समाधानाचे मुखवटे भाग - १

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
26 Jul 2017 - 3:21 pm

सलग दोन दिवस आणि रात्री झालेल्या अखंड जागरणामुळे त्याला कसलीतरी धुंदी आल्यासारखे वाटत होते, पूर्णपणे नशेत असल्यासारखी भावना. डोळेही भयंकर जळजळ करत होते. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता, जरा वेळ इकडे तिकडे केले कि त्याला प्रचंड उत्साह येई, मग अचानक आजूबाजूचे लोक, घटना हास्यास्पद वाटत. आणि मग अचानक थकवा. सखोल थकवा..
आता एकदाची गाडी आली म्हणजे दहा बारा तास ह्या अवजड पिशव्यांपासून सुटका होईल आणि निवांत झोपता येईल. असा विचार करत तो बसस्थानकावर कसा बस वेळ काढत होता. त्याच्या अगदी समोरच भडक रंगाचे शॉर्ट्स आणि टी शर्ट्स घातलेले एक जोडपे अगदीच रोम्यांटिकपणे भलत्याच उत्साहाने ल्यापटॉपवर काहीतरी पाहत होते. तो त्यांच्याकडे विनाकारण बारकाईने पाहत राहिला. जरावेळाने त्या जोडप्यातल्या पुरुषाने "काय उद्धटपणा आहे?" अशा अर्थाच्या रागीट नजरेने समाधानकडे पहिले. मग त्याने आपले निद्रा वंचित डोळे स्थानकावर टांगलेल्या घड्याळाकडे फिरवले.
बस यायला अजून अर्धा तास तरी होता. मोबाईलची ब्याटरी कधीचीच संपली होती. सोबत आणलेले पुस्तक वाचण्याइतकी ऊर्जा त्याच्यात नव्हती. ब्याकपॅकच्या सगळ्या सामानात बराच वेळ चाचपून चाचपून त्याने एक सिगारेट शोधून काढली. स्थानकाच्या चौकशी विभागात कोणीतरी दोन चार तरुण मोठमोठ्या आवाजात वाद घालत होते. त्यांच्या शिवीगाळीचा कार्यक्रम पाहत समाधान सिगारेटचे झुरके घेऊ लागला. तो भडक रंगाच्या कपड्यातला पुरुष परत मोठ्याने खोकण्याचे नाटक करत त्याच्याकडे रागाने पाहू लागला. यावेळी जरा जास्तच.
मग पाठीला ब्याकप्याक ,एका हातात एक अवजड पिशवी आणि दुसऱ्या हातात सिगारेट असा तो स्टेशनबाहेर एका चहावाल्याच्या छपराखाली जाऊन ती सिगारेट पिऊ लागला. येणाऱ्या प्रत्येक बसकडे तो लक्ष ठेऊन होता. जुलैचा महिना, नुकताच पावसाळा सुरु झालेला. दुपारपासूनच रिमझिम पाऊस चालू होता. गडद काळ्या आभाळामुळे चांदण्यांचा तर विषयच नव्हता, सगळीकडे फक्त कृत्रिम प्रकाश . त्या चहावाल्याच्या छपराखालची तेवढी जागा सोडली तर आजूबाजूने मोकळी जागा होती. नुकत्याच उगवलेल्या गवताच्या हिरवट पोपटी पात्यांकडे तो थकलेल्या नजरेने एकसारखा पाहत होता.मधेच येऊन गेलेली संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्याची झुळूक त्याला अत्यंत सुखद वाटली. समाधानाला स्थिती झाली, एक महिना तरी झाला असेल, कोणी ओळखीचा माणूस भेटून, हा एक महिना म्हणजे आपण जगाशी संपर्क बंद करून, कोणालाही न भेटता भुतासारखे फिरत आहोत. एक एक करून त्याच्या अस्वस्थ आणि निद्रवंचित डोक्यात विचारांचे वादळ उठू लागले. समाधान त्यात आणखीन डुबून गेला..

"चलो, गोवा १२.३०, सलीपरक्लास", एक अर्धवट वयाचा इसम बस मधून उतरत मोठ्याने ओरडला.

ब्याकप्याकच्या वरच्या कप्प्यात ठेवलेले तिकीट घाईघाईने काढून समाधान बसकडे निघाला. सगळ्यातशेवटी, एन त्या जोडप्याच्या वरची बर्थ, वरून आपली उंची जास्त असल्याने पाय पसरून झोपण्याइतकीही जागा नाही, हे पाहून त्याला वैताग आला. पण कसलीही तक्रार नं करता त्याने सामान व्यवस्थित ठेऊन दिले. पायातली चप्पल काढून एका कोपऱ्यात ठेवली. मग त्याने त्या स्लिपरक्लास बर्थ मध्ये ठेवलेली मळकट चादर उशाशी घेतली, आणि गुढघे पोटाशी चिटकवून तो झोपायचा प्रयत्न करू लागला. एवढ्याश्या जागेत चालत्या बसमध्ये आदळे खात खात अशा विचित्र पद्धतीने झोपण्याचा प्रयत्न करताना त्याला उगीचच आपण वासुदेवाच्या टोपलीत ठेवलेले श्रीकृष्ण आहोत कि काय असा विनोदी विचार आला. मग तो झोपला. शांत, गडद, तीव्र झोप...कशाचाच कशाला मेळ नाही अशी स्थिर स्वप्निक झोप प्रचंड वेगाने गरगरत त्याच्याकडे येऊ लागली, त्याला अलगद उचलून तिने स्वतःच्या मऊशार कुशीत घेतले. शांत, पांढरे शुभ्र, निर्मनुष्य ठिकाण डोळ्यासमोर येऊ लागले. कस्तुरीसारखा कशाचा तरी सुगंध वाऱ्याच्या आल्हाद आणि थंड झुळके बरोबर त्याला सुखावून जात होता, वरती ढगांची पांढरी चादर, आणि सुटे सुटे होत पुन्हा कायम गडद राहणारे आभाळ. निर्विकार शांतता, आणि तिथे हा एकटाच असाच पडलेला..

" उठो SSS साहेब SSS , किधर छोडनेका आपको?" तोच अर्धवट वयाचा बसवायला इसम समाधानाला झोपेतून उठवत होता.
"गोवा", समाधानने चिडून झोपल्या जागेवरूनच उत्तर दिले.
" हां साहेब गोवानेच, लेकिन किधर? पणजी, म्हापसा, परवरी, के थिवीम ?"
"मै पेह्ली बार आय हुन, आप हि कुछ सलाह देदो", झोप आवरत त्या इसमाकडे तोंड फिरवून समाधान बोलला.
"अच्छा, घुमने के वास्ते आये क्या आप?" त्या इसमाने विचारले.
"हां" समाधान उत्तरला.
" ठीक है एक-देढ घंटे मे म्हापसा आयेगा, मै उठा देता आपको. उधरसे सारे बीच नजदिक गिरेंगे आपको. आप सो जावो"
" ठीक है. थँक यू!" असे बोलून समाधान निद्राधीन झाला व तो बसवला इसम त्या भडक कपड्यातला जोडप्याला बोलायला लागला.

(क्रमशः:)
२६/०७/२०१७

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अश्या प्रकारचे लिखाण करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, माझी मिपावरची एन्ट्री जरा वादग्रस्तच झाली होती. त्यामुळे परत कधी काही लिहण्याचे धाडस झाले नाही. पण आता धाडस करून लिहतो आहे. सर्व, सूचना, टीका इत्यादींचे स्वागत आहे!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

26 Jul 2017 - 3:28 pm | भिंगरी

चांगदेव ?

हो. नायक चांगदेवपासूनच प्रेरित आहे!

निशांत_खाडे's picture

26 Jul 2017 - 3:39 pm | निशांत_खाडे

"टंकन करताना झालेली चूक"
नेमाडेंचा प्रभाव, बाकी काय!

राजाभाउ's picture

26 Jul 2017 - 3:30 pm | राजाभाउ

जरा जरा नेमाडे स्टाईल झालय काय? मधेच "समाधान" चा "चांगदेव" पण झालाय
पण आवडल पुभाप्र.

निशांत_खाडे's picture

26 Jul 2017 - 3:37 pm | निशांत_खाडे

हात तिच्या! हे दुरुस्त कसे करता येईल?

छान लिहिलंय. पुभाप्र.

निशांत_खाडे's picture

26 Jul 2017 - 6:15 pm | निशांत_खाडे

धन्यवाद!
पुढचा भाग लिहून तयारच आहे!
वेळ मिळाला कि टंकून डकवतो!

एमी's picture

26 Jul 2017 - 6:58 pm | एमी

छान आहे. पुभाप्र.

Ranapratap's picture

26 Jul 2017 - 7:29 pm | Ranapratap

लिखते रहो

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

27 Jul 2017 - 4:53 am | योगेश लक्ष्मण बोरोले

मस्त. पुभाप्र

ज्योति अळवणी's picture

27 Jul 2017 - 10:47 pm | ज्योति अळवणी

छान

रेवती's picture

28 Jul 2017 - 12:49 am | रेवती

वाचतेय.