अभी तो पार्टी शुरू हुई हैं ...

पद्मावति's picture
पद्मावति in काथ्याकूट
12 May 2017 - 6:40 pm
गाभा: 

रामगढचे ते लहानसे रेल्वे स्टेशन. एकच प्लॅटफॉर्म!
ट्रेन मधून खाकी यूनिफॉर्म मधला एक माणूस उतरतो. त्याची वाट पाहत असलेला रामलाल या माणसाला घेऊन स्टेशनच्या बाहेर पडतो. दोघेही घोड्यावर बसून रामगढच्या दिशेने दौडत निघतात......
आणि बॅकग्राउंडला सुरू होते ते हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या इतिहासातले एक अतिप्रचंड दिलखेचक, जबरदस्त पार्श्व संगीत.

गाण्यांपेक्षा कधी कधी बॅकग्राउंड स्कोर भाव खाऊन जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शोलेचा हा टायटल ट्रॅक. नेहमीप्रमाणे इथेही जूनियर बर्मनदा गाण्यांइतकाच पार्श्व संगीतातही जीव ओततात.

आता शोले हा चित्रपट!

या चित्रपटाविषयी काय काय बोलावं आणि काय काय आठवावं?
सलीम-जावेदचे तूफ़ानी संवाद, अरे ओ सांबा चा धाक, वीरूची नौटंकी, बसंतीची नॉनस्टॉप बडबड, जय आणि ठाकूर बहूचे अबोल अव्यक्त प्रेम...
संजीव कुमारचा सुडाने धगधगलेला ठाकूर, रामलालची खंबीर स्वामीनिष्ठा, पुत्रवियोगाने कोसळलेले इमाम साहेब आणि अँग्रेझोँके जमानेके जेलर... अनेकांच्या बाळपणाची नाळ या आठवणींशी अशी अगदी घट्ट जोडली गेलीय, निदान माझी तरी. अहो, या चित्रपटावर, त्याच्या संवादांवर आमची एक आक्खी पिढी पोसली आहे.
नॉर्मली मुलं कशी, रामायण, महाभारतातल्या कहाण्या ऐकत मोठी होतात…तसे आम्ही जय-विरुच्या स्टोरया ऐकत मोठे झालो =))

कोणाचं काय तर कोणाचं काय? पण शोले चित्रपट हा माझ्यासाठी मात्र एक रेशीमधागा आहे- भुतकाळाशी मला जोडणार्‍या अनेक धाग्यांपैकी एक. शोले म्हणजे सत्तर एम एमच्या पडद्यावरचा लार्जर दॅन लाईफ थरार आहे, घोड्यांच्या टापांचा छाती दडपुन टाकणारा खडखडाट आहे आणि आज मल्टिप्लेक्सच्या जमान्यात सिंगल स्क्रीनची जपून ठेवलेली आठवण आहे.

म्हणूनच शोलेचे हे टायटल संगीत मला क्षणार्धात 'अभी तो पार्टी शुरू हुई' वाल्या मोड मधे नेतं. हे संगीत माझ्यासाठी पुढल्या सुखद प्रवासाची नांदी असते, तूफानी मनोरंजनाची ग्यारन्टी असते, गब्बरच्या, बसंतीच्या पुनर्भेटीचा आनंद असतो आणि आठवणींची उजळणी असते.
आजही हे संगीत पडद्यावर सुरू झाले ना की माझ्या अंगावर काटा येतो. मनात कुठेतरी "सीट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द राइड" अशी घोषणा होते....ओठांवर कळत नकळत एक स्मितहास्य येतं...
मी आता सीटवर अशी मस्तॅंपैकी सैलावून बसते, भवतालच्या जगाला तात्पुरता टाटा बाय बाय करते आणि मग पुढचे तीन-साडे तीन तास शोले नावाच्या त्या रंगीत, जादुभर्या दुनियेत निवांत विरघळून जाते....स्वत:ला पार हरवून बसते.. पूर्णपणे....

मंडळी, तुमच्याही काही आवडीचे, लक्षात राहीलेले, मनात रुतुन बसलेले टायटल ट्रॅक्स, ओपनिंग सीन्स किंवा गाणी असतील ना? असतील तर येऊ द्यात...अभी तो पार्टी शुरू हुई हैं :)

प्रतिक्रिया

अगदी नेमक्या भावना व्यक्त केल्यास. आता आज परत एकदा "शोले" च पारायण करायला पाहिजे.

अभ्या..'s picture

13 May 2017 - 4:24 pm | अभ्या..

आह्ह्ह्ह
शोले अन शोले चा साउंडट्रॅक...... लव्हली.
परत युट्युब ओपन करुन मॅजिक रिवाइंड.
अचानक एक जेम क्लिप सापडली.
१९७६ (एक वर्षातच ना? शोले ७५ चा) चा कार्यक्रम. जनाब युसुफखान आपल्या फर्ड्या उर्दूत सूत्रसंचालन करताहेत.
सुरुवातीला अजून एक चमत्कार. चक्क एक फुल्ल कल्ले अन थोडेसे टक्कल असलेला परिचित वाटणारा देखणा चेहरा. साध्या झब्ब्यापायजम्यात. जरासा उभट फारुख शेख का? अंहं.. संजय गांधी. चक्क संजय गांधी. बरोब्बरे. १९७६ ना. आणिबाणीत व्हीसी शुक्ला कमलनाथ ग्यांगसहीत केलेले फिल्मइंडस्ट्रीत गाजवलेले प्रताप झटक्यात आठवले. एनीवे. संजयसाहेबांनी पटकन माईक सोडला (तसेही बोलायचा कमीच तो माणूस म्हणे) अन आमंत्रित केलेय बर्मन ऑर्केस्ट्राला.
दोन बीटस पडल्या गिटारच्या की ट्रम्पेट उचलले गेले अन सुरु झाले. ट्यँट्या टट्यां. हा चमत्कार न शब्दात लिहिता येईल ना चित्रात दाखवता येईल. फक्त अस्सल भारतीय कान ही धून आतपर्यंत शोषून घेईल. प्रत्येक सुराला अन त्या बीटला एकेक चित्र डोळ्यासमोर तरळेल. एकेक अस्सल कॅरेक्टर.
माणसेच नाही तर लाकडांच्या चिरफाळ्या उडवत जाणार्‍या त्या रेल्वे इंजिनापासून ते जेलरच्या हातातून घरंगळणार्‍या पृथ्वीगोलापर्यंत प्रत्येक कॅरेक्टर स्टँडस फॉर शोले.
प्रत्येक कॅरेक्टर नुसते जिवंत नाही.... अजरामर.
हॅटस ऑफ शोले.

पद्मावति's picture

13 May 2017 - 4:37 pm | पद्मावति

दोन बीटस पडल्या गिटारच्या की ट्रम्पेट उचलले गेले अन सुरु झाले. ट्यँट्या टट्यां. हा चमत्कार न शब्दात लिहिता येईल ना चित्रात दाखवता येईल. फक्त अस्सल भारतीय कान ही धून आतपर्यंत शोषून घेईल. प्रत्येक सुराला अन त्या बीटला एकेक चित्र डोळ्यासमोर तरळेल. एकेक अस्सल कॅरेक्टर.
माणसेच नाही तर लाकडांच्या चिरफाळ्या उडवत जाणार्‍या त्या रेल्वे इंजिनापासून ते जेलरच्या हातातून घरंगळणार्‍या पृथ्वीगोलापर्यंत प्रत्येक कॅरेक्टर स्टँडस फॉर शोले.

क्या बात हैं जी, क्या बात हैं....हे प्रचंड आवडलंय.
वीडियो पण फारच मस्तं. दुर्मीळ आठवण. अनेक धन्यवाद.

किसन शिंदे's picture

16 May 2017 - 7:32 pm | किसन शिंदे

निर्विवादपणे जबराट म्युझिक आहे हे.

रच्याकने वादकांच्या ताफ्यात दिल तो पागल है, गदरवाला उत्तम सिंग कुणी पाह्यला का?

मोदक's picture

12 May 2017 - 7:53 pm | मोदक

भारी धागा..

माझ्या आवडत्या थीम्स..

_

१:०६ नंतर सुरू होणारा तुकडा..

_

यातले ०:५५ नंतर सुरू होणारे बॅकग्राऊंड म्युझीक माझ्या फोनची रिंगटोन आहे.. बरीच वर्षे..

_

आणि अत्यंत आवडीची रॉकी थीम..

(आणखी भर घालतो आहेच..)

टवाळ कार्टा's picture

12 May 2017 - 7:58 pm | टवाळ कार्टा

नॉर्मली मुलं कशी, रामायण, महाभारतातल्या कहाण्या ऐकत मोठी होतात…तसे आम्ही जय-विरुच्या स्टोरया ऐकत मोठे झालो =))

=))

ओपनिंग सीन्स लैच आहेत
"ऐ जांगीर...जरा बाजार से गोश्त लेके आव"
"ईस्माईल भाय......सब खैरियत"
.
.
.

तुषार काळभोर's picture

14 May 2017 - 7:08 am | तुषार काळभोर

बोटी कबाब है बोटी कबाब!
उस्ताद, ये कली कौन है?
वो मेरी बहन होना!

मोदक's picture

12 May 2017 - 7:58 pm | मोदक

माय हार्ट विल गो ऑन.. (सॅक्सोफोनवर)

रुपी's picture

12 May 2017 - 10:50 pm | रुपी

पत्ते खेळत असणारे नवरा, बायको आणि मेहुणी.
काय खेळावं याबद्दल जाम टेन्शनमध्ये असणारी बायको, टेबलाखालून सतत बायकोच्या पायाला पाय लावायचा प्रयत्न करणारा नवरा...
असे काही वेळा झाल्यावर "जिजाजी, ये पैर मेरा है|" असा खुलासा करणारी मेहुणी...

संजीव कुमार, मौसमी चॅटर्जी आणि दीप्ती नवल यांचा हा सीन 'ओपनिंग' असा नसला तरी नामावलीनंतर येणारा पहिला सीन आहे. आणि या नंतर सुरु होते ती जुळ्यांच्या दोन जोड्यांची कॉमेडी ऑफ एरर्स ची भन्नाट राइड. 'अंगूर' हा कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा न येणारा माझा आवडता चित्रपट.

देवेन वर्माने साकारलेले दोन्ही बहादूर, त्याची भांग घेण्याची सवय..
द्राक्षमळा बघायला आलेला आणि सतत जास्तच सतर्क राहणारा दुसरा अशोक.. त्याचं 'गँग, गँग..' म्हणत सारखा संशय घेणं..
पहिला अशोक आणि मौसमीने साकारलेल्या सुधामधले हारावरुन चाललेले वाद.. रात्रभर घराबाहेर काढून सकाळी घरी आलेल्या अशोकला 'हार लाये?' हे सुधाने विचारणं..
रिक्षावाल्याबरोबरचा प्रसंग.. सराफाच्या दुकानातला प्रसंग..
अशोक आणि बहादूरमध्ये ठरलेले इशारा देण्यासाठीचे 'प्रीतम आन मिलो' गाणे..
अरुणा इराणीने साकारलेल्या प्रेमाला पकोडे खाऊ घालतानाचे 'खाती तुम हो, तन मेरे लगता है'...

कितीही वेळा पाहिलं तरी हे सगळं दर वेळी खूप करमणूक करवून आणि हसवून जातं.

वरील सर्व आवडते आहे.

वरील सर्व आवडते आहे.

वाचून छान वाटलं. शोले सिनेमा कधी पहावासा वाटला नाही. बर्‍याचजणांनी "शोले पाहिला नाही?" असं अनेकदा विचारल्यावर आता हा सिनेमा कुठं पाहणार असा प्रश्न पडला. तेंव्हा एका मैत्रिणीनं तिच्याकडे व्हिएचएस असल्याचं सांगितलं. तिच्या वडिलांनी पहायला परवानगी दिली, आमच्याकडून मिळण्याची शक्यता नसल्यानं विचारलं नाही. मैत्रिणीचं घर कॉलेजपासून पाच मिनिटाच्या अंतरावर होतं. मग रोज मधल्या सुट्टीत सगळ्यांनी डबे घेऊन तिच्याकडे जायचं व जेवत जेवत सिनेमा पहायचा. नजर घड्याळाकडे असल्याने लक्ष लागायचं नाही. तीनेक दिवस झाल्यावर आमचा शिनेमा बंद पडला कारण हिचा बॉयफ्रेंड आहे हे घरी समजलं होतं म्हणे! घरच्यांना धक्का बसला व मैत्रिणी, गप्पा वगैरे गोष्टींवर बंदी आली. मलाही धक्का बसला कारण तो मनुष्य इतके दिवस तिचा भाऊ वाटायचा. संजीवकुमारचे हात कापले जाणं व बसंतीने काचांवर नाचणं एवढच आठवतय.
रोजा, बॉम्बे या सिनेमांचं गावाकडलं वातावरण पाहिल्यावर न चुकता आनंद होतो, मोहून जायला होतं.

आषाढ_दर्द_गाणे's picture

13 May 2017 - 1:25 am | आषाढ_दर्द_गाणे

माझीही एक आठवण.
सूचना: तुनळीवरच्या चित्रफितीतली भाषा असभ्य/असांसदीय आहे. कृपया नोंद घ्यावी.

स्थळ: मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या एका पंचतारांकित म्हणता येईल अश्या एका चकचकीत मल्टिप्लेक्सात संपूर्ण आडवे लोळून चित्रपट पाहता येईल अशी व्यवस्था असणारे (रिक्लायनर सीट्सवाले) गारेगार थेटर.
वेळ: सकाळी साडेआठ (किंवा नवाचा) खेळ*.
अस्मादिक आणि अन्यजन नुकतेच डोळे चोळत, आत येऊन स्थिरस्थावर होत आहेत
आणि तितक्यात:
विशाल भारद्वाज ह्यांच्या 'ओमकारा' चित्रपटातला (नंतर येणाऱ्या अनेकांपैकी) पहिला कडक, सणसणीत डायलॉग (संवाद म्हणवत नाही त्याला!) -

अंधारात जागा शोधता-शोधता वरच्या चित्रफितीतला पहिले वाक्य ऐकून फाडकन मुस्काटात दिल्यागत वळलो आणि उर्वरित सीन उभ्यानेच पहिला!
मनाचा ठावच घेतला चित्रपटाने, मुख्यत्वेकरून सैफच्या 'लंगडा त्यागी'ने.
पश्चात पोहायला न येणाऱ्याला शांतपणे पाण्यात ढकलण्यापासून ते 'बिडी जलाईले' पर्यंत सगळेच आवडून गेले.
उत्तर प्रदेश म्हणून दाखवायचा असला तरी मुदलात वाई, महाबळेश्वर असणाऱ्या प्रदेशातले सौंदर्य असे काही काबीज केले आहे कॅमेरात, की त्याने मोहिनी घातली मनावर.
असो.
*सकाळचे खेळ स्वस्तात असत. तत्कालीन आर्थिक आणि रिकामटेकड्या परिस्थितीनुसार तितकीच चैन करणे परवडत असे.

अभिदेश's picture

13 May 2017 - 2:10 am | अभिदेश

भक्तांना एक प्रश्न ..सिनेमा मध्ये गब्बर सिंगचे खरे नाव काय ?

अभ्या..'s picture

13 May 2017 - 10:11 am | अभ्या..

प्रश्न चुकला, खरे नाव गब्बरसिंग च.
पूर्ण नाव गब्बर सिंग वल्द हरिसिंग.
.
कोर्टाला सगळे माहित असते बाबा. ;)

पद्मावति's picture

13 May 2017 - 2:16 am | पद्मावति

गब्बर सिंग वल्द हरी सिंग :)

अभिदेश's picture

13 May 2017 - 2:27 am | अभिदेश

खरे शोले भक्त ..:-) ,बऱ्याच जणांना आठवत नाही...तुम्ही आमच्या कॅटेगरीतले ....

मस्त लिहिलेस पद्माक्का. रुपी, आदगा ह्यांचे प्रतिसादही आवडले.

शोले बसंत थिएटरमध्ये याच स्टेरिओ सीन आणि आवाजासाठी पाहिलेला. याची( आणि सिनेमाची) युट्युब क्लिप आहेका? ही क्लिप आपल्या म्युझिक सिस्टमला टेस्टिंगला उपयोगी होईल असे वाटते.

शीर्षक आणि लेखिका वाचून दचकले ना ;)

मस्त धागा आहे. वर सगळ्यांनी लिहिलेले आवडते सीन आहेत.
मराठी सिनेमांचे - एक डाव धोबीपछाड मध्ये मराठीची शिकवणी "आनंदाने वेडेपिशे होणे" !!!!
बनवाबनवी मधलं - धनंजय माने आहेत का :))
मुक्ता मधलं - पंढरीच्या वारीच दृश्य
लै भारी ( हो आम्ही आवडीने बघतो दादाचा सिनेमा ;) ) मधलं माऊली गाणं कितीदाही बघताना ' मुखदर्शन व्हावे आता' ऐकताना डोळे भरून येतातच !

PS- I Love You मधलं ती दोघे पहिल्यांदा भेटतात ते दृश्य
ते मेट्रो हायजॅक करतात तो danzl वॉशिंग्टन चा सिनेमा कोणता ? त्यात तो त्या अपहरण करणाऱ्याला पैसे द्यायला जातोय असं बायकोला फोनवर सांगत असतो. ती म्हणते - ते काहीही कर पण घरी येताना दूध घेऊन ये. संपलं आहे !
यात त्यांची बॉडी लँग्वेज आवाज डोळे माय गॉड !!!!!

अजून येऊन लिहिते..

>>>ते मेट्रो हायजॅक करतात तो danzl वॉशिंग्टन चा सिनेमा कोणता ?

Taking of Pelham 123.

हा आणि Thank you for Smoking हे दोन सिनेमे फक्त आणि फक्त "कम्युनिकेशन आणि बॉडी लँग्वेज" साठी बघावेत आणि आत्मसात करावेत.

पद्मावति's picture

13 May 2017 - 2:48 pm | पद्मावति

वरील सगळे प्रतिसाद वाचतेय, आवडताहेत.

शीर्षक आणि लेखिका वाचून दचकले ना

=))

धुमधडाका - अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर सगळे अचाट सुटलेत!
बनवाबनवी - (ए, शुंतनू, तो टुकलू येईल ना!)
अंदाज अपना अपना - अमीर , सलमान, शक्ती कपूर, परेश रावल, विजू खोटे, करिश्मा आणि रविना (की रविना आणि करिश्मा?) - राजकुमार संतोषीचा पिच्चर आहे हे ऋणनिर्देश वाचूनही खरे वाटत नाही.
जो जीता वही सिकंदर!!!!!
दिल चाहता है..
Expendables : 1 &2:आपल्याला आवडतो ब्वॉ!
Terminator 2.
The Mask

माम्लेदारचा पन्खा's picture

14 May 2017 - 9:30 pm | माम्लेदारचा पन्खा

किती आठवणी . . . . .

विनिता००२'s picture

15 May 2017 - 5:15 pm | विनिता००२

सिनेमा मध्ये गब्बर सिंगचे खरे नाव काय ? >>> शोले पाहिला तेव्हा सिनेमा म्हणजे काय हे समजायचे ही वय नव्हते.
गब्बरसिंगला घरातले अमजद खान का म्हणतात हेच कळत नव्हते.
मेलेला जय परत जिवंत कसा??? या अश्चर्याने झोप उडालेली.

नंतर सिनेमा म्हणजे काय ते कळत गेले.

मी-सौरभ's picture

16 May 2017 - 4:40 pm | मी-सौरभ

चित्रपटः दिल चाहता है
गाणं: तनहाई
आवडणारा भागः बासरीचा एक पीस आहे गाण्याच्या मधोमध तो

चित्रपटः कोहिनूर
गाणं: मधुबन मे राधिका नाचे रे
आवडणारा भागः त्यात एक तबल्याचा पीस आहे आणि सोबत रफीजी ते ताल म्हणत आहेत