मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १

श्रीगुरुजी · · काथ्याकूट
मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न खालीलप्रमाणे (कृपया प्रामाणिक व खरीखुरी उत्तरे द्यावीत. कृपया प्रतिसाद गोडसे/गांधी/मोदी/सावरकर, धर्मनिरपेक्षता, काँग्रेस/भाजप, ब्राह्मण/अब्राह्मण इ. जहाल विषयांच्या वळचणीला नेऊ नये ही नम्र विनंती). (१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का? (२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते? (३) हिंदी चित्रपटाचे नाव सुरूवातीला हिंदीत, इंग्लिशमध्ये व नंतर उर्दु/अरेबिक मध्ये दाखविले जाते. हिंदी वगळता याच इतर २ भाषात नाव का दाखवितात? मल्याळम्, तेलगू, पंजाबी इ. सर्व भारतीय भाषांमध्ये नाव का दाखवित नाहीत? (४) पूर्वीच्या गिअरच्या स्कूटर्सच्या गिअरची रचना जरा विचित्र असायची. पहिला गिअर टाकताना तो उलटा आपल्या दिशेने फिरवायला लागायचा. नंतर विरूद्ध दिशेने फिरविल्यानंतर न्यूट्रल गिअर व नंतर ओळीने दुसरा, तिसरा व चौथा गिअर असायचे. मोटारसायकलचे गिअर देखील असेच असतात. गिअर्सचा क्रम १-न्यूट्रल-२-३-४ असा असायचा. त्याऐवजी गिअर्सचा क्रम न्यूट्रल-१-२-३-४ असा व्यवस्थित क्रमाने का नव्हता? (५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत? (६) एखादा मुलगा/मुलगी खूप खर्चिक मागणी करायला लागला/ली तर पूर्वीची माणसे "तुझे चोचले पुरवायला आम्ही काही लॉर्ड फॉकलंड नाही लागून गेलो" असे उपहासात्मक उद्गार काढून ती मागणी धुडकावून लावत असत. फॉकलंड नावाचे अर्जेंटिना देशाच्या जवळ एक छोटे बेट आहे. पण हा लॉर्ड फॉकलंड कोण होता? तो खूप श्रीमंत आणि उधळ्या होता का?

वाचन 28414 प्रतिक्रिया 0