तीन साडेतीन वर्षांपूर्वीची एक प्रसन्न शनिवार सकाळ कोपेनहेगन ते स्टोकहोम फ्लाईट आणि मला शेवटून दुसर्या रांगेतली मधली सीट. डाव्या बाजूच्या खिडकीजवळ एक रागीट चेहेर्याचा मिशीवाला आणि उजवीकडे एक साठीतली मावशी ... गुड मोर्निंग वगैरे करून स्थानापन्न झालो..यथासमय विमान हलले आणि कुणीतरी मला हळूच टपलीत मारल्या सारखे वाटले .. भास असेल म्हणून दुर्लक्ष करून मी खिडकी बाहेर बघू लागलो .. विमान रनवे वर धावू लागले आणि पुन्हा एक हलकेच टपलीत .. ह्यावेळी केसही ओढल्यासारखे वाटले...पण मागे वळून बघणे शक्य नव्हते...विमान उडाले आणि मागे गुस्ताव असे कुणीसे दटावले पण त्याचा काही उपयोग व्हायच्या आत तिसरी टपलीत ...
मी कमरेचा बेल्ट सोडला आणि मागे वळून बघितले..एक देखणे जोडपे कमालीचे ओशाळून मला सॉरी सॉरी म्हणत होते आणि त्यंच्या मांडीवर एक ७-८ महिन्याचे गोरेपान बाळ ..आपले मिस्कील निळेशार डोळे माझ्यावर रोखून हात उगारून तयार...गुबगुबीत गाल ..लाल चुटूक ओठ ...सोनेरी केस...
मी त्याच्याकडे दोन्ही हात पसरताच मनसोक्त खिद्ळून त्याने उडी मारली..व तडक माझ्याकडे आला ...त्यच्या आईवडिलांना हे नवल वाटले ... “तो तसा कुणाकडे जात नही नुस्त लांबून खेळतो” इति बाळाचे पिताश्री पिताश्री...मी म्हटले ‘तुमची हरकत नसेल तर खेळतो मी थोडावेळ’ lukily they agreed…
मग काय माझ्या मांडीवर उड्या काय ..माझे केस काय ओढले..गाल काय चाटले..आणि अरे अरे म्हणेस्तोवर बाजूच्या मिशिवाल्याचा पेपर फर्रकन उडवला...ते बेण गुरुगुर्ले पण करतो काय..एव्हापर्यंत बाजूच्या मावशीने मासिक बंद करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली ... पण ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून हा बाबा त्याच्या अगम्य भाषेत मला हं हुं करून काय काय सांगत होता कि ... नुस्त फुंकर मारली तर खळखळून हसायचा...गळ्याला गुदगुल्या केल्या तर हा आरडाओरडा ..दणादण उड्या काय ..हसून हसून नुसती धमाल...पण १५ -२० मिंट दंगा केल्यावर आली झोप..तर सरळ गळ्यात हात टाकून झोपून गेला...त्याची आई आली व हळूच त्याला घेऊ लागली ... तर जे घट्ट धरलन मला ... त्याच्या आईला म्हटलं असू देत ..तुम्ही बसा मागे ... जेमतेम १ तासाची फ्लाईट त्यात ५० मिनिटे हे चालू...विमान उतरायला लागल्यावर मात्र हवाई सुंदरीने बाळाला आईकडे द्यायला लावले..चाळवलेली झोप आणि त्यात आं ऊ करत गेलं आईकडे...
विमान उतरले ...एरो ब्रिज लागला ...लोकं उठून सामान घेऊन जायला लागले ... माझ्या bag बरोबर मी त्यांची bag पण काढून दिली...’sorry he bothered you a lot!!’ ते दोघेही मला पुन्हा पुनः म्हणू लागले आणि मी मात्र it was a pleasure म्हणत हा पठ्ठ्या उठतोय का बघत होतो...पण नाही..डाराडूर ....
विमाना बाहेर आल्यावर जरा पुढे मागे झालो आम्ही आणि काय कि पण ते एकदम हरवलेच...असतील तिथेच पुढे मागे पण मला एकदम दिसेच्नात...तेचं काय काहीच दिसेना..थांबलो...रुमाल काढला ..डोळे पुसले आणि मार्गस्थ झालो...त्याची पापी घ्यायची राहूनच गेली ...
कुठले ऋणानुबंध असतात देव जाणे ...माडगुळकर म्हणूनच गेलेत...’दोन ओंडक्यांची होते सागरात भेट ...एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ’...
गुस्ताव
गाभा:
प्रतिक्रिया
17 Feb 2015 - 6:58 pm | आदूबाळ
छान लिहिलंय :)
17 Feb 2015 - 6:59 pm | रेवती
किती गोड मुलगा! लेखन आवडले.
आपापल्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी येणार हे वाचून.
17 Feb 2015 - 7:01 pm | मुक्त विहारि
आवडले...
17 Feb 2015 - 7:11 pm | अत्रन्गि पाउस
मूवी / रेवती ताई /आदुबाळ
17 Feb 2015 - 7:15 pm | अजया
किती गोडुलं बाळ!सुंदर अनुभव.
17 Feb 2015 - 7:16 pm | स्वाती२
आवडले!
17 Feb 2015 - 7:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
हृदयस्पर्शी !
17 Feb 2015 - 7:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
गुटगुटीत गुस्ताव बाळ डोळ्या समोर आले :)
17 Feb 2015 - 7:32 pm | एस
वा!
17 Feb 2015 - 7:39 pm | सौंदाळा
खुपच सुंदर अनुभव आणि भावपुर्ण शेवट
17 Feb 2015 - 7:39 pm | मूकवाचक
हृदयस्पर्शी!
17 Feb 2015 - 8:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
:( खरयं.
17 Feb 2015 - 11:34 pm | अर्धवटराव
ते कुत्र्याचं पिलु होतं का काय :)
छान जमली गट्टी :)
18 Feb 2015 - 5:46 am | अत्रन्गि पाउस
आता हे वर्णन ..
18 Feb 2015 - 7:31 am | अर्धवटराव
आणि ७ - ७ महिन्याचं बाळ तडक उडी मारुन तुमच्याकडे येतं... असो.
18 Feb 2015 - 2:32 pm | स्पंदना
डॉल्फीन्सारखी सुळकी मारतात.
अहो अर्धवटराव ७-८ महिन्याच बाळ म्हणजे रांगायला लागलेलं बाळ. निदान पोटाने सरकतात तरी ही बाळे पुढे. जाम धावावं लागत घरात या वयाच्या बाळांपाठुन. वर काय आहे या वर नजर आणि तेथे पोहोचायला सगळ धरुन खेचायच. पायात तर कितीदा येतील.
18 Feb 2015 - 6:18 am | स्पंदना
कुठच्या जन्मीच देणं फेडुन गेला पठ्ठ्या !! किती छान वाटत ना लहाण बाळ आपल्या गळ्यात हात टाकून झोपी गेलं की? निर्धास्त असतात ती आणि त्यांचा तो विश्वास पाहून भरुन येतं.
18 Feb 2015 - 7:23 am | अत्रन्गि पाउस
वाटते ...
18 Feb 2015 - 10:35 am | आकाश कंदील
फार सुंदर लेख, सुरेखच
18 Feb 2015 - 11:25 am | रायनची आई
छान लिहिलय्..अ़क्षरशः डोळ्यासमोर उभे राहिले मस्तीखोर गुस्ताव बाळ..
18 Feb 2015 - 12:53 pm | असंका
अशा गोष्टी कधी कधी फारच हुरहुर लावतात....अगदी सुंदर लिहिलंयत..
धन्यवाद!
18 Feb 2015 - 2:42 pm | मदनबाण
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
18 Feb 2015 - 4:26 pm | पदम
छान लिहिलय.
18 Feb 2015 - 4:58 pm | राही
आपल्या छातीवर शांतपणे विसावलेला एक जीव आणि काही क्षणांपुरते तरी आपण त्याचे रक्षणकर्ते, त्याच्या निर्धास्त निद्रेचे आणि त्यात तो कदाचित पाहात असलेल्या स्वप्नांचे रक्षणकर्ते आहोत ही भावना किती सुखद असते!
18 Feb 2015 - 5:10 pm | अत्रन्गि पाउस
कसलाही 'व्यवहार' नसलेले हे क्षण ... माझ्यापुरते मी अतिशय भरभरून जगतो ...
18 Feb 2015 - 5:05 pm | ज्योति अळवणी
खूप छान लिहिल आहे. माझ्या लेकींच लहानपण आठवल...
18 Feb 2015 - 5:48 pm | मृत्युन्जय
बाळ थोडे मोठे असावे. साधारण ११ - १२ महिन्यांच्या बाळाचे वर्णन वाटले एकुण. पण लेख आवडला.
18 Feb 2015 - 7:28 pm | बॅटमॅन
काय गोड लेख. असे एकदोन प्रसंग आठवले. खूऽऽऽप भारी वाटतं असं काही झालं की.
18 Feb 2015 - 10:16 pm | अत्रन्गि पाउस
धन्यवाद
सगळ्यांनाच धन्यवाद ... तुमच्या प्रत्येक प्रतिसादांनी ते क्षण पुन्हा जगतो आहे ...
19 Feb 2015 - 3:40 pm | सोत्रि
छान अनुभव!
अवांतरः लेख काथ्याकुट मधे का टाकला आहे?
- (गुस्ता'ख') सोकाजी
19 Feb 2015 - 5:14 pm | मितान
गोड लेख !
19 Feb 2015 - 5:42 pm | सांगलीचा भडंग
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले . छान लेख
19 Feb 2015 - 7:25 pm | स्वधर्म
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
- स्वधर्म
20 Feb 2015 - 12:53 am | बॅटमॅन
पुन्हा एकदा हा लेख वाचला तेव्हापासून चेहर्यावरचे हसू काय जात नाहीये. :)
20 Feb 2015 - 1:02 am | आतिवास
अनुभव आवडला.
20 Feb 2015 - 1:39 am | पिवळा डांबिस
छोटासा अनुभव पण अगदी सुरेख शब्दांत लिहिलाय!
वा!
20 Feb 2015 - 1:42 am | श्रीरंग_जोशी
अनुभवकथन आवडले.
प्रवासात अनेकदा अशा गोंडस बाळांशी अंतर राखून खेळण्याची संधी मी सोडत नाही.
तुमच्या मनात दाटून आलेल्या भावना समजू शकतो.
20 Feb 2015 - 8:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नशिबवान आहात. च्यामारी लहान पोरांना काय माझ्याशी वैर आहे काय माहित. अजिबात जवळ येत नाहीत. :(
मी घ्यायला गेलो की ही डायरेक्ट तारसप्तकात रडायलाचं लागतात.
20 Feb 2015 - 2:26 pm | स्पंदना
त्या वेण्या मिश्या अन टोकदार दाढी मध्ये येत असेल काय? ;)
20 Feb 2015 - 2:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चकाचक शेव्हडं असतो कायम =)) ...
का कोण जाणे पण पोरं जामचं घाबरतात मला....आणि नेमकी लहानं मुलं प्रचंड आवडतात मला आणि त्यांना मात्र :(
20 Feb 2015 - 6:41 pm | श्रीरंग_जोशी
माझे तर असे निरीक्षण आहे की बाळ जर मुलगी असेल तर बिनमिशीच्या मामा किंवा काकाकडे जायला ते नाखुष असते.
20 Feb 2015 - 8:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदा कधी नाही ते दाढी वाढवुन माझ्या मामेबहिणीकडे गेलो होतो. त्यादिवशी तिच्या मुलीला रडवायला मला जवळ सुद्धा घ्यायला लागलं नाही =))
बाकी मामा आणि काका...एवढ्या "आत्त्या"चार नको =))
21 Feb 2015 - 1:30 am | सस्नेह
गुस्ताव म्हणजे काय ?
21 Feb 2015 - 1:47 am | श्रीरंग_जोशी
गुस्ताव हे बाळाचे नाव असावे असे लेखनावरून वाटत आहे.
21 Feb 2015 - 7:09 am | अत्रन्गि पाउस
त्या बाळाचे नाव आहे ... स्वीडन मध्ये हे नाव चांगलेच प्रचलित आहे .
21 Feb 2015 - 3:19 am | अर्धवटराव
'गुस्त'णे म्हणजे आवडणे (स्पॅनीश).
त्यावरुन गुस्ताव म्हणजे '( सर्वांच्या ) आवडीचा' असा काहि अर्थ असावा.
21 Feb 2015 - 5:12 pm | कोंबडी प्रेमी
अनुभव ...
22 Feb 2015 - 7:28 am | जुइ
आहे :)
22 Feb 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
22 Feb 2015 - 5:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
ये गुस्ता नही... ये गुस्सा है :)