नाच्या बेडुक

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 1:01 pm

नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता. सोबतीलाच अनेक वेगवेगळे आवाज येत होते. पण त्यात एकतानता होती. साद होती, तर प्रतिसाद देखील होती. आम्ही दोघांनी या आवाजांच्या दिशेने जायचे ठरवले व फोन आणि टॉर्च घेऊन त्या आवाजाच्या दिशेने निघालो. आमचा शोध कॅम्पसाईट शेजारच्या भाताच्य खाचरात संपला. त्या खाचरात शेकडो बेडुन होते. वेगवेगळ्या जातींचे. (प्रजातींचे योग्य शब्द आहे.) त्यातल्या त्यात ज्या आवाजाचा पाठलाग करत आम्ही आलो तो आवाज व त्या आवाजाचा उदगाता तो बेडुक देखील दिसला. याला नाच्या बेडुक म्हणतात. सोबत दिलेल्या वेबसाईटच्या पेज वर जाऊन त्याचा व्हिडीयो पाहता येईल. नाच्या बेडुक हे त्याच्या द डान्सींग फ्रॉग या इंग्रजी नावाचे स्वैर भाषांतर आहे. अंदाजे दोन तीन वर्षापुर्वीच शास्त्रज्ञांना अशा प्रजातीचा बेडुक असतो हे समजले. त्याच्या विशिष्ट प्रकारे पाय हलवण्याच्या व आपटण्याच्या सवयी मुळे त्या प्रजातीस सर्रास डान्सींग फ्रॉग असे बोली भाषेतले नाव पडले. तर हा नाच्या बेडुक दिसला आणि त्याचे ते खर्जातले गाणे गाताना त्याचे आविर्भाव व त्याचा नाच देखील दिसला. सोबतच्या लिंकवर क्लिक करुन अवश्य हा व्हिडीयो पहावा.

Another kind of frog

त्यानंतर ह्या बेडकाविषयी जरा अधिक माहीती शोधण्याचा प्रयत्न केला व आणखी एक अचंबित करणारी माहीती पुढे आली. बेडकाची ही विशिष्ट जात ८५० लक्ष वर्षापुर्वी अस्तित्वात आली असा अभ्यासकांचा दावा आहे. म्हणजे माणुस नावाचा प्राणी अस्तित्वात येण्याच्या कित्येक लाखो वर्षे आधी ही बेडकाची प्रजात अस्तित्वात आली. प्रियराधनासाठी हा बेडुक पायाच्या हालचाली करतो असे अभ्यासकांना सुरुवातीस वाटले. नतर च्या अभ्यासातुन हे समजले की समागमासाठी तो नाचत नाही तर, मादीपासुन इतर अन्य नर बेडकांना हाकलुन लावण्यासाठी हा पायाचा उपयोग करतो. अगदी पैलवानाने षडडु ठोकावा तसा काहीसा प्रकार आहे. षड्डु ठोकुन ही प्रतिस्पर्धी नर ऐकत नसेल तर मग लत्ताप्रहार (म्हणजे लाथ मारणे) हा प्रयोग करावा लागतो. समागमानंतर, हा बेडुक नर आणि मादी दोघे ही पुन्हा भुमिगत होतात. व पुन्हा पुढच्या वर्षी फक्त दोन आठवड्यांसाठी जमीनीच्या पृष्टभागाच्या वर येतात. म्हणजे जवळजवळ १२ ही महीने हे झोपतात. यांचे जीवनमान किमान ८ ते १६ वर्षांचे असु शकते.

सध्याची स्थिती अशी आहे की, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ह्या जातीचे तसेच बेडकाच्या अन्य ही अनेक जातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मला ज्ञात असलेला एकच देव आहे. तो म्हणजे निसर्ग. ह्या देवाची लिला अपरंपार आहे. किती विविधता आहे पहा या विश्वाच्या पसा-यात. कुणी शाकाहारी तर कुणी मांसाहारी. कुणी पाण्यात राहणारे तर कुणी पाण्या बाहेर राहणारे. तर कुणी कुणी पाण्यातही आणि पाण्याबाहेर ही राहु शकणारे. निसर्गाचे चक्र अव्याहतपणे फिरते आहे. निसर्गातील अन्न साखळी स्वयंचलीत आहे. किमान अजुन तरी आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपाने ह्या अन्नसाखळीतील काही कड्या तुटावयास आलेल्या आहेत. वाढत्या अन्नाची गरज, नवनवीन शेतजमीन तयार करण्याची गरज, पाण्याचे प्रवाह बदलण्याची गरज, फार्महाऊस साठी जमीन सपाटीकरण करीत पर्यावरण परीस्थितीकीला बदलण्याची गरज, उत्पादन वाढीसाठी व किटनियंत्रणासाठी विषारी खते व औषधांची गरज, या अशा अनेक कारणांमुळे नाच्या बेडकासारख्या असंख्य जीवांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

देवाने मानवास पृथ्वीवरील एक सहचर म्हणुन बनविला, पण माणुस स्वतःस या पृथ्वीचा स्वामी समजु लागला आहे. व याच्याच परीणामी, स्वतच्या फायद्यासाठी सृष्टीचे अव्याहत पणे शोषण मनुष्य करतो आहे. नाच्या बेडकासारख्या असंख्य प्रजाती असतील. इतर अनेक प्राण्यांच्या देखील असतील. व काही संपुष्टात देखील आल्या असतील. व सांप्रत या सर्वास जबाबदार मनुष्यच आहे. चंगळवाद व उपभोगवादाच्या दुष्टचक्रात अडलेल्या आधुनिक माणसाला हे समजत देखील नाही की त्याचा निसर्गातील आततायी हस्तक्षेप एक दिवस त्यालाच संपुष्टात आणेल.

ह्या दुष्टचक्रातुन सुटका करुन घ्यायची असेल तर मुल्यांची पुर्नस्थापना करणे गरजेचे आहे. "इदं न मम" ह्या व अशा अनेक प्राचीन मुल्यांना प्रतिष्टा प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. "मी" चा म्हणजे "अहं"चा उत्तरोत्तर विकास होत गेला पाहीजे. हा देहाधारी मी (अहं ब्रम्हास्मी), कालौघात व संस्कारांत व्यक्ति, व्यष्टीच्या पुढे गेला पाहीजे. व्यष्टीकडुन त्याने समष्टी(समाज) झाले पाहीजे व समष्टीकडुन सृष्टीमध्ये त्याचा अहंकार विलीन झाला पाहीजे. ही सृष्टी म्हणजेच मी आहे असा अनुभव मनुष्यास आला पाहीजे. याला आपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वाक्य वापरलेले आहे. "सर्व खल्विदं ब्रम्ह"...हे सर्व जगच ब्रम्ह आहे. असा अनुभव म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन एकाच जाणिवांच्या पातळीवर किंवा हवे तेव्हा हवे तसे हव्या त्या जाणिवेच्या पातळीवर जाऊन हव्या त्या प्राणीमात्राच्या जाणिवा जाणता येणे व सहवेदना सहन करणे, असे तर नसेल? आपण सगळे एकच आहोत. माझ्यात , तुझ्यात, सर्वांच्या अंतरी, सर्व प्राणीमात्रांत तीच एक चेतना विद्यमान आहे. हा समान धागा पकडुन आपण म्हणजे मनुष्य स्वामी नसुन सृष्टीतील इतर सर्व जीवांचा(प्राणी आणि वनस्पती) एक सहचर आहे हा संस्कार माणसामाणसावर करता येईल का?. त्यातुन मग शोषणाची वृत्ती नाहीसी होऊन आवश्यक तेवढेच व इतरांस कमीतकमी अपाय होऊन मिळेल तेवढेच निसर्गाकडुन घेण्याची सहज, उपजत प्रवृत्ती (म्हणजे धर्म) रुढ होईल.

खरच हे अवघड आहे का?

असो, विषयांतर झाल्यासारखे वाटले असेल कदाचित आपणास हे सर्व वाचताना. सुरुवातीस पर्यावरण, निसर्ग आणि शेवटास अध्यात्म. जर आपणास असे वाटले असेल की विषयांतर झाले तर आज किमान हे नक्की शिका की निसर्ग आणि अध्यात्म वेगळे नाही. निसर्गाच्या कणाकणात अध्यात्म आहे. प्रत्येक जीव (मनुष्य देखील) एका अज्ञात, निनावी , अनाकलनीय अशा सुप्त जिज्ञासेने पछाडलेला आहे. प्रत्येकास काही ना काही मिळवायचे आहे. कशाची तरी कमतरता आहे. प्रत्येक सजीव अविरत जीवंत राहण्याचा अटोकात प्रयत्न करताना दिसतो. जीवंत राहण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अहोरात्र सुरु आहे. पण जीवंत का राहायचे? ह्याची उकल काही कुणालाच झालेली नाही. व ती याची देही याची डोळा होईल असे वाटत ही नाही कारण जीवंत काअ राहायचे? हा प्रश्नच जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याचे उत्तर शोधण्याची किंवा मिळवण्याची सुतराम शक्यता नाहीये. संघर्ष, अपार कष्ट, प्रेम, मैथुन , निद्रा व कारण माहीत नसताना जीवंत राहण्याचा आग्रह व त्यासाठीचे कष्ट, ही सगळी लक्षणे त्या नाच्या बेडकाची आहे. आणि मनुष्याची देखील आणि चराचरातील सर्व प्राणीमात्रांची देखील आहेत. आणि हा बेडुक तर माणसापेक्षा कित्येक शेकडो वर्षे आधी पृथ्वीवर अस्तित्वात आला आहे. त्याच्याकडे जास्त अनुभव आहे व तो अनुभव पुढच्या पिढ्यांकडे सोपवला जात आहे. व ह्या सर्व क्रियाकलापाचा हेतु जर त्या न पडलेल्या प्रश्नाची उकल करणे हा असेल तर हा बेडुक माणसापेक्षा नक्कीच जास्त जवळ पोहोचला असेल त्या उत्तराच्या. त्यामुळे विषयांतर अजिबात नाही. आपल्यातील चिकित्सक वृत्ती जागी व्हावी. पर्यावरण, निसर्ग हे काही आपल्यापेक्षा वेगळे काही नाहीये. आपण स्वतःच निसर्ग आहोत. इतर सर्व प्राणीमात्रांचे सहचर आहोत स्वामी हा संस्कार आपण पुढच्या पीढ्यांना देऊया.
माऊलींच्या पसायदानामध्ये परवाच एक ओवी ऐकली. त्याप्रमाणे होवो.

॥जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात...॥

विसरु नका - वेबपेज वर जाऊन नाच्या बेडकाचा नाच आणि सुरेल गाणे जरुर ऐका.

http://nisargshala.in/amazing-kick-boxer-nisargshala/

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

गवि's picture

22 Jul 2017 - 1:28 pm | गवि

उत्कृष्ट लेख.

असे लेख येणं मिपाची समृद्धी वाढवतं.

निसर्ग या विषयावर तुलनेत कमी लिहीलं जातंय.

गामा पैलवान's picture

22 Jul 2017 - 1:53 pm | गामा पैलवान

गवि,

मिपावर निसर्गावर तुलनेनं कमी लिहलं जातंय याच्याशी सहमत. निसर्गावर लिहिण्यासाठी मनात एक ओढ असावी लागते. मिपाचा वाचक/लेखक वर्ग अतिशहरी होऊ घातलाय का?

लेख सुंदर आहे याच्याशीही सहमत.

आ.न.,
-गा.पै.

भारी माहिती आहे. नाच्या बेडूक सुद्धा असतो, ही नविनच माहिती मिळाली..

मार्मिक गोडसे's picture

22 Jul 2017 - 8:37 pm | मार्मिक गोडसे

सुंदर लेख.
अजून एक लिंक https://youtu.be/gOdwvrn7ors

जेनी...'s picture

22 Jul 2017 - 9:17 pm | जेनी...

आवडला लेख

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2017 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू बालिका!

मितान's picture

22 Jul 2017 - 11:03 pm | मितान

रोचक लेख !

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2017 - 12:55 am | डॉ सुहास म्हात्रे

निसर्गाच्या अजून एका आक्रिताची रोचक माहिती. निसर्गातील अनेक सजीव-निर्जीव गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ आहोत हेच वारंवार समोर येते !

यशोधरा's picture

23 Jul 2017 - 1:03 am | यशोधरा

सुरेख लेख. आवडला.

इडली डोसा's picture

23 Jul 2017 - 6:46 am | इडली डोसा

नाच्या बेडका विषयी माहिती नव्हती.
व्हिडीओ पहिला, अजून स्पष्ट हवा होता. पण हेही नसे थोडके =)

स्वाती२'s picture

23 Jul 2017 - 5:33 pm | स्वाती२

सुंदर लेख!