||कोहम्|| भाग 7

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
9 May 2017 - 7:46 pm

मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू.

मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं.

पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू,

मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले. मानवी मेंदू हा मानववंशातील सर्वात मोठा मेंदू नक्कीच नव्हे, तो मान बहुदा निण्डेरथलचा आहे. इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की आपल्याला मानववंशातील प्राण्यांचे सांगाडे मिळालेत, त्यांच्या कवटीच माप आपल्याकडे आहे पण मेंदू हा पूर्ण कवटी व्यापतोच असं नव्हे. त्यामुळे कोणाचा मेंदू किती मोठा होता याबद्दल आपण फक्त अंदाज करू शकतो.

दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल, पण तरीही, बहुदा, या बदलात मेंदूचे आकारमान किंवा त्याचे भाग बदलले किंवा वाढले नाहीत. जे बदल घडले ते मेंदूच्या पेशींच्या एकमेकांशी असलेल्या संपर्काच्या क्षमतेत आणि प्रमाणात. जसं एखाद्या आडव्या तिडव्या पसरलेल्या भूप्रदेशात नवीन रस्त्याचं जाळं विणले जाते आणि मग पूर्वी खूप लांब असलेले प्रदेश जवळ येतात तसंच या नवीन मज्जापेशींनी मेंदूच्या वेगवेगळ्या प्रदेशांना अशा पद्धतीने जोडले की होमो सेपियन हा प्राणी इतरांपेक्षा वेगळा पडला. हे बदल अर्थातच कुठल्यातरी जनुकीय म्युटेशनमुळे झाले आणि सुदैवाने ( की दुर्दैवाने) संपूर्ण लोकसंख्येत पसरले. ज्या अर्थी हे बदल त्या पूर्ण लोकसंख्येत पसरले त्या अर्थी बहुदा तोपर्यंत होमो सेपियन ही प्रजाती फक्त पूर्व आफ्रिकेतच स्थायिक होती.

अर्थात ही प्रक्रिया इतकी साधी नसणार, हे बदल घडत असताना, ही बौद्धिक क्षमता असलेले मानव आणि नसलेले मानव सुरवातीला एकाच कळपात राहत असतील, एकत्र प्रजनन करत असतील. अगदी जनुकीय दृष्ट्या बदललेल्या मानवालाही त्याच्या क्षमतेचा पूर्ण परिचय झालेला नसेल आणि आजूबाजूचे कित्येक लोक त्याला असं काही नसतंच हे समजावून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असावे. एकंदरच "होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक" अशी परिस्थिती असावी. जोवर एका ठराविक संख्येचे लोक या पद्धतीने म्युटेट होऊन बदलले नाही तोवर ही बौद्धिक क्षमता फारशी उपयुक्त ठरू शकली नसावी. ही गोष्ट अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला नुकत्याच घडून गेलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच उदाहरण घेता येईल. नव्वदच्या दशकानंतर या क्रांतीला खरा वेग आला कारण त्याआधी समाजातील बहुसंख्य वर्ग कॉम्प्युटर म्हणजे काय, त्याच लॉजिक काय याबद्दल अनभिज्ञ होता, एकदा एका विशिष्ट संख्येत लोकांना हे लॉजिक लक्षात आल्यावर मग पुढचा प्रवास सोपा झाला.

लक्षात घ्या की, मानवी इतिहासात शारीरिक पातळीवर झालेली ही शेवटची क्रांती ( आत्ता आपण परत शारीरिक क्रांती शृंखलेच्या अगदी तोंडावर आहोत, पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी), त्यानंतर झालेल्या सगळ्या मोठ्या उलाढाली मग ती शेतकी क्रांती असो वा औद्योगिक, या मानवी समाजाच्या आणि विचारांच्या पातळीवर झाल्यात.

मेंदूतील हा बदलही काही सहजसोपा आणि फक्त चांगलाच होता असं नव्हे, या बदलामुळे आपण आजही अशा काही रोगांना बळी पडतो जे फक्त मानवालाच होतात. उदाहरणार्थ, विस्मरणाचा आजार(पार्किन्सन्स) किंवा ऑटिसम.

पण अर्थातच या क्रांतीचे फायदे जास्त होते, त्यातले लगेच उपयोगी ठरलेले आणि महत्वाचे फायदे आपण पाहू. ढोबळमानाने पाहता होमो सेपियन, त्या बौद्धिक क्रांतीनंतर एक गोष्ट इतर मानव वंशीयांपेक्षा जास्त चांगलं करू लागले, ते म्हणजे समूह बांधणे आणि तो मोठा करणे, तसच अनेक सुट्ट्या सुट्ट्या कळपातही एक सलग सुसूत्रता राखणे..

हे नक्की कसं झालं असावं?

आपण मागील भागात बघितलं की लांडगे, रानकुत्रे, वानर यांचे अत्यंत सुसूत्रपणे बांधलेले कळप एका विशिष्ट संख्येपेक्षा मोठे झाले की फुटतात, कारण कळपात राहण्यासाठी, जिथे प्रश्न जगण्या मरण्याचा असतो तिथे, ज्या परस्पर सामंजस्याची गरज असते ते एक विशिष्ट संख्या असेपर्यंतच शक्य होतं. याच कारणासाठी सैन्यात एका तुकडीत ठराविक संख्येपेक्षा जास्त सैनिक ठेवत नाहीत. एका विशिष्ट संख्येनंतर परस्परातील बंध विरळ होतं जातात, आणि हळूहळू कळपात उभी फूट पडते.

हेच तत्व मानववंशातील सगळ्या सजीवांना लागू होत, सत्तर हजार वर्षापूर्वी आधुनिक होमो सेपियनाने यात फक्त दोन बदल घडवून आणले.. बघुयात कोणते ते..

पहिला बदल होता तो कळपाच्या गणसंख्येत, जो शक्य झाला गॉस्सीपिंगमुळे..

आधी गॉसिपिंग म्हणजे काय ते समजून घेऊ..

बऱ्याचदा आपण दोन मुंग्यांना एकमेकींशी रासायनिक भाषेत बोलताना बघतो. हे संभाषण अत्यंत प्रार्थमिक पातळीवर असतं. जास्त विकसित प्राणी त्यापेक्षा बरंच जास्त बोलतात. दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो..दोन चिंपांजी एकमेकांना एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतात,

पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत, हा तिसरा चिंपांजी कसा आहे, त्याचे चांगले वाईट गुण कोणते, तो एखाद्या परिस्थितीत कसा वागेल ह्या बद्दल हे दोन चिंपांजी तिसऱ्याच्या अनुपस्थितीत कधीच बोलू शकत नाही.

होमो सेपियन मात्र गॉसिप अत्यंत परिणामकारकपणे करू शकतो. हे गॉसिप त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल या दोघांची मतं ठरवण्याचे काम करते.. समजा दोन चिंपांजिंमध्ये काही खास बॉण्ड तयार करायचा असेल तर त्यांना एकमेकांना कुरवाळत, जवळ घेऊन बसावं लागेल. या पद्धतीला प्रचंड मर्यादा आहेत, म्हणजे एका वेळी तुम्ही एकाशीच स्पर्शातून संवाद साधू शकता. दिवसभरातील इतर सगळ्या जबाबदाऱ्या, संरक्षण, अन्न, मैथुन इत्यादी करून असे तुम्ही किती जणाना कुरवाळणार? याच मर्यादेमुळे हे समूह एका संख्येपेक्षा जास्त वाढू शकत नाहीत. भाषेचं आणि त्यातही गॉसिपच तसं नाही. दोन व्यक्ती एकाच वेळी अनेकांबद्दल बोलू शकतात. त्यातून त्या व्यक्तीचे तिसऱ्याद्दल मत तयार होते. ते त्या व्यक्तीवर विश्वास टाकावा, दूर रहावे की त्याला मारून टाकावे हे ठरवू शकतात. अर्थातच या पद्धतीने समूहातील बंध अधिक घट्ट आणि ठसठशीत होतात. समूहाच्या नैतृत्वाची उतरंड तयार करण्यात या गॉसिपचा प्रचंड मोठा हात असतो. विश्वास बसत नसेल तर राहुल गांधींना विचारा.

पण तरीही गॉसिप करून किती मोठा समूह एकसंध ठेवता येईल याला मर्यादा आहेत, शास्त्रीय दृष्ट्या एकाच समुदायात, 150 पेक्षा जास्त लोकांबद्दल तुम्हीं परिणामकारक कुचाळक्या नाही करू शकत. जिथे ही मर्यादा संपली तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात.

शैलेंद्र

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात.

पुढील भागाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे.

अस्वस्थामा's picture

9 May 2017 - 9:04 pm | अस्वस्थामा

आता पुढचा भाग २ आठवड्यात आला नाही तर या आयडीचे घर उन्हात बांधण्यात येईल.
- हुकुमावरुन..

शैलेन्द्र's picture

10 May 2017 - 9:19 pm | शैलेन्द्र

हा हा हा

पद्मावति's picture

9 May 2017 - 9:23 pm | पद्मावति

प्रचंड आवडतेय ही लेखमाला. हाही भाग जबरदस्त. पुढचे भाग जरा पटापटा येऊ द्या हो.

शैलेन्द्र's picture

11 May 2017 - 12:15 pm | शैलेन्द्र

धन्यवाद

पैसा's picture

9 May 2017 - 9:46 pm | पैसा

या भागाची जरा वाट बघावी लागली पण चीज झाले.

एस's picture

9 May 2017 - 10:20 pm | एस

ग्रेट!

इडली डोसा's picture

10 May 2017 - 3:21 am | इडली डोसा

जरा मोठे लेख लिहा प्लीज, लगेच संपल्यासारखे वाटतायेत आणि मनाचं समाधन होत नाहिये =)

शैलेन्द्र's picture

10 May 2017 - 9:16 pm | शैलेन्द्र

नक्की प्रयत्न करतो

दीपक११७७'s picture

10 May 2017 - 10:30 am | दीपक११७७

प्रतिक्षा संपली. छान भाग झाला. पुभालटा

दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल.............

शैलेन्द्र's picture

10 May 2017 - 8:58 pm | शैलेन्द्र

जोवर काही निश्चित पुरावा मिळत नाही, तोवर तर्कच

दीपक११७७'s picture

10 May 2017 - 9:46 pm | दीपक११७७

मावंशा लोकं पुराव्या शिवाय काहिच बोलत नाही, असे काही दिवसा पुर्वी खुपदा वाचले होते, म्हणुन.

बाकी विशेष काही नाही.
विज्ञानाची सुरुवात तर्कानेच झाली आहे......

मावंशा # मानव वंश शास्त्रज्ञ.

शैलेन्द्र's picture

11 May 2017 - 12:16 pm | शैलेन्द्र

कोणत्याही शास्त्रात पुराव्याशिवाय तर्क करत नाहीत.

दीपक११७७'s picture

11 May 2017 - 12:32 pm | दीपक११७७

स्वतःलाच contradict करताय.

शैलेन्द्र's picture

11 May 2017 - 2:59 pm | शैलेन्द्र

तर्क म्हणजे काय?

दीपक११७७'s picture

11 May 2017 - 3:33 pm | दीपक११७७

दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं ती नक्की काय होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल.............

जोवर काही निश्चित पुरावा मिळत नाही, तोवर तर्कच

कोणत्याही शास्त्रात पुराव्याशिवाय तर्क करत नाहीत.

स्वतःलाच contradict करताय.

वरिल block quote केलेले सर्व विधान आपलेच आहेत.

शैलेन्द्र's picture

11 May 2017 - 4:25 pm | शैलेन्द्र

असो, वादासाठी वाद घालण्यात अर्थ नाही.

मराठी कथालेखक's picture

25 May 2017 - 11:23 pm | मराठी कथालेखक

अहो...१००% पुरावे नसतात. काही संकेत असतात त्यावरुन तर्काने जुळणी करावी लागते.
जसं ते दृश्यम मध्ये नाही का तब्बूला अखेर सगळा मामला तर्काने लक्षात येतो पण पुरावा नसल्याने गप्प बसावे लागते तसंच काहीसं.

माहितगार's picture

10 May 2017 - 2:42 pm | माहितगार

वाचतोय काही शंका आहेत पण कदाचित आपल्या पुढील भागातून माहिती येईल म्हणून सध्या तरी मुक वाचन. पु.भा.प्र.

शैलेन्द्र's picture

10 May 2017 - 8:56 pm | शैलेन्द्र

विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न करतो

समूहाच्या नैतृत्वाची उतरंड तयार करण्यात या गॉसिपचा प्रचंड मोठा हात असतो. विश्वास बसत नसेल तर राहुल गांधींना विचारा

:) :) :)

संजय पाटिल's picture

10 May 2017 - 5:47 pm | संजय पाटिल

=))

उगा काहितरीच's picture

10 May 2017 - 7:32 pm | उगा काहितरीच

आवडला हा पण भाग . पुभाप्र...

रामपुरी's picture

10 May 2017 - 8:21 pm | रामपुरी

कालच कुठेतरी एक नवीन मानवसदॄश्य सांगाडा सापडल्याची बातमी वाचली. त्यामुळे होमो सेपियन थियरीचा पुनर्विचार करावा लागेल असा काहीसा सूर होता.

शैलेन्द्र's picture

10 May 2017 - 9:17 pm | शैलेन्द्र

लिंक आहे का?

दीपक११७७'s picture

10 May 2017 - 9:38 pm | दीपक११७७

लिंक आहे का? असेल तर द्या

अर्धवटराव's picture

11 May 2017 - 1:02 pm | अर्धवटराव
दीपक११७७'s picture

11 May 2017 - 2:41 pm | दीपक११७७

धन्यवाद अर्धवटराव जी. वाचतो मग ............

शैलेन्द्र's picture

11 May 2017 - 3:00 pm | शैलेन्द्र

सकाळच्या पत्रकाराने नेहमीप्रमाणे गोंधळ घातलाय

दीपक११७७'s picture

23 May 2017 - 7:38 pm | दीपक११७७

Humans originated in Europe, not Africa: study dated 23/5/2017
India today

http://indiatoday.intoday.in/story/humans-originated-in-europe-not-afric...

वरिल लिंक वचावी _/\_

दीपक११७७'s picture

23 May 2017 - 7:39 pm | दीपक११७७

Humans originated in Europe, not Africa: study dated 23/5/2017
India today

http://indiatoday.intoday.in/story/humans-originated-in-europe-not-afric...

वरिल लिंक वचावी _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2017 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

@अर्धवटराव,

हे वाचा. त्यासंबधीच्या बहुतेक गोष्टी स्पष्ट होतील.

मंजूताई's picture

11 May 2017 - 12:59 pm | मंजूताई

वाचतेय.... पुभा लवकर टाका...

इडली डोसा's picture

18 May 2017 - 10:12 pm | इडली डोसा

लवकर येऊ दे, वाट पाहणे चालु आहे.

बरखा's picture

22 May 2017 - 10:57 am | बरखा

सगळे भाग वाचले आहेत. हा भाग पण छान झालाय. पुढ्च्या भागाच्या प्रतीक्षेत.

दीपक११७७'s picture

23 May 2017 - 10:17 pm | दीपक११७७

Europe was the birthplace of mankind, not Africa, scientists find

http://www.telegraph.co.uk/science/2017/05/22/europe-birthplace-mankind-...

शैलेन्द्र's picture

24 May 2017 - 9:34 am | शैलेन्द्र

सत्य बाहेर येईलच, आणि तेंव्हा ते नक्की स्वीकारलं जाईल.

दीपक११७७'s picture

24 May 2017 - 10:39 am | दीपक११७७

हम्म......

फारच आवडत आहे ही लेखमाला.

आनन्दा's picture

24 May 2017 - 1:35 pm | आनन्दा

महाराज दरबारी ताटकळलेत...

विचित्रा's picture

26 May 2017 - 9:37 am | विचित्रा

पुभाप्र

विशाखा पाटील's picture

1 Jun 2017 - 2:13 pm | विशाखा पाटील

या विषयावरचे Yuval Harari यांचे पुस्तक ' A Brief of Humankind - Sapiens' उत्तम आहे.

शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 10:34 am | शैलेन्द्र

+11

पुंबा's picture

9 Jun 2017 - 10:26 am | पुंबा

पुढचा भाग कधी??

सौन्दर्य's picture

9 Jun 2017 - 11:37 pm | सौन्दर्य

लेख छान आणि माहितीपूर्ण आहे. पुढील भागासाठी उत्कंठा वाढली आहे.

तुमच्या लेखात काही वाक्ये अशी आहेत. - 'दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो......................... 'पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत'

इथे दोन चिम्पान्झी 'तिसर्याच' मादी चिम्पान्झी विषयी बोलत आहेत, नाही का ? मग दोन चिम्पान्झी तिसर्या चिम्पान्झी विषयी गप्पा मारू शकत नाहीत हे विधान कितपत बरोबर आहे ?

दीपक११७७'s picture

12 Jun 2017 - 3:53 pm | दीपक११७७

'पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत'

वरिल वाक्यात बहुदा कधीही हा शब्द अश्या प्रश्नांन पासुन बचाव करण्यासाठी केला आहे. हे वेगळ सांगाव लागेल का?

शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 10:26 am | शैलेन्द्र

"बहुदा कधीही" हा शब्दप्रयोग ज्ञान किंवा माहितीची अपूर्णता दर्शवतो, प्रश्नांपासून बचाव नव्हे. विज्ञानाला ही अपूर्णता मान्य कराविच लागते.
तुमच्या माहितीसाठी, नुकताच मोरोक्कोमध्ये होमो सेपियन्ससदृश्य काही अवशेष सापडले, जे 200000 वर्षापेक्षा जुने आहेत, आता या माहितीच्या उजेडात काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील. त्यामुळे "बहुदा" ला पर्याय नाही.

दीपक११७७'s picture

15 Jun 2017 - 11:15 am | दीपक११७७

नुकताच मोरोक्कोमध्ये होमो सेपियन्ससदृश्य काही अवशेष सापडले, जे 200000 वर्षापेक्षा जुने आहेत, आता या माहितीच्या उजेडात काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील

काही गृहीतक नव्याने मांडावी लागतील यासाठी "बहुदा कधीही" हा शब्द प्रयोग केला असेल हे पटण्यासारखे नाही असो. सांगडे याआधीपण चीक्कार मिळाले आहेत. "बहुदा कधीही" या शब्द प्रयोगासाठी हा नुकताच सापडलेला सांगडा कारण नसावा.

शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 11:27 am | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 11:27 am | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 11:27 am | शैलेन्द्र
शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 10:31 am | शैलेन्द्र

नाही, यांत एक छोटासा फरक आहे, हे दोन चिंपांजी स्वतःच्या मादीवरील आधिकाराबद्दल बोलतं आहे, हे स्वतःविषयी आहे, त्या मादीविषयी नाही..
जसं पूर्वी सलमान खान आणि विवेक ओबेरॉय ऐश्वर्या रॉयबद्दल बोलायचे/ भांडायचे तसं हे आहे. तुम्हीं आणि मी रेखाबद्दल बोललो तर ते गॉसिप पण सलमान आणि विवेकने ऐश्वर्यावरील आधिकाराबद्दल बोलणे गॉसिप नव्हे.

शैलेन्द्र's picture

15 Jun 2017 - 10:32 am | शैलेन्द्र

सॉरी, खूप मोठा गॅप झालाय, शक्यतो 2 दिवसात लिहितो पुढचं

शैलेन्द्र सर पुढचा भाग लवकर टाका. वाचक चातका सारखी वाट पहात आहे.
शिवाय खुप उशीर झाला आहे म्हणुन मोठ्ठा भाग अपेक्षीत आहे.
धन्यवाद.

आत्ताच लेखमाला बघितली, अजून वाचायला आवडेल. इतके दिवस मला लेखाच्या नावावरुन कादंबरी आहे का काय वाटत होते, म्हणून लिंक उघडली नव्हती.

शास्त्रीय दृष्ट्या एकाच समुदायात, 150 पेक्षा जास्त लोकांबद्दल तुम्हीं परिणामकारक कुचाळक्या नाही करू शकत

यालाच डनबारचा नंबर असे म्हणतात https://en.wikipedia.org/wiki/Dunbar%27s_number

शैलेन्द्र's picture

16 Jun 2017 - 8:59 pm | शैलेन्द्र

छान माहिती, धन्यवाद

ज्योति अळवणी's picture

16 Jun 2017 - 12:31 am | ज्योति अळवणी

मध्ये busy असल्याने वाचनात खंड पडला होता. खूप प्रभावी आणि माहितीपूर्ण लिहिता आहात. खूप आवडतंय. पुढचा भाग लवकर येऊ दे. उत्सुकता आहे

उमेश माधवराव मसलेकर's picture

22 Jun 2017 - 12:40 am | उमेश माधवराव मसलेकर

।। कोऽहम् ।। ह्या लेखमालिकेच्या भाग क्र.१-६ च्या लिंक्स मला मिळू शकतील का?
किंबहुना मला एक प्रश्न बऱ्याच काळापासून छळतोय की, एखाद्या धागाकर्त्याने आधी बरेच धागे काढले असतील किंवा इथे बरेच लेख लिहिले असतील तर त्या संबंधित धागाकर्त्याच्या सर्व धाग्यांच्या/लेखांच्या लिंक्स मिपावर कशा आणि कुठे शोधायच्या?मदतीच्या प्रतीक्षेत......

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jun 2017 - 2:02 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखाच्या वरच्या काळ्या रंगाच्या पट्टीत असलेला "मिपा पुस्तकं" हा पर्याय निवडा --> खाली आलेल्या यादीतून "मिपाकरांचे दीर्घलेखन" निवडा --> पहिल्याच पानावर "||कोहम्|| भाग 1" दिसेल. त्याच्यावर असलेली निळ्या रंगाची "अनुक्रमणिका" वापरून तुम्हाला १ ते ६ भाग मिळतील. या सातव्या भागाचाही काही काळाने अनुक्रमणिकेत अंतर्भाव होईल.

उमेश माधवराव मसलेकर's picture

22 Jun 2017 - 1:32 pm | उमेश माधवराव मसलेकर

धान्यवाद म्हात्रेजी

सेपियन वाचायला सुरुवात केली आहे, आता अनेक गोष्टींचा उलगडा नव्याने होतोय..