मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय -होत्याचे नव्हते!

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
होत्याचे नव्हते
नौरु देशाचा व जगाच्या अर्थशास्त्राचा काय बरे संबध असावा? कदाचित बराच काही ; कारण आज जे तिथे घडते आहे ते कदाचित उद्याच्या भविष्याची नांदी असू शकेल. नौरु एक जगातील छोटासा देश आहे. क्षेत्रफळ केवळ २१ चौरस कि.मी. साधारण भारतातल्या कुठल्याही एका लहानश्या उप-उपनगराएवढा. लोकसंख्या केवळ १४ हजार. त्यातुन पृथ्वीवर जरा अडगळीच्या जागी म्हणता येईल असा , बरीच शोधाशोध केल्यावर ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटे यांच्या दरम्यान कुठेतरी सापडेल असा. फक्त एका गोष्टीबाबत जगात सर्वात संपन्न देश हा! ते म्हणजे फॉस्फेट खत. शतकानुशतकांपासून , उत्तर गोलार्ध ते दक्षिण गोलार्ध असा प्रवास पॅसिफीक महासागरातून स्थलांतराच्या निमित्ताने पक्षी करत आलेले आहेत. या पक्षांच्या , अत्यंत दर्जेदार अशा शेणखताने ह्या देशाची जमीन घडली आहे. हे शेण, ( ज्याला ग्वानो असे म्हणतात) ह्या देशाच्या चुनखडीमधे शतकानुशतके मिसळून इथल्या फॉस्फेट खताचा दर्जा सर्वोत्तम झाला आहे. नौरु सारख्याच ख्रिसमस आयलंड्स नावाच्या देशामधे देखील हे शेणखत सापडते; पण नौरुमधे, त्या देशाच्या जमीनीतील लाईमस्टोन बरोबर मिसळल्याने हे खत जरा उच्च दर्जाचे. गेल्या काही दशकातील ह्या खतखाणींमुळे २१ चौरस कि मि चा हा देश सगळाच खणला गेलाय. आज जवळजवळ ८०% देश खोदकामात गेला आहे व समुद्राचे पाणी ह्या खाणीत भरले आहे. नव्वदीचे दशक हे नौरु साठी लाभदायक होते. शेणखतातुन मिळालेला सर्व पैसा त्या देशाच्या ट्रस्ट मधे जमला होता पण पैशाची/ गुंतवणुकीची योग्य काळजी न घेतल्याने, भ्रष्टाचार व चुकीचे निर्णय यामुळे बराचसा पैसा आता संपला आहे. आज नौरु देश दिवाळखोर आहे. त्या देशाची विमानसेवा एयर-नौरु - जिच्याकडे एकच विमान आहे - ते विमान देणेकर्‍यांनी जप्त केले आहे. इ.स. २००० सालानंतर नौरुची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली. जवळजवळ सगळे फॉस्फेट संपत आले व समुद्राखाली गेले. देश दोन्ही अर्थानी बुडत आहे, काही दशकातील जमवलेला पैसा संपत आला आहे. काहीच वर्षांपुर्वी दरडोई उत्पन्नात [५००० डॉ] श्रीमंत देशात गणला जाणारा हा देश आज पुर्णता परकीय मदतीवर अवलंबून आहे. देशाचा बेरोजगार दर आहे ९०%. १४००० नागरीकांनी आशा सोडली आहे व बहुसंख्य नागरिकांनी ऑस्ट्रेलीयन सरकार कडे आश्रय मागीतला आहे. एखाद्या देशातील सर्वच्या सर्व नागरीक स्थलांतर / आश्रय मागत आहेत हा एक भीषण विनोद म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलीयाचा थंडा प्रतिसाद व नौरुच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलीयाच्या निर्वासीत छावण्यातील आयुष्य हा देखील एका वेगळ्या लेखाचा भाग आहे. मोठे चित्र नौरु देशा प्रमाणे आपली देखील अवस्था होणार आहे का? अंधांधुंद वापरामुळे आपली नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिज तेल, सुपीक जमीन, गोडे पाणी यातील किती गोष्टी आपण झपाट्याने खर्च करत आहोत. कुठलाच देश हे सर्व वाचवण्याचा नेटाने प्रयत्न करत नाही आहे. उलटपक्षी, सर्व देशांची भूमिका हीच आहे की उत्पादन क्षमता, उपभोग्यता वाढावी , अजून अजून व्यापार वाढावा. हेच तर आजचे अर्थशास्त्र आहे. जादा खाणकाम, जादा बांधणी, जादा प्रवास, जादा अन्नधान्य उत्पादन ह्या सर्व गोष्टी जीडीपी वाढवतात व कुठलाही देश कधीच जीडीपी कमी व्हावे असा प्रयत्न करत नाही, कुठलाच देश स्व:ताला मंदीमधे टाकू इच्छीत नाही. बरोबर आहे, कुठलेच सरकार आता आपण कमी काम करु, कमी उद्द्यिष्ट ठेवू, जरा गरीब होऊया असे म्हणून निवडून येउ शकत नाही. असो .सध्याच्या अथशास्त्रावर काहीच परिणाम होणार नाही. हं , जरा कमी वापर करुन पुढच्या १२ पिढ्यांऐवजी १५ पिढीपर्यंत रेटून नेउ शकू इतकेच! कधीना कधी पृथीवरील नैसर्गीक साधनसंपत्ती मानवाने वापरुन संपवली असेल. यंत्राधारित आधुनिक जग जे आपण ओळखतो व गृहीत धरतो, त्याचा इतिहास खरे तर काही शतकांचा आहे - जरी पृथ्वी कित्येक करोड वर्षाची जुनी असली तरी. आता यावर उपाय काय? तर काही विशेष नाही. जे आजवर करत आलो आहे तेच चालू ठेवणे, काही न काही क्लुप्त्या वापरुन आर्थिक मंदी टाळून, आहे ते चालवायचे. हां , उपलब्ध साधनसंपत्ती नक्कीच आपण झपाट्याने खर्च करत आहोत पण दुसरे काही करणे हे देखील सध्याच्या परिस्थीती जरा अनाकलनीयच आहे. युरोपच्या उर्जावापरामुळे अफ्रिकेचे हवामान, जमिनीतुन उत्पादन बरेचसे घटले आहे. क्लायमेट चेंज [स्वतंत्र मोठा चर्चाविषय] व सध्याचे "वापर , केवळ वापर" अर्थशास्त्र अजुन किती काळ आहे तसे जगाचे व्यवहार चालु ठेवेल कोणास ठाऊक? मोठी गाडी, बंगला/ले, जमीनजुमला, मौल्यवान वस्तू इतकेच श्रीमंतीचे निकष न ठरता स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सकस अन्न पुरेसे उपलब्ध असणे ही सुखाची व्याख्या खूप जुनी, अनाकर्षक वाटली तरी जेव्हा नौरु सारखी परिस्थीती येते तेव्हा तेच एक सत्य असे प्रकर्षाने जाणवते. गेल्या तीन वर्षात जगाने अन्नधान्य व खनिज तेल यात जी मागणी, पुरवठा व भाववाढ पाहीली आहे तो वेग निश्चितच भितीदायक आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती बाबत आपण सर्वांनी तारतम्याने भोग घेउन जितके काही वैयक्तिकरित्या जितक्या प्रामाणिकपणे व सातत्याने "खारीचा वाटा" म्हणून करता येईल तितके करुया. आपल्या मुलाबाळांच्या पृथ्वीवरील सुखकर वास्तव्याकरता तितके तरी आपल्याला केलेच पाहीजे. नाही? पाहुणा संपादक : सहज.

वाचन 10698 प्रतिक्रिया 0