खांडसहून शिडीघाट मार्गे पदरवाडी

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in भटकंती
11 Jul 2017 - 11:30 pm

८ जुलै २०१७

कर्जत जवळील खांडस या गावातून भीमाशंकर असे गिरीभ्रमण करता येते. पण आम्ही पदरवाडीपर्यन्तच जायचे ठरवले. यात मुख्य भाग होता तो म्हणजे थरारक असा शिडी घाट चढणे. ठाण्याहून सकाळी ७ वाजता निघायचे असे ठरले. मी अंबरनाथला रहात असल्याने ते मला पाइपलाइन रोडवर भेटणार होते. पण आमची एक मैत्रीणीला निघायला उशीर झाल्याने आणि त्यातच तिला इतर काही अडचणी आल्याने तिला पोचायला आणखीनच उशीर झाला. मग तिला अम्ही थेट बदलापूरलाच बोलवले. ती साधारण नउ सव्वानउ आली आणि मग आमचा प्रवास सुरु झाला.

बदलापूर सोडले की विठ्ठल कामत हे उपहारग्रुह लागते. तिथे सर्वांनी नाश्ता केला. मग पुढे निघालो. तीन कार मधुन आम्ही ११ जण होतो. शेलु आणि नेरळ च्या मधे पाइप लाइन रोडवर एक फाटा डावीकडे जातो. तिथुन गेले की रेल्वेचे फाटक लागते. ते ओलांडले की कशेळे गाव लागते. तिथुन साधारण १० ते १२ किलोमिटर वर खांडस गाव लागते. आधिच उशीर झाल्याने आम्ही खांडसला सव्वा बारा च्या सुमारास पोचलो.

खांडस ... छोटेसे गाव! काही कौलारु घरे दिसत होती. घरासमोर कोंबड्या दाणे टिपत फिरत होत्या. समोरच एक मन्दिर दिसत होते. शेतामधे लावणी झालेली दिसत होती. मागे भीमाशंकरचा आडवा पसरलेला डोंगर दिसत होता. छोटे छोटे धब्धबे वहात होते. सगळीकडे हिरवेगार दिसत होते. ते पाहुनच मन प्रसन्न झाले.

खांडस गावातील वस्ती

गाड्या पार्क करुन, आपापले सामान घेउन , एक्मेकांशी ओळख करुन घेउन चालायला सुरवात करेपर्यन्त साडेबारा वाजून गेले होते. सुरवातीचा डांबरी रस्ता संपला आणि मातीचा रस्ता सुरु झाला. कडेने सर्वत्र हिरवे गवत उगवले होते.

ट्रेकची सुरवातच असल्याने सर्वजण उत्साहात व फोटो काढत चालत होते. थोड्याच वेळात एक ओढा लागला. पाणी मस्त थंडगार होते.सर्वांनी त्यात यथेच्छ डुंबुन घेतले. मग पुन्हा चालायला सुरवात केली. आता मात्र दाट जंगल लागले. आणि चढण सुद्धा उभी होती. ती चढताना सर्वांचेच श्वास जोरात चालू लागले. त्यातच डासही चावू लागले. ओडोमास लावले, ते सर्व घामाने निघून गेले. " शिड्या येणार तरी कधी ?" असे जो तो विचारु लागला.


ऐसपैस शिडी


जंगल मे दंगल

चढ अधिकच उंच होत गेला व एकदाच्या शिड्या आल्या. सुरवातीच्या शिड्या मस्त आपले पाऊल पूर्ण मावेल अशा पायर्यांच्या होत्या. आता आमच्या उजव्या हाताला डोंगराचा उभा कडा होता.पुढे एका ठिकाणाहून धबधबा वाहत होता. मागे पदरगड दिसत होता. मंदिरासमोर जणु नंदी बसला आहे, असे दगडातले नैसर्गिक शिल्प साकारले होते. आणि उजव्या हाताला लगेचच गच्च झाडीने भरलेली दरी होती.

डोंगराचा कडा, पदरगड व उजवीकडे दरी

ही शिडी एखाद्या लोखंडी जिन्याप्रमाणेच असल्याने आम्ही भराभर चढुन गेलो. पुढे मात्र वाट अधिकधिक बिकट व खडकाळ होत गेली. पुढच्या शिड्या आल्या. त्या मात्र शिडी प्रमाणेच होत्या. थोड्याशा डुगडुगत ही होत्या. पण त्या दगडांवर घट्ट बसवलेल्या असल्याने तसा काही धोका नव्हता. हळुहळु आम्ही सर्वजण त्या दोन शिड्या पार केल्या. व वर आलो.

शिडीची वाट

आता खडकाळ भाग सुरु झाला. इथुन चढणे मात्र थोडे धोकादायक वाटत होते. दोन्ही हात धरायला दगडातल्या कपारी शोधायच्या, एक पाय ठेवायला जागा शोधायची व शरीर उचलुन दुसरे पाऊल कुठे ठेवता येईल ते पहायचे अशी चढाई सुरु झाली. पण जास्त न घाबरता आम्ही धीराने मार्ग्रक्रमण करत होतो. आमच्या सहकार्यांनीही आम्हाला मदत केली व आमचे मनोधैर्य वाढवले.

खडकाळ वाटेवरुन मार्गक्रमण

तो टप्पा थोडाफार पार केला आणि अगदी जवळुन पडणारा एक धबधबा दिसला. सगळेजण तेथे थोडे विसावले व फोटो काढण्यात मग्न झाले.

मोत्यांचे तुषार

मोत्यासारखे पाण्याचे तुषार उडत होते. ते दृश्य पाहून आमचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. आम्ही पुन्हा एकदा ताजेतवाने झालो व पुढिल चढाईला लागलो. पुढचा अजून एक खडकाळ टप्पा पार केला आणि समोरील दृश्य पाहून आम्ही आनंदाने वेडे झालो. मोठा धबधबा कोसळत होता व त्याखाली बसायला ही जागा होती. मग काय ... आपल्या पाठपिशव्या , मोबाईल सर्व सुरक्षित जागी ठेवून आम्ही धबधब्याखाली जाउन बसलो. त्याचे तुषार अंगावर घेताना व चिंब भिजताना खूप मजा वाटत होती. सर्व श्रम हलके झाले होते.

धबधब्याखाली भिजताना

मनसोक्त भिजून घेतले व पुन्हा पाठपिशव्या घेउन निघालो. आता पदरवाडीचे पठार जवळच आले होते. थोडेसे चालत गेल्यावर एक मोठ्ठी विहीर दिसते. विहिरीत पाणी भरपूर दिसत होते, पण जरा पांढुरके झालेले. आत कचराही टाकलेला दिसत होता. एवढी पाण्याची सोय आहे, पण स्वच्छ पाणी नाही, हे बघून थोडे वाईट वाटले. तसेच पुढे निघालो. लवकरच पठारावर आलो. पठारावर तशी फारशी जागा नाही. एक खोपट उभे केले आहे. व त्याच्या दोन्ही बाजूना फळ्या टाकल्या आहेत. त्यावर बसलो. तिथे एक मावशी चूल पेटवून व चहाची तयारी करुन जणूकाही आमचीच वाट बघत होत्या. मग त्यांना चहा करायला सांगितला व आम्ही आमचे जेवणाचे डबे काढले. जेवण झाल्यावर चहा प्यायला. पुन्हा भरपूर फोटो काढले. बाजुला भाताची शेते दिसत होती. लावणी चालू होती. मागे भीमाशंकरचा डोंगर दिसत होता. तिथुन वर जाणारे व उतरणारे लोक दिसत होते.

नुकतेच लावणी झालेले शेत

दरम्यान चहा करणार्या मावशींची मुलाखत घेतली. त्या म्हणाल्या आम्ही शिडी घाटातुन आणी गणेश घाटातून पण जातो. आम्हांला खूप आश्चर्य वाटले. जिथुन आम्ही खूप सांभाळून हळुहळु आलो, तिथून हे लोक रोज जा ये करतात. या डोंगरात राहणार्या काटक लो़कांची खरंच खूप कमाल वाटते. अशा दुर्गम ठिकाणी राहणे ही कदाचित त्यांची अपरिहर्यता असेल, पण त्यांची जिद्द, चिकाटी, कष्टाळू स्वभाव पाहून मनोमन त्यांना सलाम करावासा वाटतो.


मावशींचा चहा तयारच आहे


थोडासा विसावा

वर पोचायला आम्हाला जवळजवळ तीन तास लागले होते. वर थोडे थांबून निघायला पाच वाजले. आता थोडी घाई करणे आवश्यक होते. आम्ही भराभर निघालो. उतरताना अधिक कठिण जाईल असे वाटले होते. पण एक-दोन जागा वगळता फारसे कठिण गेले नाही. बाकी सर्व ठिकाणी सावकाश बसत बसत उतरलो.


अवघड टप्पा पार करताना

शिड्या उतरुन जंगलातील अवघड उभा उतार उतरुन साडेसहा वाजेपर्यन्त पुन्हा ओढ्यापाशी आलो. आता श्रमपरिहार म्हणून पुन्डुंबण्याचा मोह आवरला नाही. पुन्हा एकदा मस्त डुंबुन घेतले. व खांडस गावात आलो. तो पर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. एका घरी चहा घेतला व साडेआठला परतीच्या प्रवासाला सुरवात केली. त्याचबरोबर मैत्रीणीकडून पुढच्या वेळी लवकर यायचे वचन घ्यायला विसरलो नाही.


मौज मजा मस्ती


रात्री जेवणासाठी थांबलो, तिथे असा झिम्माड पाऊस आला. संपूर्ण ट्रेक दरम्यान मात्र याने हुलकावणी दिली होती.

निसर्गाची रौद्र, देखणी, मनमोहक रुपे मनात साठवून याच वाटेने एकदा भीमाशंकरला जायचा विचार मनी घोळवत त्या ठिकाणचा निरोप घेतला.

प्रतिक्रिया

छान वर्णन! पण फोटो दिसत नाहीत.

ऋतु हिरवा's picture

12 Jul 2017 - 10:51 am | ऋतु हिरवा

मला तर दिसतायत फोटो

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2017 - 11:20 am | प्रसाद_१९८२

ट्रेक वृतांत आवडला.
फोटो फक्त गुगल क्रोम मधूनच दिसतायत

ऋतु हिरवा's picture

12 Jul 2017 - 12:19 pm | ऋतु हिरवा

मिपावर फोटो टाकणे फारच अवघड वाटते :(

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Jul 2017 - 12:19 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्त वृत्तांत. फोटो थोडे अधीक क्लॅरीटीवाले आणी मोठे हवे होते.
पुढच्या ट्रेकला शुभेच्छा.

फोटोच्या लिंक्स थंबनेलमधल्या काढल्या आहेत त्यामुळे पुसट दिसतात. उदा शेवटच्या फोटोची लिंक:https://lh3.googleusercontent.com/-FJdZjI0dZ-R4Dlml7taBcWqp5whCRodiSQXtf... फक्त १०kb च्या फोटोची आहे. लिंकच्या शेवटी rw अक्षरे आहेत त्याऐवजी -no असणारी वेगळी लिंक वापरावी.

ऋतु हिरवा's picture

12 Jul 2017 - 3:47 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद! फोटोसाठी पुढिल प्रय्त्नात यश येते का बघुया.

सिरुसेरि's picture

12 Jul 2017 - 4:21 pm | सिरुसेरि

well planned trip

ऋतु हिरवा's picture

14 Jul 2017 - 1:59 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद

ऋतु हिरवा's picture

14 Jul 2017 - 2:02 pm | ऋतु हिरवा

अखेर सर्व फोटोंमध्ये सुधारणा करुन पोस्ट संपादित केली आहे. यासाठी श्री. शरद गाडगीळ उर्फ श्री. कंजूष यांचे मनापासून आभार !

आता सर्वांना हे फोटो नीट दिसतात का कृपया सांगावे.

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Jul 2017 - 8:10 pm | भ ट क्या खे ड वा ला

वर्णन तर सुंदरच आता फोटोन्मुळे बहार आली

Sachin Bhat's picture

20 Jul 2017 - 1:47 am | Sachin Bhat

अनवट किल्ले या लेखात सगळे फोटो व्यवस्थित दिसतात त्या प्रमाणे या लेखात का नाही दिसत. सगळ्यान्नी एकच लिन्क वापरली तर खुप सोयिचे होइल. अशी विनन्ती.

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:24 pm | ऋतु हिरवा

काहीजणांना फोटो दिसत आहेत. पण काहीना नाही दिसत हे खरे आहे. मिपा वर लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. फोटो टाकणे थोडे अवघड गेले. तुम्ही लिंक दिली आहे, त्यासाठी धन्यवाद. त्यावरून नक्की प्रयत्न करेन.

संजय पाटिल's picture

20 Jul 2017 - 5:30 pm | संजय पाटिल

सुंदर वर्णन!! फोटो पण सुरेख...

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:25 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद