'प्रेम' ही खरेच इतकी मोहक गोष्ट आहे का !
चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनेक तर्हेनी हाताळूनसुद्धा अजून शोध घेणे संपलेले नाही.
--
आत्तापर्यंत असंभव, अग्निहोत्र अशा मालिका आणि गैर, मुम्बई पुणे मुम्बई, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट काढल्यानंतर
दिग्दर्शक सतिश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' नावाचा हा चित्रपट.
त्यांचा गैर सारखा सस्पेन्स थ्रिलर हिट्ट होऊनही ते बहुधा मुम्बई पुणे मुम्बई,
एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले असावेत.
हा चित्रपट जरा वेगळ्या पद्धतीने घेतला आहे.
डॉ. विवेक बेळे नावाचे एक नाटककार आहेत. त्यांचे 'माकडाच्या हाती शँपेन' नावाचे नाटक होते.
ज्यातली पात्रे नुसती एखादी कृती करीत नाहीत तर त्याबद्दल प्रेक्षकांशी बरीच चर्चा करतात.
प्रेक्षकासमोर काही प्रश्न मांडतात काही सिच्युएशन मांडतात. प्रेक्षकही त्या प्रश्नांमधे गुंतून जातो, उत्तरे शोधू लागतो.
त्या नाटकावर 'बदाम राणी ...' हा चित्रपट राजवाडे यांनी केला होता.
त्यामुळे आम्हाला दाट संशय आहे.
डॉ बेळे यांनी वापरलेली ट्रीटमेंटच इथे वापरली आहे. प्रश्नाकडून उत्तराकडे सहजपणे न जाता मधे एक्सपिरीमेंटेशन करत करत कथा पुढे जाते.
पात्रांचा A B C D असा गणितातल्या व्हेरीएबल्ससारखा विचार. उदा. पुस्तक चाकू पेन्सिल काकडी इ.
--
आम्ही विचारणार आहोत राजवाडेंना डॉ बेळे यांच्या 'काकडी' वरूनच सुचले ना 'कलिका' हे नाव.
ही 'प्रेमाची गोष्ट' आहे म्हणजे ही नुसती प्रेमकथा नाही
तर प्रेमाबद्दलची गोष्ट आहे. लव्हस्टोरीमधे प्रेमी, प्रेमिका हे कथेच्या केन्द्रस्थानी असतात तसे इथे नाही
'प्रेम' हेच मध्यवर्ती आहे. इथे प्रेमाबद्दल चिन्तन आहे.
एखादी गोष्ट उठून दिसायला हवी असेल तर त्याची बॅकग्राउंड डार्क करून दाखवली जाते.
एखादा राजा अहिंसेचा पुजारी होता हे सांगायचे असेल तर त्याच्या पूर्वायुष्यामधे त्याने रणांगणात मोठी हिंसा घडवली होती असे सांगावे लागते.
इथेही तसेच -
कहाणीचा शेवट प्रेमात होत असला तरी सुरुवात मात्र अशा ठिकाणी होते जिथे ते नाते तोडायला
निघालेले असतात. प्रेमाचे काही चटके त्यांनी सोसलेले असतात. कथा अशी अप्रेमाकडून प्रेमाकडे प्रवास करते.
बरं दोघेही आपल्या भूमिकेबाबत ठाम. आपणच कसे योग्य याची एक फिलॉसॉफीही त्यांनी तयार केलेली असते.
'नाते तुटले तरी प्रेम संपत नाही'
'प्रत्येकाला हवा असतो हातात घालून चालणारा जोडीदार'
' लग्न म्हणजे रोमिंग फ्री पण लोकल कॉलला मात्र पैसे द्यावे लागतात'
'मी पहिल्यांदा एक चूक केली आणि दुसर्यांदा घोडचूक'
राम नावाचा एक तरुण.
लेखक असतो. धडपडत असतो आयुष्यात. इतर लेखकांच्या लिखाणाचे ट्रान्सलेशन किंवा संस्करण इ. करावे.
निर्माता दिग्दर्शक सांगतील त्याप्रमाणे कथेत बदल, रीमेक करावा अशी त्याची कामे चालू असतात.
पण
कथेमधला उगाच बडेजाव, ओढून ताणून आणलेली नाट्यमयता या गोष्टी त्याच्या मनाला पटत नाहीत.
त्याच्या आयुष्याचेही जणु हेच असते तत्त्वज्ञान. पण यामुळेच यश आणि प्रसिद्धी त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत. त्याची जोडीदार रागिणी मात्र महत्त्वाकांक्षी असते. काही काळ त्याच्या बरोबर राहून ती त्याला सोडून जाते.
राम मात्र नवीन जोडीदार शोधण्याच्या विरोधात असतो. जगरहाटी, नितीमत्ता सोडून काही करायला त्यांचे मन धजत नाही. रागिणी नक्की परत येइल यावर त्याचा ठाम विश्वास असतो. आपल्या आयुष्याच्या कहाणीचा शेवटही तसाच व्हावा अशी त्याची अपेक्षा असते.
रागिणी मात्र रामबरोबर घालवलेली वर्षे ही वाया घालवलेली वर्षे मानते.
अशाच काळात त्याला सोनल त्याला भेटते. तीही अशाच अनुभवातून जात असते.
लग्न या गोष्टीचाच तिने धसका घेतलेला असतो.
पुढे त्याच्या ऑफिसमधे ती सहायक म्हणून काम करू लागते.
ऑफिस टापटीप दिसू लागते. पूर्वी राम चहाला बाहेर जात असे.
आता ऑफिसातच चहा बनवण्याची जबाबदारी सोनल घेते.
छोट्या छोट्या गोष्टी पण ती त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनते.
रामबरोबर काम करता करता त्याची छोटीशी वाक्येदेखील तिच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान बनतात.
त्याला नुसती एक टायपिस्ट नव्हे तर चर्चा करायला, अभ्यास म्हणून चित्रपट पहायला एक पार्टनर मिळते.
'शोले' चित्रपटावरील तिची नोट त्याला अगदी वेगळी, वेगळा दृष्टीकोन असणारी वाटते.
'शोले' चित्रपटाचा विषय निघाला तर आपल्याला काय आठवते... गब्बर, ठाकूर, वीरू, जय त्यांची फायटींग. गाववाल्यांनी ठाकूरला दिलेली साथ. बंदुकींचे आवाज. घोडेस्वार.
पण ठाकूरच्या विधवा सूनेचं काय हा विचार किती जणांच्या मनात येतो. सोनलचं हे वेगळेपण राम हेरतो.
तिला आत्मविश्वास देतो, तिला लिहीतं करतो.
लेखक व्हायचं तर असावं लागतं एक सेन्सिटीव मन आणि ते तुझ्याकडे आहे. असं राम सोनलला सांगतो.
हे वाक्य तिच्या मनावर योग्य तो परीणाम घडवते.
रामला एक मित्र आहे स्वराज. ज्याच्याशी राम मनातल्या गोष्टी शेयर करतो.
सोनललाही मीरा नावाची मैत्रीण आहे.
इतकी वर्षे इतरांच्या लिखाणावर राम काम करत असतो. एक मोठे बॅनर त्याला त्याच्या स्वतःच्या कथेवर काम करण्याची संधी देते.
ती रामच्या स्वतःच्याच आयुष्याची कथा असते. अनेक प्रश्न अनुत्तरीत असलेली.
रामला एकट्याला हा गुन्ता सोडवता येत नाही. सोनल त्याला मदत करते.
--
याच्या मनातली गोष्ट तिच्या ओठावर यावी आणि तिच्या मनातल्या भावनेला त्याने शब्दात मांडावे
इतके त्यांचे ट्युनिंग जमते..
--
मात्र कथेच्या शेवटाकडे येताना जे बदल सोनल सुचवते ते
रामला मान्य होत नाहीत.
रामची बुद्धी एक निर्णय घेते पण मनात मात्र दुसरेच काही असते.
इथे रागिणी 'राम'ला त्याच्या मनात नेमके काय आहे ते समजावते आणि सुनावते,
तू प्रेमाची गोष्ट छान लिहू शकतोस पण प्रेम जगू शकत नाहीस. तूला कळतं पण वळत नाही."
असे छान संदेश यात दिले आहेत.
राममागे एक मोठे बॅनर उभे राहते. तेव्हा रागिणी त्याच्याकडे परत येते.
यश प्रसिद्धी नसताना सोडून गेलेली ती रामला यश मिळताच परत येते असं म्हणायचय का !
प्रेम कसं असतं -
समित हा डॉमिनेटींग आहे. तो सोनलवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो.
तिला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो.
पण प्रेम कसं आहे तर समुद्राकाठच्या वाळूसारखं, मुठीत घट्ट पकडायला जाल तर निसटून जाईल.
गोष्ट साधी सोपी आहे पण सर्वांना आपली वाटू शकेल अशी आहे.
चित्राचा शेवट ज्याप्रकारे होतो तसाच तो व्हावा म्हणून प्रेक्षकही अति आतुर होतात.
हे दिग्दर्शकाचे यश आहे.
इथे काही ठिकाणी टाळ्या मिळवणारे, खटकेबाज संवाद आहेत. पण त्याच्या मोहात दिग्दर्शक अडकलेला नाही.
"चित्रपटाच्या नावातही साधेपणा हवा. नाहीतर शीर्षकातून काही लोक उगाच कोडी घालतात. ज्यामुळे चित्रपट नेमका कशाबद्दल आहे हे कळत नाही" असं स्वतः राजवाडे यातली स्वराजची भूमिका करताना ऐकवतात.
त्यांना 'सही रे सही', अगो बाई अरेच्चा, लोचा झाला रे, जादू तेरी नजर, आईशप्पथ या नावांबद्दल म्हणायचे असावे !
मराठीत केवळ अभिनेत्यांसाठी नव्हे तर ज्या दिग्दर्शकांसाठी चित्रपट पाहीला जातो त्यातील एक सतिश राजवाडे.
--
अतुल कुलकर्णींचे वय काय ?
हा प्रश्न कुठेच पडत नाही. ते नेहमीप्रमाणेच शोभून दिसतात.
अतुल कुलकर्णी यांच्या अभिनयाबाबत काय बोलणार! संवाद छान बोलतातच पण संवाद नसताना
एक्सप्रेशन्सही लाजवाब. म्हणजे रागिणीशी बोलतानाचा कोरडेपणा, सोनलबरोबरची आर्तता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.
--
सागरीका घाटगे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट. उत्कटतेने त्या अभिनय करतात. सागरीका यांचा ताजातवाना अभिनय हेही या चित्राचे महत्त्वाचे आकर्षण मानायला हवे.
प्रतिक्रिया
2 Mar 2013 - 3:10 pm | आदूबाळ
धन्यवाद! परीक्षण आवडलं, जोगसाहेब.
पण लेखाच्या सुरुवातीला "स्पॉयलर अलर्ट" अशी पाटी झळकावून टाका. म्हणजे ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही (माझ्यासारखे) त्यांना इशारा मिळेल.
2 Mar 2013 - 8:00 pm | पैसा
सिनेमा एकदा बघायला हरकत नाही.
2 Mar 2013 - 11:00 pm | आशु जोग
ओके ओके आदूबाळ
म्हणजे ज्यांनी पाहीला नाही त्यांनी हा लेख आत्ता वाचू नये.
चित्रपट पाहील्यावर चर्चेत सामील व्हावे. हरकत नाही.
2 Mar 2013 - 11:46 pm | सुजित पवार
खुपच ओढला आहे असे वाटले..
3 Mar 2013 - 10:20 pm | लौंगी मिरची
अतुल कुलकर्णी खुपच वयस्क दिसला ह्या चित्रपटात .चित्रपट ओढला आहे याशी सहमत .
5 Mar 2013 - 12:10 am | आशु जोग
नेमके काय खटकले ?
24 Mar 2013 - 9:15 pm | लौंगी मिरची
"अतुल ़कुलकर्णी जास्त म्हातारा वाटला " हे जास्त खटकले
ह्म्म आता बोला
24 Mar 2013 - 11:29 pm | आशु जोग
अतुल कुलकर्णीचे वय कळायला पिच्चर नाही पहावा लागत
तेव्हा पिच्चर मधले काय खटकले सांगा ना भो !
24 Mar 2013 - 9:15 pm | लौंगी मिरची
"अतुल ़कुलकर्णी जास्त म्हातारा वाटला " हे जास्त खटकले
ह्म्म आता बोला
24 Mar 2013 - 11:42 am | आशु जोग
लौंगी मिरची
यांनी
चित्रपट पाहीला नाही हे स्पष्टच आहे
इतरांचे प्रतिसाद लोक का चिकटवतात कळत नाही.
24 Mar 2013 - 9:12 pm | लौंगी मिरची
आँ ???
म्हणजे तुम्ही जे लिहिता तेच योग्य मानुन चालायचं का??
नाहि आवडला एवढा तर नाहिच म्हणनार ना ! हि ़काय ़जबरदस्ती बॉ ???
24 Mar 2013 - 12:50 pm | टवाळ कार्टा
सागरीकासाठी बघणार ;)
24 Mar 2013 - 3:21 pm | आशु जोग
आता चित्र जाण्यापूर्वी पहा
24 Mar 2013 - 3:43 pm | मन१
शक्यतो बरे वाटणारे मराठी पिच्चर आवर्जून थेट्रातच पाहतो. हा ही पहावा म्हणतोय. पण अजून थेट्रात आहे की नाही कुणास ठाउक.