==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
...असो. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडलेल्या ६०० वर्षे प्रदीर्घ सत्तेत असलेल्या साम्राज्याची भूमी आणि कोणत्याही धर्मातल्या जगातल्या सर्वात मोठ्या मंदिर संकुलाचा देश म्हणून कंबोडियाबद्दल मला खूप कुतूहल होते आणि आहे. ताकदवान आणि संपन्न देशाची बदलत्या कालगतीबरोबर कशी फरपट आणि दुर्दशा होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणूनही कंबोडियाच्या इतिहासात मला रस वाटला. हे सर्व आपल्या सर्वांबरोबर वाटून घ्यावेसे वाटले म्हणूनच जरा विस्ताराने त्याबद्दल लिहिले आहे. या पार्श्वभूमीचा कंबोडियाच्या भटकंतीत आपल्याला तो देश अधिक चांगला समजून घेण्यास मदत होईल.
विमानतळावर आलेल्या मार्गदर्शिकेने हॉटेलवर जाऊन चेकईन करण्यात वेळ घालविण्याऐवजी शहराची सफर तडक सुरू करण्याचा सल्ला दिला. विमानतळातून बाहेर पडेपर्यंत दुपारचा दीड वाजला होता त्यामुळे तिचे म्हणणे मानण्यातच शहाणपण होते. गाडीत सामान टाकून आमची मेकाँग, बसाक् आणि तोन्ले साप या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या कंबोडियाची राजधानी नॉम् पेन् ची सफर सुरू झाली.
नॉम् पेन् ह्या या शहराच्या नावामागे एक दंतकथा आहे ती अशी. चौदाव्या शतकाच्या शेवटी ख्मेर साम्राज्याच्या अखेरच्या काळात चाक्तोमुक नावाच्या (Chaktomuk) खेड्यात राहणार्या दुआन पेन् (Duan Penh) नावाच्या एका वृद्ध स्त्रीला सरपण गोळा करत असता नदीतून एक ओंडका वाहत जाताना दिसला. तो ओंडका पकडून काठावर आणल्यावर तिला त्याच्या पोकळीत बुद्धाच्या चार आणि विष्णूची एक अशा पाच मूर्ती सापडल्या. ही घटना त्यावेळेपर्यंत अंगकोरला असलेली कंबोडियाची राजधानी त्या जागी स्थलांतरित होण्याचा दैवी संकेत समजला गेला. दुआन पेन् ने मूर्ती सापडलेल्या जागेजवळच्या एका टेकडीवर मंदिर बांधून मूर्तींची स्थापना केली. या घटनेवरून चाक्तोमुक गावाचे नाव बदलून नॉम् पेन् (पेन् ची टेकडी) असे झाले आणि त्या मंदिराला वट नॉम् (टेकडीवरचे देऊळ) असे नाव पडले (Phnom = टेकडी; Wat = देऊळ, मोनॅस्टरी). पुढे त्या भविष्यवाणीप्रमाणे राजधानी खरोखरच नॉम् पेन् ला स्थलांतरित झाली.
राजवाडा
राजधानीत आल्यावर आमचा पहिला थांबा होता राजवाड्याचा. गेल्या शतकभरापेक्षा जास्त कालखंडात मूळ लाकडी बांतिय केव (Banteay Kev) नावाच्या जुन्या राजवाड्याच्या मूळ इमारतींचे वेळोवेळी नूतनीकरण केले जाऊन थाइ-कंबोडियन-पाश्चिमात्य अश्या शैलींच्या संगमाच्या नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तोन्ले साप नदीच्या किनार्यापासून जवळच असलेल्या या राजवाड्याच्या विस्तीर्ण प्रांगणात मुख्य राजभवन आणि राजाच्या नेहमीच्या वापराच्या इमारती सोडता इतर ठिकाणी फिरता येते.
सर्वप्रथम राजसिंहासनाची इमारत आपले लक्ष वेधून घेते...
राजसिंहासनाचा प्रासाद (जालावरून साभार)
नावाप्रमाणेच ही इमारत राज्याभिषेक, राजाला भेटायला येणार्या महत्त्वाच्या परदेशी राजकीय व्यक्तींचे स्वागत आणि पारंपरिक राजसमारंभांना वापरली जाते. या इमारतीच्या आत फोटो काढता येत नाही. कंबूज कोरीवकामाचा उत्तम नमुना असलेले सिंहासन अनेक स्तरांचे आहे. त्यातले खालच्या दोन स्तरांत दोन गरूडांनी मुख्य चौथरा उचलून धरलेला आहे. त्यावरचे तीन स्तर नरक, पृथ्वी आणि स्वर्ग यांचे प्रतिनिधित्व करतात. मुख्य आसनाभोवती सोन्याच्या प्रत्येकी नऊ स्तरांच्या चार सुवर्णछत्र्या आहेत आणि त्याचे छत एका नऊ स्तरांच्या पांढर्या छत्रीच्या रूपात आहे. (नऊ हा आकडा सर्व दक्षिणपूर्व व अतिपूर्वेत सर्वात मोठा एकक म्हणूनच सामर्थ्याचे प्रतीक म्हणून राजचिन्हांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत येत असतो. ) सिंहासनाशेजारी एक सोन्याचा चहापानाचा संच आणि त्याबरोबर विड्याची पाने आणि सुपारी असलेला तांबूल-संच राजसिंहासनाच्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून ठेवलेले असतात. राजाच्या मुख्य आसनामागे पण जरा अधिक उंचीवर राणीने बसायचे आसन आहे. राज्याभिषेकानंतर राजा आणि राणीची एका खास पालखीतून राजधानीतून मिरवणूक काढली जाते...
मिरवणुकीची पालखी
चंद्रप्रकाश प्रासाद (Preah Thineang Chan Chhaya)
ही इमारत राजाच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्याप्रती आदर दर्शविण्यासाठी केल्या जाणार्या नृत्यांसाठी वापरली जाते. ही इमारत राजवाड्याजवळून जाणार्या एका मोठ्या रस्त्याला (Sothearos Boulevard) लागून असलेल्या भिंतीजवळ आहे. त्या बाजूला असलेल्या सज्जाचा उपयोग राजा त्या रस्त्यावरून जाणार्या संचलनांचे व मिरवणुकीचे निरीक्षण करण्यासाठी करतो.
चंद्रप्रकाश प्रासाद
रौप्यमंदिर (Silver Pagoda)
राजवाड्याच्या आवारात असलेल्या या बुद्धमंदिराच्या जमिनीवर लावलेल्या चांदीच्या ५,००० फारशांमुळे याचे हे नाव पडले आहे. या मंदिरात उंचावर ठेवलेली बुद्धाची १७व्या शतकातील मुख्य पाचूची मूर्ती आहे. तिच्यासमोर असलेल्या ७५ किलोग्रॅम वजनाच्या पुर्णाकृती मैत्रेय बुद्धमूर्तीच्या अंगावर ९,५८४ हिरेमाणकांनी जडवलेला राजपोशाख आहे. त्यातला सर्वात मोठा हिरा २५ कॅरट वजनाचा आहे. या मंदिराच्या भिंतीच्या बाहेरील भागांवर ख्मेर रामायणातील (रीमकर) प्रसंगांची चित्रे रंगवली आहेत. या मंदिरात चित्रे काढण्यास मनाई आहे. त्यामुळे त्याचे हे फक्त बाह्यदर्शन...
रौप्यमंदिर
आणि हे बाह्य भिंतींवरील एक चित्र...
रौप्यमंदिराच्या भिंतीवरचे चित्र
खेमारीन मोहा प्रसात (Khemarin Moha Prasat)
खेमारीन मोहा प्रसात {Khemarin = Khmer + Indra; Moha = महा; Prasat = प्रासाद / मंदिर} म्हणजे ख्मेरेंद्राचा राजप्रासाद / मंदिर. राजप्रासादाच्या प्रांगणात प्रवेश मिळत नाही कारण ते राजाचे अधिकृत वास्तव्याचे ठिकाण असून तेथे बर्याचदा राजाचे वास्तव्य असते. तेथे राजाचे वास्तव्य असले की महालासमोरच्या ध्वजस्तंभावर ध्वज फडकत असतो, अन्यथा तो ध्वजविरहित असतो. राजप्रासादाचे दुरून घेतलेले हे एक चित्र...
खेमारीन मोहा प्रसात
राजवाड्याच्या आवारातल्या छोट्याश्या संग्रहालयातील दोन गोष्टींनी लक्ष वेधून घेतले...
राणीचा सुवर्णजडीत पोशाख (? साडी)
.
राजवाड्यातील सेविकांचे पोषाख... आठवड्याच्या सात वारांना सात वेगळे रंग!
अजून काही चित्रे...
राजवाड्याच्या प्रांगणाचे एक दृश्य
.
तोन्ले साप नदीच्या बाजूने दिसणारे राजवाड्याचे समग्र-दृश्य (पॅनोरॅमिक व्ह्यू) (जालावरून साभार)
राष्ट्रीय संग्रहालय
राजवाड्यातून बाहेर पडून आम्ही जवळच असलेले कंबोडियाचे राष्ट्रीय संग्रहालय पहायला गेलो...
कंबोडियाचे राष्ट्रीय संग्रहालय
तेथे दरवाज्यात भव्य विष्णूवाहन गरूडराजाने आमचे स्वागत केले...
गरूडराज आणि आम्ही
या संग्रहालयात कंबोडियाच्या प्राचीन इतिहासाचा आणि त्यावरच्या भारतीय संस्कृतीच्या प्रभावांचा खजिना होता. मात्र संग्रहालयात फोटो काढण्यास मनाई असल्याने (प्रत्येक गटाला स्वतंत्र मार्गदर्शक असतो आणि तो/ती कोणीही फोटो काढणार नाही याची खबरदारी घेतो/घेते. ) माझ्याकडे संग्रहालयातले फोटो नाहीत :(
जालावर काही चित्रे सापडली ती खाली देत आहे...
पहुडलेल्या विष्णूचा ब्राँझचा पुतळा
.
उभा विष्णू
.
मिशीवाला विष्णू
आतापर्यंत विष्णूच्या इतक्या मूर्ती / प्रतिमा पाहिल्या होत्या, पण मिशीवाला विष्णू येथेच प्रथम पाहिला !
.
भीम आणि दुर्योधनाचे युद्ध
.
शिवलिंगे
.
नंदी
.
गणेश
संग्रहालयाचे प्रांगण इतके सुंदर होते की तेथे मात्र कॅमेरा गप्प बसू शकला नाही...
कंबोडिया राष्ट्रीय संग्रहालयाचे आवार
वट नॉम् बुद्धमंदिर
या बुद्धमंदिराच्या स्थापनेसंबद्धीची गोष्ट अगोदरच आली आहेच. १३७३ मध्ये स्थापन केलेल्या या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केला गेला आहे. १४३८ मध्ये राजघराणे नॉम् पेन् मध्ये स्थलांतरित होऊन पोन्हिया यत नावाच्या राजाने तेथे नवा राजवाडा बांधल्यावर त्याने या मंदिराच्या टेकडीची उंचीही वाढवून घेतली. मंदिराच्या बाजूला असलेल्या स्तूपात त्या राजाच्या आणि राजघराण्यातील इतर लोकांची रक्षा ठेवलेली आहे...
वट नॉम् कडे नेणार्या पाहिर्या आणि त्यांच्या बाजूचा राजघराण्यातील व्यक्तींची रक्षा असलेला स्तूप
मंदिरात एक मोठी बुद्धमूर्तीच्या आजूबाजूला अनेक छोट्या बुद्धमूर्ती, फुले आणि इतर अर्पण केलेल्या वस्तूंची गर्दी होती...
वट नॉम् चे गर्भगृह
मंदिराच्या एका भिंतीवर हे कोरीवकाम होते. मार्गदर्शिका ते रामायणातले असावे असे म्हणाली. एवढे रथ आणि घोडे असल्याने मला तर ते महाभारतातले दृश्य वाटले...
वट नॉम् च्या भिंतीवरचे दृश्य
मुख्य मंदिराच्या एका बाजूला दुआन पेन् बाईंचे मंदिर होते...
दुआन पेन् ची मूर्ती
मंदिराच्या टेकडीभोवती एक सार्वजनिक बाग आहे. तिच्यात संध्याकाळी फिरायला आलेल्या नॉम् पेन् करांची गर्दी होऊ लागली होती...
वट नॉम् भोवतीच्या बागेतील घड्याळ
आजचा शेवटचा थांबा बघून झाल्याची मार्गदर्शिकेने घोषणा केली आणि दिवसभराचा शीण उसळून आला. कधी एकदा हॉटेलवर परततो आणि गरम गरम शॉवर घेतो असे झाले.
(क्रमशः )
==================================================================
जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७... ८... ९... १०... ११... १२...
==================================================================
प्रतिक्रिया
24 Feb 2014 - 10:29 pm | सूड
वाचतोय. बाकी त्या नव्वारी लुगड्यातल्या मोलकरणी बघून नवल वाटलं.
24 Feb 2014 - 10:58 pm | जोशी 'ले'
+++ असेच म्हणतो..
25 Feb 2014 - 11:21 am | पियुशा
चला एक अजुन एक नविन प्रदेश पहायला मिळ्तोय मस्त !
काका एक विचारु का ? तुम्ही नक्की काय जॉब करता ? तुम्हाला इतके नवे नवे देश पहायला वेळ कसा मिळ्तो ?
1 Mar 2014 - 6:22 pm | रेवती
अगो पिवशे, प्रवासाची, स्थलदर्शनाची मनापासून आवड असलेले डॉक्टर आहेत ते!
24 Feb 2014 - 10:45 pm | मुक्त विहारि
हा पण भाग अप्रतिम...
सुंदर...
25 Feb 2014 - 12:53 am | खटपट्या
सुंदर सुंदर चित्रे बघून झाली आहेत. आता वाचतोय.
इमारती तर एकदम स्वप्नातल्या वाटतात.
25 Feb 2014 - 4:39 am | स्पंदना
फार वेळ लागतो तुमचे लेख वाचायला.
वाचु किती अन पाहू किती अस होतं.
25 Feb 2014 - 7:25 am | सुधीर कांदळकर
वरील प्रतिसादाप्रमाणे खरेच वाचू किती आणि पाहू किती.
पहिला भाग इतिहासाच्या उजळणीसाठी पुन्हा वाचतांना त्यातले एक कळीचे वाक्य प्रकर्षाने ध्यानात आले.
ताकदवान आणि संपन्न देशाची बदलत्या कालगतीबरोबर कशी फरपट आणि दुर्दशा होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणूनही कंबोडियाच्या इतिहासात मला रस वाटला.
25 Feb 2014 - 9:18 am | प्रचेतस
हा भाग पण सुरेख.
मस्त चाललीय सफर.
25 Feb 2014 - 10:05 am | अजया
तुमचे लेख वाचले की असे न ठरवलेले देश पण बघण्याच्या यादीत जाऊन बसतात! तुमचा लेख आणि फोटोंची करामत!
25 Feb 2014 - 2:15 pm | आत्मशून्य
.
25 Feb 2014 - 9:06 pm | आनन्दिता
अगदी अगदी..
25 Feb 2014 - 10:17 am | सौंदाळा
मस्त. वाचतोय
25 Feb 2014 - 10:31 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
25 Feb 2014 - 11:08 am | अत्रुप्त आत्मा
25 Feb 2014 - 8:00 pm | मी-सौरभ
बुवांशी बाडिस
25 Feb 2014 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
सूड, जोशी 'ले', पियुशा, मुक्त विहारि, खटपट्या, aparna akshay, सुधीर कांदळकर, वल्ली, अजया, सौंदाळा आणि अत्रुप्त आत्मा : स्वागतम्. तुमच्या सहभागाने सहलिची रंगत वाढते आहे.
25 Feb 2014 - 4:08 pm | मंदार दिलीप जोशी
सही!!
25 Feb 2014 - 5:29 pm | अनन्न्या
*good*
25 Feb 2014 - 5:40 pm | बॅटमॅन
वाह!! मस्त फोटो आहेत एकदम. आग्नेय आशियाची ओळख तुमच्या लेखांतून हळूहळू होतेय हे खरेच महद्भाग्य!!!! कंबोडिया अतिशय समृद्ध दिसतोय खरेच!
बाकी ते भीम-युधिष्ठिर युद्धाचे शिल्प कै झेपले नै. म्हणजे ते दोघे युद्ध करतात असा कुठला प्रसंग आहे महाभारतात? भीमाने द्रौपदीवस्त्रहरणाच्या वेळेस युधिष्ठिराचे हात जाळून टाकू असे बोलल्याचा प्रसंग आठवतोय, पण डैरेक्ट युद्ध कधी आठवत नाहीये. वजाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.
25 Feb 2014 - 5:48 pm | प्रचेतस
ते नक्कीच भीम-दुर्योधन गदायुद्धाचे शिल्प आहे.
उजवीकडे उरलेले ४ पांडव दोघांचे द्वंद्व बघत आहेत तर डावीकडे (भीम गदायुद्धाचे नियम मोडून खेळत असल्याने) भीमावर धावून जाण्याच्या बेतात असलेला नांगरधारी बलराम व त्याला अडवणारा कृष्ण आहे.
25 Feb 2014 - 5:58 pm | बॅटमॅन
अर्र माझी गफलत झाली म्हणायची बघण्यात. धन्स!
अन त्या दोघांकडेही गदेऐवजी सोटे दिसू र्हायले पण ;)
25 Feb 2014 - 6:10 pm | प्रचेतस
=))
शैलीत बदल असणारच की.
25 Feb 2014 - 6:14 pm | बॅटमॅन
हा, ते बाकी खरंय. :D
25 Feb 2014 - 8:02 pm | मी-सौरभ
नियम भीमाने मोडले की दुर्योधनाने?
25 Feb 2014 - 8:57 pm | प्रचेतस
भीमाने.
कमरेखाली वार केला की कचकून.
25 Feb 2014 - 6:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ बॅटमॅन आणि वल्ली: चित्राचे नाव लिहीताना गडबड झाली आहे *unknw* :( हायला, यकदम् महाभारताची सुधारीत नविन आवृत्ती झाली की *shok*
धन्स अ लॉट. सुधारणा केली आहे.
25 Feb 2014 - 6:26 pm | प्रचेतस
हाहाहा.
भारतीय युद्धानंतर पांडवी माजली असे म्हणता यावे म्हणजे. :)
25 Feb 2014 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
25 Feb 2014 - 7:47 pm | मदनबाण
पहिला भाग वाचला,आणि हा सुद्धा.आता पुढच्या भाग कधी येतो याची उत्सुकता आहे. :)
25 Feb 2014 - 7:55 pm | सुहास झेले
वाचतोय... सफर अनुभवतोय... आता पुढचा भाग :)
26 Feb 2014 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण आणि सुहास झेले : धन्यवाद !
1 Mar 2014 - 5:24 pm | पैसा
तिथल्या सेविकांचे नौवारीसारखे पोशाख आणि राणीची सोन्याची साडी जुना भारतीय प्रभाव दाखवत आहे. तसाच "महाप्रासाद" वर संस्कृतचा प्रभाव स्पष्ट आहे.
विरक्त बुद्धाला सोने आणि हिरे यांनी मढवून टाकलेले पाहून मात्र मजा वाटली. सगळीकडे माणसाचा स्वभाव सारखाच. आपल्या इथेही फकीर साईबाबांच्या मूर्त्यांना मुकुट घातलेले असतातच!
1 Mar 2014 - 6:16 pm | रेवती
सगळं कसं आखीव रेखीव वाटतय. माहिती व फोटू आवडले. नॉम पेन चे स्पेलींग विचित्र असल्याने त्याचा उच्चार कसा करावा याचा प्रश्न काही दिवसांपूर्वी पडला होता तो तुमची लेखमाला सुरु झाल्यावर सुटला.
13 Mar 2014 - 6:30 pm | स्वप्नांची राणी
त्या नौवारीवाल्या सेविका पाहुन एक्दम नौवारी आवडायला लागली. आपली जी नौवारी आहे ना त्यापेक्शा ही जास्त छान आणि खुप कंफर्टेबल वाटतेय.
बाकी फिरण्याच्या लीस्ट मधे अंगकोर वॅट आहेच, तुमच्या लेखामुळे वर आणलय त्याला...
13 Mar 2014 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
पैसा, रेवती आणि स्वप्नांची राणी : अनेक धन्यवाद !
@ पैसा:
विरक्त बुद्धाला सोने आणि हिरे यांनी मढवून टाकलेले पाहून मात्र मजा वाटली. सगळीकडे माणसाचा स्वभाव सारखाच. आपल्या इथेही फकीर साईबाबांच्या मूर्त्यांना मुकुट घातलेले असतातच!!
धर्म नेहमीच राजकारण आणि अर्थकारणातले एक प्रभावी साधन राहिले आहे... दुर्दैवाने :(