ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर...

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 1:12 am

ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे नंतर..

आठवडाभर सुरू असलेले ओलीसनाट्य संपुष्टात आले. इस्रायलने एका यशस्वी कमांडो ऑपरेशनची इतिहासात नोंद केली.

...यानंतरही बरेच काही घडले आहे. बर्‍याच गोष्टी मूळ लेखामध्ये घेतल्या होत्या मात्र एकंदर लेखाचा आकृतीबंध पाहता त्या गोष्टी / घटना वगळाव्या लागल्या. मात्र 'त्या गोष्टी घडल्या' हे ही वाचकांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक वाटत असल्याने हा वेगळा धागा काढत आहे.
या घटना अर्थातच मूळ लेखाशी संबंधित असल्या तरी येथे येताना विस्कळीतपणे येणे अपरिहार्य आहे.

**************************************************************

सर्व ओलीसांना आणि इस्रायली पथकांना सुखरूप घेवून चारही हिप्पो नैरोबीकडे उडाल्यानंतर बेनी पेलेद यांनी तेल अवीवला "अधिकृत घोषणा" करणारे संदेश पाठवले. हिप्पो एंटबेला पोहोचल्यापासून; ऑपरेशन सुरू झाल्यापासून गेले दीड तास अत्यंत तणावाखाली असणारे सर्व जनरल्स आणि मंत्री आनंदात एकमेकांना मिठ्या मारत होते, कोणतेही भाषण नव्हते, कोणत्याही घोषणा नव्हत्या. आपला हुद्दा, पद आणि वय विसरून एकमेकांचे अभिनंदन करत होते. संपूर्ण अपहरणनाट्यादरम्यान, ऑपरेशनदरम्यान आलेला ताण एकदम हवेत विरून गेला होता. आजचा दिवस; ही घटना इतिहासात कोरली जाणार आहे याची सर्वांना खात्री पटली होती. एका अधिकार्‍याने कुठूनतरी एक शँपेनची बाटली मिळवली व थोड्याच वेळात "टोस्ट" चे आवाज आणि पाठोपाठ हशा उसळू लागला. डॅन शॉमेरॉनच्या सैनीकांसाठी.. इस्रायाली सैन्यासाठी, ओलीसांसाठी आणि इदी अमीनसाठी सुद्धा..!!!
मध्यरात्रीच्या त्या अडनिड्या वेळी संरक्षणमंत्री सिमॉन पेरेस यांनी कर्नल बारलेव्ह यांना एका वेगळ्या ऑफीसमध्ये नेले व ते हसू आवरत कर्नल बारलेव्हना म्हणाले, "कर्नल, आपण आत्ता युगांडाला; इदी अमीनला फोन लावूया"

आठवडाभर कर्नल बारलेव्ह कोणत्याही वेळी फोन करत असल्याने त्यांचा फोन लगेचच इदी अमीनकडे जोडला गेला.

झोपेतून उठलेला आणि संतापलेला इदी अमीन फोनवर बोलू लागला.

इदी अमीन : बारलेव्ह, रात्रीचे २:०० वाजले आहेत. या वेळी मला का फोन केला आहेस?
कर्नल बारलेव्ह : तुमचे आभार मानण्याकरिता.
इदी अमीन : मी काही केले आहे का?
कर्नल बारलेव्ह :मला कल्पना नाही, पण सरकारदरबारी असलेल्या एका उच्चपदस्थ मित्राने मला तुमचे आभार मानण्याचा आदेश दिला म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे.
इदी अमीन : (गोंधळून) मला नक्की कळेल का की तुझ्याकडे काय आदेश आला आहे?
कर्नल बारलेव्ह :माझ्याकडे इतकाच आदेश आला की युगांडाचे राष्ट्रप्रमुख इदी अमीन यांचे सहकार्‍याबद्दल तत्काळ आभार मानले जावेत.
इदी अमीन : मी काही केले आहे का? या आदेशाचा अर्थ काय?
कर्नल बारलेव्ह : मला माहिती नाही.
इदी अमीन : ओके, बहुदा हे उद्या संपणार्‍या ओलेसांच्या हत्येच्या वेळेसंदर्भात असावे. मी हालचाल करून ती वेळ पुढे ढकलण्यात केलेया मदतीसाठी असावी.
कर्नल बारलेव्ह :ठीक आहे. (यदरम्यान दुसर्‍या फोनवरून हे संभाषण ऐकणारे सिमॉन पेरेस कर्नल बारलेव्ह यांच्या कानात कुजबुजले.. बारलेव्ह यांनी इदी अमीनला पुन्हा विचारले,) मी तुम्हाला आत्ता झोपेतून उठवले का?
इदी अमीन : मी काय सहकार्य केले आहे नक्की? मला या आदेशाचा अर्थ कळाला नाही.
कर्नल बारलेव्ह :ठीक आहे, मी तुम्हाला उद्या फोन करू का?
इदी अमीन : ठीक आहे. पण इस्रायली सरकारला अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य करायला सांग.
इतके बोलून आणि एकमेकांना "Good Night" करून हे संभाषण संपले.

आता मात्र संरक्षणमंत्री सिमॉन पेरेस आणि कर्नल बारलेव्ह खळखळून हसू लागले.
एंटबेवरील ऑपरेशनबद्दल इदी अमीनला बातमी कळवण्याचे धैर्य गोळा करण्यात युगांडन अधिकारी गुंतले आहेत हे दोघांच्याही लक्षात आले आणि पहिल्यांदा बातमी सांगणार्‍या अधिकार्‍याची अवस्था आणि बातमी ऐकून होणारा इदी अमीनचा चेहरा कसा असेल याची कल्पना करून दोघांनाही हसू आवरत नव्हते.

यानंतर थोड्या वेळात सकाळी ५:०० च्या दरम्यान इदी अमीनने कर्नल बारलेव्ह यांना फोन केला.

इदी अमीन : कर्नल.. तुम्ही असे का केले?? तुम्ही माझ्या सैनीकांना मारले??? मी इस्रायली लोकांची सगळी काळजी घेतली. त्यांना जेवण, राहणे, वैद्यकीय सोयी सुविधा असे सर्वकाही पुरवले.. तरीही तुम्ही असे केलेत?? तुम्ही माझ्या सैनीकांना का मारले??
कर्नल बारलेव्ह :कोणी मारले?? ओलीसांकडे बंदुका होत्या का?" त्यांना हत्यारे कशी मिळाली?
इदी अमीन : ओलीस नाही, विमाने आली व मझ्या सैनीकांना मारून ओलीसांना सोडवून घेवून गेली.
कर्नल बारलेव्ह :विमाने??? मला काहीच कल्पना नाही. मी आत्ता घरी आहे आणि मला काही माहिती नाही
इदी अमीन : दहशतवादी मारले गेले आहेत, ओलीस तुमच्याकडे सुखरूप आहेत आणि माझे सैनीक मात्र हकनाक बळी पडले आहेत.
कर्नल बारलेव्ह :तुमचे किती सैनीक या हल्ल्यामध्ये बळी पडले?
इदी अमीन : ... (कोणतेही उत्तर नाही)

यानंतर याच विषयावर थोडी चर्चा झाली. संभाषणाच्या शेवटी इदी अमीनने कर्नल बारलेव्ह यांना सांगीतले,

राजकारणी किंवा विरोधक म्हणून नाही तर एक सैनीक म्हणून मी एक गोष्ट मान्य करतो की तुम्ही पार पाडलेले ऑपरेशन हे अत्यंत धाडसी आणि अचूक होते. तुमचे कमांडोज हे जगातील सर्वोत्कृष्ट कमांडोज आहेत. पंतप्रधान राबीन यांना हे जरूर कळवा..!!

**************************************************************

परतीच्या प्रवासात नैरोबीला इंधन भरून झाल्यानंतर सर्व इस्रायली विमानांनी उड्डाण केले व इस्रायलकडे कूच केले. आता पुढचे महत्वाचे काम होते ते म्हणजे हा विमानांचा ताफा कोणत्याही संकटांशिवाय इस्रायलला परत नेणे. इथिओपीया ओलांडल्यानंतर विमाने लाल समुद्रावर आली व येथे इस्रायली हवाईदलाच्या फँटम लढाऊ विमानांच्या ताफ्याने यांचे स्वागत केले. "Welcome Home..!!!" फँटम ताफ्याचा प्रमुखाने हिप्पो आणि बोईंगचे स्वागत केले.
कांही तासांच्या प्रवासानंतर ही विमाने तेल अवीवला पोहोचली. तेल अवीवचे रस्ते नागरिकांनी फुलून गेले होते; इस्रायली सैनीकांचे असामान्य धैर्य आणि ओलीसांची सुटका प्रत्येक नागरिकाला अभिमानास्पद वाटत होती. गेले आठवडाभर जगभरातील प्रत्येक "ज्यू"ला वाटत होते.. दहशतवादासमोर गुडघे टेकायचे नाहीत, अपहरणकर्त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे.. आणि इस्रायली सरकारने; इस्रायली सैनीकांनी नेमके तेच केले होते. अगदी सर्वांना हवे होते तसेच उत्तर दिले होते.

हा जल्लोष पुढे अनेक दिवस सुरू राहिला.

एंटबेला इस्रायली नागरिकांच्या रक्षणासाठी प्राण गमावलेल्या योनी नेत्यान्याहूच्या स्मरणार्थ या ऑपरेशनचे नांव बदलून "ऑपरेशन जोनाथन" असे केले गेले.

**************************************************************

एंटबेवरील इस्रायली नागरिकांच्या सुटकेला पुढच्या वर्षी ४० वर्षे पुर्ण होतील. एका गोष्टीवर मात्र अजूनही वादविवाद सुरू आहेत. ती म्हणजे "योनीच्या मृत्यूला जबाबदार कोण??" योनीचे अंतीम विधी संपूर्ण लष्करी इतमामात पार पाडले गेले, या दरम्यान योनीच्या वडिलांनी मुकी बेत्सरला जुन्या टर्मिनल बिल्डींगवरील हल्ला, योनीची भूमीका आणि एकंदर ऑपरेशन याबाबत काही प्रश्न विचारले जे मुकी बेत्सरला अपमानास्पद वाटले. योनीच्या मृत्यूचीही लष्करी चौकशी झाली मात्र त्यातून फारसे वेगळे काही निष्पन्न झाले नाही. हा संपूर्ण वाद केवळ एकाच घटनेच्या भोवताली एकवटलेला आहे.. ती घटना म्हणजे "दोन युगांडन सैनीकांनी काळ्या मर्सिडीजच्या ताफ्याला युगांडन पद्धतीने सलामी देणे आणि योनीने आदेश देवून त्यांना ठार मारणे"
या सर्व प्रकारामध्ये ते दोन सैनीक मारले गेले; परंतु अतीमहत्वाचे "एलिमेंट ऑफ सरप्राईज" संपले. युगांडन सैनीक आणि दहशतवादी सावध झाले.
मुकी बेत्सरच्या मते योनीचा ऑपरेशन मधला समावेश खूप आधी झाला असला तरी सहभाग खूप उशीरा, फक्त शेवटचे दोन दिवसांपूर्वी झाला. (योनी लष्कराच्या दुसर्‍या एका महत्वाच्या कामामध्ये व्यस्त होता!) त्यामुळे योनीला अनेक गोष्टींबाबत माहिती नव्हती. तसेच मुकी बेत्सरने युगांडामध्ये बरेच महिने काम केले असल्याने सैनीकांच्या सलामी देण्याच्या पद्धतीबद्दल त्याला इत्यंभूत माहिती होते. त्यामुळेही त्याने सैनीकांना गोळी मारण्यच्या योनीच्या आदेशाला विरोध केला होता.

आपआपले मुद्दे पकडून आणि एकमेकांवर शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले चढवित हा वाद गेली ३९ वर्षे सुरू आहे.

मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टींबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही... त्या म्हणजे योनीचे असामान्य शौर्य आणि योनीच्या पथकामधील कमांडोंची अभेद्य एकजुट.

**************************************************************

.

जीन जॅक्वस मायमोनी, एंटबेवर मृत्यू पावलेला दोन ओलीसांपैकी एक! (तिसरा मृत; पास्को कोहनने नैरोबीला प्राण सोडले तर 'डोरा ब्लॉक' एंटबेलाच इस्पितळामध्ये राहिली व इदी अमीनच्या आदेशावरून तिला नंतर ठार मारले गेले.

ऑपरेशन थंडरबोल्टमध्ये सर्वच सैनीकांनी असामान्य शौर्य दाखवले व एक अशक्य कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
तेल अवीवला सर्व ओलीस पोहोचल्यानंतर तेथे अक्षरशः एखाद्या सणाचे वातावरण होते. सर्वांसाठी हा अतीव आनंदाचा क्षण होता, मात्र जीन जॅक्वस मायमोनी, इदा बार्चोविच आणि पास्को कोहन या तीन मृतांच्या कुटुंबियांसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण नव्हता. या ऑपरेशनमध्ये मरण पावलेल्या ओलीसांचे कुटुंबीय उद्ध्वस्त झाले होते.
कांही वर्षांनी ते या दु:खातून सावरलेही मात्र इस्रायल सरकारने दिलेल्या वागणुकीवर हे कुटुंबीय नक्कीच समाधानी नाहीत. इस्रायल सरकार दर वर्षी "ऑपरेशन जोनाथन" च्या आठवणी जागवण्यासाठी ४ जुलै हा दिवस साजरा करते. छोट्या-मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम होतात. योनीच्या आठवणींनी, अनेक शौर्यकथांनी पूर्ण देश भारून जातो मात्र या दिवशी होणार्‍या कार्यक्रमांना या तीन मृतांच्या कुटुंबियांना साधे निमंत्रणही नसते.. या दिवशी इस्रायलने इतिहासात नांव कोरले असले तरी त्या सोबत या चार लोकांनी प्राण गमावले ही घटना सरकारने सहज दुर्लक्षिली आहे.

ऑपरेशन जोनाथन, योनी नेत्यान्याहू आणि त्याच्याबाबतीतल्या खर्‍या खोट्या दंतकथा" या वलयांकित घटनांसोबत मृतांच्या कुटुंबियांचा उद्वेग व राग या गोष्टीही अस्तित्वात आहेत.

**************************************************************

अपहरणकर्त्यांनी बेनगाझीहून उड्डाण केले व बराच वेळ उड्डाण केल्यानंतर अखेरीस ते एंटबेला उतरले. इदी अमीनने सुरूवातीला दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देवून मध्यस्थाच्या भूमीकेमध्ये प्रवेश केला तर नंतर उघड उघड पाठिंबा दर्शवला.
विमान एंटबेला गेले हे कळाल्यानंतर एका व्यक्तीला या घटनेचे प्रचंड आश्चर्य वाटले. बेनगाझीला आजाराचा बहाणा करून स्वतःला सोडवून घेतलेल्या पॅट्रिशिया मार्केलने एके काळी इस्रायलच्या तेल-हमशोर इस्पितळामध्ये इदी अमीनची बराच काळ सेवा-सुश्रुषा केली होती. त्या काळची इंग्रजी बोलू शकणारी ती एकमेव नर्स होती.
बर्‍याच काळानंतर एका मुलाखतीमध्ये पॅट्रिशियाला विचारले गेले की "जर तु एंटबेला इदी अमीनसमोर ओलीस म्हणून गेली असतीस तर काय केले असतेस?"

पॅट्रिशियाने खट्याळपणे उत्तर दिले.. "कदाचित मी सरळ अमीनसमोर उभी राहून विचारले असते... माझी ओळख आहे का? आणि बहुदा पुढच्याच क्षणी अमीनने मला तलवारीने भोसकलेही असते"

**************************************************************
(समाप्त)
**************************************************************

इतिहासवाङ्मयसमाजजीवनमानराजकारणप्रकटनआस्वादमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

तिने सुश्रुषा केली तर अमीन ने का भोसकले असते ?

एक एकटा एकटाच's picture

16 Nov 2015 - 7:33 am | एक एकटा एकटाच

हा ही लेख
सुरेख

दोन्ही लेखांवर सविस्तर प्रतिसाद देणार आहे. सध्या घाईत असल्याने फक्त दोन्ही लेख अपेक्षेपेक्षाही कितीतरी पटीने आवडले एव्हढेच नमूद करतो. :-)

पैसा's picture

16 Nov 2015 - 4:47 pm | पैसा

हाही लेख आवडला!

दिवाकर कुलकर्णी's picture

17 Nov 2015 - 1:33 am | दिवाकर कुलकर्णी

छान !

रुपी's picture

6 Jan 2017 - 2:17 am | रुपी

छान.. हाही लेख आवडला.