फुस्स...

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
12 May 2013 - 10:53 pm

दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.

आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.

दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.

दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते.
आताशिक सकरात आली जवळ.
मंग आताबी पयलीतच –हाणार की!

म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला”
दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”.

येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!

* शतशब्दकथा

कथाशिक्षणआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

12 May 2013 - 10:58 pm | अभ्या..

वॉव. :)

अभ्या..'s picture

12 May 2013 - 11:10 pm | अभ्या..

अतिवासतै एक छोटीशी शंका.
हा भाषेचा लहेजा बीड-उस्मानाबादचा की बार्शी-पंढरपूरचा?
बाकी तुम्ही अगदी हुकूमत मिळवलेला शतशब्द कथांचा फॉर्म्याट ट्राय करावा असे फार फार वाटू लागले आहे. :)
केवळ अप्रतिम आणि अप्रतिम.

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 11:21 pm | बॅटमॅन

मध्येच नाक खुपसतोय, पण अभ्या अशी भाषा मिरजेत देखील ऐकलेली आहे - फार फरक नाही जाणवला कधी. काय बरोबर का?

अभ्या..'s picture

12 May 2013 - 11:29 pm | अभ्या..

हम्म. भाषेबाबतीत बॅट्याआप्पांची दखल हवीच. ;)
मिरजेत काय पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात चालू शकेल. पण हेच संवाद जरा मनाशी बोलून बघ ना. फरक जाणवेल तुला.
मला तर लगेच जाणवतोय.

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 11:32 pm | बॅटमॅन

आनतेत, विचारतेत, जातेत, इ. रूपे आपल्याकडे इतकी नसतात- आन्त्यात, जात्यात, इ. रूपे जास्त. हा मुद्दा नजरेतून सुटून गेला होता, तो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद अभ्या :)

आता लेखिकाताई जवा सांगतील तवाच खरं कळल म्हना. ;)
आपण बसलाव नुसते वावड्या उडवीत.

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 11:42 pm | बॅटमॅन

:) खरंय.

आतिवास's picture

13 May 2013 - 9:26 am | आतिवास

अभ्या, बॅटमन;
या लेखनमालेतली ही एक मोठी उणीव आहे की यात वापरलेली भाषाशैली एका भौगोलिक प्रदेशातली नाही. कधी ती लातूर-उदगीर वाटते; कधी बीडची वाटते; तर कधी मिरज-सांगलीची.
माझा विविध भागांशी जवळचा संबंध आल्यामुळे या सगळ्या शैलींचे काही ना काही संस्कार माझ्यावर झाले आहेत.
त्यामुळे असं म्हणावं लागेल की या कथेतली छोटी मुलगी अशा एका (काल्पनिक) गावात राहतेय की तिथं या सगळ्या भाषाशैलींचा प्रभाव असणारी भाषा आहे :-)
लेखकाला असलेल्या स्वातंत्र्याचा मी असा फायदा घेते आहे!!

आतिवास's picture

13 May 2013 - 11:34 am | आतिवास

अभ्या,
माझ्या वाचनात तरी मराठीत हा प्रकार आलेला नाही आजवर. इंग्रजी ब्लॉगविश्वात हा प्रकार आणि "फिक्शन ५५" - म्हणजे ५५ शब्दांतली गोष्ट - मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
मराठीतही तो अनेक लोकांनी वापरला, म्हणजे त्यात लिहिले, तर समृद्ध होईल तो फॉर्मॅट (आणि मराठीही)अधिक.
जरुर लिहा, मला वाचायला आवडेल नक्की.
शुभेच्छा :-)

पैसा's picture

12 May 2013 - 11:01 pm | पैसा

हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.

आवडलं!

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 11:06 pm | बॅटमॅन

भारीच!!!

प्यारे१'s picture

12 May 2013 - 11:08 pm | प्यारे१

दत्तु मामा म्हंजी घराचं जावायबाप्पू. सनावाराला याचं, जावयाचा मान घ्याचा, जिऊन जायचं. सपला इषय. कसं?
त्येन्ला काय पडलं पोरगी शाळंत जाती, पास हुती, नापास हुती का आनकी काय त्ये.

लई भारी. आवडली. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

आयला ! म्हंजे, पोरान्लाबी लSSSय अक्कल अस्ती, तेबी तुमाला तोलून बगत्यात, इचार करून आपलं त्वांड उगडावं. हे बी कळंना व्हय जावायबाप्पून्ला ? ;)

खेडूत's picture

12 May 2013 - 11:28 pm | खेडूत

झकास!
एकदम पर्सन्ग समोर 'हुबा केलासा'.

नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा!

(एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?)

(फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे नवरे मामाच असतात, अन सगळ्या मावश्यांचे काका! रुल इज रुल!)
सरळ उत्तर- सगळी नाती ही कुळ-गोत्र वेगळ हे दाखवणारी असतात. वडीलांचा भाऊ हा समगोत्र त्याच्याशी विवाह संबंध होत नाहीत. पण मामा हा आईचा भाऊ वेगळ्या गोत्राचा म्हणुन मामेभावाशी विवाह संबंध चालतात. तेच मावशीच. त्यांच्या घरात आईची बहिण, आईसारखी, म्हणुन तिचे घर समगोत्र मानुन तिथे विवाह केला जात नाही.

अनामिक's picture

13 May 2013 - 12:37 pm | अनामिक

येकदम बरोब्बर! म्हणूनच आम्हाला आत्याच्या नवर्‍याला काका म्हणणार्‍यांचं हसू येतं.

(एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?)

हाहा! कुणी कुणा दुस-या व्यक्तीला काय हाक मारावी हे आपण कसं ठरवणार?

माझ्या ओळखीच्या दत्तात्रय नाव असलेल्या एका गृहस्थांना इतर लोकांबरोबर त्यांची स्वतःची मुलंही "दत्तुमामा" म्हणायची आणि मुलांच्या आईला गाव "मामी" म्हणायचं म्हणून मुलंही आईला "मामी" म्हणायची....

समाज तर्कानुसार चालत नाही - आणि ते किती बरं आहे :-)

व्वा! अतिवास शतशब्दावलीला शत प्रणाम!

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2013 - 6:57 am | अत्रुप्त आत्मा

100 % :-)

प्रचेतस's picture

13 May 2013 - 8:53 am | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/
तुमची या कथाप्रकारावर चांगलीच हुकूमत आहे.

सुहास झेले's picture

13 May 2013 - 1:11 pm | सुहास झेले

यप्प... अगदी सहमत :) :)

यशोधरा's picture

13 May 2013 - 10:12 am | यशोधरा

ब्येस!

मुक्त विहारि's picture

13 May 2013 - 10:37 am | मुक्त विहारि

आवडली....

खबो जाप's picture

13 May 2013 - 10:41 am | खबो जाप

येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!

च्यामारी दत्तुमामालाच एकदम फाट्यावर मारलं किहो …. ह्या ह्या ह्या :-)

गवि's picture

13 May 2013 - 10:46 am | गवि

सुंदर फॉर्मॅट. आत्तापर्यंतच्या सर्व आवडल्या. खास आहेत एकाहून एक.

अडकू नका. प्रयोगशीलता बदलत राहूदे.

तिमा's picture

13 May 2013 - 11:39 am | तिमा

लेख आवडला.

हा अनुभव आम्हा शहरी बाळांनाही आला आहे ?

' कोण तू ", यमीचा लेक का ? कितवीत आहेस ? अरे, नानासाहेब, कधी आलात ?".. वगैरे वगैरे. आम्ही तोंड वासून उभेच! नुसतेच इचारतात.

तिमा's picture

13 May 2013 - 11:36 am | तिमा

न्हान मुलगी म्हनून काय झालं? बराबर समजतंय तिस्ला ! कथा आवडली.

हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.

हा अनुभव आम्हा शहरी बाळांनाही आला आहे ?

' कोण तू ", यमीचा लेक का ? कितवीत आहेस ? अरे, नानासाहेब, कधी आलात ?".. वगैरे वगैरे. आम्ही तोंड वासून उभेच!

लाल टोपी's picture

13 May 2013 - 11:53 am | लाल टोपी

लहान मुलांच्या भावविश्वाला थोडक्यात पण प्रभावी शब्दरुप

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 May 2013 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई ब्येस लिवलंय ! लासच्या दोन वळी जंक्शन हायती. आजून बक्कळ लिवा.

दिपक's picture

13 May 2013 - 12:58 pm | दिपक

एकदम रांगडी कविता ! आवडली :-)

दत्तुमामाचा चांगलाच मामा केला :)

स्मिता.'s picture

13 May 2013 - 2:35 pm | स्मिता.

असे अनुभव बरेच आहेत. ते ही दोन्ही बाजूंचे ;)
काय करणार, बर्‍याच वेळा औपचारीकता पाळावी लागते.

सुधीर's picture

13 May 2013 - 6:04 pm | सुधीर

लई झ्याक! (हांगाशी असं म्हणणार होतो पण शब्दाचा अर्थ माहीत नाही. बहुदा "लय बेस" वा "लई झ्याक" असाच आहे काय? हांगाशी शब्द ऐकायला खूप आवडतो.)

हांगाशी = हां बग अशी= बरोबर, योग्य, भारी, इ.इ. संधी झालाय त्याचा.

सुधीर's picture

13 May 2013 - 6:31 pm | सुधीर

हो हो अस्स आहे होय. शब्द भारीच आहे मग. आवडला.

सोत्रि's picture

13 May 2013 - 8:52 pm | सोत्रि

झक्कास!

- (100 नंबरी) सोकाजी

छोटीच्या मनातल्या भावना मस्त उतरल्यात. त्याला पुरक अश्या भाषेचा साजही खासच.
नावही तोडीस तोड. :)

आतिवास's picture

14 May 2013 - 10:02 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

खरंय! बोलती तोंडे मिळतात अनेक, मात्र ऐकते कान मिळणे अवघडच असते!!
फक्त एवढ्या बारक्या चिमुरडीला हे लक्षात आले हेच कौतुक आहे.

चिगो's picture

15 May 2013 - 4:07 pm | चिगो

पुन्हा एकदा लाजवाब कथा.. आवडली..

अद्द्या's picture

16 May 2013 - 10:22 am | अद्द्या

हाहाहा

मस्त :D

तुमचा अभिषेक's picture

16 May 2013 - 11:33 am | तुमचा अभिषेक

मागचाच एखादा प्रतिसाद उचला आता .. तुम्ही लिहित राहायचे आणि आम्ही वाचत जायचे..