https://www.misalpav.com/node/41800
मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता.
पदवीचा विषय आहे भूगोल.
भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या.
ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे. परीक्षेची तयारी हे एक नवीन फ्याड निघाले आहे पोरींचे.
सासर पेक्षा माहेरी अभ्यासासाठी जास्त वेळ मिळू शकतो, असा त्यांचा दृढविश्वास. आयला या न्यायाने लग्नाआधीच चांगला अभ्यास केला असता तर मन्यासारख्या खोडाशी लग्न करावे लागले नसते.
पण या नवीन लग्न झालेल्या पोरींचे देखील बरोबर आहे म्हणा. लग्न झाल्याझाल्या सासरकडच्या शेजाऱ्यांना लगेच गुड न्यूज हवी असते. त्रयस्थ शेजाऱ्यांनी एक वीट आणलाय.
मन्याची आई कुरकुर करत होती पण त्याच म्हातारं म्हणाले वाटते जाऊ दे तिला.
त्यात तिचं मतदार यादीत नाव देखील नव्हते. त्यामुळे मन्याची ना नव्हती.
म्हातारं हुशार होते. सुनबाई खुश तर म्हातारपण नीट.
त्यांचा आंतरिक मामला आहे. आपल्याला काय करायचे म्हणून रस्त्यावर आडव्या येणाऱ्या दगडांना किका मारत निघालो. तसे शांतारामच कुत्रं भसकन माझ्या अंगावर आले. एरव्ही माझ्या गाडीचा आवाज आला की शेपटी हलवत रस्त्यावर स्वागतासाठी यायचे.
पण ग्रामपंचायत लागल्यापासून ते सुद्धा गुरगुरायला लागलाय.
त्याला म्हंटले जरा अदबीने महाराज..!!
-----
नानांच्या खोलीची लाईट चालू होती. पुढे येऊन पाहिले तर दरवाजा पण उघडा होता. घरात ३-४ लोक आहेत याचा अंदाज आला. आत जाऊन पाहिले बायको नानांचे तळवे काशाच्या वाटीने घासत होती. नाना थंडी ने थडथड उडत होते. चेहरा एकदम फ्रिज मधून काढलेल्या टोमॅटो सारखा दिसत होता.
" काय झाले?" मी विचारले.
" पहिला मोबाईल बघा." बायको.
ह्यात त्याच्या आयला. मिस कॉलचं मन्याच्या बायकोचे रेकॉर्ड तुटले होते.
" काय झोपेत होतात की काय? का जास्त झालती ?"
झोपलो तर नव्हतो मी आणि काहीही नसताना देखील, घेत नाही फक्त एवढ्याच गुणावरून तर तू माझ्याशी लग्न केले होते." माझा केविलवाणा खुलासा.
" तुम्ही ते नंतर भांडा, आधी नानांना नेले पाहिजे दवाखान्यात." शेजारची ताई.
मी इंडिकाची चावी शोधायला लागलो. सापडेचना. नेहमी प्रमाणे तिला विचारण्याच्या फंदात न पडत स्वतःच शोधू लागलो.
" नका घाबरू, मी ठेवली आहे फडताळी वर नीट. सकाळी देवळावर विसरला होतात."
मी लगबगीने गाडी काढिली. दोघं तिघांनी धरून नानांना गाडीत बसवले. राजू मामा नानांना धरून बसला. बायको पुढे बसली. मन्याला सोबत घ्यावे म्हंटले पण त्याचा भूगोल आठवला.
रात्रीचे २.30 वाजले होते.
हुडहुडी काय थांबेना. आणखी एक ब्लॅंकेट टाकले.
ती : " फोन का उचलत नव्हता तुम्ही ?"
मी : " अरे सायलेंट वर पडला होता."
अचानक गाडीसमोर ३-४ जणांचं टोळकं आले. मी करकचटून ब्रेक टाकला.
" भैया हे बरोबर नाही. प्रचार संपलाय कालच. डिपार्टमेंटला आम्ही कंप्लेंट करू मग." एक जण.
" आनंदा, अरे बाबा नाना आहेत मागे, त्यांची तब्येत बिघडली आहे, नीरेला दवाखान्यात घेऊन निघालो आहे." मी आर्जव केले.
त्यांना विश्वास नव्हता. त्यांनी मागच्या खिडकीतून डोकावले. नाना हुडहुडत होते.
राजुमामाला पाहून त्यांच्या जीवात जीव आला.
" जाऊ दे रे यांना. आपला माणूस बसलाय मागे. डोन्ट वोरी चं काम नाही." आम्हाला ग्रीन सिग्नल आणि त्यांना खूप मोठी ब्रेकिंग न्युज मिळाली होती.
नाना हुडहुडत होते पण पूर्ण शुद्धीत होते. 'आपल्या' माणसाच्या कुशीत स्वतःला पाहून त्यांना उर्जे बरोबर ऊब मिळाली.
नानांनी राजुमामाला झटकला आणि बाजूच्या सीट वर टेकून बसले.
मी गाडी चालवत असताना कंपाउंडरला फोन केला आणि पेशंट घेऊन येतो आहे याची दवंडी दिली.
तशी दिली नसती तरी चालली असती. माऊली आलेत एवढे जरी डॉक्टरांनी स्वप्नात ऐकले असते तरी ते राजा हरिश्चंद्रासारखे धावत पळत सुटले असते.
नानांनी त्यांच्यावर प्रेम करणारी अशी खूप लोक कमावली होती.
माझ्या मनाच्या संकल्प डायरीत मी एक नोंद केली. आगामी येणाऱ्या नवीन वर्ष्यात किमान २ माणसे तरी कमवायची. असो .
गेटसमोर कंपाउंडर उभाच होता. आम्ही नानांची झोळी करून त्यांना अलगद दवाखान्यात नेले.
हॉस्पिटलमध्ये शेवटच्या मजल्यावर डॉक्टरांचे घर होते. डॉक्टर अभ्यासाचे पुस्तक बाजूला ठेवून त्वरेने खाली आले. हे मात्र खरे आहे की प्रोफेशनल डिग्रीवाल्या लोकांना कामाबरोबर आयुष्यभर अभ्यास करावा लागतोच. प्रपंच कधी करतात देव जाणे. तो त्यांचा आंतरिक प्रश्न होता. जाऊ द्या आपल्याला काय करायचे असे म्हणून किक मारणार तेवढ्या शांतारामचं कुत्रं आठवलं.
" माऊली काय झाले? कशामुळे एवढी थंडी वाजते आहे ? काय टेन्शन वगैरे घेतले होते का ?" डॉक्टरांनी प्रोबिन्ग केली.
नानांना दरदरून घाम आला होता. कोपरी (बंडी किंवा शिवून घेतलेला खिश्या खिश्याचा गंजीफाराक) संपूर्ण भिजली होती.
" त्यांची सकाळची बीपीची गोळी चुकली होती म्हणून रात्री एकदम २ गोळ्या खाल्ल्या आणि थोड्या वेळाने त्यांना त्रास होयला सुरवात झाली ." आमच्या मॅडमनी कारणमीमांसा दिली.
मी डॉक्टरकडे पाहून कपाळाला हात लावला आणि धोतराकडे कटाक्ष टाकला.
------
सलाईन वगैरे लावेपर्यंत उजाडायला आले होते. राजुमामाला घेऊन मी निरेतल्या चौकात चहाच्या टपरीवर गेलो. पंढरपूर रोडवर असणारी ही टपरी २४ तास चालू असते. मस्त चहा मारला आणि घरून आणलेल्या स्टीलच्या ग्लासमधे चहा घेतला. आता सगळ्यांना प्रश्न पडेल स्टीलचा ग्लास का आणि कसा काय आणला होता सोबत ?
अनुभव मित्रो अनुभव. अगोदर आजीला आणि आता कधी मधी नानांना ऍडमिट केले की दवाखान्याचा इव्हेंट कसा व्यवस्थित पार पाडायचा याचा चांगला अनुभव आम्हा नवरा बायकोला आला होता.
दवाखान्यात भेटलेल्या रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांचा आमचा व्हाट्सअप ग्रुप देखील आहे.
आमचं अख्खे घरचं समाजप्रेमी आहेत. इलाजच नाही.
रूममधे शिरलो तसे अपेक्षेप्रमाणे नानांचे चार ही मेव्हणे त्यांच्या बेडभवती उदास मुद्रेत बसले होते.
१० किमी वर असणाऱ्या शेजारील गाव नानांची सासुरवाडी होती.
आजी जाऊन ३ वर्षे होऊन देखील सासरवाडीचे जावयाप्रती आणि नानांचे सासुरवाडी प्रति प्रेम तुसभरदेखील कमी झाले नव्हते.
त्यांना पाहून नानांचा बीपी बऱ्याच अंशी नॉर्मल अवस्थेत येऊन ठेपतो असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यांच्याच घरातील एखाद्या लहान पोराचा '' पापा घेऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेत असत.
माझी ही रुटीन ठरलेली होती.
ग्लासातल्या चहाचे बरोबर पाच हिस्से केले आणि कागदी ग्लास त्यांच्या पुढे केले. नाना चहा घेत नाहीत हे सर्वाना माहित आहेच.
मी डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे त्यांना समजावून सांगितले.
"दाजी कशाला या वयात राजकारणात वगैरे पडलात. आराम करायचा.जीवाची काळजी करायची" थोरल्या पण वयाने नानांपेक्षा ५-६ वर्षांनी लहान असलेल्या मेव्हण्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बोलण्याचा धडा केला.
नानांनी सलाईनची सुई असणाऱ्या हातानेच त्यांना निघायचा इशारा केला.
पहिल्यापासून धोतार लय तरवाट होते त्यामुळे सासरवाडीकर सगळे मापात होते.
सुई आऊट झाली ना...!!
------
नानांना पुणेचा वृत्तांत भडाभडा सांगू वाटत होता पण रात्रभर झोप नसल्यामुळे पित्ताच्या भडाभडा उलट्या कराव्यात हा विचार बळावला.
त्या पेक्षा मोठे दिव्य माझ्या समोर होते ते म्हणजे माउलींना भेट द्यायला येणाऱ्या लोकांचे नियोजन.
गावाचे एक वैशिष्ट्य होते. कोणी ही ऍडमिट असू देत घरा गिनीज एक तरी त्या व्यक्तीला भेटायला जाणारच.
नानांचा गोतावळा तर खूपच मोठा होता.
चहावाल्याला मी ऍडव्हान्स देऊन ठेवला.
९.३० वाजल्यापासून रांगच लागली. लोकांची गर्दी पाहून हॉस्पिटल स्टाफ वैतागला. त्यांनी मला त्याबाबत विचारणा केली की लोकांना पेशंटला भेटून देऊ नका. इतर पेशंटला त्रास होतो आहे.
मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की हे माझ्या बसची बात नाही. हॉस्पिटल नियमात बसवून तुम्हीच तोडगा काढा.
डॉक्टरांनी पायऱ्यांवरून जाता जाता स्टाफला इशारा केला, एक दिवस अड्जस्ट करा.
समर्थक विरोधक जवळ पास सगळे मतदार नानांना भेटायला आले. प्रत्येकाचा हातात हात घेऊन नाना काही तरी पुटपुटत होते.
संग्राम, भावी सरपंच, संभाजी आणि इतर उमेदवार सगळे फळं नारळपाणी घेऊन भेट देऊन गेले. नानांनी कशाला ही तोंड लावले नाही.
सगळे काळजीत पडले पण मी मात्र निश्चिन्त होता.
अनुभव मित्रो अनुभव.
पाच वाजायच्या दरम्यान पाचही दाढीवाले नानांना भेटायला हॉस्पिटल मधे आले. फक्त व्यक्तिगत सौजन्य हेच कारण नसावे.
भेटायला येणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या कानात नाना काय पुटपुटले याचा मागोवा घायचा हेतू त्यांच्या चेहऱ्यावर लपता लपत नव्हता.
" अनाधिकृत प्रचार आवडला बरका माऊली. आम्हाला कितीही तंगवले तरी लक्ष्यात ठेवा घासून नाही तर तासून येणार" चाणाक्ष सायबूनानाने जाता जाता बॉम्ब फेकला.
सकाळपासून काहीही न खाल्लेल्या नानांनी विजूबापुनी आणलेल्या काश्मिरी सफरचंदाच्या दोन फोडी खाल्ल्या.
व्हिसिटला आलेल्या डॉक्टरांना मी विचारले "रिपोर्ट ठीक आहेत ना?"
" आता पर्यंत तरी चांगला रिस्पॉन्स आहे, पुढे काय होतंय ते पाहू." डॉक्टरांचे बोलणे मला पोलिटिकल वाटत होते.
रात्री झोप न झाल्यामुळे मला वाटत असेल कदाचित.
" डिस्चार्ज कधी देऊ शकता?" मी आस्थेने विचारले.
" योग्य वेळी माऊली पोहचतील गावात. काळजी करू नका. एक दिवस अड्जस्ट करा."
डॉक्टर त्यांच्या मिसेस बरोबर बॅडमिंटन खेळायला निघून गेले.
====
क्रमश :
((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))
प्रतिक्रिया
27 Jan 2018 - 5:46 pm | पगला गजोधर
अनधिकृत प्रचाराची आयडिया आवल्डी नानांची ....
27 Jan 2018 - 6:07 pm | कपिलमुनी
माऊलींची स्कीम आवडली !
आमच्या गावात एका धोतराने हा फंडा वापरल्यावर गॉगलाने प्रचार केला धोतराचा वय झालाय , झेपत नाही आता त्रास देऊ नका आणि धोतर पडला ;)
27 Jan 2018 - 8:10 pm | एस
हाहाहा!
27 Jan 2018 - 8:32 pm | Nitin Palkar
झ्याक जमलया. तुम्ही द.मा. मिरासदारांची गादी नक्की चालवाल. आणखी काय शुभेच्छा देऊ... पुलेशु. पुभाप्र.
29 Jan 2018 - 10:26 am | विशुमित
बाप रे... द.मा. मिरासदारांची गादी???
" मज पामरासी काय थोरपण । पायींची वहाण पायीं बरी ॥.."
पिंड नसताना कथा लिह्ण्याच्या माझ्या पहिल्याच प्रयत्नाला एवढे भरभरून प्रतिसाद मिळाला याबद्दल खूप आनंद वाटतोय.
एवढ्या मोठ्या शुभेच्छेसाठी खूप खूप धन्यवाद.
28 Jan 2018 - 8:01 pm | कोण
मस्त
28 Jan 2018 - 8:01 pm | कोण
मस्त
28 Jan 2018 - 8:10 pm | पैसा
:)
29 Jan 2018 - 10:15 am | अँड. हरिदास उंबरकर
सुंदर
29 Jan 2018 - 2:57 pm | राजाभाउ
मस्त हो विशुमित साहेब, गाव, तिथले लोक त्यांचे राजकारण डिटेलींग जबरदस्त आहे. आता काय होणार याची उत्कंठा जवळपास रहस्यकथे येव्हडी लागली आहे.
पुभाप्र.
30 Jan 2018 - 5:49 pm | विशुमित
कोण, पैसा ताई, राजाभाऊ, प ग, मुनी जी सर्वांचे आभार.
13 Feb 2018 - 7:16 pm | अस्वस्थामा
भाऊ, एकदम मस्त.! पुढच्या भागाची वाट बघतोय. येऊ द्या लवकर.. :)
23 Apr 2018 - 4:34 pm | अस्वस्थामा
विशुमित भाऊ, येऊ द्या की पुढचा भाग लवकर..
23 Apr 2018 - 4:39 pm | विशुमित
बाप रे ... तुमची डिमांड बघून भारी वाटले.
निवडणुकी काळात जी लिहण्यासाठी किक बसत होती ती आता बसेना आणि कार्यालयीन कामातून तेवढा वेळ सुद्धा मिळत नाहीय.
म्हणून अर्धवट सोडलंय.
====
प्रयत्न करतो.
25 Apr 2018 - 1:59 pm | अस्वस्थामा
विनंती हो.. डिमांड कसली.. :)
खरं तर अर्ध्यावर गोष्ट राहिली की चुटपुट लागून राहते बघा. खासकरुन एखादी स्टोरी आवडली असेल तर. तुम्ही चांगली बांधलीय आत्तापर्यंत तर ती किमान पूर्ण व्हावी असं वाटतं. अजून पुढे ग्रामपंचायतीच्या स्टोर्या लिहिल्यात तर अजूनच भारी.. चांगलं लिहिताय म्हणून आमचा आग्रेव. ;)
23 Apr 2018 - 4:48 pm | श्वेता२४
लेेखनाची श्टाईल आवडली बुवा. पुभाप्र
24 Apr 2018 - 9:45 am | विशुमित
धन्यवाद
11 Feb 2019 - 5:19 pm | रॉबिन हुड
पुढील भाग कधी येईल सर......
11 Feb 2019 - 5:37 pm | उपेक्षित
मस्त हो दादा मजा आली वाचायला.
25 Feb 2019 - 7:19 am | अनिरुद्ध.वैद्य
.