मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देशाचा अपमान

संदीप डांगे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती. "इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक. . . "बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले. "तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?) "असंच, मला माहिती आहे." थोरली पाती. "अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?" "गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो." . . वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच. आम्हालाही नवीन पिढी कोणत्या जगात वावरते हे कळते. . . "आधी मला सांग देश म्हणजे काय?" मी. उगाचच शहाणपणा. "अम्म्म... भारत." "भारत म्हणजे काय?" "अम्म... देश" "भारतदेश म्हणजे काय?" "अम्म्म्म्म्म्म्म्म........ नाशिक" "बरं." जास्त ताणण्यात अर्थ नव्हता. देश काय हे समजण्याचं वय नाहीये हो. चला पुडं. "अपमान म्हणजे काय?" ह्यात तरी त्याला नक्की काय समजलं हे समजायला हवं. "अम्म्म्म.. त्रास!" "हां... ठिक आहे." . . . "बरं, मग केव्हा म्हटलं पाहिजे जन-गण-मन तू सांग?" अस्मादिक. "ताई सांगतील तेव्हा. शाळेत." "..............." . . . खरं तर माझ्याकडे तन्मयला सांगायला खूप काही आहे. पण मी गप्प आहे. . . देशभक्ती, देश, मान-अपमान, राष्ट्रगीत, काय कुठे केव्हा कसे म्हणायचे, कोणाचे ऐकायचे, नाही ऐकायचे, स्वातंत्र्य म्हणजे काय, अधिकार, कर्तव्ये, इत्यादी इत्यादी. खूप बोजा आहे हो देशाचा नागरिक असण्याचा! एवढ्या लवकर कुठे? . . सध्या मनाच्या आभाळात सृजनाची पाखरे भीरभीरतात. इवल्याशा खांद्यांवर कोवळ्या स्वप्नांचा भार पुरेसा आहे.

वाचन 7693 प्रतिक्रिया 0