शेव राईस

प्रिया१'s picture
प्रिया१ in पाककृती
27 Mar 2018 - 6:51 pm

खूप टेस्टी आणि पचायलाही सोपी अशी रेसिपी आहे. तर बघूया ह्याची हि कशी करायची...

साहित्य:
१. तांदळाचे पीठ (शक्यतो सुवासिक तांदूळ पीठ घेतले तर छान जसे बासमती तांदळाचे) - ३ वाट्या
२. ओला नारळ खवलेला - साधारण १ वाटी (हे प्रमाण तांदळाच्या प्रमाणामध्ये घेतले आहे, जसे २ वाट्या तांदूळ पीठास १ वाटी पूर्ण भरलेला नारळ, तुम्ही आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, जास्ती घेतला तर चव पण सुरेख येते)
३. कोथिंबीर चिरून - भरपूर
४. कडीपत्त्याची पाने - १०-१२
५. मोहरी - फोडणीपुरते
६. हिंग
७. मीठ - चवीनुसार
८. साखर - चवीनुसार
९. एका लिंबाचा रस
१०. हिरव्या मिरच्या तुकडे करून - ४ ते ५ (हि रेसिपी चवीने तिखट नाही त्यामुळे मिरच्यांचे प्रमाण बेताने घ्यावे, तसेच मिरच्यांचा तिखटपणाही लक्षात घ्यावा )
११. फोडणीसाठी तेल
१२. पाणी

कृती:
प्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ आणि किंचित तेल घालून भाकरीसाठी किंवा चकलीसाठी जसे भिजवतो तसे भिजवावे. भाकरीसाठी काही जण गरम पाणी घालून उकड काढतात तसे इथे करायची गरज नाही. सध्या पाण्यात भिजवावे. त्यानंतर चकली पात्र घेऊन त्यात शेव काढण्यासाठी जी चकती असते ती बसवून घ्यावी (फार जाड छिद्र असलेले नको, साधारण आपल्या bambino शेवया जितपत जाड असतात तेवढी जाड आपली शेवई पडली पाहिजे). चकली पात्राला आतून थोडे तेल लावून घ्यावे म्हणजे पीठ आत चिकटणार नाही. ह्यानंतर इडली किंवा मोदक पात्र घ्यावे. इडली पात्राची प्लेट धरायला मध्ये जे हॅन्डल असते त्याच्या भोवतालीने शेव पाडत जावी. एकावर एक असे ४ ते ५ layers देऊ शकता. जास्ती देऊ नये कारण शेवया वरच्या प्लेटला चिकटण्याची भीती असते. ह्या शेवया आता १५ मिनटे उकडून घ्याव्यात. इडली पात्रातून बाहेर काढायच्या आधी एकदा त्या नीट उकड्या गेल्यात का हे तपासून घ्यावे.

आता ह्या शेवया गार होऊ द्याव्यात. आणि मग एका परातीत घेऊन त्या हलक्या हाताने सोडवाव्यात. सोप्या भाषेत तुकडे करून घ्यावेत. फार बारीक तुकडे करू नयेत नाहीतर त्याचा गोळा बनून जाईल.

ह्यानंतर फोडणीच्या भांड्यात ३ ते ४ चमचे तेल घ्यावे. तेल चांगले तापले कि त्यात मोहरी तडतडू द्यावी. नंतर त्यात थोडासा हिंग, कडीपत्त्याची पाने आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. हि फोडणी सोडवलेल्या शेवयांवर घालावी. चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. नंतर त्यात ओले खोबरे, कोथिंबीर घालावी. वरून लिंबाचा रस घालावा. आणि हे सगळे साहित्य हाताने छान एकत्र करून घ्यावे आणि serve करावे.

रविवारच्या नाश्त्यासाठी एक पर्याय म्हणून छान आहे. थोडे वेळकाढू आहे पण एकदा जमल्यावर दुसऱ्यावेळेस वेळ लागत नाही.
हा माझा ब्लॉग लिहायचा पहिला प्रयत्न आहे. चुकांना माफी करावी :)

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

27 Mar 2018 - 6:56 pm | manguu@mail.com

अशा शेवया गूळ- नारळाच्या दुधाबरोबर गोड पदार्थ म्हणूनही खाल्ला जातो.

त्याला काहीतरी नाव आहे.

सविता००१'s picture

2 Apr 2018 - 4:38 pm | सविता००१

की असच काहीतरी म्हणतात त्या गोड पदार्थाला

अभिजीत अवलिया's picture

2 Apr 2018 - 8:36 pm | अभिजीत अवलिया

इडिअप्पम म्हणतात त्याला. खाली राघवेंद्र ह्यांनी बरोबर सांगितले आहे. नारळाच्या दुधाबरोबर मस्त लागतात.
एक महिना चेन्नईला मुक्कामी होतो तेव्हा प्रचंड प्रमाणात इडिअप्पम खायचो.

सविता००१'s picture

3 Apr 2018 - 8:45 am | सविता००१

मागे मी एक्दा कोकणात हा पदार्थ खाल्ला होता. तेव्हा तिथ्ल्या माणसाने मला शिरवळ्या असं नाव सांगितलं होतं. कोण जाणे, प्रांतानुरुप नावे वेगळी असतील.

याला गवल्यांची खीर असेही म्हणतात

जेम्स वांड's picture

20 Apr 2018 - 4:25 pm | जेम्स वांड

गवले /गव्हले हे नसतात

जेम्स वांड's picture

20 Apr 2018 - 4:33 pm | जेम्स वांड
II श्रीमंत पेशवे II's picture

3 May 2018 - 10:35 am | II श्रीमंत पेशवे II

मी त्यांना गवले समजलो होतो

manguu@mail.com's picture

27 Mar 2018 - 6:57 pm | manguu@mail.com

फोटो टाका

राघवेंद्र's picture

27 Mar 2018 - 7:53 pm | राघवेंद्र

इडिअप्पम सारखे वाटत आहे.

फोटू पाहिजेत.

सूड's picture

2 Apr 2018 - 1:49 pm | सूड

फोतो?

वेगळीच वाटते आहे पाककृती. छान!

Patil 00's picture

2 Apr 2018 - 7:44 pm | Patil 00

मस्त

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2018 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा

फोटुऊऊऊऊ ! :-/