11 Apr 2018 - 12:43 pm | पुतळाचैतन्याचा

या घटना अपघात आहेत...सर्व खेळात - क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग वगैरे मध्ये अपघात होत असतात. साहसी क्रीडा प्रकारात या गोष्टी घडणारच.

बॅटमॅन's picture

7 May 2018 - 1:38 am | बॅटमॅन

मुद्दे नक्कीच विचारात घेण्याजोगे आहेत.