अर्थक्षेत्र : एका समूहाची वाटचाल.... आणि आभार...

ज्ञानव's picture
ज्ञानव in जनातलं, मनातलं
11 Feb 2018 - 1:35 pm

दिनांक २१/०९/२०१६ ला अर्थक्षेत्र ह्या व्हॉटस अप समूहाची निर्मिती करून आज वर्ष सव्वा वर्ष होते आहे. पहिल्या समुहाने व्हॉटस अपची २५६ सदस्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे दिनांक १३/१२/२०१७ रोजी, अर्थक्षेत्र - २ ह्या समूहाची सुरवात करणे भाग पडले. त्यात देखील १००+ सदस्य सामील झाले. श्री केदार शुक्ल आणि मिपाकर ह्यांचे धन्यवाद ! त्या शिवाय हे शक्य झाले नसते. ह्या समुहामुळे मराठी माणसाची व्यवसाय करण्यासाठीची कळकळ प्रकर्षाने जाणवली. तसेच व्यवसायाबद्दलचा दृष्टीकोन किती व्यापक आहे, अडचणींवर मात करण्याची जिद्द किती अफाट आहे हे जाणवले. एका वेगळ्याच पण समविचारी मित्रांचा सहवास गेले सव्वा वर्षात सुखावून गेला. शेअर्स हा जरी मुख्य विषय असला तरी त्याच्या अनुषंगाने येणारे इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषय चर्चिले गेले. विमा, क्रेडीट कार्ड, बँकाची कस्टमरशी असणारी नाती आणि सेवा पुरवण्याची योग्यायोग्य पद्धत त्यातून कोणत्या बँका चांगल्या आणि कोणत्या ठीकाय श्रेणीतल्या आहेत ते कळले.आणि इतर अनेक चर्चा सतत होत राहिल्या त्या हेल्दी स्वरूपात होण्याचे सगळे श्रेय समूह सदस्यांना आणि त्यांच्या मुक्तपणे व्यक्त होण्याला जाते. हे सगळे चर्चा ह्या स्वरूपात आणि आतिशय पद्धतशीरपणे मांडले गेले कुठेही भांडण नाही किंवा वाद प्रतीवाद नाही. त्यामुळे मराठी माणूस एकत्र आला तर केवळ भांडतो किंवा ह्या प्रकारचे गृप जास्त काळ टिकत नाहीत हे सल्ले फोल ठरले. तसेच एकही फालतू फॉरवर्ड न करण्याची तसेच मोदी किंवा कुठलेही राजकीय पोस्ट शेअर न करण्याची शिस्त सर्वानीच पाळली हे अत्यंत स्तुत्य आहे.
कदाचित, शेअर्स हा माझा मुख्य विषय असल्याने, गृप फक्त शेअर्स ह्या विषयाशी इतर अनेक व्यवसाय विषयक चर्चांपेक्षा अधिक निगडीत राहिला. पण नवोदितांना दिशा दर्शक ठरण्यात यशस्वी झाल्याचे समाधान लाभले. वरील सर्व कारणांमुळे सर्व सदस्यांचा मी कायमच ऋणी राहीन. श्री. प्रसाद जोशी( आय.पी.ओ. आणि शेअर्स ह्या विषयाची इतर बेसिक माहिती) , श्री. दादा कुलकर्णी(डेरीव्हेटिव्हजमध्ये ह्यांचा स्ट्राईक रेट ९०% आहे.) , श्री. योगेश कुलकर्णी(फंडामेंटलचे उत्तम ज्ञान) , श्री. विक्रम चीटगोपकर(Charting ला इतके वाहून घेतलेला माणूस मिळणे हे भाग्यच आहे.), श्री संदीप बागलकर (शेअर्स विषयक अवांतर भाष्य तेही मार्मिक आणि अव्वल इंग्रजीत केवळ अप्रतिम !) श्री. श्याम भागवत (रिसर्च आणि डेटा अॅनालीसीसमध्ये ह्यांचा हात धरणे अशक्य. त्रिवार सलाम ) हि मंडळी नसती तर?? ग्रुपला अवकळा आली असती किंवा तो टिकला नसता. एक उत्तम टीम वर्क तयार होणे हे केवळ विधात्याच्या मर्जीनेच होत असावे. इतक्या व्यक्ती आणि इतक्या वल्लीमुळे मार्केटचे अनेक पैलू नव्याने जाणवले. तसेच नवोदिताचे प्रश्न, गोंधळणे का आहे त्याबद्दल विचार करणे शक्य झाले.
मार्केटमध्ये आज, शेअर बाजाराचा निर्देशांक ३६००० ह्या पातळीला स्पर्श करून आल्यावर अनेक नवोदितांचे लोंढे मार्केटकडे ओढले जाऊ लागले आहेत. तसे ते मार्केटच्या, प्रत्येक नवीन उच्चतम पातळीला येत असतात असा अनुभव आहे. तेच प्रश्न, तीच तऱ्हा दरवेळेस अनुभवता हि येत असते.
" काय रे पैसे जाणार नाहीत ना शेअर म्हणजे जुगार ना ??" हा प्रश्न रिटायर्ड बँक कर्मचारी विचारतो हा अत्यंत गमतीदार विरोधाभास आहे.
"थोडे कमावले पण बरेचसे गेले. (एक दिर्घ पॉज ) ते टेक्निकल अॅनालीसीस काय असते? ते चार्टस का काय ते....तुम्ही / तू शिकवतोस काय ?" शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मागच्यावेळेस उच्चतम पातळी जेव्हा गाठली होती त्या वेळच्या लोंढ्याबरोबर आलेला एक तरुण. ह्यांचे हात टिप्समुळे पोळलेले असतात, साधारण वय ३५ -४० च्या आसपास, अनुभवाचे पुटं चढलेला हा जास्त डेंजरस असतो कारण त्याला समग्र डेरीव्हेटिव्ह सेक्शन म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग इतकेच माहित असते. ह्या वेळेस ह्याच वर्गातली स्वतःला आयटी हमाल म्हणवणारी एक अख्खी टोळी मला येऊन धडकली.
पण शेअर बाजाराच्या दोन उच्चतम पातळ्यांवर आत आलेली हि मंडळी आणि मार्केट आवड्ल्याने (?) पण नीटसे न उमगल्याने गोंधळलेली तरीही, आत्ता नीट सगळे शिकून नव्याने सुरुवात करू ह्या आशेने धडपडणारी हि मंडळीच व्यवसायाचा नैसर्गिक नियम शिकत असतात. तग धरणे हा धडा किंवा व्यवसायाचा जम बसवणे हि प्रक्रिया नकळत घडत असते.
ह्या वेळेस मला आवडलेली घटना म्हणजे मार्केटमधला स्त्रियांचा सहभाग वाढला आहे. गेली अनेक वर्षे एकदोन - एकदोन स्त्री सदस्य मला ट्रेडिंग करताना आणि यशस्वी ट्रेड करताना दिसत होत्याच पण यंदा (३६००० ह्या पातळीला) स्त्रियांचा सहभाग लक्षणीयरित्या जाणवला.

तर मार्केटमध्ये येणारी हि नवीन मंडळी आणि काल आलेली अंमळ अनुभवी मंडळी ह्यांचे स्वागत आहेच. पण अर्थक्षेत्र सारखा व्हॉटस अप समूह ३५० लोकांना दिशादर्शक ठरला हे समाधान वर्णनातीत आहे. वर उल्लेख केलेल्या व्यक्तीचे ऋण आयुष्यभर राहतील. पण श्री केदार शुक्ल ह्यांचे विशेष आभार मानलेच पाहिजेत. एखाद्या, व्यक्तीला ज्या विषयाची आवड आहे, गती आहे त्या विषयाचे व्हॉटस अप समूह तयार करण्याबाबत, प्रोत्साहन मिळावे म्हणून त्या विषयातले समविचारी शोधून त्या माणसांची आणि गृपची गाठ घालून देणे हे कार्य ते अव्याहत करत आहेत. प्रसंगी "त्यांचे नाव आता गिनीज बुकात द्यायला हवे बाबा." हा विनोद हि त्यांच्या मागे कौतुकाने केला जातो.
लेख थोडा विस्कळीत आहे आणि अर्थक्षेत्र सिरीजमधला शेवटचा आहे. भल्या मोठ्या अर्थक्षेत्रात खारीचा वाटा.
मिसळपावचे विशेष आभार कारण काही ओळखी इथूनच झाल्या. काही सदस्य इथूनच आले आहेत.

धन्यवाद.....

अर्थव्यवहार

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

11 Feb 2018 - 1:49 pm | manguu@mail.com

छान

मी-सौरभ's picture

11 Feb 2018 - 3:00 pm | मी-सौरभ

ही तर सुरुवात आहे
पुढच्या सर्व यशस्वी योजनांसाठी हार्दिक शुभेच्छा

ज्ञानव's picture

11 Feb 2018 - 3:30 pm | ज्ञानव

तुमची साथ असेल तर नक्कीच.....

कुलदादा's picture

14 Feb 2018 - 11:52 pm | कुलदादा

एकमेका साह्य करू
अवघे बनू श्रीमंत!

कलंत्री's picture

11 Feb 2018 - 4:02 pm | कलंत्री

अर्थक्षेत्र हा खेळीमळीचे वातावरण असलेला समूह आहे. येथे माहिती आणि ज्ञानाचे आदान प्रदान अतिशय उमद्या वातावरणात होत असते. आज पर्यंत बरीच अभ्यासवर्ग झाली आणि माझ्यासारख्या अडाण्यानाही यातल्या खाचाखोचा काहीशा प्रमाणात समजू लागल्या याचे निर्विवाद श्रेय शिशिर आणि चमूला दिले पाहिजेच.

अजून बराच मोठा पल्ला गाठावयाचा आहे त्यासाठी आमच्या शुभेच्छा.

ज्ञानव's picture

11 Feb 2018 - 4:16 pm | ज्ञानव

तुम्ही पाठीशी आहात म्हंटल्यावर पल्ला गाठणारच आपण.

नाखु's picture

11 Feb 2018 - 6:43 pm | नाखु

त्यात निष्णात असलेल्या ं प्रवेश आहे का आमच्या सारख्या बनचुक्या नवशिक्या सदस्यांना प्रवेश आहे ??

वाटचालीला शुभेच्छा

ज्ञानव's picture

11 Feb 2018 - 8:06 pm | ज्ञानव

प्रवेश आहे. बाकी निष्णात वगैरे कुणी नाहीत. काहीजण थोडे पुढे काहीजण थोडे मागे आहेत.

सतिश गावडे's picture

11 Feb 2018 - 8:20 pm | सतिश गावडे

या समुहाचे सदस्यत्व तसेच मिळणारे सल्ले/कार्यशाळा वगैरे मोफत असतात कि सशुल्क?

ज्ञानव's picture

11 Feb 2018 - 10:30 pm | ज्ञानव

पूर्णतः निशुल्क. सल्ले म्हणज टिप्स असे असेल तर निराशा होऊ शकते कारण टिप्स दिल्या जात नाहीत. कार्यशाळा सशुल्क आहेत.

सतिश गावडे's picture

11 Feb 2018 - 10:45 pm | सतिश गावडे

कार्यशाळा सशुल्क आहेत.

:)

ज्ञानव's picture

12 Feb 2018 - 5:59 am | ज्ञानव

ह्या चिन्हाचा अर्थ मला समजत नाही.

पण कार्यशाळा हे गृपचे उद्दीष्ट नव्हे. जेव्हाकेव्हा त्या घेतल्या जातात तेव्हा जागेचे भाडे+प्रोजेक्टरचे भाडे+थोडा खाऊपिऊचा खर्च लक्षात घेऊनच शुल्क आकारले जाते. त्यानंतर संपूर्ण वर्षभर मार्गदर्शन करताना त्यांच्याकडून शुल्क घेतले जात नाही तसेच वर्षभरात त्यांची फी ते स्वतःच मार्केटमधून वसूल करू शकतील अशा टास्क दिल्या जातात. आजवर सहभागी झालेल्यांचे शुल्क वसूल झाल्याबद्दल बरेच जणांनी मान्य केले आहे.

कलंत्री's picture

11 Feb 2018 - 10:51 pm | कलंत्री

शुल्क नाममात्र असते. एक वर्षभर आपण कितीही वेळेस अभ्यासवर्ग मध्ये बसु शकतै.

जूलै पासुन मी असंख्य वेळेस अभ्यासवर्गाचा फायदा घेतला. प्रत्येक वेळेस संकल्पना स्पष्ट होत गेल्या.

भागभांडवल बाजार शिकण्याचा विषय आहे ही माझी समजूत दृढच होत गेली.

शाम भागवत's picture

11 Feb 2018 - 8:22 pm | शाम भागवत

शिशीर सर केवळ तुमच्यामुळे हा ग्रुप भरभराटीला आलाय.
_/\_

उपयोजक's picture

12 Feb 2018 - 7:21 am | उपयोजक

या आणि यापुढील सर्व उपक्रमांस खुप सार्‍या शुभेच्छा !

अर्थक्षेत्र ह्या व्हॉटस अप समूह चे सदस्य कसे व्हावे?

व कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी काय करावे ?

ह्या संदर्भात माहिती कुठे मिळेल,,

अर्थक्षेत्र ह्या व्हॉटस अप समूह चे सदस्य कसे व्हावे?

व कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी काय करावे ?

ह्या संदर्भात माहिती कुठे मिळेल,,

ज्ञानव's picture

12 Feb 2018 - 1:58 pm | ज्ञानव

नंबर वर व्हॉटस अप द्वारा संपर्क साधा. आपले पूर्ण, नाव आणि लोकेशन कळवा. समुहात सामील करून घेण्यात येईल.

श्रीकांत पवार's picture

12 Feb 2018 - 6:14 pm | श्रीकांत पवार

अनेक धन्यवाद

नाखु's picture

12 Feb 2018 - 8:59 am | नाखु

अडाणी प्रश्न
सदस्य होण्यासाठी कुठे संपर्क साधावा
कार्यशाळा रविवारी घेतल्या जातात का? (तोच दिवस येऊ शकतो)
फक्त भांडवल बाजारात सल्ला /मार्गदर्शन केले जाते की म्युचुअल फंडा बद्दल विवेचन/मार्गदर्शन केले जाते

सदस्यत्व घेण्यासाठी उत्सुक नाखु

ज्ञानव's picture

12 Feb 2018 - 2:41 pm | ज्ञानव

९९३०९०१९८८ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यशाळा शनी - रवी ९ ते ४ ह्या वेळेत घेतल्या जातात. पुढे संपूर्ण वर्ष कार्यशाळा केव्हा, कुठे आहे ते कळवले जाते शक्य असल्यास तुम्ही उपस्थित राहू शकता. तसेच, कार्यशाळा पूर्ण केल्यावर काही टास्क दिल्या जातात, त्यापैकी कुणाच्याही सल्ल्याशिवाय पोर्टफ़ोलिओ कसा तयार करावा हि मुख्य टास्क आहे. प्रत्येक नवोदिताकडे जातीने लक्ष देण्याचा प्रयत्न इतर अनुभवी सदस्य करत असतात. मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात अपेक्षा हीच कि त्या नावोदिताची कुठे फसगत होऊ नये. मार्केट बदनाम होऊ नये आणि त्याचे आर्थिक नुकसान होऊ नये.

निमिष सोनार's picture

12 Feb 2018 - 12:13 pm | निमिष सोनार

अशीच वाटचाल होत राहो.

मराठी_माणूस's picture

12 Feb 2018 - 12:14 pm | मराठी_माणूस

इथेच म्हणजे मिपावर "अर्थमिपा" असा साहित्य प्रकार चालु करता येइल का ?

मी आपल्या ग्रुप ची सदस्य आहे आणि हा ग्रुप खरोखर अर्थविषयक माहितीत मोलाची भर टाकतो यात तसूभरही शंका नाही.

ज्ञानव's picture

12 Feb 2018 - 1:24 pm | ज्ञानव

धन्यवाद.

पैसा's picture

12 Feb 2018 - 12:47 pm | पैसा

भांडणे न होता एवढे मोठे ग्रुप्स चालू ठेवल्याबद्दल अभिनंदन! मिपाकरांना अर्थसाक्षर करताना अर्थविषयक काही लिखाण इथे मिपावरही जरूर चालू ठेवा.

ज्ञानव's picture

12 Feb 2018 - 1:22 pm | ज्ञानव

गृप चालू राहणे (आणि एकही भांडण न होता) ह्याचे सारे श्रेय सर्वस्वी सदस्यांना जाते. टीम वर्कचे उत्तम उदाहरण आहे. श्याम भागवत आणि टका (उर्फ....) ह्यांचे रिसर्च आणि अॅनालीसीस उल्लेखनीय, स्तुत्य आहे.

मृत्युन्जय's picture

12 Feb 2018 - 3:47 pm | मृत्युन्जय

एका उत्कृष्ट मिपा गृप बद्दल आपले अभिनंदन आणी आभार :)

माझीही शॅम्पेन's picture

12 Feb 2018 - 3:55 pm | माझीही शॅम्पेन

शिशिर सर रॉक्स !!!!!!!!!!!!!!!!!!

शिशिर सर , विक्रम सर , प्रसाद सर आणि शामरावसर हि अफलातुन लोक आहेत , मी जाम शिकतोय , सर्वांना धन्यवाद __/\__

सॅगी's picture

12 Feb 2018 - 6:58 pm | सॅगी

सर्वच सर लोकं रॉक्स!!!!

साधा मुलगा's picture

12 Feb 2018 - 6:37 pm | साधा मुलगा

आपलया ग्रूपचा उपक्रम स्तुत्य आहे, या ग्रुप मध्ये passive मेम्बर म्हणून ऍड करू शकता का? मला व्हॉट सॅप ग्रुप मध्ये सहभागी होणे आवडत नाही, पण माहिती चांगली देत असाल तर वाचनमात्र सहभागी व्हायला आवडेल. जमलेच तर माझ्याकडून दोन पैशाची भर घालीन.

ज्ञानव's picture

13 Feb 2018 - 7:38 am | ज्ञानव

ह्याच धाग्यावर एका प्रतिसादाला ऊत्तर देताना मोबाईल नंबर दिला आहे. आपण संपर्क साधू शकता.
धन्यवाद

चिक्रम's picture

12 Feb 2018 - 7:38 pm | चिक्रम

खरं श्रेय तर समुह चालवणार्या अॅडमिन ला दिलं पाहिजे.
एवढ्या नियंत्रितपणे, संयम राखून, कुठलाही अपशब्द न वापरता (आणि कुणालाही बाहेरचा दरवाजा न दाखवता) समूह चालवणे आणि सर्वांच्याच ज्ञानात भर पडेल याची काळजी घेणे हे खरंच जिकीरीचं काम आहे, ते शिवधनुष्य लीलया पेलल्याबद्दल पेठकरांचे अभिनंदन व आभार.

ज्ञानव's picture

13 Feb 2018 - 7:39 am | ज्ञानव

(ऊर्फ विक्रम) मनःपूर्वक धन्यवाद.

योगी९००'s picture

13 Feb 2018 - 10:47 am | योगी९००

शिशिर सर आपले नाव " ज्ञानव" सार्थक करतात. त्यांच्या मुळे आणि ग्रुपवरील इतर मुळे माझ्याही ज्ञानात भर पडली आणि थोडेफार ट्रेडींग करू लागलो.

सरांचा एक क्लास अटेंड केला. त्याची फी ३ महिन्यात वसूलही झाली. सरांनी वरील दिलेले फी घेण्याचे कारण पटण्यासारखे आहे. त्या क्लासमध्ये आपण फक्त जागेचे भाडे+प्रोजेक्टरचे भाडे+थोडा खाऊपिऊचा खर्च भरत असतो. ज्ञान विनामुल्यच मिळते असे वाटले. बाकी प्रसाद जोशी, दादा, विक्रम यांचा क्लास अटेंड करायचे बाकी आहे.

तेवढे एकदा बंगलोर जमवा सर...मी परत येईन क्लासला...!!

ज्ञानव's picture

13 Feb 2018 - 11:09 am | ज्ञानव

योगेश जी, नक्कीच प्रयत्न करतो. थोडा वेळ द्या.

सर्वसाक्षी's picture

13 Feb 2018 - 11:12 am | सर्वसाक्षी

इथे म्युच्युअल फंडावरही चर्चा/ माहिती असते का

ज्ञानव's picture

13 Feb 2018 - 2:25 pm | ज्ञानव

हि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असल्याने तुम्ही जर प्रश्न विचारलेत तर उत्तरे नक्की मिळतातच. पण प्रश्नाचे स्वरूप " फलाणा शेअर / म्युचुअल फंड / आय पी ओ घ्यावा का ?" असे असेल तर थोडे कठीण आहे. तुम्हाला तो घ्यावा असे जर कुणी सुचवले असेल तर ते तसे का सुचवले ? तुम्ही तुमचा अभ्यास त्यावर काही केला आहे का ? वगैरे बाबी लक्षात घेऊनच उत्तर मिळेल. अन्यथा आळशी प्रश्न म्हणून दुर्लक्षित राहू शकतो. कारण इथे कुठे गुंतवणूक करू ? ह्या प्रश्ना पेक्षा गुंतवणूक कशी आणि का करावी ह्या बाबत चर्चा अधिक होतात. एक दोन महिन्यातून सोडून जाणारे पण असतात त्यामुळे जे लॉंग टर्म टिकले तेच काही तरी शिकले असा अनुभव आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2018 - 5:18 pm | अमरेंद्र बाहुबली

खूप छान ग्रुप. मला खूप माहिती मिळाली ह्या ग्रुप मुळे मार्केटची. शिशिर सर, दादा कुळकर्णी, विक्रम सर आणि प्रसाद जोशी. ह्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली अनेकजन मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. माझे अनेक महाराष्ट्रा बाहेरील मराठी न येणारे मित्र ह्या ग्रुप मध्ये आहेत.

ज्ञानव's picture

13 Feb 2018 - 7:09 pm | ज्ञानव

आपले सर्वांचे सहकार्य हा भक्कम पाया आहे आपल्या ग्रुपचा.

स्थितप्रज्ञ's picture

14 Feb 2018 - 4:41 pm | स्थितप्रज्ञ

लेख अजिबात विस्कळीत नाहीये. मुद्देसूदच लिहिलंयत.

एखादा मुंबई बाहेरचा नवखा माणूस ट्रेनमधून दादर स्टेशनला पहिल्यांदा उतरतो आणि त्याला हार्बर लाईनची ट्रेन पकडून वाशीला जायचे असते. आशा वेळेस त्याची जी भंबेरी उडते तसाच काहीसा अनुभव मला या समूहात सामील झाल्यावर आला. आधी वाटलं असंख्य ग्रुप्स सारखा एखादा ग्रुप असेल ज्यावर नुसता टिप्सचा सुळसुळाट असेल पण इयचे भलतंच चाललं होतं! एकसे एक दिग्गज लोक त्यांचे analysis आणि अंदाज शेयर करत होते. माझ्यासारख्या कलांताराने जुन्या पण अनुभवाने नवख्या माणसाला त्याचा अन्वयार्थ कसा लावावा कळत नव्हते. पण बाकीच्या इथे असलेल्या अनुभवी मिपाकरांकडून श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा सल्ला मिळाला. त्यामुळे वेट अँड वॉच चालू होतं.
शिशिरजींने म्हंटल्याप्रमाणे "समग्र डेरीव्हेटिव्ह सेक्शन म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग इतकेच माहित" असणारा मी मध्यंतरी बिनबुडाचे ऑपशन्स ट्रेड करून चांगला सपाटून मार खाल्ला होता.
पण काही झाले तरी ट्रेडिंग सोडून द्यायचे नाही असे मनाशी ठरावल्यामुळे असा ग्रुप नशिबी आला असावा. इथून भरपूर प्रेरणा घेऊन आता अभ्यासपूर्ण ट्रेड्स चालू केले (आधीपेक्षा स्ट्राईक्रेट सुधारला). अजून उठसूट FNO ला हात लावण्याइतपात आपली लायकी नाही जे ही इथेच समजले त्यामुळे सध्या फक्त कॅश ट्रेडिंग चालू.
या समूहात नसतो तर अजूनही आपण एकदा ट्रेडिंग सुरू करू या आशेवर आशाळभूतपणे रोज वाढणाऱ्या/उतरणाऱ्या मार्केटकडे बघत बसलो असतो!

समूहातल्या सर्व अर्थक्षेत्रीचे आभार मानू तितके थोडेच आहेत!!!

ज्ञानव's picture

14 Feb 2018 - 5:26 pm | ज्ञानव

आपल्या विस्तृत अभिप्रायामुळे आणखीन हुरूप आला. तसेच ऊद्देश सफल झाल्याची भावना अधिकच दृढ झाली.
मनःपूर्वक धन्यवाद

जव्हेरगंज's picture

14 Feb 2018 - 11:42 pm | जव्हेरगंज

तुमचे जुने लेख शोधून वाचले आहेत. अतिशय उत्तम आहेत.

ज्ञानव's picture

15 Feb 2018 - 3:17 pm | ज्ञानव

जव्ह्रेरगंज जी धन्यवाद.

दिपस्तंभ's picture

16 Feb 2018 - 12:00 pm | दिपस्तंभ

(पहिल्या समुहाने व्हॉटस अपची २५६ सदस्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे दिनांक १३/१२/२०१७ रोजी, अर्थक्षेत्र - २ ह्या समूहाची सुरवात करणे भाग पडले. )
जर आपण टेलिग्राम ऍप वापरले तर? त्याची समूह संख्या 10 हजार पर्यंत आहे

दिपस्तंभ's picture

16 Feb 2018 - 12:07 pm | दिपस्तंभ

सदस्य मर्यादा 1 लाख झालीय

ज्ञानव's picture

16 Feb 2018 - 7:55 pm | ज्ञानव

आम्ही १५ दिवस राहून आलो टेलीग्रामात पण सदस्यांना व्हॉटस अपच हवे आहे. त्यामुळे गप गुमान परत आलो आणि दोन गृप केले. आज सांगताना आनंद होतो आहे कि दुसरा गृप पण २५१/२५६ जवळ पोहोचला आहे. काही सदस्य येतात काही जातात त्यामुळे नवीन सदस्य प्रवेश हि होत असतो.

कलंत्री's picture

17 Feb 2018 - 2:35 pm | कलंत्री

भागभांडवल बाजाराशिवाय आर्थिकप्रगतीला पर्याय नाही आणि प्रत्येक वेळेस मात्र अपयशच आले अशा पार्श्वभूमीवर अर्थक्षेत्र या समुहाशी परिचय झाला. लास्ट इनिंग म्हणूच मी पाहत होतो.

अभ्यासवर्ग केला आणि प्रथमिक पायर्‍य ओलांडतच प्रवास सुरु झाला. रोजची बाजारातील वटघट आणि त्यातूनच पैसे मिळवण्याची धडपद सुरु झाली. आलेख शास्त्राचा अभ्यास विक्रम भौ यांनी बर्यापैकी शिकविला. बरेच आलेख अभ्यासासाठी पाठवत होते. त्यातून काही पाया पक्का झाला तर काहीठिकाणी स्वताच्या धांदरटपणामूळे नुकसानही प्राप्त झाले. एक लक्षात आले की पूर्वी नुक्सान झाले की कोणीतरी जबाबदार असे आता नुक्सान झाले तर मीच चूकीचे निर्णय घेत आहे असा स्पष्ट कौल मिळू लागला. जबाबदारी घेण्यासारखे सुख नाही.

असो, अनेक तरुणांनी या कडे सकारात्मक नजरेने बघावे असे सुचवावसे वाटते.