“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्या आवाजात.
“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय? झाली का नोंदणी करून?”, इति भुजबळकाका.
“कसली नोंदणी आणि कसले काय? फोटो काय, हाताच्या बोटांचे ठसे काय, डोळ्याचे फोटो काय, काही विचारू नका. परत कांपूटर वर माहितीची खातरजमा आपणच करायची. मीच सगळे वाचून बरोबर असे सांगायचे तर मग त्या कांपूटरच्या खोक्याचा खर्च का केला म्हणतो मी सरकारने? पैसे कमावायचे धंदे सगळे!”, घारुअण्णा तणतणत.
“घारुअण्णा, तुम्हाला नेमका कशाचा त्रास झालाय? बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले त्याचा की तांत्रिक गोष्टीतले काही कळत नाही त्याचा? अहो माहितीत काही तृटी राहू नये म्हणून तुम्हाला खातरजमा करायला सांगतात ते!”, इति नारुतात्या.
“नारुतात्या, भोचकपणा सोडा! काय गरज आहे म्हणतो मी ह्या कार्डाची? इतकी कार्ड आहेत काय फरक पडतो त्याने? दर थोड्या दिवसांनी एक नवीन कार्ड, किती कार्ड सांभाळायची माणसाने? ऑ?”, घारुअण्णा तावातावाने.
“हो ना! माझे कार्ड आले आहे त्यावर जन्म तारीख नाही, नुसतेच जन्म वर्ष आहे. असल्या अर्ध्या माहितीला काय जाळायचेय?”, चिंतोपंत.
“अहो, पण आधार क्रमांक तर तुम्हाला मिळाला आहे ना? मग झाले तर!”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.
“झालेsss आले हे सरकारचे प्रवक्ते, तरी म्हटले अजून कसे गप्प!”, घारुअण्णा वैतागून.
“च्यायला घारुअण्णा, नेमके झाले काय ते तर सांगा, उगाच का त्रागा करताय?”, बारामतीकर जरा खट्टू होत.
“बारामतीकर, सरकारी यंत्रणा एवढी प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड, आधार कार्ड कसले? निराधार कार्डच झाले की!”, चिंतोपंत.
“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने.
“घारुअण्णा, उगाच पराचा कावळा करू नका! विषयाला धरून बोला,” इति भुजबळकाका.
“अगदी बरोबर बोललात भुजबळकाका! अहो सरकारी योजना आहे ती. त्यामागे सरकारची एक निश्चित भूमिका आहे.”, बारामतीकर शांतपणे.
“अहो पण पॅनकार्ड आहे ना मग? हे परत कशाला आणखीनं?“, चिंतोपंत.
“अहो चिंतोपंत पॅनकार्ड हे करदात्यासाठी आहे. करवसुलीमध्ये आणि कर परतावा देण्याच्या कामात सुसुत्रीकरण यावे म्हणून उपयोग आहे त्याचा. त्याचा उपयोग इंडियात, अजूनही भारतात दोन वेळच्या जेवण्याची भ्रांत असलेली बहुसंख्य जनता आहे जिला पॅनकार्ड चा काहीही उपयोग नाही. त्यामुळे पॅनकार्डचा वापर ठराविक वर्गापुरताच मर्यादित होतो.”, इति भुजबळकाका.
“बरं! मग मतदान ओळखपत्र आहे ना! मग हे नवीन खूळ कशाला?”, घारूअण्णा परत तावातावाने.
“अहो, मतदान कार्ड ओळखपत्र आहे, मतदान करताना दाखविण्यासाठी. त्या कार्ड योजनेद्वारे एक यूनिक नंबर तुम्हाला मिळाला नव्हता किंबहुना तसा विचारच तेव्हा केला गेला नव्हता. त्या वेळेच्या देशाच्या आर्थिक आणि तांत्रिक स्थितीप्रमाणे काढलेली ती एक योजना होती. आधार कार्ड हे, कार्ड पेक्षा जास्त महत्त्वाचा असा 'यूनिक नंबर' तुम्हाला देते”, भुजबळकाका.
“यूनिक नंबर म्हणजे काय हे कोणी सांगेल काय?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.
“एकमेव क्रमांक जो फक्त तुम्हालाच मिळालेला असेल. दुसर्या कोणालाही तोच क्रमांक मिळणार नाही.“, बारामतीकर.
“हॅ, मग त्यात काय एवढे? माझा मोबाइल नंबर पण वापरता आला असती की, नाहीतरी आता MNP ने तोच क्रमांक कायम ठेवता येऊ शकतो.”, घारुअण्णा हसत, एकदम जग जिंकल्याच्या आवेशात.
“अहो घारुअण्णा, मोबाइल क्रमांकाचे प्रमाणीकरण एका वेगळ्याच हेतूने झालेले आहे, त्यामागे तांत्रिक प्रोटोकॉल्स आहेत. शिवाय ते नंबर दर कंपनीगणिक बदलणारे आहेत, त्यावर सरकारचा ताबा नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे जे तुम्ही लक्षात घेणे जरूरीचे आहे, ते म्हणजे, मोबाइल क्रमांक जरी तुमचा असला तरीही तो सार्वजनिक असतो किंवा तो तसा करावाच लागतो. पण तुमचा आधार क्रमांक हा तुमचा वैयक्तिक असणार आहे फक्त तुमच्याच वैयक्तिक आणि शासकीय वापरासाठी. त्यामुळे मोबाइल क्रमांक त्या कामाचा नाही.”, भुजबळकाका शांतपणे.
“म्हणजे मग त्या न्यायाने रेशनकार्डही बादच होते म्हणायचे.”, नारुतात्या हताश होत.
“अरेच्चा, म्हणजे हा नंबर आमच्या अमेरिकेतील थोरल्याच्या ‘सोशल सेक्युरीटी नंबर’ सारखाच झाला की मग!”, चिंतोपंत एकदम समजल्याच्या आनंदात.
“भले शाबास! सगळ्या एतद्देशीय गोष्टी कळण्याकरिता पश्चिमेकडच्या सोनाराकडूनच कान टोचले जाणे आवश्यक आहे म्हणायचे आजकाल!”, भुजबळकाका गालातल्या गालात हसत.
“पण सोकाजीनाना इतकी सगळी कार्ड हे तुम्हाला तरी पटते आहे का?” नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात.
“सगळ्यात आधी मला सांगा, UIDAI ची वेबसाइट किती जणांनी वाचली आहे ही तणतण करण्यापूर्वी? भुजबळकाका हा प्रश्न तुम्हाला नाही बरं का. बाकीच्यांसाठी आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.
“त्याने काय झाले असते?”, घारुअण्णा रागाचा पारा किंचित कमी करत.
“अहो घारुअण्णा, तिथे सर्व माहिती दिली आहे ह्या योजनेची. आधार हा एक १२ आकडी यूनिक नंबर म्हणजे केवळ तुमच्यासाठी तयार केलेला ‘एकमेव क्रमांक’ आहे जो भारत सरकारच्या वतीने Unique Identification Authority तयार करते आणि ज्या कार्डावरून तुम्हाला का क्रमांक कळवला जातो ते आधार कार्ड. हे आधार कार्ड तुमचे ओळखपत्र नाही तर फक्त तो यूनिक कोड धारण केलेले कार्ड आहे. त्याच साईट वर ‘आधार का?’ आणि ‘आधारचे उपयोग’ ह्याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे.”, सोकाजीनाना.
“त्या माहितीआधारे, आधार हे अजून एक कार्ड नाहीयेय तर प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला एक फक्त ‘एकमेव क्रमांक’ आहे. त्याचा आताचा प्रमुख उपयोग आणि उद्दिष्ट, समाजातील दुर्बल घटकांचे ‘आर्थिक सबलीकरण’ असा आहे. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत रिटेल बँकिंग सुविधा पुरविणे आणि त्याद्वारे सरकारी योजनांची आर्थिक मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचवणे, हे आहे. पुढे व्यापक तत्त्वावर, सर्व भारतीय जनतेकडे हा आधार क्रमांक पोहोचल्यावर, KYC, Know your Customer ह्या प्रक्रियेचे एकसुत्रीकरण हे ह्या योजनेचे व्हिजन आहे. आता कुठे ह्या योजने अंतर्गत नोंदणीकरण सुरू झाले आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांच्या मार्फत एक योग्य अशी ‘इको सिस्टिम’ ह्या आधार क्रमांकाच्या अनुषंघाने उभी राहणार आहे. ज्यामुळे फक्त आधार क्रमांक हीच ओळख सर्व व्यवहारांसाठी होणार आहे.”, सोकाजीनाना.
“अर्थात, हे सगळे उद्या व्हावे अशी तुमची सर्वांची अपेक्षा असेल, तर तो मूर्खपणा आहे. एक अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही असलेल्या, म्हणजे काय तर, प्रत्येक वेळी विरोधक बनून कशालाही विरोधच करणे, अशा देशात अशी योजना राबण्याची कल्पना करणेच हेच एक धाडस आहे. त्या योजनेचे स्वप्न हे नक्कीच चांगले आहे. आता ती योजना यशस्वी करणे न करणे हे सरकारच्या हातात नसून आपल्या हातात आहे. काय पटते आहे का? चला, चहा मागवा! आज मलाही जायचे आहे आधार नोंदणीकरणासाठी”, मंद हसत सोकाजीनाना.
भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.
प्रतिक्रिया
15 Feb 2013 - 12:15 am | श्रीरंग_जोशी
जनतेच्या सोयीसाठी दुरगामी परिणाम करणारी कुठलिही योजना राबवताना सुरूवातीला जरा गैरसोय होणारच; पण तिचे भविष्यातील लाभ पाहता थोडिशी कळ सोसायला काय हरकत आहे? हा संदेश परिणामकारकपणे दिल्याबद्दल सोकाजीनानांचे अनेक आभार.
15 Feb 2013 - 12:28 am | किसन शिंदे
ऑ! ह्या वेळेला भुजबळकाकांनी ऑर्डर केली चहाची?
आधार योजनेमागे सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन असेलही कदाचित पण हि योजना यशस्वीपणे राबवण्यात सरकारला अपयश आलंय हे ही तितकंच खरं आहे. २० मे २०११ ला मी आणि माझ्या एका मित्राने आधार कार्डासाठी नोंदणी केली होती, त्याच्या तब्बल वर्षभराने माझं कार्ड आलं तर त्या मित्राच्या आधार कार्डाचा तर अजूनही पत्ता नाहीये. आणि अजुनही त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका अनेक नागरीकांना पडतोच आहे.
इतक्या महत्वाच्या योजनेचं सुरूवातीचं कॅंपेनिंग तितक्याश्या जोरात झालंच नाही. सुरूवातीला या योजनेचं महत्व, त्याचे फायदे हे लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या न पोहचल्यानेच कि काय ३१ मार्च २०१२ ला बंद होणारी आधारची केंद्र अजुनही चालु आहेत आणि सकाळी ५ वाजल्यापासूनच त्या केंद्रांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात.
15 Feb 2013 - 12:39 pm | प्रसाद१९७१
नंदन निलेकणींना इतके वर्ष युरोप अमेरिकेतल्या customers ना लुटण्याचेच माहिती होते. स्वताच design करायची आणि मग change request मागुन अजुन डॉलर छापायचे.
इथे सर्व स्वताचीच जबाबदारी आहे म्हणल्यावर सगळे कर्तृत्व उघडे पडले. ना requirement capture जमले, ना design, ना capacity management, ना project management, ना stake holder management. काम वेळेत पण पुर्ण नाही. Infosys मधे बरे होते, काम जितके लांबेल तितके time & material वर छापता यायचे डॉलर.
टेक्निकली पण जमत नाहीये. biometric आहे तरी पण एकाच माणसानी जर दोन ठिकाणी नोंदणी केली तर दोन आधार कार्ड पाठवतात.
आता देशाचा च पैसा वाया घालवतायत.
15 Feb 2013 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार
मिपाकरांनी ताबडतोब एक ठराव करून 'श्री. निलकेणी' ह्यांना पदच्युत करून, त्यांचा कारभार 'श्री.प्रसाद१९७१' ह्यांच्याकडे सोपवावा.
15 Feb 2013 - 2:29 pm | संजय क्षीरसागर
नंदन निलकेणीकडून हा टेक्नोसॅवी माणूस देशहिताचं काहीतरी करेल अशी अपेक्षा होती त्यानं पुरती वाट लावली.
15 Feb 2013 - 2:47 pm | सोत्रि
त्यांनी नेमकी काय आणि कशी वाट लावली हे कळेल का?
-(वाट बघणारा) सोकाजी
15 Feb 2013 - 2:54 pm | संजय क्षीरसागर
तशी बातमी मी वाचलेली आहे. जी प्रार्थमिक माहिती पॅनकार्ड, बँक खाती, रेशनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, वोटर्सकार्ड, पासपोर्ट यावरनं सहज उपलब्ध होती ती इंटीग्रेट करायला हवी होती.
15 Feb 2013 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
हा संपूर्ण गाडा 'निलकेणी म्हणे.. दल हाले..' अशा तत्वावरती चालतो असे वाटते आहे का तुम्हाला ? झारीतले शुक्राचार्य विसरलात का काय ?
15 Feb 2013 - 2:59 pm | नाना चेंगट
पण असल्या गोष्टी असणारच हे गृहीत धरुन अंमलबजावणी व्हायला हवी होती ना? की सरकारी खात्यात गेल्यावर भल्या भल्यांची वाट लागते हेच खरे?
15 Feb 2013 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार
प्रश्न तुमचे आणि उत्तर देखील तुमचेच.
15 Feb 2013 - 3:21 pm | नाना चेंगट
उत्तर तुमच्याकडून अपेक्षित होते
15 Feb 2013 - 3:06 pm | संजय क्षीरसागर
ही कुड हॅव डन अ मिरॅकल.
इन्कमटॅक्सच्या इ-फायलिंगच अत्यंत बिकट काम (देशव्यापी) जिथे फायनॅन्स मिनिस्ट्री इतक्या खंबीरपणे आमलात आणू शकते तिथे आधारकार्डासारख्या गोष्टीची काय कथा?
15 Feb 2013 - 3:26 pm | प्रसाद१९७१
कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो ची कामे केलीच ना श्रीधरन साहेबांनी, ह्या सर्व शुक्राचार्यांना सांभाळत्.ती तर ह्या आधार पेक्षा कीतीतरी अवघड होती.
बर त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. ११० कोटी लोकसंख्येला कीती मशीन लागतील, काय hardware लागेल हे तर शुक्राचार्यांनी चुकीचे सांगीतले नव्हते ना. आणि मी आधी सांगीतले तसे, हे unique ओळखपत्र पण नाहीये. तुम्ही २ वेळेला नोंदणी केली तर दोन कार्ड येतात ती सुद्धा वेगवेगळ्या नंबरची.
आणि काहीच जमत नसेल तर माणुस राजिनामा देउन मोकळा तरी होतो ना.
राजकारण्यांना शिव्या घालता घालता स्वता ला खुर्ची सोडवत नाहीये का?
15 Feb 2013 - 2:51 pm | नाना चेंगट
या न्यायाने पंतप्रधान म्हणुन थत्ते किंवा विकास यांनाच नेमावे लागेल.
(थत्ते /विकास वळख राहूं द्या गरीबाची)
15 Feb 2013 - 2:36 pm | नाना चेंगट
हा हा हा
>>>स्वताच design करायची आणि मग change request मागुन अजुन डॉलर छापायचे.
ठळक केलेला भाग नक्की का ? ;)
15 Feb 2013 - 2:42 pm | प्रसाद१९७१
स्वताच डिझाईन चुकवायची असे म्हणायचे होते.
3 Jul 2017 - 12:38 pm | आशु जोग
आता भोगा
15 Feb 2013 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार
मला ते अमेरिकेची अर्थव्यवस्था, उंदीर मारण्याच्या विभाग वैग्रे वैग्रे आठवले.
15 Feb 2013 - 4:17 pm | सर्वसाक्षी
सोत्रि,
मागीतलेल्या माहितीपेक्षा अधिक सखोल माहिती, प्रमाणपत्रे, पत्त्याची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब इत्यादी सोपस्कार पाडल्याव्र दिले जाणारे पारपत्र अधिक ठाम वाटते. आधार साठी जी माहिती हवी ती जर पारपत्रात उपलब्ध आहे आणि विश्वासार्ह मानली आहे तर पारपत्र धारकांना थेट आधार कार्ड का दिले जायला प्रत्यवाय कसला? त्यांची सोय होईल आणि सरकारचे काम कमी होईल.
दुसरी गोष्ट अशी की अनेक सरकारी ठिकाणी एक उपचार म्हणुन आधारकर्डाची केवळ प्रत मागीतली जाइल. मग त्या द्वारे ठसे व बुबुळे यांची तालमेळ कशी होणार? माझ्या आईला (वय ७९) हाताचे ठसे नीट येत नाहीत या कारणास्तव आधार्कार्ड नाकारले गेले. धुणी भांडी करुन पोट भरणार्या बायका/ पुरूष, हातमागावर काम करणारे, काही विशिष्ठ रासायनिक प्रक्रियांवर आधारीत काम करणारे वगैरे अनेकांना ठसे स्पष्ट नसण्याचा संभव आहे. मग हे लोक निराधार ठरणार का?
केवळ युआयडी हवा म्हणुन अनेक सरकारी पत्रे असताना (रेशन/ पॅन/ निवडणुक/ पार/ घरपट्टी वगिरे वगैरे) निव्वळ क्रमांकाखातर जर आधार कार्ड दिले जात असेल तर त्याला ठ्शांचे बंधन का? पारपत्र, जे नागरिकत्व, पत्ता, जन्मतारिख वगैरेंचा निर्विवाद पुरावा मानले जाते त्यातसुद्धा ठसे घेतले जात नाहीत मग इथे का? वर ठसे व बुबुळे नोंदवुनही हा नाअग्रीकत्वाचा पुरावा नाहीच!
या पत्रावर ' हे ओळखपत्र आहे, नागरीकत्वाचा दाखला नाही' असे लिहिले आहे. याचा अर्थ काय? रेशन कार्ड व पॅन कार्ड हे कुणालाही मिळु शकते असे सरकार अप्रत्यक्षपणे मान्य करत आहे का? जर तसे असेल तर त्या दोन पुराव्यांच्या आधारे दिलेल्या आधारकार्डाची वैधता काय?
एकदा आधार कार्ड् मिळाले की अन्य कुठल्याही कागदपत्रांची गरज संपुष्टात येइल का? इतर ओळखपत्रे अवैध ठरतील का?
सर्व नागरीकांना आधार कार्ड मिळालेली नसता निवृत्तीवेतन, वेतन, इस्पितळात प्रवेश वगैरे असंख्य ठिकाणी या आधार कार्डाची सक्ती का?
या सक्तिचा उपयोग सरकारी कर्मचारी अजाण लोकांकडुन चिरीमिरी उकळ्ण्यासाठी करणार नाहीत असे वाटते का? (सक्ती नसतानाही ती आहे असे भासवुन)
आपला या विषयावर सखोल अभ्यास असल्याने माझ्या बाळबोध शंका आपल्याला विचारीत आहे.
15 Feb 2013 - 7:38 pm | मदनबाण
माझ्या आईला (वय ७९) हाताचे ठसे नीट येत नाहीत या कारणास्तव आधार्कार्ड नाकारले गेले. धुणी भांडी करुन पोट भरणार्या बायका/ पुरूष, हातमागावर काम करणारे, काही विशिष्ठ रासायनिक प्रक्रियांवर आधारीत काम करणारे वगैरे अनेकांना ठसे स्पष्ट नसण्याचा संभव आहे. मग हे लोक निराधार ठरणार का?
आधारकार्डसाठी जे ठसे ओळखण्याचे मशिन आहे ना... तेच मुळी नल्ला क्वालिटीचे आहे ! मग लोक ठश्याविना निराधारच राहणार ना !
पारपत्र, जे नागरिकत्व, पत्ता, जन्मतारिख वगैरेंचा निर्विवाद पुरावा मानले जाते त्यातसुद्धा ठसे घेतले जात नाहीत मग इथे का? वर ठसे व बुबुळे नोंदवुनही हा नाअग्रीकत्वाचा पुरावा नाहीच!
हल्लीच मी माझ्या पारपत्राचे नुतनिकरण करुन घेतले तेव्हा बोटांचे ठसे घेण्यात आले.आता पारपत्रासाठी ठसे आवश्यक आहेत्,त्याशिवाय तुम्हाला पारपत्र जारी होणार नाही.
जाता जाता :--- एक वेळ हिंदुस्थानी नागरिकास आधार कार्ड मिळावयाचे नाही,परंतु बेकायदेशीर बांग्लादेशी घुसखोरांना याचा आधार नक्कीच मिळेल असे वाटत आहे.
13 Bangladeshis held, one with illegal Aadhar card
http://www.youtube.com/watch?v=lGVdNTOkikk
Illegal Bangla nationals held, 1 has Aadhar card
'Millions of Bangladeshi intruders trying to get Aadhar cards'
15 Feb 2013 - 10:17 pm | संजय क्षीरसागर
आधारकार्ड हा सरकारचा नवा भंपकपणा आहे
15 Feb 2013 - 11:57 pm | दादा कोंडके
सहमत.
अशा कुठल्याही प्रकल्प चालू करायच्या आपण योग्यतेचे व्हायला अजून काही दशकं जावी लागतील. लोकसंख्या आणि साक्षरता यांच्यावर काम केल्याशिवाय असे प्रकल्प सरकारनी हाती घेउ नयेत.
बरं कोणताही प्रकल्प चालू केला की त्याचा 'माइलस्टोन रिव्यु' घेउन डेल्टा करेक्टीव अॅक्शन घेणं, प्लॅन 'बी' तयार करणं किंवा नंतर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तो प्रकल्प बंद करणं असं कोणत्याही सरकारी प्रकल्पाबाबत घडताना दिसत नाही. कारण याची सुरवात करताना याच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसिद्धीतून राजकीय फायदा उठवला जातो. आणि नंतर तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो व नामुष्की नको म्हणून पाण्यासारखे पैसे खर्च करून पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर पुर्वनियोजित बजेटमध्ये तो पुर्ण झाला नाही तर ते अपयशच.
16 Feb 2013 - 12:14 am | आजानुकर्ण
सहमत
15 Feb 2013 - 6:42 pm | नाना चेंगट
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18499450.cms
15 Feb 2013 - 7:07 pm | चिगो
हे जर असे असेल तर, "Aadhar isn't mandatory" असं UADAIच्या साईटवर का दिलंय? बाकी, माझ्या ह्या शंकेचं उत्तर द्याल का कुणी प्लिज..
15 Feb 2013 - 11:12 pm | पैसा
त्यांचा डाटाबेस करप्ट झालाय आणि काही लोकांना (बहुतेक २०१२ मधले) ही आधार कार्डे परत काढावी लागणार आहेत!
15 Feb 2013 - 11:44 pm | बॅटमॅन
ओ उगीच घाबरवताय काय, पहिल्या खेपेत आली की हो नीट कार्डे घरला :(
16 Feb 2013 - 11:18 am | सुहास..
“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने. >>>
घारूअण्णांशी दणदणीत सहमत ;)
बाकी नेहमीचेच ...