मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

अभिजीत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट गेले वर्षभर चालु असलेल्या जगभरातील आर्थिक घसरणमुळे अमेरिकेत आणि जगभरात दीर्घकालीन परिणाम घडतील यात आता काही शंका नाही. वाचकांसाठी हा एक धावता आढावा - २००३ पासुन विविध आर्थिक क्षेत्रात जगभरात तेजीला सुरुवात झाली. विकसित देश अधिक श्रीमंत होत होते आणि विकसनशील देशात मध्यमवर्ग वाढत होता. यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती. अर्थातच यात या सर्व मंडळींचे हितसंबंध गुंतलेले होते. २००७ च्या मध्यास या 'सर्वंकश-सर्वव्यापी' तेजीला ग्रहण लागले. २००५-०६ मधे अमेरिकेत घरांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. 'अर्थव्यवस्थेत येणारा नवीन पैसा, रिटायर होणारे 'बेबी-बूमर्स' आणि वाढत्या मागणीमुळे किमतीत वाढ होत आहे' असे निष्कर्ष काढण्यात आले. २००६ च्या मध्यात हा घरांच्या किमतींचा फुगा फुटला आणि अमेरिकेत अर्थव्यवस्थेला घरघर लागली. घरांच्या किमती कोसळल्या. यावर मात करण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिजर्व बँकेने (आपल्याकडील रिजर्व बँकेचा अमेरिकी अवतार) ३०० अब्ज डॉलर्स बाजारात ओतले. पण त्याला काही फार यश मिळाले नाही. अतिशय वेगाने कमी होणार्‍या घरांच्या किमतींमुळे गॄहकर्जावर वाईट परिणाम झाला. असे होता होता, २००७ सालच्या सुरुवातीस बर्‍याच घरांच्या किंमती त्यांच्यावरिल कर्जांपेक्षा कमी झाल्या. यामुळें अमेरिकेतील मध्यमवर्गावर आर्थिक अरिष्ट कोसळले. आर्थिक दिवाळखोरी किंवा कर्जफेडीअभावी होणारी घराची जप्ती यात मध्यमवर्ग होरपळू लागला. हळूहळू थकीत कर्जांचा बोजा बँकानाही जाणवु लागला. यातुन निर्माण होणार्‍या जोखमीचे निवारण करण्यासाठी बँकांनी तेल, सोने वगैरे सौद्यांमधे गुंतवणूक वाढवली. दुसर्‍या बाजुने, अमेरिकी अर्थव्यवस्था ''कमी झालेली बाजारपेठेतील मागणी -> कमी होणारे उत्पादन -> वाढती बेरोजगार -> कमी झालेले उत्पन -> पुन्हा कमी होणारी बाजारपेठेतील मागणी'' या मंदीकडे जाणार्‍या सुत्राची वाट चोखाळत ढिली पडू लागली होती. अशाप्रकारे गॄह्-कर्ज क्षेत्रात सुरु झालेल्या मंदीने २००७ च्या सुरुवातीस अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रात प्रवेश केला आणि संपूर्ण अमेरिका मंदीच्या विळख्यात सापडली. यातून सुटण्यासाठी फेडरल रिजर्वने व्याजदर कमी करायला सुरुवात केली. इतर विकसित देशांनीही याचे अनुकरण केले. एकाबाजुला गृहकर्जामुळे आर्थिक विश्वात खळबळ उडाली असता ''सब्-प्राईम कर्ज'' या प्रकाराने वॉल-स्ट्रीटची चांगलीच दमछाक होत होती. बँकांसाठी ''सब्-प्राईम कर्ज'' हा प्रकार सामान्य कर्जापेक्षा (प्राईम लेंडिंग) जास्त जोखमीचा असतो. सब्-प्राईम कर्ज अशा ज्या व्यक्ती किंवा संस्था सामान्य कर्ज घेण्यास पात्र होउ शकत नाहीत (उदा. आधीचीच न भागवलेली कर्जे, क्षमतेपेक्षा अधिक कर्जाची मागणी, अपुरी पडणारी कागदपत्रे वगैरे) अशांसाठी सब्-प्राईम कर्ज हा कर्ज उचलण्याचा एक मार्ग असतो. बॅंका सब्-प्राईम कर्जात वाढिव फी, जास्ती व्याजदर यांची मागणी करुन जोखीम नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. बॅंकेने अशा कर्जांचा विमा उतरवणे हा या व्यवहारातला एक सर्वात सुरक्षित मानला जाणारा मार्ग होता. ('होता' असे म्हटले कारण - AIG या जगातल्या सर्वात मोठ्या विमा कंपनीला या 'कर्ज्-विमा' प्रकाराचा सप्टेंबर ०८ मधे इतका मोठा धक्का बसला आहे की १७ सप्टेंबर २००८ ला AIG जवळपास दिवाळ्खोरीच्या उंबरठ्यावर होती. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व बँकेने ८५ अब्ज डॉलर्स ओतून कंपनीच्या ग्राहकांना संरक्षण दिले आहे. येत्या काही दिवसात तिचे राष्ट्रीयिकरण ही केले जाईल.) असो, तर अशी धोकादायक कर्जे बँका देतात कारण त्यांना ग्राहक वाढवायचे असतात आणि वाढत्या जोखमीत जास्त फायदाही होण्याची शक्यता असते (जास्तीचा व्याजदर, फी वगैरे) ... असे असले तरी बँकांनी असे किती व्यवहार करावे हे त्यांच्या जोखमीच्या क्षमतेवर ठरते. दरम्यानच्या काळात, तेल आणि सोने यांच्या जुगारी सौद्यांमुळे (Speculative Futures Trading) इंधनाच्या किमती भडकल्या. त्याचा परिणाम जगभर महागाई वाढण्यात आणि डॉलरच्या घसरणीत झाला आणि जगभरच्या अर्थव्यवस्था अधिकच खिळखीळ्या होण्याची भीती निर्माण झाली. सब्-प्राईम कर्जाचा मार्ग बहुतेक बँका, विमा कंपन्याना तसा फारच आकर्षक होता म्हणून यात खूप मोठ्या प्रमाणात डॉलर्स गुंतवले गेले. परंतू, थंड होत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे थकित कर्जांचे प्रमाण (ग्रुह-कर्जे, सब्-प्राईम कर्जे वगैरे) इतके वाढले की कर्जाच्या राक्षसाने २००८ च्या सुरुवातीला वॉल-स्ट्रीटच्या एकदम 'दादा' असलेल्या बँकांना गिळंकृत करायला सुरुवात केली आणि एका अभूतपुर्व नाट्याचे अंक सुरु झाले. या नाट्यात प्रमुख भुमिका करत आहेत वॉल-स्ट्रीटवरील अतिशक्तिशाली बँका, जगातल्या मोठमोठ्या विमा कंपन्या, न्यूयॉर्क रोखे-विनिमय बाजार, सिक्युरिटिज एक्सचेंज कमिशन (आपल्या सेबीचा अमेरिकी अवतार), फेडरल रिजर्व बँक, अमेरिकी सरकार, इंग्लंड-फ्रांस-स्वित्झर्लँड-सिंगापुर-रशिया-चीन-कोरिया येथील महाकाय बँका, या देशांची सरकारे आणि युरोपियन युनियन. या महाभयंकर नाटकाचे काही अंक खालीलप्रमाणे - - ऑगस्ट ०८ मधे 'फ्रेडी मॅक' आणि''फेनी मे' या गॄहक्षेत्रात काम करणार्‍या' अतिविशाल कंपन्या अमेरिकी सरकार ने २०० अब्ज डॉलर्स घालून राष्ट्रीयिकृत केल्या. - २००८ मार्च मधे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याच्या वेळी 'बिअर-स्टर्न' ही वॉल-स्ट्रीटची नावाजलेली बॅंक दिवाळ्खोरीत जात असल्याने जेपीमॉर्गन या दुसर्‍या बँकेत तिचे विलिनिकरण झाले. हा वॉल-स्ट्रीट वरील पहिला बळी! ३० अब्ज डॉलर्ससाठी अमेरिकी सरकार जामिनदार आहे. यानंतर गेल्याच आठवड्यात - - लेहमन ब्रदर्स या बँकेने दिवाळे फुंकले (६०० अब्ज डॉलर्स ची थकित जोखीम या बँकेवर आहे) - मेरिल्-लिंच ही बँक ऑफ अमेरिकाने ५० अब्ज डॉलर्सला विकत घेतली. - मॉर्गन्-स्टॅनली ही वॅकोविया बँकेशी विलिनिकरणासंबंधी चर्चा करु लागली - AIG या जगातल्या सर्वात मोठ्या विमा कंपनीला फेडरल रिजर्वने ८५ अब्ज अमेरिकी डॉलर्स चे कर्ज देउन दिवाळखोरीतून वाचवले. हे आर्थिक संकट अजुन 'किती बळी घेणार किंवा कसे' याबाबत अजूनतरी तज्ञ मंडळींमधे एकवाक्यता दिसुन येत नाही.

वाचन 5498 प्रतिक्रिया 0