गूढ भाग ५ (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
24 Jun 2017 - 4:36 pm

तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मी उरलेली संपूर्ण कथा या भागात टाकते आहे.

गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024

गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034

गूढ भाग ३: http://www.misalpav.com/node/40049

गूढ भाग ४: http://www.misalpav.com/node/40056

भाग ५

चंद्रभान म्हादुच्या घराच्या दिशेने चालतच निघाला. गाडी त्याने देवळाजवळच ठेवली. गाव इतके लहान होते की तिथे रस्ते देखील नव्हते. त्यामुळे गाडीने जाणे शक्यच नव्हते. कालपासून सतत लागोपाठ घटनाचक्र चालू होते. त्यामुळे खर तर चंद्रभानला शांतपणे विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण आता चालताना त्याच्या मनात विचार यायला लागले. तो राजनच्या स्टुडियोमध्ये पोहोचल्यापासून जो घटनाक्रम सुरु झाला होता तो आता इथे या वळणावर येऊन थांबला होता. आतापर्यंत तो केवळ एक घटक होता. पण आता यापुढे त्याला एकूणच घडणाऱ्या घटनांचा ताबा घेणे आवश्यक होते. कारण केवळ आता तो प्रेक्षक राहिला नव्हता तर एकूण घडणाऱ्या गोष्टींचा एक भाग झाला होता. चन्द्रभानच्या एक लक्षात आले की म्हादुला भेटण्याच्या अगोदर त्याने एकूण सद्यपरिस्थितीचा निट विचार केला पाहिजे. कारण म्हादू अशिक्षित आणि गावंढळ असला आणि गावातले लोक त्याला वेडा समजत असले तरी शेवटी तोच एक मार्ग होता चंद्रभानकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा.

विचार करताना परत एकदा चंद्रभान त्याने लिहिलेल्या गोष्टीकडे वळला. त्याने ती गोष्ट अगदी सहजच लिहिली होती. मित्राशी मारलेल्या गप्पांमधून जे सुचल होत ते त्याने त्यावेळी लिहील होत. मग त्याने लिहीलेल्या गोष्टीमधला म्हादू खरच कसा होता? याच त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होत. बर... म्हादू नावाची व्यक्ती सर्वसाधारणपणे सर्वच गावातून असते अस म्हणावं तर हा म्हादू त्या शहरी बाबुला भेटल्याचे सगळ्यांना सांगत फिरत असतो. असाच विचार करताना चंद्रभानच्या मनात आल की खर तर निशाचा त्याने लिहिलेल्या गोष्टीशी काय संबंध असावा? उमरगावात कोणा खरातांचा वाडा असेल, मी त्यावर एक गोष्ट लिहिली असेल, त्या गोष्टीतला म्हादू देखील खरच असेल... पण अशा एक कल्पना करून लिहिलेल्या गोष्टीचा आणि निशाच काय संबंध? असा विचार चंद्रभानच्या मनात आला आणि त्याला निशाचे आणि त्याचे संभाषण आठवले.

त्या दोघांनी गप्पा मारायला सुरवात केली तेव्हा निशा स्वतःमधेच हरवली होती. चन्द्रभानने बोलायला सुरवात केली होती तेव्हा तिचे त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष नव्हते हे त्याला आता जाणवले. त्यावर त्याने तिला विचारले देखील होते की ती ठीक आहे ना की हरवली आहे. त्यावरचे तिचे उत्तर त्यावेळी चंद्रभानला कळले नसले तरी आता एकूण घडलेल्या घटनांचा विचार करता ते उत्तर म्हणजे घटनाक्रमाची सुरवात होती हे त्याच्या लक्षात आले. तिने म्हंटले होते,' मी हरवलेच आहे आणि तरीही इथेच आहे.' काय अर्थ असावा तिच्या त्या वाक्याचा? चंद्रभानच्या मनात आले. त्यानंतर तिने त्याला कथा कशा सुचतात ते विचारले होते. आणि त्यावर तो उत्तर देताना आपल्याच विचारात क्षणभरासाठी हरवला होता. त्यानंतर तिने काहीतरी म्हंटले होते आणि 'हो की नाही,' असे त्याला विचारले होते. काय म्हणाली होती ती? चंद्रभानच्या मनात आले. ती जे काही म्हणाली ते आठवणे आवश्यक आहे असे चंद्रभानला वाटले, कारण कदाचित ती त्यावेळी जे म्हणाली त्याचा या घडणाऱ्या घटनांशी जवळचा संबंध असू शकतो.

त्याने मेंदूला ताण दिला आणि त्याला अचानक आठवले. ती म्हणाली होती,"अहो शेवट काहीही असला तरी कथा तर तुम्हीच लिहिता ना? कदाचित सुरवात करताना तुम्ही एक शेवट ठरवत असालही. पण मग जसजशी कथा पुढे सरकते तुम्हाला वाटत असेल की जो शेवट ठरवला त्यापेक्षा काहीतरी वेगळ असू शकत. आणि म्हणून तुम्ही शेवट बदलत असाल किंवा एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल. तुमचीच कथा आणि तरीही शेवट तुमच्या मनात नसलेला अस कस होईल? कथेचा शेवट तुम्हाला अगोदरच माहित असेलच न? हो की नाही?" त्यावेळी आपण तिच्या बोलण्याकडे फारस लक्ष दिल नव्हत आणि तिच्या 'हो की नाही' या प्रश्नच उत्तर 'हो' म्हणून दिल होत... चंद्र्भानच्या मनात आल. याचा अर्थ तिला आपल्या कथेचा शेवट वेगळा असायला हवा होता तर! ती म्हणाली होती ............................... एखाद्या कथेचा शेवट तुम्ही नंतरही बदलू शकत असाल......................... याचा अर्थ आपण त्या कथेचा शेवट बदलावा अशी तिची इच्छा आहे का? जर बदलायचा झालाच शेवट तर तो काय अपेक्षित होता तिला? विचार करता करता चंद्र्भानला हे देखील आठवले की तो कथा वाचून झाल्यावर झोपला होता. त्यावेळी कथेचा शेवट म्हणजे तो शहरी बाबू वाड्यात शिरला इतकाच होता. पण आज सकाळी त्याला त्याच्या पुढे काहीतरी लिहिलेलं मिळाल होत. त्याने परत एकदा मेंदूला ताण दिला आणि त्याला आठवलं; त्याने लिहिलेल्या शेवटाच्या पुढे लिहिलेलं होत की..................................

आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूच नक्की काय झाल हे तिला माहित करून घ्यायचं होत. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!!

याचा अर्थ इंटरव्हूच्या ठिकाणी भेटलेली निशा..... सकाळी त्याला झोपेतून उठवणारी निशा.... मीराताईना भेटलेली निशा.......... आणि त्याच्या कथेच्या शेवटी उमटलेली ती अक्षरे... या सगळ्याचा अर्थ निशा त्या खरातांच्यावाड्यात आहे. ती तिथे अडकली आहे. तिने कुठेल्यातरी वेगळ्या शक्तीच्या मदतीने आपल्याला साद घातली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली. तिला आपल्या मदतीची गरज आहे. आता फक्त एकच प्रश्न उरला होता की निशा तिथे का गेली. एकदा ते कारण कळल असत तर मग त्याला तिची मदत कारण सोप गेल असत.

एका मागोमाग एक कोडं सुटायला लागल्यावर चंद्रभानला हुरूप आला. तो म्हादूच्या घराच्या दिशेने भराभर पावलं टाकत निघाला.

चंद्रभान म्हादुच्या घराजवळ पोहोचला. घराच्या पडवीत कोणीतरी बसलेलं त्याला दिसलं. म्हणून चंद्रभान पडवीत शिरला. त्याबरोबर त्या व्यक्तीने अचानक ओरडायला सुरवात केली,"जा म्होर... व्हय चालत हितून... उगा नग माज्या माग लागू." या त्याच्या अचानक ओरडण्यामुळे तो क्षणभर मागे झाला. पण मग मनाचा हिय्या करून तो त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला,"म्हादू दादा... तिला तुमची गरज आहे. तुम्ही मला फक्त तिच काय झाल ते सांगा. बाकी मी बघून घेतो." चंद्र्भानच बोलण एकून म्हादू शांत झाला. त्याने चिमणी वर करून त्या उजेडात चंद्रभानच्या डोळ्यात निरखून बघितलं. चंद्रभानची शांत आणि आश्वासक नजर बघून म्हादुच्या डोळ्यात पाणी उभ राहील. चिमणी खाली ठेऊन त्याने चंद्रभानचे हात घट्ट धरले आणि म्हणाला,"का आलास हित? त्यो बाबू आल्ता कैक वारसा पूर्वी त्याला बी मी म्हन्ल हुत जा हितून. पन त्यो न्हाई ऐकला माज. मंग ती पोर आल्ती. तिला बी मी हाकलल. म्हन्ल नग घीउस ईसाची परीक्षा. पन ती बी न्हाई ऐकली माज. तू का आलास बाबा? जा हितून...." अस म्हणून म्हादुने त्याचे हातात घेतलेले हात सोडले.

चंद्रभान काही न बोलता तसाच म्हादुच्या शेजारी बसून राहिला. थोड्या वेळ म्हादू स्वस्थ बसून राहिला. पण मग त्याची चुळबुळ सुरु झाली. अजून थोडा वेळ गेला आणि म्हादुने आपणहून बोलायला सुरवात केली. "ऐक.... त्यो बाबू अल्ता कारण त्येला कामाची गरज हुती. जवा त्यो मले भेटला तवा आमच्यात बोलना झाला हुता. त्यो म्हन्ला त्याले पैका हवा हाई म्हनून या आड गावात कामाच्या शोधात आला हाई. म्या म्हन्ल सहर सोडून हित कोन तुले काम द्येनार आन काय पैका मिलनार. तर म्हन्ला खरातांच्यावाड्यावर काम हाई. म्या म्हन्ल तिथं नग जाऊ बाबू. जा हितून परत. तिथं ग्येलेल कोनी कंदी परत न्हाई आलं. पण त्यो मानला न्हाई. त्यो आला हुता तवा रात व्हायाला आल्ती. त्याले उत्तर न देता मी निघालू. म्हन्ल हित पारावर आजून कुनीबी न्हाई. मी ग्येलू तर हा बाबू बी जाईल. पन मी निघालू आन मला मागून मेरीचा आवाज आला. म्या तवाच समजलु बाबू जानार खरातांच्या वाड्याकड. म्या लई घाबरलु आन पलालू माज्या घरला. बस! त्ये तिथच संपल." म्हादू बोलायचा थांबला.

चंद्रभान म्हादुच बोलण मन लावून ऐकत होता. म्हादू जे सांगत होता तेच त्याने त्याच्या कथेमध्ये लिहील होत. पण त्याने त्यात केवळ गूढता निर्माण करण्यापुरता एका मुलीचा उल्लेख केला होता फक्त. तिच नाव किंवा तिच्याबद्दल काहीच लिहील नव्हत. त्यामुळे हे काहीतरी वेगळ आणि नवीन आहे हे त्याच्या लक्षात आल. त्याने म्हादूला विचारलं,"दादा, ही मेरी कोण? अजून एक विचारायचं होत... काही महिन्यांपूर्वी जी मुलगी तुम्हाला भेटायला आली होती तिच काय झाल?"

म्हादुने चंद्रभानला एकदा वर पासून खालपर्यंत न्याहाळल. मग परत त्याने बोलायला सुरवात केली. "पोरा... मेरी म्हंजी पोरकी किरीस्ताव पोर हुती. दिसाया पार रंभा उर्वासी जणू. सारा गाव तिच्या माग हुता. पन तिचा जीव जडला हुता खरातांच्या सुन्यावर. खरात म्हंजी गावातलं बड मानुस. त्यात सुन्या म्हंजी गावचा राजाच जनू. त्येच्यात आन मेरीत काय बाय शिजत हाय याची चर्चा गावात व्हायाला येळ न्हाई लागला. आन मग त्याची कुनकुन मोठ्या खरातांना लागली न्हाई तर नवल. मंग मात्र त्येनी सुन्याला काय कारन काढून दिल पाट्वून सहराकड. मेरी बिचारी ऱ्हाईली न्हवं हितच. तिला वाटल सुन्या यील आन घिऊन जाईल तिला. पन तस कंदी झाल न्हाई. ती सहर रस्त्याला डोल लावून बसली आन काय. कंदीतरी तिच्याबी ध्यानात आलं की आता काय सुन्या यायाचा न्हाई. आन मंग मात्र ती चवतालली राव. त्यानंतर तीन दिस ती खरातांच्या वाड्याला फेऱ्या मारत हुती. ना काय खाल, ना काय प्याली. कुटून हितका जोर आल्ता कुनास ठाऊक... बस... गोल गोल चक्कर मारीत हुती आन काय बाय पुटपुटत हुती. चौथे दिशी तिचं कलेवर वाड्याच्या मागच्या हिरीत सापडलं म्हन. थोरल्या खारातांनी तीन बाप्ये उतरवून काडल हुत. माशांनी पुरत खाल्ल हुत. लोक काय बाय बोलाय लागलं तस मोटे खरात डाफरले सर्वांवर आन हाकलून दिल सर्वास्नी. मंग त्या कालेवराच काय झाल कोनाला ठाव न्हाई.

आसच काही दिस गेलं आन खरातांकडे काम करनारी कमळी सांजच्याला तिच्या घरला जात हुती तर तिला मेरी दिसली की मागच्या अंगाला. कमळीची बोबडी बसली जनु. त्यानंतर तिन परत खरातांच्या वाड्याकड न्हाई ग्येली. हलूहलू कित्येकांना मेरी वाड्याच्या आजूबाजूने दिसाया लागली. लोकांनी त्या वाड्याकड जान सोडून दिल. थोरले खरात सोता आठवडा बाजारला यायाचे आन लागल ते सामान घिऊन जायाचे. सुरवातीला त्यांच्या चालन्यामंदी ताठा हुता. सांजच्याला मंदिरातबी यायचे ते. पण मंग मंदिर बंद जालं. आठवडा बाजारला पन पहिल्याच ठोक्यात येऊन जायाचे. आन मंग कंदितरी थोरले खरात गेले आस कानावर आलं. पण तरीबी कुनी सुदिक तिथं न्हाई ग्येलं. मंग फकस्त मालकीणबाई राहिल्या त्या भल्या मोठ्या वाड्यात.

आनी मंग अचानक एक दिस त्यो बाबू आला. त्याले कुनी कस सांगिटल कुनास ठाव की खरातांना कुनी कामाला मानुस हव हाय. म्या त्याचेकडे पाठ क्येली आन त्याले मेरीने धरला. खरातांचा वाडा दावते सांगून ती त्याले घिऊन पारावरून ग्येली खर... पन मंग काय जालं कुणाला माहित. पार कैक वर्स ग्येली त्याला. हा आन तू म्ह्न्तुस तस आल्ती ती पोर. म्हन्ली ती तिच्या थोरल्या भावाक घ्यायाला आली हाय. म्या म्हन्ल नग जाउस. तरी न्हाई ऐकली. मंग मी तिच्याकड पन पाठ क्येली.. तर मेरी आली आन तिला सुदिक घ्येऊन ग्येली की खरातांच्या वाड्याकड." एवढ बोलून परत म्हादू बोलायचा थांबला.

म्हादू बोलायचा थांबला आणि चंद्रभानकडे बघायला लागला. चंद्रभानला का कोणजाणे पण अस वाटायला लागलं होतं की म्हादुला अजूनही काहीतरी माहित आहे पण तो सांगायला धजावत नाहीये. चंद्रभानने म्हादूकडे निरखून बघितले आणि म्हणाला," दादा, का कोण जाणे पण मला वाटत आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तसं असेल तर खरच तुम्हाला माहित असलेलं सगळ मला सांगा. दादा, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दादा, ती माझी कोणीच लागत नाही, तरीदेखील तिच्या मनाने माझ्या मनाला घातलेली साद एकून मी इथपर्यंत आलो आहे. ती कोणत्यातरी संकटात अडकली आहे अस माझ मन मला सांगत आहे. मला तिला मदत करायची आहे दादा. पण संपूर्ण सत्य समजल्याशिवाय मी तिला मदत करू शकणार नाही. त्यामुळे आता तरी काहीही आडपडदा न ठेवता तुम्हाला माहित असलेलं सगळ मला सांगा."

चंद्राभानच्या बोलण्याने म्हादुच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याचा आवाज दाटून आला आणि तो म्हणाला,"आरं पोरा काय सांगू? खर काय आन खोट काय... समद हाताभाईर ग्येलं हाय र. पोरा, मेरी चांगली हुती र. तिचा खराखुरा जीव जडला हुता खरातांच्या सुन्यावर. त्यो ग्येला आन ती पार वेडीपिशी झाली. दिसाया अप्सरा हुती माजी मेरी. तिच्या माग गावातलं कितीक पोरं लागली हुती याची काही गिनतीच न्हाई. पर ती कुनालाबी भिक घालत न्हवती. माजाबी तिच्यावर लई जीव जडला हुता. तिला आस सुन्यासाठी खुल्यागत भटकताना बघून माझा जीव जलायचा. म्हनून मंग मी एकदा तिला गाटल आन म्हन्ल तू गावाभाईरच्या भगताकड चल. त्यो तुला मदत करल. तिन माज ऐकल आन एका राती म्या तिला घेऊन भागताकड ग्येलो. भगतान तिच समद बोलन एकून घ्येतल आन तिला एक भुकटी दिली. आन म्हन्ला ही भुकटी खराताच्या वाड्याभावताली तीन दिस आन ती राती टाक. बग तुझा सुन्या यील परत. मेरी खुश झाली आन आमी दोघ परतलु. म्या तिला म्हन्ल म्या टाकतू ती भुकटी. तुला वाड्याजवल मोठ्या खरातांनी बघितला तर तुला त्यो सोडनार न्हाई. पन मेरी माज ऐकेना. म्हन्ली तिची लढाई तिच लढनार. म्या तिला कायबी न्हाई बोललो. ती जे बोलल त्ये म्या ऐकायचो. पार खुळावून ग्येलू हुतु म्या.

मेरीन दुसऱ्या दिसापास्न वाड्याच्या भवताली फेऱ्या माराया सुरवात केली. तिसऱ्या दिशी सांजच्याला मेरी फेऱ्या मारत हुती आन मी दूर एका झाडावर बसून तिच्याकड बघत हुतु तर अचानक थोरले खरात भाईर आल्ये. त्यांनी खासकिनी मेरीचा हात धरला आन तिला मातीत ढकलली. त्यांच्यात कायतरी बाचाबाजी जाली. मी दुरून सार बघत हुतु. पन मला मेरीची मदत कराया जायाची हिम्मत न्हाई जाली. अचानक थोरातांनी तिच्या काल्या झग्याला हात घातला आन मेरीन जीवाच्या आकांतान हंबरडा फोडला. खरात थांबायला तयार न्हवत. ती वरडत हुती आन त्ये ओरबाडत हुते. थोड्या येलान मेरीला तिथंच टाकून खरात निघून ग्येले. तवर पार अंधार झाला हुता. म्या झाडावरून उतरलु आन मेरीकड धावलू. म्या तिच्याजवळ पोहोचेपर्यंत ती मागच्या विहिरीपर्यंत पोचली हुती. म्या तिला थांबवायचा प्रयत्न क्येला.. पन ती कायबी ऐकायला तयार न्हवती. तिची पाठ माज्याकड हुती. ती फकस्त एकच म्हन्ली... म्हादू माज एक काम करशील? म्या लगोलग हो म्हण्लू. तशी ती म्हन्ली... सुन्यान मले धोका दिला. मला वाटल हुत त्याला थोरल्या खरातान जबरदस्ती धाडला. पन सुन्या आपल्या मर्जीन ग्येला हाय. मी एकयेळ त्ये मी पचवल असत. पन आजा माज्या संगती जे झालं त्यानंतर मले जगायची इच्छा न्हाई राहिली. तू मातर माज येक काम कर................ भगतान माले सांगितल हुत की येक तरुणाचा बळी हित द्यायला होवा. त्यो तू दये. मंग मी हाईच....... आस म्हनून मेरीन माज काई ऐकायच्या अगुदर हिरीत उडी घ्येतली."

म्हादू क्षणभर बोलायचा थांबला. त्याने जवळच्या लोट्यातून घोटभर पाणी घेतलं आणि शून्यात बघत तो परत बोलायला लागला. "पोरा.... म्या मघा सांगताना थोड खोट बोललु व्ह्तु. पोरा मेरीला पयले खरातांचा जीव घ्यायाचा हुता. त्यासाटी येक तरून तिथं जान महत्वाचं हुत. पन गावातलाच कुनी तरुण म्या वाड्याकड न्यायाचा म्हन्ल तरी त्ये जमणारं न्हवत. कारण थोरल्या खरातांना सगले घाबरून आसायचे. म्हनून मंग म्याच शक्कल लढवली आन सहराकड जाऊन ती एका पेपरमंदी 'खरातांच्या वाड्याला म्यानेजर हवा हाई' म्हनून जायरात द्येऊन आलू. फार वाट न्हाई बघावी लागली. त्यो बाबू आला आन कसा कोन जाने मलाच येऊन भेटला. म्या मेरीला दिलेला सबूत पुरा क्येला. मेरी त्याले वाड्याकड घिऊन ग्येली. त्यो बाबू आत ग्येला आन थोरलं थोरात ग्येले. मला वाटलं आता मेरीचा आत्मा शांत हुईल. पन मंग त्यानंतर तिन वाड्याच्या भवताली ठाण मांडल.

दिसा मागून दिस जात हुत. मेरी कुनाकुनाला दिसाया लागली. पन म्या कितीदा तरी शोधली तरी न्हाई दिसली. आन मंग ती पोर आली. माज्या मनात आल जर ही पोर आत ग्येली तर माजी मेरी सुटल आन माज्याकड यील. म्हनून मी त्या पोरीला मेरीच्या हवाली क्येली.

पोरा मला कुनाचबी वाईट न्हवत करायचं. मले फकस्त मेरी हवी हुती. पन मेरीला मी नकू हाय. पोरा... चुकलं र माज. त्या पोरीचा हकनाक बली दिला मी. ती पोर मले म्हन्ली हुती की त्यो बाबू तिचा थोरला भाऊ हाय. आन त्याले शोधाया ती आली हाय. पोरा... त्यायेली मला फकस्त माजी मेरी दिसत हुती. पन आता मला होश आला हाय. मेरी कंदीच येणार न्हाई. मले म्हाईत हाय. तवा त्या पोरीला तरी त्या शापित वाड्यातून सोडवाया हवं. मले म्हाईत नाही आता काय करता यील. पण चल पोरा आपन वाड्याकड जाऊ. मार्ग मिलल आपल्याला तिथच." अस म्हणत म्हादू जागेवरून उठून उभा राहीला.

चंद्रभानला म्हादुच्या बोलण्याचा अर्थ लागायला लागला होता आता. याचा अर्थ शहरी बाबू म्हणजे निशाचा भाऊ असावा. तो इथे यायला निघाला त्यावेळी निशा तशी लहान असावी. मात्र तो उमरगावाला जातो आहे, हे तिने लक्षात ठेवलं होत. म्हणूनच मोठी झाल्यावर ती तिच्या भावाला शोधायला तिथे आली होती. याचा अर्थ मेरी निशाला घेऊन खरातांच्या वाड्याकडे गेली होती. जसे तिने बाबुला देखील तिथेच नेले होते. चंद्रभान विचर करत होता.

अचानक चंद्रभानला आठवलं. तो निघत असताना पुजारीबुवांनी त्याला सांगितल होत की बाबूने किंवा निशाने जे केलं तेच तसच तू करावस अस नाही. तुझ्या इथे येण्याला एक वेगळ कारण आहे. ते समजून घे. निशाच्या माग जाणं महत्वाच आहे की तिला सोडवण महत्वाचं याचा विचार कर आणि मगच तुझी कृती ठरव. पुजारीबुवा जे म्हणाले होते त्याचा चंद्रभान विचार करत होता आणि त्याला अचानक सुटकेचा मार्ग दिसला. चंद्रभानचा बदललेला चेहेरा बघून म्हादुने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितल. चंद्रभान म्हादुकडे बघत म्हणाला,"दादा... याक्षणी मला तुम्ही देवळाकडे घेऊन चला." चंद्रभानच्या या बदललेल्या अवताराकडे बघून म्हादू गोंधळला. तो म्हणला,"आर पोरा.. तिला तुजी गरज हाय. दोन येळा म्या पाठ फिरवली आणि आक्रीत घडलं र. आता मातर माज्यामुळ आजून काय इपरीत घडाय नकू. म्याच आता तुला खरातांच्या वाड्याकड न्येतू. म्हंजी मरताना माजा जीव आडकनार न्हाई. त्या बाबुला मी पाठ दावली.. त्या पोरीला सुदिक पाठ दावली. आन मेरीन तिचा डाव साधला. माज मन मला खातया. आता तरी प्रायश्चित्त घिऊ दये.. चल, म्या हाय तुज्या संगट. असा न्हाई सोडणार तुला मंदी."

म्हादूच बोलण एकून चंद्रभान म्हणला,"दादा... तुम्हाला जस प्रायश्चित्त घ्यायचं आहे तस मला देखील घ्यायचं आहे. माझ्या नकळत पण मी एक आयुष्य अडकवल आहे त्या वाड्यात... आणि कदाचित् निशाला सुध्दा...... म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो आहे की मला देवळाकडे घेऊन चला. मला या कोड्याची उकल कळली आहे. चला... आता मात्र घाई केली पाहिजे आपण." चंद्र्भांच बोलण्याचा चांगलाच परिणाम म्हादुवर झाला. तो चंद्रभानला घेऊन देवळाच्या दिशेने निघाला. चंद्रभान देवळाजवळ पोहोचला. पण देवळात जाण्याऐवजी तो त्याच्या गाडीच्या दिशेने धावला. त्याने गाडी उघडली आणि त्याची bag बाहेर काढली. त्याने निघता निघता ते मासिक bagमध्ये घातलं होत. ते बाहेर काढल आणि तो देवळात गेला. देवळाच्या वरच्या पायरीपाशी आतल्या कंदिलाचा उजेड पोहोचत होता. तो कंदील त्याने घाईघाईने पुढ्यात घेतला आणि खिशातून पेन काढून त्याने लिहायला सुरवात केली. त्याने जिथे कथा संपवली होती त्याच्या पुढे निशाने काहीतरी लिहून ठेवलं होत. त्यला जोडूनच चंद्रभान लिहायला लागला.

.................आणि तरीही ती तिथे जायला निघाली होती. बाबूच नक्की काय झाल हे तिला माहित करून घ्यायचं होत. एकटीच.... पण तिला खात्री होती तिच्या मदतीला तो येईल!!! ती बाबुला शोधायला आली खरी पण तिची अवस्था देखील बाबू सारखीच झाली होती. म्हादुने तिच्याकडे देखील पाठ फिरवली आणि ती देखील काळा झगा घातलेल्या त्या स्त्रीच्या मागून खरातांच्यावाड्याच्या दिशेने निघाली. मात्र तिच्या मनात असलेली खात्री खरी ठरली. तो तिला शोधत तिथे आला. पण तिला कशी मदत करावी त्याला सुचत नव्हत. शेवटी तो म्हादूला जाऊन भेटला.... म्हादू कडून त्याला कळल की काळा झगा घातलेल्या त्या स्त्रीने तिला देखील खरातांच्या वाड्याकडे नेलं आहे. याचा अर्थ ती जरी बाबुला भेटली असली तरी आता ती देखील बाबू बरोबर त्या वाड्यात अडकली असावी. पण ती खूप धीराची होती. तिने मनापासून त्याला हाक मारली आणि त्याने ती ऐकली.

इतकं लिहून चंद्रभान क्षणभर थांबला. यापुढे तो जे लिहिणार होता ते त्याला प्रत्यक्ष दिसणार होत याची त्याला मनातून जाणीव झाली होती. त्यामुळे यापुढचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य त्याने शांत मनाने लिहील पाहिजे हे त्याच्या लक्षात आल. त्याने पेन सरसावल आणि तो लिहायला लागला.................... तो आला आहे याची तिच्या मानाने तिला ग्वाही दिली आणि तिला मार्ग मिळाला. खरातांचा वाडा मोठा होता... त्यांचा दरवाजा देखील तसाच जड आणि उघडायला अवघड होता... पण त्यांच्या वाड्याच्या त्या मोठ्या पुरुषभर उंचीच्या खिडक्यांपैकी एक खिडकी तिला उघडी मिळाली. अनेक वर्ष आत अडकलेल्या बाबूचा हात धरून कोणताही दुसरा विचर न करता तिने त्या खिडकीतून बाहेर उडी मारली. आता तिला वाड्याच फाटक दिसत होत. तिने जीव घेऊन पळायला सुरवात केली. तिने तिच्या हातात बाबूचा हात घट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या बरोबर तो देखील विचार न करता धावत होता. ती फाटकाजवळ आली आणि मोडकळीस आलेलं फाटक एका हाताने दूर सारून ती तशीच बाबुला घेऊन पाळत सुटली. झाडा झुडपातून धावत ती देवळाकडे निघाली.....

चंद्रभान लिहित होता... एका क्षणाचाही वेळ न दवडता तो लिहित होता... आणि अचानक म्हादू ओरडलेला त्यला ऐकू आले. लिहिता लिहिता थांबून चंद्रभानने मागे वळून बघितले. मागे देवळाच्या शेवटच्या पायरीजवळ त्याला निशा जमिनीवर कोसळताना दिसली. तिच्या शेजारीच एक बराच म्हातारासा माणूस शून्य नजरेने जमिनीकडे बघत बसला होता. त्याला चांगलीच धाप लागली होती. चंद्रभान निशाच्या जवळ जाण्यासाठी उठला. पण तिने त्याला हातानेच थांबवले. दुसरा हात मागे झाडीच्या दिशेने करत अंगात असलेली नसलेली सगळी शक्ती एकवटून ती म्हणाली... मेरी!!!!! आणि तिची शुद्ध हरपली.

निशाला काय म्हणायचं आहे हे ओळखून चंद्रभान परत त्याच्या लिखाणाकडे वळला. त्याने परत पेन हातात घेतले आणि लिहायला सुरवात केली.........

......... काळ्या झाग्यातली ती स्त्री.....

त्याचवेळी त्याला मागून म्हादुचा आवाज आला,"पोरा.... तू जे लिवलं न्हाई हायेस त्ये पण हित झालया. तवा मेरीच काय झाल यापरीस म्हादूच काय झाल त्ये लिव. म्हंजी समद ठीक हुईल." म्हादूचा आवाज एकून चंद्रभान परत एकदा मागे वळणार होता. पण त्याला म्हादुने थांबवले... " नग... आता नग माग बघूस.. लिव काय लिवायचं त्ये. आता माज्या जगन्यात काई राम न्हाई. माजी कालजी नग करूस."

चंद्रभानच्या कानावर म्हादूचे शब्द पडले आणि तो परत त्याच्या लिखाणाकडे वळला.....

गाव जरी म्हादुला वेडा समजत होते तरी म्हादू मात्र सगळ ओळखून होता. सुन्या निघून गेल्या नंतर मेरीची झालेली तडफड त्याने बघितली होती. तिच वेडपीस होण आणि गावातल्या तरुणांनी तिच्या एकट असण्याचा गैरफायदा घेण त्याने जवळून बघितल होत. त्याचा जीव तुटत होता मेरीसाठी. पण त्याला माहित होत की तो खूपच दुबळा होता. कदाचित म्हणूनच तो बाबू किंवा निशाला मदत करायला धजावला नव्हता. पण आता मात्र त्याच्या मनाने त्याला कौल दिला होता. मेरीने कारण नसताना बाबू आणि निशाला तिच्या सूडाचा निशाण केल होत. आता सुद्धा देवळाकडे धावलेल्या निशा आणि बाबूच्या मागून ती त्यांना शोधात आली होती. तिला बघताच मात्र म्हादू मेरी आणि देऊळ यांच्या मध्ये उभा राहिला. त्याने समोरून येणाऱ्या मेरीला विचारल,"मला खरातांच्या वाड्याकड जायाचं हाय. तुम्ही रस्ता दावाल का?" काळ्या झाग्यातली निशा आणि बाबूच्या मागे लागलेली मेरी किनऱ्या आवाजात हसली आणि म्हणाली, "चिंता करू नका. या माझ्या मागून." आणि म्हादू येतो आहे की नाही हे न बघता वळून शांतपणे वाड्याच्या दिशेने चालू लागली..........

चंद्रभान लिहिता लिहिता थांबला आणि त्याने मागे वळून बघितलं. त्याला लांब झाडीच्या दिशेने चालत जाणारा म्हादू दिसला. त्याला हाक मारावी अस चंद्रभानला वाटल. हे ओळखून की काय पण जाता जाता मागे वळूनही न बघता म्हादुने मात्र चंद्रभानच्या दिशेने हात हलवला आणि तो झाडीमध्ये हरवून गेला. चंद्रभानची नजर निशाच्या दिशेने वळली. तिला मदत करण्यासाठी तिच्या दिशेने तो वळला.... मात्र त्या अगोर कथेच्या शेवटी 'समाप्त' लिहायला तो विसरला नाही.

समाप्त

kathaa

प्रतिक्रिया

स्मिता श्रीपाद's picture

24 Jun 2017 - 5:05 pm | स्मिता श्रीपाद

मस्त कथा...मजा आली वाचताना..

स्रुजा's picture

24 Jun 2017 - 5:13 pm | स्रुजा

सहीच... फार आवडली. मेरी ची कथा पण छान गुंफली आहे. अगदी नियमितपणे भाग टाकले म्हणुन विशेष कौतुक.

प्रीत-मोहर's picture

24 Jun 2017 - 6:42 pm | प्रीत-मोहर

सुंदर झालीच कथा!!

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

24 Jun 2017 - 7:17 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

धन्यवाद. मस्त कथा लिहीलीत व नियमीत टाकलीत. गुंतुन गेलो होतो पुर्णपणे. लिहीत रहा व आमच्या मनापासुनच्या शुभेच्छा घेत रहा

Ranapratap's picture

24 Jun 2017 - 9:52 pm | Ranapratap

वाचताना मजा आली. लिखते रहो, जितें राहो.

ज्योति अळवणी's picture

24 Jun 2017 - 10:44 pm | ज्योति अळवणी

मनापासून आभार

दशानन's picture

24 Jun 2017 - 10:48 pm | दशानन

लेखनाचा वेग उत्तम राखला आहे, पण कथा काहीशी पुढे कुठल्या अंगाने जाणार हे समजलं होते.

अतिशय उत्तम प्रयत्न, पुढील कथेसाठी शुभेच्छा!

एस's picture

25 Jun 2017 - 1:03 am | एस

वा! फारच छान कथा!

अमितदादा's picture

25 Jun 2017 - 1:20 am | अमितदादा

शेवट अजून वाढवता आला असता तरीही उत्तम कथा...

पद्मावति's picture

25 Jun 2017 - 1:24 am | पद्मावति

अतिशय आवडली ही कथा. पहिल्या भागापासूनच जबरदस्त ग्रिप घेतली होती ती शेवटपर्यंत तशीच होती.
सुंदर. लिहीत राहा.

व्हेरी गूढ!! कथेचं नाव 'गूढ' ऐवजी 'म्हादु निशा मेरी है' असं ठेवायला हरकत नाही
छान झाली कथा. आवडली. :-)

नक्की काय म्हणायचेय ते समजलेच नाही, कथे पेक्षा वर्णनच जास्त वाटले

ज्योति अळवणी's picture

25 Jun 2017 - 2:24 pm | ज्योति अळवणी

गूढ, रहस्य आणि भय कथा मनापसून आवडतात. त्यामुळे लिहिताना पण मजा येते. आपणा सर्वाना माझे लेखन आवडले हे वाजून खूप बरं वाटल. स्पा जी कदाचित् तुम्ही म्हणता तस वर्णन जास्त असेलही. पण कथा सतत flash back आणि वर्तमान अशी पुढे मागे धावत होती. त्यामुळे पहिले संदर्भ कथेत लिहावे लागले. मला स्वतःला लिहिताना देखील माझीच कथा सतत वाचावी लागत होती. लिहिताना खंड पडला की पंचाईत होत होती. त्यावरून मला वाटल की वाचकांचा गोंधळ होऊ नये म्हणून संदर्भ जास्त दिले गेले असतील. तुमचा प्रतिसाद नक्की लक्षात ठेवेन पुढच्यावेळी. धन्यवाद

तिच वेडपीस होण आणि गावातल्या तरुणांनी तिच्या एकट असण्याचा गैरफायदा घेण त्याने जवळून बघितल होत.

काळ्या झाग्यातली निशा आणि बाबूच्या मागे लागलेली मेरी किनऱ्या आवाजात हसली आणि म्हणाली

>> या दोन ठिकाणी घोळ झाला आहे असे वाटते.

मेरी वर पप्पा खरात ने बलात्कार केलाय ना? तरुणांनी गैरफायदा कधी घेतला?

काळ्या झग्यातली निशा?

मस्त.. मजा आली कथा वाचायला..

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2017 - 9:51 am | धर्मराजमुटके

सगळे भाग एकदम वाचले . आवडले.