मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| बिर्याणीस्तोत्रम् ||

बॅटमॅन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नमस्कार लोकहो, मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो: || बिर्याणीस्तोत्रम् || अथ ध्यानम्| ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्| स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1|| एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः | तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2|| कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि | अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3|| जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः| सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4|| अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: | शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5|| बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते | विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6|| उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: | तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7|| तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः| सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8|| नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् | यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9|| द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४] चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10|| ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते | खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11|| अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि | स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12|| असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति | पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13|| ||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्|| टीपा: [१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी. [२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी) [३] लखनौ. [४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी. =====================================================

मराठी भाषांतर

आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1|| तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2|| कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3|| ( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4|| त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5|| बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6|| मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7|| (तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8|| हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9|| द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10|| याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11|| जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12|| जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13|| ===============================================

वाचन 22771 प्रतिक्रिया 0