प्रिय ‘तू’ ला,
आज म्हटलं चल एक पत्र लिहू तुला. कस वाटतंय पाहू. तशी मी फार obessed आहे प्रेमपत्र वैगरे बद्दल. पूर्वीच्या कथा, कादंबऱ्या, कोणाचे अनुभव, किंवा चित्रपटामधूनसुद्धा असे उल्लेख आले कि शहारून येत. कोणी कोणासाठी गुलाबी कागद वैगरे घेऊन, इतकं छान छान विशेषणे वापरून लिहित असेल तर ते आयुष्यभरासाठी कोणीही जपून ठेवेलच ना. (ते मग कोणाला सापडलं कि वाजलेच बारा.. अस काहीतरी सांगून माझा रोमांटिक मूड प्लीज खराब करू नकोस. मी प्रेमपत्र लिहायच्या सॉल्लीड मूड मध्ये आहे) तू मला हे असलं कधीही काहीही दिलेलं नाहीस याचा प्रचंड राग तर आहेच. पण आता मी लिहितेय ना, तर शांतपणे वाचायचं. (आणि जपूनही ठेवायचं, मी म्हातारी झाल्यावर विचारेनच). तर प्रेमपत्र लिहायचेच हे नक्की झाल्यावर प्रश्न येतो गुलाबी कागदाचा. हो आणि तो हवाच. ठीकाय त्याच नंतर बघेन मी. (गुलाबी कागदावर प्रिंट कुठे काढून मिळेल?) आता पुढचा मुद्दा. काय लिहू? म्हणजे हा बऱ्यापैकी महत्वाचा मुद्दा आहे. खरच काय लिहू? दिवसभर लिहित तर असते तुलाच. म्हणजे पत्र नाही. पण whatsapp असतच ना रे. काय वाटलं कि लिहील आणि केलं send. किती सोप्प. पण मग वाटल म्हणून लिहील love you किंवा miss you अस इतक्यांदा झालंय कि आता पत्रात काय वेगळ लिहू? गुगल बाबा कि जय. थांब आलेच जरा टिप्स घेवून. पण काय इथे फक्त साचे दिलेयत. ते काय करू? पत्र मी लिहतेय, त्यात माझ्या भावना हव्यात. आणि तुला वाचताना माझी आठवण आली पाहिजे. तीही रोमांटिक पद्धतीने, नाहीतर हे काय लिहिलंय, ROFL म्हणून हसत राहशील. आणि मला माहितेय या पत्राचा रिप्लाय (पत्र लिहून पूर्ण झालं आणि तुला मिळालं तर.) तू मला whatsapp वरच देणार आहेस. तोही प्रत्येक अक्षरावर खर्च कराव लागणार असल्याप्रमाणे चिंगूस. आवडलं, एवढचं. (तुला मी लिहिलेलं सगळचं आवडत? कि मी लिहिलंय म्हणून आवडत? काहीही असो. पण तू अस म्हटल्यावर चांगल वाटत एवढ खर. आणि तेवढच पुरेस असत आपल्या दोघांना.) तू पण लिही ना मला या पत्राच उत्तर. मग मी अजून एक लिहेन, मग तू. आणि मग खूप पत्र जमतील आपल्याकडे. आठवणींचा खजिना. म्हातारे झाल्यावर आठवायला. किती गमतीशीर आहे हि कल्पना. पण मला हव्या आहेत लिखित स्वरूपातल्या आठवणी (फक्त चॉकलेट्सचे कागद किती दिवस जमवू?). पूर्वीच्या पिढीच किती बर होत, पत्राशिवाय काही पर्यायच नव्हता भावना सुरक्षितपणे दुसऱ्यापर्यंत पोहचवायचा. म्हणजे तोंडावर प्रपोज करण्याची डेअरिंग केली तर कानाखाली तारे काढणार समोरची मुलगी, आणि हि भीती असूनही प्रपोज करायचं ते मुलानेच. आणि आता किती बदललय सगळ. भावना तुझ्यापर्यंत पोहचवायचा निर्णय माझा आणि तरीही त्या भावना सुरक्षितपणे पोहचवताना (संभाव्य कानाखाली तारे प्रकरणाचा धोका असल्याने) मी घेतलेला शॉर्ट मेसेज सर्वीसचा आधार. तुझ्या होकारानंतर तो SMS जपण्यासाठी केलेली धडपड, त्यासाठी चक्क दोन वर्ष न बदललेला मोबाईल, आणि तरीही तो बिघडला तेव्हा SMS कायमस्वरूपी नष्ट झाल्याने आलेला हताशपणा, मग मी रडून घातलेला धुमाकूळ आणि सावरणारा तू. कसली बावळट आहे मी (ए.. आठवत का तुला मी काय काय बावळट लिहील होत त्या SMS मध्ये ते? आठवत असेल तर प्लीज तुझ्या पत्रात येऊ दे ते. )
आता मुद्द्याचं, मी तुला पत्र का लिहितेय? असच. कारण लिहावसं वाटतय. खूप दिवस भांडलो नाही ना आपण? कसलं मस्त वाटतंय. सगळ पूर्वीसारखं. म्हणजे अगदी जेव्हा आपण नुकतंच प्रेमात पडलो होतो. कसले धमाल दिवस होते. पूर्ण धुंदीचे. फक्त कॉलेज आणि प्रेम. एका कॉलेजात नव्हतो म्हणून काय झालं? रोज भेटत नसलो म्हणून काय झालं? जेव्हा भेटायचो तेव्हा फार छान वाटायचं. आणि भेटून घरी गेल्यावर पुन्हा कधी भेटायचं त्याच कॅल्क्युलेशन सुरु. मधल्या उरलेल्या दिवसांत फोन आणि sms होतेच. तुझ्यापासून disconnected कधी वाटलच नाही मला. कधीही काहीही बोलावस वाटल कि तुला कॉल. मग अर्धा तासाची निश्चिंती. रोजचा संध्याकाळचा ठरलेला कॉल टायमिंग,रात्रीचा मेसेज टायमिंग. रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पा, विषय नसताना उगाच मेसेजेस वर खेळलेल्या गाण्याच्या भेंड्या सगळच झकास. पण त्याचबरोबर दोघांच्याही परीक्षा किंवा सबमिशन्स असताना एकमेकांना डिस्टर्ब न करता अभ्यास करण आणि तरीही आपल्या बरोबर अजून कोणीतरी जागून अभ्यास करतंय हि छान फीलींग. किंवा कधी तू फक्त माझ्यासाठी जागा असायचास मी झोपेपर्यंत, उगाच. आणि मी झोपतेय असा मेसेज केल्यावरच good night म्हणून झोपायचास. मग आपल्यासाठी अजून कोणीतरी उगाच जाग आहे अस खूप स्पेशल वाटणारं काहीतरी मनाला गुदगुदल्या करून जायचं. (खरच का असायचास तू जागा? मी तुझ्यासाठी नसते करू शकले कदाचित एवढ.)
पुढच्या वर्षी कॉलेजच्या वेळा बदलल्या तसं संध्याकाळी भेटण अवघड होऊ लागलं. मग आपण चक्क सकाळी ६.३० ला अंधेरी स्टेशनला भेटायचो म्हणजे वेडेपणाची हद्द होती ती. पण कॉलेज न बुडवता भेटण फक्त तेव्हाच पॉसिबल होत यावर तू नेहमीच ठाम होतास. नाहीतर मी कधी कॉलेजला गेलेच नसते बहुधा. वर्षाच्या शेवटीही मला नाही येत ८०८५ ची programming अस म्हणत मी आता पासच नाही होणार वैगरे बोलायला सुरवात केली होती तेव्हा तू मला भेटण्याच्या वेळांमध्ये बाकी गप्पा बंद करून programmingचे धडे द्यायला सुरवात केलीस, ते हि इतकं सुंदर कि मी त्या विषयात highest येऊ शकले? तुला एक गम्मत सांगू का? आज मी इतरांना शिकवते ना हेच सगळ तेव्हा फक्त तू आठवत असतोस, तुझी सगळीच वाक्य, रिअल लाइफ एक्झाम्पल्स सगळच आठवत राहत आणि बऱ्याचदा तू दिलेलीच उदाहरण देते मी विद्यार्थ्यांना सुद्धा.
टीन एज रीलेशन जास्त काळ टिकत नाही अस ऐकलंय. जे बऱ्याचदा शारीरीक आकर्षणातून निर्माण होत असत. आपल अस कधीच नव्हत नाही का? पहिल्या दिवसापासून आपण एकमेकांकडे आयुष्याचा जोडीदार म्हणून पाहत होतो. प्रिसाईजली म्हणायचं झालं तर हे नात जपायला तू खूप मेहनत घेतलीस. नाहीतर माझं काय ? नात कधी टिकवाव लागत किंवा जाणीवपूर्वक जपाव लागत हेच मुळी मला कधी पटल नाही. तू माझा आहेस आणि घेशील मला सांभाळून हे खोल कुठेतरी माहित होत. आणि तू ते केलंसही. पण इतकं केअरफ्री राहताना तुला काय वाटत असेल किंवा मी तुला किती सांभाळून घ्याव याचा कधी विचारच नाही करावासा वाटला. मनात येईल तेव्हा शुल्लक गोष्टींवरून भांडत राहिले आणि तरीही भांडणाच्या शेवटी तू मला समजून घ्यावस हा माझा अधिकार असल्यासारखं जगत राहिले. खरच कसं सांभाळलस माझ्यातल्या छोट्या उनाड मुलीला? जॉब वैगरे आयुष्याच्या रहाटगाडग्यात अडकून गेल्यावरही आणि अगदी माझ्यापासून लांबच्या शहरात गेल्यावरही (आधी अगदी हाकेच्या अंतरावर राहायचास) मला शनिवारी भेटायला यायचं प्रॉमिस कायम पाळलस (जेव्हा नाही जमल तुला, तेव्हा तेव्हा मी भांडण केलीच आहेत तर ते settaled down)
आणि मग सगळ्यात वाईट होत ते गेलं वर्ष. कित्ती कित्ती भांडलेय मी गेल्या वर्षात? पण हा या वेळी भांडणाचे विषय बऱ्याचदा खूप गंभीर होते. आपण लग्नाच्या निर्णयापर्यंत आलो होतो आणि विचारांचा गुंता इथेच झाला होता. म्हणजे लग्न कराव कि करू नये हा प्रोब्लेमच नव्हता पण अचानक थोडी भीती वाटू लागली. अर्थातच ही भीती होती इतक्या जवळ येऊन तू कधी दुरावणार तर नाही ना याची. ही भीती होती इतका हवाहवासा वाटणारा तू पुढे जाऊन बदलणार तर नाही ना याची. ही भीती होती आपल्या नात्यामध्ये बाकीच्या नात्यांमुळे फरक तर नाही पडणार ना याची. आणि ही भीती होती लग्नामुळे निर्माण होणाऱ्या नवीन आणि अनोळखी नात्यांमुळे मीच माझ्यातून आणि तुझ्यापासून हरवणार नाही ना याचीही. पण यातलं काहीच बोलता न आल्याने आलेला ताण. नेमकं काय बोलू हे न कळल्याने गोंधळून जाऊन प्रत्यक्ष बोलले गेलेले आणि तुला बोचलेले शब्द. त्यातून झालेले निरर्थक वाद या सगळ्यातून माझी भीती खरी ठरत गेली आणि तुझ्यापासून आणखी दूर जात असल्याची जाणीव मात्र बळावत गेली उगाच. त्यातून होणारी चिडचिड, आतापर्यंत तुला सगळ सांगायची सवय असल्याने आणि यातलं काहीच सांगू न शकल्याने झालेली घुसमट सगळचं एका दु:स्वप्नासारखं वाटत राहिलं. पण या पूर्ण वर्षात हे नात इथे संपवावं अस बऱ्याचदा प्रकर्षाने वाटूनही सुदैवाने तसं काही झालं नाही. या सगळ्यातही कायम माझ्या बाजूने विचार करत होतास तू. मी अचानक का भांडतेय आणि तुझ नेमकं काय चुकतय याचा विचार करत स्वत:ला दोष देत राहिलास तू. कसला भारी आहेस तू. म्हणूनच आवडतोस. इतक्या सहज नाही सोडणार तुला. तू मला हवा आहेस कायमच. असाच माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला. आणि तू असशीलच हा अति फाजील आत्मविश्वास आहेच माझ्याकडे.
तू तसा कायमच असतोस रे मला समजून घेत, मला समजावत, कसलीच अपेक्षा न करता. आणि मला हि तसाच आवडतोस. पण कधी कधी वाटत कि का करतोस तू? किंबहुना का करावस? ज्या हक्काने मी पाहते तुझ्याकडे, जसं डिमांड्स करते तसं तू का नाही करत? तुझ्या डिमांड्स नसतातच का? कि मला वाईट वाटेल म्हणून फक्त तू तुझ्या अपेक्षा कधी व्यक्तच नाही करत? पण खर सांगू का? त्यामुळे मग वाईट वाटत कधी कधी. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नसल्याची जाणीव होते. किंवा मग तुझ्या अपेक्षा कधी माझ्यापर्यंत पोहचतच नसतील अशी वाटत राहत. आता अस जे वाटतय ते तुला स्पष्टपणे सांगण्यातही माझ्याच अपेक्षा आहेत अस वाटेल तुला कदाचित. पण जाणवत राहत कि तु माझ्याकडे पूर्ण व्यक्त होत नाहीस किंवा मी तुला समजून घेण्यात कमी पडते. पण जे काही असेल तरी तू बेस्टच आहेस. मी तुला तू असं का तसं का अस हजारो वेळा विचारूनही मला मी आहे तशी स्वीकारणारा तू फक्त माझा बेस्टी आहेस. जिवलग वैगरे म्हणतात ना अगदी तसा. प्रेमपत्र म्हणता म्हणता तक्रारपत्र नाही ना झालं?
बर आता डिमांड करतेच आहे तर अजून एक शेवटच (hope you don’t mind ); आपलं नात खूप जुन आणि परिपक्व वैगरे असलं ना तरी अति practical होण आणि गंभीरपणे विचार करण थोडं कमी करूया का आपण? बाकीच्या कपल्सकडे पाहून अस वाटत कि अस वागून आपण नात्यामधली एन्जॉयमेंटच संपवतो आहोत. आपल्या नात्याचा नवेपणा संपलाय का रे? सगळ रुटीन सेट होत चाललय का रे? लग्नाच्या नात्यात बांधले जाताना आपलं गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असण संपून जाईल का? तस झालेलं नाही आवडणार ना मला. स्वप्नात जगू नये अस म्हणतोस तू पण तरीही स्वप्नात जगायचं नसलं तरी स्वप्न पाहायला कायमच आवडेल मला तुझ्यासोबत.
.आता या नवीन वर्षात आपण पुन्हा पूर्वीसारखे झालोय अस मला वाटतंय. होपफूली याच वर्षी लग्नही करतोय. (हो ना?). soo लग्नाआधीच्या तुझ्या शेवटच्या वाढदिवशी तुला आणि मला खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड पापा
कायम तुझीच असणारी,
मी
प्रतिक्रिया
25 Jan 2016 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगलं चालु आहे, चालु दे. शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
25 Jan 2016 - 1:06 pm | यशोधरा
दुसर्यांची प्रेमपत्रं वाचायची सवय बरी नव्हे!
25 Jan 2016 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठीक आहे. आता त्याचं उत्तर आलं तरी नै वाचणार.
चुभता तो बहुत कुछ मुझको भी है
तीर की तरह.....!
मगर ख़ामोश रहेता हूँ अपनी तक़दीर
की तरह.....!
-दिलीप बिरुटे
25 Jan 2016 - 1:36 pm | यशोधरा
तुम्ही तर उत्तर लिहायच्या स्पर्धेत वगैरे भाग घेतलाय म्हणे! चालूद्यात हो चालूद्यात! =))
25 Jan 2016 - 11:25 am | आनन्दा
बापरे.. एव्हढं पत्र वाचायचं म्हणजे तो गारच होणार. फारच पेशंट आहे हो तो. नक्कीच सुखाने संसार करणार तुम्ही.
25 Jan 2016 - 11:31 am | पैसा
रोमँटिक!
25 Jan 2016 - 11:35 am | नाखु
किमान चार पाच भागात टाकले असते तरी (ज्यास्त) चालले असते किंवा लाटकरकाकांच्या धाग्यावर पुरवणी उत्तर म्हणून टाकून डांगे सरांना थेट टक्कर (दीर्घ) प्रतिसादाची देता आली असती.
वाचकांची पत्रे वाला नाखु
25 Jan 2016 - 11:38 am | असंका
कंप्लीटली +१
वाचायची अतीव इच्छा असूनही पत्राची लांबी बघून हताश झालोय...
25 Jan 2016 - 12:02 pm | हेमंत लाटकर
लाटकरकाकांच्या धाग्यावर.
नाखु, तुमचा खुळखुळा आजकाल जास्तच वाजतोय.
25 Jan 2016 - 12:29 pm | नाखु
आम्ही तुम्च्या या विषयासंबधीत धाग्याची जाहीरात करतोय आणि तुम्ही आमचा राग राग करताय . असे नका करू हो!!
लाटकरकाकांचा घाबरलेला पुतण्या (बालक) नाखु
25 Jan 2016 - 11:36 am | संदीप डांगे
उत्तर देऊ का पत्राला....?
बाकी, ते 'लग्नाआधीचा शेवटचा वाढदिवस' जरा विचित्र नै वाटत आहे का?
असो. शुभेच्छा!
25 Jan 2016 - 12:01 pm | पैसा
परवा जानुबाळाच्या शिरेलमधे डॉक्टर म्हणाली "ट्रॉली आणा, मी जाते पुढच्या तयारीला." मी घाबरले. ही आता "चला उचला" म्हणतेय का काय! =)) तसंच वाटलं. =))
उत्तर लिही की इथेच नाहीतर दुसरा धागा काढून!
25 Jan 2016 - 11:42 am | लाडू.
धन्यवाद.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे : उत्तर आलं कि पोस्टेन इथे नक्की. आणि ते फार छोटसं असेल :)
आनंदा: :)
नाद खुळा : :D
संदीप डांगे : लिहा की उत्तर. खर उत्तर यायला महिने लागतील. काही लिहिण म्हणजे कपाळाला आट्या पडतात इकडे :)
25 Jan 2016 - 11:51 am | उगा काहितरीच
वाचलं ! प्रेमपत्र अन् तेही पब्लिक फोरम वर! अन् तेही मिसळपाववर! किती लोक "प्रेरणा" घेतात ते पाहू .
25 Jan 2016 - 11:54 am | अजया
मिपाला प्रेमपत्र लिहिता येईल बर्याच लोकांना! घरकी मुर्गी/मुर्गाला कोण लिहिणारे ;)
25 Jan 2016 - 11:57 am | संदीप डांगे
या पत्राला मिसळपाववरचे दिग्गज सदस्य आपल्या पद्धतीने कसे उत्तर देतील अशी कल्पना डॉक्यात आली आहे. ह्या पत्राला उत्तर देण्याची स्पर्धा घ्यायची काय...?
25 Jan 2016 - 12:08 pm | लाडू.
छान आहे कल्पना
25 Jan 2016 - 12:11 pm | लाडू.
मी पण आहे सहभागी :)
25 Jan 2016 - 12:36 pm | उगा काहितरीच
+१ चला फोडा नारळ . मी येतोच गुलाल घेऊन .
25 Jan 2016 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाव घ्या माझं स्पर्धेत.
-दिलीप बिरुटे
25 Jan 2016 - 2:00 pm | संदीप डांगे
बघता काय.. सामिल व्हा!
आप जहांसे उत्तर लिखेंगे वहांसे स्पर्धा शुरु होती है....
25 Jan 2016 - 9:54 pm | स्रुजा
मी पण , मी पण !
लाडु ताई, तुमच्या ह्यांना केवढं मोठं पत्र लिहिलंय तुम्ही. मी एक पॅरेग्राफ लिहिला खफ वर तरी हा त्याला "निबंध" म्हणतो ! वरती आनंद रावांशी सहमत, एवढा पेशन्स असेल तर तुम्ही काय लॉटरी मिळवलीये, वाह ;)
25 Jan 2016 - 12:16 pm | पद्मावति
किती गोड लिहिलंय. मस्तं.
25 Jan 2016 - 12:21 pm | क्रेझी
मस्त आहे हे पत्र :)
एकटाकि लिहिलंय असं वाटलं.
जर खरंच असं तुमचं नातं आहे आणि जोडिदार असा आहे तर भाग्यवान आहात :) :)
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा :)
25 Jan 2016 - 12:25 pm | लाडू.
खूप खूप धन्यवाद क्रेझी
25 Jan 2016 - 12:36 pm | नीलमोहर
खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड पापा..
- हे वाचून पत्र नक्की कोणाला लिहीलंय त्याबाबत जरा कंफ्यूजन झालं. असो.
वरून खालपर्यंत फक्त स्क्रोल करत आले, बाकी असं लिहू (आणि ते वाचू) शकणार्या लोकांचं खूप कौतुक वाटतं.
मिपावर एक शब्द आहे यासाठी, काय ते आपलं...
25 Jan 2016 - 12:46 pm | लाडू.
बॉयफ्रेंड ला पापा देण्यात कनफ्युजन काय आहे? hugs and kisses चालू शकत तर मराठी प्रेमपत्रात पापा का नाही?
मिपावर एक शब्द आहे यासाठी, काय ते आपलं...
मिपावरील शब्द अजून सरावाचे नाही झालेत. त्यामुळे पूर्ण लिहिलत तर बर होईल
25 Jan 2016 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोड गोड पापा म्हणजे लहान बाळाचा पापा घेत आहोत असे वाटले.
एक भारीतला किस हं तुला असं काही तरी पाहिजे होतं. ;)
-दिलीप बिरुटे
25 Jan 2016 - 1:58 pm | आनन्दा
अहो त्यांचे नाव लाडू आहे, त्या गोडच असणार.. भारी वगैरे हवे असेल तर मिसळ पाहिजे. ती पण रामनाथ ची.
26 Jan 2016 - 12:29 am | अन्नू
भाग्यवान आहे हो तुमचा 'तो'.. - (म्हणजे बॉयफ्रेंड) इतकं प्रेमाने आणि इतकं मोठं प्रेमपत्र लिहिणारी भेटलीय.
नाहीतर आंम्ही! च्यायला कधी wt?.. nt... Gd.. by च्या पुढे या पोरींची गाडी गेली तर शप्पथ!!
26 Jan 2016 - 6:10 pm | भंकस बाबा
आमची पूर्वश्र्मीची प्रेयसि, आताची बायको,
"सातच्या आत घरी नाही गेली तर बाबा बदड़तील"
शेवटी पोरगी पळालीच , आमच्याबरोबर.
26 Jan 2016 - 6:28 am | कंजूस
पत्र वाचून आनंद झाला.लगेच ब्लॅाग बघितला - मुक्तांगण.सुरुवात आवडली आणि ऐलम्मा पैलम्मातलं शेवटचं वाक्य"कदाचित त्यात माझ्या प्रश्नांची उत्तर सापडतील मला माझा खेळ मांडण्याआधी.."
लेखनकौशल्य भारी.किती सहज मांडलंय!
इतकं चांगलं लेखन वाट्सपच्या माध्यमाच्या आवाक्याबाहेरचं आहे.एकमेकांनी एकदुसय्रांनी ब्लॅाग 'फालो'केले तर?
26 Jan 2016 - 10:26 am | मुक्त विहारि
पत्र आवडले...
26 Jan 2016 - 10:26 am | मुक्त विहारि
पत्र आवडले...
26 Jan 2016 - 10:55 am | एस
आज पत्र वाचलं. उत्स्फूर्त आणि मनापासून लिहिलंय. एक प्रेयसी म्हणून तुम्हांला वाटत असलेला उत्साह, काळजी, शंका, ठाम विश्वास, आशावाद इत्यादी सर्वच छान पद्धतीनं शब्दरूप घेऊन उतरलंय. प्रेम करू शकणार्यांचं मला नेहमीच फार कौतुक वाटत आलंय. प्रेम करणं आणि प्रेम केलं जाणं हे फक्त थोड्या भाग्यवंतांच्याबाबतीत होत असतं. अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
रच्याकने, महाविद्यालयीन जीवनात आम्ही होलसेल रेटने प्रेमपत्रे लिहून देत असू त्याची आठवण झाली. कित्येक प्रेमवीरांचा प्रेम-आवेश आम्ही लिहून दिलेल्या व केवळ नावे बदललेल्या प्रेमपत्रांच्या जिवावर बराच काळ टिकत असे. त्यातली काही तर चक्क यशस्वी प्रकरणेही झाली. आणि ही प्रेमपत्रे कोण लिहून देतं याची कल्पना असूनदेखील त्या पोरीही ती गोड मानून घ्यायच्या. एकूणच प्रेमप्रकरणे, समुपदेशन, जोडाजोडी आणि मिटवामिटवी करणे हा आम्हां दोघातिघांचा अवांतर उद्योग होता. आमच्यातली एक पुढे काउन्सेलर म्हणून नावारुपास आली त्याची बीजे यातच होती ;-)
ता. क. आता मात्र प्रेमपत्रे लिहून मिळणार नाहीत याची होतकरू तरुणांनी आणि वृद्धांनी नोंद घ्यावी. ;-) हाहाहा!
26 Jan 2016 - 11:15 am | पैसा
मला एक कन्फेशन द्यायचं आहे. यत्ता बारावीत असताना (मी वय वर्षे १६. घरात त्रास द्यायची म्हणून लवकर शाळेत अडकवून टाकले होते.:( ) एका मैत्रिणीला प्रेमपत्र आले होते. ते आम्ही सगळ्याजणी शाळेच्या लायब्ररीत पुस्तके आणि वह्या एक्सचेंज करत असताना तिच्या वहीतून माझ्या हातात आले. अकौंटंसीच्या वहीत मराठीत काय लिहिलंय म्हणून मी अकल्पित ते पत्र मोठ्याने वाचले. "माझ्या शोन्या" अशी सुरुवात होती एवढेच आठवते. त्या मैत्रिणीचा चेहरा अक्षरशः लालेलाल झाला होता आणि बाकी सगळ्याजणी जमिनीवर पडून हसत होत्या. लायब्ररियनने येऊन सगळ्यांना बाहेर हाकलले. नंतर बाकी हलकट मैत्रिणींकडून ते पत्र आणि माझे पत्रवाचन याची भयानक चेष्टा झाली होती. :( सुदैवाने ती फारच छान मैत्रीण आहे त्यामुळे तिने मला माफ केले. यथावकाश तिने कॉलेजच्या पहिल्या वर्ष पुरे होताच त्या मुलाबरोबर यशस्वी लग्नही केले. आता ती सुखात आहे. पण आता समजतंय. तेव्हा माझ्या जाहीर पत्रवाचनामुळे हा प्रकार तिच्या घरी कळला असता तर बारावीत असताना हे धंदे? म्हणत तिला मार पडला असता नक्कीच!
26 Jan 2016 - 12:17 pm | प्रदीप
यथावकाश तिने कॉलेजच्या पहिल्या वर्ष पुरे होताच त्या मुलाबरोबर यशस्वी लग्नही केले. आता ती सुखात आहे. म्हणजे खरेच सोने झाले तिचे!
26 Jan 2016 - 4:33 pm | पैसा
तिला पत्र लिहिणारा तिचा भावी नवरा चांगला नोकरी असणारा मुलगा. त्यामुळे बाकी काही प्रश्न नव्हते. तिचं शिक्षण मात्र अर्धंच झालं. तो चांगला माणूस म्हणून सगळं चांगलं झालं. पण त्या अडनिड्या वयात खूप मुली चुकीच्या मुलांच्या जाळ्यातही सापडतात.
26 Jan 2016 - 10:32 pm | एस
अगदी सहमत आहे!
26 Jan 2016 - 6:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चाफेकळीला पण? =))
26 Jan 2016 - 8:53 pm | स्रुजा
हाच्च प्रश्न मनात आला होता ;)
26 Jan 2016 - 10:36 pm | एस
तो वेगळाच किस्सा आहे! पण इथे नाही. खफवर लिहीन.
26 Jan 2016 - 10:54 pm | स्रुजा
हाहाहा, वाट पाहिंग ;)
26 Jan 2016 - 1:27 pm | असंका
शीर्षक अगदी समर्प़क ..मनातलं थोडं!!
सुरेख!
धन्यवाद!
26 Jan 2016 - 4:24 pm | मनीषा
बाप रे ! लई मोठ्ठय ...
थोडं थोडं वाचीन .
26 Jan 2016 - 6:23 pm | भंकस बाबा
माझ्या होण्यार्या बायकुला म्हणजे तेव्हाच्या प्रेयसिला मी पत्र पाठवले होते. पोस्ताने नव्हे तर हाताने तिच्याकडे दिले. त्यावेळी माझ्या हापिसात कामाला होती ती, सगळ्यासमोर कसे देणार म्हणुन माझा एक लेख आला होता छापुन एका मासिकात, अजहरुद्दीन वरचा, त्या मासिकात घालून दिले. वर सांगितले पण माझा लेख आला आहे मासिकात तो वाच.
रात्रि अकरा वाजता आमच्या ड्रीमगर्लचा फोन!
"अय्या अजहरने खरोख़रच मैच फिक्सिंग केलि होती?"
26 Jan 2016 - 6:41 pm | आदूबाळ
लौल!
26 Jan 2016 - 7:11 pm | अजया
=)))
26 Jan 2016 - 11:15 pm | एस
खि: खि खि: खि:
भारी किस्सा आहे! :-)
27 Jan 2016 - 8:58 am | नाखु
तुम्ही सेट केलेल्या मॅच पेक्षा अझरूद्दीन्च्या फिक्सींग (मॅच) बद्दल काळजी !!!!
26 Jan 2016 - 8:53 pm | स्रुजा
हाहाहाहा
26 Jan 2016 - 8:57 pm | पैसा
लै भारी!
26 Jan 2016 - 7:07 pm | नूतन सावंत
अशीच अमुची पत्रे असती सुंदर ओघवती,
आम्हीही अमर प्रेमी झालो असतो
26 Jan 2016 - 9:04 pm | स्रुजा
ऑन अ सीरियस नोट, आज तुमचं पत्र नीट वाचलं मी. छान च लिहिलंय अनेक गोष्टी आमच्या वेळच्या आठवल्या :)
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असण संपून जाण्यात पण एक मजा असते. तुम्हाला ती लवकरच कळेल :) मुरत गेलेलं नातं अधिकधिक सुखाचं होत जातं असा स्वानुभव आहे.
26 Jan 2016 - 9:51 pm | संदीप डांगे
सहमत. आपलंच ओळखीचं माणुस नव्या नात्याने भेटतांनाची गंमत काही वेगळीच असते. नात्यांमधे जागरूक राहिलं तर नवे बदल आपलेसे करतांना नाविन्य एन्जॉय करता येते आणि जुनं गमावल्याची बोचही राहत नाही.
26 Jan 2016 - 11:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वाचुन मनापासुन सांगतो जळजळ झाली. छान लिहिलयं :)!!!!
27 Jan 2016 - 12:02 am | संदीप डांगे
सर्वात प्रामाणिक प्रतिसाद!
आता उत्तर लिहा बघू, उत्तर वाचून तुम्हालाही कुणीतरी पत्र लिहिणारी भेटेन अशी आशा करूया.... ;-)
27 Jan 2016 - 9:01 am | नाखु
आधी जुने ( आणि अर्धवट) सोडलेले धागे पूर्ण कर आणि मग या पत्रप्रपंचात* अडकणे..
नाखुराव धापटे
पत्रप्रपंचात* हा शब्द एकसलग किंवा स्वतंत्र वाचला तरी हरकत नाही
27 Jan 2016 - 11:17 am | लाडू.
27 Jan 2016 - 11:48 am | यशोधरा
लाडूतै, हे एकदम भारी! एकदम सह्ही!
27 Jan 2016 - 12:26 pm | लाडू.
धन्यवाद
27 Jan 2016 - 12:47 pm | एस
Sorry for English. (Why GaMaBhaNa has stopped!!)
Imprint of handwritten letter lasts longer than printed one. :-)
27 Jan 2016 - 1:17 pm | लाडू.
Handwritten च द्यायचं होत. पण तेवढा वेळ नही मिळू शकला. शिवाय पत्र जर जास्तच मोठ झालाय. सो पत्राच्या शेवटी काही स्पेशल लाइन्स handwritten लिहिल्यात :)
27 Jan 2016 - 6:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या पाठौन दिल्यात तर धाग्यात अपडेटवुन देइन. अर्थात खाजगी नसतील तर =))
27 Jan 2016 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही लिहित राहा. हायगय करू नये.
-दिलीप बिरुटे