सर्व प्रतिसादीत वाचकांचे आणी संपादक मंडळींचे आभार! लेखनाला सुरवात केली तेव्हा वाटलं होतं की फार काही मोठा किस्सा नाहीये. तेव्हा एकच किस्सा लिहून खतम करू म्हणून. पण मग लिहायला लागल्यावर कळतंय किती कठीण काम आहे ते. त्यामुळे जमेल तसे छोटे छोटे भाग टाकतोय.
बहिणीकडे जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आई बॅग भरत होती. दोघेच बसने जाणार म्हणून अगदी गरजेपुरते सामान एकच बॅग भरून घेऊन जायचं असं बाबांनी बजावून सांगितल्यामुळे आईचा थोडा गोंधळ उडाला होता. त्यातच कन्येने "मी पण आत्या कडे येणार" असा हट्ट धरला होता.
"अगं तुझी शाळा चुकेल ना? आणी आपण दोन दिवसांनी जाणारच आहोत पप्पांबरोबर" बायको तिला समजावून सांगत होती. पण तिचं काही ऐकण्याचं चिन्हं दिसत नव्हतं.
"ऐकत नसेल तर घेऊन जातो आमच्याबरोबर. चुकली तर चुकूदे शाळा. KG तर आहे" असं आईनं(तिची समजूत काढण्यासाठी) म्हंटल्यावर मग काय? कन्येनं घरभर पळापळी करत आपले पण कपडे गोळा करून त्याचा ढीग आजी कडे आणून दिला.
आईने कार्यक्रमात घालण्यासाठी म्हणून घेऊन जायला आपला गळ्यातला साज आणी पाटल्या कपाटातून काढून बेड वर ठेवल्या होत्या. कन्येची तिच्या अवती भवती लुडबुड चालू होती.
"आजी मी हे घालू?" असं म्हणत तिने साज हातात घेतला.
"अगं आण ते इकडे, आता नाही घालायचं. आपण आत्याकडे गेल्यावर घालू." असं म्हणत आईने तो घेऊन बाजूला ठेवला. तोपर्यंत हिने पाटल्या हातात घेतल्या. वैतागून आईने साज बॅगेत ठेवला आणी पाटल्या हातातच घालू म्हणून घालू लागली. पण त्या सहजासहजी हातात चढत नव्हत्या. थोडं साबणाचं पाणी लावावं म्हणजे लगेच चढतील असा विचार करत होती इतक्यात बाहेरुन बाबांनी हाक मारली.
आता काय करावं असं म्हणत आईने बेडवरची गादी कोपऱ्यातून वर उचलली. आणी हिच्या लक्षात येऊ नये म्हणून कोपरा थोडासा उसवला होता त्यातून पाटल्या गादीच्या आत खुपसल्या. गादी सरळ केली आणी "चल, आजोबा का बोलावतात बघू" असं म्हणत हिच्या हाताला धरून बाहेर घेऊन गेली.
आपलं लक्ष नसताना पुन्हा हिने खोलीत घुसून बॅग किंवा इतर सामान उचकटू नये म्हणून आई तिला घेऊन थोडा वेळ बाहेरच बसली. तोपर्यंत जेवायची वेळ झाली. जेवणं, मुलांना भरवणं, त्यानंतर स्वयंपाक घर आवरणं इत्यादी नित्यक्रमात बायको बरोबर गुंतल्यावर आणि मुलांना झोपवण्याच्या रोजच्या कामात पाटल्यांचा विषय आई विसरूनच गेली.
दुसर्या दिवशी सकाळी कन्या झोपेत होती तोवरच गडबडीने दोघे बाहेर पडले. ती उठली असती तर पुन्हा मी पण येणार म्हणून हटून बसली असती. (अर्थात उठल्यावर आजी आजोबा आपल्याला सोडून आत्या कडे गेले हे कळल्यावर कन्येने जो गोंधळ घातला, तो अपेक्षीत असल्यामुळे फार त्रास झाला नाही. बायकोने प्रकरण सांभाळून घेतले.)
बसमध्ये निम्म्या वाटेत असताना आईला पाटल्यांची आठवण आली. पण आता काय करणार? आहेत घरातच सुरक्षित ठिकाणी, तर असू देत. पण मग कार्यक्रमात काय घालू? नाहीतर लेकीकडे पोहोचल्यावर फोन करू, म्हणजे हे मागून येताना घेऊन येतील. असा विचार करून ती स्वस्थ बसली.
लेकीकडे पोहोचल्यावर लेकीबरोबर आणी इतर नातेवाइकांबरोबर इतकी गुंतली की हा विषय पुढे तिच्या डोक्यात राहिलाच नाही. आणी तश्याही तीच्या दृष्टीने पाटल्या सुरक्षित ठिकाणीच होत्या.
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Jul 2015 - 5:22 pm | पैसा
मिळाल्या का नाही शेवट?
25 Jul 2015 - 6:14 pm | उगा काहितरीच
डेली सोप लिहायला सुरूवात करा !
25 Jul 2015 - 6:40 pm | श्रीरंग_जोशी
पहिला भाग वाचून तुमच्या मातोश्री दागिने चोरांपासून सुरक्षित ठेवण्याची क्लृप्ती म्हणून गादी उसवून, त्यात ठेवून नंतर शिवून टाकत असतील असे वाटले. म्हणजे चोर आले तरी आलमारी फोडतील. गादीमध्ये दागिने ठेवलेले असू शकतात असा विचार त्यांच्या मनात येणार नाही असा त्यामागचा विचार असेल असे वाटले होते :-) .
पण हा भाग वाचून चित्र स्पष्ट झाले आहे. पुढल्या भागाची उत्सुकता आहे.
25 Jul 2015 - 7:22 pm | एस
छोटा भाग टाकल्याबद्दल णिशेद. पुभामोटा.
27 Jul 2015 - 7:17 pm | तिमा
त्यांना 'गादी' चालवायची आहे.
25 Jul 2015 - 7:32 pm | जुइ
चांगले लिहिले आहे. पुढे काय झाले असावे याची उत्सुकता आहे.
25 Jul 2015 - 10:13 pm | शि बि आय
पुढे काय झाले याची उत्सुकता आहे. पुढील भाग लवकर येऊ दया.
25 Jul 2015 - 10:13 pm | शि बि आय
पुढे काय झाले याची उत्सुकता आहे. पुढील भाग लवकर येऊ दया.
26 Jul 2015 - 12:28 am | राघवेंद्र
पुढील भाग लवकर येऊ दया. मस्त लिहीत आहात.
26 Jul 2015 - 6:41 am | योगी९००
वाचतोय..!!
पुढे काय झाले याची उत्सुकता आहे. पुढील भाग लवकर येऊ दया.मस्त लिहीत आहात....!!!
26 Jul 2015 - 1:05 pm | सुधांशुनूलकर
मिपावर स्वागत.
'गादी'चे दोन्ही भाग वाचले. आवडले.
छान लिहिताय.
27 Jul 2015 - 1:43 am | जयन्त बा शिम्पि
माझाही असाच एक किस्सा आहे.मी धुळे येथे रहात होतो. मोठ्या मुलाला मुंबईत अन्धेरी येथे नोकरी लागली होती. घराची कोठेही व्यवस्था नसल्याने , बायकोच्या भाच्याकडे म्हणजे ठाणे येथे त्याची , तात्पुरती रहायची व्यवस्था केली होती. त्यास घरी एक संगणक घेण्याची गरज निर्माण झाली. त्यावेळी जवळपास ५० ते ५५ हजार रुपयापर्यन्त संगणक विकत मिळत होता. त्यावेळच्या मानाने ( १९९६ मार्च ) एव्हढी रक्कम , रोख स्वरुपात घेवून जाणे , धोक्याचे वाटत होते. एसबीआय मध्ये जावून ट्रॅव्हेलर्स चे चेक घेण्याचा पर्याय काही मित्रांनी सुचविला, पण ठाणयासारख्या ठिकाणी, काही ओळख वगैरे नसतांना, ते चेक नाही वटले तर काय ? म्हणुन ती आयडीया कॅन्सल केली. त्याच वेळी मुलाला , घरून एक गादी सुद्धा नेवून द्यायची होती. मग ठरवीले ! गादीत पैसे न्यायचे ! बॅंकेतून कॅश घरी आणली. एका बेडशीट मध्ये व्यवस्थित गुंडाळली. बेडशीट आणि एक पातळशी उशी आतमध्ये ठेवून , गादीची घडी केली. साध्या दोरीने गादी चारी बाजुने व्यवस्थित बांधली. धुळे येथून , रेल्वेने निघालो. पैसे असलेली गादी सीटच्या खाली आरामात सरकवून दिली. ( पैसे ब्रीफकेसमध्ये ठेवले असते अगर ती पोटाशी धरली असती तर पुन्हा पुन्हा तिच्याकडेच डोळे भिरभिरत राहीले असते, त्यामुळे इतरांना शंका येण्यास वाव होता , असा विचार मनाशी पुन्हा पुन्हा येत होता म्हणुन हा मार्ग स्वीकारला होता. त्या मानाने गादीकडे कोण लक्ष देतो ? ) ठाण्याला रेल्वेतून , उतरल्यावर , सरळ रिक्षात गादी टाकली आणि घरी पोहोचलो. घरी मुलाने / शालकांनी विचारले , पैसे आणले काय ? मी म्हटले , अगोदर गादी तर पहा कि कशी छान झाली आहे , मग विचारा." त्यांनी गादी मोकळी केली आणि पैसे पाहून , " व्वा ! काय पण मस्त आयडीया सुचली तुम्हाला ! ' अशी दाद दिली.
27 Jul 2015 - 11:41 am | तिमा
पंचनाम्यावर सही करताना, 'नाना फडणवीस' अशी सही करणार्यातले दिसताय तुम्ही!