ब्रम्हराक्षसाच्या पाठी …

Primary tabs

Maheshswami's picture
Maheshswami in जनातलं, मनातलं
21 Dec 2014 - 5:11 pm

भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची. नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला.

जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो. खरे कारण हे असते की एकतर ती गोष्ट करायला आपल्याला अजिबात आवडत नसते ( सुरु करण्याच्या आधीच आपण काहीतरी पूर्वाग्रह करून घेतलेला असतो) , किंवा एखादी अनामिक भीती असते की ती गोष्ट आपल्याला करायला जमणार नाही. हळुहळू ती गोष्ट अंधाऱ्या खोलीमधला कधीच न पाहिलेला राक्षस बनून जाते. जसजसे दिवस जातात तसतसे आपण त्या खोलीसमोरून रोज जातो पण दुर्लक्ष करतो, घाबरतो. पण तो विचार, कि आपल्याला आज ना उद्या त्याचा सामना करावा लागणार आहे , आपल्याला अस्वस्थ करून सोडत राहतो. दिवसेंदिवस तो राक्षस आपल्या दुर्लक्षावर , भीतीवर पोसत मोठा होत जातो. अस्वस्थपणाची पुट मनावर चढतच राहतात . दुसऱ्या चांगल्या गोष्टींवर पण तो हळू हळू आच्छदायला लाग्तो.

शहाणी लोकं शेवटी कधी न कधी त्याला सामोर जातात, त्या बंद खोलीचं दार उघडतात त्याचा सामना करण्यासाठी , आणि शंभरापैकी नव्याण्णव वेळी तो राक्षस नाही तर एक भित्रा मरतुकडा उंदीर निघतो. मग वाटते कि ह्याला आधीच चेचून टाकले पाहिजे होते, उगाच एवढ्या दिवस वाट पहिली, अस्वस्थ झालो. कितीतरी चांगले क्षण वाया घालवले ह्याच्या नादात. उलट कमकुवत लोकं आपलं सगळं जीवन अशा काल्पोकाल्पित राक्षसांना घाबरून वाया घालवतात. बरीच उदाहरणं पहिली आहेत मी.

हे सगळं सुचलं कारण ऑफिस मधलं एक काम बऱ्याच दिवसांपासून करायचे राहिले होते. रोज चालढकल करीत होतो. उद्यावर ढकलत होतो. खरं कारण होतं कि ते काम मला आजिबात आवडत नव्हते. डेडलाईन तर जवळ जवळ येत होती. दुसरी कामं करताना पण तो विचार नेहमी डोकं कुरतडत असायचा . आज ठरवले की बास ! आता काही झाले तरी हे काम हातात घ्यायचे. आणि आश्चर्य काय २-३ तासांत अर्धे काम संपले. पहिल्याच दिवशी याला सामोरं गेलो असतो तर किती बरं झालं असतं . असो. …

विक्रम जाचक म्हणून एक मित्र होता माझा बारावीत . तो नेहमी म्हणायचा कि मी कुठल्याही विषयाचा अभ्यास दोन वेळा सुरु करतो. म्हणजे पहिला चाप्टर वाचून सोडून देतो. का? कारण Well begun is half done. दोन वेळा सुरु केले कि संपला पूर्ण अभ्यास. निकाल आल्यावर मात्रं त्याला साक्षात्कार झाला कि Aristotle ने त्याची घोर फसवणुक केली आहे. विनोद बाजूला ठेवला तर विक्रम ची थेअरी बरयाच अंशी बरोबर आहे. एखादे काम पहिल्यांदा करावेसे नाही वाटले तर परत करायला घेतले पाहिजे . काय माहिती , दुसर्या वेळी ते एवढे सोपे वाटेल की खरच संपून जाईल .

किती तरी गोष्टींचा मी पण ब्रम्हराक्षस बनवून ठेवला होता . मोठ्या शहरात शिकायला जाण्याचा, लहानपणी घरी एकटा झोपण्याचा , सकाळी हिंस्त्र कुत्री असलेल्या गल्ली मधून मार्ग काढत शिकवणी ला जाण्याचा , इंग्लिश बोलण्याचा , चार लोकांमध्ये आपली मतं मांडण्याचा , अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटण्याचा , न आवडणारी नोकरी सोडण्याचा , पहिला विमान प्रवास करण्याचा , पहिल्यांदा मुंबई ला एकटे जाण्याचा, जेवण बनवायला शिकण्याचा , अगदी जवळच्या मित्रांपासून, व्यक्तींपासून दूर होण्याचा … एक नव्हे हजार गोष्टी. जोपर्यंत त्यांना सामोरं नाही गेलो तोपर्यंत त्या प्रचंड अशक्य वाटायच्या .

भीती अजूनही बऱ्याच गोष्टींची वाटते . नाही असं नाही . पण अनुभूवांती हे माहिती झालाय कि फक्त त्यांना सामोर जाण्याचा अवकाश आहे . त्या आपोआप दूर होतात. घाबरून पळून जातात . ती जाहिरात आहे न कुठली तरी… "डर के आगे जीत है ". एकदम बरोबर !!!

चला मग उघडणार ना ते दार?

म्हणीजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

पैलवान's picture

21 Dec 2014 - 5:34 pm | पैलवान

एकदम बरोबर...
घाबरणं चूकीचं नसतं, ज्याला घाबरतो ते टाळणं चुकीचं असतं. अ‍ॅक्च्युअली, आपण ते टाळत नसतो, तर पुढे ढकलतो. प्रत्येक वेळी थोड्या थोड्या काळासाठी. पण कधी तरी ती गोष्ट बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. मग लवकरात लवकर ती निपटून टाकणे बरे...

बहुगुणी's picture

21 Dec 2014 - 6:34 pm | बहुगुणी

If it's your job to eat a frog, it's best to do it first thing in the morning. And If it's your job to eat two frogs, it's best to eat the bigger one first.

शीर्षक आठवत नाही. बहूदा "अशक्यला गाडून टाका" असे असावे.

मला स्वतःला हाइटो-फोबिया होता.उंचावर गेलो की भीती वाटायची.

पण नंतर व्यवस्थित सराव करून ह्या भीतीवर मात मिळवली.

अर्थात त्यात पण मिपाचा सहभाग ९९% होता.

मध्यंतरी एक विषय आला होता. "बस मध्ये बसलो की च्क्कर येते."

त्यात एका व्यक्तीने लिहीले होते की, वस्तूच्या अंतराचा अंदाज मेंदूला पोहोचला नाही की, चक्कर येवू शकते.त्यामुळे एखाद्या स्थिर वस्तूकडे बघत-बघत प्रवास केला तर चक्कर यायचे प्रमाण कमी होइल.

मी पण उंचावर जातांना हाच उपाय अवलंबला.

आता एक चार-चाकी चालवता आली की झाले.

पैलवान's picture

22 Dec 2014 - 5:31 pm | पैलवान

"त्या " मध्यंतरीच्या विषयाला अडीच वर्षे झाली.
अन् माझा त्रास बर्‍यापैकी नियंत्रणात आहे.

पैलवान's picture

22 Dec 2014 - 5:32 pm | पैलवान

त्यात मिपाचा वाटा / श्रेय १००% आहे!!

विवेकपटाईत's picture

22 Dec 2014 - 7:44 pm | विवेकपटाईत

भीती ही माणसाची सहयात्री आहे जी आपल्याला संकटांपासून सावधान करीत राहते. कार्यातील येणारे अडथळे आपल्या लक्ष्यात येतात. एका रितीने कार्यसाध्य करण्यास सहायकच ठरते.
पण भीतीला जास्ती महत्व देऊन तिच्याशी नाते जोडले तर परिणाम विपरीत होतात.
एवढे लक्षात ठेवले पाहिजे.

मारवा's picture

22 Dec 2014 - 8:10 pm | मारवा

मला भीतीची भीती वाटते.
आणि तुमच्या दोन भित्या थोड्या विनोदि वाटल्या ( दुसरेकी भिती विनोदिच लगती नइतो झुटी लगती )
१- अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटण्याचा
२- जेवण बनवायला शिकण्याचा
पहिलीच नाव मॅरेजोफोबिया अस ठेउ दुसरीच कुकोफोबिया
अय्या यात काय भ्यायच चल मी तुला शिकवते अस म्हणणारी एखादि निर्भिड स्त्री तुमच्या आयुष्यात येवो हि इच्छा (सद नाही फक्त तुम्हाला हव असेल अस गृहित धरुन )
बाकी मॅरेजोफोबिया तसा एका अर्थाने उपयुक्त च आहे. बिइंग सिंगल इज नॉट बॅड अ‍ॅट ऑल !
बाय द वे मृत्युची भिती सर्वात मुलभुत असते अस म्हणतात म्हणजे ती मेंदुत हार्डवायर्ड असते अस म्हणतात
आणि तिची सावली चाळीशीनंतर आयुष्यावर पडते व म्हणुन चाळीशीनंतर अनेक सायकॉलॉजिकल बदल माणसात होत असतात अस एक संशोधन आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2014 - 12:13 pm | टवाळ कार्टा

फोबियासाठी हे पहा

https://www.youtube.com/watch?v=ZJ2HNOnoK1s