मर्डर इज अनाउन्सड!!
शsssssssss खून झाला आहे! "A Murder is announced" मर्डर मिस्टरीज वाचणार्यांसाठी परिचित असे हे वाक्य आणि कादंबरी देखील. या कादंबरीची लेखिका आहे Queen of crime म्हणून नावाजलेली अॅगाथा क्रिस्ती. १५ सप्टेंबर १८९० साली Agatha Mary Clarissa Miller चा जन्म अमेरिकन वडील आणि ब्रिटिश आईच्या पोटी Torquay इंग्लंड येथे झाला. वडील तिला घरीच शिकवायचे, तरी आईचे मत मात्र अॅगाथाने ८व्या वर्षापर्यंत काहीच शिकू नये असे होते. त्यामुळे कंटाळलेली अॅगाथा पाच वर्षांची होईपर्यंत स्वतःच्या प्रयत्नाने वाचायला शिकली. अॅगाथा लहान वयातच नृत्याबरोबर कविता लिहू लागली. अॅगाथा अकरा वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. या घटनेनंतर अॅगाथा आपल्या आईच्या अधिक जवळ आली. त्यानंतर ती पियानोवादन आणि गायनही शिकली. कालांतराने अठराव्या वर्षी ती छोट्या कथा लिहू लागली ज्या पुढे १९३० साली एकत्रितरीत्या प्रकाशित झाल्या. काही वर्षांनंतर अॅगाथा तिच्या आईबरोबर तीन महिन्यांसाठी कैरो येथे गेली. तिथे तिला उत्खनन स्थळांपेक्षा संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये मध्ये अधिक रुची वाटली!!
१९१४ साली आर्ची क्रिस्ती बरोबर तिने प्रेम विवाह केला. मात्र लग्नानंतर आर्ची महायुद्धात लढायला गेला. त्यानंतर काही वर्षांनंतर मात्र तो पुन्हा लंडन येथे परतला. याच दरम्यान आपल्या बहिणी बरोबर लावलेल्या पैजेखातर अॅगाथाने हेरकथा लेखन प्रारंभ केले.
आणि Hercule Poirot चा जन्म झाला...
१९१९ हे साल हे अॅगाथा आणि आर्चीसाठी संस्मरणीय ठरले. तिची पहिली कादंबरी 'The Mysterious Affair at Styles' ही प्रकाशित झाली तसेच त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. शिवाय प्रकाशक कंपनी कडून अजून पाच कादंबर्यासाठी प्रस्ताव आला. त्या काळी पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सर्वत्र बेल्जियन शरणार्थी दिसत होते. अॅगाथाला वाटले की एक माजी बेल्जियन पोलिस अधिकारी चांगला डिटेक्टिव्ह होऊ शकतो. उंचीने कमी असलेला पण ऐटबाज मिशा ठेवलेला आणि कडक शिस्तीचा असा हाच तो Hercule Poirot जो अॅगाथाच्या पहिल्या कादंबरी मधून पहिल्यांदा वाचकांसमोर आला.
आत्मस्तुती करण्यात अगदी वाकबगार असा Poirot, The Mystery of the Blue Train कादंबरीत म्हणतो, "My name is Hercule Poirot, and I am probably the greatest detective in the world." Hercule Poirot इतका प्रसिद्ध झाला की अॅगाथाने त्याला केंद्रस्थानी ठेवून आणखी ३३ कादंबर्या आणि ५४ लहान गोष्टी लिहिल्या. त्यात Murder On The Orient Express आणि Death On Nile यांचा समावेश आहे. मात्र Hercule Poirot च्या स्वभावाचा स्वतः अॅगाथाला इतका कंटाळा आला की तिने Poirot केंद्रस्थानी असलेली शेवटची कादंबरी १९४०च्या दशकात लिहून तिजोरीत बंद करून ठेवली होती. अखेर १९७४ साली ती प्रकाशित झाली. ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर Poirot या एकमेव काल्पनिक व्यक्तिरेखेवर न्यूयॉर्क टाइम्स मध्ये श्रद्धांजली छापली गेली ;-). Hercule Poirot ची व्यक्तिरेखा अनेक कलाकारांनी पडद्यावर साकार केली. सर्वात दीर्घकाळ David Suchet या कलाकाराने साकारली. त्याने ही व्यक्तिरेखा १९८९ ते २०१३ या काळात साकार केली. Hercule Poirot च्या जन्माला २०१६ साली १०० वर्ष पूर्ण झाली कारण The Mysterious Affair at Styles ही कादंबरी १९१६ सालीच लिहून पूर्णं झाली होती.
Hercule Poirotच्या भुमिकेत अभिनेता David Suchet
पहिल्या कादंबरीच्या यशानंतर तिने आणखी काही कादंबर्या लिहिल्या. त्यात मिस मार्पलची यशस्वी निर्मिती देखील सामील आहे. Hercule Poirotच्या अगदी विरुद्ध अशी मिस मार्पलची शैली आणि व्यक्तिमत्व प्रथम १९२७ साली The Tuesday Night Club या छोट्या गोष्टीतून वाचकांसमोर आले. १९३० साली The Murder at the Vicarage ही मिस मार्पल असलेली कादंबरी वाचकांमध्ये लोकप्रिय झाली. मिस मार्पल ही एक छोट्या गावामध्ये राहिलेली सजग आणि उत्तम गुप्तहेर. अॅगाथा म्हणते की मिस मार्पलच्या व्यक्तिरेखेवर तीच्या आजीचा खूप प्रभाव होता. मिस मार्पलची व्यक्तिरेखा अनेक कलाकारांनी पडद्यावर साकार केली. त्यात Joan Hickson हिने ही व्यक्तिरेखा १९८४ ते १९९२ पर्यंत सादर केली.
मिस मार्पलच्या भूमिकेत Joan Hickson.
अॅगाथाच्या आईच्या मृत्यूनंतर ती व आर्ची यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि एक अनाकलनीय घटना घडली. मुलीला दाई जवळ सोपवून अॅगाथा गाडी चालवत कुठेशी गेली. कुठे जात आहे हे काही कोणाला तिने सांगितले नव्हते. तिची गाडी दुसर्या दिवशी काही मैलांवर सोडून दिलेली आढळली. देशभर तिचा शोध सुरू झाला. काय झाले कसे झाले असेल या बाबत वृत्तपत्रांत आणि लोकांमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. झाले असे होते की ती निघून किंग्ज क्रॉस स्टेशनवर पोचली होती. तिथून पुढे ती ट्रेनने Harrogate येथे गेली. तिथल्या 'Harrogate हॉटेल आणि स्पा' मध्ये Theresa Neale या नावाने रूम बुक केली. हॉटेलच्या कर्मचार्यानी तिला ओळखले आणि पोलिसांना कळवले. आर्ची जेव्हा तिला ओळखायला आला तेव्हा तिने त्याला तर ओळखले नाहीच आणि तिला स्वतः बद्दलही काही आठवत नव्हते. अॅगाथाने या घटनेचा पुन्हा कधीच उल्लेख केला नाही. तीला अॅम्नेशिया झाला होता त्यावर तिने मानसोपचार घेतले व त्यातून बरी झाली व आपले लेखन पुढे चालू ठेवले.
Grand Hotel या स्पॅनिश मालिकेत तरुण अॅगाथाची पाहुणी व्यक्तिरेखा दाखवली होती. मालिकेतील इतर व्यक्तिरेखा पाहून तिला कादंबर्यांसाठी कल्पना सुचल्याचे दाखवले आहे. The Mousetrap हेही असेच एक रहस्यमय नाटक अॅगाथाने लिहिले. दीर्घकाळ चाललेले हे नाटक १९५२ साली प्रथम मंचावर आले. या नाटकाचा पंचवीस हजारावा प्रयोग १८ डिसेंबर २०१२ रोजी पार पडला. हे नाटक सुरुवातीला अॅगाथा लिखित 'Three Blind Mice' नावाने सुरुवातीला रेडिओवर प्रक्षेपित होत होते.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 'बेस्ट सेलिंग नॉव्हेलिस्ट ऑफ ऑल टाइम' म्हणून अॅगाथाचे नाव नोंदवले गेले आहे. अॅगाथा क्रिस्तीचे लेखन थोडेथोडके नव्हे तर सुमारे १०० भाषांमध्ये भाषांतरित केले गेले आहे. सर्वाधिक संख्येने अनुवाद झालेल्या पुस्तकांच्या लेखकांमध्ये तिचे नाव आघाडीवर आहे. And Then There Were None ही अॅगाथाची कादंबरी सर्वाधिक खप झालेली आहे. या कादंबरीच्या आजवर १० कोटीहून अधिक प्रती खपल्या आहेत, जो एक विक्रम समजला जातो. तिच्या साहित्यिक योगदाना बद्दल तिला १९७१ साली Dame Commander हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. विशेष असे की अॅगाथाचा दुसरा पती Max Mallowan याला पुरातत्त्व क्षेत्रातील कामगिरीसाठी १९६८ साली Sir किताबाने सन्मानित करण्यात आले होते Sir आणि Dame Commander हा सन्मान फार थोड्या दांपत्यांना मिळाला आहे.
अॅगाथाची शैलीही अशी की एकदा कादंबरी वाचायला सुरुवात केली की शेवटपर्यंत ठेववत नाही. तिने लिहिलेल्या कादंबर्यांमधे शेवटी गुन्हेगार म्हणून सिद्ध होणार्यांमध्ये कधी पोलिस, स्वतः निवेदक, कधी मृत व्यक्ती किंवा अगदी कुणीतरी अनोळखी व्यक्तिरेखा असे असू शकते. बर्याच कादंबर्यामध्ये शेवटी गुप्तहेर सर्व संशयितांना एकत्र करून आपले शोधकार्य कसे झाले याचे वर्णन करतो आणि गुन्हेगाराचे नाव जाहीर करतो. काही वेळा गुन्हेगाराचे नाव सांगून त्या व्यक्तीलाच गुन्हा कसा घडला याचे स्पष्टीकरण सांगायला लावतो. अॅगाथाच्या काही कादंबर्यांची नाव बालगीतांवर आधारीत आहेत जसे की 'And Then There Were None', 'One, Two, Buckle My Shoe', 'Five Little Pigs', 'Crooked House', 'A Pocket Full of Rye', 'Hickory Dickory Dock', 'Three Blind Mice' इत्यादी.
संपन्न आणि परिपूर्ण आयुष्य जगल्यावर अॅगाथा क्रिस्तीचा मृत्यू १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. तिच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतरही अॅगाथा तिच्या साहित्यिक योगदानाबद्दल वाचकांच्या स्मरणात आहे आणि पुढेही राहिल.
माहितीचे स्रोत - अॅगाथा क्रिस्तीचे विकी पेज आणि संकेतस्थळ.
प्रतिक्रिया
5 May 2016 - 9:19 am | जुइ
अरे वा, ही माहिती पहिल्यांदाच मिळाली.
केवळ एक दुरुस्ती - आपके हसीन रुख पे हे गीत बहारें फिर भी आयेंगी या चित्रपटातील आहे.
5 May 2016 - 11:46 am | बोका-ए-आझम
मेरे हमदम मेरे दोस्त मधला एका ट्रेनमध्ये खून होताना दुस-या समांतर आणि विरूद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधल्या माणसाने बघणे हे आगाथा ख्रिस्तीच्या ' ४.५० From Paddington ' या कादंबरीतून घेतलेलं आहे. आणि हे गीतही ' बहारे फिर भी आयेंगी ' मधलं आहे, ज्याला ओ.पी. नय्यर यांचं संगीत आहे. मेरे हमदम मेरे दोस्त ला लक्ष्मी - प्यारेंचं संगीत आहे.
4 May 2016 - 9:37 am | श्रीरंग_जोशी
अॅगाथा क्रिस्ती या अजरामर लेखिकेच्या कारकिर्दीचा थोडक्यात लिहिलेला आढावा आवडला.
Hercule Poirot वरची टिव्ही मालिका काही वेळा पाहिली आहे. हा लेख वाचून अॅगाथा क्रिस्तीची पुस्तके वाचण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
5 May 2016 - 11:46 am | सुधीर कांदळकर
तूनळीवर जाऊन पाहिले तर खरेच ते गाणे या सिनेमात नाही. माझ्या स्मृतीत बरीच सरमिसळ झालेली दिसते. आता मला आठवणींवर विसंबून चालणार नाही. धक्काच बसला. दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
5 May 2016 - 3:46 pm | एस
Poirot या फ्रेंच नावाचा उच्चार काहीसा प्वॉरो (र नंतर उच्चार लांबलेला) असा करतात.
11 May 2016 - 5:04 pm | पिशी अबोली
अगाथा ख्रिस्ती काहीशी कंटाळवाणी वाटते. पण लेख उत्तम जमून आलाय. लेख वाचायला मजा आली. :)