कंपन, अनुनाद आणि दुर्घटना

अमितदादा's picture
अमितदादा in तंत्रजगत
22 Oct 2017 - 7:47 pm

प्रेरणा मोजमापे, युनिट आणि दुर्घटना

टीप
     १. लेखात अनेक ठिकाणी क्लिष्टता टाळण्यासाठी सरलीकरण (simplification) केलेलं आहे, काही ठिकाणी इंग्रजी शब्द जाणीवपूर्वक तसेच ठेवले आहेत.
     २. लेखाच्या नावात जरी दुर्घटना हा शब्द असला तरी काही लिहिलेल्या घटना ह्या संभाव्य दुर्घटना होत्या, ज्या सुदैवाने टळल्या.

ह्या लेखात आपण कंपन म्हणजे काय, अनुनाद/resonance म्हणजे काय, आणि ह्या गोष्टी नीट समजून न घेता यंत्रणा/यंत्रं/structure उभारले तर काय दुर्घटना होऊ शकते किंवा होण्याची शक्यता असते हे पाहणार आहोत, ह्या लेखाचा रोख आणि स्कोप दोन्ही लिमिटेड आहे. तर थोडी बेसिक माहिती घेऊन मुद्द्याला हात घालूयात.

कंपन (vibrations), अनुनाद (resonance) आणि दुर्घटना

खरंतर कंपन ह्या गोष्टीची जास्त खोलात जाऊन ओळख करून द्यायची गरज नाही, याचं कारण एखादा व्यक्ती तंत्रज्ञान क्षेत्रात असो वा नसो, विज्ञानाची तोंडओळख असो वा नसो परंतु कंपन ही त्याचा दैनंदिन जीवनातील रोज जाणवणारी गोष्ट आहे, स्वतःच्या छातीवर हात ठेवून हृदयाची जाणवणारी कंपने असोत, की खिशातील मोबाईल ची जाणवणारी कंपने असोत, भूकंपाच्या वेळी हादरवून टाकणारी कंपने असोत, किंवा तबल्याच्या/सतारच्या कंपनातून निघणारे सुमधुर संगीत असो. पाईप मधून वेगात जाणाऱ्या पाण्यामुळे होणारे कंपन, रोज गाडीतून प्रवास करताना अनुभवले जाणारे कंपन, कोणतेही मशीन चालू केल्यानंतर जाणवणारे कंपन मग तो मिक्सर का असेना, कॉम्पुटर गरम झाल्यानंतर फिरणाऱ्या फॅनमुळे होणारे कंपन, अशी अनेकानेक उदाहरणे आपण देऊ शकतो. इतकी उदाहरणे दैनंदिन जीवनात आहेत की लेखाची जागा संपेल पण उदाहरणे संपणार नाहीत. बरं कंपनाशिवाय आपल्या खालील दोन क्रिया तर जवळजवळ अश्यक्य आहेत, 1. आवाज काढणे/बोलणे, 2. ऐकणे.

तर असे हे कंपन म्हणजे काय ?

साध्या आणि सोप्या भाषेत कंपन म्हणजे एखादया structure ची/सिस्टिमची/यंत्राची/वस्तूची त्याच्या स्थिर स्थिती भोवती होणारी कालबद्ध (लयबद्ध) किंवा रँडम हालचाल (oscilatory motion about equilibrium) [1, 2]. खालील आकृती पाहिल्यास आपल्याला कंपनाचा थोडाफार अंदाज येईल.

आता ह्या कंपनाची वर्गवारी व्यावहारिकदृष्ट्या मी दोन प्रकारात करतो
१. आवश्यक असणारी कंपने: मोबाईल कंपन, हृदयाची कंपने, इत्यादी
२. अनावश्यक कंपने: गाडीतील कंपने, यंत्रामुळे होणारी कंपने, इत्यादी

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास कंपनाची वर्गवारी खालील पद्धतीने होते [1,2]
१. मुक्त कंपने (Free Vibrations) -- यामध्ये damping आणि कोणतेही बल (force) कार्यरत नसते.
२. बलयुक्त कंपने (Forced Vibrations)---यामध्ये बल (मुख्यतः वेळेवर अवलंबून असणारे बल) कार्यरत असते. याचे परत दोन उपप्रकार होतात damped आणि undamped कंपने.

कंपन आणि गोंगाट (noise) किंवा आवाज (sound) याचा अगदी जवळचा संबंध आहे, परंतु यामध्ये खोलात जायचं टाळतो.

नैसर्गिक वारंवारिता म्हणजे काय ते पाहू,

नैसर्गिक वारंवारिता म्हणजे एखाद्या वस्तूला/structure ला जर हळुवारपणे डिस्टर्ब केलंत तर ती वस्तू ज्या वारंवारितेने कंपन पावेल ती म्हणजे त्याची नैसर्गिक वारंवारिता [1, 2]. यामध्ये कोणतंही बल किंवा damping याचा समावेश नसतो. एक उदाहरण म्हणून एक स्प्रिंग घेवून त्याच एक टोक आपल्या हातात ठेवायचं आणि दुसऱ्या टोकाला वजन टांगायचं, त्या सिस्टमला मग त्याच्या स्थिर स्थानापासून हळुवारपणे disturb करायचं. मग ती सिस्टम ज्या वारंवारितेनेने कंपन पावेल ती त्याची नैसर्गिक वारंवारिता, अर्थात यामध्ये हवेमुळे, स्प्रिंग मटेरियल मुळे होणारे damping गृहित धरलेले नाही. त्यामुळे पहिल्या काही सेकंदांत ही वारंवारिता मोजायास हवी, आणि स्प्रिंगचा स्टीफनेस कमी हवा, जेणेकरून डोळ्यांनी त्याची वारंवारिता मोजता येयील. साध्या आणि सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास एखाद्या सिस्टिमची/यंत्राची एकूण (equivalent, k) स्टीफनेस आणि एकूण (equivalent, m) वजन माहीत असेल तर नैसर्गिक वारंवारिता ही k/m चे वर्गमूळ असते. आता एखाद्या वस्तूची नैसर्गिक वारंवारिता एकच असते का? तर नाही अनेक असतात खरे त्यांना पहिली, दुसरी, तिसरी...नैसर्गिक वारंवारिता म्हणतात.

अनुनाद (resonance) म्हणजे काय ?

खऱ्या जगात अनेक गोष्टींवर/structure वर/वस्तूवर वेळेवर अवलंबून असणारे बल कार्यरत असते, त्याची स्वतःची अशी एक वारंवारिता असते, जेंव्हा ही वारंवारिता त्या वस्तूच्या नैसर्गिक वारंवारितेच्या जवळ येवू लागते तेव्हा त्या वस्तूचे amplitude वाढू लागते, ज्याची परिणिती जास्त स्ट्रेन आणि पर्यायाने जास्त स्ट्रेस निर्माण होण्यात होते, आणि एका स्ट्रेस लेवल नंतर ती वस्तू/structure फेल होते. किंवा वाढलेल्या amplitude मुळे एखादा crack वाढत जाऊन fatigue failure मुळे होणाऱ्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक सिस्टीम ह्या अश्या design केलेल्या असतात की त्याच्या वापरामध्ये येणाऱ्या बलामुळे किंवा गतीमुळे रेसोनन्स होऊ नये. [1, 2, 3]

आता जेव्हा बाह्य परिस्थिती अशी निर्माण होते की structure/सिस्टिम/यंत्र वर असे बल कार्यरत होते ज्याची वारंवारिता ही नैसर्गिक वारंवारितेच्या जवळ पोहचते, किंवा तंत्रज्ञाकडून कंपने आणि अनुनाद याचा अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या राहून जातात, आणि मग याची परिणिती दुर्घटना घडण्यात होते. खालील उदाहरणे ही मेकॅनिकल आणि acoustic रेसोनन्सची आहेत.

प्रसिद्ध उदाहरणे

१. Tacoma narrow ब्रिज हे इतिहासातील एक प्रसिद्ध उदाहरण आहे , या विषयाचे अनेक शिक्षक आणि पुस्तके हे उदाहरण देतात. तर हा सस्पेन्शन ब्रिज १९४० साली वॉशिंग्टन राज्यामध्ये उभारण्यात आला, आणि उभारल्यानंतर ४ महिन्यांतच तो कोसळला. वाऱ्याच्या ताकदीपुढे हा पूल सहज कोसळला, यात वाऱ्याच्या फोर्सपेक्षा महत्वाचा घटक होता तो म्हणजे रेसोनन्स. वाऱ्याच्या फोर्स ची वारंवारता हि पुलाच्या वारंवारितेशी मॅच झाली आणि पूल अनियंत्रित amplitude ने हलू लागला आणि शेवट हा पूल कोसळण्यात झाली. खालील चार मिनिटांचा व्हिडिओ पहा. यातून याची भयानकता लक्षात येतेय. [4]
Tacoma narrow bridge

2. अतिशय रोचक अशी ही घटना आहे, 2010 साली stuxnet ह्या संगणक व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला, परंतु सर्वात जास्त हानी केली ती इराणची, यात सर्वात जास्त तोटा झाला तो इराणच्या अणू प्रयोगाला. जगभरातील संशोधकांनी जेव्हा याच्यावर अधिक अभ्यास केला तेव्हा हे लक्षात आले की हा व्हायरस सीमेन्सच्या एका विशिष्ट सॉफ्टवेअरला टार्गेट करण्यासाठी बनविला आहे, जे सॉफ्टवेअर विविध यंत्रांना सांभाळण्याचं आणि नियंत्रित करण्याचं काम करते. याने ग्रस्त असणारे 60% संगणक हे इराणचे होते. यामागे इस्राईल असल्याची अनेक संशोधकांची खात्री आहे, याला पहिलं जालीय शस्त्र म्हणूनही ओळखलं जातं. याचा आपल्या लेखाशी काय संबंध?
तर ज्या सीमेन्सच्या सॉफ्टवेअर वर हा हल्ला झाला ते इराणच्या अणुभट्टी मधील centrifuge रोटर चे स्पीड कंट्रोल करायचे किंवा त्याच पूर्ण नियंत्रण करण्याचे काम करायचे. या व्हायरसमुळे हे centrifuge रोटर त्याचा नैसर्गिक वारंवारितेच्याच्या आसपास फिरण्यास सुरुवात झाली, ज्याची परिणिती रेसोनन्समध्ये होऊन हे centrifuge रोटर आणि त्यांना जोडणारी सिस्टिम मोठ्या प्रमाणात खराब होण्यात झाली. यामुळे इराणचा अणुप्रयोग काही वर्षे मागे ढकलला गेला. खालील एका संशोधन रिपोर्टमधील [6] वाक्ये पहा,
Attacks aim at damaging centrifuge rotors, but use different tactics. The first (and more complex) attack attempts to over-pressurize centrifuges, the second attack tries to over-speed centrifuge rotors and to take them through their critical (resonance) speeds.
इराणने याचा दोष त्यांच्या शत्रूवर म्हणजे इस्राएल आणि अमेरिकेवर ठेवला, अर्थात दोघांनी आरोप मान्य केले नाहीत. असो तो आपला मुद्दा नाही. [5, 6]

3. Broughton Suspension Bridge हा ब्रिटनमध्ये 1826 साली उभारण्यात आला, त्या काळी युरोपमधील सर्वात पहिल्या सस्पेंशन ब्रिजपैकी हा एक ब्रिज होता. हा ब्रिज 1831 साली कोसळला. याच कारण त्या ब्रिजवरून सैन्याची तुकडी मार्चिंग करत जात होती, आणि मार्चिंग दरम्यान एकाच वेळी पडणाऱ्या पाऊलामुळे रेसोनन्स तयार झाला आणि याची परिणिती पूल कोसळण्यात झाली, ज्यामध्ये 20 सैनिक जखमी झाले. यानंतर ब्रिटिश लष्कराने आपल्या सैन्याला पुलावरून जाताना मार्चिंग करू नये असा आदेश काढला. [7]

4. अगदी वरील उदाहरणासारखाच किस्सा फ्रांस मधील एक सस्पेंशन ब्रिज चा, त्याच नाव Angers Bridge जो 1839 साली बांधून पूर्ण झाला आणि 1850 साली फ्रेंच सैन्याच्या मार्चिंग करणाऱ्या तुकडीमुळे निर्माण झालेल्या रेसोनन्समुळे कोसळला. यामध्ये मात्र 200 सैनिकांचा जीव गेला. [8]

5. आताच्या काळातील उदाहरण म्हणजे लंडनमधील पादचाऱ्यांसाठी थेम्स नदी पार करण्यासाठी उभारण्यात आलेला Millennium ब्रिज. हा पूल 2000 साली उभारण्यात आला, आणि उदघाटनानंतर 3 दिवसांतच बंद करण्यात आला, याचंही कारण रेसोनन्स. हा सस्पेंशन पूल design करताना वाऱ्यामुळे आणि पादचाऱ्यांच्या लंबरेषेत लागू होणाऱ्या बलामुळे होणाऱ्या रेसोनन्सचा विचार करण्यात आला होता, परंतु पादचाऱ्यांच्या चालण्यामुळे जी आडवी हालचाल होणार होती त्यामुळे होणाऱ्या रेसोनन्सचा विचार करण्यात आला नव्हता, आणि ह्याच हालचालींमुळे हा पूल पादचाऱ्यांसाठी झुलणारा पूल झाला, अर्थात प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत हा पूल 2 वर्षासाठी दुरुस्तीसाठी बंद केला आणि शेवटी पुलाला dampers जोडून स्टेबल करून हा पूल परत खुला करण्यात आला. [9, 10]

5. दक्षिण कोरिया मध्ये 2011 मध्ये विचित्र अशी घटना घडली, सेऊल मधली 39 मजली इमारत अचानक जोर जोरात हलू लागली तेही कोणताही भूकंप नसताना. त्यातील रहिवासी सुरक्षेसाठी इमारत सोडून रस्त्यावर आले. संशोधक ना यामागील सत्य उलगडायला काही दिवस लागले, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी 17 लोक फिटनेसचा एक कार्यक्रम त्या इमारतीमध्ये करत होते, त्यावेळी त्यांच्या ऍक्टिव्हिटीची वारंवारता ही इमारतीच्या नैसर्गिक वारंवारितेच्या रेंज मध्ये आली आणि इमारत जोरजोरात हलू लागली. थोडक्यात काय, एखाद्या इमारतीची नैसर्गिक वारंवारिता माहीत असेल तर काही लोक सुद्धा त्या रेंज मधील वारंवारिता तयार करून अख्खी इमारत हलवू शकतात. [11]

6. Turbine आणि pump यासारख्या गोष्टीत रेसोनन्स हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. नॉर्वे मध्ये जलविद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी उच्चदाबाची turbine वापरली जातात, १९९० मध्ये नॉर्वे मध्ये फ्लेक्सिबल वीज निर्मिती चे नवीन धोरण आखण्यात आले ज्याच्यामध्ये, ही turbine गरज लागेल तशी चालू बंद करावी लागत असत. परंतु काही कालावधीनंतर ही turbine फेल होऊ लागली. याचा मागोवा घेतला असता असे आढळले की फ्लेक्सिबल वीजनिर्मितीसाठी turbine चालू-बंद करताना पाण्याचं प्रेशर स्थिर न राहता एका वारंवारितेने अनियमितपणे चढउतार होत असे आणि ती वारंवारिता turbine च्या नैसर्गिक वारंवारितेच्या जवळ असल्याने रेसोनन्स होऊन turbine फेल होत असत. [12]

काही वैयक्तिक अनुभव

१. गाड्यांमध्ये इंजिनला गाड्यांच्या सांगाड्याशी जोडण्यासाठी असणारे brackets किंवा कॉम्प्रेसरला इंजिनाशी जोडण्यासाठी असणारे brackets हे रेसोनन्समुळे फेल होतात किंवा होण्याची श्यक्यता असते. याचं कारण त्या bracket ची असणारी नैसर्गिक वारंवारिता आणि इंजिनाची असणारी वारंवारिता एकाच रेंजमध्ये येते. हे टाळण्यासाठी design मध्ये बदल, मटेरिअल बदल, स्टिफनर वापरणे इत्यादी उपाय केले जातात.

2. आपण अनेक वेळा डॉल्बीमुळे थरथरत असणाऱ्या भिंती पाहिल्या असतील, मी स्वतः अनेक वेळा मातीच्या भिंती थरथरत असताना अनुभवल्या आहेत. डॉल्बीच्या आवाजाने भिंत कोसळली ही बातमी सुद्धा अनेकांनी वाचली असेलच. हे का होतं तर त्या भिंतीची किंवा घराची एक नैसर्गिक वारंवारिता असते, जेंव्हा डॉल्बीचा आवाज अशा लेवलला पोहचतो ज्यावेळी त्यातून बाहेर पडणाऱ्या आवाजाची वारंवारिता ही भिंतीच्या नैसर्गिक वारंवारितेच्या जवळ जाऊन पोहचते तेव्हा भिंत जास्त amplitude ने कंपन पावू लागते, आणि शेवट सांधे निखळण्यात आणि भिंत पडण्यात होतो.

एका प्रसिद्ध वैज्ञानिकाचा किस्सा
निकोला टेस्ला ह्या प्रसिद्ध वैज्ञानिकांची वेगळी ओळख करून देत नाहीत, ह्या बहुआयामी वैज्ञानिकाला "Master of Resonance " म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याचं कारण ह्या वैज्ञानिकाने कंपन आणि अनुनाद यावरती केलेले विविध प्रयोग होय. तर एकवेळ हा शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत एका खांबावरती कंपन आणि अनुनाद याचा प्रयोग करत होता. हा खांब इमारतीच्या फौंडेशनशी जोडलेला होता त्यामुळे सगळी इमारत हलू लागली , लोकांना रस्त्यावरती यावे लागले , शेवटी पोलिसांना येऊन हा प्रयोग थांबवावा लागला. टेस्लाने काय काय प्रयोग केले आणि काय काय बंद पाडले याची उत्तम उदाहरणे खालील एका लेखात दिलेली आहेत [१३].

वरील लेखात दिलेली उदाहरणे ही मुख्यतः मेकॅनिकल आणि अकॉस्टिक रेसोनन्सची आहेत. रेसोनन्स हे इलेक्ट्रिकल, ऑप्टिकल, अवकाश आणि अणुविज्ञान क्षेत्रांतही आहेत, अर्थात याचा अभ्यास नसल्याने मी यावरती भाष्य केलं नाही. (Resonance) . कंपन किंवा vibration ला मात्र मेकॅनिकल vibrations म्हटलं जातं कारण ते सिस्टम/पदार्थ/ structure शी निगडित असतात.

लेखाचा शेवट ह्याच शास्त्रज्ञाच्या किंवा ह्या शास्त्रज्ञाच्या नावावर खपवले जाणाऱ्या एका वाक्यामध्ये थोडासा बदल करून लिहिलेल्या वाक्याने करतो.
If you want to find the secrets of the structures (original word> universe), think in terms of energy, frequency and vibration.

संदर्भ
1. Fundamentals of vibrations, Leonard Meirovitch, McGraww-Hill Publications.
2. Mechanical vibrations, S.S. Rao, Addison-Wisley Publications
3. Mechanical Resonance
4. Tacoma Narrows Bridge
5. News article regarding stuxnet
6. Report regarding stuxnet virus
7. Broughton Suspension Bridge
8. Angers Bridge
9. Millennium Bridge
10.BBC news article
11. Korean building resonance
12. Turbine resonance
13. Nicola Tesla

प्रतिक्रिया

लेखात फोटो दिले असल्यास ते दिसत नाहीयेत. बादवे, 'रेझोनन्स' साठी अनुनाद हा शब्द आवडला आहे. डॉल्बीच्या आवाजाने मातीची भिंत कोसळून कोल्हापुरात एका मुलीचा जीव गेल्याची घटना फार जुनी नाहीये.

आता फोटो दिसतोय. लेख ठीकठाक केलाय. मुद्रितशोधन इ. केलंय.

अमितदादा's picture

22 Oct 2017 - 11:54 pm | अमितदादा

धन्यवाद एसभाऊ. उत्तम बदल केलेत तुम्ही. लेखक मागतो एक डोळा संपादक देतात दोन डोळे:)

सुखी's picture

22 Oct 2017 - 11:05 pm | सुखी

3rd resonance ला एवढं वाईट का म्हणतात काही कल्पना आहे का?
इंजिनीरिंग पासून पडलेला प्रश्न आहे..

अमितदादा's picture

22 Oct 2017 - 11:53 pm | अमितदादा

generally speaking तुमच वाक्य बरोबर नाही, कारण ३ र्या resonance मध्ये असे काही विशेष नाही जे इतर resonance पासून त्याला वेगळे करेल. तुम्ही कोणत्या एखाद्या specific system किंवा situation बद्दल बोलत आहात का ?
याच कारण म्हणजे जेंव्हा damping शून्य असते तेंव्हा प्रत्येक resonance ला amplitude हे infinity होते त्यामुळे प्रत्येक resonance हा धोकादायकच. मात्र system मध्ये damping कुठे आहे, force कुठे लागलाय यावरून प्रत्येक resonance ला होणारे amplitude वेगवेगळे असणार मात्र finite असणार. अधिक माहिती साठी खालील लिंक पहा आणि शेवटचे ग्राफ पहा, damping शून्य असताना दोन्ही resonance ला amplitude infinite आहे, मात्र damping आणि force य्वारती अवलंबून amplitude मात्र प्रत्येक resonance ला वेगळी आहे.

http://www.brown.edu/Departments/Engineering/Courses/En4/Notes/vibration...

अमितदादा's picture

23 Oct 2017 - 12:03 am | अमितदादा

Good and Bad Resonance
वरील एक लेख उत्तम आहे,
झोपाळा आणि resonance चा काय संबंध हे वरचा लेख वाचून कळत.
antena, radio waves आणि resonance यांचा काय संबंध हे वरचा लेख वाचून कळत.

आणखी एक घटना मला नेहमी आठवते ती म्हणजे
आपल्यातील अनेक जणांनी एसटी च्या जुन्या बस मधून प्रवास केला असेल, एसटी जेंव्हा काही विशिष्ट वेग घेते तेंव्हा तिचा काचा खुप जोरात हलू लागतात, हे का होते तर मला असे वाटते एसटी वर त्या वेगात विविध बलामुळे असणारी वारंवारता ही काचा आणि खिडक्या यांची नैसर्गिक वारंवारता याचा जवळ येते, आणि मग कंपनानांची amplitude वाढते आणि मोठमोठ्याने आवाज येऊ लागतो.

कुमार१'s picture

23 Oct 2017 - 8:34 am | कुमार१

चांगली माहिती
रेझोनन्स' साठी अनुनाद हा शब्द आवडला आहे. >>+ १
पूल व सैनिकांची कवायत हे १२ वीत शिकवले होते

मार्मिक गोडसे's picture

23 Oct 2017 - 8:46 am | मार्मिक गोडसे

सैन्याची तुकडी मार्चिंग करत जात होती, आणि मार्चिंग दरम्यान एकाच वेळी पडणाऱ्या पाऊलामुळे रेसोनन्स तयार झाला आणि याची परिणिती पूल कोसळण्यात झाली

सिव्हिलला गेलेल्या मित्रांकडून हा किस्सा बऱ्याचवेळा ऐकला आहे. लेखातील बाकीची उदाहरणे फारच रोचक आहेत.
एखादी इमारत स्फोटके न वापरता कंपणांच्या साहाय्याने पाडता येणे शक्य आहे का? किडनी स्टोन फोडण्यासाठी हेच तंत्रज्ञान वापरले जाते का?

अमितदादा's picture

23 Oct 2017 - 9:03 pm | अमितदादा

@कुमार1
धन्यवाद.
@मार्मिक गोडसे
धन्यवाद.

एखादी इमारत स्फोटके न वापरता कंपणांच्या साहाय्याने पाडता येणे शक्य आहे का?

मला वाटते नक्कीच, भूकंप हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण यामध्ये इमारत अनियंत्रित रित्या पडण्याची श्यक्यता जास्त वाटते.

किडनी स्टोन फोडण्यासाठी हेच तंत्रज्ञान वापरले जाते का?

याबाबत याच्या अगोदर कधी वाचलं नाही, तुमचा प्रश्न आल्या नंतर जालावर शोधलं असता अशी कोणतीही माहिती हाती लागली नाही, त्यामुळे यावर ठाम पणे काही सांगू शकत नाही.

मार्मिक गोडसे's picture

23 Oct 2017 - 10:14 pm | मार्मिक गोडसे
अमितदादा's picture

24 Oct 2017 - 12:27 am | अमितदादा

किडनी स्टोन बाबत शॉक वेव्ह ही टेक्निक जेंव्हा वापरतात, तेंव्हा शॉक वेव्ह ह्या स्ट्रेस सायकल तयार करतात ज्याने fatigue failure होते खड्यांचे. खडे फोडण्याबाबत कंपन आणि रेसोनन्स यांचा संबंध जास्त करून येत नाही, मात्र ह्या शॉक वेव्ह हाडांमध्ये कंपन तयार करू शकतात. खालील लिंक मध्ये सविस्तर माहिती आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2900184/#S3title

सुखी's picture

23 Oct 2017 - 11:57 pm | सुखी

Thoda अजून mahiti मला ३रेसोनन्स electrical system baddal mhanaycha hota

अमितदादा's picture

24 Oct 2017 - 12:18 am | अमितदादा

ओके. इलेक्ट्रिकल रेसोनन्स बाबत जास्त माहिती नाही, हा लेख आणि वरील प्रतिसाद हा मेकॅनिकल आणि अकोस्टिक रेसोनन्स संदर्भात होता

अभिजीत अवलिया's picture

24 Oct 2017 - 6:22 am | अभिजीत अवलिया

रोचक माहिती आहे. Tacoma narrow ब्रिज तर झोपाळ्यासारखा हलत होता.
चक्रीवादळासारख्या घटनांमध्ये इमारती/पूल कोसळतात ह्याचे कारण म्हणजे हा 'अनुनाद' असावा.

गामा पैलवान's picture

26 Oct 2017 - 10:17 pm | गामा पैलवान

अमितदादा,

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.

प्रकाशीय अनुनादाचं दैनंदिन उदाहरण म्हणजे लेझर. यांत प्रकाशलहरींच्या लांबीइतक्या किंवा त्याच्या पूर्णांकपटीत अंतर असलेल्या अणूंच्या स्फटिकातून प्रकाश पाठवला जातो. यासाठी लाल माणिक फार उपयोगी पडतं. माणकाचा रूळ असतो. तो दोन आराश्यांच्या मध्ये ठेवतात. एक आरसा पूर्णपणे परावर्तक म्हणूनंच पूर्ण्परे अपारदर्शक असतो. तर दुसरा आरसा अर्धपारदर्शक असतो. असा हा प्रकाश दोन्ही आरशावर वारंवार पडून परावर्तित होतांना मधल्या माणकामुळे अनुनादित होतो. अशा अनुनादित प्रकाशाची शक्ती बरीच वाढते आणि एके प्रसंगी अर्धपारदर्शक आरशातून झोत बाहेर पडू लागतो. हाच तो सुप्रसिद्ध लेझर झोत.

प्रकाशीय अनुनाद वापरून एक भयंकर शस्त्र बनवता येतं. यांत मज्जातंतूंच्या नैसर्गिक कंप्रतेशी जुळणाऱ्या विशिष्ट रंगाचा एक प्रखर झोत (फ्लॅशलाईट) कुण्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वा अंगावर टाकला की तिची मज्जासंस्था क्षणभरासाठी बधीर होते. लेडी डायाना हिला अपघात करतेवेळी पापाराझी प्रकाशचित्रकारांनी अशाच कुठल्याश्या शस्त्राचा वापर करून गाडीचा चालक हेन्री पॉल याला बधीर केलं अशी वदंता आहे.

आ.न.,
-गा.पै.

एक वाक्य चुकलं आहे.

कृपया असं वाचणे : एक आरसा पूर्णपणे परावर्तक म्हणूनंच पूर्णपणे अपारदर्शक असतो.

चुकीबद्दल क्षमा असावी.

-गा.पै.

अमितदादा's picture

26 Oct 2017 - 11:37 pm | अमितदादा

@अभिजीत अवलिया आणि @ गामा पैलवान प्रतिसादबद्दल आणि लेसर संबधीच्या माहितीबद्दल धन्यवाद. नुकतच विकिपीडियावरती animation पाहिलं आता अधिक माहिती वाचून पाहतो.

शब्दबम्बाळ's picture

27 Oct 2017 - 1:30 am | शब्दबम्बाळ

माहितीपूर्ण लेख! येऊ द्यात अजून!

सुबोध खरे's picture

30 Oct 2017 - 11:08 am | सुबोध खरे

अनुनादाची अतिशय उपयुक्त अशी असंख्य उदाहरणे देता येतील यातील तीन उदाहरण देत आहे.
पहिली दोन हि पदार्थाचे पृथक्करण करण्यासाठी वापरली जातात आणि तिसरे मानवी शरीराचे रोग निदान करण्यासाठी वापरली जातात
१) ESR/ EPR SPECTROSCOPY https://en.wikipedia.org/wiki/Electron_paramagnetic_resonance
२) NMR https://en.wikipedia.org/wiki/Nuclear_magnetic_resonance
३)MRI https://en.wikipedia.org/wiki/Magnetic_resonance_imaging

अमितदादा's picture

1 Nov 2017 - 12:28 pm | अमितदादा

@शब्दबम्बाळ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून एक लेख लिहायचा विचार आहे.
@सुबोध खरे
माहितीबद्दल धन्यवाद. लेखाचा विषय मुळात यांत्रिकी आणि acoustic अनुनाद असल्याने इतर क्षेत्रातील उदाहरणे टाळली होती . NMRI आणि MRI बद्दल आधी वाचलं आहे, पहिल्या लिंक बाबत वेळ मिळाला की वाचून पाहतो.

पुष्कर's picture

15 Jan 2018 - 6:59 pm | पुष्कर

अनुनादाबद्दल एक प्रश्नः
याबद्दल कायम असे विधान केले जाते की बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता समान झाल्या तर कंपनांची अ‍ॅम्प्लिट्यूड वाढते. आता ही दोन कंपने इन-फेज असतील तर हे समजू शकतो. पण कायमच ती इन-फेज असतील असे नाही ना? मग त्या परफेक्टली आऊट ऑफ फेज असतील तर अ‍ॅम्प्लिट्यूड शून्य नाही का होणार?

अमितदादा's picture

15 Jan 2018 - 8:35 pm | अमितदादा

याबद्दल कायम असे विधान केले जाते की बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता समान झाल्या तर कंपनांची अ‍ॅम्प्लिट्यूड वाढते. आता ही दोन कंपने इन-फेज असतील तर हे समजू शकतो. पण कायमच ती इन-फेज असतील असे नाही ना? मग त्या परफेक्टली आऊट ऑफ फेज असतील तर अ‍ॅम्प्लिट्यूड शून्य नाही का होणार?

नाही उलट damped सिस्टिम साठी रेसोनन्स च्या वेळी बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता नव्वद डिग्रीने आऊट ऑफ फेज असते.
उत्तम प्रश्न .... थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
एखाद्या damped harmonic oscillator चं न्यूटन च्या नियमानुसार equation of motion खालील पद्धतीने असेल
m*d(d(x,t),t)+c *d(x,t)+k *x=F*sin(omega*t)
m*d(d(x,t),t)+2*m*xi*omega0*d(x,t)+m*omega0^2*x=F*sin(omega*t)
यामध्ये वजन (m), damping ratio (xi), वस्तूची नैसर्गिक वारंवारिता (omega0), बाह्य फोर्स (F) आणि बाह्य वारंवारिता (omega).
तर बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता यामधील फेज (phi) असेल
phi = arctan (xi*2*omega*omega0/(omega^2-omega0^2) )

तर जेंव्हा damping नसेल तेंव्हा, xi =० असेल आणि बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता यामधील फेज शून्य असेल, रेसोनन्स वेळी सुद्धा. जेंव्हा damping असेल आणि रेसोनन्स असेल तेंव्हा omega= omega0, आणि फेज होईल नव्वद डिग्री. म्हणजे damped सिस्टिम मध्ये रेसोनन्स च्या वेळी बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता आऊट ऑफ फेज असते नेहमी. खालील १ मिनिट चा व्हिडीओ पहा
https://www.youtube.com/watch?v=aZNnwQ8HJHU

म्हणजे रेसोनन्स हा बाह्य वारंवारिता आणि वस्तूची नैसर्गिक वारंवारिता यामधील फेज वर अवलंबून नाही, उलट फेज रेसोनन्स वर अवलंबून आहे.
आणखी थोडी माहिती आता तुम्ही दोन फोर्स आऊट ऑफ फेज सिस्टिम वरती लावले (१८० डिग्री आऊट ऑफ फेज )
m*d(d(x,t),t)+c *d(x,t)+k *x=F*sin(omega*t)+F*sin(omega*t+pi)
तर सिस्टिम चं amplitude शून्य होईल. The forces will kill each other.

पुष्कर's picture

16 Jan 2018 - 9:03 am | पुष्कर

छान एक्स्प्लेनेशन! '...यामधील फेज वर अवलंबून नाही, उलट फेज रेसोनन्स वर अवलंबून आहे' - हे माहिती नव्हते. तुम्ही दाखवलेल्या डिफरन्षियल एक्वेषन आणि त्याच्या सोल्युशन वरून हे सयुक्तिक वाटते. अजून फिजिकली नक्की कशामुळे हे होत असेल, हे डोक्यात येत नाहिये. जरा पाहतो विचार करून.

गामा पैलवान's picture

16 Jan 2018 - 1:47 pm | गामा पैलवान

पुष्कर,

असं बघा की जर कंपनं लागू केली की सामुग्री कंप पावते. सामुग्री ताठर असेल तर लागू केलेल्या कंपनाची उच्च्मात्रा ( = input amplitude ) ही सामुग्रीच्या उच्च्मात्रेशी जुळते. कारण की सामुग्री ताठर आहे. दोन्ही दत्तोद्भव उच्च्मात्रा संमेलीत आहेत ( = both input and output amplitudes are in phase). पण जर ती लवचिक बनवली तर धक्काशोषण होऊन दत्तमात्रा व उद्भवमात्रा अपमेलीत असतील (= input and output amplitudes will be out of phase).

आ.न.,
-गा.पै.

पुष्कर's picture

17 Jan 2018 - 11:00 am | पुष्कर

मूळ प्रश्नच हा होता की दत्त आणि उद्भव उच्च्मात्रा संमेलितच असतील असं नाही. त्याचा सामुग्री ताठर किंवा लवचिक असण्याचा काय संबंध? एखादे रबर जर कंप पावत असेल आणि त्याला बरोबर योग्य वेळी धक्का दिला तर त्याची उच्च्मात्रा वाढेल आणि चुकीच्या वेळी दिला तर ती कमी होईल. परंतू तेच जर लोखंड असेल तर त्याची फेज कशी बदलेल? इक्वेशनद्वारे ते पटते आहे, पण प्रयोगदृष्ट्या हे कसे होते?

इक्वेशनद्वारे ते पटते आहे, पण प्रयोगदृष्ट्या हे कसे होते?

हे प्रयोगात कसे होते हे पाहण्यासाठी मी मूळ प्रतिसादात लिंक दिली होती, हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता
https://www.youtube.com/watch?v=aZNnwQ8HJHU
रेसोनंस च्या वेळी वस्तूची नैसर्गिक वारंवारता आणि बाह्य बलाची वारंवारता या गोष्टी ओउट ऑफ फेज असणे आणि दोन समान बल ओउट ऑफ फेज असणे यामध्ये तुमची गफलत होत असावी कदाचित. तुम्हाला दुसरी केस अभिप्रेत आहे का कारण त्या केस मध्ये वस्तूची amplitude शून्य होईल, कोणताही initial disturbance नसेल तर. दुसर्या केस मध्ये इक्वेशन स्टेप बाय स्टेप बगुयात
m*d(d(x,t),t)+c *d(x,t)+k *x=F*sin(omega*t)+F*sin(omega*t+pi)
sin(a+b)= 2 sin((a+b)/2)*cos((a-b)/2)
m*d(d(x,t),t)+c *d(x,t)+k *x=F*sin(omega*t+pi/2)*cos(-pi/2)
m*d(d(x,t),t)+c *d(x,t)+k *x=०
कोणताही initial disturbance नसेल तर इथे amplitude शून्य होईल कारण दोन समान फोर्स out ऑफ फेज आहेत म्हणून. कदाचित इतर काही व्हिडीओ पाहिलेत तर तुमाला तुमच्या प्रश्नच उत्तर मिळेल.

पुष्कर,

ताठर ही संज्ञा जराशी चुकीची आहे. ताठर म्हणजे inelastic तर लवचिक म्हणजे elastic. मला धक्काशोषक म्हणजे damping म्हणायचं होतं. त्यामुळे माझा वरचा प्रतिसाद पार चुकीचा ठरतोय. त्याबद्दल क्षमा असावी.

समजा सामुग्री धक्काशोषक नाहीये. अशा वेळेस दत्तकंपने जर नैसर्गिक कम्प्रतेइतकी लागू केली तर ती सरळ उद्भवकंपनांत रुपांतरीत होतात. हे होतांना अनुनाद उत्पन्न होतो. आता या सामुग्रीत धक्काशोषक लावला की उच्चमात्रा प्रमाणाबाहेर जात नाही. अर्थात तुमचा प्रश्न दशाविलंबाशी (= phase lag) निगडीत आहे. अनुनादात दोन्ही उच्च्मात्रा संमेलीत नसल्या तरी उद्भवमात्रा अवाढव्य होऊ शकते. संमेलीत वा अपमेलीत दशांचा इथे संबंध नाही.

अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Vibration#What_causes_resonance?

आ.न.,
-गा.पै.