कहाणी एका औदार्यवतीची

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in भटकंती
16 May 2017 - 11:03 pm

राजा कृष्णदेवराय, विजयनगरचा सम्राट याचे साम्राज्य कर्नाटक ते कन्याकुमारी अश्या दख्खन च्या प्रदेशावर पसरलेले होते. एक दिवस राजा कृष्णदेवराय त्याच्या राजधानीतून म्हणजे हम्पी मधुन निघुन त्याच्या साम्राज्याची सफर करण्यास बाहेर पडला.

King

फिरता फिरता तो त्याच्या साम्राज्यातील पुर्व-समुद्रकिनारी पुद्दुचेरी या व्यापारी बंदरावर आला. तिथे त्याच्या नजरेस अतिशय सुंदर वास्तु पडली. त्याची वास्तुकला अन त्यावर असणारे कोरीवकाम पाहून तो थक्क झाला. ही सुरेख वास्तू म्हणजे मंदिरच असणार अशी त्याची खात्रीच पटली. तो हात जोडुन नतमस्तक झाला व वास्तूला पाया पडुन मनोभावे नमस्कार केला.

हे बघुन आजूबाजूचे लोक राजाकडे आश्चर्याने पाहून स्तब्ध झाले. तरूण युवक-युवती आपआपसात कुजबुजु लागले. तेवढ्यात गर्दीतुन एक वृद्ध नागरिक पुढे आला अन त्याने राजाला प्रश्न केला “ राजे महाराज, आपण या कुंटणखान्याच्या, वेश्यागृहाच्या वास्तुला नमस्कार का करत आहात?“

ज्या वास्तूला आपण पवित्र मंदिर समजतो आहोत ती वास्तू वेश्यागृह असावी ? या विचाराने राजाच्या मनात खळबळ उडाली. वृद्धाचे उदगार ऐकताच राजा चमकला, क्रोधित झाला. हा काय प्रकार आहे असे त्या वृद्धाला खडसावून विचारले.

“महाराज, हे तर एक वेश्यागृह आहे. आयि नावाची वेश्या या वेश्यागृहाची मालकिण आहे. ती चालवते हे’ .हे उत्तर ऐकताच राजाने संतापाच्या भरात त्याला फटके लगावले. तो वृद्ध नागरिक रस्त्यातच कोसळला.

संतापलेल्या राजाला काय करू, काय नको असे झाले. त्याने आपल्या सैनिकांना ती वास्तू पायापासून उखडुन उध्वस्त करायचा आदेश दिला. आयिला दरबारात हजर करण्याचे फर्मान सोडले. सैनिक वेश्यागृहाची वास्तू नेस्तनाबुत करण्यासाठी हातोडे व इतर हत्यारे घेवुन रवाना झाले. आयिला साखळदंडानी बांधुन दरबारात हजर करण्यात आले. राजा दरबारात येताच तिने राजाचे पाय धरले व काकुळतीने दयेची याचना के्ली. वास्तू पाडु नये खुप गयावया केले, पण राजा संतप्तच होता. तिचे काही एक ऐकुन घ्यायला तयार नव्हता.

Raja

शेवटी निराश झालेल्या आयिने वास्तू स्वत: पाडायची परवानगी मागितली. कालांतराने थोडाश्या शांत झालेल्या राजाने याला अनुमती दिली.
मग आयिने ती वास्तू स्वत: पाडली व तिथे खणुन लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा तलाव बांधला. ही जागा आता आयिच्या स्मृतीसाठी आयिकुलम तलाव या नावाने प्रसिद्ध झाली.

Ayi

काही वर्षांनंतर पुढे . . . . . . . .

इथे इ.स.१६७४ मध्ये फ्रेंच लोकांचे राज्य आले. पुद्दुनगरीला फ्रेंचांनी राजधानी बनवली. काही कालावधीनंतर सागरी किना-यावरच्या या देखण्या पुद्दूचेरीला अतिव पाणी टंचाईने ग्रासले. नदी, तलाव आटले. विहिरी खणल्या तर त्यांना खारे पाणी लागले. सारी नगरी पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झाले. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी विख्यात फ्रेंच आर्किटेक्ट मॉन्सिअर लॅमेयसिस याला पाचारण करण्यात आले. मॉन्सिअरने जमिनीखाली ५ किमी लांबीचा बोगदा खणुन पाणी आयिकुलम तलावापासुन नगरातल्या मुख्य फ्रेंच कॉलनीतल्या पार्क मध्ये आणले. अन मग जनतेने निश्वास टाकला. फ्रेंच राजाही खुष झाला. त्याला आयिची अन आयिकुलम तलावाची कहाणी समजली. आयिच्या त्यागाच्या कहाणीने तो प्रचंड प्रभावित झाला. दरम्यान पुद्दुचेरीच्या गव्हर्नरने फ्रान्सच्या राजाला यासाठी धन्यवाद देणारे पत्र लिहिले. राजाने उत्तर दिले, धन्यवाद माझे अन मॉन्सिअरचे कसले? धन्यवाद तर तिला, त्या आयिला दिले पाहिजेत, जिने स्वत:वर एव्हढे संकट कोसळुन देखील परिस्थितीचे भान राखुन औदार्य दाखवले, लोकांसाठी पाण्याचा तलाव बांधला. खरंच् ती श्रेष्ठ आहे. तिच्या आठवणीसाठी एखादे सुंदर स्मृतीस्थळ बांधा.

AMK

अन मग त्या पार्कमध्ये ग्रीको-रोमन शैलीतील फ्रांसचा तात्कालीन राजा तिसरा नेपोलियन (१८५२-१८७०) याने एक सुंदर कमान बांधली. कमानीच्या शिखरावर फ्रेंच संस्कृतीचे प्रतिक असलेले फ्लेअर-डे-लिस म्हणजेच लिलीचे शैलीदार फुल दिमाखदार पणे विसावलेले आहे. कमानी वर एका शिला-फलकावर तमिळ अन लॅटीन भाषांमध्ये आयिचे महात्म्य अन तिला धन्यवाद देणा-या ओळी कोरल्या आहेत! ही आयि मंडपमची देखणी कमान भारती पार्कच्या मध्यभागी अन समुद्र किनारी फ्रेंच दुतावास, राजभवन, गांधी पुतळा अश्या महत्वाची ठिकाणांजवळच पुद्दुचेरीच्या म्हणजेच पॉण्डिचेरीच्या मध्यवर्ती भागात आहे.

NKS

मी नुकतीच पुद्दुचेरीला भेट दिली असताना या सुंदर अश्या आयि मंडपम च्या देखण्या कमानी समोर माझी छबी टिपण्याचा मोह मला आवरला नाही.

Mee

(माहितीस्त्रोत: स्थानिक गाइड व आंतरजालावरील आयिची आख्यायिका / चित्रे आंजावरुन साभार)

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 May 2017 - 11:36 am | चांदणे संदीप

यानिमित्ताने ' शनवारवाड्यात कात्रजचे पाणी' याचीच आठवण झाली!

Sandy

चौथा कोनाडा's picture

17 May 2017 - 9:43 pm | चौथा कोनाडा

धन्यू, संदीप!
हो, मलाही हा कात्रजच्या पाण्याचा संदर्भ आठवला होता.
औरंगाबाद शहरात देखील खाम नदीतून पाणीपुरवठ्यासाठी पाणचक्कीमार्गे आणलेल्या पाण्याची योजना चारशे वर्षे जुनी आहे.
पाणी मुलभुत गरज असल्यामुळे त्या त्या वेळेच्या तद्न्यांनी प्रजेला उपयोगी पडतील असे अभियांत्रिकी प्रकल्प केले.
त्याकाळचे इंजिनीयरींग पाहून आपल्याला नवल वाटत राहते.

दुर्गविहारी's picture

17 May 2017 - 11:45 am | दुर्गविहारी

वा! नवीनच माहिती समजली. छान.

हे माहीत नव्हतं. धन्य ती आयि!

दशानन's picture

17 May 2017 - 12:01 pm | दशानन

वाह!
हे नवीनच समजले आज.

खेडूत's picture

17 May 2017 - 12:11 pm | खेडूत

छान माहिती.
दोनदा तिथे जाऊनही पाहिलेले नाही, पुढच्या वेळी पहाण्यासाठी नोंद घेतलीय.

चौथा कोनाडा's picture

18 May 2017 - 11:07 pm | चौथा कोनाडा

या मंडपमला भेट द्यायचा माझाही योग चुकायचाच, पण माझ्या बरोबरचा गाइड भन्नाट होता, त्याने अयिची कथा अशी काही खुलवुन सांगायला सुरुवात केली की त्यात मी हरखलोच. वनश्रीने नटलेल्या भारती पार्क मधील मंडपम रमत गमत बघण्यासारखा आहे. गाइडनी अयिची कथा इतकी सुंदर सांगितली की ती आता कायमची स्मरणात राहिल.
धन्यु खेडुत !

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2017 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

या लेखामुळे आयिची माहिती प्रथमच समजली ! फ्रांसचा तात्कालीन राजा तिसरा नेपोलियन हा पण गुणग्राही होता असे दिसते.

प्रचेतस's picture

17 May 2017 - 4:06 pm | प्रचेतस

वेगळी माहिती. पण मंदिर/वेश्यागृह/राजाचा क्रोध ही दंतकथा वाटतेय. विजयनगरमध्ये वेश्यागृहे होतीच, समकालीन परकिय प्रवाशांनी त्यांचे वर्णन देखील केले आहे.

पैसा's picture

17 May 2017 - 9:47 pm | पैसा

तेव्हा गणिका/वेश्या म्हणजे समाजावर कलंक वगैरे काही मानले जात नव्हते.

चौथा कोनाडा's picture

18 May 2017 - 10:36 pm | चौथा कोनाडा

..पण मंदिर/वेश्यागृह/राजाचा क्रोध ही दंतकथा वाटतेय.

दंतकथाच असेल बहुधा, कारण या प्रसंगाची ऐतिहासिक महिती मिळाली नाही. विकिपेडियावर देखील "हे स्मारक अयि नावाच्या गणिका जिने स्वःतची वास्तू पाडून त्या जागी जनतेच्या सोयीसाठी जलाशय बांधला" असा उल्लेख आहे.
फ्रेंचानी अयिची स्मृती इतक्या सुंदर रूपात जपली हे विशेष !

धन्यु, प्रचेतस अन पैसातै !

संजय क्षीरसागर's picture

17 May 2017 - 5:10 pm | संजय क्षीरसागर

आणि स्मारक पण सुरेख बांधलंय .

गामा पैलवान's picture

17 May 2017 - 8:24 pm | गामा पैलवान

लोकहो,

कृष्णदेवराय बावळट होता असा काहीसा अर्थ या कथेतून निघतो आहे. जालावर थोडा शोध घेतल्यावर आयि देवदासी होती असा काहीसा उल्लेख सापडला. युरोपीय भारतात येण्यापूर्वी देवदासींचं नावतरी कोणी ऐकलं होतं का!

सांगायचा मुद्दा काये की आयि औदार्यवती असेलही, पण त्याकरिता राजास दोषी ठरवायची आवश्यकता नाही. आयिमंडप सुंदर वास्तू असेलही, पण उगीच फ्रेंचांची लाल करण्यात अर्थ नाही.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

20 May 2017 - 6:15 pm | चौथा कोनाडा

लै भारी निष्कर्ष, गापै !
<< कृष्णदेवराय बावळट होता असा काहीसा अर्थ या कथेतून निघतो आहे >>
: इतिहास पहिला तर राजा कृष्णदेवराय पराक्रमी व आदर्श राज्यकर्ता होता, एखाद्या प्रसंगी क्रोध केला तर राजा बावळट ठरतो हा धाडसी निष्कर्ष आहे !

<< जालावर थोडा शोध घेतल्यावर आयि देवदासी होती असा काहीसा उल्लेख सापडला. युरोपीय भारतात येण्यापूर्वी देवदासींचं नावतरी कोणी ऐकलं होतं का ? >>
: राजा कृष्णदेवरायचा कार्यकाळ इस १५०९ ते इस १५२९ असा होता. युरोपीय भारतात या दरम्यानच युरोपियन व्यापार्‍यांनी भारतास भेट देण्यास सुरुवात केली होती ! आणि माझ्या वाचनात आलेल्या नुसार देवदासी/गणिका प्रथा कितीतरी आधीपासून सुरू होती. आंजावर या विषयी भरपुर माहिती आहे.

<< सांगायचा मुद्दा काये की आयि औदार्यवती असेलही, पण त्याकरिता राजास दोषी ठरवायची आवश्यकता नाही.>>
: या (दंत)कथेनुसार आयि नक्कीच औदार्यवती ठरते. इतकी औदार्यवान की चक्क फ्रेंचानां तिचे स्मारक बांधावे अशी इच्छा होते ! कथेनुसार राजा दोषीच आहे, मंदिरासारखी सुंदर वास्तू पाहुन हे मंदिरच असे समजून नमस्कार करतो ! अरे, विचारायंच ना कुणाला तरी, कसलं मंदिर आहे ? कुणी बांधलेय वैगरे ? मग नंतर क्रोध करायची वेळ आली नसती.

<< आयिमंडप सुंदर वास्तू असेलही, पण उगीच फ्रेंचांची लाल करण्यात अर्थ नाही. >>
: फ्रेंचांच्या कृतज्ञतेचे कौतुक केले पाहिजे. सुंदर स्मारकाच्या निर्मितीचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. हे त्यांची लाल करणे नसून इतिहास मान्य करणे आहे !

धन्यु गापै प्रतिसादाबद्दल !

बबन ताम्बे's picture

17 May 2017 - 9:46 pm | बबन ताम्बे

नवीन माहिती समजली. स्मारक सुंदरच आहे आणि आपली लिहिण्याची शैली देखील सुंदर आणि ओघवती. फोटो देखील छान !! पुढील भटकंतीच्या लेखाच्या प्रतीक्षेत !

रेवती's picture

18 May 2017 - 8:43 pm | रेवती

माहिती व फोटू आवडले.

रुपी's picture

24 May 2017 - 7:25 am | रुपी

+१

अभ्या..'s picture

19 May 2017 - 10:07 am | अभ्या..

मस्तय कथा.
इंटरेस्टिंग

गामा पैलवान's picture

21 May 2017 - 1:58 pm | गामा पैलवान

चौथा कोनाडा,

उपरोक्त कथेतल्या मला खटकणाऱ्या गोष्टी सांगतो.

१. कृष्णदेवराय राजा असल्याने त्यास आयिमंडपाची माहिती नव्हती हे असंभव वाटतं.

२. ज्याअर्थी आयिने इतकं अलिशान घर बांधलं त्याअर्थी तिच्याकडे बरीच संपत्ती असावी. तसेच ती देवदासी होती असा उल्लेख सापडला. हे खरं धरायचं का? खरं धरल्यास देवदासी हा संपत्तीवाला प्रतिष्ठित व्यवसाय होता. तर मग राजाला राग यायचं कारणंच काय मुळातून?

३. त्या काळच्या देवदासी आजच्यासारख्या भोगदासी नसंत. तर मग वेश्येचा उल्लेख विसंगत नव्हे काय?

सांगायचा मुद्दा काये की, एका औदार्यवतीने जनहितार्थ आपला राहता प्रासाद पाडून त्याजागी एक तलाव बांधविला. या सरळधोपट कथेस फालतू वळसे घालंत बसायची गरज नाही.

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

23 May 2017 - 11:14 pm | चौथा कोनाडा

गा.पै.साहेब,

तुम्हाला खटकणाऱ्या मुद्द्यानुषंगाने मला उमगलेल्या गोष्टी मांडतो.

१. कृष्णदेवराय राजा असल्याने त्यास आयिमंडपाची माहिती नव्हती हे असंभव वाटतं

- अयि मंडपम हे स्मृतीस्थळ राजा कृष्णदेवरायनंतर पुढिल शतकात फ्रेंच शासन्कर्त्यांनी बांधले. त्या आधी ती जागा आयिकुलम तलाव या नावाने प्रसिद्ध झाली होती.

२. ज्याअर्थी आयिने इतकं अलिशान घर बांधलं त्याअर्थी तिच्याकडे बरीच संपत्ती असावी. तसेच ती देवदासी होती असा उल्लेख सापडला. हे खरं धरायचं का? खरं धरल्यास देवदासी हा संपत्तीवाला प्रतिष्ठित व्यवसाय होता. तर मग राजाला राग यायचं कारणंच काय मुळातून?
- सुंदर वास्तूची मालकिण म्हंजे धनाढ्य असणारच ! त्याकाळच्या देवदासी / गणिका / वारांगना या कलावती (कला-रूप-गुणासंपन्न) तसेच धनवान असल्याचे उल्लेख अढळतात. राजाला राग आला तो फसगत झाल्याचा ! तो चक्क वेश्यागृहाला मंदिर समजला, अन रागावला मात्र वेश्यागृहाच्या मालकिणीवर, अयिवर !

३. त्या काळच्या देवदासी आजच्यासारख्या भोगदासी नसंत. तर मग वेश्येचा उल्लेख विसंगत नव्हे काय?
- बाराव्या शतकानंतर परकिय शासननकर्त्याच्या काळात मंदिर संस्कृतीवरील आक्रमणांमुळे देवदासी भोगा मध्ये ढकलल्या जात होत्या असा उल्लेख आढळतो (आता लिंक नाहियत, मिळाल्या की पोस्टतो इथे)

सांगायचा मुद्दा काये की, एका औदार्यवतीने जनहितार्थ आपला राहता प्रासाद पाडून त्याजागी एक तलाव बांधविला.
- याच्याशी मात्र १०० % सहमत !

वेगळे मुद्दे उपस्थित करुन चर्चा केल्याबद्दल धन्यवाद, गा.पै.

आ.न.,
चौ.को.

मला सगळ्यात जास्त नवल वाटले ते कृष्णदेवरायाच्या चित्राचे.
तेहि शिवाजी महाराजांच्या चित्रावर फोटोशॉप करून फक्त कृष्णदेवरायाचा चेहरा बसवला आहे.
जानवले नाही का कुणाला?
Sm

जाणवले पण कर्नाटकात सर्वत्र हेच चित्र प्रचलित आहे. विशेषतः कोप्पलच्या आसपास हेच चित्र फ्लेक्स वर लावलेले आढळते. वास्तविक कृष्णदेवराय बारकुडा, देवीचे व्रण चेहऱ्यावर असलेला असा होता. डोक्यावर पगडी नसून निमुळती होत गेलेली टोपी.

कृष्णदेवरायाची तत्कालीन मूर्ती कमलापूरच्या संग्रहालयात ठेवलेली आहे तशीच त्याची एक मूर्ती हंपीतील विठ्ठल मंदिराच्या आवारातील कल्याण मंडपाच्या एका स्तंभावर देखील कोरलेली आहे.

चौथा कोनाडा's picture

26 May 2017 - 9:38 pm | चौथा कोनाडा

हा ... हा.. !
भारी निरिक्षण ! सजग कलाकाराची नजर, दुसरं काय !
(चित्र आंजावरून साभार आहे)

गामा पैलवान's picture

25 May 2017 - 1:43 am | गामा पैलवान

चौथा कोनाडा,

१.

अयि मंडपम हे स्मृतीस्थळ राजा कृष्णदेवरायनंतर पुढिल शतकात फ्रेंच शासन्कर्त्यांनी बांधले.

आयिमंडप चुकून म्हंटलं. मला त्या अगोदरचा प्रासाद म्हणायचं होतं.

२.

राजाला राग आला तो फसगत झाल्याचा ! तो चक्क वेश्यागृहाला मंदिर समजला, अन रागावला मात्र वेश्यागृहाच्या मालकिणीवर, अयिवर !

हेच नेमकं मला खटकलं. राजा असूनही त्याला आपल्या प्रजेची माहिती नव्हती का? तसंच आयिवर भडकायचं कारण नाही. राजे लोकं आपला राग सहजासहजी दिसू देत नाहीत. शिवाय चूक राजाची होती. आयिची नव्हे. त्यामुळे राजा रागावला ही दंतकथा वाटते.

३.

बाराव्या शतकानंतर परकिय शासननकर्त्याच्या काळात मंदिर संस्कृतीवरील आक्रमणांमुळे देवदासी भोगा मध्ये ढकलल्या जात होत्या असा उल्लेख आढळतो (आता लिंक नाहियत, मिळाल्या की पोस्टतो इथे)

माझ्या मते हे उल्लेख प्रक्षिप्त आहेत. शिवाजीमहाराजांच्या वेळचं विपुल लेखन उपलब्ध आहे. देवदासी हा प्रकार महाराष्ट्र व कर्नाटकात प्रामुख्याने अस्तित्वात होता. शिवाजीमहाराजांच्या काळांत कोणी मातब्बर सरदारांनी अनेक स्त्रिया बाळगल्याचे बरेच उल्लेख आहेत. त्यांत देवदासी कशा दिसंत नाहीत?

आ.न.,
-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

27 May 2017 - 11:24 pm | चौथा कोनाडा

१. ओके
२.

दंतकथाच असेल बहुधा, कारण या प्रसंगाची ऐतिहासिक महिती मिळाली नाही. विकिपेडियावर देखील "हे स्मारक अयि नावाच्या गणिका जिने स्वःतची वास्तू पाडून त्या जागी जनतेच्या सोयीसाठी जलाशय बांधला" असा उल्लेख आहे.

हा मी आधीच्या एका प्रतिसादात ही दंतकथा असल्याचा उल्लेख केलेलाच आहे.
३. मी गाईडकडुन ऐकलेल्या माहितीनुसार व वाचनानुसार अयि ही वेश्या होती हे लेखात लिहिलेलेच आहे. देवदासीचा उल्लेख प्रथम तुम्ही तुमच्याच प्रतिसादात केला आहे. तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये ( http://www.thehindu.com/thehindu/mp/2005/09/17/stories/2005091700200300.htm) अयि टेम्पल डान्सर (देवदासी) होती असा उल्लेख आहे, मग आता या संदर्भात अयिचा काळ अन आपल्याला माहित असलेली महाराष्ट्र / आंध्र / कर्नाटकातील प्रथा या संदर्भात ताडून पाहणे अप्रस्तूत आहे. (बायदवे, तुम्हि दिलेला अयि नृत्यनाटिकेचा संदर्भ मस्तच आहे ! चेन्नईला असताना अशी एखादी नृत्यनाटिका बघायची जाम इच्छा होती, पण योग आला नाही.
तिथली प्रसिद्ध संस्था कलाक्षेत्रला देखील भेट द्यायचा योग थोडक्यात हुकला) असो.
देवदासी प्रथेचा उगम यावरची ही एक माहितीपुर्ण लिंक:
http://iml.jou.ufl.edu/projects/Spring02/Chattaraj/genesis.html

चर्चा व लिंक करता धन्यू गा.पै.