तात्या ,मनोगतावर परतला....!!!
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले.
मित्र हो.... हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण की......तात्या, पुन्हा एकदा मनोगतावर पोहचणार आहे....किंवा पोहचलेला असेल....?
आम्हाला एक तातडीचा व्य. नि. आला....त्यात म्हटले होते की, तात्या आणि वेलणकर यांची ठाण्यात एक बैठक झाली. ''मनो-मिसळ'' नावाचे दोघांच्या संकेतस्थळावरील साहित्य मिळून एक संकेतस्थळ काढायचे ठरले....!!! आम्हाला 'ल' या चर्चेतील तात्याच्या प्रतिसादावरून त्याचा अंदाज आलाच होता आणि नेहमी 'माझे पहिले प्रेम, पहिले प्रेम' असा तात्याला येणारा झटकाही आम्हाला माहीत होताच.
झालं! तात्या मनोगतावर जाणार हा प्रतिसाद आणि निरोप वाचल्यापासून आम्ही अस्वस्थ होतो. आम्ही ताबडतोब त्यांचे आणि आमचे मित्र धोंडोपंताशी संपर्क केला. त्यांचा गूगल टॉक वर संदेश होता. ''ज्योतिषविषयक कष्टमरांशी बोलत असल्यामुळे सध्या संपर्क करू नये!''
च्यायला आता काय करावे बॉ ! तरी हिंमत करून -
"पंत, एक तातडीचे बोलायचे होते. 'तात्या, मनोगतावर जाताहेत, त्यांचा 'ल' वरचा प्रतिसाद वाचला का ? "
त्यांचे उत्तर यायच्या आत आमचे नेटाचे कनेक्शन डिसकनेक्ट झाले.
''बात करने का टैम अन नेटको............ आया म्हणतात ते असे.....!!!
" नाही पण जायचेच होते तर, कशाला काढले हे संस्थळ, बरे होतो तिकडेच......अनुमती तर अनुमती.....नाहीतर उपक्रमावर माहितीची देवाण-घेवाण तरी चांगली चाल्लेली होती. बरं तात्याचं जालावर लेखक म्हणुन नाव आहे, सगळेच स्वागत करतील मनोगतावर......पण आमचे काय ? आम्ही तर 'फसलेला दिवाळी अंक' म्हणुन, घेतली ना अनेकांची दुश्मनी ओढवून .......आमचा कसा निभाव लागणार तिथे !" असा विचार जेवता-जेवता चाललेला होता........... बायको म्हणत होती. "पोळी वाढू का ?"
आम्ही म्हणत होतो
''तात्याचा हाच स्वभाव आवडत नाही आपल्याला!''
एव्हाना काही पात्रांची ओळख तिलाही झालेली होतीच. काहीतरी गडबड आहे, इतकेच तिला उमजले.
जेवण झाल्यावर.. हजर असलेल्या सदस्यात पाहिले प्रियाली,गुंडोपंत,सहज, धनंजय, मुक्तसुनित,ऋषिकेश, आलेले होते. ताबडतोब त्यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला प्रियालीला व्य. नि. केला....!!!
''तात्या, मनोगतावर चाल्लाय.........काही कळले का ?"
"सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"
चतुर प्रियालीला सर्व माहीत असते....पण विषय कसा टाळायचा ते शिकावे प्रियालीकडून (स्वगत)
"गुंडोपंत, यार तात्या मनोगतावर चाल्लाय ?"
"सर, काही दिवसापासून मला निराशेने पार वेढलंय.....अन, सांगू का ? मिसळपावची जी रंगसंगती आहे, ना....!!! त्यातला लाल रंग पाहिला की, आम्हाला उलटीची भावना होते........तेव्हा.....तात्याला फोन करतो अन विचारतो.......बाकी,........काय म्हणतंय कॉलेज. !!!"
आजकाल गुंडोच्या आणि आपल्या संवादात फारच कृत्रिमपणा आलाय याची जाणीव झाली............!!!
"देवसाहेब, तात्याचं कळलं का ? "
"काय दिलीपराव? आधी तुमचे ते शुद्धलेखन सुधारा राव !"
असा प्रश्न, कोणाचं बरं वाईट झाल्यावर विचारतात?पण ह्यांचे आपले काहीतरीच.
"सॉरी....देव साहेब, तात्या मनोगतावर चाल्लाय ?"
"लेखन ज्यांचे दर्जेदार आहे, त्यांना माणसाचे, संस्थळाचे बंधन नसते. त्यांनी ते पाळू नये. अहो, तात्या, दिलदार आहे, तसा लहरी आहे, संगीताचं ज्ञान आहे, भाईकाकांचा आशीर्वाद आहे, तेव्हा मोठ्या माणसाला जिथे लिहायचे तिथे लिहू दे ! आणि तो वेलणकरही दिलदार माणूस आहे, त्याने नाही का मिसळपावचे सदस्यत्व घेतले. तेव्हा दिलीपराव त्यांना अडवू नका, जाऊ द्या !!! आणि तुम्हीही तिथे लिहीत चला तुमच्या बालपणच्या आठवणी."
हट! कुठून निरोप केला यार या देव माणसाला.......!!!(स्वगत)
विकासरावांशी संपर्क केल्यावर त्यांनी कमीत कमी दोन हजार शब्दापर्यंतचा प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहचवला. त्यात पर्यावरण आणि तात्याचे मनोगतावर जाणे याचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी अनेक संदर्भासहित पटवून दिला होता. त्यांना आम्ही उलट टपाली याचे सारांश लेखन करून पाठवावे अशी विनंती केली. त्यांचा अजून काही प्रतिसाद आलेला नाही.
घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे."
मुक्तसुनित........"तात्याचे जे लेखन आहे, ते वृत्तात बसले पाहिजे, त्यांच्या लेखनाचा पूर्वार्ध हा १२ मात्रांचा तर उत्तरार्ध.......१८ मात्रांचा आहे. सामान्यपणे त्यांचे लेखन आर्या या वृत्ताकडे झुकणारे आहे."
पुढे त्यांचा प्रतिसाद वाचायचा राहून गेला.
"वाचक्नवी, तात्या, मनोगतावर जाणार आहेत त्या बद्दल काय वाटते ?"
"सामान्यपणे, -हस्व आणि दीर्घ असे दोन उच्चार असतात. त्यांना पद्याच्या भाषेत ' लघु-गुरु' असे म्हणतात."
त्यानंतर डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे वाटले......पुढे, त्याच निरोपात 'त' हे दंततालव्य' असे काहीसे अस्पष्ट दिसले.........!!!
"बेला, तात्या, मनोगतावर चाल्लाय ?"
"ये तो होनाही था !!! ये तो होनाही था !!!
प्यार तो होनाही था !!!"
प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."
आम्ही ताबडतोब 'फार सुंदर चारोळी, काय सुंदर आशय आहे' असा निरोप पाठवून मोकळे झालो.
ऋषिकेशाचं 'अमेरिकायन' फेमस झाले होते म्हणुन ते खुशीत होते. "येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
आपल्याला काही फरक पडत नाही."
स्वाती दिनेश.... " मिसळपाव तात्या बरं चालवत होता. पण काही हरकत नाही. जर्मनीचे बाकीचे भाग तिकडेच टाकू"
स्वाती राजेश ला काही फरक पडणार नव्हता.... पाककृती तिकडे टाकल्यावर, लाजवाब पाककृती असा प्रतिसाद आठवणीने येईल हा त्यांचा ठाम विश्वास होता.
वेगवेगळे डॉनांना विचारल्यावर ते म्हणाले, "आम्ही सगळे मूळ मनोगतीच....इथे फक्त सुरामारी करायला येतो."
मित्र हो, यानंतर आम्ही थेट विसोबा खेचरांशी संपर्क केला.
ते म्हणाले, "बिरुटेशेठ आम्ही कुठेही जाणार नाही !"
खरं तर त्यांच्या उत्तराने आमचे काही समाधान झालेले नाही. सर्किटरावला अजून विचारले नाही. ते मार्चएन्ड पर्यंत बिझी आहेत. मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
राजे, त्यांच्या सफरीचा अंतिम दोनशेवा( अंदाजे) भाग मनोगतावर टाकणार असल्याचे सहजरावांच्या खरडी वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलंय, त्याचबरोबर ही मंडळी मिसळपावचे एचटीएमएल कोडिंग ढापून निलकांतला देऊन सेम 'मिसळपाव' चालू करण्याच्या विचारात आहेत.
तेव्हा मित्र हो, सध्याच्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवणे हा आमचा उद्देश होता.
मात्र विसोबा खेचरांनी कुठेही जाऊ नये, त्यांनी इथेच समाधी घ्यावी. येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......अन् विसोबाच्या आठवणीने..... कोणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या व्हाव्यात असे मात्र आम्हांस मनोमन वाटत होते.
सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)
वाचन
23340
प्रतिक्रिया
0