भ्रमणगाथा -६ हिमगुंफा !
लेखनप्रकार
याआधी: भ्रमणगाथा - ५
आज सकाळीच हिमगुंफा पहायला जायचे होते त्यामुळे लवकरच उठलो.पडदे बाजूला सारल्यावर आपसूकच अऽहा आले!योहानाचे घर डोंगराच्या कुशीत, वळणावळणांची वाट, दारात असलेलं सफरचंदाचं झाडं,उजव्या हाताला हिरवेगार मखमालीचे आवार, त्यात चरणार्या पुष्ट गाई, त्यांच्या गळ्यातल्या किणकिणत्या (त्या कोणत्याशा सिनेमामुळे सुप्रसिध्द झालेल्या)घंटा.. पलिकडेच दाणे टिपणार्या कोंबड्या,वार्यावर डोलणारी रंगीत गवतफुले, मागच्या बाजूला उंचचउंच आल्प्स, शिशिररंगात न्हालेली ती केशरीपिवळी झाडं,थोडी वर नजर गेल्यावर दिसणारे हिरव्या शेंड्यांचे पाइन्स आणि अजून वर पाहिलं की त्या हिरव्यागार पाइन्सवर जणू खोबरं पेरावं तसं शुभ्र बर्फ!नंदनवनातल्याच एका कोपर्यात आम्ही आलो नव्हतो ना? रात्रीच्या अंधारात आणि आंबलेल्या शरीर आणि मनाला हे सौंदर्य दिसल नव्हत.एका अर्थी ते बरंच झालं म्हणा.. सकाळ इतकी प्रसन्नता घेऊन उगवली की पूछो मत!
जिना उतरुन खाली आलो तर योहानाने नाश्त्याची जय्यत तयारी केली होती. घरचे दूध, बटर, दारच्या सफरचंदांचा उत्कृष्ठ केक,शेतातल्या स्ट्रॉबेरीचे मार्मालाडं,अंडीही घरचीच, म्युसली,वेगवेगळ्या प्रकारचे पाव..पूर्वी ती पावही घरीच करायची पण हल्ली तिच्याच्याने होत नाही अशी माहितीही कळली. काल प्रागच्या नादात जेवणाचे तसे हालच झाले होते. मिळेल ते खाल्लं होतं. रात्रीही खूप उशीर झाल्याने खिचडीवर भागवलं होतं. आता मात्र सगळी कसर भरून काढली. सगळ्यांनी ताव मारला.योहानाही आग्रहाने काय हवे ,नको ते विचारत होती आणि आम्ही पण येऊ दे केक, आणा अजून अंडी असे सांगत यथेच्छ खाल्ले.
आता वेर्फनला जायचे होते. जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या हिमगुंफा येथे आहेत. पायथ्यापर्यंत गाडी जाते, तिथून मग साधारण अर्धा तास चढून केबलकारच्या थांब्यापाशी जायला लागते. केबल कारचा थांबा साधारण १००० मीटरवर आहे आणि रोपवेने आपण १५७५ मीटरवर जातो.नंतर परत अर्धा तास चढायचे की १६४१ मीटर उंचीवर हिमगुंफेचे द्वार!
आम्हाला पायथ्याशी सोडून देशपांडेकाका परत गेले. ते तरी किती वेळा पाहतील गुंफा? असा विचार करून आम्ही चढायला सुरुवात केली.कच्चा वळणावळणांचा रस्ता,हिरवेगार पाइन आणि दुसर्या बाजूला दरीतून खोलवर दिसणारी घरांची सुबक रांगोळी!आम्ही जरा तरंगतच चढायला सुरुवात केली आणि टप्पोरे थेंब आले की अंगावर.पाण्याचे ते गार ,बोचरे थेंब नक्को वाटतात त्यापेक्षा बर्फ परवडले. छत्रीचा तर उपयोग नसतोच."अरे देवा,हा बोचरा पाऊस नको रे बाबा, त्यापेक्षा स्नो चालेल.." अशी विनवणी देवाने ऐकली चक्क आणि थोडं अजून वर गेल्यावर हिमवर्षा चालू झाली.शाल्मली आणि डॉन्याचा हा पहिलाच बर्फ! (लहान मुलांना कसं आपण पहिलाच उन्हाळा,पहिलाच पावसाळा आहे म्हणतो ना अगदी तस्सं..)पण कितीही वेळा ही वर्षा पहा,अनुभवा त्यातली गंमत ताजीच राहते.आम्ही सगळ्यांनीच भरपूर आनंद घेत चढणे चालू ठेवले.झाइलबान म्हणजे रोपवेची तिकिटे आता काढायची होती.
रांगेत उभे राहिलो आणि सभोवार पाहिले तर नजर ठरेल तिथे आता फक्त हिरवा आणि पांढरा रंग होता आणि धुक्याची हलकीशी लपेटलेली शाल.. परत अऽहाहा.. आले उस्फुर्तपणे!
रोपवेने आणखी वर गेलो. आता खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते. अजून वर चढायचे होते.रस्ता अजूनच कच्चा,चढणीचा आणि वळणांचा झाला होता आणि खाली दरीत फक्त धुकेच दिसत होते त्यामुळे डोंगराला चिकटूनच चालायचे होते. झाडाझाडांवर लगडलेली हिमफुले पाहून सगळेच लहान झाले. बर्फाचे गोळे एकमेकांना मारत खेळायला सुरुवात झाली. शेवटी गुंफेत लवकर पोहोचायला हवे,येताना हवे तितके खेळू असे एकमेकांना बजावत परत चढू लागलो.
गुंफेच्या दारापाशी फक्त आम्हीच ७ जण!
पाचच मिनिटात दार उघडले. आम्ही तर तिळा,दार उघड! सुध्दा म्हणालो नव्हतो. अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे केल्विनच्या पाठोपाठ आम्ही आत शिरलो. दार परत बंद झाले. आत मिट्ट काळोख. आपल्याला बॅटरी न्यायला,फ्लॅश मारुन फोटो काढायला परवानगी नाही. उष्णतेने आतील बर्फ वितळू नये म्हणून ही काळजी. आम्हाला दोघात एक कंदिल दिला. आता एकूण १४०० पायर्या चढणे उतरणे होते.ते अद्भुत पहायला आम्ही अधीर झालो होतो.बर्फाचा राजवाडा आणि त्यातले ते महाल केल्विन आम्हाला मॅग्नेशियमच्या ज्योतीच्या प्रकाशात दाखवत होता.तो बर्फाचा नैसर्गिक चमत्कार पाहताना किती वेळा डोळे विस्फारले गेले. बर्फामुळे तयार झालेले एका बाजूने पोलार बिअर आणि दुसर्या बाजूने दिसणारा गजराज असे काय काय पाहिले.बाहेर कितीही तपमान असले तरी आतमध्ये मात्र शून्य अंश से. तपमान कायम असते. बर्फाच्या लेयरवरून त्याचे वय कसे ओळखतात तेही केल्विनने सांगितले.
ह्या गुंफांचा शोध अचानकच लागला. १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी ह्या गुंफा जगाला माहिती झाल्या. इस. १८७९ मध्ये अँटोन पोझेल्ट ह्या साल्झबुर्गच्या निसर्ग शास्त्रज्ञाला आप्ल्समध्ये फिरताना ह्या गुंफा सापडल्या.त्याने त्यावर माहितीपूर्ण लेखही लिहिले पण मग विशेष काही घडले नाही.मॉर्कच्या अलेक्झांडरने पोझेल्टचे लेख वाचले आणि तो त्या गुंफापर्यंत गेला आणि मग तिथे जायचा लोकांचा ओघ वाढला.साधारण १९२० नंतरअगदी प्रिमिटिव्ह का होईना चढणीसाठी रस्ते खोदले आणि मग पुढे वर्षभरात कच्चा का होईना रस्ता तयार केला गेला आणि इस. १९५५ मध्ये रोपवे बांधला गेला.
अलेक्झांडरची ह्या गुंफांमध्येच चिरनिद्रा घ्यायची इच्छा होती म्हणून मग त्याचा अस्थीकलश ह्या गुंफांत ठेवला आहे.एका बाजूला त्याचा अस्थीकलश आणि शेजारीच तयार झालेले हिमरुपी शिवलिंग हिंदू तत्वज्ञानाची जाणीव करून देतात.
केल्विन माहिती सांगत होता आणि एकीकडे ते बर्फीय चमत्कार दाखवत होता.एरवी अशी टूअर असते तेव्हा साधारण २५ एक लोकं तरी एका गटात असतात पण आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा फक्त आम्हीच ७ जण होतो आणि त्यांची वेळ झाल्यामुळे त्याने फक्त आम्हालाच घेऊन टूअर सुरु केली. सगळ्या गुंफेत तेव्हा फक्त आम्हीच होतो साहजिकच नियम थोडे शिथिल झाले आणि आम्ही भरपूर फोटो काढू शकलो.
तृप्त मनाने जेव्हा उदंड बर्फ पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा बाहेरची गर्दी पाहून आम्ही लवकर तिथे गेल्याचा विचार किती शहाणपणचा होता हे एकमेकांना सांगत आम्ही आता उतरु लागलो. आता मात्र मुक्तपणे बर्फात खेळत, एकमेकांना बफाचे गोळे मारत, बर्फाचे लाडू भरवत मूलाहून मूल झालो. आणि जेव्हा मन भरले तेव्हा रोपवेत बसलो.
अधिक चित्रांसाठी आप्ल्सच्या कुशीत हे कलादालन पहावे.





वाचन
17394
प्रतिक्रिया
0