पाऊलखुणा....... (भाग - २)

सौरभ वैशंपायन's picture
सौरभ वैशंपायन in जनातलं, मनातलं
3 Sep 2008 - 11:03 pm

दिवस पहिला:
फटफटलं तशी आन्हिकं उरकली. अचानक बापूंनी उजव्या हाताला समोरच्या किनार्‍यावर "गवा!!" असं म्हणतच बोट दाखवलं. पलीकडल्या किनार्‍यावर एक मोठ्ठे धुडच उभे होते. सकाळि ०६:१५च्या कोवळ्या किरणात देखिल त्याचे गुडघ्यापासुन खालचे पांढरे पाय समजुन येत होते. गवा "पांढर्‍या पायाचा" असला तरी आमच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र त्याने चांगली केली होती. मिनलला मी बॅग मधुन दुर्बीण काढुन दिली, पण तोवर गव्याला आमची चाहुल लागली असावी, त्याने परत जंगलाचा रस्ता धरला. साधारण ०७:१५ ला आम्हि कॅमेरा, दुर्बीण गळ्यात आणि पाणी-खाणं असं गरजेपुरतं सामान छोट्या सॅक मध्ये घालुन निघालो. बाकिच सामान त्या जंगलात उघड्यावर टाकुन जाण्यात काहिहि धोका नव्हता. किनार्‍याला धरुनच आम्हि मऊ मातीत प्राण्यांच्या पायाचे ठसे बघत पुढे सरकत होतो. गव्यांचे, अस्वलांचे, रानमांजराचे, साळिंदरांचे झालेच तर टिटवीचे सुध्दा. बापूकाका त्या ठश्यां बद्दल सांगत होते. मग आमच्या पाच जणांत थोडे-थोडे अंतर आपसुकच पडत गेले, आम्हि वेगवेगळ्या ठिकाणी वाघ-बिबट्याचे ठसे शोधु लागलो. मधेच अमितने हलक्या आवाजात इशारा केला. आम्हि जवळ जाताच त्याने हाताने जमिनिकडे बोट दाखवले. मधे बदामासारखि गादि आणि ४ बोटं. बिबट्याचा ठसा होता तो. त्याच्याच आसपास अजुन तसेच ठसे होते. आम्हि त्याचे चारहि पाय मिळतील असे ठसे घेतले, कारण आम्हाला त्याची लांबी काढायची होती. ठसा घेताना फार काळजीपूर्वक घ्यावा लागतो. शिकारी जनावरांच्या मागच्या डाव्या पायाचा ठसा घेतात.

ठश्याची लांबी-रुंदि आणि गादि याची मापे घेतात. तर जनावराची लांबी मोजताना पुढच्या पायाची बोटे ते मागच्या पायाची गादि असे अंतर मोजतात. लांबी मोजल्यावर तो बच्चा आहे कि तरुण आहे कि पुर्ण वाढ झालेलं जनावर आहे ते समजतं. पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्या हा जास्तीत-जास्त ८० सेंमी पासुन ८५ सेंमीपर्यंत असतो. तर मादि साधारण ७८ सेंमी पासुन ८२ सेंमीपर्यंत असते. शिवाय वाघ-बिबट्या नराची बोटे गोलाकार तर मादिची थोडि लांबुडकि असतात, अर्थात नराचा पंजा हा चौरस तर मादिचा लांबुडका-आयताकृती असतो. बर्‍याचदा पुर्ण वाढ झालेला बिबट्या आणि वाघाचा बच्चा यांच्या ठश्यांमध्ये गोंधळ होऊ शकतो, पण वाघाचा बच्चा असेल तर आजुबाजुला त्याच्या आईच्या पायांचे ठसे नक्कि असतात. आधी आम्हि काच त्या ठश्यावर दोन पट्ट्यांच्या सहय्याने ठेवली. काचेवर स्केचपेनच्या सहाय्याने त्याच्या मागच्या डाव्या पायाचा ठसा काळजीपूर्वक उतरवुन घेतला, लगोलग त्याला ट्रेसिंगपेपर वर उतरवलं त्याची मोजमापे घेतली. शेवटि त्याभोवती चार पट्ट्या रचुन त्यावर आम्हि PP ओतले आणि साचा घेतला. सकळिच मिळालेल्या बिबट्याच्या ठश्याने आमचा उत्साह द्विगुणित झाला. पुर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा ठसा होता तो, साधारण ८३ सेंमी होता. बापूंनी पाण्याकडे नजर टाकली - "१७-१८ दिवसांपूर्वीचा असल! पाणी फार दुर नाय!" आमच्या त्या सगळ्या हालचालीमुळे समोरील जंगलातील माकडे सावध झाली आणि त्यांनी ४-६ वेळा मोठ्यांदा "हुप्प-हुप्प-हुप्प" असा कॉल केला. म्हणाजे आता सगळ्या जंगलाला २ पायांचे कोणी संशयित प्राणी त्या भागात आल्याचे समजले होते तर.

तो ठसा घेऊन आम्हि पुढे निघालो, डोक्यावरुन २ टिटव्या जीवाच्या आकांताने ओरडात उडत होत्या. बहुदा आम्हि त्यांच्या एरीआत घुसखोरी केली असावी. टिटव्या दगडांमध्येच त्यांची अंडि घालतात. ती सहजासहजी समजुन येत नाहि. त्यासाठिच त्यांचा सगळा आटापिटा चालला होता. पुढे गेल्यावर एका ठिकाणी भरपुर जांभळाअच्या बीया एकगठ्ठा पडल्या होत्या. बापू म्हणाले -"अस्वलाची विष्ठा", अर्थात आजुबाजुला अस्वलाच्या बर्‍याच पाऊलखुणा होत्याच. मधुनच सांबारांचे "फुर्र-फुर्र-फुर्र" असे तर भेकरांचे ’फ्रॅक-फ्रॅक-फ्रॅक-फ्रॅक" असे पोटातुन काढलेले आवाज येत होते. एखादे शेकरु पण मधुनच ओरडत ओरडत होते. विविध पक्ष्यांच्या आवाजाने सगळे रान गजबजले होतेच, पक्ष्यांबद्दल फारसे ज्ञान नसल्याचा किंवा बरोबर कोणी पक्षीतज्ञ नाहि याचे फार वाईट वाटल तेव्हा. मधुनच ६-७ पोपटांचा थवा डोक्यावरुन किनार्‍यापार व्हायचा. चालुन थकल्यावर एके ठिकाणी बसलो होतो डाव्या हाताच्या ओहोळात अमीत उतरुन ठसे शोधत होता. तिथेहि त्याला बिबट्याचे ठसे मिळाले. आणि जवळंच सांबाराची हाडं पण होती. परत येताना समोरुन एक लॉंच येताना दिसली. ती बघुन बापूकाका आम्हाला बसायला सांगुन झपझप खाली उतरले. आम्हि झाडाच्या सावलीत बसुन हलक्या आवाजात चित्तम्पल्ली आणि माडगुळकरांच्या रानकथांबाबत गप्पा मारत होतो. मिनलने कृष्णमेघ कुंटे यांचीहि आठवण करुन दिली. या गप्पात वेळ निघुन गेला. नंतर २०-२५ मिनीटांनी आम्हालाहि बापूंनी खाली बोलावले. तिथे आमच्या बरोबरच एक ग्रुप जो झुंगटि पूर्वेला उतरला होता तो जमला होता. त्यांना काय झटाका आला होता माहित नाहि, पण त्यांना पश्चिम झुंगटि पाहिजे होतं. बहुदा आम्हि यायच्या आधी त्यांचा बापूं बरोबर काहितरी वाद झाला होता. पण आम्हाला खाली बोलावल्यावर आम्हि सांगितले - "आमच्या बरोबर मुलगी आहे! टॉवर आम्हालाच पाहिजे! मोहिते साहेबांनीच तिच्यासाठिच टॉवर असलेला झुंगटिचा भाग आम्हाला दिलाय!!" वाद एका वाक्यात खलास. पण तो ग्रुप तिथुन परत गेला नाहि. आम्हि आदली रात्र जिथे काढली होती तिथेच थोडं वर त्यांनी त्यांच बस्तान टाकलं.

आम्हि आमच्या कॅम्प वर परत आलो. मी आणि अमितने आमच्या आणि मिनलच्या सॅक टॉवरखाली आणुन टाकल्या. आमच्या त्या ठिकाणा पासुन टॉवर २ मिनीटावर दिसत होता. पण त्या भुसभुशीत मातीतुन वर चढणे जरा त्रासदायक प्रकार होता. उन्हाळ्यात कोयनेचे पाणी कमी होत जाते, ते मागे सरताना लाल मातीच्या पायर्‍याच बनवत जाते. पण त्या कच्च्याच असतात. एका वरुन पाय घसरला की पुढच्या ४ पायर्‍या तुटतात. २ मिनीटावर दिसणारा टॉवर त्या मातीच्या रस्त्यामुळे १० मिनीटावर गेला. शेवटि कसरत करत मिनल, तेजस देखिल वर आले. बापुकाकांना ते नविन नव्हतं ते सराईत पणे वर आले. आमची दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली. जेवणासाठि समोरच्याच एका झाडाखाली चुल मांडली. मी, अमित आणि तेजस मिळुन कांदे-बटाटे आणि लसुण कापुन मिनलला देत होतो. मिनलने झकासपैकि खिचडि केली, त्या आठ दिवसात मिनल आमची अन्नपुर्णा होती. कापाकापीच आम्हि बघायचो, शिजवायची मात्र तिच. खुप दिवसांनी असं चुलीवरचं खायला मिळालं. चुलीवरच्या जेवणाची चवच छान असते. जेवण झाल्यावर त्याच झाडाच्या सावलीत आम्हि ताणुन दिली. आम्हाला बापुंचा त्यांच्या बरोबर काय वाद झाला ते माहित नाहि, पण पूर्ण दुपारभर बापु बड्बड करत होते. आम्हि दोन्हि ग्रुप एकमेकांना समोरासमोर सहज पाहु शकत होतो.

दुपारी साधारण ०४:३० च्या आसपास टॉवर मागच्या जंगलातुन बापू आनंदाने धावत आले - "चला लवकर, तिथं, त्या तिथं, मागं पट्टेर्‍याचा मोठा ठसा हाय!" आम्हि लगबगीनं सगळ ठसा घेणाचे सगळे सामान आणि कॅमेरे उचलले आणि झपाझप त्यांच्या मागुन निघालो. ठश्या शेजारी बसत बापू म्हणाले - "असे या बाजुनी या! बा! बा!! बा!!! कसला पंजा हाये बघा त्यो! पट्टेरीचाच! अजुन कोणाचा??" दुपारी ०४-०४:३० देडिल जंगलात अंधारुन आलं होत. सुर्यास्ताला अजुन २ तास तरी होते. बाकि जाऊ दे, आम्हाला आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर सुर्यकिरणे पसरलेली दिसत होती. पण आमच्या आजुबाजुला इतकि दाट झाडे-झुडुपे होती कि एकहि कवडसा आमच्या आसपास पडत नव्हता. आम्हि फोटो काढायचा प्रयत्न करत होतो. त्या अंधार्‍या जागेत नीट फोटो येत नव्हता, फ्लॅश वापरला कि फोटो सपाट यायचा. शेवटि मी माझ्याकडे असलेल्या हेडटॉर्चने २-३ कोनातुन गादिची आणि बोटांची सावली येईल असे फोकस टाकुन फोटो घेतले. मनासारखा किंवा त्यातल्या-त्यात बरा फोटो आल्यावर आम्हि त्याची मोजमापे घेऊ लागलो. १५X१५ सेंमी चा म्हणजे अर्ध्या फुटाचा पंजा होता. चौरस पंजा म्हणजे नराचा पंजा. आणि त्याची स्ट्राईड होती १२६ सेंमी. म्हणजे जवळ जवळ सव्वाचार फुट. आता त्यापुढे साधारण २ फुटि तोंड आणि मागे तीन साडे तीन फुट शेपुट जोडलं कि झाला नाकापासुन शेपटापर्यंत १० फुटि वाघ तयार. बापुंनी परत विचार करुन सांगितलं - " २ दिवसापूर्वीच असंल!! असल्या मातीत ४ दिसापेक्षा जास्त नाय खुणा टिकत. आत्ताच बघा किती त्रास होतोय आपल्याला? असंल २ दिवसा पूर्वीचाच असल!!" त्या ठश्याचा आम्हि साचा घेतला, मोठ्या आनंदान आम्हि परत आलो.

रात्री बापू सांगत होते - "मागं असाच एकदा सांजच्याला निघालो होतो, पाऊस लागला होता, कड्यावरुन असा वळलो तर समोर वाघरु, मला पाहुन बुझलं आणि काय वाघच त्यो, गुरगुरला नी अश्शी दानकन उडि मारली दरीत, खाली थोड्या झाडोर्‍याचा आवाज झाला आनी कड्याखालुन दुर-दुर सरकत गेला. अस्सा काटा आला अंगावर!! पण म्या बघितलं, त्याचे पंजे उठले हुते, ते मोठ्या पानानं झाकले, जवळच त्यानं आखाडा(लोळण्याची जागा) केला हुता त्ये बी बघितलं, दुसर्‍या दिवशी हापिसात सायबाला जाउन समद सांगितलं. लगेच गाडि घेऊन माझ्या मागं ४ साहेब आलं. त्यांची खात्री पटल्यावर मला कोल्हापुरच्या हापिसात नेऊन मला सर्टिफिकट दिलं. सगळ्या मजुरात म्याच लई वेळा वाघ बघितलाय! दर महिन्यात एकदा तरी दिसतोच. वाघ दिसला, तो वाटेवरच असेल तर हात जोडुन म्हणतु - तु तुज्या वाटेनं जा, मला माज्या वाटेनं जाऊ दे!!" हे सगळ सांगताना बापूंच्या चेहर्‍यावरच्या अनुभवी सुरकुत्या लयीत हलत होत्या. मधुनच क्षणभर थांबुन डोळे मितुन, मानेला होकारार्थी झटाका देत बोलायची त्यांची सवय आम्हाला देखिल सरावाची झाली होती. हे सगळं ऐकताना मिनलने एकिकडे मॅगी शिजवायला ठेवले होते. शिवाय सकाळाची बरीच खिचडी देखिल उरली होती. शिवाय बापू काकांची काल रात्रीची एक तांदुळाची भाकरी देखिल उरली होती. भाकरी अगदि कडक झाली होती पण अमित ने ती मॅगीत टाकली खिचडि संपवे पर्यंत भाकरी परत मऊ झाली होती, कोणीहि आत्तापर्यंत तांदुळाची शिळी भाकरी आणि मॅगी अशी डिश कल्पनेतहि खाल्ली नसेल ती आम्हि प्रत्यक्ष खात होतो. ’पानात पडेल ते आणि सगळ्यांना सारख्या प्रमाणात’ या नियमाने सगळ्यांनी निमुट्पणे ती भाकरी-मॅगी डिश मटकावली.

जेवण झाल्यावर सामानाची आवरा-आवर करुन आम्हि टॉवरकडे मोर्चा वळवला. टॉवर मोठ्ठा होता. आम्हि पाचहि जण झोपल्यावरहि बॅग, पाण्याच्या बाटल्या, पाऊच बुट हे सगळं ठेवायला बरीच जागा होती. संध्याकाळपासुनच रातवा काऽपूऽ-काऽपूऽ-काऽपूऽ चा ताल धरुन बसला होता. आणि अजुन ४-५ ठिकाणहुन त्याला तशीच साथ मिळत होती. रातकिडे देखिल अविरतपणे आपली किरऽऽऽऽऽऽऽऽऽकिरऽऽऽऽऽऽऽऽऽ ची ड्युटि न थांबता पार पाडत होते. पहिला दिवस आजुबाजुच्या वातावरणाशी जुळवण्यात गेला. सुर्यास्त झाल्या्वर जेवण सोडुन काहिच काम नव्हतं. जेवण करुन आम्हि ०९:१५ ला टॉवरवरती आलो आणि गप्पा मारता मारता ०९:४५ ला सगळे आडवे. मुंबईत आम्हि ०९:४५ ला जेवतो आणि १२:००-०१:०० ला झोपतो. इथे TV, Internet, Mobile, Walkman असे काहिच नव्हते, त्याची गरजहि नव्हती. आज काय-काय झालं याची उजळणी मनातल्या मनात चालु होती. जागा अनोळखि होती म्हणा किंवा आपण जंगलात आहोत म्हणुन म्हणा टॉवरवर देखिल नीट झोप लागत नव्हती. दर २ तासांनी जाग येतच होती. त्यातुन मी कडेला झोपल्याने लोखंडि टॉवरच्या पट्ट्या मधुनच खांद्याला, कोपराला गाऽऽऽर चटका देत होत्याच. मग परत कुशीवर व्हायचे, पांघरुण नीट करायचे आणि झोपायचा प्रयत्न करायचा हे वारंवार होत होते. मधे एकदा तेजसच्या कृपेने कालचाच तो पक्ष्याचा अलार्म देखिल वाजला, मग त्याची मान मुरगाळायचा कार्यक्रम देखिल पार पडला. अखेर कंटाळुन ०५:४५ ला मी आणि मिनल उठुन बसलो.

-सौरभ वैशंपायन्(मुंबई).

वावरसमाजजीवनमानभूगोललेखअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 Sep 2008 - 11:22 pm | यशोधरा

अजून आहे ना पुढे?

रामदास's picture

3 Sep 2008 - 11:40 pm | रामदास

असायला हवे.मला तर वाघ दिसायला लागला आहे.

शिवा जमदाडे's picture

4 Sep 2008 - 9:38 am | शिवा जमदाडे

तुमचा हा अनुभव खूप आवडला आणि असे काहीतरी करावे असे वाटू लागलेय.....
या गणणेसाठि सहभागी होण्यासाठी काय करावे लागते? मार्गदर्शन करावे.....

सौरभ वैशंपायन's picture

4 Sep 2008 - 5:13 pm | सौरभ वैशंपायन

दर उन्हाळ्यात सरकार तर्फे हि गणना केली जाते.

मे महिन्यात जी बुध्द पौर्णिमा असते त्याच्या साधारण एक आठवडा आधी हि गणना सुरु होते. व बुध्दपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी संपते.
पौर्णिमा अश्यासाठी कि रात्री जंगल कसे असते? रात्री कोण-कोणती जनावरे पाण्यावर येतात? याचे निरीक्षण करता येते.

बाकी महाराष्ट्रात सर्व अभयारण्यात या गणना होतात. तुम्हि त्यात सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सहभागी होऊ शकता.

शिवा जमदाडे's picture

5 Sep 2008 - 8:33 am | शिवा जमदाडे

धन्यवाद सौरभराव.....
भारतात परतल्यावर नक्किच एकदा करावे असे काहीतरी आहे हे........ नक्किच करणार....

मेघना भुस्कुटे's picture

4 Sep 2008 - 11:15 am | मेघना भुस्कुटे

मजा येतेय वाचायला.
लिहा लवकर. :)

स्वाती दिनेश's picture

4 Sep 2008 - 12:05 pm | स्वाती दिनेश

फार छान! पुढचे लवकर लवकर लिहा हो..उत्सुकता ताणली आहे,:)
स्वाती

पावसाची परी's picture

4 Sep 2008 - 3:41 pm | पावसाची परी

सौरभा
छान् आहे अनुभव पण आणि त्याचे लिखाण पण
याचा तरी पुढचा भाग नक्की आणि लवकरात लवकर टाक रे.....

-तुझी पन्खी

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Sep 2008 - 5:37 pm | डॉ.प्रसाद दाढे

खूप छान लिहिता॑य बर॑ का. आणखीन येऊ द्या

सुमीत भातखंडे's picture

4 Sep 2008 - 5:52 pm | सुमीत भातखंडे

खूप छान लिहीलय.
अजून येउद्यात.

मिंटी's picture

5 Sep 2008 - 12:42 pm | मिंटी

मस्त लिहिलं आहे............

पुढचा भाग कधी टाकणार ???????????

महेश हतोळकर's picture

5 Sep 2008 - 1:03 pm | महेश हतोळकर

फोटो पण येऊ द्या!

दुर्गविहारी's picture

20 May 2016 - 5:49 pm | दुर्गविहारी

उद्या बुध्द्पौर्णिमा. त्यानिमीत्त धागा वर आणत आहे.

काय जबरदस्त अनुभव आणि केवढ्या तपशीलात लिहिलाय!! अनेक धन्यवाद लेखकाला (आणि धागा वर आणणार्‍यांना सुद्धा)!