शाभभट्टा ची युरोप वारी... इटली , स्वीस , फ्रान्स ..लेखांक ७

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
17 Jul 2017 - 7:15 pm

दिवस सातवा

व्हेनिस शहराचे दर्शन घेण्याची वेळ आता संपत आली होती.रेल्वे स्थानकातील कॅफेमधे घुसलो. काहीतरी खरेदी केले की वायफाय चे कोड मिळते ही ठाउक झाले होते. "फ्री" वायफाय हे असे असते. ' आम्हाला दुधासह कॉफी हवी होती" पण काउंटर वरील महिलेला आमचे काही कळत नव्हते. आमच्याच बाजूला एक जपानी बाई उभी होती. तिला इंग्लीश येत होते. तिने 'लोट्टे 'ही कॉफी मागा असे आम्हाला सुचविले. त्याप्रमाणे दोन कप आम्ही मागितले. सहा युरोत दोन कप होते. त्यात आम्ही गोळ्या टाकून " आपली भारतीय कॉफी" प्यायला सुरूवात केली. कप अगदी मोठा होता. आम्हालाही वेळ होता. घोट घेता घेता आजूबाजूचे निरिक्षण करीत बसलो. काउंटर मागे उभे असलेले राखाडी युनिफॉर्मातील " सरव्हर्स " सफाईदार पणाची कमाल होते. एक रिदम मधे त्यांचे काम चालू होते. बाकी युरोपातून इतर ठिकाणाहून आलेले लोक मात्र आईसक्रीमलाच पसंती देत होते. काही लोक सॉफ्ट पेये हाणीत होते. वायफाय कोड मिळाले." आम्ही व्हेनिस आटोपून आता मिलानसाठी निघत आहोत" असा मेसेज मायदेशी पाठवते झालो. पुन्हा बाहेर पायरीवर येऊन बसलो. समोर कनाल पलिकडे व्हेनिस अलिकडे आम्ही .
साडेदहाच्या सुमारास लगेज ताब्यात घेतले. बाराच्या सुमारास गाडी फलाटावर लावण्यात आली. बरोब्बर १२ वाजून आठ मिनिटानी सुटली. ही गाडी थेट मिलानला जाणारी नव्हती. बोलोग्ना या वाटेतील स्टेशनवर मिलानला जाणारी दुसरी नाईट ट्रेन पकडणे प्राप्त होते. मधे दीडेक तासाचे अंतर त्या स्टेशनातच कंठावे लागणार होते. आम्ही उतरलो ते अगदी बीरव शांततेत. जबरी थंडी व कापरं वारं यामुळे फलाटावर बसण्याची सोयच नव्हती. त्यात युरोपात वेटिंग रूम हे प्रकरण
काही कुठेच नव्हते. सबब सबवे मधे जाउन बसलो तर थंडी कमी लागेल या हिशेबाने इथे उतरलो व जरा पेंगलो. काही तरी २ वाजून ४० मिनिटानी गाडी सुटणार होती. तो लक्षात आले की आपला चष्मा गायब झाला आहे. वेडया सारखा सबवे मधे शोध घ्यायचा प्रयत्न केला पण व्यर्थ . अगदी हवेत विरघळून गेला जणू. त्यात मी ज्या घड्याळावर अवलंबून राहिलो ते घड्याळ ( बायकोचे) बरोबर टाईम झोन अ‍ॅडजेस्ट केलेले नव्हते. वर फलाटावर चष्मा पाहू म्हणून वर आलो तर एक गाडी येऊन उभी. मला काय वाटले कुणास ठाउक मी टीसी ला विचारले " मिलान ? " त्याने येस म्हणताच आम्हाला अक्षरशः गाडीत ढकलले. व गाडी मिलानच्या दिशेने चालू झाली. युरोपातील व्यवस्थेत एक घोळ कायमचा दिसला तो म्हणजे इंडीकेटर व अनऊन्समेंट असतीलच असे नाही. तसेच गाडीवर इन्जिनावर समोर व ड्ब्यांवर बाजूला " पुणे मुंबई पुणे दक्खन राणी " असे लक्ख लिहिलेली पाटी नसते. त्यामूळे पर्यटकांचा घोळ होतो.

युरोपातील ट्रेनचे सर्व डबे एकमेकाना जोडलेले असतात. दुसर्‍या मधून पहिल्या क्लास मधे जाता येत नाही ही भानगड नाही. सबब शोधत शोधत आमचे आरक्षण असलेल्या जागा मिळाल्या व जागेवर बसलो तरी छातीतली धडधड चालूच. त्या टीसी आभार मानावेत की " मिलान? " हा प्रश्न योग्य सेकंदाला विचारल्याबद्द्ल स्वतः ला सलाम करावा हे आज तागायत मला पडलेले कोडे आहे.नाहीतर " ऑन डे" तिकिट किती पडले असते कुणास ठावुक ?"
.
मागे मिलानचे रेल्वे स्टेशन.
सकाळी सातच्या च्या सुमारास मिलान सेंट्रल या डिझाईन टर्मिनस प्रमाणे पण नाव " सेंट्रल" असलेल्या स्थानकावर उतरलो. मिलान- इटलीतील धनिकांचे मिलान. अधुनिकतेचे प्रतिक- मिलान , ललनांच्या वस्त्रप्रावरणाची नगरी- मिलान अशा शहराचे हे स्थानक युरोपातील गिन्या चुन्या भव्य , प्रासादतुल्य रेल्वे स्टेशन पैकी एक आहे.
.
मिलानच्या रेल्वे स्थानका समोर . कमालीचा स्वच्छ , मोकळा व विशाल परिसर. अधुनिक युरोपाची एक झलक.
स्टेशनाला जोडूनच मेट्रोचे बीळ आहे. इथून ड्युमो या स्थानकाला जायचे तर एम थ्री ही मेट्रो किंवा ट्राम यांचे पर्याय होते. जाताना मेट्रोने जाउ व येताना ट्रामने शहराचा दिमाख पाहत येऊ अशा बेताने प्रथम प्रत्येकी १२ /१२ युरो दाखल करून दोन्ही बॅगा क्लोकरूम मधे टाकल्या. म्हण्जे जवळजवळ किमतीच्या इतके पैसे ६ तासाच्या राखणी साठी ! बाहेर आलो तर पावसाळी वातावरण व आम्ही छत्र्या लगेज मधे टाकून आलेलो. मागे स्टेशनची भव्य दगडी इमारत पुढे विशालकाय प्रांगण व त्याबाजूस इटलीत आतापर्यंत न दिसलेल्या उंच काचांच्या भिंती. हवेत गारठा व त्यात गार वार्‍याचा मारा की अंगावरचे कोट थंडीने गारठून गेले. त्या जागी आम्ही त्या वखताला जवळ जवळ दोघेच . उगीच एखादी मोटर गाडी येताना जाताना. मेट्रोच्या गुहेत शिरलो. व दहाएक मिनिटात ड्युमो स्थानकावर उतरलो. बाहेर॑ आलो ते एकदम कथिड्रल चे थेट दर्शन. वाटले होते जरा चालावे लागेल.
.
मेट्रो मधून बाहेर की लगेचच मिलानचे जगप्रसिद्ध कथिड्रल.
.
चर्च समोरून .
ऊंचच ऊंच व पराकोटीची कलाकुसर असलेले हे चर्च ५०० वर्षे बांधले जात होते म्हणतात. अखेर १९६५ ला ते पूर्ण झाले. आपल्या सहलीत कलोनचे देखणे चर्च बसले नाही तरी मिलानचे पहायला मिळणे आता दूर नाही या जाणीवेने आनंद वाटला. बारीक भुर भूर करीत पाउस सुरू झाला होता. चौकशी करता प्रवेशासाठी ३ युरो प्रत्येकी भरावे लागणार होते. तिकिटे घेऊन आत शिरलो. हे चर्च आतून काहीसे अंधारे होतेच पण जागोजागी फ्लड लाईट टाकून आतला भाग प्रकाशित करण्यात आला होता. मधे नेव्ह व दोन्ही वाजूस आईल्स मागे अल्टर असे साचा चर्चचा ससतोच तसा इथेही होता. पण नेव्ह मधे पर्यटकाना प्रवेश नव्हता. आईल्स लांबी दरम्यान कप्या कप्यात कोणा कोणा संतांची स्थापना झालेली. व समोर मेणबत्या.नेव्ह च्या वरती एकेका कप्यात " ट्रिपल आर्च " ची रचना.
.
चर्चचे जरा बाजूने दर्शन व समोर भव्य आंगण . फोटो साभार .सौजन्य आंतरजालावरील अनामिक.
.
रात्री कथिड्रलची भव्यता अशी खुलून दिसते . फोटो साभार ,सौजन्य आंतरजालावरील अनामिक.
याच कथिड्रल च्या बाहेरील भागावर सुमारे २५०० ते ३००० पुतळे बसविले गेले आहेत. या चर्च च्या सर्वात वरच्या मजल्यावरून मिलान शहर पहाता येतेच पण चर्चच्या बांधकामातील बारकावेही जवळून पहावयास मिळतात. आम्हाला दोनची ट्रेन पकडायची होती शिवाय बजेट टूर असल्याने आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. बाहेर आलो तो पावसाची सर आली. सर्व पर्यटकानी छत्र्या उघडल्या .
.
आंगणातील पुतळा ..
आम्ही मात्र जवळच्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील कॉरिडॉरचा आधार घेत समोरच्या प्रांगणाकडे व चर्चच्या भव्य दर्शनी भागाकडे पहात राहिलो. अक्षय कुमारच्या एका सिनेमात या अंगणात चित्रित केलेला एक डान्स सिक्वेन्स आहे. पाउस काही थांबण्याचे लक्षण दिसेना अतः जवळील मॉल मधे चक्क्कर मारावी म्हणून पावसाचा मारा चुकवीत आत शिरलो.
.
मॉल मधील इटालियन मार्बल मधे केलेली रंगीत फरसबंदी
.

.
खास इटालियन देखणे एलेव्हेशन
.
कातडी मालाची आकर्षक शोकेस
.
'या' ब्रॅन्ड बद्द्ल म्या पामर काय बोलणार . अशांसाठीच तर मिलान प्रसिद्ध आहे.
.
क्या बात है
.
हा त्या मॉलचा मध्य चौक
.
रात्रीच्या प्रकाशात न्हाउन निघालेला मॉल - साभार , सौजन्य आंतरजालावरील अनामिक.
वीसेक मिनिटे प्रेक्षणीयतेचा सोहळा अनुभवत या कोपर्यातून त्या कोपर्‍यात निरनिराळ्या ब्रॅन्डसच्या शोकेस पहात फिरू लागलो. खाली इटालियन मार्बलचे टस्कनी प्रांतात असतील नसतील तेवढे रंगीत संगमरवरी दगड आणून सुरेख फरशीकाम येथे केले आहे. वर पारदर्शी अर्धवर्तुळाकार छत या दोन्हीच्या मधे मस्त रोमन शैलीतील खांबांनी बंदिस्त खिडक्या असलेल्या भिंती यात जोड म्हणून की काय जागोजागी प्रकाश फेकणारे दिवे.

मिलान खरे तर दोन दिवस राहून नीट पहावे असे स्थान आहे . भारतीय पर्यटन कम्पन्याना या शहराचे वावडे आहे असे दिसते. अर्थात मीही मिलानचा॑ उपयोग बर्निना पास या जागतिक वारसा मिळालेल्या खिन्डीतून जाण्याची एक शिडी म्हणूनच केला हे कबूल केले पाहिजे. वेळ कमी होता. दुपारच्या दोनच्या सुमारास निघणारी रिजनल ट्रेन मला लेक कोमो मार्गे तिरानोच्या दारात नेऊन सोडणार होती. येताना ट्राम ने यावे व शहराचा नजारा अनुभवावा हा बेत बदलून पुन्हा मेट्रोच्या गुहेत घुसलो. पंधरा मिनिटात मिलान सेंट्रल. लगेज ताब्यात घेतले. लगेज कार्यालयातील मुलीला विचारले" २४ युरो हे फार वाटतात आम्हा भारतीयाना... तुला २४ युरो काहीच नाही असे वाटत असेल ना ?" " मलाही ते फार वाटतात ! " असे तिचे उत्तर मला कोड्यात टाकणारे होते. तिला मी जरा संकोचानेच ?पगार किती मिळतो? "असे विचारले तर ३५ युरो दिवसाचा (आठ तासाचा ) है ऐकून मी चाट पडलो. कदाचित अर्न एन लर्न या पातळीत काम करणार्‍याना हा पगार ठीक वाटत असेल.

मिलान तिरानो हे १२ युरोचे प्रत्येकी तिकिट खरेदी केले व ट्रेनमधे शिरलो.खिडकीत जागा मिळणे हा काय प्रश्न च तिकडे नाही. मिलानच्या उपनगरना पार करीत गाडी कंन्ट्री साईड मधून दौडू लागली . मस्त आखीव वसाहती , सुशोभित बाल्कनीज नजरेसमोरून पळत होत्या. डाव्या हाताला लेक कोमो दिसू लागले. अन आता सहा दिवसाच्या रम्य प्रवासाची नांदी मनात चालू झाली. कोमो तलावाच्या काठा काठाने जात ट्रेन आता पूर्वेकडे वळली व दोन उंच पर्वत रांगामधून इटली व स्वीस सरहद्दी वरील तिरानो या लहानशा गावाकडे निघाली.

लेक कोमो हे फार सुरेख ठिकाण आहे असे तूनळी वरच्या फिर्तींमधे पाहिले होते. पण आताचे लेक कोमो खाली उतरलेल्या ढगांनी लिप्त असल्याने काहीसा विरस होत होता . पावसाची भूरभूर चालूच. अखेर तिरानो या स्थानकावर उतरलो.
.
हॉटेल करोना ' तिरानो.
आम्ही ठरवलेले हॉटेल करोना स्टेशन पासून फक्त ५०० मीटर अंतरावर होते. बुकिंग करताना युरोमध्ये पैसे भरावे असे कार्ड माझ्याकडे नसल्याने मी बुकिंग रद्द करताना मिस कारेन शी माझा पत्रव्हवहार झाला होता.आता आपल्याला रूम मिळेल का ? व कोणत्या दराने ? हा प्रश्न मनात घोळवत बॅगा फूटपाथवरून खेचत हॉटेल गाठले. " मला नाईलाजाने बुकिंग रद्द करावे लागले.... " अशी मी सुरूवात करताच रिसेप्शनचरच्या मुलीने " आर यू...... ? " असा प्रश्न लगेच केला मी होकार दाखविल्यावर " आता त्या रूम ला आताचे भाडे द्यावे लागेल.. .अशी ओळ तिच्या मुखातून येताच माझ्या हिशेबी मनात लगेच आता किती जास्त युरो ? असा सवाल उभा राहिला. " प्लीज डू समथिंग .. असे एकच प्लीज खर्च केल्यावर तिने " ओके.... यू अ‍ॅन पे अग्रीड अमाउंट ५०.१५ युरो ! ? असे म्हटल्यावर " ग्रासिया .... मिस.... " यावर " कारेन ! " असे उत्तर आल्यावर " वाउ कारेन ग्लॅड यू आर हिअर असे काहीसे मी बोलून गेलो. पैसे भरले. रूमचा ताबा घेतला. व पाहिले आडवे आलो. गेले दोन दिवस पाठ जमिनीला टेकलेली नवव्हती. सहा वाजले तरी बाहेर पावसाळी वातावरण असूनही लक्ख उजेड होता.
.
तिरानो तील पावसाळी संध्याकाळ.
दुसर्‍या दिवशी लूसर्न ला जाण्यासाठी सकाळी ७ लाच बाहेर पडायचे असल्याने जरा चक्कर मारून तिरानो चा नजरेनेच आस्वाद घ्यावा म्हणून बाहेर पडलो . आमच्या जवळ्ची फळे संपत आल्याने दुकाने शोधू लागलो पण सर्व दुकाने त्या विशिष्ट वारी म्हणे ६ लाच बंद होतात. मग नुसतेच चकरा मारणे. आजूबाजूच्या उंच शिखरांवरील बर्फ न्याहाळणे झाले. सकाळी घोळ नको म्हणून तिरानो ची स्वीस चे स्टेशन प्रथम पाहून ठेवले. ( इटालीचे स्टेशन बाजूलाच पण वेगळे आहे ).

ऊद्या पासून अलम दुनियेचे आकर्षण ठरलेला " स्वीस महल" आम्ही पहायला जाणार होतो. गेल्या दोन रात्री ट्रेनमधे काढल्या होत्या. मायभूमीत अगणित वेळा रात्री स्लीपर क्लास च्या कोलाहलात प्रवास केला होता त्यामानाने युरोपातील रात्रीचा प्रवास फारच समाधानकारक होता. पण आता उद्याचे वेध लागले होते तेंव्हा डोळा कधी लागला हे असे उमगावे ?

क्रमशः

प्रतिक्रिया

तुम्ही स्वतः आखणी केल्यामुळे एकदम वेगळ्या शैलीतून आणि वेगळ्या ठिकाणांचे वर्णन वाचायला मिळत आहे.

अजून एक बॅकअप चष्मा ठेवला होता काय? मिलानच्या फोटोत चष्मा दिसतोय.

चौकटराजा's picture

18 Jul 2017 - 6:16 pm | चौकटराजा

प्रत्येक " चार डोळे " वाल्याने एक जुना चष्मा बरोबर न्यायलाच पाहिजे. मी नेला होता. पण त्याच्याही एका बाजूच्या काडीची बिजागरी तुटली पुढे. पण बरोबर हवा म्हणून सेलोटेप घेतला होता तो गुंडाळून " काम" भागविले.

रामदास२९'s picture

21 Jul 2017 - 7:03 pm | रामदास२९

चौरा साहेब .. एकदम बरोबर .. चष्मा, पोवर ब्यान्क ह्या गोष्टी प्रवासात अत्यावश्यक आहेत..

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2017 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे सफर ! चर्च तर देखणे आहेच... पण, मॉलही काही कमी सुंदर नाही !

जबरी थंडी व कापरं वारं यामुळे फलाटावर बसण्याची सोयच नव्हती.

इटली मधल्या स्टेशन्सवर वातानुकुलीत केबिन्स नाहीत की काय ? स्वित्झर्लंडमध्ये आहेत. हिवाळ्यात अत्यावश्यक असलेली सोय !

चौकटराजा's picture

17 Jul 2017 - 9:04 pm | चौकटराजा

होय अशीच वेळ इंटरलाकेंन ला आली असता तिथे मात्र आपण म्हणता तसे केबीन आहे.त्याचा लाभ झाला.

मजा येतेय वाचायला फोटो अजून हवे होते.

तुमचा तुम्हीच करत असलेला प्रवास अगदी इन्स्पायरिंग आहे चौराकाका ! वाचता वाचता माझ्या डोक्यात आपल्याला हे कसे साधता येईल विचार सुरु होतो!!

मस्त प्रवास वर्णन आणी फोटो . शुभेच्छा .

सुंदर सफर सुरू आहे. तुमच्या पर्सपेक्टिव्हने आणखी देखणी झाली आहे.

निशाचर's picture

18 Jul 2017 - 5:33 pm | निशाचर

फोटो मस्तच!
मिलानला "The last supper" पाहिलं नाही का? एका बॅगेसाठी १२ युरो खूप जास्त आहेत. तेवढ्या वेळासाठी साधारण ५ ते ६ युरो दर असतो.
बर्निनाच्या viaducts च्या प्रतिक्षेत!

मोदक's picture

18 Jul 2017 - 5:52 pm | मोदक

भारी हो चौरा काका...!!!

अभ्या..'s picture

18 Jul 2017 - 6:01 pm | अभ्या..

मस्त हो चौराकाका, एकदम हॅन्डसम फोटो आलेत तुमचे.
जबरदस्त ट्रीप.

एवढा मोठ्ठा, लंबा-चौडा प्रवास व्यवस्थित प्लॅन करून केल्याबद्दल तुमचे खरेच कौतुक . ६ तास बॅग ठेवण्यासाठी १२ युरो इथल्यानुसारही जास्तच आहेत आणि तिची ८ तासाची सॅलरी नक्कीच कमी ! मिलानचे चर्च कलोन पेक्षा कांकणभर जास्तच देखणे आहे त्यामुळे ते हुकले तरी हरकत नाही , तुम्ही हे तर पाहूच शकलात.

कंजूस's picture

18 Jul 2017 - 10:05 pm | कंजूस

डोळे उघडणारा प्रवास. वर चरचरीत चटकदार मसाला वर्णन.
कायकाय बरंच वाचन केलेलं दिसतय. पारशालाही माथेरान दाखवाल इटकं टुमाला माहिट आहे.

मी कोण's picture

19 Jul 2017 - 8:01 am | मी कोण

मी मागे तुम्हाला सर्व ठिकाणांचे पत्ते व फोन देण्याची विनंती केली होती,द्याल का?

चौकटराजा's picture

19 Jul 2017 - 9:11 am | चौकटराजा

म्हणजे नक्की काय ..... ? युरोपातील सर्व स्थळे ही सुदैवाने ९० टक्के गुगल अर्थ गुगल मॅप व मुख्य म्हणजे गुगल स्ट्रीट व्यू या वापर करून जाण्यापूर्वीच " पाहून" घेता येतात.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2017 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह... मजा आ रहा है!

पुभाप्र.

मस्त.. माहिती आणि फोटो आवडले.

Saagar Regade's picture

20 Jul 2017 - 12:52 pm | Saagar Regade

हे हॉटेल करोना नसून त्याला कोरोना असं वाचावे. माझ्या सध्याच्या पुण्यातल्या कंपनीचे नाव पण सारखेच असल्यामुळे मला सवय झाली आहे असं करेक्ट करून सांगायची. त्याबद्दल क्षमस्व. बाकी ट्रिप अतिशय सुंदर चाललेली आहे. तिरानो तर अतिशय सुंदर दिसतंय. मला आपल्या हिमाचल ची आठवण झाली.

चौकटराजा's picture

20 Jul 2017 - 1:22 pm | चौकटराजा

आता उच्चरांचा घोळ तर पुढेच आहे. स्वीस म्हण्जे अर्धे फ्रेंच व अर्धे जर्मन ... Chur याचा उच्चार " क्वार " असा आहे म्हणे ! )))

पैसा's picture

20 Jul 2017 - 1:12 pm | पैसा

छान लिहिताय