==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
... सुमारे हजार वर्षांपूर्वी बांधलेला प्राचीन स्थापत्यचमत्कार व त्याच्या विखुररेल्या ३ लाख दगडांतून तो परत उभा करण्याचा अर्वाचीन चमत्कार म्हणजे एकावर एक फुकट असे दोन चमत्कार पाहून आणि त्यांचे साक्षीदार असलेल्या दोन वयोवृद्ध वृक्षराजांशी संवाद करून आम्ही पुढच्या आकर्षणाकडे चालू लागलो.
त्या काळी सामान्य मंदिरांच्या, राहण्याचा आणि व्यावसायिक उपयोगाच्या इमारती लाकडी असत. विशाल आकाराच्या आणि त्यातही सुंदर कोरीवकामाने सजलेल्या दगडी इमारती उभारणे हे अमाप संपत्ती आणि सत्ता असणार्या सम्राटांनाच परवडण्यासारखे होते. अंगकोर थोमच्या केवळ मध्य आवारातच एका आकर्षणाकडून दुसर्याकडे जाताना इतक्या मोठ्या दगडी इमारती दिसतात की हे त्यावेळचे फारच मोठे आणि फारच वैभवशाली शहर होते याची खात्री पटते. असेच हे दाट झाडीत लपलेले मंदिराचे गोपुर...
दाट वृक्षराजीमध्ये दडलेले मंदिराचे गोपुर
हस्तीवेदिका
नंतर आम्ही अंगकोर थोमच्या राजमंदिरवेदिका पहायला निघालो. या वेदिका मुख्यतः फौजेची मानवंदना स्विकारताना आणि जनतेला खुल्या असणार्या राजसमारंभांच्या वेळेस सम्राटांच्या आणि राजदरबारातील महत्वाच्या लोकांच्या बैठकीचे स्थान म्हणून वापरल्या जात असत...
नकाश्यात वर्तुळातील 4 या इंग्लिश आकड्याच्या डाविकडे असलेली उभी लांब हिरवी रेषा हस्तिवेदिका दर्शवित आहे
आता त्याकाळचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे त्याच्या दरबाराची वेदिका तशीच असायला पाहिजे ना. सातव्या जयवर्मनने बंधलेली सगळ्यात प्रसिद्ध हस्तिवेदिकेची लांबी आहे तब्बल ३५० मीटर! तिची उंची सर्वसाधारणपणे ३ मीटर आणि रुंदी साधारण ८ -१० मीटर तर काही ठिकाणी १५-२० मीटर आहे. आता या वेदिकेचा केवळ दगडी चौथरा बाकी आहे. छप्पर आणि त्याचा भार उचलणारे खांब लाकडाचे असल्याने काळाबरोबर नष्ट झाले आहेत आणि इतर मौल्यवान साजशृंगार अर्थातच लुटला गेला आहे. वेदिकेच्या विरुद्ध बाजूला संपूर्ण मैदानाच्या कडेला अनेक उंच बुरूज आहेत...
हस्तिवेदिका ०१
.
हस्तिवेदिका ०२
या वेदिकेवरून मैदानात प्रवेश करण्यासाठी पाहिर्या असलेले एकूण पाच चौथरे आहेत. वेदिकेला आणि पाहिर्यांकडे नेणार्या चौथर्यांना सिंह, गरूड आणि नाग यांच्या मूर्तींनी सुशोभित केलेले आहे..
हस्तिवेदिका ०३
सम्राटाच्या खास प्रशस्त मध्यचौथर्याच्या कडांवर विशाल नागराजांबरोबर सिंहाच्या विशाल पूर्णाकृती मूर्तीही आहेत..
हस्तिवेदिका ०४ : सम्राटाच्या पाहिर्यांकडे जाणारा चौथरा
विजयी सैन्य अंगकोर थोमच्या पूर्वेकडील दरवाज्याने प्रवेश करून विजयमार्गावरून या वेदिकेसमोरच्या मैदानात प्रवेश करत असे. प्रशस्त वेदिकेवरुन चालताना तिचे आकारमान आणि समोरचे संचलनाचे भव्य मैदान पाहूनच मन भारावून जाते. मग तिला पूर्णपणे सजवलेले असताना आणि तेथे विजय प्राप्त करून आलेल्या सैन्याच्या भव्य संचलनाचा जल्लोश चालू असताना वातावरण कसे भारून जात असेल याची काहिशी कल्पना येते... आणि हे सर्व हजारभर वर्षांपूर्वी खरेच घडले आहे हे जेव्हा ध्यानात येते तेव्हा केवळ थक्क व्हायला होते...
या वेदिकेच्या मध्यभागी हत्तींची शिल्पे आहेत. या हत्तिंच्या शिल्पांवरूनच या वेदिकेचे नाव हस्तिवेदिका (Terrace of the Elephants) असे पडले आहे. हत्तींच्या सोंडेतून पाणी वाहताना दाखवले आहे. ही शिल्पे जलदेवता इंद्राला वंदना म्हणून स्थापित केली गेली आहेत. त्यांच्या बाजूला असलेल्या पाहिर्या तीन-साडेतीन मीटर उंचीवर असलेल्या कमलासनाकडे जातात...
हस्तिवेदिका ०५
मूळ हस्तिशिल्पांबरोबर भिंतींवर हत्तींची अनेक कोरीवकामे (उठावचित्रे) आहेत...
हस्तिवेदिका ०६
भिंतीवर एका ठिकाणी नागाला पायात पकडलेला गरूड आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिंह यांनी वरचा भाग तोलून धरला आहे असे उठावचित्र आहे...
हस्तिवेदिका ०७
कुष्ठरोगी राजाची वेदिका (Terrace of Leper King)
हस्तीवेदिकेच्या उत्तरेकडे कुष्ठरोगी राजाची २५ मीटर लांबीची इंग्लिश 'U' अक्षराच्या आकाराची वेदिका आहे. या वेदिकेवर बसलेल्या अवस्थेतल्या मनुष्याकृती पुतळ्यावरून या वेदिकेचे नाव पडले आहे. ही मूर्ती कुष्ठरोगी राजाची असल्याची कल्पना तिच्यावर अनेक शतके साचलेल्या नेचे आणि दगडफुलांच्या थरांमुळे केलेली असावी. त्याचबरोबर पाश्चिमात्य अज्ञान आणि वंशव्देष त्यामागे असावेत.
उघड्यावर असलेली मूळ मूर्ती ऊनपावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेली आहे. येथील आताची मूर्ती मूळ मूर्तीची हुबेहूब प्रतिमा आहे. ..
कुष्ठरोगी राजाची वेदिकेवरील मूर्ती
नग्नावस्थेत असलेली ह्या मूर्तीवर जावा शैलीचा प्रभाव आहे. काही पुरातत्त्व संशोधकांच्या मते ही वेदिका राजदहनस्थान असून ती मूर्ती यमाची आहे. या वेदिकेच्या चौथर्याच्या भिंतींवर असलेल्या पाताळवासी व्यक्ती आणि प्राण्यांची उठावचित्रे याच सिद्धान्ताचे समर्थन करतात...
कुष्ठरोगी राजाच्या वेदिकेवरील पाताळवासी व्यक्ती आणि प्राण्यांची चित्रे ०१
.
कुष्ठरोगी राजाच्या वेदिकेवरील तरवारधारी पाताळवासी ०२
मनातल्या मनात ख्मेर सम्राट बनून विजयी सैन्याची राजवंदना स्विकारून भारावलेल्या अवस्थेत असताना मार्गदर्शकाने... "चला, आता अंगकोर वट बघायला जाउया" असं म्हणून भानावर आणले. उत्सुकतेची परिसीमा कशीबशी सांभाळत आम्ही जगातले सर्वात मोठी धार्मिक इमारत असलेल्या जगप्रसिद्ध राजमंदिराकडे निघालो.
(क्रमशः )
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
प्रतिक्रिया
5 Mar 2014 - 8:24 pm | सौंदाळा
मस्तच.
हस्तवेदिकाचे पहीले २ फोटो बघुन शनिवारवाडा आठवला, खर्रर्र्च.
हेच म्हणतो.
लवकर घेऊन चला आम्हाला अंगकोर वट दाखवायला.
5 Mar 2014 - 10:49 pm | मुक्त विहारि
आवडला....
6 Mar 2014 - 3:12 am | खटपट्या
हाही भाग छान
6 Mar 2014 - 7:58 am | रेवती
माहितीपूर्ण लेखन झाले आहे. सगळी भव्य बांधकामे पाहून डोळ्यासमोर तो काळ उभा राहतो.
6 Mar 2014 - 9:05 am | प्रचेतस
सुरेख सफर चाललीय.
आता अंगकोर वट बघायला सज्ज आहे.
6 Mar 2014 - 9:26 am | सुहास झेले
व्वा मस्त .... :)
6 Mar 2014 - 8:50 pm | मूकवाचक
+१
7 Mar 2014 - 11:54 pm | आत्मशून्य
हेच बोलतो!
6 Mar 2014 - 10:01 am | डॉ सुहास म्हात्रे
सौंदाळा, मुक्त विहारि, रेवती, वल्ली आणि सुहास झेले : अनेक धन्यवाद !
6 Mar 2014 - 10:37 am | मदनबाण
मस्तच... आता अंगकोर वट ची वाट पाहतो. :)
6 Mar 2014 - 10:52 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
6 Mar 2014 - 11:55 am | मृत्युन्जय
पुभाप्र. अजुन वेगळे आत्ता काहिच लिहित नाही. नेह्मीप्रमाणे सुंदर तर आहेच.
6 Mar 2014 - 1:06 pm | अत्रुप्त आत्मा
हा ही भाग अतिशय मस्त!
6 Mar 2014 - 2:38 pm | बॅटमॅन
भव्यदिव्य फटू. शनवारवाडा आठवला हे बाकी खरंच. आता अंगकोर वटच्या प्रतीक्षेत!
6 Mar 2014 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण, जेपी, मृत्युन्जय, अत्रुप्त आत्मा आणि बॅटमॅन : धन्यवाद !
6 Mar 2014 - 5:27 pm | सुधीर कांदळकर
सारे शब्द खुंटले. टागोरांच्या भाषेत सांगायचे झाले तर
पाषाणांच्या भाषेने इथे शब्दांना मागे टाकलेले आहे.
पुभाप्र
धन्यवाद.
7 Mar 2014 - 10:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
8 Mar 2014 - 12:01 am | कंजूस
धन्यवाद इ एक्का . छान लिखाण आणि चित्रे यांतून आम्हाला आनंद दिल्याबद्दल .
यावरची मालिका डीडी भारती चानेलवर आजपासून (संध्याकाळी पाच आणि पु०प्रक्षे०दुसरे दिवशी सकाळी सात) सुरू झाली आहे .
8 Mar 2014 - 7:51 am | यशोधरा
वाचते आहे.. हस्तवेदिका किती सुरेख आहेत..
8 Mar 2014 - 6:54 pm | विवेकपटाईत
हा ही भाग मस्त झाला. असे वाटते खरोखरच आपण तिथे फिरत आहोत.
9 Mar 2014 - 10:39 am | डॉ सुहास म्हात्रे
कंजूस, यशोधरा आणि विवेकपटाईत : अनेक धन्यवाद !
9 Mar 2014 - 11:07 am | माझीही शॅम्पेन
लेख माला अर्थातच भन्नाट !!!
वेदीका ह्या शब्दाचा नेमका अर्थ लागला नाही , कृपया सांगाल का ?
9 Mar 2014 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे
वेदिका म्हणजे कोणत्यातरी समारंभासाठी तयार केलेला उंच चौथरा. मलाही हा शब्द नविनच होता. शब्दकोषातून शोधावा लागला. म्हणून लेखाच्या शिर्षकांत त्याचे इंग्लिश भाषांतर (terrace) दिले आहे.
10 Mar 2014 - 9:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
वेदिकांबद्दल अजून थोडे...
स्थापत्यशास्त्रातले उंच चौथरे ही भारतिय द्रविड संस्कृतीने दिलेली आणि ख्मेर संस्कृतीने पूर्णपणे अंगभूत केलेली ठेव आहे. केवळ समारंभासाठी अथवा देवळासाठीच नाही तर संपूर्ण शहरे मानवनिर्मीत उंच चौथर्यांवर वसवणे ही प्रथा सिंधू नदीच्या खोर्यातल्या (हराप्पा-मोहेंजोदरो) संस्कृतीपासूनच सुरू झाली. या रचनेचे अनेक उपयोग होत असत त्यापैकी महत्वाचे खालीलप्रमाणे आहेत :
१. या प्रदेशांतल्या सतत येणार्या पुरांपासून संरक्षण
२. उच्चासनावर असलेल्या राजा, देवूळ, शहर यांचा आपल्या नागरिकांवर आदर/अभिमान वाढवणारा मानसिक प्रभाव आणि शत्रूंवर भितीदायक प्रभाव.
10 Mar 2014 - 8:55 pm | भाते
प्रत्येक वेळी तुमचा धागा वाचल्यावर तेच ते छान, सुंदर, सुरेख, अप्रतिम असे ठराविक प्रतिसाद का द्यायचे?
(तुमच्या धाग्याला अजुन काय प्रतिसाद द्यायचा? :) )
त्यामुळे समाप्त असे दिसल्यावर प्रतिसाद (पुन्हा तेच?) देईन.
आता तुम्हीच नविन प्रतिसाद सुचवा! :)
10 Mar 2014 - 11:02 pm | पैसा
इतिहासाचं वर्णन आणि चित्रे केवळ सुरेख! पुढचा भाग आणखी सरस असणार याची खात्रीच आहे!
तिथली शिल्पे भारतीय शिल्पांचे विषय घेऊन आलेली दिसतात पण त्यांचे अलंकरण खास तिकडच्या पद्धतीचे आहे. बघायला मस्त वाटले.
11 Mar 2014 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
ख्मेर शिल्पकला ही बरीचशी भारतिय शिल्पकलेवर आधारीत आहे. विषय तर हिंदू आणि नंतर बौध्द धर्मातील पुराणकथा आणि इतिहासावर आधारलेले आहेत. पात्रांचा तोंडावळा अर्थातच स्थानिक परिस्थितीप्रमाणे मंगोलाईड आहे.
10 Mar 2014 - 11:13 pm | केदार-मिसळपाव
हा लगेच पाचव्या भागावर प्रतिसाद...
भाग दोन, तीन, चार वाचले आहेतच. प्रतिसाद मात्र दिला नव्हता...
आता साहाव्या भागाची प्रतिक्षा आहे.
11 Mar 2014 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
भाते आणि केदार-मिसळपाव : धन्यवाद !
11 Mar 2014 - 4:42 pm | अमोल मेंढे
एका दमात वाचुन काढ्ले
12 Mar 2014 - 11:14 am | मंदार दिलीप जोशी
मस्त!!!
13 Mar 2014 - 5:28 pm | इशा१२३
सुरेख वर्णन आणि फोटो ..नेहेमीप्रमाणेच...
13 Mar 2014 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
अमोल मेंढे, मंदार दिलीप जोशी आणि इशा१२३ : धन्यवाद !