टेकडीच्या मंद उतारावरुन त्याची पावले वेगात खाली उतरु लागली. चंद्र एव्हाना माथ्यावर आलेला होता. त्याची सावली देखील त्याच्या पायात घुटमळत घुटमळत वेगाने खाली उतरत होती. खुरट्या गवतातून टोकदार दगड पायाला जोरदार काचत होते. बोचरा वारा अंगावर शहारे आणीत होता. पण तिकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता त्याला. इथून वेगात दूर कुठेतरी निघून जायचं. बस्स!
अचानक वरुन रंगनाथच्या हाका त्याला ऐकू येऊ लागल्या. त्याने मागे वळून पाहिले. चंद्राच्या दुधाळ प्रकाशात रंगनाथची काळी बाह्याकृती टेकडीवर उभे राहून आपल्याकडे येण्यास जोरजोरात खुणावत असलेली त्याला दिसली.
‘काय करावं आता? हा का बोलावत असेल? मला पकडून सैनिकांच्या ताब्यात तर देणार नाही ना?’
न जावे तरी चुकीचे. मग तर विनाकारण अपराधी असल्याचा संशय वाढेल. काही क्षण तो तिथेच विचारमग्न उभा राहिला. एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की रंगनाथ देखील घाईघाईने खाली उतरत येत आहे. वयाच्या मानाने बराच तरातरा चालत होता रंगनाथ. त्याला त्याही परिस्थितीत थोडं हसू आलं.
बघता बघता रंगनाथ पुढ्यात ठाकला देखील.
“अरे! इतका काय रागावतोस? एकदम उठून चालताच झालास ते?”
“मग काय करू? तुम्हाला मी जर कुणी खुनी दरवडेखोर वाटत असेन तर तिथे थांबून उगाच तुमच्या भीतीमध्ये भर कशाला घालू?”
“अरे बाबा! गैरसमज कुणाचाही होऊ शकतो. कशाला इतकं मनावर घेतोयंस? चल माघारी. तुझ्या नावचे जेवण पण बनवलेय बायकोने. जेवण करुन मग सकाळीच निघ पाहिजे तर. एवढ्या थंडीचे निघू नकोस. जवळ आता कुठली वस्ती देखील नाही.”
“पण इतक्या लगेच तुम्हाला मी निर्दोष कसा काय वाटू लागलो?”
“तू गेल्यावर मी विचार केला की हे कदाचित संकेतात्मक पण असू शकतं! पण ते काय संकेत देतंय हे माझ्या अद्याप तरी लक्षात येत नाहीये.”
एवढं बोलून रंगनाथ शांत बसला. एव्हाना सगळं कसं एकदम स्तब्ध झालं होतं. थंडगार वारा तेवढा हलके हलके वाहत होता.
‘काय करावं? याच्यावर विश्वास ठेवावा काय? करुन करुन काय करेल? सैनिकांच्या ताब्यात देईल फार तर ! आपण जर काही केलंच नाहीये तर कोण काय वाईट करु शकेल?’
तो एकही शब्द न बोलता वरच्या दिशेने चालू लागला. रंगनाथला देखील आता बरं वाटलं आणि तो त्याच्या मागे मागे चालू लागला. थोड्याच वेळात दोघे खोपटापाशी पोहोचले. रंगनाथची पत्नी दरवाजातच वाट पहात होती. त्या दोघांना येताना बघून ती आत वळली. दरवाजापाशी तिने गरम पाण्याचं भांडं हातपाय धुण्यासाठी ठेवलं होतं.
“हात पाय धुऊन घे. आता जेवायलाच बसू या थेट.” रंगनाथ त्याला म्हणाला.
त्या थंड हवेत त्या कोमट पाण्याने हातपाय धुवायला फार छान वाटत होतं. मुद्दाम हातातील तांब्या गरम पाण्याच्या भांड्यात खळ्ळ खळ्ळ करीत तो थोडा वेळ तो उबदार स्पर्श अनुभवत राहिला. तेवढ्यात आतून रंगनाथच्या हाका सुरु झाल्या…
“अरे ये की लवकर. ताटं केली आहेत.”
मग अनिच्छेनेच तो आत वळला. खोलीत थोडासा धूर पसरलेला होता. त्याने चुलीकडे पाहिले तो रंगनाथची पत्नी निखा-यांवर भाक-या गरम करीत होती. त्याच्याकडे पाहून ती हसली. “या बसा. लगेच गरमागरम जेवण वाढते.”
देवघराजवळच्या कोप-यात रंगनाथ बसलेला होता. याला त्याच्या शेजारीच दरवाजाच्या बाजूला बसायला रंगनाथच्या पत्नीने गोणपाटाचा तुकडा टाकला आणि थंडीला मनसोक्त शिव्या घालत दरवाजा बंद केला. आत एक मजेशीर वातावरण निर्माण झालं. एकदम घराची आठवण करुन देणारं. वातावरणातील प्रचंड थंडी आणि चुलीचा उबारा यांचं जोरदार युद्ध चालू झालेलं शरीरास जाणवू लागलं. म्हातारीने दोघांच्या समोर पत्रावळ्या मांडल्या. त्यात तिने चुलीवरची खरपूस कडकडीत भाजलेली ज्वारीची भाकरी आणि डाळ वाढली. ताटापाशी प्यायला पाण्याचे भांडे भरून ठेवून मग ती चुलीच्या शेजारी एखाद्या म्हाता-या मांजरीसारखी बसून राहिली.
“तुम्हाला ही विद्या कुणी शिकवली?” त्याने रंगनाथला प्रश्न विचारला.
“नाही. कुणीच नाही. मला तरी अद्याप कुणी गुरु मिळालेला नाही. आणि तशी काही गरज पण वाटत नाही. या विद्या मी केवळ एक उत्सुकता म्हणून जुन्या ग्रंथांवरून शिकलोय. या विद्या काही फारशा चांगल्या मानल्या जात नाहीत. पण केवळ एखाद्या अडल्या-नडल्यास मदत करण्यापुरते म्हणून वापर करतो. बाकी माझी खरी उपासना वेगळीच आहे.”
“मघाशी कुठल्या देवतेचे आवाहन केले होते तुम्ही?”
“तो एक यक्षदेवता आहे. तो फार तामसी असून त्याच्याकडून घेतलेल्या मदतीची फार मोठी किंमत द्यावी लागते मला प्रत्येक वेळीस.”
“काय देता तुम्ही?”
“जाऊ देत! तुला काय करायचे आहे? बाकी यापुढे काय करायचे ठरवले आहेस तू?”
“ठरवलं तर काहीच नाही. जसं होईल तसं होईल. आपण आपला प्रवास चालू ठेवायचा.”
“हं.. बरोबरंय…”
जेवणं उरकून दोघांनी हात धुतले. म्हातारीने आवराआवर चालू केली. खरकट्या पत्रावळ्या बाहेर टाकण्यासाठी त्याने बळेच म्हातारीकडून मागून घेतल्या. बाहेरून तो परत येऊपर्यंत रंगनाथने अंथरुणं देखील टाकली होती.
“कशाला इतके कष्ट घेता माझ्यासाठी?”
“अरे कष्ट कसले त्यात? तू काही रोज रोज येणारा थोडाच आहेस? परत कधी येशील की नाही हे पण खात्रीने सांगता येत नाही.”
यावर मात्र ते दोघे मोकळेपणे हसले.
“असो. चल झोप आता.”
एव्हांना म्हातारीची झाकपाक सर्व झालेली होती. तिच्या अंथरुणावर पडण्यापूर्वी म्हातारीने दिवे मालवले आणि ते खोपट अंधारात बुडून गेलं.
*****
सकाळी त्याला अगदी उशिराच जाग आली. सूर्यनारायण बराच वरती आलेला होता. स्वच्छ ताज्या हवेने आणि उत्साही प्रकाशाने ते घर भरुन गेलेलं होतं. म्हातारीने सकाळची चूल पेटवली सुद्धा होती आणि आता अंगावरचं पांघरुण काढलं तरी थंडी फारशी जाणवत नव्हती. स्वच्छ अंघोळ केलेला रंगनाथ देवघरापाशी काहीतरी अस्पष्ट मंत्रपाठ करीत पूजा करीत होता. सूर्याच्या उबदार किरणांनी तापलेल्या सुक्या गवताचा मजेशीर वास सर्व हवेत पसरलेला होता. क्वचित कुठून तरी लांबून गाईंबैलांच्या हंबरण्याचा अस्पष्टसा आवाज येत होता.
एवढ्यात रंगनाथची पत्नी कळशा घेऊन बाहेर जाताना त्याला दिसली. पाणी आणायला जात असावी! त्याला थोडंसं खजिल वाटलं. आपण काहीतरी मदत करायला हवी त्यांना.
“द्या माझ्याकडे. मी आणतो. कुठे जायचं तेवढं फक्त सांगा.”
“अरे तू कशाला? बस तू निवांत. मी आणते जाते. मला काय हे रोजचंच काम आहे.”
“अहो, तुम्ही द्या तर कळशा इकडे. कुठे जायचं तेवढं फक्त सांगा.” त्याने जवळजवळ ओढूनच घेतल्या कळशा.
म्हातारीला थोडं हसू आलं. दोघेही आता बाहेर आले. म्हातारीने उगवतीकडे बोट दाखवलं.
“हे बघ ही पिंपरण. तिच्या डाव्या बाजूने खाली उतरायला सुरुवात कर. टेकडी उतरुन तसाच पुढे त्याच पायवाटेने चालत रहा. एक शे-दोनशे पावलांवरच मोठी विहीर दिसेल. खाली उतरायला पाय-या नाहीत. मातीचाच घसरटा उतार आहे. तेव्हां जपून जा.”
“अहो तुम्ही काळजी करु नका. मी पण खेड्यातच राहिलेला माणूस आहे. हे सगळं मला काही नवीन नाही.”
***
म्हातारीने दाखवल्याप्रमाणे तो चालत निघाला. थोडी गार आणि थोडी उबदार अशी छान हवा पडलेली होती. रानात सगळीकडे एकदम शुकशुकाट होता. वाळक्या गवतावर चालताना होईल तो त्याच्या पावलांचाच काय तो आवाज. एव्हाना पानगळती सुरु झाली होती. झाडांखाली पानांचे थरच्या थर साचलेले होते. पहाटेचं दव आणि परवा दिवशीचा पाऊस, यामुळे भिजून थोडे जड झालेले.
थोड्याच वेळात विहीर दिसू लागली. काठावरती खणून काढलेल्या दगड मातीचे ढीगच्या ढीग पडलेले होते. काठावर उभं राहून त्याने आत वाकून पाहिलं. आत काळंशार दिसणारं पाणी अगदी स्तब्ध…
भिंतींना लागूनच एक कच्चा मातीचा गोल रस्ता खालपर्यंत गेलेला. त्याच्यावर सावधपणे उतरत तो खाली जाऊ लागला. इथे बरंच घसरटं होतं. म्हातारी बरोबर सांगत होती तर! अगदी खाली, पाण्याची पातळी जिथे होती तिथे थोडी जास्तीची मोकळी जागा खणून काढलेली होती. तिथेच त्याने दोन्ही कळशा ठेवल्या.
त्यातील एक मोठी कळशी त्याने पहिली उचलली आणि पाण्यात बुडवली.
डुब्ब.. डुब्ब.. डुब्ब..
कळशी अधाशासारखे पाणी पिऊ लागली.
तो आवाज वाढतच गेला. डुब्ब.. डुब्ब.. डुब्ब…
अचानक त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. मन शून्य शून्य होत कुठल्या तरी अथांग पोकळीत जाऊन आदळलं. आणि एका झटक्यासरशी तो त्या काळ्याशार थंडगार पाण्यात कोसळला…
(क्रमशः)
प्रतिक्रिया
24 Aug 2016 - 7:08 pm | क्षमस्व
जबरा लिहिलंय।
दण्डवत घ्या।।।
24 Aug 2016 - 7:53 pm | लालगरूड
पुलेशु
24 Aug 2016 - 8:05 pm | अमितदादा
आवडली...पुभाप्र
24 Aug 2016 - 8:08 pm | रुस्तम
__/\__
24 Aug 2016 - 8:29 pm | एक एकटा एकटाच
मस्तच
लवकर लवकर लिहित जा हो........
24 Aug 2016 - 9:14 pm | पद्मावति
खुपच सुरेख लिहिता हो तुम्ही. अक्षरश: डोळ्यासमोर सर्व घडतंय असे वाटतं. पु.भा.प्र.
25 Aug 2016 - 8:18 am | शित्रेउमेश
हा ही भाग मस्त, पन खूप लहान होता....
तुम्हि लवकर-लवकर लिहित जा...
पुढे काय होणार?? खूप उत्सुकता लागलिये...
25 Aug 2016 - 12:31 pm | प्रभास
धन्यवाद सर्व वाचक व प्रतिसादक...
25 Aug 2016 - 1:40 pm | सिरुसेरि
प्रवाही लेखन . तामसी अघोरी तांत्रिक रंगनाथ त्याच्या डावात यशस्वी होईल का ?
25 Aug 2016 - 4:11 pm | vikrammadhav
खूपच छान लिहिताय !!!! _/\_
25 Aug 2016 - 6:47 pm | बाबा योगिराज
लिहित राहा.
आम्ही वाट बघत आहोत.
बाबा योगीराज.
25 Aug 2016 - 8:36 pm | शिवोऽहम्
बर्याच दिवसांनी वाचायला बसलो आणि अवधूतचे सगळे भाग वाचून काढले. कथा छान रंगते आहे, असेच लिहीत रहा!
26 Aug 2016 - 9:35 pm | प्रभास
सिरुसेरी, विक्रम, बाबा, व शिवोऽहम् धन्यवाद...
26 Aug 2016 - 4:27 pm | अभिरुप
तेवढं डोंगरावरच्या देवाचंबी मनावर घ्या की...
26 Aug 2016 - 9:35 pm | प्रभास
होय... लिहितोय... धन्यवाद!
26 Aug 2016 - 4:53 pm | पैसा
छान लिहिताय. भीती वाटण्यासारखं काही आहे का पुढे?
26 Aug 2016 - 9:34 pm | प्रभास
नाही... :)
देवाच्या शोधात निघाल्यावर भय कसलं? तो काळजी घेतोच की!!!
26 Aug 2016 - 9:59 pm | शाम भागवत
अहाहा. काय सुंदर वाक्य आहे. खूप मस्त वाटलं.
27 Aug 2016 - 8:03 am | क्षमस्व
+1
26 Aug 2016 - 10:57 pm | चाणक्य
रंगतीये कथा. ओघवतं लिखाण एकदम.
27 Aug 2016 - 5:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
हा भागही आवडला.
आता नवे नाव घेण्या आधी सगळी गोष्ट लिहून काढा.
पैजारबुवा,
28 Aug 2016 - 1:31 am | असंका
=))
खरंय...
28 Aug 2016 - 6:30 am | प्रभास
=))
होय माऊली व हिशेबनीस साहेब...
28 Aug 2016 - 9:59 am | जव्हेरगंज
उत्सुकता वाढली आहे!
पुभाप्र !
28 Aug 2016 - 10:36 am | रातराणी
अतिशय सुंदर!! पुभाप्र!